माणसाने जीवन सुसह्य करण्यासाठी कालौघात अनेक शोध लावले असले तरी शत्रूवर आक्रमण किंवा शत्रूपासुन संरक्षण यासाठीही अनेक शोध लावले. तलवारी, भाले, बर्च्या., गदा, धनुष्यबाण असे मानवी शक्तीवर अवलंबून असलेले शोध लावत युद्धतंत्रात बदल घडवत नेले. पण दारूगोळ्याच्या शोधाने युद्धांतील विध्वन्सकता कैक पटींनी वाढली. पण दारूगोळ्याचा शोध ठरवून लावला गेला नाही. तो हेतूही नव्हता तर अत्यंत अपघाताने हा शोध लागला.
चीनमधील ताओ पंथीय अमरत्वाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे रासायनिक प्रयोग करत असत. असा द्रव बनवायचा की ज्यायोगे मनुष्य अमर होईल असा या किमयागारांचा प्रयत्न होता. यातूनच सोरा, गंधक आणि कोळशाची पूड मिश्रण केल्यानंतर स्फोटक दारू (गनपावडर) तयार होते असा शोध लागला. अर्थात आधी हे मिश्रण नेमके किती प्रमाणात करायचे याचं अंदाज नसल्याने याकडे खेळकर वृत्तीने पाहण्यात आले. इतिहासकारांनुसार, बंदुकीच्या दारूशी साम्य असणाऱ्या पदार्थाचा जगातील सर्वात पहिला ढोबळ उल्लेख इ.स. १४२ मध्ये ईस्टर्न हान राजवंशाच्या काळातील किमयागार वेई बोयांग यांनी केला होता. त्यांना 'चिनी किमयाशास्त्राचे जनक' मानले जाते. त्यांनी आपल्या 'कानतोंग की') या ग्रंथात लिहिले होते की, "तीन पावडरींचे असे एक मिश्रण आहे, जे एकत्र केल्यावर अत्यंत हिंसकपणे 'हवेत उडते आणि नाचते'
आधी या शोधाकडे मौजेने पाहिले गेले असले तरी टांग राजवटीच्या काळात मात्र या शोधाकडे गाम्भिर्याने पाहिले गेले. कारण घडले एक स्फोट आणि त्यातून झालेला विध्वंस. किमयागारांनी औषध बनवण्यासाठी सोरा ( पोटॅशियम नायट्रेट), गंधक आणि लोणारी कोळशाची पावडर एका विशिष्ट प्रमाणात एकत्र केली आणि हे मिश्रण प्रखर आचेवर गरम करताच प्रयोगशाळेत प्रचंड मोठा स्फोट झाला. यात किमयागारांचे चेहरे आणि हात भाजले, तसेच त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. ताओवादी एवढे घाबून गेले की त्यांनी हे मिश्रण चुकुनही गरम करू नका अन्यथा अमरत्व राहिले दूर, मरायची वेळ येईल असे सांगायला सुरुवात केली. पण दहाव्या शतकाच्या आसपास चीनी संशोधकांच्या लक्षात आले की शत्रूचा खात्मा करण्यासाठी या शोधाचा चांगला उपयोग होऊ शकतो. प्रथम या मिश्रणाचे स्फोट करून शत्रूच्या घोड्यांना घाबरवून पळून जाण्यासाठी याचा उपयोग केला गेला. सोंग राजवंशाच्या काळात, इ.स. १०४४ मधील 'वूजिंग झॉंग्याओ' या चिनी लष्करी पुस्तकात गनपावडर बनवण्याचा जगातील पहिला अचूक आणि स्पष्ट रासायनिक फॉर्म्युला अधिकृतपणे नोंदवला गेला.
भारतातही बिहार, बंगाल, पंजाब, राजस्थान आणि कर्नाटकसारख्या राज्यांत नैसर्गिक सोऱ्याच्या खाणी आहेत. बांबूच्या नळीत सोऱ्याबरोबर गंधक आणि कोळशाची पूड भरली की त्यातून अग्निबाणासारखी शत्रे दूरवर मारा करण्यासाठी फेकता येतात असा शोध भारतात बंगाल किंवा आसाममध्ये लागला असेही मानले जाते. आसाम आणि चीन या भागात प्राचीन व्यापारी मार्गांवरून दळणवळण असल्याने हा शोध भारतातून चीनमध्ये गेला की चीनमधून भारतात आला याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. पण उपयुक्त शोध सर्वत्र झपाट्याने पसरतात हा इतिहास असल्याने पहिलेपणाचे श्रेय कोणीही ठामपणे घेऊ शकत नाही. पण युद्धासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करायला चीनने सुरुवात केली यात शंका नाही.
हा शोध जरी चीन-भारतात लागला असला तरी या तंत्राचा शास्त्रीय वापर केला तो युरोपने. तेराव्या शतकात तुर्क–मोगलांनी यूरोपवरील आक्रमणात दारूचे अग्निबाण वापरले होते व त्यांसाठी बांबूच्या नळ्यांचा उपयोग केला होता. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अरबांनीही तोफा व दारूगोळा यांचा वापर केला होता. यूरोपात कलशसदृश प्रक्षेपकांतून बाण फेकीत असत. चवदाव्या शतकात यूरोपात अनुक्रमे मेट्स, अल्जसिरस व क्रेसी येथील लढायांत मोठ्या प्रमाणात दारूगोळा वापरला गेला.
द. भारतात प्रथम बहमनी राज्यकर्त्यांनी अडोणीच्या वेढ्यात (१३६८ साली) दारूगोळा वापरला अशी नोंद मिळत असली तरी तत्कालीन दारूगोळ्याचे वर्णन उपलब्ध नाही. भारतात वा चीनमध्ये दारूचा शोध लागला हे खरे असले, तरी त्यात सुधारणा करण्याचे कार्य यूरोपातच झाले. यूरोपीयांची साम्राज्ये जगभर पसरण्यात त्यांनी केलेल्या दारूगोळ्यातील प्रगतीचा फार मोठा वाटा आहे. यातूनच तोफा, अग्निबाण, हातबॉम्ब, बंदुका, पिस्तुले इत्यादींचा शोध लागून त्यांचे उत्पादन सुरू झाले. तोफा व दारूगोळा बनविणाऱ्या तज्ञांचा व कुशल कामगारांचा वर्ग निर्माण झाला.
सोळाव्या–सतराव्या शतकांत जहाजांवरही तोफा बसविण्यास सुरुवात होऊन भर समुद्रातही लढाया होऊ लागल्या. मध्ययुगीन तटबंद्या दारूगोळ्यापुढे निष्प्रभ ठरल्या व गोल बुरूजांची जागा तोफा बसविलेल्या जाड त्रिकोणी बुरूजांनी घेतली. बंदुकीच्या गोळ्या काडतुसाच्या स्वरूपात म्हणजे प्रक्षेपक दारू व शिशांची गोल गोळी एकत्रित असलेल्या स्वरूपात उपलब्ध होऊन बंदुकीचा गोळीबार मिनिटाला एक गोळी या प्रमाणात होऊ लागला. वातीच्या ठिणगीऐवजी बंदुकीत गारगोटीच्या चापाची योजना करण्यात आली. बारा ते पंधरा किलो वजनांचे सुटसुटीत दारूगोळे प्रचारात आल्यामुळे गोळामारीचा वेग वाढला. १७८४ साली इंग्रज लेफ्टनंट श्रॅप्नल यांनी जमिनीपासून थोड्या उंचीवर फुटणाऱ्या, श्रॅप्नल याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या, तोफगोळ्याचा शोध लावला. त्यामुळे खुल्या मैदानावर लढणाऱ्या सैनिकांचे जीवित धोक्यात आले. अमेरिकेत व्हिटनी यांनी बहूत्पादनाच्या तत्त्वावर बंदुकांचे उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविले. जर्मनीच्या क्रप कारखान्यात पोलादाच्या भक्कम तोफा तयार करण्यास आरंभ झाल्यामुळे भारी तोफगोळे वापरणे सुलभ झाले. काडतुसाला आघात वाटी जोडल्यामुळे प्रक्षेपक दारूच्या ठिणगीऐवजी आघाताने गोळीबार करणे शक्य झाले.
इंग्रज कर्नल काँग्रीव्ह यांनी भारतातूनच हैदर अली व टिपू सुलतान यांनी वापरलेल्या रॉकेट्सची कल्पना पश्चिमी देशांत नेली. ब्रह्मदेश पादाक्रांत करतानाही (१८२५-२६) इंग्रजांनी अग्निबाण वापरले. महाराजा रणजितसिंग यांनी दारूगोळा बनविण्याचे कारखाने अमृतसर इ. ठिकाणी काढून यूरोपीय दर्जाचे तोफगोळे तयार केले. भारतात मराठ्यांनी तोफगोळ्यांचे पुणे, सोनोरी इ. ठिकाणी कारखाने काढले होते पण त्यांचा दर्जा निकृष्ट होता. इ.स. १८५० ते पहिल्या महायुद्धाअखेर (१९१८) दारूगोळ्यात लक्षणीय प्रगती झाली. धातूच्या जाड पत्र्याचा भेद करणाऱ्या (चिलखतभेदी) आणि व्यक्तिसंहारक दारूगोळ्यात सुधारणा झाल्या. नाविक तोफांचा व्यास ३० सेंमी. इतका महाकाय झाला आणि त्यामुळे चिलखती व पोलादी नौ–काया असलेली जहाजे फोडणे वा जाळणे शक्य झाले. १८५०–१९०० या काळात उपलब्ध झालेला दारूगोळाच बहुतांशी पहिल्या महायुद्धात वापरण्यात आला. पुढे यात नवीन शोधांची भर पडत राहिली. आता प्रचंड संहारक क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. इराण-इझ्राएल-गाझा आणि रशिया-युक्रेनच्या युद्धात आपण याचे भयानक संहारकता पाहिली आहेच. माणूस अमरतेसाठी दैवी रसायन शोधात होता पण त्याच्या हाती लागला तो असा विध्वंसक शोध!
-संजय सोनवणी

No comments:
Post a Comment