कोणताही समाज कोणत्या दिशेने जाणार आहे, तो भविष्यात कोठे आणि कसा असेल हे समजावून घ्यायचे असेल तर आजची पिढी नव्या पिढीला कशी घडवते हे आधी पहावे लागेल! पिढीमागून पिढी असा शृंखलाबद्ध प्रवास मानवी समाज करत असतो. आई-वडिल, शिक्षक आणि समाज हे नव्या पिढीवर काहीना काही संस्कार करणारे घटक असतात. समाजाची वर्तमान स्थिती नवागत नागरिकाच्या समग्र व्यक्तिमत्वावर परिणाम करत असते. समाजाच्या निराशा, स्वप्ने व जगण्याच्या प्रेरणा नकळतपणे या नवांगत नागरिकाच्याही प्रेरणा बनतात व तो त्याच परिप्रेक्षात व परिघात स्वप्न पहायला लागतो. आहे त्या समाजव्यवस्थेत अडथळ्यांवर मात करत ती स्वप्ने पुर्ण करण्याचे प्रयत्न करू लागतो. अमेरिकेतील मुलगा जी स्वप्ने पाहिल ती स्वप्ने भारतातील मध्यमवर्गातील मुलगा पाहीलच असे नाही. किंबहुना अशीही स्वप्ने असू शकतात याची तो कल्पनाही करू शकणार नाही. शेवटी व्यवस्था स्वप्नांनाही बंदिस्त करते.
याकडे आपल्याला अत्यंत व्यापकपणे व अनेक अंगांनी पहावे लागेल. नवीन पिढी घडवणारा महत्वाचा घटक असतो व तो म्हणजे शिक्षण! विद्यार्थ्याला साक्षर बनवत विविध ज्ञानशाखांशी परिचय करून देत भविष्यात त्याला कोणत्यातरी एक आवडीच्या ज्ञानशाखेत नवी भर घालण्यासाठी अथवा एखादी नवीच ज्ञानशाखा स्वप्रतिभेने निर्माण करण्यासाठी त्याला तयार करणे म्हणजे शिक्षण! शिक्षण म्हणजे जुलमाचा रामराम नसते. प्रत्येक विद्यार्थी स्वत:तच एक स्वतंत्र विश्व असते, व्यक्तिमत्व असते. बाह्य प्रभाव जेवढे व्यक्तिमत्व घडवायला कारण घडतात त्याहीपेक्षा त्याच्या आंतरिक प्रेरणा महत्वाच्या ठरतात. या आंतरिक प्रेरणा लहानपणी सुप्तावस्थेत असल्या तरी व्यवस्था अशी असावी लागते कि वाढत्या वयाबरोबर त्या प्रेरणांचे सुयोग्य प्रस्फुटन होत सामाजिक संरचनेत महत्वाची भर घालणारा नागरिक तयार व्हावा.
पण आपण आजच्या आपल्या व्यवस्थेकडे पाहिले तर जे चित्र दिसते ते अत्यंत निराशाजनक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजे, आम्ही मुळात मुलांना शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्याला केवळ साक्षर बनवण्यापलीकडे व एक बौद्धिक श्रमिक बनवण्यापलीकडे काहीही विशेष साध्य करत नाही हे आपल्या लक्षात येईल. आमच्या द्रुष्टीने ’सब घोडे बारा टक्के’ या पद्धतीने ठराविक विषय लादत, सर्वात पास होणे बंधनकारक करत, ज्याला अधिक मार्क तो हुशार अशी धारणा बनवून बसलो आहोत. थोडक्यात मार्क हाच आमचा गुणवत्तेचा एकमेव निकष आहे. मेरिट अथवा गुणवत्ताही आम्ही त्यावरच मोजतो. "९७% मिळूनही प्रवेश नाही आणि ’त्यांना’ ५०% ला प्रवेश..." अशा प्रकारच्या सामाजिक दुहीतही अडकतो. ही एक वंचना आहे हे मात्र आपण मुलात समजावून घेतलेलेच नाही. मुळात ९७% मिळाले म्हणून त्याचे गुणवत्ता जास्त आणि कमी मिळाले म्हणुन गुणवत्ताच कमी असे ठरवण्याचे साधनच अस्तित्वात नाही. ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करुन घेतलेली फसगत आहे.
मुळात आपली शिक्षणव्यवस्था हीच मानवी प्रेरणांना विसंगत आहे. ’नैसर्गिक कल’ आणि त्यातच प्राविण्य मिळू देण्याच्या संध्या आम्ही नाकारलेल्या आहेत. थोडक्यात प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या भावी पिढ्या कशा घडणार नाहीत याचीच पुरेपूर काळजी आम्ही घेतली आहे. सरच प्रज्ञावंत होऊ शकत नाहीत हे सत्य मान्य केले तरी अशा बहुसंख्यांक विद्यार्थ्यांना जगण्याची कौशल्येसुद्धा शिकवण्यात आम्ही अजून खूप मागेच आहोत. पुन्हा वर आम्ही भावी विकासाच्या गप्पा मारतो ही तर मोठी विसंगती आहे. खरे म्हणजे आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीतून मुलांना खुरटवणारी, संकुचित करणारी, त्यांचे कुतुहल व स्वप्ने छाटणारी, कौशल्याचा अभाव असणारी पिढी घडवत आहोत हे आमच्या लक्षात कधी आले नाही. या नव्या पिढ्याही मग तशाच पुढच्या साचेबंद पिढ्या घडवत जाणार यात शंका बाळगण्याचे कारण नाही.
आज आपण पाहिले तर जागतिक पहिल्या २०० विद्यापीठांत आमचे एकही विद्यापीठ नाही. कोणत्याही ज्ञानशाखेत नवी भर घालणारे विद्वान व शास्त्रज्ञ आम्ही घडवले नाहीत. विदेशात जाऊन जे भारतीय अगदी नोबेलप्राप्तही होऊ शकले त्यांची गणना यात करण्याचे कारण नाही. येथे असते तर ते तसे घडू शकले नसते कारण आपली व्यवस्थाच मुळात प्रतिभेला फुलारू देणारी नाही हे कटू वास्तव त्यातुनच अधोरेखित होते. भारताचा नव्या जगात ज्ञान-विज्ञानक्षेत्रात नेमका वाटा काय हे पहायला गेले तर निराशाजनक चित्र सामोरे येते ते यामुळेच!
मग आम्ही आमची नवीन पिढी स्बल, सक्षम व प्रज्ञावंत बनवू शकलो नाही तर आमचे भविष्यही तेवढेच मरगललेले राहणार यात शंका नाही. आम्ही सर्व प्रश्नांवर आंदोलने करत आलेलो आहे. पण आमच्याच भवितव्याचा कळीचा प्रश्न जो आहे त्याबाबत मात्र आम्ही थंडगार आहोत. इंग्रजी माध्यमांच्या इंटरन्यशनल म्हणवणा-या शाळांत भरमसाठ पैसे भरून मुलाला प्रवेश मिळवला कि आपण कृतकृत्य झालो असेच सर्व पालकांना वाटते. मुलांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कशात करियर करावे हेही एकुणातला ट्रेंड पाहून ठरवले जाते. पण ज्याला हे सारे करायच आहे त्यालाच विचारात घेतले जात नाही. मतामतांच्या गलबल्यात तो दुर्लक्षितच राहतो व शेवटी मिळेल ती वाट चालू लागतो. एका अर्थाने आम्ही परिस्थितीशरण पिढी बनवत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही.
आपल्या व्यवस्थेतच दोष आहेत हे मान्य करू. हा दोष आमच्या विचार करण्याच्या पद्धतीतील भरकटलेल्या दिशेमुळे निर्माण झाला आहे हेही आपण स्विकारू. पण चुका कधी ना कधी दुरुस्त कराव्याच लागतात. एका रात्रीत व्यवस्था बदलत नाही हे मान्य केले तरी व्यवस्था बदलासाठी मानसिकता बनवणे व पुढाकार घेणारे काहीजण तरी पुढे येणे महत्वाचे असते. आणि येथे तर पुढाकार पालकांना घ्यावा लागणार आहे. पण त्यासाठी पालकांनाच शिक्षण म्हणजे नेमके काय याची जाण व भान देणे आवश्यक आहे. वर्तमानाचेच ते आव्हान आहे.
आज आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहोत. राष्ट्रवादही आपापले स्वरूप बदलतांना दिसत आहे त्यामुळे भविष्यातील जागतिकीकरण नेमके कसे असेल हेही आपल्याला अंदाजावे लागेल. जागतिक ज्ञान अशी संकल्पना असली तरी सर्वच ज्ञान जगातील सर्वांनाच उपलब्ध होऊ शकत नाही. अनेक राष्ट्रे आपापली गुपिते जपत असतात. त्यामुळे इतरांनी विकसीत करावे व मग त्यापासून आपण शिकावे अशी योजना भविष्यात अस्तित्वात येईलच असे नाही. खरे तर ज्ञानावर समस्त मानवजातीचा अधिकार हवा. पण तसे वास्तव नाही. आणि आपली सुरुवात तर ज्ञान म्हणजे काय या प्राथमिक स्तरावरच घुटमळते आहे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे हे अजून अगणित नागरिकांना तर माहितच नाही. ते माहित नसेल तर भविष्यातील ज्ञान-क्रांतीच्या दिशा कोणत्या असतील हे नेमके कसे समजणार? त्या शोधण्यासाठी आम्ही भारतीय कसा प्रयत्न करणार? आजही उच्चविद्याभुषित या संदर्भात गोंधळलेले दिसतात. सामान्यांची मग काय गत असणार?
भविष्यातील बुद्धीवाद आज आहे तसा राहणार नाही. भविष्यातील सामाजिक व आर्थिक आव्हानेही वेगळी असतील. त्याची प्रारुपे बदलतील. प्रश्नांचे गुंतवळे वेगळ्या स्वरुपात सामोरे येतील. किंबहुना जीवनशैलीच अत्यंत वेगळी बनलेली असेल. पण ती कशी असेल हे ठरवण्याचीही शक्ती आम्ही प्रगल्भ पिढ्यांच्या अभावात घालवून बसलेलो असू. प्रगल्भ पिढी घडते ती बंधमुक्त शिक्षणातून. मानवी प्रेरणांना अवसर देणा-या खुल्या व्यवस्थेतून. आज आपल्याला सर्वप्रथम विचार करावा लागणार आहे तो शिक्षणाबाबत, तिच्या पद्धतीबाबत. कार्यक्षम अंमलबजावणीबाबत. पालक ते शिक्षक आणि सभोवतालची व्यवस्थाच सक्षम नवी पिढी बनवू शकते. आम्हाला केवळ साक्षर नकोत तर बौद्धिक झेपा घ्यायला निरंतर सज्ज अशा प्रगल्भ वाघांची पिढी घडवायची आहे. त्यातच आमच्या समाजाचे, राष्ट्राच उज्ज्वल भविष्य सामावलेले आहे हे आम्हाला लक्षात घ्यावे लागेल.
-संजय सोनवणी
(Published in Daily Sanchar, 8-1-2017)