१.
बऱ्याच काळानंतर त्याला काळोखाचा
आडोसा सोडून बाहेर जावेसे वाटले. त्याला त्या दिवशी तसे का वाटले हे नसते सांगता
आले, पण वाटले खरे. कधी कोणाला काय वाटेल हे सांगता तरी येईल का? आणि वाटणे हेही
जेव्हा दुर्मिळ झालेले असते तेव्हा तर असे वाटणे हेही आश्चर्यच. पण त्याने
शरीरावरची छाताडावर आणि हनुवटीवर घुशींच्या रक्ताची साकळलेली काळपट पडलेली अस्तरे नखांनी
ओरबाडून बाजूला सरकावली तेव्हा त्याला जरा बरे वाटले आणि उठून बसला.
बाहेर माणसांच्या टोळ्या आता घुशींची शिकार करायला
बाहेर पडल्या असतील अशी त्याची कल्पना होती. खायला उपलब्ध तेवढेच होते, पण तेही सहजासहजी न मिळणारे.
जीवघेण्या झुंजी द्याव्या लागत, पाठलाग करावा लागे आणि त्यांचे हिंस्त्र हल्लेही चुकवावे
लागत. शिकारीवरून माणसांच्या टोळ्यांत भांडणे, मारामाऱ्या आणि कधी मुडदेही पडत. कोणालाच
त्याचे काही विशेष नव्हते. पाच-दहा घुशींची शिकार मिळाली तरी पंधरा वीस जणांच्या
टोळीचे पोट भरे.
आणि घुशींच्या हल्ल्यात एखादा माणूस मेला तरी
वीस-पंचवीस घुशींचेही पोट भरे.
ज्याचे त्याचे पोट भरले की मग ते आपापल्या
आसऱ्याच्या ठिकाणाकडे धावत जात.
कारण घुशी कधी माणसांवर तर माणसे कधी घुशींवर हल्ला
करतील याचा नेम नसे!
तो एकता त्याच्या अंधारी गुंफेत राहायचा. तो
सहसा बाहेर पडत नसे. बाहेरचा उजेड
पहायचीही इच्छा उरलेली नव्हती. लोकांची तर त्याला गरजही वाटत नव्हती. तसेही एकटे
बाहेर पडणे धोक्याचे असते हा त्याचा अनुभव होता. कोणी एकटा दिसला तर घुशी झुंडीत त्याच्यावर
चारी बाजूनी येत झडप घालत आणि शेवटी उरे तो सांगाडा. अशा वेळी कोणी मदतीला
येण्याचीही शक्यता नसे. तरीही एखादा कोणी मानसिक उद्रेकाच्या भरात बाहेर पडे आणि
ती त्याचे शेवटचीच भटकंती ठरे. अशी चूक करणाऱ्यापैकी तो नव्हता. शिवाय माणसांची झुंड
त्याने कधीच सोडून दिली होती आणि त्याचे त्यालाही आणि कोणालाही सोयरसुतकही नव्हते.
त्याला फक्त बाहेर एक नजर टाकावी असे वाटले पण त्यात त्याचा काही खास हेतू नव्हता.
त्याच्या झोपडीच्या खालून अनेक बिळे
जात...त्यातून दडलेल्या घुशी वेगाने बाहेर पडत...त्यांचे आवाज त्याला वरूनही
ऐकायला येत. बऱ्याच काळापूर्वी त्याने काहीतरी हुशारी करून त्या भूमिगत बिळांवर एक
उभे, घूस खेचता येईल एवढे, बीळ बनवलेले होते. त्या जाताहेत याची चाहूल लागली की तो
अचानक हात घालून एखाद्या घुशीला बिनबोभाट वर खेचून घेई. बाकी घुशींना खालच्या बिळातून सरळ जातांना कोणात
वर वळून जमिनीवर येणे शक्य झालेले नसल्याने तो आजवर जिवंत राहिला. अर्थात बिळात
अचानक हात घालून घूस पकडणे आणि वर खेचणे यालाही अपार कौशल्य लागे. ते त्याने आपल्या
गरजेच्या तीव्रतेमुळे आणि नित्याच्या सरावाने कमावलेले होते. त्यामुळे त्याच्या
दिवसभराच्या अन्नाची आणि पिण्याची सोय होऊन जात असे. बाहेर पडायची आणि झुंडीने
शिकार करायची गरज नसे.
बाकी घुशी साऱ्या वस्तीतून त्यांच्या असंख्य बिळांबाहेर
उघड्यावर येत गोळा होत आणि हिंस्त्र चित्कार करत त्याही माणसांच्या शोधात बाहेर
पडत. आणि माणसेही कोठेतरी दबा धरून त्यांचीच वाट पाहत असत.
हा नित्याचा पोट भरण्याचा संघर्ष होता.
तो घुशींच्या अर्धवट खाल्ल्लेल्या वास
मारणाऱ्या कलेवरांना तुडवत झोपडीचे दार ढकलून बाहेर डोळे दिपवणाऱ्या प्रकाशात आला.
बाहेर आला आणि एक माणसांची झुंड बुभुक्षितपणे चित्कार करत काही घुशींचा पाठलाग करत
त्याच्या समोरून गेली. पळत्या घुशी आडोशाच्या शोधात संतप्त चित्कारत होत्या. प्रतिहल्ल्यासाठी
प्रयत्न करत होत्या. त्याही माणसांना घाबरवण्यासाठी कर्कश्य किंचाळत होत्या. पण
आता त्यांचे स्वभाव आता माणसांच्या लक्षात आल्याने ते त्यांना घाबरवण्यासाठी दुप्पट
आवाजात चित्कारत होते. त्यांच्या दिशेने हातातील दगड भिरकावत होते. ज्या घुशीना ते
लागत त्या मरणप्राय किंचाळत जीव सोडत
होत्या. त्यांची कलेवरे उचलून, जखमा फाडून, गरम रक्त प्यायला लोक त्यांच्यावर तुटून
पडत होते.
कोण रक्ताळलेली घूस आधी उचलतो या स्पर्धेत त्यांच्यातच
बाचाबाच्या होत होत्या.
त्याला हे दृश्य नवे नव्हते. तो काही क्षण
दारातूनच त्या आता ओझरत्या दृश्याकडे पाहतच होता तेवढ्यात त्याची नजर मागे
राहिलेल्या एका कोसळत्या बाईवर गेली. आता हिला अचानक काय झाले? पिरीया तर झाला
नाही ना हिला? त्याच्या दिशेने ती वेद्नाप्राय चेहरा करून वळाली. मांड्यावर हात
ठेवत ती वेदना-विकृत चेहरा करून खाली बसू पाहत होती.
सर्व
स्त्री-पुरूषांप्रमाणे तीही नग्नच होती. तिचे ओघळते स्तन आणि मांड्यामधला केसाळ
भाग त्याही अवस्थेत मादक दिसत होता. पण तिच्यावर तर कोणी घुशीने किंवा माणसाने
हल्ला करताना कोणी दिसले नव्हते. म्हणजे पिरीयाच हा. त्याशिवाय का असे अचानक त्राण
जाते आणि पाठोपाठ जीवही जातो?
हे लक्षण ओळखणे एवढे अवघड नव्हते. अनेकांना तो होत
असतो हे त्याला माहित होते. त्यामुळे त्याला काहीच वाटले नाही. ती खाली बसण्याचा
प्रयत्न करत असतांनाच साऱ्या शरीरातील त्राण जाऊन ती एकाएकी खाली कोसळली. ती
त्याच्या झोपडीपासून काही अंतरावरच पडली होती आणि आता विव्हळत होती. तसे तिची
काळजी घ्यावी असे त्याला वाटणेही शक्य नव्हते. तिलाही ती अपेक्षा नव्हती. त्या
बाईने शेवटचे आचके दिले आणि काही वेळात गतप्राण झाली. ती पडताच बाजूला दडलेल्या
काही घुशींनी बाहेर पडत तिच्या देहावर झडप घातली. तिला कुरतडू लागल्या. मांस
फाटल्याचा आवाज येवू लागला.
माणसांची झुंड उघड्यावर आलेल्या घुशींचा पाठलाग करत पुढे
निघून गेली होती. चौकात त्यांना बहुदा अजून एक मानवी झुंड आडवी आली होती.
त्यांच्यातील संघर्षाचा आवाज आता कर्कश्य होवू लागला होता. मारामारी होत होती.
काही माणसं आपापसात लढून मरणारच होती. त्याने तिकडे दुर्लक्ष करून त्या स्त्रीच्या
मृतदेहाकडे पाहिले.
त्या स्त्रीची आता हाडेच शिल्लक राहिली होती.
घुशींची झुंड आता आहे ते हाडांना चिकटून राहिलेले मांसाचे तुकडे ओरबाडून ते चावत चपळाईने
पळ काढू लागल्या होत्या. आता त्यांचे पोट भरले होते. त्या त्यांच्या त्यांच्या
बिळात जाऊन आराम करायला मोकळ्या झालेल्या होत्या.
त्यांची नजर आता आपल्यावर जाणार नाही याची त्याला
खात्री असली तरी येथे बाकीच्याही पिपासू झुंडी खूप होत्या. कोणा एखाद्या झुंडीची नजर
आपल्यावर जाण्याआधीच आपण झोपडीत परत गेलेले बरे असा विचार करून तो मागे वळाला आणि
झोपडीचे दार बंद करून आपल्या सवय झालेल्या सडक्या माणसाचा रक्ताचा वास मारणाऱ्या बिछान्यावर
बसला.
डोळे मिटले. अंधारच.
तसाही आता त्याला प्रकाश नकोसाच वाटे. त्यात त्याला
गुदमरायला होई. अंधाराची मिठी मात्र स्नेहल आणि उबदार वाटे. ती आधार देतेय असे
वाटे. सुरक्षित वाटे त्याला.
अंधार पडला तरी त्याला बाहेर पडायला नको वाटे.
होतेच काय तेथे?
अंधार पडला की त्या उध्वस्त आणि आता मातीत मिळून
गेलेल्या कोणा एके काळच्या शहरात उरलेली थोडकी माणसे दिवसभरच्या मिळालेल्या
घुशींच्या शिकारीवर ताव मारत झोपी गेलेली असत. ज्यांना भागवायच्या ते मिळेल त्या
स्त्रीबरोबर झुंडीने वासना भागवून निपचित पडलेले असत. जे जास्त घुशी मारत ते
अर्थात अशा सेक्स पार्टीचे आकर्षण असे. अशाला एकाऐवजी दोन-तीन स्त्रिया सहज मिळत.
तीही मर्दानगी दाखवायची पद्धत असल्याने त्या रात्री भाळलेल्या सर्व स्त्रीयांना
भोगणे क्रमप्राप्त असे.
अर्थात हे सर्वांना जमणारे नव्हते. घुशी मारणे वेगळे
आणि एकाच रात्री दोन-तीन स्त्रीयांना संतुष्टी देणारा संभोग देणे वेगळे.
पण तीही एक मौज असे आणि टोळीतले लोक जल्लोष करत असत.
तेच त्यांचे मनोरंजन होते. तोच त्यांचा विधी होता. उद्या आपण सर्वात जास्त घुशी
माराव्यात ही प्रेरणा देणारा तो क्षण असे. पोरे आणि म्हातारे ती मौज चेकाळून पाहत
असत. सारेच चित्कारत असत. बाकीचे ते दृश्य उन्माद करत अधाशासारखे पाहत स्वत:चे
लिंग हलवत बसत किंवा मिळेल त्या स्त्रीला कवटाळू लागत आणि खेळात सहभागी होत. आवाज
बाहेर जाणार नाही याची काळजीही घेत असत. उगाच घुशींना अशा वेळी निमंत्रण देणे
धोक्याचे असे. पडल्या पडल्या रात्रीच्या गहन शांतीत ते दबके मादक वाटणारे चित्कारणे
ऐकण्यातही मौज असे.
ते ऐकून ते दृश्य न पाहताही त्याच्याही वासना चाळवत.
तो आपल्या झोपडीत आपले इंद्रीय जोरजोरात हलवत त्या वासनांना वाट देत असे. वीर्याचा
फव्वारा उडाला की मग म्लान होत तो आडवा पसरत असे.
हे पुरेसे नाही हे त्याला कळत असे. पण स्त्रीच
पाहिजे तर टोळीत सामील होणे गरजेचे होते. आणि त्याला मात्र टोळीत सामील व्हायचे
नव्हते. याचा अर्थ तो कधीच कोणत्या टोळीत नव्हता असाही नाही. तोही अशा प्रणयोन्मादात
गढला नव्हता असेही नाही. पण त्याने कधीच टोळी सोडली. हा आता असाच एकटाच मरणार याची
खात्री असल्याने त्याला कोणी विरोधही केला नाही. त्याने हा प्राचीन खंडहरात आडोसा
शोधला. तिचेच झोपडीवजा गुंफेत रुपांतर केले. रोजच्या खायची-प्यायची आणि घुशी बाहेरून
आत घुसणार नाहीत याची काटेकोर व्यवस्था केली.
आता तो मजेत होता.
मघाशी मेलेली स्त्री त्याच्या डोळ्यांसमोर
तरळत होती. ती मेली होती. तिला नक्कीच पिरीया झालेला होता याची त्याला खात्री
होती.
हा भयंकर आजार होता. शरीरातील सारे स्नायू आक्रसणारा
आणि एखाद्या क्षणी शरीरातील प्राण वाहून नेणारा. घुशीचा मेंदू खाल्ला तर हा आजार
बरा होऊ शकतो असे काही माणसांचे म्हणणे असले तरी त्याही इलाजाने कोणावर सकारात्मक परिणाम
झाला नव्हता. शेवटी ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि ती आपण स्वीकारलीच पाहिजे यावर
त्या अनेक टोळ्यात वाटल्या गेलेल्या माणसांत एकमत झाले होते. ज्याशी लढता येत नाही
तेथे हार मानून मोकळे होणे आवश्यक होते. उगाच कोण डोकेफोड करत बसेल?
ते काहीही असले तरी मघा मेलेली स्त्री
त्याच्या मनात चेतना जागवत होती. त्याने तिचे ती जिवंत असतानाचे पाहिलेले ओघळते
स्तन आणि मादक मांड्या आणि त्या मांड्यामधली केसाळ योनी त्याला उद्दीपित करत होती.
त्याचे लिंग ताठरू लागले होते. तो डोळे मिटून आपले लिंग हातात घेऊन तिच्याशी संभोग
करण्याची कल्पना करू लागला. हातांची हालचाल वेगवान होत गेली. तो स्वत:शीच चित्कारू
लागला. उसासे सोडत तो तिला कल्पनेतीत जोरकस धक्के देत राहिला. शरीरातील तणाव
उद्रेकावस्थेला पोहोचला.
आणि एके क्षणी तो वीर्याच्या फव्वाऱ्यासह तणावमुक्त
झाला. हाताला लागलेले वीर्य त्याने निगुतीने चाटले. बरे वाटले. घुशीच्या मांसाच्या एकसुरी चवीवर हा
चांगला उतारा होता. तृप्त होत तो आडवा पडला. आता थकव्याने त्याला ग्रासले होते.
झोप घ्यायला पाहिजे होती. तो कुशीवर रेलला आणि सवयीने जमिनीला कान लावून खाली
बिळांत घुशी काय करताहेत याचा कानोसा घेऊ लागला.
पण कोणी जात-येत नव्हते. अशा वेळीही काही भूकावलेल्या
घुशी शिकारीला बाहेर पडलेल्या असत. रात्री त्यांनाही शिकार मिळणे अवघड असे. पण
नशीब जोरावर असले तर बाहेर हव्यासाने कोंदट हवा खायला आलेला एखादा मानव त्यांच्या
तावडीत सापडे. पण फार क्वचित.
दिवस मात्र घुशींसाठीही धामधुमीचा असे. उद्रेकून कर्कश्य
किंचाळ्या फोडत झेपा घेत हल्ले करणे, माणसे मारणे किंवा माणसांच्या हल्ल्यात जखमी
होणे आणि त्यांचे भक्ष्य होणे किंवा बचावासाठी पळत सुटणे, कोणी बेसावध शिकार
सापडते काय यावर लक्ष ठेवणे. आणि तीक्ष्ण दगडांचा हल्ला आला की स्वत:ला वाचवणे ही
तर फार मोठी कसरत असे.
नेहमीच वाचू याचाही भरोसा नसे कारण अनेक सहकारी मरतांना
रोजच दिसत. आपणही एके दिवशी डोक्यात दगड आदळून मरू याची त्यांना खात्री होती. पण
तरीही जिवंत होते तोवर खायला माणसांचे मांस
गरजेचेच होते. खाता येईल असे दुसरे धरतीवर काही नव्हतेच. एक जरी माणूस
मिळाला की एका झुंडीचे जरा तरी भागे.
त्यात आजकाल माणसे कमी होऊ लागलेली होती याची
त्यांनाच जास्त काळजी होती. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त माणसे मारायची नाहीत असा सर्व
घुशींच्या झुंडीनी आपापसात करारच करून टाकला होता. त्यांच्या चिर-चिर आणि गुरगुरीतून त्यांची भाषा
प्रसारित होई आणि ती त्यांनाच कळे.
त्यांचे बोलणे कदाचित माणसांपेक्षा प्रगत असेल याची कोणाही
माणसाला आजतागायत कल्पना आलेली नव्हती. मग त्याला कशी येणार? तसाही तो झुंडीतला
माणूस नव्हता. आणि तो एकटा राहतो याचीही कोणाला परवा नव्हती.
ते गरजेसाठी एकत्र येत असले तरी कोणाची कोणावर
निष्ठा नव्हती.
आणि त्यालाही इतरांची परवा नव्हती.
एकाकीपणात जगण्यात आणि तहान-भूक भागवण्यात तो खुश
होता.
रात्री साऱ्या घुशी निमूट आपल्या बिळांत खाल्लेले
मांस पचवत झोपी जात. त्यामुळे त्याने कितीही कानोसा घेतला तरी त्याला झोपडीखालील
त्यांच्या आश्रयांतून कसला आवाज येणे शक्य नव्हते. तरीही कोठून तरी आवाज येईल याची
वाट पाहत बसणे हा त्याचा वेळ घालवण्याचा छंद होता. असे करता करता कधी झोप लागायची
हे त्यालाही कळत नसे.
बरे, तशा त्याच्याकडे आठवण्यासारख्या फारशा
आठवणीही नव्हत्या. ज्या होत्या त्या उगाळून उगाळून त्यांचा कधीच निर्जीव चोथा
झाल्या होत्या. कित्तेक आठवणी दखलपात्र नसल्याने तो विसरूनही
गेलेला होता.
स्वप्नात पहावे असेही काही नव्हते.
आलेच काही स्वप्नात तर जळालेली काळी पडलेली
विस्तीर्ण धरती. त्यात पहावे असे काही नसे. असल्या तर फक्त घुशी.
म्हणजे त्याचे स्वप्नांवर नियंत्रण होते असे नाही.
मुळात आपल्याला स्वप्ने पडतात की नाही हेही त्याला
माहित नव्हते. किंबहुना तो स्वप्नांनाही विसरून गेला होता. सारे विसरले होते तसेच.
हा आडोशाचा अंधार त्याचा चिरंतन सोबती होता. त्याची
संगत सोडून बाहेर पडावेच वाटत नसे.
आज थोडा बाहेर पडला तर ते उद्रेकी दृश्य दिसले. मग त्याने
त्याचाही उद्रेक पडल्या पडल्या मुक्त केला होता.
आता त्याला ग्लानी आलेली होती.
खाली बिळांतून तर कसला आवाज येत नव्हता.
कोणतीही घूस परत आली नव्हती. याचा अर्थ अजून कोणाला शिकार मिळालेली नव्हती. बाहेर
सर्वत्र अजूनही झुंजी चालूच होत्या. चारी बाजूंनी तो हिंस्त्र आरडाओरडा आणि
घुशींच्या किंवा माणसांच्या संतप्त किंवा वेदनांनी चित्कारण्याचे आवाज येत होते.
हे आवाज त्याला मधुर संगीतासारखे वाटत.
कारण एवढेच काय ते संगीत म्हणावे असे काही उरलेले
होते.
त्याने काही वेळ अजून वाट पहिली. पाठीवर
पडला. वर त्या वस्तीतील कधीकाळचे प्राचीन कठीण अवशेषांचे तुकडे रचून तिरके बनवलेले
छत होते. असे दाट की कधीकाळी येणाऱ्या त्या विषारी पावसाचे थेंबही आत झिरपू नयेत.
ते त्याने आणि एक एके काळी एक जोडीदार होता त्याच्या
सहकार्याने बनवले होते. पण तोही घुशींच्या हल्ल्यात मेला होता.
तो मरत असतांना त्याने पाहिले होते. त्याचा चेहरा तीक्ष्ण
दातांनी ओरबाडला जात असतांना ज्या वेदना त्याच्या रक्ताळलेल्या चेहऱ्यावर दिसल्या
होत्या त्या भेसूर होत्या. पण त्याला त्याचे काही वाटले नव्हते. त्याला हे दृश्य
नवेही नव्हते आणि काही वाटावे एवढ्या भावनाही उरलेल्या नव्हत्या.
कोणातही उरलेल्या नव्हत्या तसेच. आणि आता तर त्याला
मरूनही आठवणार नाही एवढा काळ झाला होता.
एक होते, त्याचा हा सहकारी जरा अजबच होता.
या झुंडीनी विस्कळीत झालेल्या आणि रोज युद्धायमान असलेल्या भग्नावशेषाच्या विशाल ढिगाऱ्याबाहेर
जाऊन कोठे नेमके काय आहे हे शोधायची त्याला फार हौस होती.
दोनेकदा त्याने यालाही ओढून सोबत घेतले होते. तेव्हा
जे पाहिले ते त्याला अजूनही अस्पष्ट आठवे. होते ते अजबच. न समजणारे. भयभीत आणि
अचंबित करणारे...पण ते पाहून त्याच्या साथीदाराला काय चेव चढायचा!
एकदा तर रात्री वस्तीबाहेरच्या काळ्याशार पाषाणाजवळ तो
त्याला घेऊन गेला होता. तेव्हा जे अजब पाहिले त्याच्या स्मृती मात्र उसळून वर आल्या
तरी तो त्या दाबून टाकत असे. ती आठवण आठवू नये असे वाटणारी होती म्हणून त्याने ती
विसरून जाण्यातच धन्यता मानली होती.
हा जोडीदार कोठेही काही अस्पष्ट जुनाट खुणा दिसल्या
की बेभान होऊन ओरडायचा. ते काय असेल, कसे असेल, त्याचा काय उपयोग असेल यावर बडबड
करत बसायचा. त्याने त्याच्या किंवा कोणाच्याही शब्दसंग्रहात नसलेले नवीन शब्दही
शोधले होते, पण त्याचा अर्थ त्यालाच माहित. हा बावचळून त्याच्याकडे फक्त पहात
रहायचा. समजून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत रहायचा.
कारण मुळात आता भाषाच त्यांच्या रोजच्या जगण्यासाठी
जेवढी आवश्यक होती तेवढीच उरलेली होती.
त्या भाषेत जे बसत नव्हते ते खाणाखुणांनी सांगायचा
प्रयत्न व्हायचा. अनेक विचार आले मनात तरी ते व्यक्त करायला त्यांच्याकडे ना शब्द उरले
होते ना व्याकरण.
चेहऱ्यावर अचंबा आणणे किंवा खेद दाखवणारा चेहरा करणे
एवढेच काय ते त्यांच्या आंतरिक अभिव्यक्तीचे साधन उरलेले होते.
पण ही धरती कशी जळाली याचे त्याच्या साथीदाराने काही
सिद्धांत बनवले होते.
धरती जळाली हे आता सर्वांनाच माहित होते, पण कशी आणि
कधी हे मात्र आता कोणालाही आठवत नव्हते कारण हे आक्रीत झाले तेव्हा हे जन्मालाच
आलेले नव्हते.
पण या जोडीदाराने त्याच्या काही कथा बनवल्या होत्या.
अंदाजच ते. पण ते सांगायला त्याला खूप उत्साही
वाटायचे. त्याचे अनेक शब्द त्याच्या डोक्यावरून जात. काही समजत नसले तरी तो ते बोल
ऐकत बसायचा. कसलाही उत्साह न उरलेल्या याला ते न समजणारे काल्पनिक अद्भुत निमूट
ऐकून घ्यावे लागायचे.
कारण हा साथीदार त्याच्या कामाचा होता.
तो अट्टल घूसमाऱ्या होता. चपळ होता. नेमबाज होता.
खरे तर तो झुंडीचाच नेता व्हायचा. पण त्याला त्यातही काही रस नव्हता. पण त्याच्यामुळे
याची मात्र खाण्याची बिनबोभाट सोय होत असल्याने तो त्याला चिकटून होता. त्याच्या
इशाऱ्याने चालत होता.
पण एके दिवशी मेला तो.
एवढा नेमबाज आणि सावध तो, पण त्यालाही घुशींनी चकवले
आणि गनिमी काव्याने त्याच्या मागून त्याच्या मानेवर झेपा घेत त्याच्या मानेचे असे
चावे घेतले की किंकाळ्या फोडत तो खाली कोसळला. त्याच्या समोर त्याचे शरीर कुरतडले
गेले आणि तो ते निमूट पाहून परत फिरला. त्याला वाचवायला हवे असेही त्याच्या मनाला
शिवले नाही. स्वत: जगणे महत्वाचे होते. त्यात तो स्वत: काही त्याच्याइतका चपळ
नव्हता. स्वत:च्या जोरावर तो एकही घूस हल्ला करून मारू शकत नव्हता. तो आता नसेल या
जाणीवेने तो हवालदिल झाला असला तर केवळ त्यामुळे. त्याच्या मरणाचे दु:ख असेल तर
एवढेच!
आता शिकार करायची कशी हा भयंकर प्रश्न क्रूर घुशीने
जबडा फाडून पहावे तसा त्याच्यासमोर उभा होता.
आता एखाद्या झुंडीत जावे की नाही यावर
त्याने खूप विचार केला. तसा त्याला कोणीही प्रवेश दिला असता. शेवटी झुंडीला माणसे
हवीच असत. फार तर असली नाकाम तर मरतील...पण त्यात एखाद्याला सामील करून घेण्यात नुकसान
तर काही नव्हते.
पण त्याने तरीही काही दिवस बाहेर जाणे टाळले. काही
दिवसांचे उपास झाल्यावर मग त्याला ही सोपी युक्ती सापडली. त्याने खालून घुशींच्या
आडव्या जाणाऱ्या बिळांवरून चिंचोळ्या दगडाने अल्लाद खोदत एक आडवा उभा छेद केला आणि
त्याची सोय झाली. आणि तो त्यात तृप्त होता.
घुशींचा स्वभाव लक्षात घेता त्या बाहेर जाण्याच्या
धावपळीत असताना त्यांनाच पटाककन अचानक उचलून घेणारे बीळ आपल्याच डोक्यावर कोणी
बनवले असेल याची त्या कधीच शंका घेणार नव्हत्या. शंका आली तरी वर वळून जावे एवढी
जागाही नव्हती. त्यात डोक्यावर पहायचा निवांतपणा त्यांच्याकडे होताच कोठे?
आणि समजा पाहिले जरी असते तरी त्यांना अंधाराशिवाय
त्यांना काय दिसले असते?
आणि मुळात त्या घाईत असत बाहेर जाऊन माणसे शोधून
त्यांचा खात्मा करून त्यांना पोट भरून घेण्यासाठी.
आता माणसे नेमकी कोठे चूक करतात हे लक्षात घेऊन संधी
साधताच त्यांच्यावर झेपा घेत त्यांना मरणासन्न करून त्यांचे रक्त-मांस ओरबाडून
खाण्यात घुशींनी कौशल्य साधलेले होते. त्यांनाही जास्त डोके चालवायची गरज नव्हती
आणि जी होती त्यात त्यांनी अपार कौशल्य प्राप्त केलेले होते.
एवढ्या काळाच्या संगतीने एकमेकांचे दोष एवढे
तरी दोन्ही पक्षांच्या लक्षात आलेले होते. उदाहणार्थ घुशीनी एकदा तोंड समोर करून
एकसुरात गुरगुर सुरु केली तर त्यांचा सामना करणे हा विषम लढा असेल हे माणसांच्या
लक्षात आलेले होते. त्यामुळे त्यानी एक मार्ग शोधला हता तो हा की त्यांचे लक्ष
जमेल तेवढ्या दिशांनी भरकटवायचे आणि हल्ला करायचा किंवा त्या तरीही बधत नसतील तर सरळ
झुंडीने पळ काढायचा. त्यांचा बेभान हिंस्त्र पाठलाग चुकवायचा.
पण त्याला आता त्या बेभान पळापळीची गरज
राहिलेली नव्हती. बिनबोभाट त्याचे पोट भरत होते. तहान भागत होती. घुशी कधीकाळी
त्या बिळातून वर आल्या तर मात्र आपला चट्टा-मट्टा होईल याचाही विचार त्याने केला नव्हता. त्याचीही
त्याला गरज नव्हती. त्याने काही कारण नसलेला उसासा सोडला आणि संथ लयीत घोरणे सुरु केले.
·
२
पृथ्वी जळाली त्याला किती काळ झाला हे
त्याला माहित नव्हते. खरे तर कोणालाही माहित नव्हते. किंबहुना काळाची गणना सारेच विसरून
गेले होते. किती पिढ्या गेल्या म्हणावे तर पिढी नावाची आता कोणतीही गोष्टच शिल्लक
राहिलेली नव्हती. कोण कोणाची औलाद आहे आणि कोण कधी मेले हे जर सांगताच येत नसेल,
कसलीही नोंद ठेवायची व्यवस्था नसेल तर
दुसरे होणार तरी काय? मुळात कोणालाही लिहिता-वाचता येण्याची कलाच माहित नसेल तर
नोंद कसली बोडक्याची ठेवणार आणि कशावर? किंबहुना लिहिता येणे ही मानवाच्या
प्रतिभेची सर्वोच्च झेप होती हे त्यांना आता कोठे माहित होते?
आणि मुळात नोंद तरी कशाला ठेवायची? काय उपयोग?
एक आठवण मात्र परंपरागत चालत आलेली होती ती म्हणजे
कधीकाळी पृथ्वी जळाल्याची.
आणि ते त्याच्या खुणा आजही सर्वत्र पाहत होते. म्हणजे
जमीन काळी-राखाडी झाली होती. माणूस आणि घुशी सोडल्या तर कोणतेही सजीव उरले नव्हते.
कधी काळी असलेल्या पुरातन झाडांचे जळके बुंधेच काय ते उरलेले होते...आणि त्यांना
झाडे म्हटले जायचे आणि ती कशी दिसायची हेही त्यांना माहित नव्हते. सध्या जे होते
ते पाणीही मेलेले होते. पाउस वेदनादायक होता. तो कधी पडूच नये असे वाटे त्यांना.
कारण ते थेंब अंगावर पडले तर त्वचेची लाहीलाही व्हायची. साऱ्या अंगावर फोड यायचे.
वेदनांनी तडफडून मरणाच्या स्वाधीन व्हावे लागायचे.
त्यामुळे कोणी आता असा पाउस येणार याची चाहूल जरी
लागली तरी आश्रय शोधत पळायला सुरुवात करत.
पण एक बरे होते. मुळात पाउस क्वचीतच येई. आला तरी
येण्याआधी आभाळात घाणेरडे दिसणारे ढग गर्दी करायचे आणि भीषण गर्जना व्हायच्या. त्यामुळे
तो विषारी पाउस सुरु होण्याआधीच सावध व्हायला उसंत मिळे, अर्थात आडोसा जवळपास असेल
तरच, अन्यथा वेदनादायक मृत्यूला कवटाळावे लागायचे.
त्यामुळे कोणी आपापल्या आडोशांपासून फारसे दूरही जात
नसे.
पण मुळात हे व्हायचे क्वचित. एरवी आभाळ सतत निस्तेज
आणि काळपट दिसायचे. रात्रीच्या धुकट आभाळातील तारका पहायचीही कोणी तसदी घेत नसत. त्याचीही
गरज वाटत नसे. गरजांचा अपार संकोच झालेला होता.
माणसे बाहेर येत नाहीत म्हणून घुशीही त्यामुळे
रात्री आपापले आडोसे सोडून सहसा वर येत नसत.
जणू माणसं आणि घुशी यांच्यात एक तहच झालेला होता.
पण बाहेर पडलो आणि घुशींना जरा चाहूल जरी लागली तर
मृत्यू निश्चित हे समीकरण माहित असल्याने तर रात्री कोणी बाहेर क्वचित कोणी पिरीया
रोगाने वेडावलेला सोडला तर कोणी पडणेही शक्य नव्हते.
पण दिवसा दिसणाऱ्या ढिगाऱ्यापारच्या धरतीत कधीकाळी
काही उगवत होते याच्याही खुणा कधीच मिटलेल्या होत्या.
म्हणजे कधीकाळी धरती जळाली होती हे खरेच होते.
पण सामुहिक विस्मृतीने त्यांचे जीवन तसे सोपेही
केलेले होते.
जरा थकु लागलेले आणि केवळ योगायोगाने वाचलेले पूर्वजांनी
सांगितलेल्या दंतकथा आपली भर घालत सांगत. पण त्यात तथ्यांश असावा असे कोणालाही
वाटत नव्हते. पण तेवढीच करमणूक म्हणून ते ऐकून घेत. हसत. चित्कार करत. असे कोठे
असतेय काय? असे फिदीफिदी हसत म्हणत.
पण असे खरेच झाले असेल तर काय, या भीतीने गळाठूनही
जात.
पण तरीही ती एक गम्मतच असे. उद्या आपल्याला घुशी
मारून पोट भरायचे आहे एवढे मात्र त्यांना पक्के माहित असे. कधीकाळी झालीच असली तर
धरती जळल्याची घटना आज त्यांच्या काय
कामाची होती? त्यांना आज जाळही करता येत नव्हता. मुळात जाळता येईल असे काहीही
शिल्लक नसल्याने आग म्हणजे काय याचं विचार करण्याची कोणाला गरज कोणाला भासत
नव्हती. पृथ्वी जळाली असे जुने लोक अजूनही सांगत हे खरे पण जाळ म्हणजे काय हेही त्यांना
आता सांगता येत नव्हते.
मग धरती जळाली या म्हणण्याला तरी काय अर्थ होता? एक
निरर्थक अनुभवता न येणारा आणि अर्थ समजत नसताना अद्भुत वलय प्राप्त झालेला एक शब्द.
एवढेच.
मग ती भीती आज बाळगण्याची काय गरज होती?
आज तर धरती निर्जीव होती ना?
आणि ते त्यांच्यासाठी चांगलेच नव्हते काय?
कारण सजीव असणे म्हणजे काय हेच माहित नाही तर
निर्जीवतेला तरी काय अर्थ राहत होता?
आज ज्या जगात ते जगत होते त्या जगाने
त्यांचे आताचे मानसशास्त्र घडवले होते. या जगात जे नाही, ते कधीकाळी असू शकेल याची
कल्पना करणे ठीक आणि मानीव असले तरी त्याचा तरी काय उपयोग होता?
पण तरीही त्यांच्या कल्पनातीत कथाही अजबच
असायच्या.
कोणे एके काळी म्हणे माणूस आणि घुशींत धमासान युद्ध झाले. ते आजच्या घुशींचे पूर्वज होते खूप अवाढव्य
आणि क्रूर. म्हणे त्यांनी जमिनीखालच्या विवरावर माणसांनी ठेवलेली भव्य शिळा एके
दिवशी उचकटून फेकण्यात यश मिळवून धरतीवर आक्रमण केले. त्यांनी माणसांच्या वस्त्या
आपल्या पंजाच्या फटकार्यांनी उध्वस्त करायला सुरुवात केली. माणसेही त्या काळात
होती तशीच अवाढव्य. आधी घाबरले असले तरी त्यांनी नंतर प्रतिकार करायला सुरुवात
केली. त्यांनी घुशींच्या नाशासाठी साधने शोधली. त्यांची सारी शस्त्रे संपली तर मग
त्यांनी दगडांचा बेसुमार मारा करून त्यांचा प्रतिकार करायला सुरुवात केली.
पण घुशी कसल्या हार मानतात? त्या बलाढ्य ना! त्या
फार तर जखमी व्हायच्या. मरायची ती माणसे. मग माणसांनी जगण्यासाठी अजून शोध सुरु
केला.
घुशींवर झुंडीने हल्ला केला तरच त्यांना परतवता येवू
शकते हा महत्वाचा शोध त्यांना लागला.
माणसांनी मग झुंडी बनवल्या. त्या कधी येतील आणि
हल्ला करतील याचे अंदाज बांधायला सुरुवात केली. त्यांची आश्रयस्थाने शोधून काढली
आणि मग झुंडीच्या जोरावर घुशींचा विनाश सुरु केला.
झुंड बनवणे हा माणसांचा जीवनावश्यक नीतीसिद्धांत
बनला.
झुंडीने माणसे चालून येऊ लागल्यावर आधी घुशी
घाबरल्या. मग चिडल्या. त्यांनीही झुंड बनवायला सुरुवात करत एकत्र येत माणसांच्या
जगावर एकाच वेळेस सर्वत्र भीषण हल्ला चढवला.
मग मात्र सर्वत्र ह्ल्लकल्लोळ उडाला. माणसाचे जग
तितर-बितर झाले.
माणसांनी मग आपली सर्व बुद्धी पणाला लावली. अग्नीची मदत
घेतली. त्याची अस्त्रे बनवली. सोडली. सर्वत्र जसा कधी विझणार नाही असा भीषण आगडोंब
उसळला. त्यात असंख्य घुशी मारल्या गेल्या. सृष्टी जळून खाक झाली. जगातील सारे
प्राणी नष्ट झाले. अरण्ये संपली. नद्या-समुद्राचे पाणी आटले.
घुशींची अवस्था बिकट झाली. अग्नीच्या झळांपासून
वाचण्यासाठी त्यांनी जमिनीत बिळे बनवली आणि त्यात आश्रय घेतला. जमीनीखाली आधीच
राहणाऱ्या जीवांचा भूकेपोटी फडशा पाडला. घुशी आक्रसत गेल्या.
आणि असंख्य माणसेही स्वत:च लावलेल्या आगडोंबात
भस्मसात झाली.
अनेक जिवंत राहिले पण विद्रूप होत.
अखेर कधीतरी अग्नीचा प्रलय थांबला. कारण जगात
जळण्यासारखे आता काही उरलेलेच नव्हते.
घुशी तोवर भुकेने आणि त्या उष्णतेने कासावीस
झालेल्या होत्या. त्यांनी धाडस करून जेथेही माणसे लपली होती त्यांना शोधून उरल्या
सुरल्या मानवी जगात हाहा:कार उडवला. दिसतील त्यांच्यावर झडप घालून त्यांचे मांस
ओरबाडले. भूक भागवली. अनेकांना तर त्यांनी केवळ सूड घ्यायचा म्हणून मारले. त्यांची
जगायची साधने कुरतडून नष्ट केली. अवघ्या जगात हे सारे एकाच वेळेस झाले. उरली सुरली
माणसे पळून जाऊ लागली. मिळेल तेथे आसरा शोधू लागली.
पण आता सर्वत्र घुशींचे साम्राज्य निर्माण झाले.
माणसे शेतात, मैदानात, डोंगरावर गेली तरी तेथे त्यांचे हिंस्त्र स्वागत करायला
घुशी होत्याच.
काही लोक समुद्रातल्या उरल्या सुरल्या पाण्यात उड्या
मारून पळून जाऊ लागले तर त्यांनीही पाण्यात उड्या मारून पाठलाग करत माणसांना
मारले.
शेवटी समुद्रही विषारी झाला. कोणी त्यात पाय टाकायला
धजेना.
अखेर असंख्य लोक त्यांचे भक्ष झाले. आता जगली
वाचलेली थोडकी माणसे पुन्हा मागे पळाली.
त्यांच्या जुन्या जळलेल्या उध्वस्त आश्रयस्थानांत
आसरा शोधला. घुशींपासून वाचणे गरजेचे झाले
होते. पण अन्नाचे काय? जुने शिल्लक साठे त्यांच्याही हाती फारसे लागले नाहीत कारण
घुशींच्या झुंडीनी त्याचाही फडशा पाडायला सुरुवात केली होती. माणसांना त्या
अन्नाजवळ जाऊही देत नव्हत्या.
शेवटी माणसांनी घुशीनाच अन्न बनवायला सुरुवात केली. त्यात
अजरामर चव शोधली गेली. घुशींचा कोणता अवयव चविष्ट लागतो यावर चर्चा जादू लागल्या.
आणि घुशींचे मुख्य अन्न माणसे तर कधीच झालीच होती.
पण एकमेकांना खाऊन सर्वांचेच आकार अजूनच आक्रसत
गेले. सर्वांचीच मुळची शक्ती कमी झाली. पण हेही वास्तव सर्वांनी अपरिहार्यपणे
स्वीकारले.
त्यांना हळूहळू त्याची एवढी सवय झाली की घुशी
शत्रू असल्या तरी त्याच आपल्या अन्न्देवता आहेत असा साक्षात्कार त्यांना झाला. पण
आपण मात्र त्यांचे अन्न बनता कामा नये यासाठी त्यांनी प्रत्येक पिढीत सुधारणा करत
योजना बनवत नेल्या. काही फसल्या तर काही यशस्वीही झाल्या. त्यांचे जग घुशीभोवती
फिरू लागले. त्यांचे विचार आणि आचारही घूस-केंद्रित झाले. यापार काही जग असू शकते किंवा कधीकाळी
होते हे त्यांच्या आता मनातही येत नव्हते.
घुशींनाही मानवी अन्न हा एकमेव पर्याय उरला
होता. माणसेच कमी झाल्याने भुकेने आणि मानवी हल्ल्यांनी मरून आता घुशींची संख्याही
वेगाने घसरली होती.
आता जेथे मानव वस्तीला असे तेथेच घुशी
वास्तव्य करीत. त्यांना तरी त्यापार कोठला मार्ग होता?
मानव आणि घूस हा संघर्ष गेल्या बऱ्याच काळापासून
सुरु होता. नेमका कधीपासून हे कोणी सांगू शकत नव्हता. कालगणनेची साधने कधीच नाश
पावली होती आणि आता किती काळ गेला आणि किती जाणार आहे हे जाणून घ्यायची इच्छाही कधीच
मरून गेली होती.
किंबहुना इच्छा असावी असे वाटावे असेही वातावरण
नव्हते.
किंवा असेही म्हणता येईल की आता कोणतीही अन्य इच्छा आता
उरलेलीच नव्हती.
हिंस्त्र घुशींपासून स्वत:चे रक्षण करणे आणि जमेल
तेवढ्या घुशी मारून पोट भरणे आणि त्यांच्या रक्ताने तहान भागवणे हेच जेथे जीवनगाणे
झाले होते तेथे असल्या बाष्कळ रिकामटेकड्या गोष्टींकडे कोण लक्ष ठेवेल?
सारे जग निष्प्राण झालेले होते.
याचा अर्थ पाउस पडतच नसे असे नाही.
पडे ना!. क्वचित पडे पण पडे.
पण त्याचा स्पर्श जीवघेणा असे. त्वचा जळू लागे. अनेक
लोक आणि घुशी एके काळी पावसाने मरत. ते पाणी पिणे म्हणजे जीव देणे होते असे झाले
होते. पण कैक विसा काळापासून माणसे आणि घुशी पावसाची नुसती चाहूल लागली तरी
आडोशाला पळत. तो पाउसच असा विषारी होता की
त्यामुळे कधी काही उगवायचेही नाही. ते पाणी पिले तर आतडी जळे आणि पिणारा हात-पाय
झाडून मरे. त्यामुळे ते साठलेले पाणीसुद्धा कोणी पीत नसे. वाफा मारणाऱ्या त्या उरल्या-सुरल्या
आटत चाललेल्या रोगट तळ्यांकडे किंवा निष्प्राण ओढ्यांकडे कोणी जायची हिम्मत करत
नसे.
पृथ्वी जळाली असली तरी तिला हे पाणी थंड करत असेल
यावरही कोणाचा विश्वास नव्हता.
पण कधीकाळी पृथ्वी जळाली होती यावर मात्र सर्वांचे
एकमत होते. आता कधी आणि कशी जळाली हे माहित नसले म्हणून काय झाले? या क्षणी तरी सारा
परिसर उजाड झालेला होता. पूर्वीही असेल कारण जन्माला आले तेव्हापासून ते असेच पाहत
आलेले होते.
जुने जाणतेही सांगत की धरती अशीच होती, आकाश असेच कळभावलेले
असायचे. त्यात दिवसा काळवंडलेला सूर्य आणि रात्री अंधुक चंद्र-तारे सोडले तर आता
काहीच नसायचे. हवेत उष्णता दाटलेली असायची. वारे वाहे कधीकधी तेही धूळ सोबत घेऊन.
ही धूळ आता त्यांचे दैनंदिन वास्तव बनलेले होते.
कोणीतरी कधीतरी बांधलेल्या प्राचीन वास्तू आता नामशेष
होत धुळीच्या ढिगांखाली गेलेल्या होत्या. त्याखालील प्राचीन वास्तूतील घुशींच्या शिकारीच्या
कामाला येईल त्या कठीण आणि टोकदार वस्तू पूर्वी कधी काळीच वापरल्या गेलेल्या
असल्याने आता त्यातही आज न कळणारे अवशेष सोडता काही उरले नव्हते असे म्हटले तरी
चालेल.
धुळीखाली जमिनीत होती ती घुशींची बिळे. त्यात घुशी
राहत. तेथे खोदणे म्हणजे मृत्युला निमंत्रण. कारण घुशी त्यांच्या बिळांवर आक्रमण
झाले की चवताळून बाहेर येत. बिळांवर हल्ला करणाऱ्या माणसांवर जीवघेणे तुटून पडत. मग
त्यांच्याशी लढा देणे अशक्य होऊन जायचे.
माणसांनी मग धुळीचे ढिगारे उकरायचा आणि घुशी शोधायचा
कार्यक्रम थांबवला होता. खूप काळ गेला तसा तो प्रकार निषिद्ध मानला जाऊ लागला
होता.
घुशी जेव्हा शिकारीला बाहेर पडत तेव्हाच त्यांची
शिकार करायची संधी असायची. आणि ती संधी स्वत:चे जीव वाचवत साधणे आता माणसासाठी
महत्वाचे बनून गेलेले होते. जगण्यासाठी नवे नैतिक नियम बनू लागले होते.
अर्थात हे समजायला माणसांना खूप वेळ लागला.
म्हणजे अनेक विसा काळ. आता धरतीवर दोनच जीव होते. वनस्पतींसह सर्व अन्य प्राणीमात्र
पृथ्वी जळाली तेव्हाच भस्मसात झाले होते. आता
क्वचित कोठे दिसले तर त्यांचे काळे पडलेले सांगाडे. तेही वस्तीबाहेर गेले
तरच दृष्टीस पडत आणि आता तर कोणी वस्ती सोडून जातही नसे.
पिण्यासारखे पाणीच नसल्याने घुशींचे रक्त हेच
त्यांच्या तहानेला उत्तर होते.
घुशीही मानवी रक्तात मिळेल तेवढ्या द्रवावर आपली
तहान भागवून घेत. किंबहुना आता सर्वांचीच तहानही कमी झाली होती आणि कदाचित काही
काळानंतर तीही संपणार होती.
धरती जळालेली होती. ते वास्तव आता सर्वांच्या
अंगवळणी पडलेले होते. चांगलेच मुरले होते सर्वांत. आणि त्यामुळे आता त्याचीही
पर्वा उरलेली नव्हती. ते शिकार करण्याला जीवनातला सर्वात गरजेचा आनंद मानत होते.
घुशींचे हल्ले चुकवणे आणि पलटवार करून त्यांना ठार मारणे यात आवश्यक चपळाई अंगात
आणण्यात स्वत:ला अधिकाधिक तरबेज करत होते.
घुशीही मागे नव्हत्या.
माणसे दगड उचलतात कधी, फेकतात कसे आणि तो
आपल्यापर्यंत यायला किती वेळ लागेल याचे गणित करत मधल्या वेळेची....काही क्षणांची
संधी साधून मुसंडी मारत माणसांच्या गळयाला दात लावण्यात तरबेज झाल्या होत्या.
त्यांचेही एक न्यूरल नेटवर्क प्रस्थापित झालेले
होते. ते बव्हंशी बरोबर काम करे. आधी अनेक घुशी भूक नसताना मारल्या जात तशीच
माणसेही मारली जात असल्याने सारेच कमी कमी होत गेले होते. शेवटी कोणीच राहणार नाही
ही भीती सर्वांनाच मार्ग काढायला प्रेरित करती झाली. घुशींनी आपापसात आणि माणसांनी
बैठकीत घोर चर्चा करून पोटापुरतीच आवश्यक शिकार करायचा निर्णय घेऊन उरली होती ती
संख्यातरी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
पण घुशीची पैदास मोठी. एक मादी घूस पंधरा-वीस पिल्ले
पैदा करायची. माणसांचे तसे नव्हते. ही पैदासच विषम होती. त्यामुळे घुशींची संख्या
काहीही झाले तरी जास्तच राहू लागली.
पण माणसेही हुशार आणि चपळ होऊ लागल्याने त्यांच्या
गरजेपेक्षा जास्तच घुशी मारल्या जात. पण माणसांचे असणे घुशींसाठी जास्त महत्वाचे
होते. किती घुशी मरतात हा विशेष मोठा प्रश्न नव्हता. तसा हा कोणालाच प्रश्न
नव्हता. पोट भरण्यापुरते तरी जीव असले पाहिजेत हीच काय ती उपजत अक्कल होती.
घुशी माणसांचे तर माणसे घुशींचे अन्न होते आणि हे
त्रिकालाबाधित सत्य दोन्ही पक्षांनी मान्य करून टाकले होते.
पृथ्वी जळाली तेव्हाची स्थिती काय होती
याबाबत आता फक्त कल्पना उरलेल्या होत्या. दंतकथा होत्या. काही मिथके होती. या
वस्तीतली मिथके जेथेही कोठे माणूस जिवंत असेल तेथेही असतील काय याचीही कोणाला
कल्पना नव्हती. खरे तर ही वस्ती (म्हणजे एके काळचे आता केवळ असंख्य ढिगारे झालेले एके
काळचे विस्तीर्ण शहर) सोडून अन्यत्र कोठे वस्ती आहे की नाही याचीही त्यांना माहिती
नव्हती.
कधीकाळी कोणी त्या शोधायला बाहेर पडलाच नसेल असेही
नव्हते. पण असा कोणी परत आल्याचेही कोणाला माहित नव्हते. त्यामुळे तर आहे ही वस्ती
सोडून जाण्याचीही भीती सर्व माणसांच्या मनात होती.
तो आपल्या जोडीदारासोबत एके रात्री एका गुहेत गेला
होता. तेथे जग कसे जळाले याचे समूळ हादरवणारे प्रात्यक्षिक त्याने पाहिले होते. त्यानंतर
तो कधीच तिकडे फिरकला नव्हता आणि आता ती आठवणही
विसरून गेला होता.
घुशींचा तर वस्ती सोडायचा काही प्रश्नच
नव्हता. बाहेरच्या उजाड जमीनीवरची मातीच त्यांच्या शरीराची लाही लाही करे. काय
होते त्या मातीत हे त्यांना माहित असायचे काही कारणही नव्हते. त्या एके काळी तिकडे
फिरकल्याच तर परत वेगाने जीवापाड धडपड करत वस्तीकडे परत येत आणि बिळांत घुसत. काही
काळात त्वचेवर लाल फोड येऊन त्या मरत. अर्थात त्यालाही आता खूप काळ उलटून गेला होता.
आता माणूस काय किंवा घुशी काय, कोणीही वस्तीबाहेर
जायचे धाडस करत नव्हते.
असे का या प्रश्नाचे उत्तरही हे जग विसरून गेले होते.
ही वस्ती हेच त्यांचे वस्तीस्थान होते. येथेच खाद्य होते. येथेच तहान भागवू शकेल
असे रक्त होते.
मग ही वस्ती सोडून जाणे त्यांना कसे शक्य होते?
आणि कोठे काय आहे हे तरी त्यांना कोठे माहित होते?
असाच कसलातरी शब्दात बसू शकत नसलेला विचार करत तो
लवंडला. हा हा म्हणता गाढ झोपी गेला.
कधीतरी त्याला अचानक जाग आली. डोळ्यावर कसला तरी
प्रकाश पडला होता.
ही दिवस होण्याची वेळ नव्हती आणि असली तरी त्याच्या या
गुहेत दिवस झाला तरी कळायची सोय त्याने ठेवलेली नव्हती.
त्याने डोळ्यांवर हाताचा आडोसा धरत पाहिले.
एक विलक्षण प्रकाशाची भिंत त्याच्या दारावर उभी
होती. तो ताडकन उठून बसला. प्रकाशाच्या भिंतीत त्याला काहीतरी सळसळतांना दिसले. जसे
त्याला बोलावत होते. तो संभ्रमित अवस्थेत काही काळ पाहत राहिला.
मग झोपेचा अंमल झटकून अनाहूतपणे तो उठला आणि त्या
प्रकाशभिंतीतून पार होत बाहेर आला.
·
३
तो बाहेर आला आणि बाहेरच्या स्वच्छ प्रकाशाने त्याचे
डोळे दिपले. काही क्षण काहीच दिसेनासे झाले. डोळे चोळून त्याने प्रकाशाला दृष्टी
सरावण्याचा प्रयत्न केला. पण ते एरवी दिसायचे ते जग नव्हतेच.
त्याने पुन्हा पुन्हा डोळे चोळले.
पण काही केल्या दृश्य बदलायला तयार नव्हते.
त्याला ते विलक्षण जग दिसत होते जे त्याने कधी
पाहिलेच नव्हते. तो त्या दृश्याने अचंबित झाला. हिंस्त्र, रानटी चेह-यांची बायामाणसे आणि भुकेने
वखवखलेल्या पोराटोरांचे आणि हिंस्त्र घुशींनी भरलेले त्याचे जग होते.
वस्तीत कधीकाळी म्हणे जिवंत पाण्याची एक नदी होती पण
तिचे पात्र आता घुशीन्च्या सांगाड्यांनी भरलेले होते. तीत कधीकाळी जिवंत पाणी वाहायचे असे त्याचा मान
लुळी झालेला आणि चेहरा आणि दंडाचे मांस जीव नसल्यागत लोंबकळत आलेला त्याच्यासोबत
राहणारा एक दृष्टीहीन म्हातारा त्याला सांगायचा.
आता जिवंत पाणी म्हणजे काय हे कोणा लेकाला माहित
होते? त्या म्हाताऱ्यालाही माहित नव्हते. आता पाणी दिसे पण ते विषापेक्षा कमी
नव्हते. सारेच ते टाळत असत.
मग म्हातारा म्हणायचा तशी ही नदी घुशींच्या
रक्तासारखी रक्त घेऊनच वाहत असावी असे त्याला वाटे. मग मात्र त्याला आल्हाददायक
वाटायचे. अशा नदीशेजारी फक्त आपणच आहोत आणि प्यायला मनसोक्त रक्त आहे याची कल्पनाच
किती मोहक होती!
एकदा कधीतरी घुशींच्या शिकारीच्या वेळेस त्या म्हाताऱ्याचे
डोळे आक्रमक घुशींनी खाल्ले होते. नाक चावून ओरबाडले होते. त्याचा एक हिस्सा तसाच
लोंबकळत राहिल्याने विचित्रच दिसायचा म्हातारा. त्याचे म्हणणे हा तरीही हा ऐकून
घ्यायचा. कारण हाही त्याच्या कामाचा होता.
कारण आंधळा असला तरी तो नुसती चाहूल जरी लागली तरी
घुशींवर असे नेम धरून दगड मारायचा की दोनेक घुशी तरी मरायच्या.
तो त्या म्हाताऱ्याच्या कौशल्यावर बेहद्द खुश होता.
तो मारे तेवढ्या घुशींचे अन्न दोघांनाही पुरे.
पण नंतर तो कधी मेला हेही त्याला आता आठवत नाही. एक आठवते ते हे की
त्यानेच त्याचे प्रेत आपल्या गुंफेबाहेर घुशींना भूक भागवण्यासाठी म्हणा कि प्रेताची
विल्हेवाट लावण्यासाठी म्हणा निर्विकारपणे फेकून दिले होते.
तो त्याच्या झोपडीत उजेडाचा एक कवडसाही येणार नाही
याची काळजी घेत भोवतालच्या जगाला त्याच्या नशीबावर सोडून देत जमीनीखालच्या निवाऱ्यातील
घुशींच्या आवाजांच्या सहवासात आणि अंधाराच्या आडोशात क्षणाक्षणाने आपले विचारशून्य
आयुष्य जगत बसला होता.
दुर्गंधीची सवयच एवढी झालेली कि त्याशिवाय जगण्याची
तो कल्पनाच करू शकत नव्हता.
विचारांचीच शून्यता असल्याने काळ वेगात जातोय कि हळू
याचीही पर्वा उरलेली नसायची.
बाहेर दिवस आहे कि रात्र, आपण जीवंत आहोत कि मेलोत
याचेही त्याला भान नसायचे.
आणि आज अवचित जे अकल्पित दृश्य त्याला दिसले त्याने
अचंबित झाला.
एवढा कि आपण खरेच हे पाहतोय कि हा एक भास आहे असा
प्रश्न त्याला पडला.
त्याच्यासमोर जे काही होते ते अनपेक्षित होते.
चिरपरिचित
सवयीचा वास नसलेले हे कोणते जग होते?
त्याने
हुंगले. स्वच्छ हवा त्याचा जीव कासावीस करू लागली.
छे.. ही आपली
सृष्टी असूच शकत नाही!
समोर एके काळच्या शहराचे मातीत गाडलेले उध्वस्त
ढिगारे किंवा पुंजक्यानी दाटलेल्या कोंदट बंदिस्त झोपड्या नव्हत्याच. ना घुशींची
शिकार करण्यासाठी धावणारी वखवखलेली बुभुक्षित झुंड होती कि वयोवृद्ध आणि बालकांचे तहान-भुकेचे
आक्रोश होते.
समोर एक विलक्षण दृश्य होते. त्याने कल्पनेतही कधी न
पाहिलेले.
समोर चक्क लुसलुशीत आणि सुखद वाटणाऱ्या अनाम रंगाचा गालिचा
घातलेला होता. उतार जेथे संपत होता तेथे कोणी
विचित्र आभाळी रंगाची रेषाच काढली असावी असा कसला तरी कधी न पाहिलेला
प्रवाह आपल्या आपल्या मस्तीत वाहत होता.
हवेचा स्पर्श कधी नव्हे एवढा सुखावून गेला. पण त्यात
असे शिरशिरी भरवणारे काय होते? त्याला माहित नव्हते. आकाशात कसलेतरी जीव उड्डान
भरत होते. चार पायांच्या उंच आणि वेगळेच
रंग असलेल्या प्राण्यांचा
एक कळप गवतात शिस्तीत मनमुक्त पायाला जे लूसलुशीत वाटत होते ते निवांत खात होता.
कोठे भय नव्हते. कोलाहल नव्हता. बुभुक्षिततेचा दर्प नव्हता. जी होती ती अपार शांती. आणि
त्याने क्षितीजाकडे पाहिले तसा तो अजून विस्मित झाला. क्षितिजावर डोळे दिपवणाऱ्या प्रकाशाची
पार आभाळात घुसलेली भिंतच उभी होती जशी.
हे काय आहे?
कोठे आलोय मी?
त्याने डोळे चोळले. स्वत:ला चिमटा घेतला.
पण दृश्य काही बदलले नाही.
तो खुळावला पण तेवढ्यात एक इवला प्राणी त्याला ढुशी
देत तेथून पळाला. अर्थात त्या घुशीपेक्षा मोठ्या प्राण्याला ससा म्हणतात हे त्याला
माहित असायचे कारण नव्हते, पण त्या अनपेक्षित धक्क्याने त्याचा अंमळ तोल गेला हे मात्र
खरे.
तो स्वत:ला सावरत त्या धावत्या इवल्या प्राण्याकडे
डोळे फाडून पाहतच राहिला.
आता आकाशात काही उडू शकते याची त्याचे जग कल्पनाही
करू शकत नव्हते.
त्याने पुन्हा आपले परिचित जग दिसेल या आशेने मागे
पाहिले. पण वस्तीतली ती शिकारी झुंड वस्तीसाहित कोठे तरी गायब झालेली होती. उरले
होते कसलेतरी आच्छादन घातलेले विस्तीर्ण मैदान.
आपले जग नाही या जाणीवेने आता मात्र तो बावरून गेला.
त्याला अगदी एकाकी वाटू लागले.
ते जग निर्दय होते हे खरे पण परिचित जग कितीही
विनाशकारी असले तरी प्रियच वाटते ना?
मग ते एवढे चिरपरिचित जग आता अचानक गेले तरी कोठे?
हे काय आक्रीत दिसतेय?
त्याला काही कळेना.
बरे हे स्वप्न म्हणावे तर त्याच्या स्वप्नात घुशींची
शिकार, त्यांचे शेवटी रक्तबंबाळ होत अंग टाकणे आणि त्याचा उन्मादी आकांत सोडले तर
दुसरे काहीही आजवर आलेले नव्हते.
मग हे काय आहे?
आपल्याला पिरीया रोग तर झालेला नाही ना? मग हे भ्रम
कसले?
तो बधीर होऊन मटकन खाली त्या मुलायम हिरव्या गवतावर बसला.
हा सुखद स्नेहल स्पर्शानेही तो बावरून गेला.
काय म्हणतात याला?
त्याला तेही माहित नव्हते.
त्यांच्या जगातून आता हे शब्द आणि त्यांचे अर्थ बाद
झालेले होते. पण त्याला जेही म्हणत असतील त्या घुशीच्या लांबलचक शेपटांसारख्या गवतातून
डोके वर काढणारी कसलीतरी वेगवेगळ्या रंगांच्या झुली घातलेली विचित्र झुडुपेही त्याला
दिसली.
हा उतार होता...खाली खोल कोठेतरी जाणारा. आधी काय
होते येथे बरे? हो...मेल्या घुशींच्या हाडांचे ढीग...आणि तो ढीग एवढा मोठा होता की
त्यापार काय आहे हे समजूच नये. आणि ते समजावे ही त्याची कधी गरजही नव्हती.कोणती
उत्सुकताही नव्हती. काही कामही पडले नव्हते.
त्यापार पहायची त्याच्यात किंवा कोनात इच्छांही उरली
नव्हती.
पण ते आता कोठेतरी अदृश्य झाले होते...
किंवा कोणीतरी गिळून टाकले होते.
त्याने पुन्हा पुन्हा डोळे चोळले...पण ते गूढ
वाटणारे, संमोहित करणारे दृश्य बदलले नाही. तो उठला आणि एखाद्या स्वप्नभूल
पडलेल्या माणसाच्या धुंदीत हे काय हे पहायला पुढे पुढे अनाम उत्सुकतेने चालू
लागला.
ते जग त्याला एकीकडे हवेसेही वाटत होते आणि नकोसेही.
कारण ते त्याच्या संपर्कात कधी आलेलेच नव्हते.
समोरची ती निळी रेघ रुंदावत चालली होती. त्यातील जिवंत
पाण्याचा वाहताना होणारा आवाज घुशींच्या
चित्कारांपेक्षा मनमोहक वाटत होता. त्यात मांस ओरबाडले जाणाऱ्या माणसांचा
आक्रोश नव्हता. एक मनाला दिलासा देणारा एक अनाहत नाद होता.
तो वेडावून गेला.
तो त्या भावनोद्रेकात उतारावरून धाऊ लागला. हात
उभारून. असम्बब्ध किंचाळत. आणि तो त्या
प्रवाहाच्या काठावर आला.
तो प्रवाह अनाहत निनाद करत वाहत होता. त्यात चक्क
जीव पोहत होते. म्हणजे तो म्हातारा म्हणे तसेच हे जिवंत पाणी होते.
भीती वाटत असली तरी त्याने आपले हात त्या
प्रवाहापर्यंत नेले.
अनंत क्षण विचार करून मोहात पडल्याप्रमाणे आपले हात
त्या प्रवाहात बुडवले.
शरीरात एक सुखद अनुभूती सरसरत गेली. तो त्या
स्पर्शानेच वेडावून गेला. हाताला होणारा स्पर्श स्नेहल आणि मुलायम होता. त्याला
जसा समर्पणाचे निमंत्रण देत होता.
त्या सुखद संमोहनात तो एवढा गढून गेला की जसा तो
एखाद्या अद्भुत जगात आलेला होता आणि तेथून कणभरही हटण्याची त्याची इच्छा नव्हती.
हे पाण्यात पोहणारे वेगळ्या वेगळ्या रंगाचे
जीव म्हणजे मासे आहेत हे त्याला माहित असण्याचा कधी प्रसंगच आलेला नव्हता. असे
नितळ पाणी आपल्या जगात असू शकते याची कल्पना करणेही त्याच्याच काय सर्व उरल्या
सुरल्या माणसांच्या कुवतीबाहेरचे होते.
पण प्रकाश बदलला तसा तो भानावर आला.
म्हणजे हा नेहमीचा अंधारी प्रकाश नव्हता.
तो तेजाने भारलेला मावळतीचा संकेत देणारा सोनेरी
प्रकाश होता.
हेही त्याच्यासाठी अद्भुत होते. तो अनिमिष नेत्रांनी
क्षितिजे तेथे टेकत होती तेथील माहित नसलेल्या आणि कधीच न पाहिलेल्या रंगांच्या
आविष्कारांकडे पाहत राहिला. त्याची वस्ती कोठेही दिसत नव्हती. क्षितिजापर्यंत
पसरलेले प्रदेश आणि त्यापार धूसर दिसणारी क्षितिजाची रेघ.
आणि त्याला एखादे अभद्र स्वप्न पडावे तशी त्याच्या
जागत्या आयुष्यातील एक आठवण आली.
तो हतबुद्ध होऊन त्या नदीच्या खळखळत्या प्रवाहाकडे
अनिमिष नेत्रांनी पाहत स्वत:शीच वेडावत हे सत्य कि ते सत्य याच्या विचारांत गुंगून
गेला.
छे...धरती कशी जळाली असेल? जळाली तर मग हे काय आहे?
ती जुनी आत उरात दडपून टाकलेली आठवण उमदळून वर आली.
आपली मान खेदाने हलवून ‘नको आता ती आठवण’ असाही जीवाच्या
आकांताने पुकारा केला.
पण ते खरी असो की खोटी, विसरला असेल किंवा ते कधी
घडलेच नसेल ती आठवण तरळून गेलीच...
·
४
त्याच्या जोडीदाराने त्याच्या कुशीत कोपर
मारले तसा तो जागा झाला होता.
“शिकार? कोठे?’ अभावितपणे त्याने विचारले होते.
तसा त्याचा जोडीदार उठून बसला आणि त्याचा हात धरून
त्याला खेचू लागला.
तो का बोलावतो आहे हेच त्याला कळेना कारण ना कोणा
घुशीचे ना कोठे मानवी झुंडीचे चित्कार होते.
होती ती नियतीशरण गाढ शांतता. बाहेरही अंधार असणार.
पण त्याचा जोडीदार तरीही त्याला विचित्र आवाज करत खेचतच राहिला.
शेवटी तो उठला आणि त्याच्या सोबत बाहेर आला.
निष्पर्ण आकाशात कुजकट प्रकाशाचे इवले ठिपके होते.
वस्तीतील माणसे आणि जमीनीखालच्या घुशी जशा गाढ झोपी गेल्या होत्या.
बाहेर पडताच त्याचा जोडीदार वस्तीबाहेर जाणाऱ्या
वाटेने निघाला.
कशासाठी हे सारे? पण ते विचारायलाही त्याला शब्द
सुचले नाही.
तो विरोध करत असतानाही जोडीदाराने त्याला बरेच दूर
नेले.
इतके की त्याचे पाय दुखू लागले.
शेवटी एका उतारावरून तो धाऊ लागला. हाही ठेचकाळत धावला.
तो अचानक एका कातळासमोर थांबला तसा हाही थांबला.
अंधारात तो कातळ धूसर प्रकाशातून कोरून काढलेल्या
अवाढव्य घुशीसारखा दिसत होता.
तो घाबरला.
दोन पावले मागे सरला.
त्याचा जोडीदार वाकला. काहीतरी हातात धरले. दोन्ही
हात जवळ आलेले त्याने पाहिले. दोन पथ्थर एकमेकांवर आपटल्याचा आवाज त्या गहन शांतीत
त्याला घुशीच्या पंजाने ओचकारावे तसा ओचकारून गेला.
आणि त्याला आभाळात तरंगत होत्या तशा ठिणग्या उडाल्या
आणि विझुनही गेल्याचे दिसले. तो घाबरून मागे सरकला. आपला जोडीदार पूर्वज सांगायचे
तसा राक्षस तर नाही ना?
पण जोडीदार काहीतरी उत्साहाने बडबड करत ठिणग्या
उडवतच राहिला.
आणि काही वेळाने तेथे प्रकाश झाला.
त्या प्रकाशात आनंदाने वेडावलेला आणि त्याच्याकडे
पाहत विचित्र हातवारे करणारा जोडीदारही त्याला दिसला.
तो घाबरला. पळून जायला त्याने पाय उचलला पण
जोडीदाराने त्याला एका झेपेत थांबवले.
“नको...” तो आग्रहाने म्हणाला. “बघ...” आणि त्याने
एका काठीवर तो प्रकाश उचलला आणि पुढे पहायला सांगू लागला.
आता पुढे कातळ नव्हता तर कातळातील एक मोठी भेग होती.
घुशीच्या बिळापेक्षा कैक पटीने मोठी. जोडीदाराने त्याला पुढे ढकलले आणि स्वत:ही तो
प्रकाश धरून आत आला. त्या उजेडात त्याला चित्रविचित्र आकार दिसले. अर्थ समजला
नाही.
त्याने मध्येच थांबून बावळटासारखे जोडीदाराकडे
पाहिले. जोडीदाराने त्याला पुढे चालायचा इशारा केला आणि उन्माद्ल्याप्रमाणे
स्वत:ही चालू लागला.
जशी त्याला येथे आयती शिकार मिळालेली होती.
आता तो पुढे होता. झपाटल्यासारखा धावू लागला होता.
तोही प्रकाश पळून जाईल या भीतीने त्याच्या मागे धावत राहिला.
तो अचानक थांबला. येथे फार मोठी पोकळी होती. वरून
कसलेतरी थंड थेंब पडत होते. पण ते विखारी नव्हते.
आपला जोडीदार एकटाच काहीतरी शोधत भटकत असतो हे
त्याला माहित होते, पण हे अजब ठिकाण त्याने शोधले आहे...एवढेच नाही तर त्याला
प्रकाशही बनवता येतो या ज्ञानाने तो जोडीदाराकडे अजब आदरभावनेने पाहू लागला होता.
पण जोडीदार कोठेतरी पाहत होता आणि त्याला हाताने
खुणावत होता.
आता काय पहायला मिळते या बावरल्या जाणीवेने तो
त्याच्यासोबत काही पावले चालला. जोडीदाराने प्रकाश समोरच्या भिंतीकडे धरला.
तो घाबरून दोन पावले मागे सरला.
समोर जे दिसले ते त्याला हादरा देऊन गेले होते.
त्या प्रकाशात त्याला एक मानवाचे चितारलेले रंगीत
चित्र दिसले. पण तो मानव आहे हे तो त्याला चेहरा आहे, हात आहेत आणि पायही आहेत
यामुळे ओळखू शकला. स्तन दिसत नसल्याने आणि कंबरेचा आकार घाटीव नसल्याने ती स्त्री तर
नक्कीच नव्हती. कशानेतरी त्या मानवाचे शरीर आच्छादलेले होते. चित्र रंगीत होते.
जणू तो कोणी माणूस जिवंत होता...सारी भिंत व्यापण्याएवढा मोठा होता.
जोडीदाराने त्याचा हात अनावर उत्साहाने हातात घेतला
आणि त्या चित्राच्या छातीवर ठेवला. एका क्षणात जशा अगणित घुशींनी त्याचे चावे
घेतले.
पण त्यात जोरदार धक्का होता...शरीरातून काहीतरी वेगात
धावले होते.
आणि त्याच्या भ्रमित मनाला दिसले एक दृश्य.
काहीतरी आकाशातून भेसूर प्रकाश ओकत जात होते. मग
त्याला दिसले ते भयानक स्फोट. कान बधीर करणारे. मग त्याला दिसले ते वेदनांनी
आक्रोश करत धावणारे आणि पेटलेले मानव. त्यात स्त्रिया होत्या...माणसे होती...मुलेही
होती....त्यांच्या किंचाळ्या भेदरवनाऱ्या होत्या. आणि पाहता पाहता त्यांची शरीरे प्रकाश
बनत मग काळी होत कोसळली.
मग देह प्रकाशात अदृश्य झाले.
उरले ते भेसूर सांगाडे. आणि तेही सावकाश धुळीला
मिळाले.
काहीतरी उंच झेपावणारे कल्पनेतही न बसणारे बांधकाम
कोसळतानाही दिसले.
त्या कर्कश्य आवाजांनी त्याचे कान बधीर होऊ लागले.
मग आकाश. सर्वत्र डोळे फाडणारा प्रकाश....आभाळालाही भेसूर प्रकाशात बदलवनारा
प्रकाश...अगणित घुशींनी एका स्वरात विव्हळावे तसा आक्रोश....मग धरती....काळीसहार
बंत गेली....आकाशातून विखारी पाउस सुरु झाला आणि मग सर्वत्र अंधार....
म्हणजे धरती अशी जळाली होती?
जोडीदार त्याला हे तर सांगायचा प्रयत्न करत नव्हता
ना?
हे कोणते जग होते?
काय अर्थ होता त्याचा?
की धरती कशी जळाली याचे भेदक चित्रण होते?
आणि ते कोणी केले?
का?
तो बधीर होऊन खाली बसला.
हे काय आहे हे त्याच्या समजेच्या बाहेरचे होते. माणसे...जनावरे
धूळ बनत असताना आणि धरती काळी होत असताना पाहूनही त्याला काही वाटले होते अशातला
भाग नाही. त्याला हा धक्का देणारा काहीतरी चमत्कार वाटला होता. त्रास देणारा
चमत्कार. आत कोठेतरी खोल गाडलेले भूत अकस्मात सामोरे यावे तसा.
हा भासच असला पाहिजे. त्याने डोळे घट्ट मिटले.
तोच त्याचा जोडीदार त्याला उठवत म्हणाला होता...
“हे...झालेले...घडलेले ...कधी झाले?....पहा...”
त्याने कानांवर हात ठेवत घाबरून किंचाळ्या फोडत त्या
घोर अंधारात धाव घेतली होती.
बाहेर आला तेव्हा तो गुढगे टेकून खाली बसला आणि
दोन्ही हात फैलावून आभाळाकडे पाहत वेडसर किंचाळत बसला.
त्याचा जोडीदार जरा वेळाने बाहेर आला. त्याला हलवून
शांत करण्याचा प्रयत्न केलां. वस्तीत असे कोणी कोणाला करत नसे. हेही अजबच होते. पण
त्याला त्या क्षणी बरे वाटले होते हेही खरे.
दोघे परत निघाले. त्याची बधीरावस्था काही दिवस टिकली
आणि तो काही काळातच ती रात्र विसरूनही गेला.
जशी ती कधी घडलीच नव्हती.
त्यात नंतर काही दिवसांत घुशींच्या हल्ल्यात त्याचा
जिगरबाज जोडीदार मेला होता.
आता तो त्यालाही विसरला होता.
पण आता त्या प्रवाहात हात घालू पाहत असताना ती गाडून
टाकलेली आठवण झेपावत वर आली होती हे मात्र खरे.
हा प्रवाहही त्या रात्री गुहेत पाहिले तसे कोणतेतरी
अकल्पनीय भ्रम तर नव्हते ना?
पण या भ्रमाने त्याला वेडावून टाकले हे खरे.
कसल्यातरी अनावर ओढीने तो उठला आणि पाण्यात पाय
टाकला. मासोळ्या त्याच्या पायांना गुदगुल्या करत दूर पळाल्या. तो त्या विचित्र जलचरांच्या
स्पर्शाने घाबरला. जास्त वेगाने पाण्यात पाय रोवत पुढे चालू लागला.
तो जसा चालत गेलं तसतसे पाणी छातीला टेकले. पाण्याची
ओढ एवढी की त्याला वाटले पावले तळाचा आधार सोडतील. तो बावरला...वेगाने चालायचा
प्रयत्न करू लागला. पाण्याची उंची कमी झाली. तो पैलतीरी पोचला. मागे पाहिले. दुष्य
बदलले नाही.
आपण आलोत तरी कोठे?
जोडीदार आज असता तर कदाचित त्याने याचाही काही अर्थ
लावला असता.
पण तो तर त्या प्रकाशलोटात नाहीसा झाला होता ना! आता
कोठून येणार होता तो परत त्याला जे दिसतेय त्याचा अर्थ समजावून सांगायला?
तो काठावर आला. त्यालाच अस्वस्थ वाटले. त्याच्या
शरीरावरील छातीखालची रक्ताची आणि मातीची पुटे धुउन गेली असल्याने त्याला आपण नागडे
झाल्यासारखे वाटले. त्याने त्या शरीरावरून हात फिरवला. आताच स्पर्श त्याला जिवंत
असल्याची तीव्र जाण देणारा होता.
तो अस्वस्थपणे आपल्या आता काही स्वच्छ झालेल्या
त्वचेकडे असहायपणे पाहत राहिला.
मग त्याने क्षितीजाकडे पाहिले आणि त्याला पुन्हा ती
प्रकाशाची भिंत दिसली.
हिच्या पल्याड काय असेल?
त्याने त्वचेचा नाद सोडला आणि कधी न वाटलेल्या अनावर
कुतूहलाने त्या दिशेने वेगाने चालू लागला.
·
५
तो
प्रकाशभिंतीजवळ येत होता तशी ती भिंत मागे मागे सरकत होती. जणू तो काही तिची
शिकारच करणार होता. तो थकू लागला होता. पायातून पेटके येऊ लागले होते. पण का नकळे
अनावर कुतूहलाने तरीही तो धावत होता. काहीही करून त्याला त्या भिंतीच्या पल्याड
काय आहे हे पहायचे होते.
जे
त्याने गुहेत पुढे पहायचे टाळले होते जणू तेच येथे असणार होते...
प्रकाशाचा
आगडोंब आणि जळणारी माणसे...जळलेली धरती.
पण
एकीकडे अनावर भय वाटत असले तरी आता त्याला त्यापासून दूर पळून जायचे नव्हते...त्या
आगडोंबाचा सामना करायचा होता. त्यालाही त्या दिव्य प्रकाशात होरपळत धूळ व्हायचे
होते.
जळून
जायचे होते...जळणे म्हणजे काय हे माहित नसले तरी!
पण
ती भिंत जसा तो पुढ सरकत होता तशी ती मागे जात होती.
हे
काहीतरी आक्रीत आहे हे त्याला कळू लागले होते.
नाहीतर
एवढी चिर-परिचित वस्ती अशी कशी दिसेनाशी झाली असती? नाही का? हे पायाखाली मऊ वाटले
तरी जमिनीला उगवावे तशा केसांसारखे काय होते? ते घुशीन्सारखे न दिसणारे ते विचित्र
प्राणी कोण होते?
ते
पाणी एवढे मउसुत कसे? दाह करणारे विषारी का नव्हते?
तो
थबकला तशी ती प्रकाशभिंतही थबकली.
तो
अवाक झाला.
हारलेल्या
माणसाप्रमाणे खाली बसला. गुढग्यात मान खुपसली. दोन्ही हातांनी डोळे चोंभाळले.
पुन्हा पाहिले. ती प्रकाशाची भिंत स्तब्ध उभी होती. तो खाली आडवा पडला. वर शुभ्र
कोवळे निळसर आभाळ होते जे त्यानेच काय त्याच्या वस्तींवाल्यांसकट त्याच्या अज्ञात
पुर्वजांनीही कधी पाहिलेले नव्हते.
आपण
मेलेलो असावेत...नाहीतर आपल्याला पिरीया रोग झाला असावा. नाहीतर ही असली दृश्ये
आपल्याला का दिसली असती?
आणि
कोठेही कोणी माणूस का नाही दिसत?
या
प्रश्नाने मात्र त्याला हादराच बसला.
घुशी
नाहीत...बुभुक्षित माणसे नाहीत...कोणी नाही...फक्त कधी न पाहिलेले प्राणी आणि
वनस्पती...
आपण
हे कोणते जग पाहत आहोत?
पृथ्वी
जळाली त्याच्या आधीचे की नंतरचे?
त्याला
काही समजेना.
तो
थकून आडवा पडला. ग्लानी येऊन डोळे बंद केले. त्याला वाटले नको हे जग. यात घुशी
नाहीत. वखवखलेली माणसे नाहीत. दोन रंगांचे जग त्याला पुन्हा हवे होते.
हे
वेगवेगळ्या रंगांचे आणि असे कसलाही उग्र दर्प नसलेले जग नकोसे वाटले त्याला.
आपण
आता आपल्या जगात जागे होऊ.
घुशींचे
चिरपरिचित आवाज ऐकत...बिळाखालून जात असताना आपण झटकन हात आत घालून वर घेऊ...तिचा
गळा आवळून आपले दात तिच्यात रोवत शांतपणे तिचे रक्त पिऊ आणि मग मांस खाऊ....अशाच
जगात जाग येऊ दे अशी विनवणी करत डोळे बंद करून तो पालथा पडला.
आता
काही पहायची त्याची इच्छा नव्हती.
पण
त्याला जाग आली ती मानवी पोरांच्या हसण्याने...बोलण्याने आणि एकमेकांवर केलेल्या
ओरड्याने.
त्त्याने
डोळे उघडून पाहिले. ती प्रकाशभिंत आता तेथे नव्हतीच. होता तो आडवा पसरलेला कातळ.
आणि त्या कातळाखालच्या जमिनीवर एका डोहात खेळणारी मुले....आणि त्या कातळातून त्या
डोहात अविरत कोसळणारा एक पाण्याचा झरा....
या
विषारी पाण्यात ही पोरे कशी? तो हात टेकून उठला...आवेगाने कातळाच्या काठावर आला
आणि ओरडला...
“जा...मरण...सगळे
जा...”
त्याचा
विचित्र आवाज येताच पोरांनी वर पाहिले. त्याच्या विद्रूप नागड्या देहाकडे पाहताच ती
घाबरली आणि ओरडत पाण्याबाहेर पळाली. काठावर काही विचित्र पडलेले होते. त्यांनी ते
घाईने अंगावर घातले आणि दूर पळत सुटली.
ते
तसेच आच्छादन होते जसे त्याने त्या गुहेत लोकांच्या अंगावर पाहिले होते.
ही
पोरं या पाण्यात मेली नाही. तोही पाण्यातून चालत आला होता आणि तोही मेला नव्हता.
म्हणजे
येथील पाणी मारणारे नव्हते. हे जिवंत पाणी
होते. त्याला आपली चूक लक्षात आली आणि तो आपल्या मूर्खपणावर जाभाड विस्कटून हसला.
पण
येथे माणसे होती.
म्हणजे
घुशीही असणार होत्या.
घुशिंची
आठवण येताच त्याच्या पोटातील भुकेची आग भडकली. घुशी शोधाव्या लागणार होत्या.
खबरदारी म्हणून त्याने त्या कातळावरचे सुटे अणकुचीदार दगड उचलले. आता तो समाधानी
झाला आणि मुले ज्या दिशेने पळाली होती त्या दिशेने चालू लागला.
एखादीतरी
घूस मिळाल्याखेरीज त्याचे चित्त शांत होणार नव्हते.
तिचे
रक्त पिल्याखेरीज तहानही भागणार नव्हती.
पण
त्याचा घसा पिण्यासाठी व्याकुळला होता.
हे
जिवंत पाणी पिऊन पहावे?
तो
धीर धरत ओहोळाजवळ आला.
काही
वेळ तो त्या इवल्या लाटा उधळत वाहणार्या पाण्याकडे हपापल्यासारखा पाहत राहिला.
मग
तो वाकला. आडवा झाला. पाण्याला त्याने तोंड भिडवले. तो थंड स्पर्श त्याच्या अंगावर
अनामिक शहारे उठवत गेला.
त्याने
खूप धाडस करून पाण्यात ओठ घातले आणि एक घोट तोंडात घेतला.
मचूळ
होता तो. अगदीच असहनीय.
घुशीच्या
रक्ताची आठवण जास्तच उमदळून वर आली.
त्याने
तो घोट तिरस्काराने थुंकून टाकला.
मग
आवेगाने उठला आणि तो त्या वाहत्या ओहोळाच्या काठाने जात राहिला.
पाण्याचे
संगीत त्याच्या कानांना त्रास देत असले तरी तो इकडे तिकडे पाहत घुशींचे वास्तव्य
कोठे दिसते काय हे शोधत होता.
काही
अंतर गेल्यावर मोठी झाडे दिसली. पार आभाळाला भिडणारी. तो अचंबित होऊन पाहत राहिला.
हेही काहीतरी अजब होते. पण भुकेची आणि तहानेची जाणीव होताच ते आश्चर्य तेथेच सोडून
तो पुढे निघाला.
नंतर
ओहोळाच्या दोन्ही बाजूंनी काही लोक मोठी जनावरे पुढे ठेवत शिस्तीत काहीतरी
जमीनीच्या उरात खुपसत काम करताना त्याने पाहिली. ते पाहून तो चित्कारलाच.
लोकांनी
चमकून त्याच्याकडे पाहिले.
त्यांच्या
चेहऱ्यावर आधी भीती तरळली. मग त्याच रुपांतर रागात झाले. त्यांनी ढेकळे उचलून
त्याच्या दिशेने भिरकावली. त्याला काही लागले नाही पण त्याने प्रतिक्षिप्त
प्रतिक्रिया म्हणून हातातील दगड त्यांच्या दिशेने भिरकावले.
त्याचा
नेम अचूक लागला. दोन माणसे भोवंड येऊन कोसळली. बाकीची ओरडत पळत सुटली.
हाही
ओहोळाच्या पल्याड उडी घेत वाकडा-तिकडा पळत सुटला आणि उंच झाडांची गर्दी ओलांडत आला
तो एका वस्तीत.
येथली
घरे सुबक होती. स्वच्छ होती. रस्ते होते. काही स्त्रिया आणि मुले अंगावर कसल्यातरी
विचित्र रंगाचे आच्छादन घेऊन वावरत होती. गलका होता. तो जरा बिचकला. चाल धीमी
केली.
त्याचे
लक्ष त्या बायांनी वेधून घेतले. आच्छादन असले तरी त्यांचे त्याआडचे स्तन आणि
कमरेखालचा घाटीव भाग पाहून त्याच्या वासना उफाळून वर आल्या. त्याचे लिंग ताठर
झाले. वासनांनी त्याच्या डोळ्यापुढे धुके दाटले आणि त्या भरात तो एका जवळ अंतरावरच्या
स्त्रीकडे धावला.
पण
त्याच्याकडे लक्ष जाताच बाया किंचाळू लागल्या, नजर फिरवत पोरांना बखोट्याला धरत
घरात घुसून धडाधड दारे बंद करू लागल्या.
यांना
काय झाले?
तो
भांबावून उभा होता तोच दहा पंधरा माणसांचा जमाव हातात काठ्या घेऊन त्याच्या दिशेने
धावत येताना दिसला.
“नागड्या...शरम
नाही वाटत?” ते ओरडत होते. आता शरम म्हणजे काय असते हेच त्याला माहित नव्हते. पण
हे आपल्याला मारायला येत आहेत हे लक्षात येताच तो उलट्या दिशने धाऊ लागला. पुन्हा
झाडीत आला.
वाट
सोडली आणि खडकांच्या दाटीत घुसला. सुरक्षित जागा सापडताच त्याने तेथेच बसकण घेतली
आणि श्वास नियंत्रित करत राहिला.
तो
दिसेनासा झाला तसे ते लोक आरडा ओरडा करत मागे वळाले.
याला
हायसे वाटले.
त्याने
सावध होत आजूबाजूला घुशीची चाहूल घेतली. बिळे दिसतात काय हेही पाहिले. पण तसे
काहीच सापडले नाही.
तहान
आणि भुकेने त्याचा जीव कासावीस होऊ लागला होता.
त्याचे
लक्ष खडकांपल्याडच्या झुडुपांकडे गेले. तो तिकडे धावला. काही झुडुपांवर गोल लालसर फळे
होती. पण त्यांचे काय करायचे हे त्याला सुचेना. तो तसाच आपण कोणत्या दळभद्री जगात
येऊन पडलो यासाठी शब्द नसलेल्या शिव्या-शाप देऊ लागला. आणि शेवटी निस्त्राण होऊन
खाली निपचित पडला.
त्या
बाया त्या आच्छादनाशिवाय किती मादक दिसत असतील याची कल्पना करून त्याने ताठरलेले
लिंग हलवले,पण भुकेने त्याला एवढे कासावीस केले की त्याच्यात पुढे लिंग हलवायचीही
शक्ती राहिली नाही.
तो
तसाच असहायपणे पडून राहिला.
तो
अंधार पडल्यावर उठला. हवा बर्फाळ वाटली. अंग शिरशिरत होते. काकडत त्याने आसपास
पाहिले. तो घाबरून गेला होता. इतक्या वेळा जाग आली तरी त्याला त्याचे जग मिळत
नव्हते. या भयंकराच्या तावडीत तो सापडला होता. जोडीदार असता आज सोबत कदाचित तर
त्याने याचाही अर्थ सांगितला असता. पण ते आपल्याला कळालेच असते असे नाही. काय
अनाकलनीय भाषा तो बोलायचा..
या
येथल्या माणसांसारखीच!
काय
खात असतील हे लोक?
रानात
बिळे करत होतेकी काय ते घुशींना शोधायला?
मग
आपल्यालाच घुशी का दिसत नाहीहेत?
तो
आकांतून उठला.
काहीतरी
निर्धार करून त्या वस्तीच्या दिशेने चालू लागला. सारे झोपले असतील आता. आपल्याला
खायला काहीतरी मिळेल.
आशेने
त्याच्यातला जोर वाढवला. तो वेगाने चालू लागला.
त्याला
मिणमिणता प्रकाश दिसला. ती वस्तीच्या कडेवरची झोपडी होती. त्याने त्याने तीच आपले
लक्ष्य ठेवली.
जवळ
आला आणि पाय पुढे टाकला तर काट्यांनी तयार केलेल्या कुंपणावर त्याचे पाय पडले.
वेदनांनी
तो कासावीस झाला.
पुढे
काही पावले जायचे तरी कसे हा प्रश्न त्याला पडला.
मग
त्याने निट चाचपून पाहिले. हातात काटे घुसले तरी हे हलवता येण्यासारखे आहे हे
त्याच्या त्याही स्थितीत लक्षात आले.
तो
कुंपणाच्या बाभळीच्या फांद्या हळूहळू हटवू लागला
तोच
त्याच्या कानावर एका कोंबड्याचा आवाज पडला.
आणि
त्या मागोमाग झोपडीतून प्रणयाच्या अत्युच्च क्षणी उठतात तसे स्त्री आणि माणसाचे
चित्कार कानी पडले.
आधी
खाद्य की आत घुसून त्या स्त्रीशी संभोग?
आधी
काय?
आधी
खाऊन घेऊ ताराचाप्ल्यात जोर येईल. त्याने वेगाने त्या फांद्या हटवल्या आणि आत
शिरला.
झोपडीबाहेर
सारे धूसर होते. पण त्या धुसरतेत त्याला अंगणातील अनेक अपरीचित वस्तू दिसल्या.
काही मोठ्या...काही छोट्या.
काही
क्षण तो भांबावून उभा राहिला.
मग
त्याला कोंबड्यांचा पंखांचा फडफडाट आणि झोपाळलेले कर्कश्य कलकलाटी आवाज आले.
घुशींचे
कोठे नामोनिशान नव्हते.
पण
किमान हे तरी खाद्य आहे...ते खाऊन पाहूयात असा विचार करत तो त्या आवाजांच्या
दिशेने झेपावला.
त्या
खुराड्यात कोंबड्या होत्या. त्याने दगड घेतला आणि त्यांची शिकार करायचा प्रयत्न
केला, पण त्याचा दगड कशावर तरी अडला. त्या आवाजाने कोंबड्या जास्तच कलकलाट करू
लागल्या.
तो
हताश होऊन स्तब्ध बसला.
आता
काय करायचे?
त्याने
मग हात पुढे करून दगड कोठे अडला याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला.
त्याचे
हात एका जाळीला अडले. काय असेल हे? त्याने चाचपडले. जाळीत एक बोट सहज आत घुसले. मग
त्याने सारी बोटे जाळीत घातली. सारी शक्ती पणाला लावली. ती जाळी ओढली.
खुराड्याचे
दार उपसुन हातात आले. आतील कोंबड्या पंख फडफडवत आवाज करत बाहेर पळू लागल्या.
त्याचे कौशल्य कामी आले. त्याने झडप घालून घूस पकडावी तशी एक उडती कोंबडी पकडली.
ती
चित्कारत, चोचीने आघात करत, त्याच्या हातातून सुटायचा प्रयत्न करत राहिली, पण याने
तिला घट्ट आवळले आणि तिच्या मुंडीत खच्चकन दात खुपसले.
रक्त
आले. तो ते चाखत अजून दात खोल्र रुतवू लागला...पण त्या रक्ताच्या चवीने त्याला
शिसारी आली. उलटीची भावना झाली. तत्क्षणी त्याने ती कोंबडी खाली फेकली.
“ह्या...”
तो तिरस्काराने उद्गारला आणि थुंकू लागला.
हे
कसले अजब प्राणी येथे?
घूस
कोठाय?
तोच
झोपडीचा दरवाजा उघडला आणि हातात प्रकाश घेऊन एक माणूस बाहेर आला आणि ओरडला...
“कोण
आहे रे तेथे?” आणि मग त्याने किंचाळी फोडली...”चोर...चोर...वाचवा....”
हा
आवाज येताच तो एवढा घाबरला की आल्या वाटेने परत पळत सुटला. अडखळला, पडला,काटेरी
फांद्यानी त्याला रक्तबंबाळ केले, वेदनांनी कहर केला, पण तो परत उठला आणि जीव घेऊन
धावत राहिला.
पण
वस्तीतून जातांना पाहता पाहता लोकांनी आपापल्या घरातून काठ्या घेत, बाहेर येत,
त्याला अडवायला सुरुवात केली. पण हा असा सुसाट धावला की तो कोणाच्या हाती लागला
नाही.
मागे
लोक त्याच्यामागे धावत येत हिंस्त्र ओरडा करताहेत आणि हा फक्त पिसाट धावतो आहे.
जशी
घुशीमागे आपली झुंड लागले किंवा माणसामागे घुशींची झुंड.
प्रकाशाची
ती भिंत कोठे आहे?
त्याने
काकुळतीने विचार केला. येथे त्याला कोणाचे भक्ष व्हायचे नव्हते.
माणसे
अजूनही त्याचा पाठलाग करत होती.
मला
ती प्रकाशभिंत हवी आहे. त्या पार माझा स्वर्ग आहे. घुशी आहेत. अन्न आहे आणि तेच
माझे पाणीही आहे. काळी असली, जळालेली असली तरी तीच माझी धरती आहे.
हे
जग राक्षसी आहे. येथली माणसे घुशीन्पेक्षा क्रूर आहेत.
तो
जीवाच्या आकांताने धावत राहिला. छातीचा भाता एवढा धपापत होता की जसा तो कधीही
फुटेल.
त्याने
तो कातळही ओलांडला जेथे त्याला या जगातली पहिली जाग आली होती.
त्याने
अंदाज घेतला. हीच ती जागा होती. पण तेथे प्रकाशभिंत नव्हती. काही नव्हते. दुर्गन्धीपेक्षा
भयंकर वाटणारी हवा आणि घाणेरडे आकाश.
तो
थबकला. असहाय झाला. ती प्रकाशभिंत नाही....त्याचे चिरपरिचित विश्व नाही....
पायातले
त्राण जसे जाऊ लागले होते.
त्याने
हताश बसकण मारली. त्या घुशीन्च्या अनंत शेपटांसारख्या लवलवत्या ओलसर गवतावर मस्तक
ठेवले.
त्याला
कधी रडणे माहित नव्हते...पण हृदयच एवढे भरून आलेले की तो ढसाढसा रडू लागला.
गलितगात्र
होऊन पाय पोटाशी घेत आभाळाकडे पाहत आकांत करू लागला.
“जिवंत
जग...हे मेलेले नको...” तो म्हणत होता.
ऐकायला
तेथे कोणी नव्हते. स्तब्ध शांत आणि थंड हवा आणि काळोखाने व्यापलेली धरती.
काळी
झालेली जमीन. कधीतरी जळून खाक झालेली. कोठे होती ती?
तो
भूक-तहान-श्रम याने पुरता गळून गेला होता.
त्याने
डोळे मिटले.
पाठलाग
करणारे कोठेतरी भलतीकडे भरकटले होते, एवढेच समाधान.
त्या
गहन अंधारात तो हरवून गेला.
तो
बेशुद्ध झाला.
किती वेळ गेला कुणास
ठाऊक.
अचानक त्याला
घुशींच्या चित्काराचे आवाज ऐकू येऊ लागले.
प्रथम दूरचे, मग जवळचे. त्याचे कान ताणले गेले.
हा आवाज... हा त्याच्या ओळखीचा होता. हा त्याच्या जगाचा आवाज होता.
हायसे वाटून तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागला.
तेवढ्यात त्याच्या
मानेवर एक तीक्ष्ण, जळजळीत
डंख बसला.
त्या वरून बनवलेल्या बिळाला
शोधणे घुशींना शेवटी जमले होते. त्यांनी त्यातून एकामागोमाग एक करून वर उसळी घेतली
होती.
त्यांना आजवर
बिनबोभाट वर उचलणारा वैरी त्यांच्या कचाट्यात सापडला होता.
तो त्या असह्य वेदनांनी विव्हळला.
एक मोठी घूस त्याच्या
मानेवर दात रोवून रक्त पीत बसली होती. तिचे तीक्ष्ण दात त्याच्या मांसात रुतले
होते. त्याचे वाहते गरम रक्त बाकीच्या घुशी जिभेने चाटत त्याच्या बाकी शरीरात आपले
दात घुसवू लागल्या होत्या.
त्याने हाताने घुशींना
झटकायचा प्रयत्न केला. पाय झाडले. पण घुशींनी आता त्याचा ताबा घेतलेला होता. त्या
अधिक त्वेषाने त्याचे मांस ओरबाडू लागल्या. त्याच्या शरीरातून वेदनांच्या असह्य लहरी
उमटत होत्या...
तो किंचाळत होता, पण
घुशी त्याला तीक्ष्ण दातांनी लुचत होत्या.
त्याचे मांस खात
होत्या.
त्याने शेवटची धडपड
केली.
सारा जोर लावला. एका
घुशीला खेचून काढले आणि तिच्या मानेत दात
खुपसले. तोंडाला तिचे जसे रक्त लागले तशी त्याला आपली तहान भागल्याचा संतोष हो
लागला. जशी त्याची समाधी लागली.
मग त्याला आपले शरीर आता
घुशींचे अन्न होते आहे यातही चिरंतन आनंद वाटू लागला.
काही वेळात बुभुक्षित
माणसांचे चित्कार येऊ लागले.
म्हणजे सकाळ झाली
होती. झुंड शिकारीसाठी सज्ज झाली होती.
चारी बाजूंनी घुशींचे
आणि माणसांचे चित्कार त्याचे बधीर होत असलेले कान फाडू लागले.
कसाही असो, शेवटी तो
त्याच्या प्रिय जगात आला होता.
त्याच्या शरीरावरचे मांस
लुचले जात होते आणि तो त्यात अपार सुख भोगत होता.
त्या जगातील
जगण्यापेक्षा या जगातील मरणे बरे...
एवढाच काय तो शेवटचा
विचार होता.
एका घुशीने त्याचे
नरडे करकचून चावले आणि त्याचे नि:शब्द विचार धूळ बनून कोठेतरी विलीन झाले.
·
No comments:
Post a Comment