आजकाल अभिजनीय साहित्य आणि बहुजनीय साहित्य यावर चर्चा होत असते. बहुजनीय साहित्याला कथित अभिजनीय साहित्यिकांनी हेटाळने आणि बहुजनीय म्हणवणा-या साहित्यिकांनी कथित अभिजनीयांना हेटाळण्याचे प्रकार खुप वाढले आहेत. आपल्याकडे उच्चवर्णीय म्हणजे अभिजनीय असे मानण्याचा एक चुकीचा प्रघात पडलेला आहे. पण खरे वास्तव काय आहे?
जो संस्कृती घडवतो त्या वर्गाला अभिजन म्हणतात. मग हे अभिजन समाजाच्या कोणत्याही स्तरातुन (आपल्याकडे जातीतुन) आलेले असोत. या संस्कृतीचे जे अनुसरन करतात ते बहुजन...मग त्यांचा वर्ग कोणताही असो. जुन्या संस्कृत्यांत सुधारणा अथवा त्यांना पुरेपुर नाकारत नवसंस्कृत्यांचा उद्गार करत राहणे हेच नवाभिजनांचे कार्य असते. बहुजनांना नवसंस्कृत्यांची चाहुल काही केल्या लवकर लागतच नाही. शक्यतो जुन्यालाच चिकटुन राहणे त्यांना आवडते. संस्कृती निर्म्नाण करणारे आणि मग तिचे अनुसरन करणा-यांत किमान एक पिढीचे अंतर पडते ते यामुळे. पण दुर्दैव असे कि आपले तरुणही (पिढी कोणतीही असो) या बहुजनीय संस्कृतीचेच खंदे पाईक असल्याने आताच काय, अगदी मागेही, आपल्याकडे ख-या अर्थाने म्हणता येईल अशा अभिजनीय संस्कृतीचे निर्माण झालेलेच नाही. त्यामुळे आपले बहुजनीय-अभिजनीय सहित्याचे श्रेष्ठाश्रेष्ठत्वाचे वादच मुळात निरर्थक आणि गैरलागू आहेत. मी परवाच एका नवविचारवंताला म्हणालो...तुमची पिढी जेंव्हा सर्वस्वी आमचे आणि आधीच्या पिढीचे नाकारत स्वतंत्र विचार करत नाही तोवर तुम्ही केवळ भारवाही हमालच व्हाल...नवसृजन तुमच्याच्याने कधीही होणार नाही...कारण मागच्या पिढ्यांतील कोणीही आदर्श घ्यावे असे काहीही निर्माण केलेले नाही. संस्कृती घडवायला वा निर्माण करायला जी लागते ती मुळात कुवतच नव्हती. थोडक्यात अभिजन-बहुजन हा वाद तेंव्हाच लढता येईल जेंव्हा मुळात आम्ही अभिजन घडवू...सध्या तरी सर्वच बहुजन आहेत! प्रश्न आहे तो अभिजन कसे घडवायचे याचा. जातीमुळे कोणी अभिजन अथवा बहुजन होत नसतो. हा एक मिथ्याभ्रम आहे. प्रश्न आहे साहित्य संस्कृतीचे निर्माण करण्याचा.
संस्कृती निर्माण करायला अचाट साहस लागते. ख-या प्रतिभेचे जीवंत झरे अंतर्मनातुन उसळावे लागतात. त्यांना सामाजिक भयाचे बांध घालणारे काय संस्कृती घडवणार? कोण काय म्हणेल, स्तुती मिळेल कि निंदा याचा विचार करत भीत भीत सृजन करणारे काय लायकीचे साहित्य प्रसवणार? आमचे आधीचे आणि आताचेही बहुतेक साहित्यिक हे पापभिरु आणि म्हणुनच भेकड होते व आहेत. थोड्या टीकेचे लक्ष्य बनले तरी बेभान अस्वस्थ होणारे हे लोक. ताठ मानेने टीकेला सामोरे न जाता आपले छापील पुस्तक मागे घेणारे यादवी लोक आम्ही पाहिले नाहीत कि काय? समाजाला रुचेल-पटेल त्या चौकोनात आपली साहित्यिक मांडणी करण्यात यांच्या हयाती चाललेल्या आहेत. समाजमन अस्वस्थ करणारी, संपुर्ण व्यवस्थेला आव्हान देणारी, नव्या दृष्टीकोनातुन जगाकडे पहायला भाग पाडणारी अस्सल कृती आजतागायत मराठीत का झाली नाही याचे उत्तर या वैचारिक षंढपणात आहे.
हे कसली संस्कृती घडवणार? गेला बाजार इंग्रजी साहित्यातील प्रवाह उचलायचे आणि येथल्या समाजस्थितीचे वरकरणी कलम करत कागद खरडुन मिरवायचे यातुन संस्कृतीचे अध:पतन होत असते, निर्माण नव्हे याचे भान आलेलेलेच नाही.
ते येण्यासाठी नवीन पिढीच्या लेखकांनी मुलात आमच्या व आधीच्या पिढीचे सर्व साहित्य नाकारले पाहिजे. ते वाचताही कामा नये. अन्यथा त्याचाच अप्रत्यक्ष प्रभाव मनावर राहुन नवसृजनाच्या वाटा बंद होतील अशी भिती मला वाटते.