गोपीचंद पडळकर, महाराजा
आज माझे बंधुतुल्य मित्र प्रा. हरी नरके यांनी श्री. गोपीचंद पडळकर यांनी “अनसंग हिरो ऑफ इंडिया- महाराजा यशवंतराव होळकर” या मी इंग्रजीत लिहिलेल्या आणि सहा जानेवारी २०२१ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी झालेल्या प्रकाशन समारंभात कोणीही मागणी अथवा विनंती केली नसतांना पडळकर यांनी प्रकाशनासाठी आलेला रु. १.२५ laakh खर्च आपण देतो असे जाहीर केले होते. माझे मित्र प्रकाश खाडे यांनी आपल्या अत्यंत अडचणीच्या स्थितीत पुस्तकाची छपाई, संपादन इत्यादी कामाला अपार खर्च केलेला होता. मी किमान आठ महिने हे पुस्तक कोणत्याही मोबदल्याशिवाय लिहिले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनाचे अनावर आकर्षण आणि त्यांनी भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे केलेली माझ्या मनाला मोह पाडणारी झंझावाती रुजुवात यापोटी मी कधीही आर्थिक विचार केलेला नव्हता व नाही. मी त्यांच्या जीवनावर “झंझावात” ही कादंबरीही लिहिली व ती योगेश दशरथ यांनी स्टोरीटेलच्या श्राव्य माध्यमातून जगासमोर नेली. हा यशवंतरावांचा त्यांच्याच समाजाला न समजलेला महिमा आहे कारण ही कादंबरी हजारो लोकांनी ऐकली त्यात हा समाज किती असेल हा संशोधनाचा विषय आहे. २०११ साली माझे महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावरचे चरित्र प्रकाशित झाले. त्याआधी प्रकाश खाडे आणि मी यशवंतरावांचे जन्मस्थान हुडकून वाफगाव येथे गेलो. पुढे मी त्यांच्या राज्याभिषेकाची तारीखही शोधून काढली. त्यांचा जन्मोत्सव आणि राज्याभिषेक दिन साजरा करायची सुरुवात मी आणे श्री. खाडे यांनी केली. आज ही प्रथा राज्यभर पसरलेली आहे. फक्त एकच आहे कि त्याचे श्रेय आम्हाला कोणी देत नाही आणि ती अपेक्षाही नाही. असो.
महाराजा यशवंतराव होळकर यांचे जीवन इंग्रजीच्या माध्यमातून जगासमोर जावे हे माझे स्वप्न होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले केळुस्करगुरुजी लिखित इंग्रजीतील चरित्र जगासमोर जावे यासाठी तुकोजीराजे होळकर यांनी त्या काळातील २५००० रुपयांची देणगी दिली होती व ते चरित्र जगभरच्या विद्यापीठांतील ग्रंथालयांमध्ये पाठवले होते. आता हे असे करायला कोणी पुढे येणार नाही हे वास्तव माहित असलेले श्री. खाडे यांनी आपले काही मित्र तयार केले होईते जे या प्रती विकत घेऊन भारतातील व जगभरच्या विद्यापीठांत प्रती पाठवणार होते. सुमारे अडीचशे प्रती तरी सुरुवातीला पाठवता येतील असा त्यांचा होरा होता. पण प्रकाशन समारंभात पडळकर यांनी केलेल्या घोषणेमुळे व त्याप्रमाणे पैसे खाडे यांना मिळाले आहेत या समजुतीमुळे हेही लोक बाजुला सरले. कार्यक्रमानंतर महिनाभरात पडळकर यांनी खाडे यांना फोन करून त्यांच्या सांगली जिल्ह्यातील जरे गावी बोलावले. माझ्या पाठीच्या वेदना तेंव्हा तीव्र असूनही खाडे यांच्या आग्रहामुळे मी तेथे गेलो. तेथे हे नव्हतेच. त्या दिवशी ते येणारच नव्हते. आम्ही अन्यत्र मुक्काम करून पुण्यास परत आलो.
प्रा. हरिभाऊ मी आठवीत असल्यापासून माझ्या सर्व सुख-दु:खाचे साक्षीदार आहेत. या इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते मुख्य अतिथी होते. पडळकर यांनी कोणेही मागणी न करता दिलेले जाहीर आश्वासनही माहित होते. त्यांनी ते पाळले नाही. ती जागा पुढा-याप्रमाणे पोकळ आश्वासने देण्याचीही नव्हती. त्यांने तरीही “वचनं किं दरिद्रता” या न्यायाने आश्वासन दिले असेल पण त्यामुळे पुढे काय अनर्थ कोसळला याची त्यांना पर्वाही नसेल. एक वर्ष उलटले तेंव्हा त्यांची भेट हरीभाउन्शी झाली. त्यांनाही असेच थातूर मातुर उत्तर देऊन पडळकर यांनी बाजू सावरली. बरे, हा एकच अनुभव नाही, इतर नेत्यांबाबतही असे अनुभव अनेक आहेत आणि ते हरीभाउन्ना माहित आहेत कारण ते त्या क्षणांचे साक्षीदार आहेत.
अर्थात माझा अनुभवाने या लोकांवर विश्वास नव्हताच. छापील चरित्र विकण्यात आणि जगभरच्या ग्रंथालयांमध्ये नेण्यात अडचणी आहेत हे लक्षात घेऊन मी अव्यावहारिक निर्णय घेतला व तो म्हणजे अकेडमिया आणि रिसर्चगेट या अभ्यासकांसाठी असलेल्या साईटवर मोफत उपलब्ध करून देण्याचा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या दोन्ही साईट्सवरून गेल्या वर्षभरात ६५००० पेक्षा जास्त प्रती डाउनलोड झालेल्या आहेत. दर आठवड्याला आजही किमान ३०० प्रती डाउनलोड होतात. अर्थात या प्रती मोफत आहेत. याचा फायदा असला तर एकच, अभ्यासकांपर्यंत तरी महाराजा यशवंतराव होळकर पोचत आहेत.
पण दुर्दैव हे आहे कि महाराजा यशवंतरावांचे नाव घेत, त्यांच्या नावाने आणाभाका घेणारे तथाकथित नेते मात्र यापासून अलिप्त आहेत. इंग्रजी सोडा, मराठी चरित्रही यांनी वाचलेले नाही कि “झंझावात” ही त्यांनी कधी ऐकलेले नाही. आणि हे लोक समाजाचे नेते बनतात. सरधोपट थापा मारतात. अब्यासक म्हनवनारेही बिनधास्त थापा मारतात. ही सुभेदार मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्याशीच केलेली कृतघ्नता नाही असे कोण म्हणेल? पण तेही असो. महाराजा यशवंतराव तळपते सूर्य होते आणि ते वर्तमानातही तळपतच राहणार. त्यासाठी माझीही मुळीच गरज नाही. मी जे केले ते केवळ प्रेमापोटी. मी कधी महाकाव्य लिहिले तर ते केवळ महाराजा यशवंतरावांवर असे मी म्हणतो ती पोकळ गोष्ट नाही.
आज दु:ख याचे वाटले कि काही मला म्हणाले, हरीभाउन्नी ही पोस्ट केली ही तुमच्या सांगण्यावरून. हा अत्यंत उद्धट आणि बेमुर्वतखोर आरोप आहे. मुळात मी हरीभौन्ना काही सांगेल ही माझी प्राज्ञा नाहीये. मलाही कोणी एखादी पोस्ट टाका असा आदेश देऊ शकत नाही. आम्ही स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहोत. किंबहुना त्यामुळेच आमचे मैत्रही अजरामर झालेले आहे. असले फालतू आरोपो करणारे मनोविकृत आहेत एवढेच काय ते मी म्हणू शकेल.
राहिले पडळकर किंवा तशाच प्रकारच्या अन्य नेत्यांबद्दल, जर हे कार्य त्यांच्या मेहरबानीने सुरूच जर झालेले नव्हते तर ते त्यांच्या बेमुर्वतखोरीमुळे थांबेल असा भ्रम कोणीही करून घेण्याचे कारण नाही.
- संजय सोनवणी
No comments:
Post a Comment