मागील लेखात आपण पाहिले की मानवी उड्डाणाचे स्वप्न प्राचीन काळापासून मानवाला सतावत होते. माणसाने नेहमीच आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा अथक प्रयत्न केला आहे. उडता यावे हे स्वप्न तसे अशक्यप्राय वाटत असले तरी माणसाची अपार जिज्ञासा आणि तिच्या पूर्तीसाठी अथक प्रयत्न करत राहण्याही वृत्ती यातून विमानाच्या प्रत्यक्ष शोधापर्यंतचा प्रवास मानवाने पूर्ण केला. विमानाच्या संकल्पनेचा इतिहास, प्राचीन पुराणकथांत मिळणारे उल्लेख, विमानसदृश्य सापडलेली प्राचीन खोदचित्रे असा पुढे जात लिओनार्डो दा विंची, जॉर्ज केली, ओटो लिलिएन्थल इत्यादींपासून पुढे तो राईट बंधूंपर्यंत येतो. या शोधपरंपरेत सातत्याने, अनेक अपयशे येउनही हार न मानता मानव उड्डानाचे प्रयत्न करत राहिला. त्याचा पुढील भाग म्हणून राईट बंधूंनी प्रत्यक्ष यशस्वी उड्डाण साध्य केले. तत्पूर्वी अपयशे येण्याचे कारण म्हणजे एक मूलभूत प्रश्न आणि तो म्हणजे माणूस आकाशात उडू शकेलही, पण तो हवेत प्रचालन कसे करणार? त्यामुळे सर्वांचे उड्डानाचे प्रयोग अयशस्वी होत होते.
पण नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर शोधताना दोन अमेरिकन बंधूंनी इतिहास घडवला. विल्बर आणि ऑर्व्हिल राईट हे ते बंधू. ते प्रत्यक्षात व्यावसायिक शास्त्रज्ञ नव्हते तर ते ओहायो राज्यातील डेटन येथे सायकली बनविण्याचा आणि दुरुस्त करण्याचा व्यवसाय करत होते. परंतु यंत्ररचनेची उत्तम जाण, निरीक्षणशक्ती आणि उपजत प्रयोगशील वृत्ती यांमुळे त्यांनी अशक्य वाटणाऱ्या समस्येकडे वेगळ्याच दृष्टीने पाहिले.
यामागे एका दुर्दैवी अपघाताची पार्श्वभूमी आहे. माणूस तोवर ग्लायडर बनवून त्यातून उडायला शिकला असला तरी त्यात नियंत्रणाची साधने नव्हती. इंजिनही नव्हते. तरीही धाडसी लोक उद्दानाचे प्रयोग करतच असत. अशात १८९६ मध्ये जर्मन संशोधक ओटो लिलिएन्थल यांचा ग्लायडर अपघातात मृत्यू झाला. त्या घटनेने राईट बंधूंना धक्का बसला, पण त्याचबरोबर उड्डाणशास्त्राविषयी तीव्र उत्सुकताही निर्माण झाली. त्यांनी उपलब्ध साहित्याचा अभ्यास सुरू केला. त्या अनेक संशोधकांचे लक्ष अधिक काळात विमान उडवू शकेल असे शक्तिशाली इंजिन तयार करण्यावर केंद्रित असल्याचे त्यांना दिसून आले. परंतु राईट बंधूंना वाटले की खरा प्रश्न इंजिनाचा नसून नियंत्रणाचा आहे. त्यांनी मग नैसर्गिक रीत्या उडणार्या पक्षांवर आपले लक्ष आधी केंद्रित केले.
पक्ष्यांचे निरीक्षण करताना एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात आली. उडते पक्षी वळताना किंवा संतुलन राखताना पंखांच्या कोनात काही सूक्ष्म बदल करतात. त्या निरीक्षणावरून त्यांनी पंखांना किंचित झोक देऊन विमानाला वळविण्याची आणि दिशा देण्याची कल्पना विकसित केली. पुढे हीच पद्धत ‘विंग वॉर्पिंग’ म्हणून प्रसिद्ध झाली.
सन १८९९ मध्ये त्यांनी एका छोट्या पतंगावर हा प्रयोग करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावर त्यांनी प्रत्यक्ष ग्लायडर बनविण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनातील किटी हॉक हा समुद्रकिनारी भाग निवडला. येथे जोरदार वारे वाहत असत आणि जमिनीवर मऊ वाळू असल्याने जरी अपघात झाला तरी जीवितहानीची शक्यता कमी होती.
१९०० ते १९०२ या काळात त्यांनी तीन वेगवेगळे ग्लायडर तयार केले. शेकडो उड्डाणे केली. अनेक वेळा अपयश आले. तरीही त्यांनी हार न मानता आपले प्रयोग झपाटल्यासारखे सुरूच ठेवले. हे प्रयोग करताना प्रत्येक अपयशाच्या वेळेस ते अपयश का आले असावे याचा अभ्यास करत. आपल्या काळातील उपलब्ध वायुगतिकीय आकडेवारी चुकीची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बहुतेक संशोधकांनी एवढी अपयशे आल्यानंतर प्रयोग सोडून दिले असते, पण राईट बंधूंनी उलट स्वतःच संशोधन करण्याचे ठरवले.
त्यांनी एक लहान ‘विंड टनेल’ तयार केला. विविध आकारांच्या शेकडो पंखांची चाचणी घेण्यात आली. आजच्या दृष्टीने हा प्रयोग साधा वाटेल; परंतु त्यातून मिळालेली माहिती त्या काळातील कोणत्याही उपलब्ध माहितीपेक्षा अधिक अचूक होती. उचलशक्ती, वायुरोध, पंखांचा कोन आणि आकार यांचे प्रत्यक्ष मोजमाप करून त्यांनी विमानरचनेचे नवे तंत्रज्ञान विकसित केले.
१९०२ चा त्यांचा ग्लायडर हा खऱ्या अर्थाने पहिला पूर्णपणे नियंत्रित ग्लायडर ठरला. त्यात पंखांचे वळण, उभा रडर आणि पुढील नियंत्रण ठेवण्यासाठीचा पृष्ठभाग यांचा समन्वय साधण्यात आला. आजच्या आधुनिक विमानांतील नियंत्रण व्यवस्थेची बीजे याच रचनेत दिसून येतात.
यानंतर उरला तो इंजिनाचा प्रश्न. बाजारात उपलब्ध इंजिने अतिशय जड होती. त्यामुळे त्यांनी स्वतःचे इंजिन बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कार्यशाळेतील चार्ली टेलर या कुशल मेकॅनिकने त्यांना मदत केली. अवघ्या काही महिन्यांत हलके पण सक्षम पेट्रोल इंजिन तयार झाले.
विमानाच्या प्रचालनासाठी लागणार्या पंख्यांची समस्या त्याहून कठीण होती. त्या काळी पंख्यांचे शास्त्र जवळजवळ अस्तित्वातच नव्हते. त्यांनी तयार केलेले प्रचालक पंखे (प्रोपेलर) त्या काळातील कोणत्याही रचनेपेक्षा अधिक कार्यक्षम ठरले.
अखेर सर्व तयारी पूर्ण झाली. १७ डिसेंबर १९०३ रोजी किटी हॉकजवळील किल डेव्हिल हिल्स येथे इतिहास घडला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ऑर्व्हिल राईट विमानात आडवे झाले. विमानाने लाकडी रूळांवरून वेग घेतला आणि अचानक जमिनीपासून वर उचलले गेले. ते केवळ १२ सेकंद हवेत राहिले आणि सुमारे १२० फूट अंतर पार केले. परंतु मानवाच्या इतिहासातील तो क्षण अनमोल होता.
त्या दिवशी एकूण चार उड्डाणे झाली. शेवटच्या उड्डाणात विल्बर राईट जवळजवळ एक मिनिट हवेत राहिले आणि ८५० फूटांहून अधिक अंतर पार केले. त्यानंतर जोरदार वाऱ्याने विमानाचे नुकसान झाले आणि त्या दिवसाचे प्रयोग थांबले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळी जगाने या घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. काही वृत्तपत्रांनी ती बातमी छापलीही नाही. अनेकांना तिच्यावर विश्वास बसत नव्हता. परंतु पुढील काही वर्षांत राईट बंधूंनी आपल्या विमानात सातत्याने सुधारणा केल्या आणि अखेर संपूर्ण जगाला त्यांच्या यशाची दखल घ्यावी लागली.
राईट बंधूंचे मोठेपण केवळ त्यांनी पहिले उड्डाण केले म्हणून नाही. त्यांनी संशोधनातील प्रत्येक अडचण वैज्ञानिक पद्धतीने सोडवली. उपलब्ध माहितीवर आंधळा विश्वास न ठेवता स्वतः प्रयोग केले. अपयशाला घाबरले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या यशाने आधुनिक विमानयुगाचा पाया घातला.
आजची महाकाय प्रवासी विमाने, ध्वनिवेगापेक्षा जलद जेट विमाने आणि अवकाश संशोधन यांची सुरुवात त्या बारा सेकंदांच्या उड्डाणातून झाली होती. मानवी जिद्द, वैज्ञानिक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयोग यांच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही प्रत्यक्षात उतरू शकतात, याचा राईट बंधूंचा इतिहास हे सर्वोत्तम उदाहरण आहे. राईट बंधूंनी केवळ विमान शोधले नाही तर त्यांनी उड्डाण नियंत्रित करण्याची समस्या सोडवली आणि माणसाचे हवेत उडता येण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
· संजय सोनवणी
No comments:
Post a Comment