Thursday, September 18, 2025

जागतिक मानवाचे स्वप्न कसे पूर्ण होणार?



व्यवस्था बदलत राहतात. कोणतीही व्यवस्था अमरतेचा पट्टा घेऊन जन्माला आलेली नाही हे आपण मागील लेखात पाहिले. सुजाण नागरीक आपल्या भविष्यातील पिढ्या अधिकाधिक चांगल्या वातावरणात वाढाव्यात यासाठी नवनव्या व्यवस्थांची मांडणी करीत असतात. त्या अंमलात याव्यात यासाठीही प्रयत्न करत असतात. पण कोणती व्यवस्था श्रेष्ठ याबाबतचे अहंकार आणि त्या अहंकारांतील संघर्ष याने जग बरबटलेले आहे व त्यामुळे भविष्याकडे जाण्याचा आपला वेग मंदावलेला आहे आणि जगात एका परीने गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली आहे हे आपण पाहू शकतो. एका अर्थाने आजचे मानवी जग हे अनेक दुर्घर दुखण्यांनी जखडले आहे आणि ही दुखणी दूर केल्याखेरीज वैश्विक समाज आपल्याला तयार करता येणार नाही हे उघड आहे.  

 

"एक जग:एक राष्ट्र" या संकल्पनेच्या दिशेने प्रवास झालाच नाही असे नाही. जागतिक सौहार्द वाढावेपरस्पर व्यापारही सुरळीत व्हावाजागतिक ज्ञान व तंत्रज्ञानही सर्वच राष्ट्रांना उपलब्ध व्हावेराष्ट्रा-राष्ट्रांतले तंटे युद्धाने नव्हे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयांत सोडवले जावेतजागतिक मानवाचे मुलभूत अधिकार जतन केले जावेत अशी अनेक मानवतावादी उद्दिष्टे घेऊन युनायटेड नेशन्सची स्थापना झाली. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी युनोची घटना अस्तित्वात आली. जागतिक शांतता हे मुख्य ध्येय होते. पण त्यात अमेरिका आणि सोव्हिएट रशियामधील शितयुद्धाने युनोच्या सुधारित कामांत कोलदांडा घातला. सुरक्षा समितीच्या मर्यादित सदस्यांना असलेल्या नकाराधिकारामुळे युनो अजुनच दुर्बळ झाली. शितयुद्धोत्तर काळातही युनो जागतिक शांततेच्या परिप्रेक्षात उठावदार कामगिरी करू शकली नाही. युनोने जागतिक समस्या सोडवण्याऐवजी त्यात भरच घातली आहे असेही आरोप डोरी गोल्डसारखे अभ्यासक करतात. आपापले अजेंडे राबवू पाहणारे सुरक्षा समितीवर असलेले देश ही एक मोठी समस्या आहे हेही खरे आहे. अमेरिकेने तर स्थापनेपासुन युनोला हवी तशी वापरली आहे. त्यामुळे युनायटेड नेशन्स हे सामर्थ्यशाली राष्ट्रांच्या हातचे बाव्हले बनलेले आहे. थोडक्यात अंतिम उद्दिष्ट जरी श्रेष्ठ असले तरी युनो त्या दृष्टीने अपेशी ठरली आहे. 

 

खरे तर युनोमुळे एक नवी जागतिक व्यवस्था जन्माला येण्याची आशा होती. युनो एक जागतिक सरकार बनवेल अशीही अपेक्षा अमेरिकेतील काही विद्वान बाळगून होते तर याचसाठी युरोपियन विद्वान यावर टीकाही करत होते. याचे कारण म्हणजे "जागतिक सरकार" म्हणजे अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील सरकार असाच अर्थ घेतला जात होता आणि त्यात तथ्य नव्हते असे म्हणता येत नाही. युनोच्या एकंदरीत घटनेतच दोष असल्याने ख-या अर्थाचेसर्वांना प्रतिनिधित्व मिळेल असे सरकारही स्थापन होणे शक्य नव्हतेच! किंबहुना  राष्ट्रांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षांना आळा घालत दुर्बल राष्ट्रांना न्याय देण्याचे कार्यही युनो नीटपणे करू शकलेले नाही. त्यामुळे आजही जगात तणावाचीहिंसाचाराची केंद्रे जीवंत आहेत. नॉर्थ कोरियाइझ्राएलपाकिस्तानचीनसारखी राष्ट्रे तर कधी तालिबानइसिससारख्या दहशतवादी संघटना जगाला वेठीला धरत आहेत असेही चित्र आपण रोज अनुभवतो आहे. तिस-या महायुद्धाचा धोका उंबरठ्यावर आला आहे की काय अशी भिती निर्माण व्हावी असे प्रसंग अधून मधून घडतच असतात हेही आपण पहातच असतो. 

 

 

याचा अर्थ असा की जागतिक मानवी समुदायालाच या संकल्पनेच्या प्रत्यक्षात येण्यासाठी आणि मानवजातीचे ख-या अर्थाने वैश्विक नागरिक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.  या संकल्पनेला "दिवास्वप्न" समजणारे लोकही कमी नाहीत. आमचेच राष्ट्र जगातील अन्य राष्ट्रांवर सत्ता गाजवत राहील अशी स्वप्ने पाहणारी राष्ट्रे अनेक झाली आहेत. अमेरिका तर कधीपासुनच स्वत:ला महासत्ता समजते. पुर्वी ग्रेट ब्रिटन हे महासत्ता होते. जर्मनीने हिटलरच्या नेतृत्वाखालीच महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला होता. साम्यवादी रशियानेही अर्ध्या जगावर प्रभुसत्ता गाजवली. आज चीनही त्या दिशेने वाटचाल करीत आहे.  जर्मनीनेही आतापासून नव्याने महासत्ता बनण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून शिक्षणपद्धतीतही त्या दृष्टीने बदल करायला सुरुवात केली आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही भारतीयांत महासत्तेचे स्वप्न पेरले. पण महासत्ता म्हणजे नेमके काय याची व्याख्या मात्र “अन्य राष्ट्रांवर आर्थिक व राजकीय प्रभुत्व गाजवणे (म्हणजेच अन्य राष्ट्रांन मांडलिक बनवणे" एवढ्यापुरती मर्यादित झालेली आहे.

 

आज उजव्या विचारसरणीच्या लोकांची चलती आहे. विचारसरणी कोणतीही सर्वस्वी वाईट अथवा टाकावू असते असे नाही. किंबहुना विविध विचारसरण्यांचे सह-आस्तित्व व त्यातील वाद-विवादांमुळे पुढे जाणारे विचार आपल्याला अभिप्रेत असतात. प्रत्यक्षात आपल्याला असे दिसते की "विचारहीणांचा विचार" असे आजच्या विविध विचारसरणीचे जागतीक रुप बनले आहे आणि त्याला भारतीय विचारही अपवाद नाही. किंबहुना ही राष्ट्रवादाचीही शोकांतिका आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.

 

धर्मवादी संस्था या जागतिक संघर्षात भरच घालत आहेत असेही आपल्याला दिसेल. कोणाला जगाचे ख्रिस्तीकरण हवे आहे तर काहींना इस्लामीकरण. कोणाला जगाचे हिंदू-करण अथवा वैदिकीकरण करायचे आहे तर कोणाला बौद्धमय जगाची स्वप्ने पडत आहेत. थोडक्यात धार्मिक वर्चस्वतावादही राष्ट्रांच्या संघर्षात भर घालत आहे हे आपल्या लक्षात येईल. मुस्लिम ब्रदरहुड, इसिससारख्या संघटनानी तर हिंसेचा अमानुष वापर केला असल्याचे आपल्या नजीकच्याच इतिहासात डोकावले तरी लक्षात येईल. “आम्ही अहिंसक आहोत” असे धर्मांचे मुख्य तत्वद्न्यान आले तरी कधी हिंसक झाला नाही असा एकही धर्म जगात आढळून येणार नाही. धर्मवाद आणि राष्ट्रवादाची ही एक दारुण शोकांतिका आहे.

 

थोडक्यात राष्ट्रवाद, अर्थविचारवाद (भांडवलशाही की साम्यवाद?) आणि धर्मवाद (कोणत्या धर्माच्या स्वामित्वाखालील जग?) आणि तदनुषंगिक मानवाच्याच भ्रमांतून निर्माण झालेल्या श्रेष्ठतावादाच्या गंडांत संघर्ष होत राहिल्याने ख-या अर्थाने "एक जग : एक राष्ट्र" कसे बनेल याची सुजाणांना चिंता लागणे स्वाभाविक आहे. सध्या जरी भांडवलशाही विचाराने जग पादाक्रांत केले असले तरी त्यालाही हे जागतीक संदर्भ असल्याने अनेक राष्ट्रांत भांडवलशाहीची जागा  "कुडमुड्या" बनावट भांडवलवादाने घेतली आहे. त्यामुळे जगातील सामान्य नागरीक आपल्या एकुणातील अर्थव्यवस्थेच्या रसातळाला जाण्याने पिचत आहेत. मग आजच्या काळाला उपयोगी पडेल असे नवे सुसंगत तत्वज्ञान शोधण्याची प्रेरणा कोठून येणारम्हणजेच अर्थतत्वज्ञानास समृद्ध करत त्यानुषंगाने त्याला मानवी चेहरा देण्यास जागतिक विचारवंत व अर्थतज्ञांना अपयश तर आले आहे असे म्हणता येईल.

 

असे असले तरी मुळात राष्ट्र या कल्पनेचा इतिहास दोन-अडीचशे वर्षांच्या पलीकडे जात नाही. राष्ट्र म्हणजे काय याची अजून सर्वमान्य व्याख्या नाही. आपण पुढील लेखात या व्याख्यांचाही विचार करूयात. आज जगाला, विशेषता: कृत्रिम बुद्धीमत्तेच्या होत असलेल्या विस्फोटानंतर नवी मुल्याव्यावास्था व जागतिक सर्वसमावेशक तत्वद्न्यानाची आवश्यकता आहे हे मात्र निश्चित.

 

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

भाषा कशा निर्माण झाल्या?

        मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे केंद्र सरकारने घेतलेला योग्य निर्णय म्हणता येईल. मुळात भाषाच कशा निर्माण होतात या...