काश्मिर फाईल्सच्या निमित्ताने-
१९९० ची घटना पाहण्यापूर्वी हेही समजावून घ्यायला पाहिजे.
१. काश्मीरवर १८१९ पासून शीख सत्ता सुरु झाली. ही सत्ता जुलमी होती. शिखांनी अनेक मुस्लीमविरोधी कायदे लागू केले. मुस्लीम समाज दारिद्र्यात फेकला गेला. काश्मिरी पंडित तेवढे वाचले कारण ते हिंदू होते.
२. लाहोर करारानुसार ब्रिटीशांनी (ब्रिटीश इंडिया कंपनी) ७५ लक्ष नानकशाही रुपयांच्या मोबदल्यात गुलाब सिंग यांना जम्मू आणि काश्मीर राज्याचे महाराजा घोषित केले. हा करार १८४६ साली झाला. या मोबदल्यात गुलाब सिंग यांनी ब्रिटीशांना शिखविरोधात मदत करायची होती व ब्रिटीश साम्राज्याचे एक सेवक बनायचे होते. डोग्रांनी १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्य उठावात ब्रिटीशांची मदत केली.
३. मुस्लीम बहुसंख्य असतांनाही डोग्रा अंमलाखाली मुस्लिमांचा छळ कायमच राहिला. गीलगीट बाल्टीस्तान आणि लदाख डोग्रा शासकांनी जोरावर सिंग या सेनानीच्या अधिपत्याखाली कब्जात आणला. पण व्यापार हेच त्याचे मुख्यत्वे कारण होते.
४. डोग्रा शासनकाळात मुस्लिमांवर प्रचंड कर लादले गेले. वेठबिगारी लादली गेली. शासकीय सेवेत त्यांना नाकारण्यात आले. मुख्य प्रशासकीय पदांवर पंडित होते. ते मुस्लिमांवर अत्याचार करण्यात आणि अधिक व्याजाने कर्जे देण्यात आघाडीवर होते. मुस्लीम अधिकांश कुळे म्हणून काम पाहत. या काळात विविध अन्यायांमुळे असंख्य मुस्लिमांनी काश्मीर खोरे सोडले.
५. १३ जुलै १९३१ ला अब्दुल कादिरची देशद्रोहाच्या आरोपाखाली सुनावणी सुरू असतांना हजारो मुस्लीम नागरिकांनी जेलवरच धावा केला. पोलीस या प्रसंगी क्रौर्याने वागले. सुमारे २२ आंदोलक यात ठार झाले. प्रख्यात विद्वान प्रेम नाथ बजाज म्हणतात कि हा विद्रोह हिंदू-मुस्लीम स्वरूपाचा नव्हता तर अन्यायाविरुद्धची ती एक प्रतिक्रिया होती.
६. भारतीय स्वातंत्र्यानंतर पुंछ प्रांतात राजाविरुद्ध अन्यायी कररचनेबाबत विद्रोह सुरु झाला. २४ ऑक्टोबर १९४७ रोजी पुंछ प्रांताने आजाद काश्मीरची घोषणा केली.
७. अधिकांश मुस्लीम प्रजेवर राज्य करणारा शासक हिंदू असल्याने व हिंदू पंडितांचे प्राबल्य प्रशासनात असल्याने मुस्लीम प्रजा ही डोग्रा आणि पंडितांच्या विरोधात होती.
८. १९४७ साली हिंदू-मुस्लीम दंग्यांत जम्मू भागातील मुस्लिमांना हिंसाचाराचा सामना करावा लागला. लाखो मुस्लीम पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेले. जम्मू यानंतर हिंदूबहुल झाले.
९. १९९० ची घटना एकाएकी झालेली नाही. त्यावेळचे राज्यपाल जगमोहन यांनीच पंडितांना खोरे सोडायचे आवाहन केले त्यानंतर काही महिन्यांत पंडितांनी खोरे सोडले असाही दावा केला जातो. हा दावा खरा असल्याचे काश्मीरमधील पंडितांनीच मला सांगितलेले आहे. जेकेएलएफ या संघटनेने निर्माण केलेल्या दहशतीचाही त्यात मोठा वाटा होता. पण दावे केले जातात त्या प्रमाणात हिंसा झालेली नाही. तसे पुरावेही नाहीत. खो-यात आजही अनेक पंडित परिवार सुखनैव राहत आहेत.
१०. विस्थापनानंतर कश्मीरी पंडित हिंदुत्ववादाने ग्रासले गेले. आधी मात्र या हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या मदतीलाही कधी आल्या नव्हत्या. मुळचा मुस्लीम् विरुद्ध पंडित हा वाद शोषित विरुद्ध शोषकाचा होता. शीख आणि डोग्रा शासकांनी त्याला खतपाणी घातलेले होते. पंडितांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठणे स्वाभाविक होते. १९९० चे घटना दिर्घकालीन विद्वेशाची परिणती होती. पण तिने वंशविच्छेदाचे स्वरूप गाठले नाही. चुका असतील तर त्या परिस्थितीजन्य होत्या. १९९० साली सत्तेवर कोण होते आणि कोण नाही या चर्चा निरर्थक ठरून जातात.
काश्मीर फाईल्सने या पार्श्वभूमीचा विचार केला असेल तर स्वागतार्ह आहे अन्यथा हाही चित्रपट व्यर्थ आहे असे म्हणावे लागेल.
No comments:
Post a Comment