महादजीच्या काळात मराठी सत्तेने उत्कर्षाचा कळस गाठला. देशांतील स्थिती अत्यंत उद्रेकी असूनही सर्व आघाड्यांवर संघर्ष करत महाद्जीने शिंदेशाहीच्या इतिहासावरही सोन्याचे कळस चढवले. खुद्द पुणे दरबारातून त्यावेळचा प्रमुख प्रशासक असलेल्या नानाने जे राजकारण केले, इतरांचे मने महादजीबाबत कलुषित केली गेली होती. त्यावरही महादजीने मात केली होती. दुर्दैवाने महादजीचा मृत्यू झाल्याने आणि पाठोपाठ अहिल्याबाई होळकर व तुकोजी होळकर यांचा मृत्यू (१७९५ आणि १७९७) झाल्यामुळे मराठा पक्षाची बाजू लुळी पडली. कोणी दूरदृष्टीचा खंदा सेनानी अथवा मुत्सद्दी उरला नाही की अहिल्याबाईसारखा नैतिकतेचा दीपस्तंभही उरला नाही. त्यात नानाच्या कारस्थानांनी निराश होऊन सवाई माधवराव पेशव्याने १७९५ मध्येच शनिवार वाड्यात आत्महत्या केली. मराठेशाहीवर संकटांचे काळे ढग गर्दी करू लागले. यानंतरच्या काळाला जॉन माल्कमही “अशांतीचा काळ” असे म्हणतो.
महादजीला पुत्र नसल्याने वारसाचा प्रश्न निर्माण
झाला. त्यातून
महादजीचा पुतण्या असलेल्या आनंदराव शिंदे याच्या मुलाला दत्तक घेण्याचे ठरले व तसे
विधानही करण्यात आले. या मुलाचे नाव दौलतराव. शिंदे घराण्याचे
गादी त्याला मिळाली तेंव्हा त्याचे वय जेमतेम पंधरा वर्षाचे होते. यामुळे अलीजाबहादूर हे
पद तर त्याच्याकडे चालून आलेच पण शिंदेंची देशभर पसरलेली संपत्ती व मोठा प्रदेश
त्याच्याकडे वारसाह्क्कामुळे चालून आला. पण महादजीच्या विधवांना हे दत्तकविधान मंजूर
नव्हते तसेच महाद्जीचा एकनिष्ठ सरदार लखोबादादा लाडही दौलतरावाच्या विरोधात गेला.
इकडे निपुत्रिक सवाई माधवरावाच्या मृत्यूमुळे पेशवे
घराण्यातही वारसाचा प्रश्न निर्माण झाला. राघोबादादाचा मुलगा बाजीराव (दुसरा) हा तेव्हा कैदेत
असला तरी त्याला सोडवून पेशवेपदावर त्याला आरूढ करावे अशी अनेक मुत्सद्द्यांची
भावना होती. पण
तुकोजी, नाना
आणि पटवर्धन सारखे सरदार व मुत्सद्दी यांनी बाजीरावास पेशवेपद द्याला विरोध केला व
सवाई माधवरावाच्या पत्नीने म्हणजे यशोदाबाईने बाजीराव (दुसरा) याचा धाकटा भाऊ
चिमणाजी यास दत्तक घेऊन त्यास गादीवर बसवावे अशी मसलत चालवली. त्याप्रमाणे होऊन
साताऱ्याच्या छत्रपतीकडून चिमणाजीसाठी पेशवाईची वस्त्रे आणली गेली. १७९६ मध्ये
पेशवेपदावर आरूढ झालेला हा औट घटकेचा पेशवा ठरणार होता.
इकडे बाजीरावही स्वस्थ बसला नव्हता. त्याने सर्वात
सामर्थ्यशाली असलेल्या शिंदे गादीची मदत घ्यायचे ठरवून दौलतरावास चार लक्ष
महसुलाचा प्रांत आणि सैन्याचा खर्च देण्याचे मान्य करून आपणास सोडवण्याचा आग्रह
चालवला.
ही बातमी नानास समजताच तो अस्वस्थ झाला कारण
शिंदेंचे लष्करी बळ त्याला चांगलेच माहित होते. लाखेरीच्या
युद्धामुळे तुकोजीचे सामर्थ्यही कमी झालेले होते. तरुण दौलतराव
बाजीरावाच्या गोटात सामील झाल्यास अनर्थ होईल असे वाटून त्याने काही हालचाली
करण्याचा प्रयत्न केला पण स्वत:पुरतेच पहायची सवय लागलेला नाना बाजीरावाची बाजू
भक्कम होते आहे हे पाहून तोही बाजीरावाच्या गोटात गेला आणि बाजीरावाला कैदेतून
मुक्त करून त्यालाच पेशवेपद मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. आपण वरचढ बाजूस गेलो
नाही तर आपले महत्व कमी होईल असे त्याला वाटले असावे असे पारसनीस म्हणतात.
अर्थात दौलतराव शिंदेचे दिवाण बाळोबा तात्याचा बाजीरावाला
पेशवा बनवण्यास विरोध होता. बाळोबाने दौलतरावास आपले मत स्पष्टपणे सांगितले. पण बाजीराव व नाना दौलतरावाशी संधान बांधतच होते. यात बाजीरावाला
सहाय्य करायला जी व्यक्ती पुढे आली ती म्हणजे सर्जेराव घाटगे होय. ही व्यक्ती
दौलतरावाच्या जीवनात अनेक वादळे निर्माण करणारी ठरली असल्याने त्याची थोडक्यात
माहिती घेऊयात.
सर्जेराव घाटगेचा राजकारणात प्रवेश
सर्जेराव घाटगे याचे जन्मनाव सखाराम. सर्जेराव ही
त्यांच्या घराण्याला मिळालेली पदवी. हा मुळचा कागलचा. कागलची देशमुखी
याच्या पूर्वजांना मिळाली होती ती विजापूरच्या पहिल्या बादशहा युसुफ आदिलशाहकडून. सर्जेराव घाटगेचा
देशमुखीच्या उत्पन्नावरून वाद निर्माण झाल्याने त्याने कागल सोडले आणि पुण्यास
येऊन परशुरामभाऊ पटवर्धन याच्याकडे नोकरीस राहिला.
साध्या शिलेदार पदावरून त्याने आपल्या अंगचा पराक्रम
आणि चाणाक्षपणा दाखवत पटवर्धनांच्या मनात चांगले स्थान निर्माण केले. येथून त्याचा
उत्कर्ष होऊ लागला.
परशुरामभाऊसोबत त्याचे पुण्याला येणे-जाणे वाढले होते. त्यामुळे नानालाही
हा धीट गृहस्थ आवडू लागला. परशुरामभाऊने त्याला पेशव्यांच्या सेनेतच एका
पथकाच्या प्रमुखपदाची धुरा सोपवली. तेवढ्यात सवाई माधवरावाने आत्महत्या केली आणि
पुण्यातील राजकारण वादळी वेगाने बदलू लागले.
बाजीरावाला मदत करण्यासाठी दौलतरावाला आपल्या
बाजूने वळवून घेण्यासाठी नानाने सर्जेरावची नेमणूक केली. पण याच काळात
परशुरामभाऊ, नाना
आणि बाळोबात वैमनस्य आल्याने नानाला पुणे सोडावे लागले. मग सर्जेराव दौलतरावाच्या
चाकरीत आपल्या पथकानिशी दाखल झाला. तेथे सरदार रायाजी पाटील याच्याशी स्नेह निर्माण
करून सर्जेरावने शिंदे दरबारात प्रतिष्ठा मिळवली. दौलतराव हा उत्सवप्रिय
आणि शिकार ते पतंगबाजीत रमणारा तरुण आहे हे त्याच्या लक्षात आले. आपल्या अंगभूत
चातुर्याने त्याने लवकरच दौलतरावाच्या हृदयात शिरकाव करून घेतला.
याची जाणीव असलेल्या नानाने सर्जेरावाच्या मार्फत
दुसऱ्या बाजीरावास सत्तेत आणण्यासाठी दौलतरावाला आपल्या बाजूने खेचून घेण्याचा
प्रयत्न सुरु केला. नानाने
दौलतरावास चार नाहीतर दहा लक्ष रुपयांच्या महसुलाचा प्रदेश आणि अहमदनगरचा किल्ला
देण्याचेही आमिष दाखवले. पण ही माहिती दौलतरावाचे दिवाण बाळोबा तात्यास
मिळताच त्याने दौलतरावाचे हित पाहून बाजीरावास उत्तरेत कैदेत पाठवण्याचे ठरवले आणि
त्याने ती कामगिरी दिली ते सर्जेराव घाटगे यास. बाळोबाने आजवर आपली
मुत्सद्देगिरी दाखवत दौलतरावास बाजीरावास मदत करण्यापासून थोपवले होते, पण आता संधी आयतीच बाजीरावाच्या
पक्षात गेली.
सर्जेरावने त्याप्रमाणे बाजीरावास आपल्या ताब्यात
घेतले आणि कडेकोट बंदोबस्तात बाजीरावास उत्तरेकडे नेण्यास निघाला. बाजीराव धूर्त होता. त्याला सर्जेरावाची
सर्व नाहीती होती. दक्षिणेची
सौंदर्यलतिका समजली जाणारी रूपवती बायजाबाई सर्जेरावाची कन्या होती. दौलतराव तिच्या
सौंदर्याच्या प्रेमात पडला आहे हीसुद्धा माहिती त्याच्याकडे होती, त्यांवे या माहितीचा
लाभ करून घ्यायचे ठरवले.
बाजीरावाने सर्जेरावची महत्वाकांक्षा ओळखून
सर्जेरावसमोर प्रस्ताव ठेवला की त्यांने आपली मुलगी बायजाबाई दौलतरावास द्यावी आणि
आपल्याला पेशवे पदासाठी पाठींबा द्यावा. या मदतीसाठी आपण पेशवा झाल्यावर दौलतरावास दोन
कोटी रुपये देऊ, सर्जेरावासही
त्याची कागलची जहागिरी परत बहाल केली जाईल, आणि सर्जेरावास दौलतरावाचे दिवाण म्हणून नेमण्यात
येईल.
हा सौदा आधी जरी सर्जेरावास मंजूर नसला तरी आपया
मुलीच्या आणि आपल्या भावी फायद्यांवर लक्ष ठेवून त्याने यास मान्यता दिली. बाजीरावास हेच हवे
होते. मग
बाजीराव आजारी आहे असेच खोटे उठवून पुढे जाण्याऐवजी सर्जेराव व बाजीरावाने प्रवरेकाठीच
आपला मुक्काम ठोकला. तेथून सर्जेरावाने दौलतरावास सर्व माहिती कळवून दौलतरावाचे
मन वळवण्यात यश मिळवले. दौलतराव बायजाबाईच्या अलौकिक सौंदर्यामुळे
तिच्यावर लुब्ध तर होताच पण बायजाबाई, जी पुढे एक कर्तबगार महिला म्हणून उदयास आली, तिचा उपयोग बाजीराव
व सर्जेरावाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी करून घेतला हे वास्तव लपवता येत नाही.
यामुळे नानाही खुश झाला. त्याने बाजीरावास
परतत बोलावून घेतले, त्याच्याशी रीतसर करामदार केले आणि ४ डिसेंबर
१७९६ रोजी साताऱ्याहून पेशव्याची वस्त्रे मागवून घेतली आणि अशा रीतीने एक
कारस्थानी, अदूरदृष्टीचा
दुसरा बाजीराव पेशव्याचा गादीवर बसला.
बाजीरावाचा जन्म त्याचा पिता राघोबादादा कैदेत असताना
झाला होता. वयाच्या
१९ व्या वर्षापर्यंत तो कैदेतच होता. त्याला कसलेही औपचारिक आणि राजकीय शिक्षण
मिळालेले नव्हते. शिवाय
एका खुन्याचा मुलगा अशीच त्याची जनमाणसात प्रतिमा होती. थोडक्यात बाजीराव
पेशवा बनल्यानंतर त्यात प्रजेला आनंद होण्यासारखे काही नव्हते.
दौलतराव शिंदेच्या
पाठबळाने पेशवेपद मिळाले असल्याने बाजीराव दौलतरावाच्या ओंजळीने पाणी पिऊ लागला. नानाही आपले वर्चस्व
गाजवू लागला व बाजीराव निमूटपणे दोघांसमोर झुकू लागला किंवा किमान तसे दाखवत तरी
होता कारण फारशी बुद्धी लाभली नसली तरी त्याची महत्वाकांक्षा मात्र अपार होती. आता तर तो
सर्जेरावाच्याही आहारी गेला होता, बाजीरावच्या तीव्र कामेच्छा पूर्ण करण्यासाठी तो
स्वत: आणि
बाळोबा कुंजीर झटत होते. पुण्याच्या राजकारणात अडकून पडलेल्या दौलतरावाला
उत्तेतील आपल्या संस्थान आणि महादजीने मिळवलेल्या प्रदेशांकडे लक्ष देण्यासही वेळ
मिळत नव्हता, पण
तेथील प्रशासन व सैन्याची व्यवस्था महादजीने दूरदृष्टीने लावली असल्याने सध्या तरी
त्याला फारसे लक्ष देण्याची आवश्यकता वाटत नव्हती.
इकडे तुकोजी होळकरच्या मृत्यूमुळे होळकर
घराण्यातही सत्ता संघर्ष सुरु झाला. काशीराव आणि मल्हारराव (दुसरा) या भावंडात तो
संघर्ष होता. लाखेरी
युद्धात पराजय झाला असला तरी मल्हाररावने त्यात पराक्रम गाजवला होता ते
प्रजेच्यांही स्मरणात होते. शिवाय काशीराव अधू तर होताच पण त्याचे वर्तनही
सुभेदार होण्यास शोभेसे नव्हते त्यामुळे तो होळकरी सैन्यातही अप्रिय होता. यशवंतराव व विठोजी हे धाकटे सावत्र-बंधुही मल्हाररावाचा
समर्थनात होते. त्यामुळे
होळकर गादीचा वारस कोण हा प्रश्न निर्माण झाला.
गादीवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी काशीरावाने
सर्जेराव घाटगेच्या मार्फत दौलतरावाशी मदत घेण्याचे ठरवले आणि पुण्याकडे प्रस्थान
ठेवले. दौलतराव
शिंदे-होळकरांत
झालेले मतभेद विसरला नव्हता. पण हे इंदोर-महेश्वरचे संस्थान
आपल्या अखत्यारीत आणण्याची ही एक संधी आहे असे समजून त्याने काशीरावाला मदत करायचे
ठरवले. बाजीरावाने
अर्थात याला संमती दिली. पण नानाच्या मनात मल्हाररावाला सुभेदारीची
वस्त्रे मिळावीत असे असल्याने त्याचे व बाजीरावाचे खटके उडू लागले.
त्यामुळे बाजीरावाने सर्जेराव घाटगे यास सांगून
नानाला कैद करण्याचा आदेश दिला. ही कैद केल्यास तुम्हाला ठरल्याप्रमाणे शिंदेंची दिवाणगिरी
मिळवून देतो असे आश्वासनही दिले. त्याप्रमाणे ३१ डिसेंबर १७९७ रोजी सर्जेरावने आपले
सैनिकी बळ वापरून नानास कैद करुन काही महिने कैदेत ठेवले. पण या काळात
राज्याची घडी पूर्ण विस्कटली. महत्वाचे बहुतेक लोक अत्यंत तरुण, अननुभवी तर होतेच पण
ते स्वार्थप्रेरित झाले होते. शहाणपणाचे बोल सांगणाराही आता कोणी उरला नव्हता.
सर्जेरावने या स्थितीचा फायदा घेत पुण्यात
लुटालूट सुरु केली. त्याच्या
निकटच्या लोकांवर अनन्वित अत्याचार केले. नानाच्या जवळचे जे कोणी होते त्यांना पकडून त्यांचा
अतोनात छळ केला गेला व त्यांचेही धन लुटले.
दरम्यान मल्हारराव (दुसरा) आपल्या तीन
भावांसोबत पुणे दरबाराने आपल्याता सुभेदार म्हणून मान्यता द्यावी या मागणीसाठी आला. पुण्याजवळच त्याची
छावणी पडली होती. काशीराव
मात्र आता घाबरला होता. हा वाद कोणाच्यातरी मृत्यूनेच सुटेल असे त्याने
दौलतरावाला सांगितले. दौलतरावाला आपल्या ताब्यात राहणारा काशीराव जास्त
प्रिय होता. त्यामुळे
त्याने १४ सप्टेंबर १७९८ च्या मध्यरात्री, होळकरांची सेना निर्धास्त झोपी गेली असता तेथे
सैन्य पाठवले. या
सैन्याने होळकरांच्या छावणीवर भीषण हल्ला चढवला, त्यात मल्हारराव
मृत्यूमुखी पडला तर यशवंतराव आणि विठोजी त्या हल्ल्यातून कसेबसे निसटून गेले. पण मल्हाररावाची
गर्भवती पत्नी यशोदाबाई तसेच यशवंतरावाची पत्नी लाडाबाई व कन्या भीमाबाई यांना कैद
करण्यात येऊन त्यांना पुण्यात एका वाड्यामध्ये कैद करून ठेवण्यात आले.
काशीरावची आकांक्षा यामुळे प्रज्वलित झाली खरी पण
यातूनही आपला संतप्त सावत्रभाऊ यशवंतराव वाट काढेल आणि दौलतराव आणि पेशव्याला
पूर्ण संत्रस्त करून सोडेल असे त्यावेळेस तरी कोणाला वाटले नाही.
नानाला दूर केल्यावर बाजीरावाने अमृतराव या
त्याच्या भावास आपल्या दिवाणपदी नेमणूक केली. सर्जेरावाने आपली
कन्या बायजाबाईचे लग्न दौलतरावाशी लावून दिले. मोठा थाट-माट करण्यात आला. (१७९८) दौलतरावाने
बाजीरावाच्या इच्छेप्रमाणे सर्जेरावची नेमणूक आपल्या दिवाणपदी केली.
पण लग्नात दौलतरावाने अवाढव्य खर्च केला असल्याने
त्याला पैशांची अडचण भासू लागली. त्यामुळे त्याने बाजीरावाकडे त्याने कबुल केलेले
दोन कोटी रुपये मागायला सुरुवात केली. पेशव्याचा खजिनाही त्यावेळेस खंक झाला होता. मग त्याने बाजीरावाकडे
पैशांचा तगादा लावायला सुरुवात केली. तरीही बाजीराव पैसे देण्याचे नाव काढेना म्हणून
दौलतरावाने पुण्याची लुट करून पैसे वसूल करण्याचा आदेश सर्जेराव घाटगेला दिला.
त्याप्रमाणे सर्जेरावाक्डून पुन्हा लुटालूट सुरु
झाली. यामुळे
अस्वस्थ झालेल्या अमृतरावने दौलतराव शिंदेलाच कैद करण्याचा प्रयत्न चालवला. बाजीरावही पुणे
लुटण्याच्या उद्योगामुळे दौलतरावाच्या विरोधात गेला. त्याने दौलतरावास
उत्तरेत निघून जायला सांगितले.
त्याच वेळेस यशवंतरावाने शिंदेंनी बंदोबस्तात
घेतलेली होळकरशाही मुक्त करण्यासाठी एकामागोमाग एक हल्ले चढवायला सुरुवात केली
त्यामुळे दौलतरावाच्या सैन्याची हानी होऊ लागली. यशवंतरावने डिसेंबर
१७९८ मध्ये दौलतरावांचा फ्रेंच सानिकी अधिकारी दुंदरनेकच्या नजीब व तेलंगा या
बलाढ्य पलटणीचा दणदणीत पराभव करून
दुंदरनेकला पलायन करायला भाग पाडले आणि महेश्वरही जिंकून घेतले. ६ जानेवारी १७९९
रोजी स्वत:चा
राज्याभिषेक करून घेऊन मराठेशाहीशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आणि आपल्या
राज्याला पुन्हा उभे करण्यासाठी संघर्ष करू लागला.
त्यात दौलतरावासमोर दुसरे आव्हान उभे राहिले. ते आव्हान उभे केले
होते महादजीच्या विधवांनी. त्यांनी केलेले युद्ध “विधवांचे युद्ध” या नावाने इतिहासात
प्रसिद्ध आहे. पण
हे सारे घडत असूनही दौलतराव पुण्यातून हलायला तयार नव्हता कारण धूर्त बाजीराव
आपल्या अनुपस्थितीचा गैर फायदा घेईल अशी शंका त्याला वाटत होती. पण यातून
शिंदेशाहीचे अस्तित्व धोक्यात येईल याची त्याने कल्पनाही केली नव्हती.
विधवांचे युद्ध
दौलतरावला वारस म्हणून नियुक्त केल्याबद्दल महादजीच्या
लक्ष्मीबाई व यमुनाबाई या विधवा नाराज होत्या. महादजीचा झुंझार सेनानी लखोबादादा
लाडही दौलतरावच्या लहरी व छंदीफंदी स्वभावामुळे रुष्ट झाला होता. आपल्या पतीच्या जहागीरीतील योग्य वाटा खर्चासाठी आपल्याला
देण्यात यावा अशी या दोन विधवांची मागणी होती. पण दौलतराव पुण्यातच तळ ठोकून
बसल्यामुळे त्यांच्या तो त्यांच्या मागण्या मान्य करण्यात चालढकल करत होता. त्यातूनच एक युद्ध उद्भवले ज्याला “विधवांचे युद्ध” म्हणून ओळखले जाते.
या दोन्ही विधवांना पाठबळ मिळाले ते या महादजींशी इमानदार
असलेल्या अशा असंतुष्ट सेनानी लाखोबादादा लाड याचे. हे युद्ध खुद्द दौलतराव शिंदेच्या
विरुद्ध होते. अर्थात विधवांची सैन्यशक्ती कमी होती. लखोबादादाचाच काय तो त्यांना आधार
उरला होता.
शिंद्यांची राजधानी उज्जैन येथे
होती. त्यावेळी उज्जैनला शिंद्यांचे फारसे लष्कर नव्हते. पण त्यालाही तोंड देता येईल एवढी
सेना लखोबादादाकडे नव्हती. त्यामुळे त्याने यशवंतरावशी संधान
बांधले व उज्जैन जिंकून देण्यासाठी मदत मागितली. काशीराव होळकर दौलतरावाच्या
तंत्राने चालतो हे यशवंतरावालाही तसेही सहन होत नव्हते. त्यामुळे दौलतरावच्या जागी
शिंदेशाहीचा दुसरा वारस नेमावा या विचाराने त्याने विधवांना मदत करायचे ठरवले
यशवंतरावांनी उज्जैनवर मे १७९९ मध्ये स्वारी केली आणि ते शहर सहज
जिंकले आणि महादजींच्या विधवांच्या
ताब्यात दिले. तेथील धनाढ्यांकडुन युद्धखर्च म्हणुन खंडणी वसुल करायला सुरुवात
केली. दरम्यान ही बातमी दौलतरावांपर्यंत पोहोचली.
त्याने यशवंतरावला “आमच्या दौलतीत बखेडा करू नये” असे पत्र लिहिले व विधवांशी तहाची
बोलणी सुरु केली. आता कायमचा तोडगा निघतो असे दिसताच लखोबादादाचा विचार बदलला आणि
यशवंतरावास उज्जैन सोडण्याची विनंती केली. यशवंतरावांनी ती विनंती मानली आणि
खंडणी वसुली थांबवून तेथील बाळोबा (बाळाराव) इंगळे सरदाराकडुन नाममात्र खंडणी वसुल
केली आणि आपला मोहरा कोटा आणि हाडा या राज्यांकडे वळवला.
दौलतरावने सर्जेराव घाटगे या दुष्ट मानसिकतेच्या दिवाणास काढून
टाकावे अशीही मागणी बंडखोर विधवांनी केली होती. इकडे पुण्यातही बाजीराव पेशवा
दौलतरावाकडे हीच मागणी करत होता. उज्जैन आपल्या ताब्यातून गेले आहे
याची जाणीव झाल्याने त्याने विधवांना संरक्षण आणि त्यांच्या खर्चाची सारी व्यवस्था
करण्याचे वचन दिले. एवढेच नव्हे तर सर्जेराव घाटगेला दिवाण पदावरून हटवण्याचेही
कबुल केले.
पण प्रत्यक्षात त्याने आपले एकाही आश्वासन पाळले नाही. तात्पुरते दूर केलेल्या
सर्जेरावाला त्याने आपली पत्नी बायजाबाई हिच्या आग्रहामुळे ४ जानेवारी १८०० रोजी
पुन्हा आपल्या दरबारात स्थान दिले. सर्जेराव हा अत्यंत क्रुर इसम. त्याच्या भाडोत्री मारेक-यांनी १४ जानेवारीच्या मध्यरात्री
दोन्ही विधवांच्या निवासात घुसुन त्यांचा खुन करण्याचा प्रयत्न केला. त्यात यमुनाबाई ही विधवा गंभीर
जखमी झाली...पण तिच्या आरड्याओरड्याने पहारेकरी सावध झाले व काही मारेक-यांना पकडले गेले. त्यांनी खरा कट सांगितल्यावर
लाखवा दादा हादरला. आपल्यालाही कधीही अटक होवू शकते आणि मातोश्रींचे येथे काही खरे
नाही याची जाण लखोबादादास झाली. वरकरणी काहीही न दाखवता, शेवटी त्याने दोघींसहित सुरक्षित पलायन केले आणि त्यांनी सरळ बुर्हाणपुर
गाठले. दरम्यान दौलतरावाच्या ताब्यात उज्जैन पुन्हा गेले होते.
विधवांचा नाईलाज झाला. तेथुन या दोन्ही महिलांनी पुन्हा यशवंतरावासना
पत्र पाठवून आपल्याला उज्जैन पुन्हा मिळवुन देण्याची विनवणी केली.
दौलतरावचा उत्तरेतील सरसेनापती तेंव्हा जनरल पेरों हा फ्रेंच
सेनानी होता. त्याने यशवंतरावाने परत जिंकुन घेतलेल्या टोक व रामपुरा या
जहागिरी पुन्हा ताब्यात घेवुन जयपुर राज्याला जोडुन टाकल्या होत्या. त्यामुळे मानी यशवंतराव अस्वस्थ
होताच. त्यात विधवांचे पत्र आल्यानंतर त्याने प्रथम लक्ष्मीबाई व
यमुनाबाई या दोन्ही विधवांना सन्मानपुर्वक महेश्वरला बोलावुन घेतले. त्यांना १ लाख रुपये रोख व एक लाख
रुपयाची वस्त्रे-अलंकार दिले. यानंतर त्यांच्याशी करार केला. या करारानुसार यशवंतरावांनी
त्यांना महादजी शिंद्यांची उत्तरेतील जहागीर त्यांना परत मिळवुन द्यायची होती. यासाठी ज्या लढाया कराव्या लागतील
त्या खर्चासाठी विधवांनी ४ लाख रुपये द्यायचे होते.
यशवंतरावाने लक्ष्मीबाई व यमुनाबाईला सोबत घेऊन उज्जैनला सुखरुप
पोहोचवले. जनरल पेरों तेव्हा पातशाहीची व्यवस्था ठीक करण्यासाठी दिल्ली
येथे गेला होता. त्यामुळे थोडक्या लढाईत उज्जैन पुन्हा त्यांच्या ताब्यात आली. यशवंतरावने आपल्या कर्नल प्लमेट
याच्या प्रशिक्षित बटालियनला बोलावून घेतले. हे कळताच त्या दोघींना वाटले कि
यशवंतराव आपल्यालाच अटक करणार या भितीने त्या दोघी अकारण पळून
गेल्या.
यामुळे यशवंतराव अधिकच संतापला आणि त्याने मग नाईलाजाने
उज्जैनमधील धनाढ्यांवर युद्धखर्चाची खंडणी लादली. जे देत नव्हते त्यांच्या महालांत
खणत्या लावण्यात आल्या. शिंद्यांचा प्रत्येक प्रदेश पायतळी तुडवायला सुरुवात झाली.
हे कळताच दौलतरावने प्रत्युत्तरासाठी आणखी पाच बटालियन्स उज्जैन
व त्याच्या जहागिरीच्या रक्षणासाठी तातडीने पाठवल्या. याच दरम्यान दौलतरावाने
पेशव्यांवर दबाव आणुन काशीरावाला होळकरी जहागिरीची वस्त्रे देण्यासाठी दबाव आणला. पण काशीरावाने वेडेपणा करून
मल्हारराव होळकर याच्या कुंटे याच्या वाड्यात कैदेत ठेवलेल्या पत्नीस आणि कैदेतच जन्मलेल्या
तिचा पुत्र खंडेराव यांच्यावर मारेकरी घातले. काशीरावचा हा बेत व्यर्थ गेला. काशीरावाच्या नासानीवर
संतापलेल्या बाजीरावाने माय-लेकाला शनिवारवाड्यात आणून ठेवले. पण पुढे उत्तरेत जातांना
दौलतरावाने त्यांना आपल्यासोबतच नेले. राजकारण व कटकारस्थान अयशस्वी
झालेल्या काशीरावला मग पुण्यातच राहणे भाग पडले.
दररम्यान यशवंतरावाने विधवांच्या संघर्षातुन अंग काढुन घेतले
होतेच. त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा झाला कि शिंदेंचा बटालियन्स लखोबादादाच्याच
पाठलागात व्यस्त राहिल्या.
लखोबादादा त्या बटालियन्सशी सरळ लढु शकत नव्हता म्हणुन त्याने
गनीमी काव्याचा आधार घेतला, त्यामुळे शिंदेंचा जयही लांबत
गेला. त्यात लखोबादादाला मदत करण्यासाठी बुंदेलखंडातील
संस्थानिकांचेही सहकार्य मिळू लागले होते. शिंद्यांच्या आदेशाने जनरल पेरों
विधवांवर चाल करून गेला. तो अत्यंत शुर व साहसी योद्धा होता. त्याने तिन्ही दिशांनी फास आवळत आणला
होता. आता लखोबादादाला पळायला
एकच दिशा उरली होती...पुर्व. तो मागे सरकला आणि सेउंधचा किल्ला गाठला.
शेवटी सेउंध येथे घनघोर युद्ध झाले. या युद्धात मात्र लखोबादादा लाड प्राणांतिक जखमी झाला. या युद्धात त्याने जी पराक्रमाची
शर्थ केली त्याला तोड नाही. महादजींचा हा स्वामीभक्त सेनानी. त्याला तेथुन माघार घ्यावी लागली...पण त्याने स्वत: घायाळ असतांनाही पाठलाग चुकवत महादजींच्या विधवांना प्रथम
सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.
तो त्या जखमांतुन पुर्णपणे कधीच बरा होवु शकला नाही. शेवटी ७ फेब्रुवारी १८०२ रोजी या शिंदेशाहीतील शेवटच्या इमानी
माणसाने शेवटचा श्वास सोडला. पण लखोबादादामुळे शिंदेशाहीला मोठे खिंडार पडले व त्यातून
दौलतराव लवकर बाहेर पडू शकला नाही.
इकडे पुण्यातून आपले बस्तान उठवायला दौलतरावास डिसेंबर १८००
उजाडला. पुढे जांब येथे मुक्काम करून फेब्रुवारीत तो बुर्हाणपूर येथे
पोचला,. तेथे गेल्यावर त्याने चार-पाच महिने शिकार व पतंगबाजीत
घालवले. तेथेच त्याने दुंदरनेक या आपल्या फ्रेंच कमांडरला काशीरावास
घेऊन बुर्हाणपूरला बोलावून घेतले. दुंदरनेकला त्यानेच यशवंतरावविरुद्ध धाडले होते पण यशवंतरावने
त्याचा पुन्हा घोर पराभव केला आणि त्याला आपल्या बाजूस वळवून घेतले. दौलतरावास हा झटका होता. काशीरावाने तर सरळ यशवंतरावाशी
समेटाची बोलणी सुरु केली आणि यशवंतरावास मिळण्यासाठी महेश्वर गाठले.
काशीराव निघून गेल्यामुळे दौलतरावाचा होळकरांवर वर्चस्व
मिळवायचा एक मार्ग बंद झाला.
विठोजी होळकरची क्रूर हत्या
अठराशे साली इकडे पुण्यात वेगळाच प्रसंग निर्माण झाला होता. विठोजी होळकराने पंढरपूरला राजधानी बनवत पार बारामतीपर्यंतचा
भाग पेशव्याहातून आपल्या ताब्यात घेतला होता. कुरकुंभ येथे तर विठोजीने
बावनपागे वगैरे सरदारांचाही पराभव केला. थेट पुण्यावर स्वारी करण्याची
त्याची योजना आहे असे बाजीरावास वाटले.
त्यात विठोजीने अमृतराव पेशव्याचे समर्थनही मिळवले. पेशव्याचे अनेक सरदार विठोजीला जाऊन मिळू लागले. पेशवाईत पुरता गोंधळ माजला. याचा फायदा घेत दौलतरावाचे
पेंढारी लुटालूट करू लागले. यामुळे बाजीराव अधिकच हादरून गेल्का. दौलतरावची बरीच सेना जरी पुण्यात
असली तरी ती आपले रक्षण करेल याचाही भरोसा चंचल वृत्तीच्या बाजीरावास वाटेना. तिकडे उत्तरेत यशवंतराव एकामागोमाग एक शिंदेंचे प्रदेश घेत
चालला होता. दौलतराव कोणत्याही क्षणी पुण्यातील सेनाही यशवंतरावच्या विरुद्ध
लढायला बोलावून घेईल अशी धास्ती त्याला
वाटू लागली. शेवटी त्याने इंग्रजांशी संधान बांधले. बापू गोखले आणि इंग्रज बटालियन विठोजीवर
चालून गेल्या. या युद्धात विठोजीची हार झाली आणि मार्च १८०१ मध्ये विठोजीला
कैद करून पुण्यास आणले, व १६ एप्रिल १८०१ रोजी त्यची हाल हाल करून व हत्तीच्या पायी
तुडवून हत्या केली.
गो. स. सरदेसाई म्हणतात की हा बाजीरावाचा अविचार होता ज्यामुळे
त्याच्या राज्याचा नाश झाला. इतिहासकार ग. ह. खरे म्हणतात की हा अत्यंत नीच दर्जाचा खून होता.
इकडे सावकाश वाटचाल करत दौलतरावाने अखेर मे १८०१ च्या अखेरीस
नर्मदाकाठी आला खरा पण पैलतीरावर यशवंतराव त्याची वाट अडवून उभा होता, दौलतरावाला तेथेच अडकून पडावे लागले. त्याने मदतीस असावा म्हणून
सर्जेराव घाटगेलाही पुण्याहून बोलावून घेतले. दरम्यान दौलतराव व यशवंतरावात
सारख्या लढाया चालू होत्या. दौलतरावाची भिस्त होती ती कवायती सैन्यावर त्यामुळे त्याला यशवंतरावाच्य
गनिमी युद्धाला कसे तोंड द्यावे हेच कळेना. दौलतरावाला तीन मोठ्या लढाया
द्याव्या लागल्या. यशवंतराव उज्जैनच्या दिशेने जाणार हे समजताच ऑगष्ट १८०१ ला
दौलतरावने घाईने यमुना ओलांडली. आपल्याकडील कर्नल जॉन हेसिंग्जला तातडीने उज्जैनच्या दिशेने पाठवून
दिले. येतांना त्याने वाटेत जो अकारण वेळ दवडला त्याचे दुष्परिणाम
झाले. पण रघुजी भोसल्याने नर्मदा पार करायला दौलतरावाची मोठी मदत केली
त्यामुळे सारी सेना नदीपार तरी होऊ शकली.
हेसिंग्ज पुढे गेला असला तरी यशवंतरावाने गनिमी कावा केला. उज्जैनजवळ देखाव्यांपुरती थोडी फौज ठेवली आणि आपल्या मोठ्या
फौजेला घेऊन विजेच्या वेगाने हांडीया घाटात दौलतरावच्या पलटणीना गाठले आणि सर्व
कवायती तुकड्या कापून काढल्या. तसाच तो उज्जैनकडे वळाला आणि उज्जैनवर हल्ला केला. या हल्ल्यात शिंदेंच्या तीन पलटणी गारद केल्या गेल्या तर
उर्वरित सैन्याला जखमी हेसिंग्जसहित पळून जावे लागले.
पुण्यात बरीच धामधूम करून सर्जेराव घाटगे ऑक्टोबर १८०१ मध्ये दौलतरावास
येऊन मिळाला. होळकराने उज्जैन जिंकून घेतले तर
आपण इंदोर बेचिराख करावे अशी मसलत त्याने दौलतरावास दिली. त्यानुसार संयुक्त फौजा चालून
गेल्या. यशवंतरावाचे तीन हजार सैन्य ठार मारून इंदोर ताब्यात घेतले गेले. तेथे प्रचंड नासधूस, अत्याचार आणि जाळपोळ करून इंदोर
होत्याचे नव्हते करण्यात आले. घाटगेने उज्जैनचा सूड अत्यंत क्रूर होत उगवला. तोवर दौलतरावाने उज्जैन पुन्हा ताब्यात घेतली होती.
३० ऑक्टोबर १८०१ ला झालेल्या लढाईत सर्जेरावचा पराभव झाला. यशवंतरावने राजपुताना व चंबळ
नदीकाठचे शिंदेंच्या प्रदेशांत वेगाने हालचाली करून प्रलय माजवला. अशात बाजीरावाने दोघांनाही युद्ध
थांबवण्याची आज्ञा पाठवली पण दोघांनीही तिला किंमत दिली नाही.
१८०२ साल उजाडले.
यशवंतराव आता पुण्यावर चाल करून
जायच्या योजना आखत होता. काशीरावला त्याने सेंधव्याच्या
किल्ल्यात बंदोबस्ताने ठेवले. आपल्या ताब्यातील काशीराव आता
यशवंतरावच्या ताब्यात आहे हे दौलतरावास मानवत नसले तरी त्याचाही इलाज नव्हता.
बाजीरावाने मदतीस येतो अशी
आश्वासने दिली असली तरी’ त्याने एकही पाळले नाही. कारण उत्तरेतील यशवंतरावाचा झंजावात पाहून खानदेशापासून ते
सोलापूरपर्यंत बावनपागे, येसाजी रामकृष्णसारखे अनेक सरदार
बंड करून उठले होते.
त्यात मार्च १८०२ मध्ये
यशवंतरावाने पुण्यावर चाल केली. बाजीराव त्यामुळे धास्तावून गेला.
त्याने समेटाचे प्रयत्न सुरु केले
पण यश आले नाही. यशवंतरावची समजूत काढणे त्याला शक्य
झाले नाही आणि बाळोबा कुंजीर तर यशवंतरावाचे दर्शन घ्यायलाही घाबरत होता.
शेवटी त्याने दौलतरावाची मनधरणी
केली व मदतीस सैन्य पाठवायची विनंती केली.
दौलतराव या वेळेस पैशांच्या अडचणीत
होता. तरी त्याने कर्ज काढून सदाशिव
भास्कर बक्षीला सैन्य देऊन पुण्याकडे रवाना केले. यशवंतराव आता बारामतीजवळ आला होता. बाजीरावाने वाटाघाटीसाठी हलक्या दर्जाचा आणि अधिकार नसलेल्या
लोकांना पाठवले याचा त्याला संताप आला. शेवटी २५ ऑक्टोबर रोजी शिंदे-पेशवे आणि यशवंतरावाचे सैन्य हडपसरजवळ आमनेसामने आले.
त्या भीषण युद्धात पेशवे आणि
शिंदेंच्या फौजांचा दारुण पराभव झाला आणि बाजीराव थेट वसईला पळून गेला.
त्याला असे करण्यापासून रोखण्याचा
यशवंतरवाने पुष्कळ प्रयत्न केल पण तो त्यात अयशस्वी झाला. बाजीराव परत येत नाही हे पाहून यशवंतरावाने अमृतरावास
पेशवेपदाची वस्त्रे मागवून घेतली पण अमृतरावाची गादीवर बसण्याचीही इच्छा दिसेना.
अशात ३१ डिसेंबर १८०२ रोजी
बाजीरावाने इंग्रजांशी तह केला आणि मांडलिकत्व स्वीकारले. याच दिवशी खऱ्या अर्थाने पेशवाई बुडाली.
` बाजीरावाने
इंग्रजाशी केलेला तह जसा यशवंतरावास पसंत नव्हता तसेच दौलतरावासही तो तह पसंत
नव्हता. त्यामुळे दौलतराव,
यशवंतराव व रघुजी भोसले या त्रिवर्गाने
पूर्वीचे मतभेद विसरून एकत्र येत इंग्रजांशी युद्ध करण्याचा बेत आखला.
यशवंतरावाने सर्वांना त्या आशयाची
पत्रे लिहिली होती. बाजीराव असा आत्मघातकी निर्णय
घेईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. तिघांच्या सेना १८०३ मध्ये एकत्र
आल्या. आता इंग्रजांना हरवणे सोपे जाणार
होते. वसईचा तहही रद्द करून घेता येणार होता.
पण नियतीच्या मनात काही वेगळेच
होते.
नर्मदाकाठी तिघांच्या सेना एकत्र
आल्या. याच दरम्यान अमृतराव पेशव्याच्या
हाती एक दौलतराव शिंदेचे बाजीराव पेशव्याला पाठवलेले पत्र लागले.
ते बहुदा बनावट असावे अशी शंका
घेण्यास बराच वाव आहे, कारण त्या पत्रात दौलतरावाने
पेशव्याला लिहिले होते की आम्ही इंग्रजांवर जय मिळवला की मग आपण एकत्र येऊन
यशवंतरावचा काटा काढू, वेलस्लीने तर ही इंग्रजांचीच एक
चाल होती असे मान्य केले आहे. कारण मुळात हे पत्र अमृतरावच्या
हाती लागलेच कसे आणि ते त्याने यशवंतरावाला पाठवण्यात त्याचा काय स्वार्थ होता?
त्याचा स्वार्थ असेल तर
इंग्रजांकडून आपल्यालाही पेन्शन मिळवावे. पेन्शन प्राप्त करण्यासाठी अमृतराव इंग्रजांच्या कुटील डावास
बळी पडला. अमृतरावाने वेलस्लीच्या
सांगण्यावरून ते पत्र यशवंतरावाकडे रवाना केले. अमृतरावाने हा मराठ्यांचा केलेला मोठा विश्वासघातच होता असे
अनेक इतिहासकारांनी नोंदवलेले आहे.
ते पत्र वाचून यशवंतरावाच्या मनात
किल्मिष निर्माण होईल असा जो इंग्रजांचा अंदाज होता तो खरा झाला.
दौलतराव अद्यापही आपल्यावर डूख
धरून आहे याची खात्री पटली. आता एकत्र राहण्यात अर्थ नाही हे
मनी धरून यशवंतरावाने रातोरात आपला तळ नर्मदेच्या काठावरून हलवला व स्वतंत्र
वाटचाल सुरु केली.
यशवंतरावाने तळ सोडला आहे ही खबर
मिळताच वेलस्लीने कर्नल कॉलिन्स मार्फत दौलतरावास धमक्या द्यायला सुरुवात केली.
६ ऑगस्ट १८०३ रोजी इंग्रजांनी
शिंदे व भोसले विरुद्ध युद्ध घोषित केले. इंग्रजांनी अत्यंत धूर्तपणे युद्धाची योजना तर आखलीच पण
दौलतरावाच्या नियंत्रणाखाली असलेल्या पातशहाला आपल्या कब्जात घेण्यासाठीही योजना
आखली. इंग्रजांनी ओरिसा, बंगाल ते गुजराथपर्यंत जेही
प्रांत भोसले आणि शिंदेंच्या ताब्यात होते ते घेण्याचा सपाटा लावला.
दोघांच्याही त्या त्या
प्रांतांच्या रक्षणासाठी ठेवलेल्या सेना मार खाऊ लागल्या. लासवारी युद्धात तर शिंदेंचा जो पराभव झाला तो दौलतरावाच्या जिव्हारी
लागण्यासारखा होता.
१ नोव्हेंबर १८०३ रोजी ही
लासवारीची लढाई अलवर गावाजवळ झाली. जनरल लेक इंग्रजी सैन्याचे
नेतृत्व करत होता. शिंदे फौजा प्राणपणाने लढल्या असल्या
तरी शेवटी त्यांचा पराजय झाला.
एकीकडे शिंदे-भोसलेंच्या मदतीस जावे असे बाजीरावाला अधून मधून वाटत असले तरी
आता तोच इंग्रजांचा मांडलिक बनलेला असल्याने सरदारही त्याला जुमानेना झाले.
त्यात बाजीराव धरसोडीच्या
वृत्तीचा. त्यामुळे पेशव्याकडून कोणतेही
सहाय्य झाले तर नाहीच पण अडसर मात्र निर्माण झाला.
शिंदे आणि भोसले आता दोन्ही
बाजूंनी कात्रीत सापडलेले होते. वेलस्ली असे दाखवत होता की तो जणू
पेशव्यांच्या आदेशानेच ही मोहीम पार पाडत होता. वेलस्लीच्या फौजांना दौलतराव जमेल तेवढा प्रतिकार करून त्याचे
सैन्य कापून काढत होता खरा पण तो मागे रेटला जात होता.
त्यात भोसले व शिंदे यांच्यातही
मतभेद निर्माण झाले ते दौलतरावच्या मताप्रमाणे कवायती सैन्याच्या पद्धतीने की
भोसलेला वाटते तसे गनिमी काव्याने या मुद्द्यामुळे.
आसई (जिल्हा जालना) येथे इंग्रजानी दौलतरावाच्या
फौजांना गाठले व युद्धाला तोंड फुटले. दौलतराव व भोसलेच्या सैन्याने प्राणपणाने लढाई दिली.
वेलस्लीकडील बारा-तेराशे गोरे तर सातशे तेलंगी मारले गेले. त्यांच्या तोफा बंद झाल्याने इंग्रजांचा मोड झाला असे वाटून
घोडदळास पुढे सरकण्याचा आदेश दिला व त्यांचा तोफखाना बंद करण्यात आला.
तेवढ्यात इंग्रजांनी संधी साधून
पुन्हा तोफांचा मारा सुरु केला आणि जिंकत आलेल्या युद्धाचे पारडे फिरले.
यात दौलतरावाच्या तीन पलटणी
मारल्या गेल्या तर अनेक तोफा तेथेच सोडून मागे अजिंठ्याकडे परतावे लागले.
ही हारही नव्हती की जीतही.
पण शिंदे-भोसले सेना आडगाव येथे जमल्या आहेत हे समजताच वेलस्लीने पुन्हा
त्या दिशेने वाटचाल सुरु केली. तेथे दोन्ही फौजा युद्धाच्या
तयारीत खड्या होत्या. येथील युद्धातही इंग्रजांची मोठी
हानी झाली असली तरी मराठ्यांना आपापसातील गोंधळामुळे एकजूट राखता आला नाही व तेथून
काढता पाय घ्यावा लागला.
पण इंग्रज आपला पाठलाग सोडत नाहीत
हे दौलतराव व रघोजीच्या लक्षात आले. इंग्रजांशी तात्पुरता तह करून
सर्व मराठा सरदारांना एकत्र करून मग इंग्रजांशी झुंज द्यावी असा त्यांनी आपापसात
निर्णय घेतला आणि वेलस्लीशी तहाची बोलणी सुरु केली. पण बेलस्ली धूर्त होता. त्याने ज्या वाटाघाटी केल्या त्या प्रत्येकाशी “तुम्ही तुमच्यापुरते बोला” असे सांगून आणि भविष्यातील ऐक्याची शक्यताच संपवून टाकली.
त्यामुळे एकत्र तह होण्याऐवजी दोन
वेगळे तह झाले. त्यानुसार भोसलेने १७ डिसेंबर
१८०३ रोजी देवगाव येथे तर दौलतरवाने ३० डिसेंबर १८०३ रोजे सर्जी-अंजनगाव येथे इंग्रजांशी तह केले व मराठी साम्राज्याच्या अंताचा
वेग वाढला.
यानंतर दौलतरावाकडे इंग्रजांनी
ठेवला तेवढाच प्रदेश राहिला. पण ही मांडलिकी त्याला सहन होत
नव्हती, त्यात यशवंतराव त्यालाही पत्रे पाठवून
त्याने इंग्रजांविरुद्धच्या युद्धात सामील व्हावे अशी आवाहने तर करत होताच पण त्याच
वेळी प्रत्येक लढाईत इंग्रजांना धूळ चाखायला भाग पाडत होता. इंग्रजांची एवढी मानहानी जगात कोठे झालेली नव्हती. त्याच्यामुळेच वेलस्लीची उचलबांगडी होऊन कॉर्नवालिसला नवा गव्हर्नर जनरल नेमावे लागले होते.
शेवटी त्याने यशवंतरावास मिळून इंग्रजांशी युद्ध पुकारत
सार्वभौमत्व प्राप्त करण्याचे ठरवले.
पण इंग्रज सावधगिरी म्हणून
सर्वांवर बारकाईने लक्ष ठेवून होते, दौलतराव यशवंतरावास जाऊन मिळण्यासाठी सैन्य घेऊन निघाला पण मेजर
जॉन माल्कमने त्याला वाटेतच गाठले. दौलतरावास शांत करण्यासाठी त्याने पूर्वीच्या तहाच्या अटी अजून
सौम्य करायचे तर ठरवलेच पण आर्थिक सवलती देत एक विशेष बाब म्हणून महाराणी बायजाबाई
व कन्या चिमाबाईला कंपनी सरकारतर्फे स्वतंत्र जहागिऱ्या बहाल केल्या गेल्या. हा नवा तह २४ डिसेंबर १८०४ रोजी झाला. त्या तहामुळे दौलतरावाचा पुढे
जाण्याचा उत्साह मावळला आणि तो परत फिरला.
या तहानंतर दौलतरावानने इंग्रजांविरुद्ध पुन्हा शस्त्र
उचलन्याचा विचार सोडून दिला.
पण शिंदेचे जेही लष्कर होते त्यात कोणत्याही तहानुसार कमतरता आलेली
नव्हती. पेरों सारखे फ्रेंच सेनानी ते अम्बुजी इंगळेसारखे जुने सरदार
अजूनही त्याच्याजवळच होते. दौलतरावाने ग्वाल्हेरचा तळ जेथे पडला होत्या तेथेच लष्कर नावाचे
गाव उभारायला सुरुवात केली. मध्यंतरी इंग्रजांशीच्या तहामुळे नाराज झालेला सर्जेराव घाटगे
पुन्हा मुलीतर्फे मध्यस्ती करून दौलतरावाच्या दरबारात सामील झाला होता.
सर्जेराव घाटगेचा खून
सर्जेराव हा एक आपमतलबी माणूस होत हे आपण येथवरच्या माहितीवरून
पाहिले असेलच. केवळ स्वार्थासाठी त्याने आपली कन्या दौलतरावास दिली होती. अर्थात दौलतरावाचे बायजाबाईवर
नितांत प्रेम असल्यानेच हा प्रपंच सुखाचा झाला आणि असे असले तरी स्वार्थासाठी
कोठल्याही थराला जायची त्याची तयारी असे. तो मोठा विक्षिप्तही असला तरी
गोडबोल्या व धोरणी होता.
मराठी रियासतीच्या म्हणण्यानुसार याचे जवाहीर नावाचे एक अंगवस्त्र
होते. तिच्याशी एकदा त्याच्या नोकराने फाजीलपणा केला. हे समजताच त्याने नोकराचे हात-पाय तोडले व नाकही कापले. हा माणूस अत्यंत नीतीहीन असून त्याच्याएवढा दुष्टपणा कोणाजवळ
नसेल. त्याच्या क्रौर्याच्या अनेक कथा इतिहासाने नोंदलेल्या आहेत आणि
त्यांची उजळणी येथे करण्याची आवश्यकता वाटत नाही. पण १८०९ मध्ये सर्जेराव पुन्हा
दौलतरावाच्या दरबारात स्थान मिळवून बसला एवढे मात्र खरे.
त्यानंतर दोनेक महिने त्याचे वर्तन ठीक होते, पण नंतर त्याचा मूळ स्वभाव उचल खाऊ लागला. आपला खर्च भागवण्यासाठी लोकांवरील
त्याचा जुलूम एवढा वाढला की दौलतरावासही ही ब्याद नकोशी झाली. तो सर्जेरावास टाकून बोलू लागला. दौलतरावाला फौज सांभाळायला खर्च तर करावाच लागे. फौज मागील वेतन दिल्याखेरीज काढताही येत नव्हती. त्यामुळे त्याच्या आर्थिक अडचणी अजून स्म्प्लेल्या नव्हत्या.
अशा स्थितीत सर्जेरावच्या पाटणकर घराण्यांतील बायकोच्या भावाने दौलतरावकडून
जे कर्ज घेतले होते ते मुदत संपली असूनही गरजेच्या वेळेसही तो परत देईना तेव्हा
दौलतरावाने त्याच्या घरी धरणे धरले. त्यामुळे सर्जेराव अगदीच चिडून गेला. ब्राह्मणांस दान-धर्म करून तो आपले चंबू-गबाळे आवरून जायला निघाला. त्याची समजूत काढून त्यास परत आणावे असा बायजाबाईने हट्ट धरला. तरीही दौलतरावने तिचेही ऐकले नाही, पण सर्जेरावाची जवाहीर ही रखेल
तेथे होती तिला मात्र पकडून ठेवले. हिच्यासाठी का होईना सर्जेराव परत येईलच याची त्याला खात्री
होती.
आणि तसेच झाले कारण सर्जेरावास जवाहीर कैदेत आहे हे कळताच तो अत्यंत
शोकविव्हळ झाला. त्याने दौलतरावास निरोप दिला की “जवाहीर परत आली नाही तर मी प्राण
ठेवणार नाही. तिने तुमचा काय गुन्हा केला आहे?” शेवटी बाळोबा इंगळेने मध्यस्ती
करून सर्जेरावास परत आणले. १५ जुलै १८०९ रोजी सर्जेरावने आपल्या जावयास मेजवानीही दिली. रात्रभर नाचरंग केले. पण या स्नेहमिलनानंतर पुन्हा
त्यांच्यात भांडणे सुरु झाली. दरबारात दौलतरावने त्याचा पाणउतारा केला. तो अपमानित होऊन त्याने दरबारातून
काढता पाय घेतला.
२६ जुलै रोजी लोचट सर्जेराव पुन्हा दौलतरावास भेटला व आपल्या
काही मागण्या पुढे रेटल्या. दौलतरावाने त्याला झिडकारले आणि हत्तींच्या टक्करांचा खेळ
पहायला तेथून जाऊ लागला. पाठोपाठ आलेल्या सर्जेरावाने त्याचा अंगरखा धरून तमाशा सुरु
केला.
दौलतरावाचे अंगरक्षक हा प्रकार पाहून सर्जेरावास ओढून दूर करू
लागले. पण सर्जेरावाने तलवार उपसली व त्यात काही लोक मारले गेले. मग बात बिघडली आहे हे लक्षात येताच तो घाबरून आपल्या तंबूच्या
दिशेने पळाला.
मानाजी फाकडे याचा मुलगा आनंदराव दौलतरावाच्या देवडीवर अंमलदार होता. तो शस्त्रधारी सैनिकांचे पथक घेऊन घाटगेच्या तंबूकडे निघाला. तंबू पाडण्यात आला व सर्जेरवास बाहेर खेचून काढले. रस्त्यावर आणून सर्जेरावाचे तुकडे तुकडे केले गेले. अशा रीतीने एका दुष्टबुद्धीचा अंत झाला, त्याचे प्रताप सर्वांनीच पाहिले
असल्याने आणि त्याच्या दुष्कृत्यांमुळे तो आधीच नकोसा झाला असल्याने कोणालाच
त्याच्या मृत्यूचे काही वाईट वाटले नसले तरी बायजाबाईस मात्र आपल्या पित्याच्या
खुनाने खूप दु:ख झाले.
पेंढारी
यानंतर मात्र दौलतरावाच्या जीवनात
विशेष उल्लेखनीय घटना घडली नाही. इंग्रजांशी मैत्री वाढवत गेल्याने त्याचे वार्षिक उत्पन्न वाढत
गेले. इंग्रज सरकारनेही त्याचा यथायोग्य मानमरातब ठेवला. तरीही शिंद्यांचे सैन्य मोठे असल्याने वेतन भागवण्यासाठी दौलतरावास
आपले प्रांत गहाण ठेऊन कर्ज उभारावे लागे. लष्करी अंमलदार आता शिरजोर झालेले
होते. त्यात इंग्रजांनी पेंढारी सैन्याविरुद्ध मोठे मोहीम काढली होती कारण
आता पूर्वीसारखी युद्धे होत नसल्याने त्यांना उत्पन्नाचे साधन उरले नव्हते
त्यामुळे ते लुटपाट करत सर्वत्र धुमाकूळ घालत होते. पेंढारी लोकांनी इंग्रजांना
प्रतिकार केला असला तरी आता पेंढारी विखुरलेले होते त्यामुळे ते दुबळेही झालेले
होते. पूर्वी शिंदे-होळकरांच्या सैन्यात पेंढारी (म्हणजे बिनपगारी कोणत्याही धर्म-जातीचे योद्धे) लोकांची मोठी संख्या होती. पेंढारी जीवावर उदार होऊन युद्ध
करत असल्युआमुळे शिंदे-होळकरांना अनेक विजयही मिळाले होते. पण आता भारत देश इंग्रजांच्या
छत्र-छायेखाली जाण्याच्या बेतात आला असता पेंढारी लोकांची तशी
उपयुक्तताही संपलेली होती.
त्यामुळे मेजर माल्कमच्या सूचनेनुसार दौलतरावाने १८१७ मध्ये आपले
पेंढारी सैन्य इंग्रजांच्या देखरेखीखाली ठेवण्यास तयारी दाखवली. पण इंग्रजांनी पाठोपाठ राजपूत संस्थानिकांवरचे शिंदेंचे
स्वामित्वही काढून घेतले.
यापूर्वीच १८११ मध्ये यशवंतरावाचा मृत्यू झालेला होता तर १८१७
साली होळकरशाही जरी इंग्रजांच्या आधिपत्याखाली आलेली असली तरी त्याची मुलगी
भीमाबाईने पेंढारी सैनिकांच्या साथीनेच इंग्रजांशी स्वातंत्र्य लढा सुरूच ठेवला
होता. त्याची लागण अन्यत्र नको म्हणून इंग्रज सर्वत्र सावधगिरी बाळगत
होते तसेच भीमाबाईकडे असलेल्या पेंढाऱ्याना अनेक आमिषे दाखवून आपल्या बाजूला खेचत
चालले होते. पण दौलतरावाच्या मनात बंडाचा विचारच नसल्याने त्याने सर्व
तहांवर सह्या करून टाकल्या.
यामुळे आता इंग्रजांशी संघर्षाच्या पावित्र्यात असलेल्या
बाजीरावास खूप राग आला. त्याने दौलतरावास लिहिले की "तुमचे तीर्थरूपांनीं स्वामिसेवा एकनिष्ठपणें करून, दिल्लीची वजिरी संपादन केली व ते जगविख्यात होऊन गेले. त्यांचे चिरंजीव तुह्मी असून, कंपनीसरकाराशीं
स्नेह करून,
आह्मांशीं कृतघ्न झालां. हें करणें तुह्मांस उचित नाहीं. ह्यापेक्षां तुह्मीं बांगड्या
भरल्या असत्या, तर बरें झालें असतें. आह्मांवर तूर्त प्रसंग गुदरला आहेच. आतां तुमचे ऐश्वर्य कायम राहणे
कठीण दिसते!" बाजीरावांचे हें पत्र वाचून दौलतराव शिंदे ह्यांनीं विस्मय
प्रदर्शित केला. परंतु त्यांनी त्या पत्रानें प्रोत्साहित होऊन इंग्रजांविरुद्ध शस्त्र उचललें नाहीं. एकंदरीत त्यांनी ह्या वेळीं जें
वर्तन केले,
तेंच त्यांचें राज्य सुरक्षित
राहण्यास कारण झालें. पेंढारी लोकांचे बंड मोडल्यापासून मध्य हिंदुस्थानांत बरीच
शांतता झाली. तेणेंकरून शिंद्यांचे उत्पन्न २० लक्ष रुपये अधिक वाढलें व इतर
रीतीनेंही पुष्कळ फायदे झाले. इ. स. १८१८ पासून दौलतराव शिंदे हे इंग्रजसरकाराशीं अत्यंत
स्नेहभावाने वागून त्यांचे विश्वासू दोस्त बनले. त्यामुळे इंग्रज सरकारही त्यांचा उत्तम प्रकारचा मानमरातब ठेवीत असे पारसनिसांनी
नमूद केलेले आहे.
दौलतराव शिंदेचा मृत्यू
ऑक्टोबर १८२६ पासून दौलतरावाची तब्बेत बिघडायला सुरुवात झाली. बायजाबाईने त्यांची पुष्कळ काळजी घेतली, मातब्बर वैद्यांना पाचारण केले पण
तब्बेतीत फारसा फरक पडला नाही. ग्वाल्हेरचा रेसिडेंट मेजर
स्टुअर्ट हाही दौलतरावाच्या तब्बेतीची विचारपूस करायला सतत येत असे. दौलतरावास पुत्र झाला नसल्याने वारसाची काळजी
होतीच. एखादा दत्तक घ्या अशी इंग्रज वारंवार विनंती करत
असले तरी दौलतराव म्हणे माझी पत्नी बायजाबाई राज्य सांभाळायला सर्वात अधिक योग्य
असता दत्तक घेण्याची काय गरज?
दौलतरावास बायजाबाई आणि रखमाबाई या दोन पत्नी
होत्या. त्यात रखमाबाई अत्यंत साधी-भोळी
असली तरी बायजाबाई मात्र शहाणी, राजकारणी, धूर्त, प्रसंगावधानी, आणि दृढनिश्चयी होती आणि तिने आपल्या पतीस
राज्यकारभार चालविण्याचे कामीं पुष्कळ वर्षें साहाय्य केलें होतें. त्यामुळें दौलतरावास सर्व राज्यकारभार बायजाबाईच्या
स्वाधीन करावा असे वाटणे साहजिक होते. शिवाय बायजाबाईवर
दौलतरावाचे निस्सीम प्रेम होते.
दौलतराव शिंदेच्या आजारपणात
रेसिडेंट मेजर स्टुअर्टने संस्थानाच्या भावी व्यवस्थेबद्दल पुनः एकदा प्रश्न
विचारला तेव्हा दौलतरावाने उत्तर दिले की, "जर
राजाची बायको शहाणी व समजूतदार असेल, तर त्याच्या पश्चात्
त्याचा कारभार करण्यास तीच पात्र होय." त्या
वेळीं स्टुअर्टने विचारलें कीं,
"परंतु आपणांस दोन बायका आहेत, त्याचा विचार काय ?” महाराजांनी उत्तर दिलें "होय. शिरस्त्याप्रमाणें
माझ्या वडील पत्नीनें माझ्या पश्चात् राज्याचा कारभार चालवावा हें खरें आहे. परंतु राज्यभार हातीं घेणाऱ्या बायकोच्या अंगीं
शहाणपण, जगाचें ज्ञान, व्यवहारांतला अनुभव हे गुण असावे लागतात. ह्या सर्वांची तिच्या ठिकाणीं वानवा आहे. त्यामुळें ती राज्य करण्याचे कामीं अगदीं अपात्र
आहे. तिनें फक्त राजवाड्यांत बसावें आणि दुवक्तां
जेवावें. ह्यापेक्षां तिच्या अंगीं अधिक कांहीं नाहीं." अशा प्रकारें दौलतराव शिंदेने आपल्या दोन्ही
राण्यांविषयीं आपलें मत कळविले. त्यावरून मेजर
स्टुअर्टची बायजाबाईंच्या योग्यतेबद्दल खात्री झाली; व आपल्या पश्चात् बायजाबाईनीं राज्यकारभार
चालवावा अशी महाराजांची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले.
दौलतरावाची तब्बेत दिवसेंदिवस ढासळत गेली. शेवटी शेवटी त्याला बोलवेनासे झाले. अखेर २१ मार्च १८२७ रोजी त्याने शेवटचा श्वास
घेतला.
बायजाबाईने ग्वाल्हेर येथे त्यांची छत्री बांधलेली
आहे. दौलतरावाच्या मृत्युनंतर बायजाबाई तिचा भाऊ हिंदुराव घाटगे याच्या मदतीने
राज्यकारभार पाहू लागली.
·
No comments:
Post a Comment