Monday, November 3, 2025

महात्मा फुलेंचे अर्थविचार

 



 

आधुनिक भारतात आर्थिक विचार महत्वाचा आहे याचे भान निर्माण करणारे पहिले महापुरुष म्हणून महात्मा जोतीराव फुले यांची नोंद घ्यावी तर लागतेच पण त्यांचे आजही मार्गदर्शक असणारे अर्थविचार प्रत्येक सुजाण नागरिकाने समजावून घेतले पाहिजेत एवढे ते महत्वाचे आहे. भारतात तत्पूर्वी आधुनिक स्वरूपाची अर्थचर्चा झालेली नव्हती. देश इहलोकवादाची कास सोडून बव्हंशी परलोकवादी बनलेला होता. त्यामुळे सामाजिक प्रश्नांवरच नवीन अंगाने चर्चा होत नव्हती तर अर्थवादावर चर्चा होणे तर असंभाव्य होते. युरोपात औद्योगिक क्रांती होऊन अतिरिक्त उत्पादनांना बाजारपेठ शोधण्यासाठी नव्या नव्या वसाहती बनवत बसण्याची जीवघेणी स्पर्धा निर्माण झालेली होती. भारत देश असाच वसाहतवादाचा शिकार बनला. तरीही भारतीय लोकांनी आधुनिकतेच्या औद्योगिक प्रांताकडे काहीशा उपेक्षेनेच पहिले. त्यामागे पुरेशा भांडवलाचा अभाव, नावीन्याबद्दलचे मेलेले कुतूहल आणि धार्मिक परिस्थितीने निर्माण केलेली विकलांग स्थिती जबाबदार होती. यातून मार्ग काढणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन पुढारलेल्या समाजांतील धुरिणांनी जरी सामाजिक सुधारणांना प्राधान्य दिले असले तरी दारिद्र्यात पिचत असलेल्या भारतीय समाजाला आर्थिक उन्नती करून घेता येईल असे दिशादर्शक प्रयत्न झालेच नाहीत असे म्हणावे लागेल.

रूढ अर्थाने म. फुले अर्थशास्त्रज्ञ नव्हते, पण तांत्रिक बाबींत न शिरत बसता सामाजिक स्थितीचे करुणात्मक मनाने अवगाहन करून लोकांच्या पिचलेल्या अवस्थेचे कारण शोधणे व त्यावर उपाय सांगण्याचे कार्य त्यांनी केले.  गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड ही पुस्तके क्रांतीकारी अर्थविचार देणारी पुस्तके त्यांनी लिहिली. एकाच वेळेस धर्मव्यवस्था व ती करत असलेले शोषण, इंग्रजी सरकार व बाबूशाही भ्रष्ट प्रवृत्तीमुळे होणारे शोषण आणि कायदेव्यवस्थेमुळे  शेतकरी व कामगारांचे हरपलेले स्वातंत्र्य हे त्यांच्या चिंतनाचे मुख्य विषय झाले. य्तून मार्ग काढून उन्नती साधण्यासाठी शिक्षण हे एक महत्वाचे साधन त्यांनी मानले व कृतीशील उपक्रम सुरु केले. स्त्रियांचे दास्य हा तर त्यांच्या करुणेचा विषय. सावित्रीबाई फुलेंना मदतीस घेत त्यांनी स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ते स्वत: उत्कृष्ठ बांधकाम व्यावसायिक होते. त्यामुळे वंचितत्व दूर करण्यासाठी समाजातही पारंपारिक व्यवसायांसोबतच नवी उत्पादनव्यवस्था आणावी असेही त्यांचे आग्रहाने म्हणणे होते. समाजाचे एकंदरीत कल्याण शिक्षण, प्रतिभा आणि व्यावसायिकता याची कास धरण्याशिवाय होणार नाही असा त्यांच्या लेखनाचा मतितार्थ आहे. पण या लेखनातील त्यांनी धर्माच्या पुरोहितांकडून होणाऱ्या शोशानाबाद्द्ल केलेल्या कठोर प्रहारांमुळे एका हितसंबंधी वर्गाने अस्वस्थ होऊन महात्मा फुलेंना दोषाच देत रहायचे धोरण अंगीकारल्यामुळे त्यांच्या सकल अर्थविचारांची चर्चाच घडू देण्यात आली नाही व त्यांच्या अनुयायांनीही ती पुढे केलेली दिसत नाही. किंबहुना त्यांचे अर्थविचार सतत सामाजिक चर्चेत राहिले असते तर देशाची समग्र अर्थव्यवस्था मोजक्या कुडमुड्या भांडवलदारांची दासी न बनता ती एक सर्वसमावेषक आणि समर्थ अर्थव्यवस्था बनली असती.

खरे तर मानवतेचा हात न धरता सैद्धांतिक, बौद्धिक रंजन करणा-या आणि आकडेवारीच्या गणिती भरा-या घेणा-या आधुनिक अर्थतज्ञांनी महात्मा जोतीराव फुल्यांपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. महात्मा फुलेंसमोर कोणीसाव्या शतकाच्या मध्यानंतरची भारतीय आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिती होती.  आहे त्या स्थितीचे पुरेसे अवगाहन न करता मांडलेला कोणताही आर्थिक व सामाजिक सिद्धांत कुचकामी ठरत असतो. महात्मा फुले याला अपवाद होते. आहे त्या स्थितीच्या झळा कोणाला व का बसत आहेत आणि त्याचे जबाबदार घटक कोण याची जाण त्यांना होती. त्यांच्या लेखनामधून प्रकर्षाने प्रकट होणारे अर्थविचार आपण समजावून घेतले पाहिजेत.

कोणत्याही समाजात महत्वाचे दोन घटक विद्यमान असतात. एक घटक हा उत्पादक घटक असतो तर दुसरा घटक हा अनुत्पादक असला तरी प्रशासन, सांस्कृतिक/धार्मिक नियमनाच्या रूपाने उत्पादक घटकांचे नियमन करण्याचा आव आणत प्रत्यक्षात मात्र शोषण करणारा असतो असे त्यांच्या अर्थविचाराचे सूत्र म्हणता येईल. या अनुत्पादक घटकांमुळे उत्पादक घटक शोषित बनतो तर केवळ धार्मिक/प्रशासकीय वर्चस्वाच्या उद्दंडशाहीच्या आधारावर अनुत्पादक घटक अनायासे शोषक बनून जातो असा त्यांचा सिद्धांत आहे. महात्मा फुले इंग्रजी राज्याचे समर्थक होते असं अपप्रचार करण्यात अनेक आघाडीवर असल्याचे दिसतात. प्रत्यक्षात इंग्रजांच्या राज्यावर आसूड ओढताना इंग्रज मानवतावादी नियामकनाहीत तर ते अमानवी जुलुमी कायदे लादतात यावर महात्मा फुले भर देताना दिसतात. इंग्रजांनी देशात बरीच सुव्यवस्था आणली व धार्मिक अत्याचारापासून देशाला वाचवले हे सत्य असले तरी त्यांनी इंग्रजांना क्षमा केली नाही. शासनाने कसे मानवतावादी असायला हवे अन्यथा कोणतेही शासन प्रिय ठरू शकत नाही हा मोलाचा राजकीय विचार त्यांनी मांडला. आजही त्यांचे हे म्हणणे खरे ठरत आहे पण त्याविरोधात आसूड ओढायला आज महात्मा फुले राहिले नाहीत आणि त्यांचे अनुयायी तर कधीच कोशात जाउन लपले आहेत.

धार्मिक/सामाजिक शोषणावर आसूड ओढतांना ते वैदिक (ब्राह्मणी) धर्म शूद्रांवर (हिंदुंवर) अनिर्बंध राज्य करण्यासाठी कशा कसबीक्लुप्त्यांचा आधार घेत हिंदूंना विभाजित ठेऊन आपली अनिर्बंध सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात याचे विश्लेषण करतात. धर्मसत्ता विरुद्ध मानवी शोषण हा जागतिक द्वंद्वाचा विषय आहे. भारतात वैदिक पुरोहितशाहीने धर्माच्या नावावर सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप करत कसे शोषण चालवले आहे याचे विदारक दर्शन ते घडवतात.

परंतु मुळात धार्मिक असो कि प्रशासकीय, शोषणाचा पायाच मुळात आर्थिक आहे आणि शोषितांचे अज्ञानी असणे हेच शोषकांचे अंतिम उद्दिष्ट असते असेही ते गुलामगिरीया ग्रंथात स्पष्ट करतात. कोणतेही सरकार सामान्य नागरिकांना आर्थिक समृद्ध असणे आवडत नाही. उलट लोक आपल्यावरच कसे अवलंबून राहिले पाहिजेत याकडेच त्यांचे मुख्य लक्ष असते. थोदाक्य्तात सत्ताधारी व धर्मनेते समजणार्या लोकांना जनता कंगाल कशी करता येईल व त्यांचे अज्ञान कसे वाढेल हे पाहण्याचे मार्ग शोधणे गरजेचे ठरत असते. त्याशिवाय आपली सत्ता टिकणार नाही याचेही भान त्यांना असते.

इंग्रजांनी प्रशासकीय कार्यात भरणा केलेल्या वर्गात बव्हंशी अधिकारी वैदिक ब्राह्मण होते. प्रशासकीय अधिकारी म्हणून ते भ्रष्टाचाराच्या मार्गाने शोषण करत असताच पण त्याच वेळी धार्मिक वर्चस्वाच्या नादात दान-दक्षिणा-ब्राह्मणभोजन इत्यादीच्या रूपाने होणारे शोषण वेगळेच. सांस्कृतिक/धार्मिक गुलामगिरी वैदिकेतरांच्या मानसिक गुलामगिरीचे व शोषणाचे कारण आहे म्हणून ती गुलामगिरी धुडकावून लावायची असेल आणि आपली आर्थिक व बौद्धिक उन्नती करायची असेल तर विवेकनिष्ठ विद्येशिवाय तरणोपाय नाही असा मार्गही महात्मा फुलेंनी  सुचवला. ते नुसते मार्ग दाखवून थांबले नाहीत तर ते व सावित्रीबाई फुले भारतीय शिक्षणाचे अग्रदूत बनले. विवेकनिष्ठ विद्या हा महत्वाचा सिद्धांत ते मांडतात. शिकायला तर हवेच, पण का? तर ते विवेकी माणूस घडवण्यासाठी. विवेकाशिवाय विद्या व्यर्थच होय हे सार्वकालिक तत्व महात्मा फुले मांडून जातात. याचे कारण म्हणजे तत्कालीन स्थितीच अविवेकी होती. याबाबत ब्राह्मणी वर्गावर कठोर कोरडे ओढले गेले असतील तर आत्मपरीक्षण करायचे की महात्मा फुलेन्नाच नाकारायचे याचा विविक ब्राह्मणी व्यवस्थेने बाळगला नाही हेही एक दुर्दैव होय.

तत्कालीन भारतात वैदिक धर्मीय वगळता आधुनिक शिक्षणाची दारे इतरांना तशी किलकिलीच होती. याचे कारण शिक्षकवर्ग व प्रशासकिय वर्ग त्याच धर्माचे. त्यामुळे एकंदरीत समाजावरचे वर्चस्व सर्वार्थाने हा वर्ग मिळवून बसला होता. इंग्रजांनी काही चांगले कायदे केले तरी त्यावर अंमलबजावणी करणारा हाच वर्ग. चांगल्या गोश्तीन्चीही कशी वाट लावायची हे भारतीय प्रशासकीय अधिकार्यांकडून आजही पहायला मिळते. इंग्रजी राज्यात या प्रशासकीय वर्गामुळे महात्मा फुलेंच्या भाषेत, गायत्री मंत्राच्या जागी चिरी मिरी देवहा मंत्र आला. ही अशी भ्रष्टाचाराची बीजे रोवली गेल्यामुळे समाजोन्नती कशी होणार? प्रशासन कार्यक्षम कसे होणार? महत्वाचे म्हणजे सधन माणसांखेरीज न्याय कोणाला मिळणार? थोडक्यात छद्म भांडवलसहीचे दुष्परिणाम महात्मा फुले यांना त्याच काळात दिसले होते व त्यांनी त्याचे विश्लेषणही केले. आजही प्रशासनात दुर्दैवाने वैदिकेतरांतही चिरी मिरी देवहाच मंत्र श्रेष्ठस्थान प्राप्त करून बसला असल्याने समाजाची सर्वांगीन उन्नती होण्यात अडथळे आहेत हे आपण नित्यश: पाहतो.  भ्रष्ट प्रशासन राष्ट्राच्या आर्थिक उन्नतीतील सर्वात महत्वाचा अडथळा असते. ते प्रतिभांना मारून टाकण्यातच आपले “’कसबदाखवत असल्याने संतुलित विकास साध्य होत नाही. या प्रशासकीय भ्रष्टाचारामुळे ओढवणा-या आर्थिक विपदा, अन्याय व शोषणाचे विदारक वर्णन म. फुलेंनी केलेले आहे.

स्त्री-पुरुष समानतेचा आदर्श त्यांनी नुसता विषद केला नाही तर कृतीतून दाखवून दिला. महिला जोवर शिकत नाहीत, आपले अधिकार, हक्क जाणत नाहीत तोवर खरी उन्नती शक्य नाही हा त्यांच्या सिद्धांताचा मतितार्थ होत. अज्ञान, अंधश्रद्धा या माणसाच्या भौतिक आणि मानसिक प्रगतीतील सर्वात मोठे अडथळे आहेत असे त्यांनी आपल्या शेतक-यांचा आसूडया ग्रंथात विस्तृतपणे मांडले. ज्ञान हा मानवी जीवनाचा मूलाधार त्यांनी मानला. आज माहिती तंत्रज्ञांनाचा बोलबाला आहे पण ज्ञानाचा मात्र नाही हे काय सुचवते? आपण ज्ञानाची कस सोडून अविवेकाची कस धरली आहे आणि माहितीच्या फोपटपसार्यालाच ज्ञान समजण्याची गल्लत करत आहोत आणि त्यामुळेच महात्मा फुलेनंतर ज्ञाननिष्ठ समाज निर्माण होण्याची परंपरा थांबलीच आहे याकडे मात्र आधुनिक विचारवन्तांचे लक्ष जात नाही हे दुर्दैव नाही काय?

जोतीराव ज्या काळात लिहित होते त्या काळात भारताची लोकसंख्या फारतर २५ ते ३० कोटींच्या दरम्यान असेल. त्यात आजचा पाकिस्तान आणि बांगला देशही आला. तरीही देशातील हलाखीचा संबंध लोकसंख्येशी जोडून दाखवून त्यांनी क्रांतीकारी पाउल उचलले होते. लोकसंख्या वाढत असल्याने प्रती शेतकरी शेतजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. आज भारताची लोकसंख्या (पाकिस्तान-बांगलादेश वगळता) १४० कोटींची मर्यादा पार केली आहे. व्यक्तीगत शेतीक्षेत्र कमालीचे खालावले आहे. शेतीउत्पादनही त्यामुळे बाधित झालेले आहे. असे असूनही वाढती लोकसंख्या हे शाप नसून वरदान आहे अशा बाजारकेंद्री अर्थविचारांचे आज प्राबल्य आहे. असे असले तरी लोकसंख्येचा विस्फोट अनर्थकारी होऊ शकतो हे म. फुल्यांच्या तेंव्हाच लक्षात आले होते. भूमी मर्यादित आहे त्यामुळे लोकसंख्याही त्याच प्रमाणात राहिली तर एकंदरीत समाजाच्या अर्थस्थितीचे संतुलन होईल असा त्यांचा एकंदरीत सिद्धांत होता. तो काळापुढचे पाहणारा नव्हता असे म्हणण्याचे धाडस कोण करू शकेल? पण याही मुलभूत अर्थसिद्धांताकडे भारतीयांनी अखाम्य दुर्लक्ष केले आणि त्याचे दुष्परिणाम आपण आजही भोगतो आहोत.

महात्मा फुले त्याच वेळेस ते त्या काळच्या छोट्या शेतक-यांच्या अर्थस्थितीचाही विचार करतात. ते म्हणतात पूर्वी छोटे शेतकरी आसपासचे डोंगर, अरण्ये यांचा वापर चराई ते लाकूडफाटा, फळे ते औषधी वनस्पतीसाठी करत काही आपले पोट भरत. पण इंग्रज सरकारने आपली विलायती अक्कलपणाला लावून जंगलखाते निर्माण करून शेतक-याचा पोट भरण्याचा तोही मार्ग बंद केला आहे असे म्हणून इंग्रजांवर टीकेची झोड उठवतात. दुर्दैव म्हणजे आजही हा ब्रिटीशकालीन कायदा अस्तित्वात असून त्याचा जाच आदिवासी, मेंढपाळ व शेतक-यांना किती होतो आहे हे आपण पाहतोच आहे.

इंग्रज सरकारने आधुनिक कारखान्यांत तयार होणा-या वस्तूंची आयात वाढवल्याने देशी बारा बलुतेदारांची खचलेली आर्थिक स्थिती हा एक त्यांच्या अर्थचिंतनाचा महत्वाचा विषय आहे. किंबहुना देशी उत्पादकांच्या स्त्य्हीतीकडे लाख वेधणारे महात्मा फुले हे आद्य अर्थतद्न्य. विदेशी माल आणि त्याच्या मार्यामुळे त्यामुळे वाढलेले बेरोजगारीचे संकट आणि नवे पर्याय उपलब्ध केले जात नसल्याची खंत त्यांच्या लेखनातून जाणवते. त्यामुळे समाजात आर्थिक गुन्हेगारी, लबाड्या आदी दुर्गुनांचा शिरकाव झाला असल्यीचे ते नमूद करतात. उद्योगधंद्याच्या वाढीखेरीज रोजगार नाही आणि इंग्रज सरकार आहेत त्या उद्योगांचाच गळा घोटते आहे. त्यात शेतीचे क्षेत्र घटत चालल्याने सार्वत्रिक बेरोजगारी आणि उपासमार वाढते आहे हे त्यांचे निरीक्षण आजही महत्वाचे आहे. आज लघु-मध्यम उद्योगांचा कोणी वाली नाही आणि शेती तर परवडणारी राहिलेली नाही. आजच्याही बेरोजगारीच्या विस्फोटाचे हे महत्वाचे कारण आहे.

या आर्थिक अरिष्टाने वाढलेली कर्जे, सावकारांनी त्याचा घेतलेला गैरफायदा, भ्रष्ट अधिका-यांमुळे हिरावला जाणारा न्याय याचे विदारक चित्रण करतांना म. फुले सरकारसोबत सावकारीवरही आसूड ओढतात. प्रसंगी त्यांची भाषा उग्र होत असली तरी त्यामागे समग्र अर्थोन्नतीची कळकळ आहे. विद्येमुळेच अंतता: आर्थिक उन्नतीची द्वारे खुलू शकतात याची त्यांना जाणीव आहे. शेतक-यांच्या हिताखेरीज राष्ट्राचा आर्थिक पाया सक्षम होणार नाही हा त्यांचा मौलिक अर्थसिद्धांत आजही महत्वाचा आहे.

महात्मा फुले यांची देव्हार्यात स्थापना करून फुले अनुयायांनी एक प्रकारे त्यांच्या विचारांची हत्या केली असे म्हणावे लागते ते यामुळेच. त्यांचे विचार पुढे नेत त्यात भर घालत आजच्या काळाला सुसंगत असे अर्थतत्वज्ञान विकसित केले गेले असते तर भारताचे आजचे चित्र वेगळेच झाले असते.

तत्वद्न्य हा सर्वस्पर्शी असतो. मराठी साहित्याबद्दलही त्यांची मते कालजेयी आहेत. महात्मा जोतीराव फुले यांनी पुणे येथे १८७८ साली झालेल्या पहिल्या ग्रंथकार सभेचे अध्यक्ष न्या. म. गो. रानडे यांनी दिलेल्या निमंत्रणाला उत्तर देतांना तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवांचे हित होईल याचे बीज नाही. हे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोडया दादांचे संमेलन आहे.असे म्हणून या संमेलनास जाण्याचे नाकारले. यातील अखिल मानव जातीचे हित हा शब्द सोईयीस्कररीत्या विसरला गेला. साहित्य हे मानवहितैषु असले पाहिजे तरच ते उपयुक्त ठरते, विशिष्ट वर्गाचे हितास्म्बंध, भावना जपणारे साहित्य हे विघातक असते असा सज्जड इशारा त्यांनी दिल होता. आमच्या साहित्यीकांनी हा इशारा कधी मनवर घेतला आहे काय याचाही विचार सर्वांनी केला पाहिजे.

लोकांची अर्थशक्ती हीच संस्कृती घडवण्यात हातभार लावत असते. अर्थशक्तीच्या अभावात कोणत्याही नवविचारांचे सृजन होऊ शकत नाही. कंगाल-दारिद्र लोक ज्या देशात बहुसंख्येने असतात त्यांचे अधिकाधिक शोषण होत जात अवनतीकडून अवनतीकडे वाटचाल होताच जात शेवटी सारे रसातळाला पोहोचणार हे अटळ आहे. महात्मा फुले यंचे सार्वाक्लिक अर्थविचार आजही आम्हाला समजाऊन घेण्याची व अवलंबण्याची आवश्यकता आहे.

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...