Sunday, September 11, 2011

हिंदु सामाजिक ऐक्यातील अडथळे आणि उपाय

हिंदु सामाजिक ऐक्यातील अडथळे आणि उपाय
-----------------संजय सोनवणी


हिंदुत्व हा शब्द आधुनिक काळात अत्यंत कळीचा आणि विवादास्पद मुद्दा बनलेला आहे. म्हनजे कागदोपत्री या देशातील किमान ८२% हिंदु आहेत पण हिंदुत्व हा शब्द आला कि सावध होणारे अगणित हिंदु आहेत. याचा अर्थ हिंदु आणि हिंदुत्व यात काही मुलभुत फरक आहे कि काय यावर विचार करणे आवश्यक आहे, त्याशिवाय सर्वच हिंदु असुनही हिंदुत्ववादाशी फारकत का घेतली जाते याचा उलगडा होणार नाही. उदाहरनच द्यायचे तर मी स्वता: हिंदु आहे परंतु मी हिंदुत्ववादी नाही. म्हनजे माझ्याही मानसिकतेत हिंदुत्ववाद हा वेगळा असून मी हिंदु असुनही हिंदुत्ववादी नाही. असेच असंख्य हिंदुंबाबत घडत असेल आणि हिंदुत्ववादाच्या मशाली कितीही पेटल्या असतील आणि तरीही सारेच त्या मशालींचा उजेड आपला मानत नसतील तर काहीतरी चुक होते आहे हे मान्य करावे लागते.
आपला धर्म श्रेष्ठ आहे, त्यात सामाजिकतेची सर्वच महनीय मुल्ल्ये आहेत आणि इहलोक आणि परलोकवादासाठी सारे उच्च तत्वद्न्यान आणि सोयी आपल्या धर्मात आहेत असे सारेच धर्मीय समजत असतात, तसा प्रचार-प्रसार करत असतात. हिंदु धर्मीयही त्याला अपवाद नाहीत. असुही नये. कारण एखाद्या धर्मात असण्याचे सामाजिक फायदे त्या-त्या धर्मातील लोक अविरत उपभोगतच असतात. हे फायदे प्राय: मानसिक जेवढे असतात तेवढेच व्यावहारिकही असतात. या दोन्ही फायद्यांपासुन मनुष्याला वंचित व्हावे लागते तेंव्हाच तो पर्याय शोधतो. हा पर्याय अर्थातच अन्य धर्माचा असतो. भारतात बौद्ध व जैन धर्म निर्माण होण्यापुर्वी दोन धर्मच काय ते आस्तित्वात होते. एक होता शैवप्रधान मुर्ती-प्रतिमापुजकांचा सुफलता विधीवर आधारित धर्म आणि त्याची प्रतिक्रिया म्हणुन सुदासाच्या काळात निर्माण झालेला यद्न्याधारित, अमुर्त दैवत्तांची आराधना करनारा वैदिक धर्म. तर्कतीर्थ लक्ष्मनशास्त्री जोशी यांनी नोंदवुन ठेवले आहे कि वैदिक धर्नाचा भारतातील उदय ही मध्योद्घट घटना असुन पुढे या दोन्ही धर्मांत सरमिसळ होत आजचा हिंदु धर्म आस्तित्वात आला. पुराणांनी (महाकाव्यांनीही) या मिश्रनास फार मोठ्या प्रमानावर हातभार लावला, त्यामुळे एका अर्थाने हिंदु धर्म हा पौराणिक धर्म आहे.
परंतु त्याच काळात यद्न्यांनाही (वेदांनाही) आणि मुर्ती/प्रतिमापुजक धर्मांनाही प्रतिक्रिया म्हणुन ज्याला आपण आधुनिक परिप्रेक्षात religion म्हनतो असे व्यक्तिप्रणित धर्म निर्माण झाले..ते म्हणजे बौद्ध व जैन होत. खरे तर या दोन्ही धर्मांची पाळेमुळे मुळच्या स्रमण सम्स्क्रुतीत जातात. पण ही अवस्था निर्माण करायला दोन्ही धर्म (वैदिक व शैवप्रधान) कारणीभुत झाले हेही अमान्य करता येत नाही. वैदिक धर्मातील यद्न्यातील पशुहिंसा आणि पारंपारिक धर्मांतील मुर्तीपुजा, मोक्षादि संकल्पना, जातीव्यवस्था आणि स्रुष्टीनिर्माता परमेश्वर या संकल्पना जैन व बौद्ध धर्माने (किमान आरंभी तरी) नाकारल्या. अन्य तत्वद्न्यान बव्हंशी एकच राहिले असले तरी कर्मकांडे मात्र बदलली. आज या दोन्ही धर्मांना (शिख धरुन) हिंदु मानण्याची प्रथा आहे पण ते वास्तव नाही.
हिंदु शब्दाची धर्म म्हणुन सर्वमान्य व्याख्या नाही. माझ्या द्रुष्टीने तरीही हिंदू धर्माची व्याख्या करता येते. प्रत्येक धर्म हा कोणत्या तरी तत्वद्न्यान आणि कर्मकांडावर उभा असतो. तत्वद्न्यान आणि कर्मकांड हे परस्परपुरक असते. य दोहोंचा संबंध तत्वद्न्यानात्मक पातळीवर कधी परस्परसमर्थनीय वा विरोधाभासात्मकही असू शकतो. परंतू ते सर्वस्वी एकमेकांना छेद देनारे नसतात. यासाठी आपण आधी प्रथम या धर्माची अव्यवच्छेदक कर्मकांडात्मक व तत्वद्न्यानात्मक वैशिष्ट्ये पाहुयात, जी या धर्माला अन्य धर्मांपासुन आपसूक वेगळे करतात.

१. प्रतिमा/मुर्ति पुजा: वैदिक म्हणवणारे ब्राह्मण ते आदिवासीं हे आज मुर्तिपुजक आहेत. या सर्वच, श्रेष्ठ ते सर्वच गौण दैवते ही कोणत्या-ना-कोणत्या प्रकारे पुरांणांत वा स्थलपुराणांत निर्दिष्ट आहेत.
२. पुजा, व्रते-वैकल्ये, योग, तप, संन्यास ही इष्ट दैवताला प्रसन्न करणे ते मोक्ष मिळवणे या धेयासाठी वापरली जाणारी, प्रत्येकाच्या आध्यात्मिक कुवतीनुसार वापरण्यास दिलेली कर्मकांडात्मक साधने आहेत. (पहा सर्वच पुराणे)
३. तत्वद्न्यानात्मक पातळीवर अद्वैत सिद्धांत हा परमोच्च सिद्धांत असून तो मनुष्य, प्राणिमात्र आणि सर्वच दैवतांत एकत्व/अभिन्नत्व पहातो. (पहा: आदी शंकराचार्य: ब्रह्मसुत्र भाष्य)
४. हे सिद्धांत सेश्वर असूनही इश्वर मानवी जीवनात कसलाही हस्तक्षेप करत नाही, तो सदय नाही कि निर्दय नाही, हे वैद्न्यानिक तत्वद्न्यान परमोच्च पातळीवर स्वीकारले गेले आहे.
५. आध्यात्मिक प्रगतिच्या पाय-या स्वयंनिर्दिष्ट असून स्थुलाकडुन सुक्ष्माकडे आणि सुक्ष्माकडुन शुन्याकडे नेणारे तत्वद्न्यान उपलब्ध आहे. (पहा-ब्रह्मसुत्रे)
६. जोवर प्राणिजात स्थुलाकडुन सुक्ष्मात आणि शेवटी शुन्यात जाणा-या पाय-या ओलांडत नाही तोवर पुनर्जन्म अटळ आहे हा एक सिद्धांत. (त्याला मी कर्मविपाक सिद्धांत म्हणत नाही.) याला खरे तर मी चढत्या प्रगतीचा सिद्धांत मानतो.
७. आत्मा हा अमर असून त्यावर कसल्याही क्रुत्याचा परिणाम होत नाही एवढा तो अलिप्त आणि निर्विकार आहे.
८. विश्वाची निर्मिती ही शिव आणि शक्ति या एकातुनच दोन अशा विभक्त झालेल्या अद्वैताचे द्वैत यातुन झालेली आहे. (वैष्णव शिव-शक्तीऐवजी वैष्णव सद्न्या वापरतात...पण मुलार्थ एकच आहे. )
९. जन्माधारित जाती आणि वर्णव्यवस्था हे या धर्माचे अविभाज्य आणि एकमेवद्वितीय लक्षण आहे.

थोडक्यात नाव काहीही दिले तरी वरील नऊ मुद्दे या धर्माला अन्य सर्वच धर्मापासुन वेगळे करतात. धार्मिक/आध्यात्मिक आणि कर्मकांडात्मक स्वतंत्र वैषिष्ट्ये येथे विद्यमान आहेत. ही अन्य धर्मांत नाहीत. ही वैशिष्ट्ये वैदिक ते ज्यु धर्मातही आढळनार नाहीत. यामुळे हिंदु धर्माची व्याख्या करणे अशक्यप्राय बाब नव्हती हे तरी स्पष्ट व्हावे. कोणत्याही धर्मात विश्वनिर्मिती, तत्वद्न्यान आणि धार्मिक कर्मकांड हेच त्या-त्या धर्माला आस्तित्व देणारे घटक असतात. या आधारावरच हिंदु धर्माची व्याख्या करता येईल. असो.
हिंदु धर्माचे आजचे वास्तव
हिंदु धर्म हा जगातील सर्वात प्राचीन आणि कालौघात बदल स्वीकारत (कधी प्रतिगामी तर कधी पुरोगामी) टिकुन राहिलेला जगातील एकमेव धर्म आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. असे असुनही या धर्माला पराकोटीची गळती लागलेली आहे हे वास्तवही अमान्य करता येत नाही. एवढेच नव्हे तर धर्मांतर्गत संघर्ष हा विकोपाला जावुन पोहोचला असुन धर्मालाच नाकारण्याची प्रथा वाढत चालली आहे. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करुन हिंदु धर्माला आव्हान दिले होते हे सर्वद्न्यात आहेच. अलीकडे तर शिव धर्म नामक धर्मही स्थापन झाला आहे. अशा प्रयत्नांना हसण्याआधी मुळात हा विद्रोह का निर्माण झाला आहे यावर चिंतन केल्याखेरीज हा तिढा सुटनार नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. समाजातीलच घटक परस्पर द्वेष करत असता धर्माचे काही कल्याण होईल असे समजणे वेडगळपणाचे आहे.
आजचा हिंदु धर्म हा ब्राह्मनी धर्म आहे म्हणुन तो नाकारला पाहिजे अशी आग्रही भुमिका अनेक विचारवंतही घेत आहेत. विद्रोही चळवळ करणारे या मतावर ठाम आहेत. धर्मावरील ब्राह्मणी वर्चस्वतावाद खटकणारे तर असंख्य आहेत. काहींची मजल तर ब्राह्मणांना कापुन टाका/कत्तली करा अशी आवाहने करण्यापर्यंत गेली आहे. या तक्रारीत/आरोपात तथ्य नाही असे म्हणुन चालणार नाही.
दुसरे असे कि रा.स्व.संघ, सनातन प्रभात, बजरंग दलादि कडव्या हिंदुत्ववादी संघटना हिंदु ऐक्यात बाधक आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. या संघटनांवर ब्राह्मणी शिक्का बसलेला आहे आणि तो अमान्य करण्याचे कारण नाही. किंबहुना त्यामुळेच असंख्य लोक त्यापासुन नुसते फटकुन रहात नाहीत तर त्यांच्यावर जहाल टीकाही केली जाते हे एक वास्तवच आहे.
तिसरे असे कि जातीव्यवस्थेचे निर्माते हे ब्राह्मणच आहेत असा आरोप केला जातो. त्यामुळे जी सामाजिक विषमता निर्माण होवुन त्यांचे (स्त्रीयांचेही) धार्मिक समतेचे अधिकार तर नाकारले गेलेच पण अस्प्रुष्यतेचा मानवताहीण कलंकही ब्राह्मणांवर आहे असे प्रतिपादित केले जाते. ते सहजी पटण्यासारखे असल्याने ब्राह्मण सामाजिक रोषाला बळी पदतात.
जातीव्यवस्थेबाबत माझी वेगळी मते आहेत. समाजात आधी एक व्यवस्था निर्माण होते आणि नंतर त्यांचे नियमन धर्मनेते करत असतत. ब्राह्मणांनी सांगितले आणि सर्व समाजांनी विनातक्रार ऐकले असे कोठेही घडत नाही. सर्वच समाजाने जन्माधारित जातीव्यवस्था स्वीकारली असेच मला इतिहासावरुन दिसते. येथे त्याबाबत अधिक विवेचन न करता एवढेच म्हणतो कि जातीव्यवस्थेचे पाप सर्वस्वी ब्राह्मणांवर ढकलणे अन्याय्य आहे. फार तर त्यांनीही ही व्यवस्था स्वीकारली आणि त्यांचे नियमन केले एवढेच म्हणता येईल.
परंतु वरील अनेक जे काही आक्षेप मी नोंदवले आहेत त्याबाबत ब्राह्मण समाजाने अपवाद वगळता सर्वस्वी दुर्लक्ष केलेले आहे असे स्पष्ट दिसते. उलट इस्लाम-ख्रिस्त्यांचा द्वेष पसरवत त्यामुळे हिंदु एकत्र येतील अशीच त्यांची व त्यांचे वर्चस्व असना-या संघटनांची भावना दिसते. पण तसे झालेले नाही...आणि होण्याची शक्यताही नाही. याचे कारण म्हनजे धर्मातच कालसुसंगत परिवर्तन घडवायला हवे, त्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलेले नाही.
आज हिंदु धर्म ६५०० जातींत वाटला गेलेला आहे. यातील असंख्य जातींना मंदिर प्रवेशही नाकारला जातो. काही मंदिरांत स्त्रीयांनाही प्रवेश नाही. त्यांचे किमान धार्मिक अधिकारही नाकारले गेलेले आहेत. अनेक जातीयांचे लग्न लावायला ब्राह्मण पुरोहित (उपलब्ध असले तरी) नकार देतात. पेशवाईतही सासवड येथे महार समाजाने याबाबत फिर्याद गुदरली होती....आजही परिस्थिती फार बदलली आहे असे म्हणता येत नाही.
महाराष्ट्रातील हिंदु समाजाचे आजचे दुसरे वास्तव म्हनजे सत्ताधारी जातींचा झालेला नवोदय. १९०९ साली एकही आमदार नसलेल्या महाराष्ट्रात आज ७०% सत्ता एकाच मराठा जातीच्या हातात एकवटली गेली आहे. ५-६ राज्यांचा अपवाद सोडला (जेथे हिंदुच नाहीत वा अल्पसंख्य आहेत) तर पुर्वी क्षत्रीय म्हणुन मिरवणा-या जातीच पुन्हा सत्तेत नवे सरंजामदार बनले असुन जवळपास वंशपरंपरागत सत्ता भोगत आहेत. विद्रोहींचा आरोप आहे कि धर्मसत्तेचे चालक ब्राह्मण आणि सत्ताधारी जाती यांच्यातील पुरातन युती पुन्हा अवतरलेली आहे. जी आहे ती लोकशाही केवळ नावाची आहे.
या आरोपातुन जो एक हिंदुधर्मांतर्गत विद्रोह निर्माण झाला आहे तो असा कि ही एका परीने मनुस्म्रुतीची नव्या पद्धतीची अम्मलबजावनी आहे. प्राचीन काळातही धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालुनच काम करत होते. ब्राह्मणांनी धर्माविषयक निर्णय दिला तर त्याची अम्मलबजावणी करणारे हेच वर्ग होते. त्यामुळे धार्मिक बाबींत जेही काही अन्याय्य घडले आहे त्या पापापासुन या वर्गाची मुक्तता होण्याची सुतराम शक्यता नाही, आणि ते खरेही आहे.
यामुळे संख्येने अधिक असुनही जे निर्माणकर्ता ओबीसी, भटके-विमुक्त, दलित, आदिवासी ई. घटक लोकशाही असुनही नव्य गुलामीत अडकलेले आहेत आणि याबाबतचा विद्रोह हिंदु ऐक्याच्या मार्गातील महत्वाचा अडसर ठरणार आहे हे क्रुपया समजावुन घ्यावे. ब्राह्मण नेहमीच सतीच्या बाजुने असतात (अपवाद आहेत....पण किती?) हा आरोप महत्वाचा ठरतो तो यामुळेच. ब्राह्मण समाजाबद्दल एक प्रकारचा असंतोश आहे आणि एकाच धर्माचा समग्र विचार केला तर मुळात असे आक्षेप निर्माण होनार नाहीत यासाठी ब्राह्मण समाज काय करणार आहे हा मला येथे प्रश्न पडतो.
अन्य धर्मियांमुळे निर्माण झालेल्या समस्या
मी धर्मांतर्गतच्या काही महत्वाच्या समस्यांचा धावता आढावा घेतला आहेच. त्यामुळे धर्माची इमारत खिळखिळी होत आहे याचे धर्मप्रेमींना दु:ख होणे स्वाभाविक आहे. पण हे येथेच थांबत नाही. अन्य धर्मियांमुळे होणारे आघात तेवढेच भयंकर आहेत. आणि या आघातांचा इतिहास पुरातन आहे. भारतावर प्राचीन काळांपासुन अनेक आक्रमने झाली. ग्रीकांनी येथील धर्मावर आघात केले नाहीत. शक-हुण-कुशाणांनी तर येथीलच धर्म स्वीकारले. पण कुशाण राजा कनिष्काने प्रथम हिंदु (खरे तर शैव...तो स्वत:ला शिवपुत्र मानत असे.) आणि नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्याची ही शिफ्ट भारतीय धर्मेतिहासाला वेगळेच वळन देणारी ठरली यावर आजतागायत कोणी विशेष भाष्य केल्याचे मला तरी कोठे आढळलेले नाही. बौद्ध धर्म हा जेंव्हा विस्कळीत आणि विखुरण्याच्या मार्गावर होता तेंव्हा त्याने तिसरी धर्मसंगिती भरवुन बुद्ध धर्माला नवे संजीवन दिले. यानंतर बुद्ध धर्मही खुप बदलला. त्यामुळे बौद्ध धर्माला कितपत लाभ झाला याबाबत स्वतंत्र विवेचन करता येईल, परंतु राजाश्रयाची नवी सुरुवात झाली आणि ती सातवाहनादि सम्राटांनी पाळली हे वास्तव आहे. परंतु इस्लामचा झंझावात मात्र या धर्माला अधिक संकुचित करत गेला. अमानवी बनवत गेला हे वास्तव विसरता येत नाही.
अन्यत्र इस्लाम जेथेही गेला तेथे तेथे काही दिवसांत संपुर्ण जनसंख्या मुस्लिम बनवण्यात त्यांना यश आले, पण जवळपास ५०० वर्ष इस्लामला दुर ठेवण्यात यशही आले होते हा स्वर्णकाळ महत्वाचा आहे तसेच सत्तास्थापन झाल्यानंतर जरी लक्षावधी लोकांना बातवण्यात इस्लामला यश आले असले तरी संपुर्ण देश त्यांना मुस्लिम बनवता आला नाही हेही एक वास्तव आहे. नंतर आलेली लाट ख्रिस्त्यांची होती. त्यांनीही जमेल त्या पद्धतीने हिंदुंचे धर्मांतर करण्याचा घाट घातला. इशाण्यपुर्व राज्ये संपुर्ण वा बव्हंशे ख्रिस्ती बनली. असंख्य आदिवासी ख्रिस्ती बनले. ते स्वाभाविक होते कारण त्यांना हिंदु हा धर्म आपला असे कधी वाटण्याचा प्रसंगच आला नाही.
आज भारतात १३% लोक मुस्लिम आहेत. त्यातील किमान १०% हे मुळचे हिंदुच आहेत. ते सर्वस्वी हिंदुंचे शत्रु आहेत असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न रा.स्व. संघाच्या स्थापना काळापासुन होत आहेत. ५७ चे बंड (त्याला कोणी जिहाद म्हणतो तर कोणी स्वातंत्र्यसमर...हवे ते घ्या.) बहाद्दुरशहा जफरलाच सत्तेवर बसवण्यासाठी होते. तत्पुर्वी पहिला शाहु ते पेशवाईच्या अंतापर्यंत हिंदु सत्तांनी (त्यात जाट, रजपुथी आले) दिल्लीचे तख्त राखण्याचीच प्रतिद्न्या केली होती. म्हनजे एतद्देशीय मुस्लिम हे हिंदुंचे शत्रु आहेत असा अभिनिवेश या प्रदिर्घ काळात दिसत नाही.
परंतु स्वातंत्र्य द्रुष्टीपथात आल्यावर मात्र लोकशाहीमुळे सत्तेची केंद्रे हिंदुंकडे जातील या समजातुन म्हणा कि अपसमजातुन, हिंदु-मुस्लिम संघर्षाची ठिणगी पेटली. पुरातन सौहार्द नष्ट झाले. यात कट्टर पंथीय हिंदुंनी हिंदु म्हणुन आपली मुस्लिमांबद्दलची पुर्वापार भावनाही बदलली. त्यातुनच अनेक अनर्थ झाले. आजही होत आहेत. त्यातुनच बाबरी मशिद असो कि मुस्लिम दहशतवाद्यांची अनवरत हिंसक क्रुत्ये असोत यांचा उगम झाला.
हिंदु धर्मासमोरील समस्या कमी झाली तर नाहीच प्ण एक न्रुशंस आव्हान उभे ठाकले.
दुसरी समस्या म्हणजे धर्मांतरांची. इस्लामी कालातही सर्वच धर्मांतरे बळजबरीने झाली असे म्हनता येत नाही. अनेकांनी हिंदु धर्माने नाकारलेली समता मिळेल वा सत्तेत वाटा मिळेल म्हणुन स्वेच्छेनेही धर्म बदलला. काहींनी तर जिझिया कर माफ होईल म्हणुन धर्म बदलला. ब्राह्मण हे हिंदु नाहीत म्हणुन जिझिया कराला पात्र नाहीत असे म्हणुन काहींनी त्या जाचक करातुन सुटकाही करुन घेतली.
या सर्वातुन एकच झाले ते म्हणजे हिंदुंची संख्या घटत गेली. बरे आजही ते प्रमाण थांबले आहे काय? उत्तर आहे...नाही. डा. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली असली तरी त्यांनी तब्बल २० वर्ष वाट पाहिली...का तर त्यांचे एकमेव अपेक्षा होती ती ही कि हिंदु धर्मातील अस्प्रुष्यता काढुन टाका आणि मंदिर प्रवेश सर्वांना खुला करा. ही मागणी नक्कीच धर्मसुसंगत (अद्वैतता मानणारे कोण आहेत?) होती आणि मानवतावादी होती. परंतु ती मागणी मान्य झाली नाही. ही हिंदु धर्माच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे हे मी येथे स्पष्टपणे नमुद करतो. हीच बाब लक्षमन माने यांनी अलीकडेच धर्मांतराची घोषणा केली आणि कोणाही धर्ममार्तंडाने कसलेही प्रयत्न केले नाहीत याबाबतची.
थोडक्यात धर्माला गळती लागावी अशीच काय ती भावना दिसते.
हिंदु धर्मात दुस-यांना घेणे ही प्रक्रिया तर २००० वर्षांपासुन जवळपास थांबलेली आहे. शक, हुण, कुशाण ते सिथियनांना व्रात्यस्तोम विधी करुन हिंदु धर्मात घेण्याची प्रथा एके काळी होती. तेंव्हा फक्त वर्णव्यवस्था प्रबळ असल्याने त्यांना शक्यतो क्षत्रीय वर्ण दिला गेला. मगी लोकांना ते सुर्यपुजक असल्याने ब्राह्मण वर्णात प्रवेश दिला गेला. चित्पावनांना ते एतद्देशीय नसले तरी ब्राह्मण वर्णात प्रवेश दिला गेला. परंतु आज वर्ण म्हणुन फक्त ब्राह्मण आणि शुद्र हेच शिल्लक असल्याने अन्य धर्मियाने समजा हिंदु व्हायचे ठरवले तरी ते प्रकरण तेथेच थांबत नाही तर त्या धर्मांतरिताला कोणती जात देनार? आणि तुम्ही द्याल ती तो कसा स्वीकारेल?
त्यामुळे वैचारिक तात्विक पातळीवर हिंदु धर्माचे महनीय तत्वद्न्यान पगडा टाकु शकले तरी अन्यांना हिंदु बनणे एवढे सोपे नाही. त्यामुळे हिंदु धर्माची तशा पद्धतीने वाढ होण्याची शक्यता नाही आणि भविष्यात तो राहील कि नाही असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. परंतु प्रस्तुत लेख मी फक्त रडगाणे गाण्यासाठी लिहिलेला नसुन मला वाटतात ते उपाय सुचवण्यासाठी आहे.
नव्या कालसुसंगत धर्मरचनेची गरज!
जोही कोणी वर्नवर्चस्ववादी/जातीय हिंदु आहे त्याला मी म्हणतो हे पटनार नाही ही जानीव ठवुनच मी पुढील मुद्दे मांडत आहे.
हिंदु धर्मात वेगवेगळ्या काळात किमान १८ स्म्रुत्या लिहिल्या गेलेल्या आहेत. सर्व स्म्रुती परस्परसुसम्गत नसुन त्या-त्या काळाच्या परिप्रेक्षात आणि सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने लिहिल्या गेलेल्या आहेत. मग २१ व्या शतकाच्या वर्तमानस्थितीला अनुसरुन संपुर्ण मानवतावादी-समतावादी स्म्रुती का लिहिली जावु शकत नाही?
मी वर हिंदु धर्माची महत्वाची लक्षने मांडली आहेत. त्यात अद्वैतता, पुजनीय दैवतांची हव्या तशा निवडीचे स्वातंत्र्य, अगदी अनिश्वरही राहण्याची मुभा (जी अन्य कोणत्याही धर्मात नाही) इं या धर्माची महनीय तत्वे मांडलेली आहेत आणि सर्वच हिंदु त्या तत्वांचा लाभ घेतात. अगदी पीरालाही जाण्यावर हा धर्म बंधन घालत नाही.
हा एवढा उदार आणि महनीय तत्वे मांडनारा धर्म जर आहे तर सर्वच धर्मियांना सामाजिक पातळीवर समता देण्यास या धर्माला कोणी अडवले आहे? चांडाळवेशात आद्य शंकराचार्यांना शिव अद्वैताचा शेवटचा धडा देतो या दंतकथेतुन तरी आपण शिकायला हवे कि नाही?
सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, हिंदु धर्मांतर्गतचे संघर्ष जोवर संपत नाहीत तोवर या धर्माला भवितव्यच नाही.
आणि या संघर्षाचे मुलकारण आहे ते हे कि समतेचे तत्वच तत्वद्न्यानात्मक पातळीवर असले तरी व्यावहारिक/कर्मकांडात्मक पातळीवर नाही. जात-गत धार्मिक आरक्षणे ही हिंदु धर्मांतर्गतच्या समतेच्या तत्वांना पुरेपुर छेद देतात. आणि त्यामुळे रोष आहे आणि तो वाढत आहे याकडे मी लक्ष वेधु इच्छितो.
याच विषमतेमुळे हिंदु तत्वद्न्यान हिंदुच दुर्लक्षित करतात...कारण आत्मिक पातळीवर ते समाधान देत असले तरी वास्तवात ते निरुपयोगी ठरते.
थोडक्यात गरज आहे ती ही...
१. धार्मिक पातळीवर जन्माधारित वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था पुर्णतया नाकारणे. (ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील पुरुषसुक्त हे तर प्रक्षिप्त आहेच पण "ब्राह्मण मुखमासिद....वै. दोन ऋचा या अत्यंत विसंगत आणि वर्णव्यवस्थेला वैदिक बळ देण्यासाठी कोणीतरी घुसवलेल्या आहेत. प्रत्यक्षात ऋग्वेदात वर्णव्यवस्थेचे कसलेही दिग्दर्शन नाही.)
२. धार्मिक पातळीवर सर्वच हिंदुंना समान अधिकार. यात नुसती सामाजिक समानता अभिप्रेत नसुन धार्मिक कर्मकांडांत कोणीही हवे तेंव्हा इच्छा असेल तर बरोबरीने भाग घेण्याची मुक्त सोय. मग ते वैदिक कर्मकांड असो कि पुजादि विधींबाबत. यासंबंधीचे सर्वच निर्बंध उठवले पाहिजेत. थोडक्यात सारे हिंदु समान हे तत्व लागु केले पाहिजे.
३. पौरोहित्यादि धार्मिक कर्मांची जात-निरपेक्ष धर्मिक अनुमती.
४. धर्मांतर ज्यांनीही केले असेल त्यांना हीच समानतेची ग्वाही देत त्यांना पुन्हा धर्माकडे आकर्षित करणे. पुन्हा धर्मात घेणे...आणि जे जात असतील त्या कारणांचा शोध घेत त्यांना थांबवने.
५. अन्य धर्मियांना या धर्मातील उदात महनीय तत्वद्न्यान (जे सत्यच आहे आणि अस्तित्वात आहे) सांगत या धर्मात अन्य कोनत्याही धर्मापेक्षा अधिक समता आहे हे वास्तव दर्शवत त्यांना धर्मात घेण्याची योग्य सोय लावणे.
६. सर्व वंचित घटकांना अधिक महत्व देत त्यांना पुरेपुर (जे अधिकार आज ब्राह्मनांहाती आहेत) देत त्यांना धार्मिक समतेचा आणि आत्मनिष्ठेचा गौरव मिळवु देणे. ( फार कमी येतील...पण मलाही तो अधिकार आहे ही भावना फार महत्वाची असते.)
७. सर्व वर्चस्वतावादी तत्वद्न्यानांना तिलांजली कशी दिली जाईल हे पहा. हिंदुत्व म्हणजे वैदिकत्व/ब्राह्मणत्व असे सिद्धांत अडगळीत टाकुन द्या.
आता प्रश्न असा आहे कि हे कोणी करायचे? धर्मातील गळती कशी थांबवायची? धर्मांतर्गतचा संघर्ष कसा थांबवायचा?
मग ही शंकराचार्यांची १६ पीठे कशासाठी आहेत? काशी विद्वत्सभा कशासाठी आहे? धर्माचे नियमन करणे ही त्यांची जबाबदारी नाही कि काय? कालसुसंगत परिवर्तन घडायला त्यांनी काहीएक करायचे नाही असे ठरवले आहे कि काय? हा धर्म मरावा, आपापसात संघर्ष करत संपावा अशी त्यांची अंतिम इच्छा आहे कि काय? धर्मच उरला नाही तर धर्मगुरु अखेर काय करणार आहेत? त्यांची महत्ता काय राहणार आहे? केवळ एक समतेच्या तत्वाची अपेक्षा आहे....तीही धार्मिक पातळीवर देता येत नसेल तर आम्ही तुम्हाला धर्मगुरु का मानावे? समता ही काही हिंदु धर्माला वेगळी बाब नाही. ऐतरेय महिदास या दासीपुत्राचे, म्हणजे धर्मार्थाने शुद्र असलेल्याचे ऐतरेय ब्राह्मण जर पुज्य ठरु शकते तर आज एखादा विद्वान धर्मार्थाने शुद्र असुनही ब्राह्मनांपेक्षा द्न्यान/व्यवहार/तत्वद्न्यानात्मक पातळीवर जर श्रेष्ठ जागतीक पातळीवर ठरत असेल आणि तरीही धर्मानुसार त्याला आज शुद्रच ठरवत असाल तर माफ करा हा धर्म टीकनारच नाही.
समता तात्विक पातळीवर आहे पण व्यावहारिक पातळीवर नाही एवढेच हिंदु धर्माचे वैगुण्य आहे...पण ते अतिभयंकर आहे. ते दुर करा....तरच या धर्माला काही भवितव्य राहील.
अन्यथा..........?

-----------संजय सोनवणी
९८६०९९१२०५


6 comments:

  1. "समता ही काही हिंदु धर्माला वेगळी बाब नाही. ऐतरेय महिदास या दासीपुत्राचे, म्हणजे धर्मार्थाने शुद्र असलेल्याचे ऐतरेय ब्राह्मण जर पुज्य ठरु शकते तर आज एखादा विद्वान धर्मार्थाने शुद्र असुनही ब्राह्मनांपेक्षा द्न्यान/व्यवहार/तत्वद्न्यानात्मक पातळीवर जर श्रेष्ठ जागतीक पातळीवर ठरत असेल आणि तरीही धर्मानुसार त्याला आज शुद्रच ठरवत असाल तर माफ करा हा धर्म टीकनारच नाही.
    समता तात्विक पातळीवर आहे पण व्यावहारिक पातळीवर नाही एवढेच हिंदु धर्माचे वैगुण्य आहे...पण ते अतिभयंकर आहे. ते दुर करा....तरच या धर्माला काही भवितव्य राहील.अन्यथा..." वा:,संजयजी केवळ अप्रतिम.एका पुस्तकाचा ऎवज आपण एका छोट्या लेखात आम्हाला उपलब्ध करुन दिला आहे.आपली सगळी मते पटतीलच असे नाही,परंतु आपली सगळी मांडणी समर्पक,साधार आणि पोटतिडिकीतुन आलेली आहे.आपले वाचन,चिंतन,संशोधन थक्क करणारे आहे.ग्रेट!!!
    या व्यवस्थेचे लाभार्थी ३वर्ण होते.ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य.धर्म-शिक्षण,राजसत्ता,आणि अर्थसत्ता हे तीन वाटे तिघांनी विभागुन घेतले होते.सर्वाधिक लाभ या तिघांनाही मिळालेला असुन सगळे खापर मात्र आज ब्राह्मणांवर फोडले जात आहे.ब्राह्मणही आप्पलपोटे आणि आत्मकेंद्रीत आहेत. {सन्माननीय अपवाद वगळुन}शुद्र,अतिशुद्र[अनुसुचित जाती/जमाती,विमुक्त भट्क्या जमाती]व सर्व स्त्रिया यांना या व्यवस्थेने कायमच वंचित ठेवले.
    असे असले तरी हिंदुधर्म मरणार नाही.कारण १५ लाख साधु/किर्तनकार/प्रवचनकार यांचे पोट त्यावर अवलंबुन आहे.ते त्याला मरु देणार नाहीत.गरजेनुरुप तडजोडी केल्या जातील.या धर्मात आणि पर्यायाने हिंदुधर्मशास्त्रात क्रांती कधीही शक्य नाही.या धर्माची पचनशक्ती अपार आहे.शुद्र समाज हे या धर्माचे नि:शस्त्र सैन्य आहे.जिथे गुलाम मजेत आहे{जाणीव जाग्रुतीअभावी]तिथे डर कश्याची?ब्राह्मणवादविरोधी छावणीचे नेत्रुत्व "वामन" मेश्राम-"परशुराम" खेडेकर अश्या थोर लोकांच्या हाती आहे.हे महान लोक जोवर नेते असतील तोवर हिन्दुधर्माला ओरखडाही उठु शकणार नाही.ब्राह्मणांनी निश्चिंत राहावे.त्यांनी काहीही करण्याची गरज नाही. जे काही करायचे ते हे दोघे करीतच आहेत.

    ReplyDelete
  2. संजय सर,
    राष्ट्रीय स्वंयसेवक संघा बद्दल जे तुमचे विचार आहेत ते अतिशय चुकीचे आहेत..तुम्हाला एक तर संघ म्हणजे नक्की काय ते माहीत नसेल किंवा संघा बद्दल चुकीची माहीती मिळाली असेल.संघ मुस्लिम विरोधी आहे,संघ सनातन विचारसरणीचा आहे,संघावर ब्राह्मण समाजाचे वर्चस्व आहे इ.या सर्व चुकीच्या गोष्टी आहेत.संघाच्या आदीवासी,दलित,ईशान्य भारतातील सेवा प्रकल्पा बद्दल योग्य आणि तटस्थपणे जाणून घेतले असते तर तुमचा असा गैरसमज झाला नसता.

    ReplyDelete
  3. अहो इतकी धर्मसत्तेवर आलेली एवढी संकटे व धर्मसत्तेला एवढा माज असूनसुद्धा जर ८२% पेक्षा जास्त आज हिंदू आहेत तर आजच्या काळात थोडाफ़ार का होईना हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदू एकत्र आल्याने संकटे तर समोर नाही आहेत ...
    तसेच धर्मसत्तेचा माज कमी झालाय , समतावादी तत्वज्ञान हे रुळतय .सर्वच पातळींवर . लोक आज एकत्र आलेले आहेत किमान व्याव्हारिक पातळीवर तरी .
    पुढचे पाऊल खूपच आशादायी आहे .. अहो वर्णव्यवस्थेने अन्याय केलेले तर सोडाच परंतु आज बरेच पाश्चात्य लोक हिंदू धर्माचा स्वीकार करत आहेत किंवा त्यांच्याच धर्मात राहून हिंदू तत्वज्ञानाचे पालन करत आहेत . तिथेच ते हिंदू झालेत ...
    हिंदू हा एकमेव धर्म आहे कि जो तत्वज्ञानाच्या पातळीवर इतर धर्मांच्या विचाराचे व प्रार्थनेचे स्वातंत्र्य देतो ...


    हिंदू धर्मात समतेचे तत्वज्ञान पूर्णपणे रुजले पाहीजे हे सत्य आहे पण त्या दिशेने पाऊले पडत आहेत व हिंदू धर्माचे भवितव्य उज्वल आहे ..

    ReplyDelete
  4. राष्ट्रीय स्वंयसेवक संघा बद्दल जे तुमचे विचार आहेत ते अतिशय चुकीचे आहेत..तुम्हाला एक तर संघ म्हणजे नक्की काय ते माहीत नसेल किंवा संघा बद्दल चुकीची माहीती मिळाली असेल.संघ मुस्लिम विरोधी आहे,संघ सनातन विचारसरणीचा आहे,संघावर ब्राह्मण समाजाचे वर्चस्व आहे इ.या सर्व चुकीच्या गोष्टी आहेत.संघाच्या आदीवासी,दलित,ईशान्य भारतातील सेवा प्रकल्पा बद्दल योग्य आणि तटस्थपणे जाणून घेतले असते तर तुमचा असा गैरसमज झाला नसता.
    ===========================================
    ईशान्य भारतात कशाला जाताय ? उस्मानाबादच्या यमगरवाडीत जावून या मग तुम्हाला समजेल संघ हणजे काय ते नक्की ...
    सोनावणीसाहेब तुम्ही नक्की भेट द्या अन त्याचे तटस्थपणे लिखाण करा .
    तुमच्या लिखाणात अनिल अवचट साहेबांची जादू आहे तुम्ही खर्‍याला खरे व खोट्याला खोटेच म्हणता ती एक गोष्ट मला खूप आवडते ...

    बाकी फ़ेसबुकवर मित्र विनंती स्विकारल्याबद्दल धन्यवाद ..

    ReplyDelete
  5. संजयजी तुम्हाला ब्लॉगवर सक्रीय पाहून बरे वाटले. आपल्या अनेक मुद्यांशी मी सहमत आहे. कळीचा मुद्दा हिंदू आणि हिंदुत्ववाद हाच आहे. मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. मुळात हिंदू धर्म हा वैदिक आणि शैव धर्माची सरमिसळ आहे. अनेक वेगवेगळ्या रुढी परंपरा वेगवेगळ्या समुदायातून घेत हिंदू धर्म बनत गेला. व्रात्यस्तोम विधीबद्दल मीही वाचले आहे पण नक्की केव्हा चित्पावन ब्राम्हण झाले याचा संदर्भ मिळत नाही. आपल्याला माहिती असल्यास जरूर एक वेगळा लेखं लिहा. शक कुशाण यांना धर्मात सामावून घेतले गेले हे अगदी बरोबर आहे. पण त्यानंतरच्या काळात सामावून घेण बंद झालं. तुम्ही दिलेले सर्व उपाय अगदी बरोबर आहेत पण किती लोक तयार होतील हे देव जाणे. ज्या धर्मात सामाजिक समानता असते तो धर्म लोकप्रिय होत जातो. हिंदू धर्मामध्ये समाजिक समानतेची मोठी गरज आहे.

    ReplyDelete
  6. आपल्या विचारांशी सहमत.. लेखन आवडले.. रोख ठोक लिहिता पण त्यात कुणाला हिनवन्याची भावना नसते त्यामुले हे एक वैचारिक मंथन ठरते.
    माझ्या मते जातिवाद पेक्षा भेदा भेद हाच आपल्या समाज व्यवस्थेतील मुख्य दोष आहे. कारण सध्या सगलेच जन मी कसा श्रेष्ठ अणि तो कसा कनिष्ठ हेच दाखवण्यात आपला वेल दवदत आहेत. अगदी संत महातमा वर देखिल चिखल फेक चालवली आहे.. साप गेला पण हे लोक भुई धोपटन्यात धन्यता मानत आहेत. खरोखरीच केविलवाणी परिस्थिति आहे.
    अणि आर्यन इनवेशन बद्दल म्हणाल तर आता काही पुरावे ही सापडले आहेत जे सिद्ध करत आहेत की असे कही झालेच नाही.. केवल भारतीयांना हिनावान्या साथी अणि ख्रिस्ती धर्माचा प्रसार होण्या साठी आशा चाली खेलल्या गेल्यात. अणि पुन्हा तेच होत आहे
    सध्या आपण ब्रेक एवेन पॉइंट वर आहोत. वेलीच योग्य तोडगा नाही काढला तर . धर्मं बुडानार हे निश्चित आहे. याचा फ़ायदा अर्थातच मुस्लिम अणि christi लोकांना होणार. कारण यांना धर्मान्तर करवान्याचा कीड़ा आहे. ते येन केन प्रकरेण त्यांचा हेतु साध्य करतातच. उदहारण घ्यायचे झाल्यास केरल चेच घ्या.. तेथे हिन्दू अल्पसंख्यांक होऊ राहिलेत जिथे बघावे तिथे ख्रिश्चन आणि मुसलमान आहेत. खरा तर आपल्या संस्कृतीत शिकान्य सारखे भरपूर आहे पण त्या कड़े बघायला कोणालाही वेल नाहिये. हे लवकरात लवकर थम्बयाला हवे येवाधिच अपेक्षा.

    P S - पूर्वी पाकिस्तान बंगलादेश अणि त्याही पूर्वी अगदी middle east मध्ये ही हिन्दू धर्मं अस्तित्वात होता अता छे म्हणायचे झाले तर मलेसिया इंडोनेसिया थाईलैंडइथे ही अगदी तुरालक प्रमाणात हिन्दू सापडतात पण बहुटेक करून सगळे मुस्लिम केले गेले आहेत.. हीच वेल भारतात ही येऊ शकते.. एवढेच सांगाने आहे.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...