महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील
एक अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला समृद्ध इतिहास लाभला आहे आणि आधुनिक
महाराष्ट्राची सामाजिक मानसिकता घडवणाऱ्या सामाजिक-सांस्कृतिक चळवळींमध्ये
महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र हा विविध प्रकारच्या जीवनदृष्टी
असलेल्या एका गुंतागुंतीच्या समाजाने व्यापलेला आहे. प्रत्येक जाती घटकाला काही
स्वतंत्र तर काही सामायिक इतिहासही आहे. असे असले तरी अनेकदा असे दिसून येते की, समाजातील प्रत्येक
घटक केवळ एकमेकांच्या विरोधातच उभा नाही,
तर तो परस्परांबद्दल द्वेष आणि आकसही
बाळगून आहे. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ही भावना उसळून येते आणि समाजात संघर्ष
निर्माण झालेलाही आपल्याला दिसतो. काही थोडके सामाजिक विचारवंत या संघर्षाची
तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करत असले,
तरी त्यांचे प्रयत्न जातीय
दृष्टीकोनातूनच पाहिले जात असल्याने त्यांना विशेष यश लाभल्याचे आपल्याला दिसत
नाही. शिक्षणामुळे भावी पिहीचे नागरिक सुजाण होतील आणि या द्वेष किंवा
वेगळेपणाच्या भावनेला संपवता येईल अशी साधारणपणे धारणा असली तरी प्रत्यक्षात तसे
घडत नाही. मुले मैत्री करतानाही शक्यतो आपल्या जातीतील तर करतातच पण स्वजातीचा
शिक्षक असेल तर त्याच्याबाबत विशेष प्रेम बाळगतात. काही वर्षांपूर्वी समीर मोहिते
या तरुणाने टाटा समाज विज्ञान संस्थेमार्फत कोकणातील दोन गांवातील सातवी व नववीत
शिकणा-या विद्यार्थ्यांचे एक सर्वांगीण सर्वेक्षण केले होते. त्यातील निरिक्षणे
काळजीत टाकणारी आहेत. विद्यार्थी दशेतच जातीय जाणीवा, जातिभेद व लिंगभेद जाणीवा कशा विकसीत झालेल्या
असतात व त्यांचे निराकरण करण्याची कसलीही सोय आपल्या शिक्षणपद्धतीत नाही. बव्हंशी
विद्यार्थ्यांचे मित्रही आपल्याच जातीतील असतात. सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात
नोकरी करणारेही जातजाणीवा कटाक्षाने जप्त असतात असेही आपण अनुभवतो. याचाच अर्थ असा
कि ते कितीही कथित उच्च-शिक्षित बनले तरीही ते फक्त साक्षरच राहनार कारण त्यांच्या
विचारपद्धतीत आमुलाग्र बदल करण्याची सुविधा आपली समाजव्यवस्थाच उपलब्ध करून देत
नाही. त्यामुळे महाराष्ट्रात कधी प्रबोधन
काळ खऱ्या अर्थाने आला होता काय किंवा येण्याची नजीकच्या भविष्यात येण्याची शक्यता
आहे काय या प्रश्नाचे उत्तर निराशाजनक आहे.
शिक्षणही
ज्ञानासाठी घेतले जात नाही तर पोटभरू कारणाने घेतले जाते. विद्यार्थी परीक्षा
देतांना शक्य तेवढ्या लबाड्या करतात. पेपर फुटीची आपल्याकडे गाजणारी प्रकरणे आपला
मानसिक दर्जा आणि नैतिकता किती रसातळाला गेली आहे याचे विदारक दर्शन घडवतात.
एकविसाव्या शतकात येउनही जात म्हणजे नेमके काय याची सुस्पष्ट व्याख्या करण्यात
विद्वानांना घोर अपयश आले आहे. उलट एकोणीसाव्या शतकातील युरोपियन आणि देशी
इतिहासकारांनी केलेल्या चुकीच्या विवेचनामुळे जातीविषयक एक भ्रमित विचार
सर्वांच्या मनात आहेत. त्यामुळे कोणात न्यूनगंड तर कोनात अहंगंड अशी अवस्था
निर्माण झालेली आहे. तथाकथित बहुजनीय चळवळ मुळात चुकीच्या जात सिद्धांतावर उभी
असल्याने तिला वैचारिक, ज्ञानात्मक क्रांति घडवण्यात यश आलेले नाही ते यामुळेच.
बहुतेक सामाजिक विचारवंत कोणत्या तरी जातीच्याच वर्तुळात राहतात ते त्यामुळेच.
दुर्दैव म्हणजे हाच दोष त्यामुळे इतिहासकारांतही झिरपला असल्यास नवल नाही.
महाराष्ट्रात इतिहासावरून ह्णारे जातीसंघर्ष आता नवीन राहिलेले नाहीत. यामध्ये
प्रामाणिक इतिहासाची माहिती असल्याने हे वाद काढले जातात असे नव्हे तर आपल्याला
आवडतो, भावतो तो इतिहास दाक्खाव्लेला नाही यावर जास्त रोख असतो.
त्यामुळेच की काय सामाजिक संघर्ष
दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. प्राचीन काळापासून महाराष्ट्र प्रबोधनाच्या
वेगवेगळ्या टप्प्यांमधून गेला असे मानले जात असले तरी जातीविरुद्ध जात, जमातीविरुद्ध जमात
आणि धर्माविरुद्ध धर्म असा संघर्ष हा महाराष्ट्रातील दैनंदिन जीवनाचा जणू नियमित
भाग बनला आहे. जणू काही अंधारयुगाने आपली पकड कधीच सैल न करण्याचा चंग बांधला आहे!
खरे सांगायचे तर महाराष्ट्र (आणि भारतातही) कधी प्रबोधन पर्व आले असल्याचे दिसून
येत नाही. आपण युरोपात झालेल्या प्रबोधनाची चर्चा करत असतो आणि प्रबोधन या
शब्दाचेही व्यवहारात पाश्चात्य व्याख्या वापरत असतो. त्यामुळेच की काय भारतात जेही
काही थोडेफार प्रबोधन झाले आहे ते आणि प्रबोधन क्णारे या पाश्चात्य व्याख्येलाच
समोर ठेऊन कार्य करत आलेले आहेत असे आपल्याला दिसेल. त्यात भारतीय मानसिकता आणि
त्यांचे प्रबोधन करायचे म्हणजे नेमके काय केले पाहिजे याबाबत मोठाच गोंधळ दिसून
येतो. त्या मुळेच की काय आपण आपल्या प्रबोधनाला मुकलो आहोत अये आपल्याला दिसून
येईल.
महाराष्ट्रातील सद्यकाळ हा पूर्णपणे
गोंधळाने वेढलेला आहे. यात भर घालणारा विषय म्हणजे इतिहासाच्या (त्यात
समाज-सांस्कृतिक इतिहासही आला) केवळ चुकीच्या समजुतींवर आधारलेल्या वेगवेगळ्या
विचारसरणी या गोंधळाला कारणीभूत आहेत. मग ती वैदिक (आरएसएसची) विचारसरणी असो किंवा
तथाकथित बहुजन विचारसरणीचे विखुरलेले तुकडे असोत,
या दोन्ही विचारसरणींना कोणताही भक्कम
तात्विक किंवा ऐतिहासिक पाया नाही. सामाजिक इतिहास जणू अर्थहीन झाला आहे आणि
म्हणूनच इतिहासकार इतिहासाच्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक पैलूंना क्वचितच
स्पर्श करतात. आणि जर त्यांनी कधी स्पर्श केलाच,
तर तो वेगवेगळ्या कालखंडातील वैदिक स्मृती,
ताम्रपट, दरबारी भाटांनी लिहिलेली काव्ये/महाकाव्ये आणि प्रशस्तीवर आधारित एक 'गृहीत धरलेला इतिहास' असतो, त्यांचे ऐतिहासिक महत्व मर्यादित असते.
त्यात बव्हंशी केवळ राजा, सरदार किंवा उच्चपदस्थांचा श्रेष्ठत्ववाद
विषद करत अनेक चुकीची तथ्ये गौरवीकरणाच्या नादात इतिहासाचे कंबरडे मोडणारा असतो.
बखरी तर तत्कालीन कल्पित कादंबऱ्या वाटाव्यात अशा शैलीत लिहिलेल्या असतात.
ऐतिहासिक पत्रेसुद्धा अनेकदा दिशाभूल करणारी असतात. यांचा आधार घेऊन जो इतिहास लिहिला गेलेला असतो तो अन्य
पुराव्यांच्या कसोटीवर अनेकदा खोटा पडतो आणि आपल्या हाती येतो तो गृहीत धरलेला
इतिहास. या गृहीत धरलेल्या इतिहासाच्या प्रभावाने अनेक सामाजिक समस्या निर्माण
केल्या आहेत. शिवाय इतिहास लिहिणारा कोण आहे, कोणत्या विचारधारेच्या प्रभावातील
आहे आणि मुळात त्याची ग्रहणक्षमता किती आहे याचा परिणाम त्यांच्या लेखनावर झालेला
दिसतो. अनेक गैरसोयीच्या गोष्टी वगळणे, चुकीचे विवेचन करणे अथवा वाढवून चढवून
सांगणे यात अनेकदा इतिहासकार धन्यता मानतात.
इतिहासकार (विशेषतः वैदिक) वेगवेगळ्या
स्मृतींमध्ये दिलेल्या सामाजिक अनुमती/निर्बंधांना (जे केवळ वैदिक धर्माच्या
अनुयायांसाठी लिहिले गेलेले असते) त्यावरून त्या त्या काळातील सामाजिक वास्तव त्याप्रमाणेच
होते असे मानतात. आजकाल मनुवाद ही एक नवा पारिभाषिक शब्द वापरण्याची परता पडली
आहे. प्रत्यक्षात मनु किंवा अन्य कोणतीही स्मृती हिंदूंसाठी (म्हणजे ज्यांना बहुजन
म्हटले जाते) लागू नव्हती आणि याचे प्राचीन कालापासून अगदी पेशवे काळापर्यंतचे
असंख्य पुरावे उपलब्ध असतानाही या स्मृतीने भारतीयांचे वाटोळे केले, अज्ञानात
ठेवले आणि स्त्रीयांना दास्यात ठेवले गेले, शिक्षणावर बंदी घातली गेली असे आरोप
होत असतात आणि त्या गैरसमजांना खतपाणी घालणारे वैदिक अथवा वैदिकाश्रायी
इतिहासकाराच आहेत हे विशेष.
उदाहरणार्थ, महाराष्ट्र शासनाने प्रकाशित
केलेला गॅझेटियर "महाराष्ट्र राज्य गॅझेटियर: इतिहास: प्राचीन काळ (खंड १)", ज्याचे संपादन डॉ.
अरुणचंद्र शं. पाठक (२००२) यांनी केले आहे,
तो जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात
येईल की, डॉ. एस. एन. राजगुरू असोत की डॉ. अजय मित्र शास्त्री, प्रत्येक लेखकाने
अत्यंत खोडसाळपणे आणि कोणताही संकोच न बाळगता सरसकट विधाने केली आहेत की, जवळपास प्रत्येक
राजवंशाच्या काळात लोक वैदिक स्मृतींच्या नियमांचे पालन करत होते. समाजव्यवस्था
स्मृतीप्रणीत नियामांनीच आखलेली होती. असे विधान करताना कोणत्याही इतिहासकाराने
कोणताही तत्कालीन समर्थक पुरावा दिलेला नाही. त्यांच्याकडे पुरावा म्हणून काय आहे, तर फक्त स्मृतींमध्ये
लिहिलेले नियम! हे नियम नेमके कोनासाठी होते आणि ते तरी त्यातील नियमांचे पालन करत
होते काय या प्रश्नाचे उत्तर त्यांनी सोयीस्कररीत्या टाळलेले आहे. पण त्यांनीच
विषद केलेले त्या त्या काळातील सामाजिक वास्तव जे दिसते ते मात्र त्यांच्या या
अट्टाहासाने व्यक्त केलेल्या विद्वत्म्तात कोठेही बसत नाही.
सातवाहनांचेच
उदाहरण घेऊ. सातवाहन घराणे हे शुद्र होते हे सर्व पुराणांनी उच्च रवात घोषित केले
असले तरी नाशिक येथील लेण्यातील प्रशास्तील “एक बभ्भण” हा शब्द आला आहे म्हणून
सातवाहन ब्राह्मणच कसे होते हे उपरोल्लिखित ग्रंथात सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न
केला आहे. त्याच वेळेस नाणेघाट लेण्यातल्या शिलालेखात राणी नागनिकाने केलेल्या अश्वमेध यागासह अनेक मोठ्या
वैदिक यज्ञांचा तपशील आणि यज्ञांमध्ये ब्राह्मणांना दिलेल्या हजारो गाई, घोडे,
हत्ती आणि 'कार्षापण'
(प्राचीन नाणी) या दानाची नोंद आहे. या लेखांना आधार
घेत सातवाहन ब्राह्मण ठरवण्याचा प्रत्यत्न झाला आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे
नाशिक शिलालेख दरबारी भाटाने लिहिलेला प्रशस्ती लेख आहे आणि एक बभ्हन शब्दाप्धील
शब्दच तुटलेले असल्याने त्या मूळच्या पूर्ण वाक्याचा संबंध लागत नाही. शिवाय
प्रशस्ती लेखातील अथवा ताम्रपटातील लेखनात राजाचे कुल पार चंद्र-सूर्य किंवा
पुरातन महान दैवतस्वरूप व्यक्तीशी जोडण्याची सार्वत्रिक प्रवृत्ती भारतात सर्वकाळ
राहिली असल्याने त्यावरून एवःया अट्टाहासाने सातवाहन ब्राह्मणच होते हे सिद्ध
करण्याची आवश्यकता यांना का भासली? राणी नागनिका ही एका त्रनकयिर नामक महारठीची
नाग वंशातील अन्गीय कुलातील कन्या होती हे नाणेघाट शिलालेखात स्पष्ट आले आहे. या
शिलालेखातील यज्ञांची वर्णने अतिरंजित असून सातवाहनांनी किंवा नागनिकेने यातील
खरेच एक तरी यज्ञ केला असेल काय हे मजकुराला वाचूनच शंका येते. स्त्री आणि त्यात
विधवा ही कोणतेही यज्ञयाग कसे करू शकते? की हा शिलालेख उत्तर काळात केवळ नागनिकेला
वैदिक चरित्र बहाल करण्यासाठी लिहिला गेला? ही शंका येण्याचे प्रबळ कारण स्वत: वा. वि. मिराशी आपल्या "सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप" या ग्रंथात इसपू पहिल्या
शतकातील नाणेघाट लेखाबद्दल म्हणतात, ".....पण त्या श्रौत यज्ञांचे वर्णन असलेला लेख मात्र संस्कृत भाषेतील
नसून प्राकृत भाषेत आहे. किंबहुना, एकाही सातवाहन राजाचा एकही लेख संस्कृतात नाही ही आश्चर्याची गोष्ट
आहे...."
त्याहीपेक्षा महत्वाचे निरीक्षण
हालाच्या गाथासप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकर आपल्या प्रास्ताविकात मांडतात. ते
म्हणतात, “या
गाथासप्तशतीतील गाथा ग्रामीण कवींनी ग्रामीणांसाठी लिहिल्या आहेत....गाथा सप्तशतीत
ब्राह्मणांचा उल्लेख कोठेही आलेला नाही.....त्यावेळी ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य
व शुद्र या वर्गाचा वा वर्णाचा गाथा सप्तशतीमध्ये मागमूसही आढळत नाही. समाजात
व्यवसाय आहेत पण त्याचे जातीत वर्गीकरण झालेले नाही.....आर्य संस्कृतीचा मुलाधार
मानलेल्या यज्ञसंस्थेची येथे हेटाळनी केलेली आहे....कदाचित ब्राह्मण सातवाहनांच्या
राज्यात अत्यल्प असावेत...” आणि हेच
जोगळेकर एकीकडे सातवाहन ब्राह्मण असावेत असे विधान करतात. त्यांचे “गाथासप्तशतीतील
गाथा ग्रामीण कवींनी ग्रामीणांसाठी लिहिल्या आहेत...” हे विधान दिशाबुल करणारे आहे
कारण यातील सम्राट हाल, पादलिप्ताचार्य (पालित्त्त) असे अनेक कवी नागरे जीवनातील
तर आहेतच पण दरबारी प्रतिष्ठित विद्वानही आहेत. यात जवळपास २८ कवयित्रीही आहेत. या
ग्रामीनांनी (जोगळेकरांच्या शब्दात “गावंड्या”) लोकांसाठी लिहिलेल्या कविता नव्हेत.
तरीही त्यात जर ब्राह्मनांचा उल्लेख कोठेही येत नसेल, यज्ञसंस्थेची हेटाळणीच दिसत
असेल तर मग पुराने म्हणतात सातवाहन शुद्र होते आणि हे विद्वान म्हणतात सातवाहन
ब्राह्मण होते आणि त्यांनी यज्ञही केले या दोन्ही विधानात विसंगती आहे व हे
विद्वान सोयीस्कर इतिहास मांडायचा प्रयत्न करत आहेत हे उघड आहे. मग सामान्य
लोकांचा प्राचीन साहित्याचे वैदिकीकरण केले जात असल्याचा किंवा वैदिक चष्म्यातूनच
इतिहास लिहिला जात असल्याचा आरोप होत असेल तर याचे दोषी कोण?
महत्वाचे
म्हणजे दोन-सव्वा दोन हजार वर्षापूर्वी दरबारी आणि ग्रामीण लोक एवढ्या नितांत
सुंदर गाथा लिहित असतील तर त्यांच्यावर शिक्षण बंदी होती आणि ती वैदिकांनी घातली
होती या दाव्याला कोणता आधार राहतो? ते जाऊ द्या, पण यात २८ कवयित्री आहेत, मग
हिंदू किंवा बहुजन स्त्रीयावरही शिक्षण बंडे तर होतीच पण त्यांचे जीवन दासीसमान
होते या दाव्याला कोणता आधार राहतो? आणि याचे पुरावे इंग्रजकाल येईपर्यंत शेकडोने
मिळत असताना मनुस्मृतीने ही बंधने शूद्रांवर घातली म्हणून शूद्रांचे शोषण झाले असे
कसे म्हणता येईल? मुख्य म्हणजे ९९% राजे भारतात वैदिक नव्हते. व्यापारी ते सेनानी
वैदिक नव्हते. समुद्रप्रवासावरची बंदी कधीही पाळली गेली नाही याचे तर
अलेक्झांडरच्या आक्रमण कालापासून प्रत्यक्ष असे शेकडो पुरावे आहेत. मग ज्या
स्मृतीने हिंदुंच्या जीवनावर कसलाही प्रभाव टाकला नाही तिचा बाऊ करून आपण आपले
आजचे दौर्बल्य तर लपवत नाही आहोत ना, याचा गंभीर विचार करण्याची गरज आहे.
आणि तरीही डॉ. अजय मित्र शास्त्री या ग्रंथात त्या
त्या समाजकाळात वैदिक स्मृती लागू असल्याच्या आपल्याच विधानावर जेव्हा सबळ पुरावा
देता येत नाही तेव्हा एक महत्वाचे विधान करतात....“...विविध
व्यवसाय वंशपरंपरागत बनल्यामुळे त्यातून जातींची निर्मिती झाली. या विविध जातींचा
वर्णव्यवस्थेशी मेळ घालण्यासाठी, स्मृतींनी 'अनुलोम' (उच्च वर्णीय पुरुष आणि निम्न वर्णीय स्त्री यांच्यातील विवाह)
आणि 'प्रतिलोम' (उच्च वर्णीय स्त्री आणि निम्न वर्णीय
पुरुष यांच्यातील विवाह) विवाहांना या विविध जातींच्या उदयाचे कारण मानले. तथापि, हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे दिसून येते, कारण लोकांनी दानविषयक विविध शिलालेखांमध्ये स्वतःच्या
व्यावसायिक जातींचाच उल्लेख केलेला आढळतो.” ("महाराष्ट्र राज्य गॅझेटियर: इतिहास: प्राचीन काळ (खंड १) २००२,
पृष्ठ क्र. ४८९) मुळात वर्णव्यवस्था आणि जातीसंस्था या दोन स्वतंत्र वेगळ्या
धर्माच्या गोष्टी आहेत हे मी अन्यत्र दाखवून दिले आहे. येथे प्रसिद्ध इतिहासकार
शास्त्रीही म्हणतात की कारागीर वर्गाने त्यांना वैदिक धर्माने बहाल केलेले शुद्र
हे संबोधन भारतातील एकाही दानलेखात वापरलेले नाही, मग समाज स्मृतीप्रमाणे चालत
होता हे विधान किती भोंगळ आणि समाजाची दिशाभूल करणारे आहे हे वेगळे सांगायची
आवश्यकता नाही. भारतात जातीनिर्मितीबाबत जे गैरसमज बहुजानीय इतिहासकारांनी वाढवत
नेले आणि ब्राह्मण हेच जाती संस्थेचे निर्माते हा घोर गैरसमज करून घेतला त्यामुळे
ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला द्वेषाची-तिरस्काराची धार मिळाली. वस्तुत: जाती
व्यवसायातून निर्माण झाल्या आणि ते व्यवसाय किंवा त्या आधारित जाती निर्माण
करण्यात ब्राह्मनांचा काडीएवढाही हातभार नाही, हे सुद्धा एक ऐतिहासिक सत्य आहे, पण
लक्षात कोण घेतो?
येथे आपण पेशवाईचे उदाहरण घेऊयात.
पेशवेकाळात मनुस्मृतीची कठोर अंमलबजावणी केली जात होती (विशेषत: दुसर्या
बाजीरावाच्या काळात) असा आरोप नेहमी होत असतो. पण वास्तव काय आहे? पेशवेकाळात केवळ
वैदिक स्मृतींवर आधारित न्यायदान होत नव्हते. जे व्हायचे ते केवळ ब्राह्मणांच्या
बाबतीत. अन्य समाजाबाबत त्याकाळी स्थानिक रूढी-परंपरा, गावकीचे नियम, जात पंचायतीचे निर्णय आणि त्या त्या
जातीतील पूर्वापार प्रथा आणि देशाचार (स्थानिक संकेत) यांचा न्यायालयात मोठा वापर
केला जात असे。पेशवेकालीन
न्यायव्यवस्थेचे स्वरूप १. गाव पातळीवरील पंचायत:गावातील तंटे ग्रामपंचायत किंवा जातपंचायतीतर्फे
सोडवले जात. यात गावातील ज्येष्ठ, अनुभवी आणि प्रतिष्ठित लोक पंच म्हणून
काम करत. ते लिखित धर्मग्रंथांऐवजी जातीच्या आणि गावच्या रूढी आणि परंपरेला अधिक
महत्त्व देत. २. पुराव्याला महत्त्व: न्यायदानासाठी पुराव्याला पहिली पसंती असे. यात साक्षीदार, दस्तऐवज
(कागदपत्रे), आणि दिव्य (शपथ घेऊन किंवा गरम लोखंडाचा गोळा हातात धरून सत्य
सिद्ध करण्याची परीक्षा) यांचा समावेश होता.३.मुस्लिम समाजातील कौटुंबिक वाद
सोडवण्यासाठी काजी यांची न्यायालये होती. तिथे शरियतच्या (इस्लामी कायद्यांचा)
आधार घेतला जाई. गुन्ह्यांच्या बाबतीत राजाच्या आज्ञा आणि प्रशासकीय सोयीनुसार
शिक्षा ठरत.४. ब्राह्मणांचे वाद गोतसभीत सोडवले जात किंवा फारच गंभीर धार्मिक
प्रकरण असेल तर पैठण किंवा काशी येथील विद्वतसभेकडे धाव घेतली जात असे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ
पेशावेकालातच नाही तर प्राचीन कालापासून जात पंचायत आणि गोतसभा यांचे निर्णय अपवाद
वगळता राजसत्ता मान्य करत असे. मनु किंवा अन्य स्मृतीप्रमाने समाज चालत असे असे जे
आताच्या वैदिक इतिहासकारांचे विवेचन जसे वर्चस्वतावादी भावनेतून विद्वात्तेशी
प्रतारणा करत आले आहे तसेच बहुजनीय (हिंदू) सुधारक ते इतिहासकार यांची मते केवळ
विरोधी किंवा अज्ञानामुळे आलेली आहेत आणि हे काही प्रबोधनाचे लक्षण म्हणता येत
नाही.
याच कारण एकच म्हणजे वैदिक धर्मियांशी
विवाद करण्यासाठी जर तेवढ्याच असत्य मुद्द्याचा आधार घेतला जात असेल तर ते प्रबोधानाचे
पर्व कसे आणू शकेल?
भारतात राजांच्या प्रशस्तीपत्रांमध्ये
(जी प्रामुख्याने त्यांच्या दरबारी कवींनी लिहिलेली असत) केलेले उघड-उघड दावे
इतिहासाचा पाया बनले आहेत. ते हे विसरले की,
एखाद्या विशिष्ट धर्माच्या अनुयायांसाठी
असलेले धार्मिक नियम हे सर्वांचेच सामाजिक वास्तव असू शकत नाही; विशेषतः अशा वेळी
जेव्हा तिथे पूर्णपणे भिन्न धर्म आणि सामाजिक व्यवस्था मानणारे लोक राहतात, जे त्या विशिष्ट
धर्माच्या आज्ञा फेटाळून लावतात. प्रशस्तीपत्रे ही जरी निधर्मी स्वरूपाची कोरीव
लेखने मानली जात असली, तरी ती केवळ बढाईखोर विधाने आणि तथाकथित विजयांच्या दाव्यांनी
भरलेली असतात, ज्यांना कोणताही समकालीन समर्थक पुरावा नसतो. पण इतिहासकार
त्यांच्या नैतिक कर्तव्याशी प्रामाणिक नव्हते. जर ते प्रामाणिक असते, तर संबंधित
कालखंडातील सामाजिक-राजकीय वास्तव काय होते,
हे शोधण्यासाठी त्यांनी अधिक खोलवर शोध केला
असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. आजचा सामाजिक गोंधळ हा इतिहासाच्या या
अप्रामाणिक सादरीकरणामुळेच निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर, अनेक वेळा ते
संदर्भांचा विपर्यासही करतात.
इतिहासकारांनी घालून ठेवलेला गोंधळ
येथेच मर्यादित राहत नाही. अनेकदा ते खोटेपणाचा आश्रय घेतात. उदाहरणार्थ, “Yaśovarman of Kanauj: A Study of Political History,
Social, and Cultural Life of Northern India during the Reign of Yaśovarman”
(अभिनव पब्लिकेशन्स, १९७७) या पुस्तकात
इतिहासकार लेखक श्याम मनोहर मिश्रा यांनी पान ९३ वर नमूद केले आहे की, काश्मीरचा ललितादित्य
मुक्तापीड आणि कनौजचा यशोवर्मन यांच्यातील युद्ध इसवी सन ७३६ ते ७४९-७५३ दरम्यान
झाले होते. इसवी सन ७३६ हे सुरुवातीचे वर्ष ठरवताना,
ते त्यांच्या पुस्तकाच्या तळटीपेत
म्हणतात की, ललितादित्याने ७३६ मध्ये त्याचा मंत्री मित्रशर्मा याला तांग
राजदरबारात पाठवले होते. चीनी दरबारी नोंदींनुसार,
त्याने तिथे सांगितले होते की 'मध्य देशाचा राजा' त्याचा मित्र आहे.
त्यामुळे हे युद्ध ७३६ च्या आधी होऊ शकत नव्हते.
येथे उल्लेखनीय बाब अशी आहे की, मिश्रा यांनी तळटीपेत
दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे. ललितादित्याने ७३३ चा अपवाद वगळता कधीही आपला
दूत चीनला पाठवला नव्हता. ललितादित्याचे शिष्टमंडळ किंवा दूत मित्रशर्मा ७३६ मध्ये
चीनला गेला होता, हा त्यांचा दावा खरा नाही. त्यांनी आपल्या विधानाच्या
समर्थनार्थ मार्क स्टेन यांच्या 'राजतरंगिणी'च्या प्रस्तावनेतील पान ८९ चा संदर्भ दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात स्टेन
यांनी या प्रस्तावनेत असा कसलाही उल्लेख केलेला नाही. त्यांनी प्रस्तावनेत फक्त
एवढेच लिहिले आहे की, ललितादित्याने इसवी सन ७३६ नंतर कधीतरी युद्ध करून यशोवर्मनला
त्याच्या गादीवरून हटवले असावे. स्टेन यांनी ज्या चीनी नोंदींचा संदर्भ दिला आहे, त्या ७३३ च्या आहेत, ७३६ च्या नाहीत.
शिवाय, स्टेन यांनी या संदर्भात मित्र शर्माचे नावही कुठे घेतलेले
नाही. त्यामुळे मिश्रा यांनी उघडपणे असत्य मांडले आहे. त्यामुळे इतिहासकारांचे
लेखनही आंधळेपणे स्वीकारता येणे अशक्य झालेले आहे.
दुसरे उदाहरण मी महाराष्ट्र शासनाने
प्रकाशित केलेल्या गॅझेटियरमधून (पान २५३) देऊ शकतो,
जिथे अत्यंत बेजबाबदारपणे असे विधान
केले आहे की, वाकाटक हे विष्णूवृद्ध गोत्राचे ब्राह्मण होते आणि त्यांनी
वैदिक-पौराणिक धर्मानुसार विविध वैदिक यज्ञ आणि पौराणिक धार्मिक विधी केले. परंतु, पान २८६ वरील तळटीप
क्रमांक ४३ मध्ये असे नमूद केले आहे की,
विंध्यशक्ती (द्वितीय) च्या वाशीम
ताम्रपटावर गोत्राचे नाव चुकून "वृष्णीवृद्ध" असे आले आहे.
आता प्रश्न असा पडतो की, प्रख्यात इतिहासकार
डॉ. अजय मित्र शास्त्री ज्या ताम्रपटाचा वापर करत आहेत, त्या ताम्रपटात जर
नाव 'वृष्णीवृद्ध' असेच
कोरले गेलेले असेल,
तर त्यांनी मुख्य लेखामध्ये त्याचा
उच्चार मूळ लेखनाला बगल देत 'विष्णूवृद्ध' असा का करावा? आणि ताम्रपटात 'वृष्णीवृद्ध' हे चुकीचे लिहिले गेले आहे,
असे तळटीपेत का सांगावे? ताम्रपट जारी
करणाऱ्याची किंवा तो कोरणाराची ती चूक होती,
हे ते कसे ठरवू शकतात? ही काही लहान चूक
नाही आणि जर ती चूक असती, तर ती स्वतः राजाने कशी स्वीकारली असती? डॉ. शास्त्री यांनी
ताम्रपटातील स्पेलिंग ही चूक आहे आणि वाकाटकांचे खरे गोत्र वृष्णीवृद्ध नसून
विष्णूवृद्ध होते, हे जाहीर करण्यासाठी कोणताही समर्थक पुरावा दिलेला नाही. एक
प्रामाणिक इतिहासकार म्हणून त्यांनी ताम्रपटात लिहिलेले मूळ गोत्र मुख्य लेखात का
मांडले नाही?
याचे कारण असे की मुळात ताम्रपट कोरताना राजाला उच्चवर्णीय ब्राह्मण ठरवण्याचा
नादात त्याला कोणते तरी गोत्र बहाल करायचे म्हणून दिले गेले, प्रत्यक्षात आणि गोत्र रत्नावलीनुसार “वृष्णीवृद्ध” या नावाचे गोत्रच
अस्तित्वात नाही. आणि तरीही वाकाटक राजे ब्राह्मण ठरवण्यासाठी वृष्णीवृद्धऐवजी
विष्णूवृद्ध हेच गोत्र असले पाहिजे असा खोडसाळपणा इतिहासकाराने का करावा? आणि
इतिहासकाळातील राजे ब्राह्मणच होते असे ठरवण्याचा अट्टाहास का? आणि वर गम्मत
म्हणजे “आमच्या हाती कधी सत्ताच नव्हती, मग आम्ही अन्न्याय्य नियम लादणार तरी
कसे?” असा आक्रोशही ब्राह्मण विचारवंत करतात. (उदा. प्रसिद्ध साहित्यिक ह. मो. मराठे
आपल्या ब्राह्मणांना अजून किती झोडपणार? या पुस्तिकेत.)
एकंदरीत असे दिसते की, हे इतिहासकार
सातवाहनांसह महाराष्ट्रावर राज्य करणारे बहुतांश राजवंश ब्राह्मण होते हे सिद्ध
करण्यासाठी हट्टाला पेटले होते आणि आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी बौद्धिक
प्रतारणा करायलाही मागेपुढे पाहिले नाही.
हा अप्रामाणिकपणा इथेच थांबत नाही. हे
वास्तव आहे की, वैदिक इतिहासकारांना नेहमीच वेगवेगळ्या कालखंडात ब्राह्मणांचे
वर्चस्व सिद्ध करायचे होते. परंतु,
आता हिंदू, बौद्ध, जैन आणि इतर लहान
घटकांमध्ये जी नवीन जागृती निर्माण झाली आहे,
ती देखील याच असत्याच्या गाड्यावर स्वार
झाली आहे. ते ब्राह्मणांनी किंवा ब्राह्मणधार्जिण्या लोकांनी लिहिलेल्या इतिहासाचा
तिरस्कार करतात; मात्र, स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी ते स्वतःच इतिहासाच्या नव्या, दिशाभूल करणाऱ्या
आवृत्त्या बेजबाबदारपणे तयार करतात. अशी उदाहरणे देखील असंख्य आहेत.
आता गेला बराच काल आर्य आक्रमण सिद्धांत
खोटा असून आर्य मुळचे भारतातीलच हे सिद्ध करण्यासाठी संघवादी संशोधकांनी चंग
बांधला आहे. त्यात पुरातत्व आणि जनुकीय शास्त्रही वेठीला धरले जात आहे. राखीगढी
येथे नुकतेच झालेले उत्खनन आणि जनुकीय पुराव्यांचा आपण येथे विचार करू. या
संशोधनावर आधारीत अकादामिक लेख सेल आणि सायन्स या जगविख्यात मासिकात प्रसिद्ध
झालेले आहेत ज्याचे डॉ. वसंत शिंदे सहलेखक आहेत. डॉ.
शिंदे हे मुख्य लेखक असलेल्या 'सेल'मधील प्रबंधात राखीगढी येथे केलेल्या उत्खननातील
४६०० वर्षांपूर्वीच्या एका स्त्रीच्या सांगाड्यात मिळालेल्या जनुकांवरुन काय
निष्कर्ष काढण्यात आले आहेत, हे
आपण पाहू या. त्यानुसार प्राचीन इराण आणि सिंधू संस्कृतीत सांस्कृतिक संबंध होता, त्यांच्यात स्टेपे प्रांतातील भटक्या पशुपालकांचा
आजच्या लोकांत सापडतो तसा जनुकप्रवाह आढळून आला नाही. स्टेपेतील लोक सरासरी चार ते
तीन हजार वर्षांपूर्वीच्या दरम्यानच्या काळात आधी इराण व नंतर काही भारतात
विस्थापित झाले. भारतातील शेतीचा शोध त्यापूर्वीच एतद्देशियांनी स्वतंत्रपणे लावला
होता. या विस्थापित लोकांबरोबरच इंडो-युरोपियन भाषाही इकडे आल्या असण्याची शक्यता
आहे. या संपूर्ण लेखात आर्य हा शब्द कोठेही वापरण्यात आलेला नाही किंवा सिंधू
लोकांची भाषा वैदिक संस्कृत होती असे विधान नाही.
पण याच डॉ. वसंत शिंदे यांनी आपल्या देशात केलेल्या विधानांत
मात्र “आर्य याच देशातील, सिंधू संस्कृतीची भाषा वैदिक संस्कृत” अशी बेजबाबदार आणि
जनुकीय पुराव्यानेही सिद्ध न होऊ शकलेली विधाने केली, लेखही लिहिले जे त्यांनीच
केलेल्या शास्त्रीय संशोधनाला पूर्ण छेद देणारे होते. या संदर्भात त्यांनी अगदी
महाराष्ट्र टाईम्स मध्ये “होय..आम्ही सिंधूपुत्रच” हा लेख लिहिला होता आणि मी
त्याचा त्यांचीच उल सायन्स आणि सेल मासिकातील शास्त्रीय विधाने आधाराला घेऊन या
नव्या “अवताराचा” प्रतिवाद केला होता. पण
झाले असे की मूळ लेख वाचायची सवय आपल्याला नसल्याने माध्यमांनी प्रसारित केलेले
अशास्त्रीय दावे मात्र लोकांमध्ये पसरले आणि व्हायचा तो संस्कृती-गोंधळ झालाच.
आता हे झाले वैदिक किंवा वैदिकाश्रयी
लोकांचे. बहुजानीय विद्वत्तेची अवस्था तर अगदीच केविलवाणी आहे कारण तेही हिरीरीने
खोटा प्रती-इतिहास लिहित आहेत हे लक्षात येईल. उदाहरणार्थ, जेव्हा वैदिक अभ्यासक
सिंधु संस्कृतीची भाषा संस्कृत असल्याचा हिरीरीने युक्तिवाद करतात, तेव्हा हे इतर घटक
त्या सिंधू लिपीत गोंडी, तमिळ किंवा मराठी भाषा शोधू लागतात! अनेकांचा असा विश्वास
आहे की भारताचा इतिहास केवळ भगवान बुद्धांच्या काळानंतरच सुरू होतो. भारतात जेथेही
खोदाल तेथे बौद्ध अवशेषच सापडतील. गौतम बुद्धापुर्वी भारतात कोणताही धर्म नव्हता,
संस्कृती नव्हती असे दावे विशेष करून आंबेडकरवादी आणि त्यानुकुल अभ्यासक करत
असतात. एवढेच नव्हे तर शिवलिंग ही बौद्ध स्तुपांची नक्कल आहे असेही अट्टाहासाने
सांगितले जाते. “वैदिक युग का घालमेल” या राजीव पटेल लिखित आणि सध्या तथाकथित
बहुजनांमध्ये आणि आंबेडकरवाद्यामध्ये गाजत असलेल्या पुस्तकात पुरातत्वीय
पुराव्यांचे पूर्वग्रह दुषित आकलन केले आहे कि विद्वत्ता म्हणजे काय या
प्रश्नाबद्दल संभ्रम निर्माण व्हावा. पटेल दावा करतात कि सिंधू काळात बौद्ध
संस्कृतीच होती. भारतात वैदिक काळ कधीच नसला हे समजा वास्तव असले तरी वेद
बुद्धकाळानंतर लिहिले गेले हे असले धादांत सिद्ध न होऊ शकणारे दावे करत हे पुस्तक
पुढे जाते. याला काही प्रबोधन म्हणता येत नाही.
श्रीमंत कोकाटेंसारख्या काही जणांचा असा
विश्वास आहे की सिंधू संस्कृती (जी केवळ १९२० मध्ये प्रकाशात आली) सतराव्या शतकातच
जिजाबाईंना ठाऊक होती आणि त्यांनीच तरुण शिवाजींना शिकवले होते की कशा प्रकारे
आक्रमक ब्राह्मण आर्यांनी ती “आपली” संस्कृती नष्ट केली! जाणीवपूर्वक निर्माण
केलेल्या अशा गैरसमजांना काही मर्यादाच राहिलेली नाही आणि प्रत्येक जण आपापल्या
आवडीनुसार इतिहासाची आवृत्ती स्वीकारत आहे. आपण ज्या महापुरुषांची पूजा करतो, त्यांच्यावर झालेली
कोणतीही चिकीत्सा लोकांना नको असते. त्याऐवजी,
ते त्यांच्याभोवती नवीन दंतकथा (मिथके) रचत
राहतात आणि त्यांनाच ऐतिहासिक तथ्य मानतात. अशी उदाहरणे अनेक आहेत आणि त्यांची
गणना करणे सोपे नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अलौकिक व्यक्तिमत्व
होते हे सत्य असले तरी त्यांचे निखळ चरित्र आजवर ना ब्राह्मणी इतिहासकारांनी
लिहिले ना बहुजनीय. संघवादी लेखकांचा दावा असतो की शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या
विरोधात होते आणि त्यांनी अफजलखानाला त्यासाठीच ठार मारले. (कोथळा काढला हा
त्यांचा लाडका शब्द.) मुस्लीमवादी संशोधक (यात साम्यवादी आणि ब्रिगेडीही आले) दावा
करतात की महाराजांच्या सैन्यात ४०% मुस्लीम होते. हे दोन्हीही दावे भ्रामक आहेत. दिशाभूल
करणारे आहेत. अगदी स्मृतिशेष कॉ, गोविंदराव पानसरे यांच्या “शिवाजे कोण होता?” या
पुस्तकातही साम्यवादी दृष्टीकोनातून अनेक अनैतिहासिक गोष्टी सांगितल्या गेलेल्या
आहेत. अर्थात पानसरे इतिहास संशोधक नव्हते त्यामुळे त्यांना सुट देता येऊ शकते, पण
इतिहासकार म्हणून मिरवनाऱ्याचे काय? सामाजिक अनुबंध साधण्यासाठी भावनिक इतिहास
तयार करणे एक्वेल क्षम्य आहे पण धर्मांमध्ये द्वेष माजवण्यासाठी धादांत असत्य
इतिहास सांगितला जात असेल तर काय? खरे तर दोन्ही बाबी त्याग्ल्या पाहिजेत आणि जे
मागे घडून गेले आहे त्याकडे तटस्थ बुद्धीने पाहिले पाहिजे आणि यालाच प्रबोधन
म्हणतात.
आपण हे विसरतो की तत्कालीन संघर्ष हा
सत्ता संघर्ष होता नि त्यात धर्म हा तोंडी लावण्यापुरता वापरला जात होता या
वास्तवातून इतिहासाची चिकित्सा केली जात नाही. अफजलखानाला मारले हे खरेच आहे, पण
त्याच वेळेस (१६६४ साली)बाजी घोरपडे या आपल्याच कुळाशी संबंधीत असलेल्याच्या मुघोळ
गावात घुसून बाजी घोरपडेची हत्या केली हा इतिहास सहसा ब्रिगेडी असोत की संघवादी कधीही
प्रचारात आणत नाहीत. शहाजी राजांना कपटाने कैद केले त्या या दोघांनी म्हणून
त्यांना कधी ना कधी शिक्षा दिली जाणारच होती ती शिवाजी महाराजांनी दिली. यात
हिंदू-मुस्लीम हा वाद कोठे बसतो? म्हणजे आम्हाला सोयीचा आणि अंगावर मुठभर मांस
चढवणारा इतिहास हवा असतो, मग तो किती का खोटा असेना! याला गजानन मेहंदळेसारखे
हिंदू-मुस्लीम करणारे संशोधकही अपवाद ठरत नाहीत. मग पांडुरंग बलकवडेसारख्या इतिहास
लिहिणार्यांचे काय?
ऐतिहासिक व्यक्ती अथवा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर काढलेले चित्रपट
आपल्याकडे वारंवार वादाचे कारण घडत असताना आपण पाहतो. अलीकडे ही परंपरा पद्मावती
चित्रपटापासून सुरु झाली. “हर हर महादेव” वरून
रणकंदन सुरु असून “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाच्या निमित्तानेही वाद उठला होता. भविष्यात असेच वाद वारंवार
उसळत राहतील असे दिसते आहे. अशा चित्रपटांमुळे इतिहासाचे विकृतीकरण होते, समाजात दुही निर्माण होते, इतिहासातून चुकीचा संदेश
जातो असे आरोप होतात. असे चित्रपट प्रदर्शित होऊ दिले जाणार नाहीत, सिनेमागृहाचे पडदे फाडू असे इशारे दिले जात असतानाच काही संघटना सरळ
चित्रपटाच्या सेटवर तोडफोड करतानाही आपण पाहिले आहे. काही निर्माते जाणीवपूर्वक
असे वाद निर्माण होतील असे पाहतात कारण यामुळे तरी तसे ‘पडेल’
या सदरात जाऊ शकणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला भरण्यात यशस्वी
होईल अशी आशा त्यांना असते. निर्माते-दिग्दर्शक मात्र “सिनेम्यटीक
लिबर्टी” अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा बचावाचा मुद्दा उपस्थित करतात आणि या वादांवर पडदा टाकायचा प्रयत्न करत
असतात. “चित्रपटात इतिहास शोधायचा नसतो तर एक कलाकृती म्हणून
त्याच्याकडे पाहत कलात्मक गुण-दोषांची चर्चा करायची असते, ऐतिहासिक
तथ्यांची नाही” असे म्हणणारेही “तटस्थ”
सदरात मोडू पाहणारे लोक असतात. राजकीय व सामाजिक संघटनांचे नेतेही
राजकीय व सामाजिक लाभावर नजर ठेवून अशा वादात उडी घेत असतात. एकंदरीत समाज ढवळून
निघतो. समाजमाध्यमांवर तर अशा चर्चांना उधाण येते.
“वेडात दौडले वीर
मराठे सात” या मिथकाकडे आपण
पाहूयात. हे गीत ऐकले की स्फुरण चढते, डोळेही ओलावतात हे सत्य असले तरी इतिहासाच्या
दृष्टीने पाहिले तर तथ्य वेगळेच असल्याचे लक्षात येते. कृष्णाजी
अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले.
नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत
तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.' (सभासद बखर) या लढाईत
प्रतापराव गुजर यांच्यासोबत त्या युद्धात आणखी सहा वीरांना वीरमरण आले, अशी इंग्रज दुभाषी
नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात ऐकीव नोंद आहे. कोणत्याही
विश्वसनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत किंवा फक्त सात जण बहलोलखानावर
चालून गेले असेही सांगत नाहीत. त्यामुळे केवळ सात वीर बहलोलखानाच्या फौजेवर चालून
गेले आणि बलिदान दिले ही कथा कितीही प्रेरणादायी वाटत असली तरी त्यात ऐतिहासिक
तथ्य असल्याची शक्यता दिसत नाही. परंतु इतिहास हा आपल्याकडे नेहमीच वादाचा विषय
होताना दिसतो.
एका अर्थाने, ही एक अनागोंदी
सामाजिक स्थिती आहे. वास्तविक पाहता,
इथे एका नवीन प्रबोधनाची फार पूर्वीच
होती पण पाश्चात्य विचारांचा सावलीत झालेले आमचे अर्धवट प्रबोधन आमचे मेंदू
प्रगल्भ करू शकलेले नाहीत कारण मुळात भूतकाळाकडे पाहण्यासाठी एका स्पष्ट
दृष्टीकोनाची गरज आहे आणि तरच भविष्य अर्थपूर्ण होईल हेच आमच्या लक्षात आलेले
नाही. मग अन्य ज्ञानक्षेत्राबाबत बोंबच असणार हे उघड आहे आणि तसे दुर्दैवी वास्तव
शिक्षणापासून सर्वच क्षेत्रात उमदळून येतांना दिसत असेल तर गले काढण्यात काय अर्थ
आहे?
सध्याचा काळ प्रत्येक महाराष्ट्रीयाला
जाणवून घ्यायचा असेल तर नक्कीच जाणवू शकतो,
कारण ते इतिहासाच्या कोणत्या ना कोणत्या
आवृत्तीचा भाग आहेत आणि त्यांनी स्वीकारलेल्या इतिहासाच्या आवृत्त्यांवर त्यांचा
ठाम विश्वास आहे. वास्तविक, इतिहास हा समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या
जीवनप्रवासाचे अंतर्दृष्टी प्रदान करण्यासाठी असतो. परंतु दुर्दैवाने, इतिहासाचा वापर
समाजाचे तुकडे करण्यासाठी केला जात आहे. या तुकड्यांनी माणसाच्या स्वतःबद्दलच्या
आणि तो ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या आकलनाबद्दल कमालीचा गोंधळ निर्माण केला
आहे. महाराष्ट्रीयांना त्यांच्या भूतकाळाचे—तो चांगला असो वा वाईट—एक स्पष्ट चित्र माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना हे
समजेल की ते आज असे का आहेत आणि त्यांना उद्या काय बनायचे आहे. परंतु, कोणत्याही
विचारसरणीने जाणीवपूर्वक कलंकित केलेला इतिहास भविष्याचा पाया बनू शकत नाही.
जेव्हा आपण प्रबोधनाबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा युरोपीय प्रबोधनाशी थेट तुलनात्मक अर्थ घेता
कामा नये आणि घेऊ शकत नाही. प्रत्येक प्रदेशाच्या इतिहासात असे कालखंड येतात जे
भूतकाळाशी असलेले दुवे तोडतात आणि एका नवीन जागृतीच्या युगात प्रवेश करतात. एका
अर्थाने, तो एक संक्रमण काळ असतो. याचा अर्थ नवीन विचारांचे युग.
युरोपीय प्रबोधनात, विद्वानांनी कला,
वास्तुकला, राजकारण, विज्ञान, मानवतावाद, साहित्य अशा विविध
रूपांतून स्वतःची वैशिष्ट्ये नव्याने, प्रसंगी बंड करून परिभाषित करण्याचा प्रयत्न
केला. रूढ चौकटी उध्वस्त करून नवीन
तत्वद्न्याना जन्म दिला आणि आम्ही गीता, ज्ञानेश्वरी आणि तूकोबा किंवा गेला बाजार
म. फुले किंवा आंबेडकर येथेच तात्विक प्रकाशाला बंदिस्त करून थांबलो. त्यांच्याहे
तत्वज्ञानाचे समीक्षण किंवा चिकित्सा करण्याचे धैर्य आम्ही दाखवलेले नाही. कोणी
करायचा प्रयत्न केला तर होणार्या टीकेला सामोरे जाण्याची कोनात हिम्मत नाही. मग
महाराष्ट्रात किंवा अभारतात प्रबोधनकाळ कधी आणि आला तर कसा येणार?
एका अर्थाने, प्रबोधन म्हणजे मानवी
विचारांचे अंधाराकडून प्रकाशाकडे
झालेले संक्रमण होय. मानवासाठी काय वाईट
आणि काय प्रकाशमान आहे, हे ठरवण्यासाठी अद्याप कोणताही ठोस आधार देण्यात भारतातील सर्व
विचारवन्त आणि इतिहासकार अपेशी ठरले आहेत कारण प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या
कालबाह्य विचारधारेचे चष्मे घातलेले आहेत. आपल्या व्याख्या प्रामुख्याने स्वता:वरील
वैचारिक झापडे बाजूला सारून विचारांमधील आमूलाग्र बदलावर आधारित करण्याची सर्वांना
नितांत गरज आहे.
युरोपात प्रबोधन युग अनेकांगाने आले.
अनेक शास्त्रीय शोधही लावले. भारत किंवा महाराष्ट्राने मात्र एकाही अभिनव यंत्रांचा
शोध लावला नाही. देशाने किंवा महाराष्ट्राने राजकीय किंवा सामाजिक विचारांमध्ये
स्वतःहून कोणताही मोठा क्रांतिकारक बदल घडवून आणला नाही. उलट अनेक बाबतीत, महाराष्ट्र पाश्चात्य, विशेषतः ब्रिटीशांनी
आणलेल्या बदलांवर अवलंबून राहिला. तत्वद्न्यानाचे क्षेत्र म्हणाल तर मदार
कृष्ण-महावीर-बुद्ध यांच्यावरच आधारित विचारसरणी राहिली. एका अर्थाने, आपल्याकडे झालेले किरकोळ का होईना प्रबोधन हे पाश्चात्य जगाच्या सावलीत होते आणि त्यामुळे ते
अपरिहार्यपणे 'अर्धवट शिजलेले'
राहिले. एकोणिसाव्या शतकापासूनचे
महाराष्ट्रातील सर्वच मोठे विचारवंत पाश्चात्य विद्वत्तेने मोठ्या प्रमाणावर
प्रभावित झालेले दिसतात. अगदी त्यांनी प्राचीन भारतीय दार्शनिक विचारांना
पाश्चात्य तात्विक विचारांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला. बाळ गंगाधर
टिळकांचे 'गीतारहस्य' हे याचे उत्तम उदाहरण आहे. महात्मा फुलेंसारखे बहुजन
विचारवंतही याला अपवाद नव्हते. यात शंका नाही की त्यांनी समाजात जागृती आणली, पण ते त्या मूळ
विचारांचे जनक नव्हते. त्यांनी पाश्चात्य जगाबद्दलचे आपले आकलन भारतीय संदर्भात
बसवण्याचा प्रयत्न केला. तत्वज्ञान,
कला,
साहित्य आणि राजकारणातील जी 'मौलिकता' असायला हवी होती, ती त्यांच्यापासून
दूर राहिली; किंवा कदाचित त्यांना भारतीय इतिहास आणि त्याच्या सामाजिक
जाणिवेची खरी खोली पूर्णपणे मोजता आली नाही. भारतातील महात्मा गांधी हे एकमेव
व्यक्ती होते ज्यांना भारतीय लोकांची मानसिकता समजली आणि त्यांनी राजकीय व सामाजिक
उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नवीन मुल्यांची भर घालत भारताच्याच तत्वज्ञानाचा वापर
केला. अन्यथा, त्या काळातील विद्वानांच्या मांडणीत 'भारतीयत्व' क्वचितच पाहायला
मिळते, जरी अनेकांनी भारताच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगला असला तरी!
एका अर्थाने, प्रबोधन त्याच्या
खऱ्या अर्थाने बाजूलाच राहिले, जरी भारतीयांनी त्याच्या फळांचा आस्वाद घेतला असला तरी. तथापि, २१ व्या शतकातही
प्रबोधनाच्या मूलभूत घटकांनी त्यांना स्पर्श केला आहे असे दिसत नाही.
याचा अर्थ असा नाही की भारत या
संकल्पनेसाठी नवीन आहे. महाराष्ट्राने प्रबोधनाचे कालखंड पाहिले आहेत, परंतु ते एका वेगळ्या
दृष्टीकोनातून पाहिले आहेत. पण त्यांचेही आकलन आपल्याला नाही ही दुर्दैवी बाब आहे.
आपण एका प्रदेशाच्या प्रबोधनाची तुलना दुसऱ्या प्रदेशाशी करू शकत नाही, कारण प्रत्येक
प्रदेशाची स्वतःची मानसिकता आणि बदलाची गरज वेगवेगळी असते. भारतीय मानसिकता,
विशिष्ट संस्कृती व त्याही प्रादेशिकतेत वाटल्या गेलेल्या, त्यांचा साकल्याने
विचार करत मुलभूत भारतीय सांस्कृतीकतेचा सारगर्भ शोधण्यात ना संघाला यश आले ना
बहुजानीय विचारवान्तान्ना आले त्यामुळे भारतीय समाज एका विस्कळीत व्यक्तिमत्वाचे
भाग झालेले आहेत.
आणि आधुनिक महाराष्ट्रातील (देशातील) खरी
समस्या ही आहे की, तिथे प्रामाणिक बौद्धिकतेचा अभाव आहे, मग ते लोक कोणत्याही
विचारसरणीचे का नसोत. आजची सामाजिक अव्यवस्था याच बौद्धिक अप्रामाणिकपणातून
निर्माण होते! जर कोणताही समाज चुकीच्या,
जाणीवपूर्वक किंवा अज्ञानातून केलेल्या
सामाजिक मांडणीमुळे अंधारयुगात ढकलला जात असेल,
तर प्रबोधनाचे युग तेव्हाच सुरू होते
जेव्हा समाजातील बुद्धीजिवी भूतकाळातील चुकांचे गांभीर्य ओळखायला प्रामाणिकपणे
सुरुवात करतात. ते झालेल्या चुकांवर केवळ पश्चाताप करत नाहीत, तर त्या चुका
सुधारण्यासाठी जे काही शक्य असेल ते सर्व करतात.
आज महाराष्ट्राने (आणि देशाने) जवळपास
सर्वच आधुनिक जागतिक पद्धती आणि चालीरीती स्वीकारल्या आहेत. परंतु, समाजाने खरोखरच एक 'उदारमतवादी मानसिक
अवस्था' (Liberal state of mind) गाठली आहे का? हा एक असा प्रश्न आहे,
ज्याचा गंभीर विचार करण्याची आज नितांत
गरज आहे. आम्ही वेश, खाद्य-सवयी आणि तंत्रज्ञानाचा वापर यात आघाडी घेतली असली तरी
बौद्धीकतेच्या स्तरावर आम्ही आजही मध्य युगातच जगत आहोत. तोच नृशंस रानटी
असंवेदनिक वारसा आम्ही जप्त आहोत. आम्हाला खरेच प्रबोधनाची कधी नव्हे एवढी
आवश्यकता आहे.
- संजय सोनवणी
(साहित्य चपराक, दिवाळी विशेषांक २०१६ मध्ये प्रकाशित)
No comments:
Post a Comment