णमोकार मंत्र- (पर्यायी नावे- पंच-णमोक्कारा, नमोकार, नवकार, नमस्कार मंत्र)- णमोकार मंत्र जगभरातील बहुतेक सर्व जैन दररोज किंवा कधीकधी अनेक वेळा - जप करतात. जे जैन परंपरेत जन्मलेले नाहीत ते देखील या मंत्राचा जप करतात असे आढळून आले आहे. या मंत्राला मूलमंत्र, महामंत्र, पंचनमस्कार मंत्र किंवा पंचपरमेष्ठी मंत्र असेही म्हटले जाते. खरे म्हणजे जैन तत्वज्ञानाचे मुलभूत सार या मंत्रात आले असल्याने अभ्यासकांच्या दृष्टीनेही हा मंत्र महत्वाचा आहे. जैन परंपरेत या मंत्राचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. जैनांच्या मते णमोकार मंत्र नेहमीच अस्तित्वात होता आणि तो निर्माण केला गेलेला नाही अथवा कोणा व्यक्तीने लिहिलेलाही नाही. तो अनादि आहे. सध्या सर्वत्र मान्यता असलेल्या मंत्राचे स्वरूप, क्वचित उच्चारभेद वगळता) खालीलप्रमाणे आहे.
Friday, November 14, 2025
णमोकार मंत्र
णमो अरिहंताणं
(अरिहतांना नमस्कार असो)
णमो सिद्धाणं
(सिद्धांना नमस्कार असो)
णमो अयरियाणं
(आचार्यांना नमस्कार असो)
णमो उवज्झायाणं
(उपाध्यायांना नमस्कार असो)
णमो लोए सव्व साहूणं
(विश्वातील सर्व साधू-साध्वींना नमस्कार असो)
एसो पंचणमोक्कारो, सव्वपावप्पणासणो
मंगला णं च सव्वेसिं, पडमम हवई मंगलं
(हा णमोकार महामंत्र सर्व पापांचा विनाश करणारा सर्व मंगलांहून सर्वाधिक श्रेष्ठ मंगल आहे.)
इतिहास- ऐतिहासिक उपलब्ध पुराव्यांनुसार हा मंत्र कालौघात विकसित होत गेलेला आहे. पुरातत्वीय पुराव्यांनुसार या मंत्रातील आरंभिक ओळी इसपूच्या दुसऱ्या शतकातील हाथीगुंफा येथील सम्राट खारवेलच्या शिलालेखात येतो. त्यानंतर महाराष्ट्रातील लोहगड व पाले येथील इसपू दुसरे ते पहिले शतक या काळातील शिलालेखातही या मंत्राची पहिली ओळ आलेली आहे.
हाथीगुंफा शिलालेख-
हा शिलालेख ओडीशातील उदयगिरी टेकड्यांत खोदण्यात आलेल्या गुंफांपैकी ही एक मोठी गुंफा आहे. यात हा १७ ओळींचा लेख असून त्याची सुरुवात-
“ नमो अरहंतानं नमो सव-सिधानं”
अशी असून पुढे सम्राट खारवेलाने आपल्या कार्यकाळात केलेल्या विपुल कार्याची आणि विजयांची नोंद आहे. या लेखात संपूर्ण णमोकार मंत्र आलेला नाही व जो आलेला आहे त्यात उच्चारभेद असल्याचे दिसते. उदा. येथे मंत्रात आलेला “सव” (सव्व?) हा शब्द पुढे अवतरणाऱ्या मंत्राच्या या ओळीत येत नाही. हा शिलालेख इसपू १६२ मधील आहे असे विद्वानांचे साधारण सर्वमान्य मत आहे.
लोहगड (महाराष्ट्र) येथे सापडलेल्या जैन लेण्यांत एक दान-शिलालेख मिळाला असून त्याची सुरुवात “णमो अरहंताणम्” अशी आहे.
पाले (महाराष्ट्र) येथील जैन गुंफेतही एक दान-शिलालेख सापडला असून त्याचीही सुरुवात “णमो अरहंताणम्” अशी असून हे दोन्ही लेख भदंत इदरखित या एकाच व्यक्तीने कोरवले आहेत अशी मान्यता आहे कारण दोन्ही दान-शिलालेखांत हेच नाव आलेले आहे.
वरील तीनही शिलालेख ब्राह्मी लिपीत असून त्यांची भाषा प्रादेशिक प्राकृत आहे. त्यामुळेही काही स्थानिक भाषिक भेद निर्माण झाले असणे शक्य आहे. हे दोन्ही शिलालेख इसपुचे दुसरे ते पहिले शतक या दरम्यान कोरले गेले असावेत असा पुरातत्व खात्याचा अंदाज आहे. थोडक्यात प्राचीन शिलालेखात णमोकार मंत्राचे संक्षिप्त रूप दिलेले आहे. शिलालेखांची मर्यादा लक्षात घेता हे स्वाभाविकही आहे. पण इसपूच्या दुसऱ्या शतकात हा मंत्र सामाजिक दृष्ट्या निश्चयाने प्रचलित होता असे दिसते.
या मंत्राचा पहिला ग्रांथिक पुरावा मिळतो तो “वासुदेवहिंडी” या इसवी सनाच्या दुसऱ्या ते तिसऱ्या शतकाच्या दरम्यान श्वेतांबरपंथीय संघदास गणी याने लिहिलेल्या ग्रंथात. यात मंत्राचा विस्तार दिसत असला तरी तो आज जसा पूर्ण आहे तसा नाही. त्यात आजच्या मंत्रात नसलेले मध्ये अनेक विवेचनात्मक शब्द घातले गेले असले तरी ते वगळता त्यात दिलेला मंत्र असा-
“नमो .....अरहंताणं
नमो ....सिद्धाणं
नमो .....अयरियाणं
नमो.... उवज्झायाणं
नमो ....साहूणं “
यात मध्ये गाळलेले काय आहे हे आपण मंत्राच्या एका पहिल्याच ओळीवरून समजू शकतो. संघदास गणी यांनी दिलेल्या मंत्रातील ओळी या मूळ शब्दरचनेला स्थान देत असल्या तरी मध्ये त्यांनी स्पष्टीकरनात्मक शब्द सामाविष्ट केलेले आहेत. उदा.-
णमो विणयपणयसुरिंदविंदवंदियकमारविं दाणं अरहंताणं
आपल्या लक्षात येईल की वरील सर्व मंत्रांत काही ना काही शब्दविस्तार किंवा पाठभेद आहेत. शिवाय क्रमश: मंत्राचा विस्तार होत गेलेला दिसतो. अरहंताणं या शब्दाऐवजी अरिहंताणं ही संज्ञा सर्वप्रथम वापरली ती भद्रबाहु यांनी आपल्या कल्पसूत्र या ग्रंथात. हा ग्रंथ जरी इसपू चवथ्या शतकात रचला गेला अशी मान्यता असली तरी तो लिखित रुपात वल्लभी धर्मसंसदेच्या वेळेस राजा ध्रुवसेनाच्या कारकीर्दीत पाचव्या ते सहाव्या शतकात आला असावा असे अंतर्गत पुराव्यांवरून मानले जाते. मूळ मौखिक संहितेत हा मंत्र सामाविष्ट होता की नाही हे मात्र सांगता येत नाही. (पहा- कल्पसूत्र व भद्रबाहू प्रथम)
संपूर्ण णमोकार मंत्र
संपूर्ण णमोकार मंत्र सर्वप्रथम येतो तो भद्रबाहू विरचित कल्पसूत्र या ग्रंथात. तोवर हा मंत्र क्रमश: विकसित होत होता असे दिसते किंवा संपूर्ण मंत्र लिहित बसण्याची वा कोरत बसण्याची आवश्यकता न वाटल्याने शिलालेखात त्याला संक्षिप्त स्वरूप दिले असेल असेही म्हणता येऊ शकते. पण कल्पसूत्रमध्ये मात्र आज म्हटला जातो व वर दिला आहे तसाच्या तसा मंत्र आलेला आहे. १९३३ साली बनस्थली येथे कल्पसूत्रच्या झालेल्या प्रकाशित प्रतीवरुन आपण याचा पडताळा घेऊ शकतो. णमोकार मंत्राचे पूर्ण विकसित रूप यात दिसून येते. महाकवी पुष्पदंत (इ.स. नववे ते दहावे शतक) यानेही ‘अरिहंताणं’ हीच संज्ञा वापरलेली आहे. तिलोयपन्नती या प्राचीन ग्रंथात मात्र अरिहंतांऐवजी सिद्धांना प्रथम वंदन केलेले आहे.
मंत्रातील संज्ञा व अर्थ-
आज जैन धर्मीय ज्या अर्थाने हा मंत्र घेतात तसाच प्रत्येक परमेश्ठीला केलेल्या वंदनाचा अर्थ “वासुदेवहिंडी” मध्ये संघदास गणी यांनी दिला आहे. तो असा-
अरहंत (अर्हत) म्हणजे ते लोक जे सर्वज्ञता प्राप्त जैन परंपरेच्या शिकवणी सामायिक करण्यासाठी मूर्त स्वरूप धारण करतात आणि "ज्यांचे कमळासारखे चरण" अशा प्रकारे "देवांद्वारे पूजनीय" असतात;
सिद्ध म्हणजे असे आत्मे जे त्यांचे सर्व कर्म नष्ट करून, त्रयस्थपणे वैराग्यपूर्णपणे विश्वाकडे पाहतात.
आचार्य हे तपस्वी गटांचे विश्वसनीय नेते आहेत आणि योग्य तपस्वी वर्तनाचे सर्वोच्च आदर्श म्हणून काम करतात;
उपाध्याय हे त्यांच्या तपस्वी विद्यार्थ्यांना जैन ज्ञान शिकवण्याची जबाबदारी घेणारे असतात.
साधू - भूतकाळातील आणि वर्तमानातील साधू हे सामान्यतः कर्मनाश करण्यासाठी योग्य आचरण मूर्त स्वरूपात आणत असतात.
नंतर सातव्या शतकातील श्वेतांबर ग्रंथातील महानिसीह-सुह (महानिशिथ सूत्र) पंच परमेष्ठीपैकी प्रत्येकाचा तपशीलवार अर्थ देते. यातील अरहंत या शब्दाची व्याख्या महत्वाची व व्यापक आहे. नवव्या शतकातील धवला टीका लिहिणारा वीरसेनही याच व्याख्येत अर्थबदल न करता अर्थविस्तार करतो. श्वेतांबर व दिगंबर जी व्याख्या सर्वसामान्यपणे घेतात त्यात समानता दिसून येते हे दोन्ही पंथांच्या आचार्यांच्या कथनावरून दिसून येते. बाराव्या शतकातील देवेंद्राच्या उत्तराध्यायन सूत्रावरील टीकेतही या मंत्राचा व्यापक अर्थ नोंदवलेला आहे. त्यानुसार णमोकार मंत्र हा आनंदाचा वाहक व एक संरक्षणात्मक साधन आहे, तसेच हा मंत्र आध्यात्मिकदृष्ट्या फायदेशीर, कर्म-नाश करणारा आवाज आहे. १२ व्या शतकातील हे अर्थ आज मंत्राच्या एकूण कार्ये आणि क्षमतांबद्दलच्या अनेक लोकप्रिय जैन समजुतींशी जुळतात.
-संदर्भ-
१. वासुदेवहिंडी, संघदास गणी, प्रकाशक- श्रीजैन आत्मानंद सभा, भावनगर.
२. Kalpasutra of Bhadrabahu Swami by Kastur Chand Lalwani, pub. Motilal Banarasidas, 1979
3. Roth, Gustav. 1986. “Notes on the Paṃca-Namokkāra-Parama-Maṅ gala in Jain Literature.” In Heinz Bechert and Petra Kieffer-Pülz (eds.), Indian Studies (Selected Papers). Delhi: Sri Satguru Publications. pgs.129-146.
-संजय सोनवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?
पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani · Pune · Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
No comments:
Post a Comment