Sunday, March 29, 2026

काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!

महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस गेली हजारो वर्ष साजरा करत आले आहेत. नवरेहच्या नंतर तिसऱ्या दिवशी झंग त्रयी हा माहेरवासिनी स्त्रियांचे स्वागत करणारा सामुहिक सणही परंपरेने साजरा केला जातो. काश्मीरमधील १९९० मध्ये निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीमुळे लाखो काश्मिरी पंडितांचे विस्थापन झाले, त्यामुळे जेही पंडीत याही स्थितीत काश्मीर खोऱ्यात राहिले त्यांनी या परंपरेला जसे जिवंत ठेवले, तसेच भारतात आणि जगभर विस्थापित झालेल्या पंडितांनी असतील तेथे ही आपली काश्मिरी परंपरा कायम ठेवली. यंदाचा नवरेह १९ मार्चला साजरा केला गेला तो पुढील वर्षी नवरेह काश्मीर खोऱ्यातच साजरा करण्याचा संकल्प करत. इतकेच नव्हे तर दुसरा दिवस सम्राट अशोकानंतर भारताबाहेरही प्रथमच विशाल साम्राज्य निर्माण करणाऱ्या काश्मीरच्या महान सम्राट ललितादित्याच्या स्मृती जपण्यासाठी शौर्य दिवस म्हणूनही साजरा करण्यात आला. आपला इतिहास, परंपरा यांचे जतन व्हावे ही तीव्र भावना काश्मीर खोरे आणि जगभर विस्थापित झालेल्या पंडितांमध्ये जागृत झाली आहे. नंदनवन पुन्हा एकदा काश्मिरी पारंपारिक सणांच्या निमित्ताने का होईना घरवापसीमुळे फुलारेल आणि काश्मीरचे सौंदर्य शतपटीने वाढेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या सणाचे काश्मीरमधील सांस्कृतिक महत्व अपार आहे. प्रत्येक प्रदेशात आपापल्या भौगोलिक आणि पर्यावरणीय अनुकुलतेनुसार सणांचे अर्थ, साजरे करण्याची पद्दत आणि त्याला जोडून आलेल्या पारंपारिक कथा वेगवेगळ्या असतात. काश्मीर खोरे हे चारी बाजूनी हिमालयीन पर्वतराजीने वेढलेले आणि अतिप्राचीन काळी तेथले सतीसार नावाचे विशाल सरोवर होते. पुरातत्वीय पुराव्यांनुसार नैसर्गिक हालचालीमुळे पर्वतराजीत भगदाड पडल्याने पाणी वाहून जाऊन जमीन सुकल्यामुळे मानवी वस्ती करण्यायोग्य बनलेले आहे. काश्मीरचा लिखित इतिहास किमान पाच हजार वर्ष जुना असून हा इतिहास जसा नीलमत पुराणातून जपला गेला आहे. नवरेह सण काश्मीर खोऱ्यामध्ये वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करतो. काश्मीरमधील वसंत किती मनमोहक असतो हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही, त्यामुळे काश्मीर खोऱ्यात त्याचे अपरंपार महत्व असणे स्वाभाविक आहे. नवरेह (नव वर्ष) सणाला काश्मीरमध्ये अत्यंत उत्साहाने घरोघरी साजरा होतो. हा सार्वजनिक उत्सव नव्हे. हा सण साजरा करण्यामागे समृद्धी, प्रगती आणि ज्ञानात्मक सांस्कृतिक वारशाचे जतन ही भावना असते. वसंत ऋतूचे आगमन मनाला उल्हासित करणारे असल्याने या सणाचा आगळा वेगळा जोश आहे. या सणाला आपल्या महाराष्ट्रासारखी गुढी उभारली जात नाही तर मुख्य विधी असतो थाली भरण. यात एका तबकात तांदूळ, दही, फुले, अक्रोड, नाणी आणि नववर्षाचे पंचाग ठेवले जाते आणि त्याचे पूजन करून सर्व-समृद्धीच्या प्रार्थना म्हटल्या जातात. याच दिवशी प्राचीन सप्तर्षी पंचांगाप्रमाणे नवीन वर्ष सुरु होत असते. या सणाच्या सायंकाळी लोक देवी पार्वतीच्या (शारिका देवी) मंदिरात जाऊन तांदळाची खीर अर्पण करून दर्शन घेतात. काश्मीर खोरे ही मुळात पार्वतीची भूमी मानली जाते आणि शारिका हे पार्वतीचेच एक काश्मिरी नाव असून हरी पर्वत हे तिचे निवासस्थान मानले जाते. शिवाय श्रीनगर शहराची ती अधिष्ठात्री देवी आहे. किंबहुना शिव-पार्वती हे पुरातन काळापासून काश्मीरचे आराध्य राहिलेले आहे. काश्मीरी शैव परंपरा तत्वज्ञानातही भारतात श्रेष्ठ असून आचार्य अभिनवगुप्त हे शैव तत्वज्ञशिरोमणी मानले जातात. हे शैव माहात्म्य येथेच संपत नाही. काश्मीरमध्ये माता पार्वतीने गणेशाला निर्माण “पन” नावाचा सणही साजरा केला जातो. या दिवशी गणेशाची नव्हे तर ज्या दिवशी पार्वतीने काश्मीरमध्येच गणेशाची निर्मिती केली म्हणून पार्वतीची पूजा केली जाते. यात कलश आणि माती याला जास्त महत्व असते आणि काश्मिरी रोटांचा प्रसाद असतो. या दिवशी प्रथेनुसार प्रत्येक भाविकाच्या मनगटावर स्नेहाचा धागाही बांधला जातो. हे मैत्री आणि स्नेहाचे प्रतीक. सरहदचे संजय नहार यांच्यामुळे मी २०१९ साली श्रीनगरमधील लाल चौकात गणपती बसवायला गेलो होतो आणि योगायोगाने सप्तर्षी पंचांग आणि आपल्या शक पंचांगानुसार दोन्ही सण नेमके एकाच दिवशी आल्यामुळे मला पन सणात सहभागी होऊन त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. काश्मीर ही मुळात सृजनाची भूमी आहे आणि त्याबाबत काश्मिरी लोक कसे सृजनाचीच परंपरा जपतात हे मला अनुभवायला मिळाले. काश्मीरच्या सप्तर्षी पंचांगाचे वैशिष्ट्य म्हणजे याचा गणनेची सुरुवात इसवीपूर्व ३०७६ पासून सुरु होते. ही कालगणना सत्तावीस नक्षत्रांच्या भ्रमणावरून केली जाते. सप्तर्षी प्रत्येक नक्षत्रात शंभर वर्ष राहतात अशे कल्पना करून या संवताची चक्रे ठरवली जातात. काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात अजूनही ही कालगणना प्रमाण मानली जाते. अन्य प्रदेशांत ही कालगणना आता जवळपास विस्मृत झाल्यात जमा आहे. नवरेह सणानंतर तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो झंग त्रेई हा सार्वजनिक उत्सव. यंदा हा सण २१ मार्चला नवरेहप्रमाणेच जेथे जेथे काश्मिरी पंडित आहेत तेथे तेथे अत्यंत उत्साहाने साजरा केला गेला. हा सण खास माहेरवाशीनी स्त्रियांसाठी राखून ठेवलेला असून हाही सण यंदा काश्मिरी पंडितांनी अत्यंत उत्साहाने साजरा केला. या दिवशी पारंपारिक आणि अत्यंत विलक्षण अशी काश्मिरी लोकगीते गायली जातात. त्यावर नृत्येही होतात. झंग म्हणजे शगुन. काश्मीर पूर्वीपासूनच स्त्रियांना बरोबरीचे स्थान देणारे आणि सन्मान करणारे राज्य म्हणून ओळखले जाते. स्त्रीमाहात्म्याची ही परंपरा महाभारतकालीन यशोमती राणीपासून सुरु होते. दिद्दा राणी, कोटा राणी यासारख्या महान नायिका काश्मिरी स्त्रीमाहात्म्यातूनच निर्माण होऊ शकल्या. झंग त्रेयी हा सण स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा प्राचीन अध्याय आहे. याही सणाचे मुख्य केंद्र शारिका देवीचे निवासस्थान हरी पर्वत असून तो तेथे आणि अन्यत्र सार्वजनिक जागांवर साजरा केला जाती. त्यासाठी आपल्या गणेश मंडळासारखी मंडळेही पूर्वी असत. सध्या खोऱ्यात कश्मीरी पंडितांची संख्या तुलनेने कमी असल्याने हा सण किंवा उत्सव एखाद्या हॉलमध्ये किंवा मोकळ्या जागेत साजरा केला जातो. यंदाची या सणात भर पडली ती काश्मीरच्या अलौकिक सम्राट ललितादित्याच्या स्मरणार्थ नवरेहनंतरचा दुसरा दिवस “शौर्य दिवस” म्हणून साजरा करण्याची. खरे तर ललितादित्याचा जाज्वल्य इतिहास खुद्द काश्मिरी जनतेच्या विस्मरणात गेला होता. जे काही उपलब्ध होते ते फुटकळ लेख आणि पंडीत कल्हणने लिहिलेल्या राजतरंगिणीत बऱ्याचशा मिथकात्मक स्वरूपात. त्याचा सुसंगत इतिहास एका महाराष्ट्रीय माणसाने, म्हणजे मी, लिहिला आणि तोही एका महाराष्ट्रीय माणसाच्या प्रेरणेने आणि काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी अविरत प्रयत्न करणारे सरहदचे संजय नहार यांच्यामुळे. आज जगभरात हा इतिहास प्रमाण मानला जातो. काश्मिरी पंडितांना आणि इतर काश्मीरीनाही आपल्याच इतिहासाकडे पहायची वेगळी दृष्टी या इतिहास ग्रंथामुळे मिळाली याचे एक समाधान आहेच. आणि आता ललितादित्याच्या स्मृती जतन करण्यासाठी काश्मिरी पंडित शौर्य दिवस साजरा करू लागले आहेत यासारखी समाधानाची बाब असू शकत नाही. आपल्या मायभूमीची आस प्रत्येकात असते. निर्वासित व्हावे लागलेल्यांच्या मनातील भावनांची तीव्रता साहजिकच जास्त असते. “काश्मीर खोऱ्यात परत या.” अशी आवाहने केंद्र आणि राज्याच्या प्रमुखांनी गेली तीन दशके सातत्याने केली आहेत. त्याला तेथील परिस्थितीमुळे फारसा प्रतिसाद लाभल्याचे दिसत नाही. शेकडो काश्मिरी पंडीत आजही जम्मूमधील निर्वासित कॅम्पमध्ये आजही राहतात. असंख्य पंडित देशात आणि देशाबाहेर पोट भरण्यासाठी विस्थापित झालेले आहेत. तरीही मायभूमीची आस त्यांच्यात आजही तेवढीच जितीजागती आहे. आज सर्वच काश्मीर खोऱ्यात कायमचे परतू शकत नाहीत कारण आता बव्हंशी अन्यत्र स्थिरस्थावर झालेले आहेत. पण ते आज काश्मीरच्या प्रगतीसाठी आपले बौद्धिक योगदान देऊ शकतात हे वास्तव आहे. खोऱ्यात कायमचे आले अत्र चांगलेच आहे, पण काश्मीरच्या विकासाला ते हातभार लावू शकतात. यंदाचा नवरेह सण त्या संकल्पाचा होता आणि तो अभिनंदनीय असाच आहे यात शंका नाही. आता नेहमी काश्मिरी हिंदूंनी नवरेह सणच काय पण सारे पारंपारिक काश्मिरी सण प्राचीन उत्साहाने खोऱ्यात साजरे केले पाहिजेत कारण हे सण काश्मीरच्या विशिष्ट पर्यावरणातून जन्माला आलेले आहेत. त्याचा सन्मान सर्व देशवासीयांनी केला पाहिजे! -संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!

महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...