Sunday, March 29, 2026

मसापमधील सत्तापालट: मराठी साहित्य विश्वाच्या अंत्ययात्रेची सुरुवात!

महाराष्ट्र साहित्य परिषदेची तब्बल दहा वर्षांनी झालेली यंदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणेच वादग्रस्त ठरत गेली. साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या पद्धतीवर आक्षेप घेणारे काही विद्यमान तर काही निलंबित सदस्य होतेच. माजी अध्यक्ष मिलिंद जोशी व अन्य पदाधिकार्यांविरुद्ध धर्मादाय आयुक्त ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत झेपाही घेतल्या गेल्या होत्या. या तक्रारी व याचिकांचे काय झाले हे सर्वांना माहीतच आहे. साहित्य परिषदेच्या घटनेत केलेल्या दुरुस्त्या बेकायदेशीर आहेत असाही एक आरोप न्यायालयापर्यंत गेला होता. आताची निवडणूक त्याच घटनेवर झाली आहे आणि विरोधक त्याच घटनेप्रमाणे निवडून आलेले आहेत. जर घटनाच बेकायदेशीर असेल तर ही निवडणुकही बेकायदेशीर ठरू शकते हेही लक्षात घेतले पाहिजे. यंदा दहा वर्षांनी निवडणूक झाली. मिलिंद जोशींच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा किरकोळ फरकाने पराभव झाला. म्हणजे मिलिंद जोशी यांना एकूण अकरा हजाराच्या आसपास झालेल्या मतदानात साहित्य संवर्धन आघाडीचे विजेते उमेदवार योगेश सोमण यांच्यापेक्षा फक्त चाळीस मते कमी पडली. या आघाडीचे सर्वाधिक अधिक मते घेणाऱ्या प्रदीप निफाडकर यांना प्रतिस्पर्ध्यापेक्षा मिळालेली मते केवळ चारशेने अधिक होती. त्यात महत्वाच्या एकूण सात पदांपैकी तीन पदावर मिलिंद जोशींच्या आघाडीचे उमेदवार विजयी झाले. याला काही दणदणीत विजय आणि मिलिंद जोशींच्या मनमानी कारभाराविरुद्ध प्रचंड नाराजी होती म्हणून त्यांचा पराभव झाला असे म्हणता येत नाही. अजूनही जवळपास निम्मे मतदार सदस्य त्यांच्या मागे उभे आहेत.. त्यामुळे किमान मनमानी कारभाराचा मुद्दा बाद ठरतो. उलट त्यांनी मसापचा चेहरा-मोहरा बदलवला, मसापला तरूण बनवले, अभिजात मराठीसाठी सक्रीय संघर्ष केला हे मुद्दे त्यांच्या बाजूने गेल्याने विरोधी आघाडीने प्रचंड राजकीय शक्ती पणाला लावूनही त्यांचा दारुण म्हणता येईल असा पराभव करता आला नाही. निवडणुका म्हटले की काही ना काही व्यक्तिगत राजकारण होतेच. पण यंदा मसापच्या निवडणुकीत जो घृणास्पद फरक पहायला मिळाला तो मात्र दु:ख्ख-संतप्त करणारा होता. भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपली विचारधारा काय असावी आणि कोणत्या पक्षाशी निगडीत असावे याचे स्वातंत्र्य राज्य घटनेने दिलेले आहे. मिलिंद जोशी किंवा त्यांचे सहकारीही कोणत्या ना कोणत्या विचारधारेशी संलग्न होतेच. पण त्यांनी राजकीय पक्षांना किंवा जातीयवादी संघटनांना आपल्या आघाडीच्या प्रचारात उतरवले नव्हते. पण योगेश सोमण यांच्या साहित्य संवर्धन आघाडीने मात्र उघड उघड भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक ते आमदार आणि संघ स्वयंसेवकाना आपल्या प्रचारात उतरवले. इतके की डोळ्यावर यावे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही लगोलग तेथे भाजप आणि संघ नेत्यांची गर्दी जमा झाली. खरे तर निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झाली तेव्हापासून हे चित्र ठळक झाले होते. साहित्य परिषदेचे अनेक आजीव सदस्य साहित्यिक आहेत. त्यात आजी व माजी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही आहेत. पण राजकीय पक्ष आणि एका विशिष्ट विचारधारेला वाहिलेल्या संघटनेचे स्वयंसेवक एवढ्या हिरीरीने प्रचारात उतरलेले पाहूनही त्यांची समाधी भंगली नाही. सर्वांनी चूप बसणे पसंत केले. माझ्याकडेही एका आमदाराचा प्रतिनिधी आदेशात्मक स्वरात सोमण यांच्या आघाडीला मतदान करा असे सांगायला आला होता. मी त्याला दारातूनच हाकलून दिले आणि त्याच दिवशी एक व्हिडीओ क्लिप बनवून प्रसारित केली. त्याने जरा खळबळ माजली असली तरी बाकी सदस्य चुपचाप बसले. या घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी तीन संघ स्वयंसेवक माझ्याकडे तीच टेप वाजवत आले. त्यांच्या वयाचा मी मान ठेवला म्हणून, अन्यथा त्यांनाही हाकलून दिले असते. मुळात प्रश्न हा आहे की साहित्य संस्था म्हणजे पक्षीय राजकारणाचा अड्डा आहे काय? साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी असावेत की नाही याबद्दल महाराष्ट्रात दरवर्षी वाद होत आले आहेत. अनेकजण राजकीय शक्तींच्या पाठबळाने संमेलनाध्यक्ष झाले आहेत हे वास्तव आहे. हेही चुकीचे आहे आणि यावरही गंभीरपणे चर्चा झालेली आहे. पण या वेळेस मसापच्या निवडणुकीत भाजप व संघाने जसा उघड प्रचार केला गेला तसे आजवर कधी झाल्याचे पाहण्यात नाही. एक प्रकारे ही मराठी साहित्य परिषदेच्या थोड्याफार प्रतिष्ठेची अंत्ययात्रा होती. मराठी साहित्य आणि त्याचे भविष्य कसे घडवणार हा चर्चेचा विषय न राहता प्रचाराने गलिच्छ पातळी गाठली. सार्वजनिक संस्था कोणत्याही क्षेत्रात काम करणारी असो त्यावर आपली गौण क्षमतेची प्यादी आणून संस्था ताब्यात घेण्यासाठी एखाद्या पक्षाने आणि स्वत:ला सांस्कृतिक रक्षक मानणाऱ्या संघटनेने अशी पूर्ण शक्तीनिशी अशी खालची पातळी गाठावी ही गोष्ट मराठी साहित्यविश्वाचा अपमान करणारी आहे. मी निकाल लागला त्याच दिवशी मसापच्या आजीव सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टाकला. जे लोक राजकीय प्यादी आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील मसापचे काम कोणत्या दर्जाचे असेल याची मी कल्पना करू शकतो. हा मराठी साहित्यसंस्कृतीचा पराभव आहे असे मी मानतो. -संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!

महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...