Friday, December 7, 2012

हाराकि-या करु नयेत!

विशेषत: अमेरिकेत साहित्यलेखनाच्या कार्यशालाही भरतात. कथा-पटकथांसाठी काही संगणकप्रणाल्याही आहेत. पण यातून कोणी मोठा लेखक बनल्याचे पाहण्यात/वाचण्यात नाही. साहित्य लेखन ही कल्पना सुचल्याक्षणापर्यंतची प्रतिभा असते...पण पुढे लिहून काढणे ही केवळ हमाली असते असेही म्हटले जाते. तसेच लेखक व्हायला प्रतिभा वगैरे काही लागत नाही असाही एक मतप्रवाह आहे. हा मतप्रवाह मराठीतील गत पिढीच्या बव्हंशी लेखकांबाबत लागु पडतो हेही खरे आहे कारण मुळ संकल्पना या आयत्या उचललेल्या असत. कधी बेमालुमपणे तर कधी सहज लक्षात येतील अशा. अर्थात त्यांनाही पाश्चात्य कल्पना येथील सांस्कृतीक/सामाजिक चौकटीत बसवायला हमालीकाम बरेच करावे लागत असे हेही खरे. मुद्दा असा आहे कि लेखकाला प्रतिभा असते किंवा नाही वा केवळ कुशल-अकुशल कारागिरी करणारा लेखक बनू शकतो कि नाही हा. मुळात लिहायला सुचणे व लिहावेसे वाटणे या गुंतागुंतीच्या मानसशास्त्रीय प्रक्रिया आहेत. सुचलेली मूळ कल्पना लिहिता लिहिता वेगळीच रुपे कशी धारण करते हे खुद्द लेखकालाही न उलगडणारे कोडे असते. अमूक पात्र/प्रसंग/वाक्य असेच कसे लिहिले गेले हे लेखकाला सहजी सांगता येईल असे वाटत नाही. किंबहूना त्याला जर परत तीच कृती लिहायला सांगितली (आणि त्याने लिहिलीच) तर ती आधीच्या कृतीपेक्षा अत्यंत वेगळी बनून जाईल. लेखकाच्या दृष्टीने लिहितावेळीचे अबोध पातळीवर वावरणारे व्यक्तीव्युह/घटनाव्युह/प्रतीकव्युह/संकेतव्युह आणि शब्दव्युह कसे आकार घेतील वा घेत असतात याची कल्पना समीक्षकांना करता येत नाही. फारतर ते लेखक जीवनातील संगती/विसंगती पकडतो तसेच ते लेखनातील संगती/विसंगती पकडण्यात तरबेज असतात व लेखकाच्या लेखनाला स्व-सापेक्ष आकलनमर्यादेतील विचारव्युहात/संज्ञाव्युहात बसवण्याचा प्रयत्न करत असतात. पण लेखकाला लिहितांना समिक्षकांना नंतर जे वाटते तेच अभिप्रेत असते असे नाही. किंबहुना समिक्षा लेखकाला न्याय देवू शकतच नाही असे माझे मत आहे. अनेक चांगले साहित्य हे समिक्षकांच्या लहरींमुळे वाचकांपासून दुरावल्याचेही अनेक उदाहरणांतुन पाहता येईल.

प्रतिभा म्हणजे नेमके काय, त्याचे काही वेगळे मेंदुतील रसायन असते काय, कि ती एक विशिष्ट लोकांमधील विशिष्ट काळात होणारी एक शृंखलाबद्ध मानसिक प्रक्रिया आहे कि ज्यायोगे लेखकाला विशिष्ट गोष्टी सुचतात व तो लिहायला प्रेरीत होतो...असे अनेक प्रश्न आहेत. त्यांची शास्त्रीय उत्तरे भविष्यात कदाचित आपल्याला मिळतीलही. परंतू लेखक नुसता कुशल वा अकुशल कामगार असतो असे सरसकट विधान करता येणार नाही. काही लेखक असे असतात कि ते खरेच कामगारच असतात. अभ्यासाने, वाचनाने व निरिक्षणाने ते कृत्रीम आराखडे कसे बनवायचे व शब्दांच्या विशिष्ट शैलीबद्ध संरचनेत त्या आराखड्यांना कसे बसवायचे यात कुशल अथवा अकुशल असतात. या शैलीबद्ध संरचनेतच त्यांचे यश अथवा अपयश असते. नेमाडे-जी.ए. हे अत्यंत यशस्वी कुशल कामगार लेखक आहेत यात वाद नाही. त्यांची पात्रे विशिष्ट विचारव्युह/संकेत/प्रतिमाव्युहांचेच प्रतिनिधित्व का करतात, ती जीवंत हाडामांसाची पात्रे का नसतात याचे कारण यात आहे. कारण त्यांच्या रचना एखाद्या कुशल कामगाराने ओतीव लोखंडातुन साच्यातून एखादी प्रतिमा साकारावी तशी देखणी (अथवा कुरुप) पण मृतवत असतात. महत्व मिळते ते विचारव्युह/संकेत/प्रतिमाव्युहांना. समीक्षकांना अशा रचनांना उलगडण्याचे एक वेगळेच आव्हान असते म्हणुन ते अशा कृतींवर विविधांगांनी चर्चाही करत असतात. जीवंत कलाकृती या सहसा चर्चेसाठी नसून जगण्यासाठीच असतात, म्हणून त्या अधिक सोप्या व सहज-संज्ञा प्रवाहीही असतात. अशा रचनांना कारागिरीची व फारच कलाकुसरींची गरजही नसते. शोलोखोवची And Quite Flows the Don (मराठी अवतार म्हणजे तुंबाडचे खोत) किंवा टोल्स्टोयची Anna Karenina शैली अथवा कलाकुसरीचा बडेजाव न मिरवताही जशा जीवंत (आणि श्रेष्ठही) कलाकृती वाटतात तशा या कलाकृती असू शकत नाहीत कारण त्या प्रतिभेतुन नव्हे तर कलाकुसरीतुन साकारलेल्या आहेत.

आपली (आमची व किंचित आधीची पिढी) पिढी ही एका संक्रमणकाळातील संभ्रमाने भरलेली, स्वत्व गमावलेली आणि जीवनाकडे संशयाने व संतापानेही पाहणारी पिढी. या पिढीने स्वतंत्र प्रतिभा गमावली आणि कृत्रीमतेचा सोस बाळगत या मानसिकतेचे आरेखनात्मक दर्शन घडवायचा प्रयत्न केला. त्यासाठी वापरता येतील तशा प्रतिमा व प्रमेयांचा भडिमार केला. या सा-यांत जीवंतपणा नसला तरी विचारव्युहांचे प्रातिनिधिकत्व उमटल्याने त्या यशस्वीही झाल्या. अर्थात अशा यशस्वी नगांचे प्रमाण अत्यंत कमी तर फसलेल्या, अर्धवट अडकलेल्यांचे प्रमाण जास्त राहिले. आणि हे लोक "असे असते तेच साहित्य" असे जोमाने सांगु लागले. नवलेखकांनाही तेच खरे वाटु लागले. मातीच्या साहित्यात विशेष प्राण फुंकला गेला नाही तो नाहीच!

पण कुशल-अकुशल कामगार या संज्ञेत लेखकांनी अडकु नये...किंबहुना कोणत्याही साहित्यसंज्ञेत बसण्याच्या/बसवण्याच्या प्रेरणेने लिहुच नये...नाहीतर साहित्य आहे तेथेच अडकून बसेल...प्रतिभा हवीच असते. असलेल्या प्रतिभेचा विकास लेखकाने आपापल्या पद्धतीने अवश्य करावा. पण कारागि-या करणा-या कृती निर्माण करुन हाराकि-या करु नयेत.

4 comments:

  1. संजयजी,
    आपण विषय नवीन निवडला आहे .
    कथा,लघुकथा,कविता,खंड काव्य,निबंध,आत्म चरित्र यातील कादंबरी हा चर्चेचा विषय आहे असे वाटले होते पण
    तसा स्पष्ट उल्लेख आपण केलेला दिसला नाही.
    साहित्य लेखन असा आपला शब्द आहे.
    फिक्शन आणि नॉन फिक्शन असे दोन गट केले आणि विचार केला तर ?
    कल्पित लेखनात जितका प्रतिभेचा संबंध येतो तितका नॉन फिक्शन लेखनात येतो का ? चरित्र लेखन आणि इतिहास निबंध यात जे लेखन कौशल्य दिसते
    त्यात प्रतिभेच्या आविष्काराचा भाग असतो का ?
    तुंबाडचे खोत मध्ये - त्यातील वातावरण आणि पात्रे यांच्या एकत्रित रेखाटनाचा जो वास्तव कोकण जीवनाशी
    अस्खलित मेळ घातला आहे तेच त्या कादंबरीचे सौंदर्य आहे का ? का अजून काही त्यात आहे जे आपले मन जिंकते ?
    आपण कोसला ला मुद्दाम श्रेय देत नाही याचे वाईट वाटते.अनुल्लेखाने मारल्यासारखे वाटते !
    टोलस्टाय किंवा आपले ह.ना.आपटे यांच्या लांबण लावत -वास्तवाचे वर्णन -काल्पिताचे चित्रण -करण्याच्या काळात कादंबरीचा आकार अनावश्यक फुगत असे -
    लेखनश्रद्धा आणि प्रतिभा , तसेच तुमचे खाजगी आयुष्य ,सामाजिक जाणीव आणि लेखनाची उर्मी यांचे असलेले नाते -
    लेखनाची प्रेरणा ,प्रतिभेच्या आविश्कारासमयीची अस्वस्थता आणि प्रत्यक्ष लेखन यामधला काल हा प्रसूती वेदनेसारखा असतो असे म्हणतात ते खरेच असावे.
    याबाबत लेखक,चित्रकार - कवी - सगळ्यांचा अनुभव सारखाच असतो.
    फॉर्म हापण महत्वाचा असतो.व्हॉल्यूम - तसेच त्या फिक्शन चा निवडलेला काळ -सामाजिक पार्श्वभूमी -सर्वच महत्वाचे असते.
    त्यावर त्या लेखकाच्या जगण्याच्या तत्वज्ञानाचे संस्कार-
    पात्रांच्या तोंडून आपलेच जीवनविषयक तत्वज्ञान वदवून घेण्याची लेखकाची खोड - यातल्या कुठल्याही एका गोष्टीमुळे ती कादंबरी भरकटत जाऊ शकते.
    समीक्षक हा एक प्रकारे कलाकृतीचे रसग्रहण करत ,त्याचा आस्वाद् घेत,लेखकाला त्याची बलस्थाने आणि कमकुवतपणा दाखवत असतो.
    प्रतिभा सोडून जाते त्यावेळीचा काळ भीषण असतो.माध्यम बदल आणि तांत्रिक बदल यामुळे सुद्धा कलाकार बुचकळ्यात पडतो.
    चार्ली चाप्लीन हा जितका ब्लाक अन्ड व्हाईट मध्ये प्रभावी ठरला तितका रंगीत जमान्यात फुलला नाही.
    हिच् कॉकने जे एका ट्रोलीवर केले -रियरविण्डो माध्येते त्याच्या शेवटच्या फ्रेन्झी मध्ये आधुनिक यंत्र असूनही दिसत नाही.

    ReplyDelete
  2. संजय सर,
    आपण लिहिल्याप्रमाणे अगदी भाताची मूद पाडल्याप्रमाणे कादंबरीचे लेखन करून स्वतःला लेखक म्हणून मिरवणारे बरेच होते आणि आहेत.
    ज्यांना थोर मानले गेले तेसुद्धा सूक्ष्म विचार केला तर याच पठडीत बसतात.
    एका ठराविक फॉर्म मध्ये जे अडकून बसले त्यातून अगदी प्रा ना.सी.फडके आणि वि.स.खांडेकर यासारखे अतिरथी महारथी सुद्धा नाही वाचू शकले.
    आणि त्यांच्या त्याच त्याच साचेबद्ध प्रीतिकथा कादंबरी रुपात स्वतःचा ताजेपणा हरवून बसली अल्ला हो अकबर पासून एकूण ७४ कादंबऱ्या न.सी.फडके यांनी लिहिल्या - प्रा.वि.स.खांडेकर सुद्धा ययाती किंवा क्रौंचवध,अमृतवेल यातून लिहिते झाले पण तसे पाहिले तर भावनांचा कल्लोळ दाखवताना जीवनातील नाटय दाखवताना त्यातील आदर्शवादी खांडेकरी मांडणी पुढेपुढे कंटाळवाणी वाटू लागली.त्यांच्या लेखनात जीवन म्हणजे काय आहे ह्याच्या असंख्य व्याख्या दिसतात.तेसुद्धा या मोहातून स्वतःला वाचवू शकले नाहीत.बाकी लोकांचे तर बोलायलाच नको.
    सुहास शिरवळकर आणि कंपनी चे लेखन -महिन्याला एक- या स्पीडने " बाजारात " येत असते.
    स्त्रियांचे विश्व आणि लेखन असा एक वेगळा प्रकार पूर्वी होता.मालती बेडेकर,स्नेहलता दसनूरकर - त्यात ठराविक वेदना , ठराविक फ्रेम वर्क ,त्याच वाटा - कल्पना- तेच प्रश्न , तोच वेग आणि आवेग -असे असायचे.
    नाटककारांचेपण तेच
    बाळ कोल्हटकरांसारखी प्रचंड वेगवान स्वगते लिहित नाटक सादर करणारे,किंवा एकाच पद्धतीने भूमिका वठवणारे चित्तरंजन किंवा घाणेकर किंवा पणशीकर यांनी
    मराठी रंगभूमीला फक्त जिवंत ठेवले पण पुढे नाही नेले !
    कादंबरी या प्रकारात ऐतिहासिक कादंबऱ्यानी तर स्वामी नंतर धुमाकूळ घातला.
    जयवंत दळवी ,श्री ना पेंडसे,भाऊ पाध्ये ,अशानी हा साचा मोडून दुसरी वाट धरली,

    त्याच काळात intricacy kills the spirit असे जे म्हणतात ,तसे घडून आत्मा हरवलेल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या.
    परंतु
    नामदेव ढासळ, दया पवार आणि लक्ष्मण माने , मल्लिका अमरशेख यांच्या लेखनाने मराठी लेखानाविश्वात आणि भावविश्वात क्रांतीच झाली.
    पारंपारिक मध्यमवर्गीय जगात " हे असे पण जगावे लागते "हा आक्रोश पोचल्यामुळे लेखनात नवीन विचार ,अनुभवांचा ताजेपणा , आणि मांडणीतला साधेपणा सर्वाना अचंबित करून गेला.
    एकीकडे कादंबरीच्या मांडणीच्या पारंपारिक विचाराना शह देणारे " कोसला" आले.विषयातला वेगळेपणा ,मांडणीतला बाळबोधपणा सगळ्यांच्या नजरेत भरला.
    आता अनेक दिशांनी मराठी कादंबरी फुलते आहे.
    त्यातील धंदा आणि त्याच्याशी केलेली तडजोड कधीकधी मनाला क्लेश देते.पानांचा हिशोब करून लिहिणाऱ्यांचा उबग येतो.
    पण नवीन विचार ,नवीन स्वप्ने मराठी कादंबरी आपल्याला निश्चितपणे भरभरून देईल.
    नवीन आव्हाने पेलायची ताकद या सर्व लेखकात नक्कीच आहे अशी आशा बाळगायला जागा आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. मी तुमच्याशी सहमत आहे.

      Delete
  3. सर,
    थोडेसे आत्म चरित्रात्मक लेखनाविषयी
    आपण म्हणता तसे लिहिलेले आत्ताचे कुठलीही नक्षीकाम - कलाकुसर नसलेले ,पोटतीडीकेने लिहिलेले असे साहित्य जर कुठले असेल तर ते म्हणजे दलित आत्म कथन .
    त्याच्या निर्मितीबद्दल बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की तो वाग्मयीन आविष्कार सर्वार्थाने उत्स्फूर्त असा आहे.
    त्यातील "आत्म" कथन मनाला चटका लावणारे आहे.

    पुस्तकाचे लिखाण त्यांच्या जीवनासारखेच सरळसोट आहे.त्यातील वेदना सच्च्या आहेत -त्यात कोणताही मसाला किंवा भेसळीचा प्रकार नाही. आहे ते उघडे वागडे सत्य -
    त्यामुळे त्यातील सौंदर्य सतेज आहे.आणि मध्यमवर्गाने अवश्य वाचावे अशाच या रचना आहेत.

    मी वाचलेले पहिले आत्मचरित्रात्मक प्रवास वर्णन गोडसे भटजींनी माझा प्रवास १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वातावरणात लिहिले.त्याचे इंग्रजी भाषांतर या वर्षी २०१२ ला
    त्यांच्या सुमुखिनी वीझ नावाच्या खापर खापर पणतीने रोहन प्रकाशन तर्फे प्रकाशित केले.

    नंतर झाले वाचून कऱ्हेचे पाणी .खेडेगावातून येऊन आचार्य अत्रे यांनी जे करून दाखवले त्याने आश्चर्याने तोंडात बोट जाते.

    स्त्रियांच्या लेखनात एक प्रकारचा घरगुतीपणा मधल्या काळात जाणवत असे.त्याला छेद दिला तो "आहे मनोहर तरी" या आत्मचरित्राने.
    श्यामची आई हे पण न विसरता येणारे पुस्तक - आत्मकथन -आणि
    अलीकडचे ,कोसला मधले पांडुरंग सांगवीकर चे आत्म कथन वाचणे हा वेगळाच अनुभव आहे.

    दया पवार चे शब्द -
    शिळेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरडा
    किती जन्माची कैद कुणी निर्मिला हा कोंडवाडा -
    त्यांचे बलुते तर खाली ठेवताच येत नाही एकदा हातात धरले तर ! अशा कितीतरी न लिहिलेल्या आत्मकथा अजून असतील.त्यांना शब्द सापडत नसतील .
    न सांगितलेली हि वेदना अशीच एक दिवशी काळाच्या पडद्या आड जाईल.
    त्यांचा राग कुणा एकावर नसतो हो - ते भोग भोगत असतात ते मनुष्य निर्मित असतात - याचीपण त्यांना जाणीव नसते.
    त्यामुळेच त्याची विशालता आकाशाला जाऊन भिडते .
    सर्व समाजाला सांगताना त्यांचे मन आईच्या मायेने सांगत असते कि -लेकारानो , आम्ही भोगले ,
    पण आता आमच्या लेकरांना सांभाळा - इतके विशाल काळीज असते त्यांचे !
    त्यांचे थिजलेले डोळे आणि सुरकुतलेले हात सगळे मूकपणे सांगत असतात.न बोलता.एकही हुंदका न काढता ,
    संजय सर आपण कादंबरी या विषय नंतर आत्म कथेवर जरूर लिहा.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...