Thursday, January 24, 2013

च्यायला... आभासच कि!


मला पुरातन काळातून, कोणत्या हे नाही आठवत... एक सामंगा म्हणवणारा वयोवृद्ध गृहस्थ भेटायला आला. (कि मीच त्या काळात त्याला भेटायला गेलो होतो? नाही नीट आठवत मला...पण त्याने काय फरक पडतो? आजकाल या काळातुन त्या काळात मीही जातो आणि कोणत्याही काळातील लोक मला कधीही भेटायला येत असतात. पुरता गोंधळ उडतो बघा...) त्याच्या चेह-यावर ओसंडून वाहणारा आनंद होता. डोळ्यांत ऐन जवानीत असावी तशीच तेजोमयता आणि आभाळागत अथांग जिज्ञासा होती. त्याच्या देहाचा कण अन कण जणू आनंदाचे गाणे गात होता. एवढा आनंदी माणूस मी कोणत्याही काळात कधीही पाहिलेला नव्हता. किंबहूना एवढा आनंद कोणात भरभरुन उसळत असेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती.
तर सामंगा माझ्याकडे आला असेल अथवा मी त्याच्या काळात गेलो असेल, पण त्याचे दर्शन अत्यंत सुखावह (आणि किंचित असूया वाटेल असेही) होते एवढे नक्की!
त्याने मला त्याच्या निकट बसवले. त्याच्या स्पर्शात अनिवार हळुवारपणा व कौमल्य होते. स्नेहाची अपरंपार पाखर होती. जणू तो मला युगानुयुगापासून जाणत असावा एवढा ओलावा त्याच्या स्वरात होता.
"मुला, तू कधी उडते हरीण पाहिले आहे काय?"
या त्याच्या पहिल्याच प्रश्नाने मी दचकलो. विचारात पडलो. या माणसाचा आनंद वेडेपणातून तर आलेला नाही ना?
मला प्रश्न पडला.
माझ्या प्रश्नांकित चेह-याकडे पहात त्याने दुसरा प्रश्न विचारला, "म्हणजे नाहीच ना? नसावाच! कसा पाहणार? उडते हरीण कोठे असते तरी काय?" आणि तो मनसोक्त हसला. त्याचे शुष्क शरीर त्या हास्याबरोबर गदगदून हसत राहिले. माझ्या पाठीवर एक हळुवार थाप मारत तो म्हणाला, "पण माझ्या राज्यात असते. आणि ते फक्त मलाच दिसते. माझ्या राज्यात काय पहावे आणि काय नाही हे मी ठरवतो. मी ठरवतो ते मला दिसू लागते. आहे कि नाही गंमत?" आणि पुन्हा तो हसू लागला.
आता माझी खात्रीच पटली कि हा सामंगा ठार वेडा आहे. मी आठवायचा प्रयत्न करू लागलो...मी याला भेटायला आलोय कि हा मला? आजकाल माझ्या स्मृती विविध काळांत वावरत राहिल्याने तशा चमत्कारीकच झालेल्या होत्या. मी जर त्याला भेटायला आलेलो असेल तर का बरे? आणि समजा तोच माझ्याकडे आला असेल तर कशासाठी बरे?
मी माझ्या स्मृतींवर ताण दिला. मग आठवले.
मीच त्याला भेटायला आलेलो होतो.
का?
तेही आठवले...
मला युधिष्ठिरानेच त्याला भेटायला सुचवले होते. स्वर्गवाटेवर सारे हरपून जरा निराश बसलेल्या युधिष्ठिराला मी त्याला उमगलेला जीवनाचा अर्थ विचारला होता...तेंव्हा तो म्हणाला होता..."जीवनाचा अर्थ उमगलेला माणुस सारे काही हरपून बसत नसतो. बघ माझ्याकडे, मी एकाकी आहे. माझे प्राणप्रिय बंधू एकामागोमाग एक या वाटेवर निखळून पडले आहेत. ती महान सुंदरी द्रौपदीही! स्वर्गाचे द्वार माझ्यासमोर आहे...आणि आत प्रवेशायचीही इच्छा उरलेली नाही. मी काय उमगलो बरे?..." आणि एकाएकी तो रडायला लागला होता.
मी शांतपने त्याचे रडणे थांबायची वाट पाहिली होती. मग एकाएकी तो म्हणाला होता, "खरे तर कोणालाही काही उमगल्यासारखे वाटत असले तरी काहीही उमगलेले नसते आणि हाच जीवनाशी होणारा सर्वात क्रूर विनोद असतो! माझ्याशीही तसाच विनोद झालाय खरा. मला काहीही उमगलेले नाहीय!"
* * *
मी मौन राहिलो होतो. (अज्ञानाचे बावळट प्रदर्शन करण्यापेक्षा अनेकदा मौन सोयिस्कर आणि अर्थपूर्ण असते.)
काही वेळाने तोच म्हणाला, "आणि तू का प्रश्न विचारलास? समजा मला काही उमगले असेलही समजा, तर ते सांगून तुला तरी काय उपयोग? त्याने तुझ्या उमजेत काय भर पडनार आहे? अरे मुर्खा, मी खात असलेले अन्न तुझ्या पोटात कधी जावू शकते काय? काही लोक साक्षात्कारी होतात आणि लोकांनाही साक्षात्कारी करण्याचा दावा करतात...तशा काही बावळटांपैकी तू मला समजलास कि काय?"
मी तरीही मौन राहिलो होतो.
मग तो म्हणाला, "मला एक माणुस माहित आहे. त्याला सारे काही उमगलेले आहे आणि तरीही तो आनंदी असतो असे मी ऐकले आहे. उमगल्यानंतर मनूष्य कधी आनंदी झाल्याचे ऐकले आहेस काय? उलट ती उमगल्याचे ओझे बाळगत निरस आयुष्य गिळत असतात...ते जाऊदे, सामंगाला भेट. मला नाही माहित आता तो कोणत्या काळात आहे, पण त्याला भेट...."
"पण मला तुम्हाला जे उमगले ते ऐकायचे होते..." मी शेवटी मौन तोडले होते.
"मुर्ख माणसा, अंतिम उमगणे सर्वांचे सारखे असते असे म्हणतात...पण माझी समस्या ही आहे कि मला काहीच उमगलेले नाही तर काय सांगणार? मला एवढेच उमगलेय कि स्वर्गाच्या दारासमोर मी शेवटी एकटाच आहे...का? हे नाही उमगले...काय उपयोग आहे या छचोर उमगण्याचा? जा...तू सामंगाला भेट आणि मला माझ्या प्राक्तनावर सोड..."
* * *
तर युधिष्ठिराने मला सामंगाला भेटायला सांगितले होते आणि मी बरोबर तेथे पोहोचलो होतो.
पण हा तर वेडसर माणुस होता.
सारी भावंडे व पत्नी गमावल्यावर युधिष्ठिराला लागलेल्या वेडातून त्याने मला दुसरा वेडा तर सुचविला नव्हता ना?
सामंगा माझ्याकडे अपार कुतूहलाने पाहत होता. जणु तो मी काहीतरी बोलण्याची वाट पाहत होता.
पण माझ्याकडुन कसलाही प्रश्न येत नाही हे पाहून त्यानेच बोलायला सुरुवात केली. आता त्याचा चेहरा गंभीर झाला असला तरी त्याच्या डोळ्यांत तसेच हास्य होते.
"युधिष्ठिराला काहीच उमगले नसले म्हणून काय झाले. आपल्याला काहीच उमगले नाही हे उमगणे हेही अंतिम ज्ञानाचे लक्षण नव्हे काय?
"आणि आपल्याला दुस-याचे उमगणे, दुस-याचे ज्ञान काय कामाचे असते बरे? युधिष्ठिर तुला तेच म्हणत होता, तेंव्हाच तू समजून जायला हवे होते.
"तुला मी आनंदी का असतो याचे नवल वाटतेय ना?
"मी कोणत्याही काळात आनंदीच असतो, कारण मी काळासाठी जगत नसून माझ्यासाठी काळ जगत असतो.
"मी विश्वाचा घटक नसून मी आहे म्हणुन विश्व आहे हे मी जाणतो. मी अथवा तू नसशील तर तुझ्यासाठी-माझ्यासाठी विश्व मृतवत नाही काय?
"मी ठरवतो आणि माझ्यासाठी उडणारी हरणे येतात. मी ठरवतो आणि मी सळसळत्या तारुण्यात प्रवेश करतो आणि जीवनमदाचा यथेच्छ उपभोग घेतो.
"हे जग वास्तव आहे आणि अस्तित्वहीणही आहे. जगाचे वास्तव आपल्या आभासांत असते. पण ते आभास खरे नसतात...म्हणून वास्तव जीवन...जग मनुष्याला कधीच समजत नाही. मग त्याला काय उमगणार?
"आणि स्वत:च आपण स्वत:कडे जर आभासी कल्पनांतुन पाहत असू तर आपणही कोठे सत्य असतो?
"मी आनंदी दिसतो हाही भ्रम नाही काय? थोड्याच वेळापुर्वी मी तुला वेडा वाटलोच होतो ना?
"म्हणजे माझ्या आनंदाला वेडाचे लिंपण लागत असेल तर माझा आनंद खरा कसा?
"तुझा कालप्रवास खरा कसा आणि तो युधिष्ठिरही खरा कसा?
"मी कोठुनही कोठे जात नाही आणि कोठुनही कोठे येत नाही.
"खरे तर मी अस्तित्वात असुनही अस्तित्वातच नसेल तर माझा आनंद अस्तित्वात आहे असे मानणेही भ्रमच नव्हे काय?
"पण मी तरीही आनंदात आहे कारण आनंद हा मी निर्माण केलेला आभास आहे.
"मी जशी उडती हरणे निर्माण करु शकतो..तसाच आनंदही.
"दु:खाच्या आभासापेक्षा मला आनंदाभास प्रेय वाटतो म्हणुन मी आनंदी आहे.
"खरे तर दोन्हींचे अस्तित्वच नाही हे उमगणेही जर मला आनंदी करत असेल तर मी आनंदी राहणेच यथोचित आहे.
"आभास कोणतेही असोत...प्रिय वाटतात ते आभास निवडायचे स्वातंत्र्य तरी आपल्याला आहे कि नाही?
"होय, असते!
"आणि काय असते उमगणे बरे?
"उमगण्यासारखे यच्चयावत विश्वात काहीएक नाही कारण मुळात विश्व हाच एक आभास आहे, वास्तव नाही, एवढेच आभासी जीवनात
समजत असेल तर ते उमगणेही आभासच असनार ना?
"ते जाऊदे...काहीएक उमगून घेण्याचा प्रयत्न करू नकोस कारण काहीएक उमगण्यासारखे नसते...
"तुला लाव्हारसाचा शिरा खायचाय का?"
* * *

मी आता कोणत्या काळात आहे हे नाही माहित...
नाहीतरी माहित असणे म्हणजे तरी काय असते शेवटी?
च्यायला...
आभासच कि...
माहित असल्याचा...!
* * *

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...