विशेषत:
अमेरिकेत साहित्यलेखनाच्या कार्यशालाही भरतात. कथा-पटकथांसाठी काही
संगणकप्रणाल्याही आहेत. पण यातून कोणी मोठा लेखक बनल्याचे
पाहण्यात/वाचण्यात नाही. साहित्य लेखन ही कल्पना सुचल्याक्षणापर्यंतची
प्रतिभा असते...पण पुढे लिहून काढणे ही केवळ हमाली असते असेही म्हटले जाते.
तसेच लेखक व्हायला प्रतिभा वगैरे काही लागत नाही असाही एक मतप्रवाह आहे.
हा मतप्रवाह मराठीतील गत पिढीच्या बव्हंशी लेखकांबाबत लागु पडतो हेही खरे
आहे कारण मुळ संकल्पना या आयत्या उचललेल्या असत. कधी बेमालुमपणे तर कधी सहज
लक्षात येतील अशा. अर्थात त्यांनाही पाश्चात्य कल्पना येथील
सांस्कृतीक/सामाजिक चौकटीत बसवायला हमालीकाम बरेच करावे लागत असे हेही खरे.
मुद्दा असा आहे कि लेखकाला प्रतिभा असते किंवा नाही वा केवळ कुशल-अकुशल
कारागिरी करणारा लेखक बनू शकतो कि नाही हा. मुळात लिहायला सुचणे व लिहावेसे
वाटणे या गुंतागुंतीच्या मानसशास्त्रीय प्रक्रिया आहेत. सुचलेली मूळ
कल्पना लिहिता लिहिता वेगळीच रुपे कशी धारण करते हे खुद्द लेखकालाही न
उलगडणारे कोडे असते. अमूक पात्र/प्रसंग/वाक्य असेच कसे लिहिले गेले हे
लेखकाला सहजी सांगता येईल असे वाटत नाही. किंबहूना त्याला जर परत तीच कृती
लिहायला सांगितली (आणि त्याने लिहिलीच) तर ती आधीच्या कृतीपेक्षा अत्यंत
वेगळी बनून जाईल. लेखकाच्या दृष्टीने लिहितावेळीचे अबोध पातळीवर वावरणारे
व्यक्तीव्युह/घटनाव्युह/प्रतीकव्युह/संकेतव्युह आणि शब्दव्युह कसे आकार
घेतील वा घेत असतात याची कल्पना समीक्षकांना करता येत नाही. फारतर ते लेखक
जीवनातील संगती/विसंगती पकडतो तसेच ते लेखनातील संगती/विसंगती पकडण्यात
तरबेज असतात व लेखकाच्या लेखनाला स्व-सापेक्ष आकलनमर्यादेतील
विचारव्युहात/संज्ञाव्युहात बसवण्याचा प्रयत्न करत असतात. पण लेखकाला
लिहितांना समिक्षकांना नंतर जे वाटते तेच अभिप्रेत असते असे नाही. किंबहुना
समिक्षा लेखकाला न्याय देवू शकतच नाही असे माझे मत आहे. अनेक चांगले
साहित्य हे समिक्षकांच्या लहरींमुळे वाचकांपासून दुरावल्याचेही अनेक
उदाहरणांतुन पाहता येईल.
प्रतिभा म्हणजे नेमके काय, त्याचे काही
वेगळे मेंदुतील रसायन असते काय, कि ती एक विशिष्ट लोकांमधील विशिष्ट काळात
होणारी एक शृंखलाबद्ध मानसिक प्रक्रिया आहे कि ज्यायोगे लेखकाला विशिष्ट
गोष्टी सुचतात व तो लिहायला प्रेरीत होतो...असे अनेक प्रश्न आहेत. त्यांची
शास्त्रीय उत्तरे भविष्यात कदाचित आपल्याला मिळतीलही. परंतू लेखक नुसता
कुशल वा अकुशल कामगार असतो असे सरसकट विधान करता येणार नाही. काही लेखक असे
असतात कि ते खरेच कामगारच असतात. अभ्यासाने, वाचनाने व निरिक्षणाने ते
कृत्रीम आराखडे कसे बनवायचे व शब्दांच्या विशिष्ट शैलीबद्ध संरचनेत त्या
आराखड्यांना कसे बसवायचे यात कुशल अथवा अकुशल असतात. या शैलीबद्ध संरचनेतच
त्यांचे यश अथवा अपयश असते. नेमाडे-जी.ए. हे अत्यंत यशस्वी कुशल कामगार
लेखक आहेत यात वाद नाही. त्यांची पात्रे विशिष्ट
विचारव्युह/संकेत/प्रतिमाव्युहांचेच प्रतिनिधित्व का करतात, ती जीवंत
हाडामांसाची पात्रे का नसतात याचे कारण यात आहे. कारण त्यांच्या रचना
एखाद्या कुशल कामगाराने ओतीव लोखंडातुन साच्यातून एखादी प्रतिमा साकारावी
तशी देखणी (अथवा कुरुप) पण मृतवत असतात. महत्व मिळते ते
विचारव्युह/संकेत/प्रतिमाव्युहांना. समीक्षकांना अशा रचनांना उलगडण्याचे एक
वेगळेच आव्हान असते म्हणुन ते अशा कृतींवर विविधांगांनी चर्चाही करत
असतात. जीवंत कलाकृती या सहसा चर्चेसाठी नसून जगण्यासाठीच असतात, म्हणून
त्या अधिक सोप्या व सहज-संज्ञा प्रवाहीही असतात. अशा रचनांना कारागिरीची व
फारच कलाकुसरींची गरजही नसते. शोलोखोवची And Quite Flows the Don (मराठी
अवतार म्हणजे तुंबाडचे खोत) किंवा टोल्स्टोयची Anna Karenina शैली अथवा
कलाकुसरीचा बडेजाव न मिरवताही जशा जीवंत (आणि श्रेष्ठही) कलाकृती वाटतात
तशा या कलाकृती असू शकत नाहीत कारण त्या प्रतिभेतुन नव्हे तर कलाकुसरीतुन
साकारलेल्या आहेत.
आपली (आमची व किंचित आधीची पिढी) पिढी ही एका
संक्रमणकाळातील संभ्रमाने भरलेली, स्वत्व गमावलेली आणि जीवनाकडे संशयाने व
संतापानेही पाहणारी पिढी. या पिढीने स्वतंत्र प्रतिभा गमावली आणि
कृत्रीमतेचा सोस बाळगत या मानसिकतेचे आरेखनात्मक दर्शन घडवायचा प्रयत्न
केला. त्यासाठी वापरता येतील तशा प्रतिमा व प्रमेयांचा भडिमार केला. या
सा-यांत जीवंतपणा नसला तरी विचारव्युहांचे प्रातिनिधिकत्व उमटल्याने त्या
यशस्वीही झाल्या. अर्थात अशा यशस्वी नगांचे प्रमाण अत्यंत कमी तर फसलेल्या,
अर्धवट अडकलेल्यांचे प्रमाण जास्त राहिले. आणि हे लोक "असे असते तेच
साहित्य" असे जोमाने सांगु लागले. नवलेखकांनाही तेच खरे वाटु लागले.
मातीच्या साहित्यात विशेष प्राण फुंकला गेला नाही तो नाहीच!
पण
कुशल-अकुशल कामगार या संज्ञेत लेखकांनी अडकु नये...किंबहुना कोणत्याही
साहित्यसंज्ञेत बसण्याच्या/बसवण्याच्या प्रेरणेने लिहुच नये...नाहीतर
साहित्य आहे तेथेच अडकून बसेल...प्रतिभा हवीच असते. असलेल्या प्रतिभेचा
विकास लेखकाने आपापल्या पद्धतीने अवश्य करावा. पण कारागि-या करणा-या कृती निर्माण करुन हाराकि-या करु नयेत.