Tuesday, December 18, 2012

अभिजन कसे घडवायचे ?


आजकाल अभिजनीय साहित्य आणि बहुजनीय साहित्य यावर चर्चा होत असते. बहुजनीय साहित्याला कथित अभिजनीय साहित्यिकांनी हेटाळने आणि बहुजनीय म्हणवणा-या साहित्यिकांनी कथित अभिजनीयांना हेटाळण्याचे प्रकार खुप वाढले आहेत. आपल्याकडे उच्चवर्णीय म्हणजे अभिजनीय असे मानण्याचा एक चुकीचा प्रघात पडलेला आहे. पण खरे वास्तव काय आहे?

जो संस्कृती घडवतो त्या वर्गाला अभिजन म्हणतात. मग हे अभिजन समाजाच्या कोणत्याही स्तरातुन (आपल्याकडे जातीतुन) आलेले असोत. या संस्कृतीचे जे अनुसरन करतात ते बहुजन...मग त्यांचा वर्ग कोणताही असो. जुन्या संस्कृत्यांत सुधारणा अथवा त्यांना पुरेपुर नाकारत नवसंस्कृत्यांचा उद्गार करत राहणे हेच नवाभिजनांचे कार्य असते. बहुजनांना नवसंस्कृत्यांची चाहुल काही केल्या लवकर लागतच नाही. शक्यतो जुन्यालाच चिकटुन राहणे त्यांना आवडते. संस्कृती निर्म्नाण करणारे आणि मग तिचे अनुसरन करणा-यांत किमान एक पिढीचे अंतर पडते ते यामुळे. पण दुर्दैव असे कि आपले तरुणही (पिढी कोणतीही असो) या बहुजनीय संस्कृतीचेच खंदे पाईक असल्याने आताच काय, अगदी मागेही, आपल्याकडे ख-या अर्थाने म्हणता येईल अशा अभिजनीय संस्कृतीचे निर्माण झालेलेच नाही. त्यामुळे आपले बहुजनीय-अभिजनीय सहित्याचे श्रेष्ठाश्रेष्ठत्वाचे वादच मुळात निरर्थक आणि गैरलागू आहेत. मी परवाच एका नवविचारवंताला म्हणालो...तुमची पिढी जेंव्हा सर्वस्वी आमचे आणि आधीच्या पिढीचे नाकारत स्वतंत्र विचार करत नाही तोवर तुम्ही केवळ भारवाही हमालच व्हाल...नवसृजन तुमच्याच्याने कधीही होणार नाही...कारण मागच्या पिढ्यांतील कोणीही आदर्श घ्यावे असे काहीही निर्माण केलेले नाही. संस्कृती घडवायला वा निर्माण करायला जी लागते ती मुळात कुवतच नव्हती. थोडक्यात अभिजन-बहुजन हा वाद तेंव्हाच लढता येईल जेंव्हा मुळात आम्ही अभिजन घडवू...सध्या तरी सर्वच बहुजन आहेत! प्रश्न आहे तो अभिजन कसे घडवायचे याचा. जातीमुळे कोणी अभिजन अथवा बहुजन होत नसतो. हा एक मिथ्याभ्रम आहे. प्रश्न आहे साहित्य संस्कृतीचे निर्माण करण्याचा.

संस्कृती निर्माण करायला अचाट साहस लागते. ख-या प्रतिभेचे जीवंत झरे अंतर्मनातुन उसळावे लागतात. त्यांना सामाजिक भयाचे बांध घालणारे काय संस्कृती घडवणार? कोण काय म्हणेल, स्तुती मिळेल कि निंदा याचा विचार करत भीत भीत सृजन करणारे काय लायकीचे साहित्य प्रसवणार? आमचे आधीचे आणि आताचेही बहुतेक साहित्यिक हे पापभिरु आणि म्हणुनच भेकड होते व आहेत. थोड्या टीकेचे लक्ष्य बनले तरी बेभान अस्वस्थ होणारे हे लोक. ताठ मानेने टीकेला सामोरे न जाता आपले छापील पुस्तक मागे घेणारे यादवी लोक आम्ही पाहिले नाहीत कि काय? समाजाला रुचेल-पटेल त्या चौकोनात आपली साहित्यिक मांडणी करण्यात यांच्या हयाती चाललेल्या आहेत. समाजमन अस्वस्थ करणारी, संपुर्ण व्यवस्थेला आव्हान देणारी, नव्या दृष्टीकोनातुन जगाकडे पहायला भाग पाडणारी अस्सल कृती आजतागायत मराठीत का झाली नाही याचे उत्तर या वैचारिक षंढपणात आहे.

हे कसली संस्कृती घडवणार? गेला बाजार इंग्रजी साहित्यातील प्रवाह उचलायचे आणि येथल्या समाजस्थितीचे वरकरणी कलम करत कागद खरडुन मिरवायचे यातुन संस्कृतीचे अध:पतन होत असते, निर्माण नव्हे याचे भान आलेलेलेच नाही.

ते येण्यासाठी नवीन पिढीच्या लेखकांनी मुलात आमच्या व आधीच्या पिढीचे सर्व साहित्य नाकारले पाहिजे. ते वाचताही कामा नये. अन्यथा त्याचाच अप्रत्यक्ष प्रभाव मनावर राहुन नवसृजनाच्या वाटा बंद होतील अशी भिती मला वाटते.

1 comment:

  1. संजय ,
    आपले हे लेखन आततायीपणाचे वाटते.
    मराठी संस्कृती ही वार करणाऱ्यांची नसून वारकरी म्हणवून घेण्यात धन्य मानणारी संस्कृती आहे.
    अमुक एका पिढीचे लिखाण वाचूच नका असे सांगणे अतिशय चुकीचे आहे.
    नवनिर्मितीसाठी हा लेखनाच्या इतिहासाचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.
    आणि १०-१२ पुस्तके लिहून , आणि २० -२५ लेखकांच्या लेखणीने कधी संस्कृती निर्माण होते का कधी ?
    आपण सर्वसमावेशक असले पाहिजे. आपण जर असे आग्रही झालात तर आपल्यात आणि त्या ब्रिगेडी लोकात काय फरक राहिला ?आपण मराठी लोक सहिष्णू - अशी आपली ओळख आहे.आपण बेरजेचे गणित करणारे लोक आणि आपणच असे फतवे काढले तर कसे चालेल? आपल्याला मराठी मातीतले आपण तालिबानी बनायचे आहे का ?
    लेखन , चित्रकला , संगीत या व अशा कला या मुख्यत्वे स्वतःचा आविष्कार मांडायचे माध्यम असतात.आपल्या आत्म्याचे मनोगत आपल्या आवाजात सांगायची इच्छा होणे हेच किती अद्भुत असते - ज्ञानेश्वर ते केशवसुत, भा .रा.तांबे = आपापल्या परीने सांगून गेले !
    नदी लंघून जे गेले तयांची हाक ये कानी
    इथे हे ओढती मागे मला बांधुनी पाषाणी
    अक्षरे,लिपी,शब्द,वाक्ये यांचा वापर आपल्याला का करावासा वाटतो ? सृजनशील व्यक्ती माणसामाणसातील नाती घट्ट करायला त्याचा वापर करेल.
    स्वर,नाद,ताल,यातून आपले नादब्रह्म गायक उभे करेल,
    लावणी पासून अभंगापर्यंत, जनाबाईच्या पासून,बहिणाबाई पर्यंत आपला वारसा का उगाच - फुकाचा आहे. रामजोशी असो कि होनाजी बाळा- जात कुठे आडवी आली ?

    आणि यातले काहीच वाचू नका अशी गळ नवनिर्मिती करणाऱ्याला घालणे हा त्या नवलेखकावर अन्याय नाही का ?
    त्या नंतर अमुक वाचा - अमुकच वाचा असे सांगण्याचा हुकुमशाही मोह टाळणे अश्यक्यच नाही का ?
    तुम्हाला रेनेसान्स झालेच नाही आपल्याकडे - असे सुचवायचे असेल तर , रेनेसान्स न होण्याची कारणे अनेक सांगता येतील ! पण म्हणून आता उठा आणि २०१३ सालात "जुने जाऊ द्या मरणालागुनी -जाळून किंवा पुरुनी टाका -असा केशवसुती ओरडा करण्यात काय अर्थ आहे.
    हजारो वर्षांचा इतिहास काय सांगतो. भारताइतकी आदर्शवादाची व्यर्थ चर्चा जगाच्या पाठीवर कुठेच झाली नसेल , तरीही भारतात कधीही आदर्श वादातून क्रांती होणार नाही. मुळात आदर्शवादी असणे हा आपल्या संस्कृतीत कधीच महत्वाचा मुद्दा नव्हता.तसे असूच शकत नाही.आपली घडणच तशी नाही .

    पु.ल.देशपांडे आणि दुर्गा भागवत यांनी आणीबाणीत आटापिटा केला पण जनतेची स्मृती क्षण भंगुर असते हे जनतेनेच दाखवून दिले आणि जयप्रकाशांचे स्वप्न त्यांच्यासमोरच विरून गेले.
    लेखणीतून माणसाना पेटवणे इथे कधीच होणे नाही .आपला तो पिंडच नाही.
    हा दोष त्या लेखणीचा नसून - हा आपल्या जडण घडणीतला दोष आहे. सर्वसमावशकतेला याबद्दल फारतर आपण जबाबदार धरू शकतो. पण तेपण तितकेसे खरे नाही -
    आपल्या लोकांमध्ये बिरबलाचा मिश्कीलपणा इतका बेमालूम भिनला आहे की तो नेहमीच नव्या नव्या बद्शाहाना आपल्या मिश्किलीने नामोहरम करत असतो.
    हेच आपल्या संस्कृतीचे रहस्य आहे !
    धन्यवाद !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...