Sunday, September 11, 2011

पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिगामी चेहरा! (3)

प्रतिगामत्वाचा कळस: पेशवाई....

महाराश्ट्रात प्रतिगामिता आणि पुरोगामीतेची काही मुलतत्वे यांचे सह-अस्तित्व कसे होते व त्यात प्रतिगामीता हीच कशी वरचढ राहिली याचा धावता आढावा आपण वर घेतला आहे. पेशवाई आल्यानंतर मात्र क्रमशा: प्रतिगामीतेने कळस गाठला. पहिल्या बाजीरावाचा अपवाद करावा लागतो. तो खराखुरा सेनानी होता. धर्माधारित ब्राह्मण्याचा त्याने कधी अवलंब केलेला दिसत नाही. मल्हारराव होळकर, शिंदे यांना हुडकुन त्याने त्यांना पराक्रमाच्या संध्या उपलब्ध करुन दिल्या. आहाराच्या बाबतीतही त्याने कसलेही विधि-निषेध पाळले नाहीत. त्याने मस्तानीशी विवाह करुन खरे तर अभूतपुर्व क्रांती घडवली. त्याचे राजकीय परिणामही वेगळे होवु शकले असते पण शनिवारवाड्याने त्याचे सारे बेत ढासळवुन टाकले. बाजीरावानंतर मात्र पेशवाई नैतीक पातळीवर घसरतच गेली. जातीयतेचे स्तोम वाढु लागले. दलितांवरील अन्याय अत्याचारांनी परिसीमा गाठली. त्यांच्यावर पराकोटीचे सामाजिक निर्बंध लादले जावु लागले. पानिपत युद्धातील पराजयामागे सरदारांमधील जातीय तेढ हे एक महत्वाचे कारण मी किस्त्रीम (२०१०) मधील लेखात सविस्तर नोंदवलेले आहेच. पुणे हे भटभिक्षुकांचे उदार आश्रयस्थान बनले. दान-दक्षिणा, ब्राह्मण भोजने आणि धार्मिक कर्मकांडांत पेशवाई गुरफटत गेली. स्त्रीयांवरील अत्याचार एवढे वाढले कि त्याला सीमा राहीली नाही. शनिवारवाड्यासमोरच चक्क कुणबिणी/बटक्यांचे बाजार भरु लागले. १० रुपये ते ७० रुपये भावात स्त्रीयांची खरेदी विक्री होवू लागली. या नव्य गुलामी प्रथेला साकार करणारे पेशवेच होते. हा एक सामाजिक अमानुषपणाच होता पण त्याविरुद्ध कोणीही आवाज उठवल्याचे दिसत नाही. या काळात एकुणातील सामाजिक मानसिकता पुर्णतया रसातळाला जावुन पोहोचल्याचे दिसते. अर्थात याला नागरिकांची खालावलेली आर्थिक स्थिती हेही कारण होतेच. स्वत: पेशवेच कर्जबाजारी. सामाजिक अर्थ व्यवस्थेला बळ देण्यासाठी कसली धोरणेही त्यांच्याकडे नव्हती. मग अम्मलबजावणी कसली करणार?
उत्तरपेशवाईने या सा-यावर अक्षम्य कळस चढवला. पुण्यात सावल्या लांब पडतात अशा सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी अस्प्रुष्यांना पुण्यात प्रवेश बंद करण्यात आला. शहरात येतांना त्यांनी पाठीवर खराटा आणि गळ्यात मडके लटकावण्याची सक्ती करण्यात आली. एकदा एका ब्राह्मणाच्या अंगावर महाराची सावली पडली तेंव्हा त्याचा शिरच्छेद करुन पर्वतीसमोरील मैदानावर त्याच्या मस्तकाचा चेंडु करुन खेळण्याची महाविक्रुत घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. (या घटनेचे ह्रुदयद्रावक वर्णन मी "...आणि पानिपत" या कादंबरीत केले आहे.) या काळात महारांना लग्नप्रसंगी घोड्यावर बसण्यास, वाजंत्री असण्यास बंदी घातली गेली होती. सतीप्रथा, स्त्रीभ्रुणहत्या, विधवांचे केशवपन अशा विक्रुत चालींनाही पराकोटीचे समर्थन मिळाले. स्त्रीयांना एक स्वतंत्र आस्तित्व असते तेच पुर्णतया नाकारले गेले.
हा असा प्रतिगामीत्वाचा कळस उत्तर पेशवाईत गाठला गेला. त्याचा संतप्त सुड महारांनी कोरेगावच्या लढाईत घेतला आणि एक अन्यायी पर्व संपले...तरी प्रथा मात्र सुरुच राहिल्या.

पुरोगामीत्वाचे पर्व

जेंव्हा प्रतिगामीता एक उच्च टोक गाठते, समाज नैतीक पातळीवर रसातळाला जातो, अन्यायाची एक परिसीमा होते तेंव्हा समाजातीलच काही घटक जाग्रुत होतात आणि प्रति-व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरु होतात. ब्रिटिश राज्य आल्याने शिक्षणव्यवस्थेत बदल झाले आणि त्याची व्यापकताही वाढली. त्यातुन युरोपातील समाजव्यवस्था, तेथे घडलेल्या सामाजिक क्रांत्या व सुधारणांशी येथील ब्राह्मण वर्ग परिचित होवु लागला. १९ वे शतक त्या द्रुष्टीने समाज जाग्रुतीचे, महाराष्ट्राला ख-या अर्थाने पुरोगामित्वाकडे नेणारे शतक होते. या काळात आपली व्यवस्था आणि पाश्चात्य व्यवस्थेची तुलना होणे अपरिहार्य होते. त्यातुन आपल्या परंपरा, वर्तमान आणि त्यातुन निर्माण झालेली अन्याय्य विषमावस्था आणि त्यावर पर्याय याचे मंथन होणेही अपरिहार्य होते. या नव्या द्न्यानपरंपरेशी सर्वात आधी परिचित झाला तो नव-शिक्षित ब्राह्मण वर्ग. सनातनी ब्राह्मण अद्यापही पेशवाईच्या भुलीतुन बाहेर यायला तयार नव्हतेच. बाळशास्त्री जांभेकरांनी सतीप्रथा व स्त्रीभ्रुनहत्येविरोधात बोलायला सुरुवात केली. शतपत्रकारांनी ब्राह्मण समाजातील सर्वच अनिष्ट प्रथांवर टीकेची झोड उठवली. डा. रा. गो. भांडारकर आणि न्या. रानडे यांनी प्रार्थना समाजाची स्थापन करुण सामाजिक सुधारणांचे प्रयत्न सुरु जकेले तर महात्मा फुलेंनी त्यावर कळस चढवला. स्त्री शिक्षण, अस्प्रुष्यता निर्मुलन हे त्यांचे क्रांतीकारी कार्य होय. याचबरोबर शेतक-यांचा आसुड लिहुन त्यांनी शेतअक-यांच्या मुलभुत प्रश्नांना हात घातला. सामाजिक समता व न्यायासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. या काळात असंख्य समजसुधारकांची लाट आली आणि महाराष्ट्राला अनिष्ट प्रथा-परंपरांतुन बाहेर पडत मोकळा श्वास घेण्याची संधी मिलाली. बाबासाहेबांचे कार्य तर कोणीही विसरु शकणार नाही. त्यांनी फक्त दलितांसाठीच नव्हे तर अखिल समाजाच्या अभुदयासाठी जे क्रांतीकारी कार्य केले त्याला भारतीय पुरोगामित्वाच्य इतिहासात तोड नाही. येथे मी सखोल इतिहासात न जाता एवढेच नमुद करुन ठेवतो कि महाराष्ट्राला पुरोगामी चेहरा ख-या अर्थाने मिळाला तो या महान विचारवंत, सुधारक आणि सामाजिक क्रांतिकारकांमुळे.
स्वातंत्य्रोत्तर काळात कला-साहित्य आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातुन ही पुरोगामित्वाची लाट पुढे काही दशके तरी सरकत राहीली. दलित साहित्याने मराठी साहित्याला नुसता वेगळा चेहरा दिला असे नाही तर त्याला जागतिक प्रतिष्ठाही मिळाली. तसेच पुरोगामी साहित्य प्रयोग उच्चभ्रु म्हणवणा-या साहित्य-विचारक्षेत्रातही झाले व त्यामुळे महाराष्ट्र हा विचारवंतांचा, सामाजिक प्रश्नांबाबत सजग असणा-या लोकांचा प्रदेश अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली.
परंतु हा चेहरा कितपत प्रामाणिक होता व आहे यावर आता चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. ज्या महान समाज नेत्यांनी आधुनिक महाराष्ट्र घडवण्यासाठी अविरत प्रयत्न केले त्यांना त्यांचेच नाव घेत पायतळी तुडविण्याचे प्रयत्न होत असतांना पाहुन खेद वाटणे स्वाभाविक आहे. आज महाराष्ट्र प्रतिगाम्यांच्याच ताब्यात वेगाने जात असल्याचे भिषण चित्र सामोरे येत आहे. ते कसे हे आता पाहुयात.

प्रतिगामी महाराष्ट्र

पुरोगामी वारसा घेत महाराष्ट्र हा अधिक सामाजिक ऐक्याच्या दिशेने वाटचाल करत क्रमश: सर्वच अनिष्ट प्रथांना तिलांजली देत एका आदर्श समाजाच्या दिशेने वाटचाल करेल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैब्वाने महाराष्ट्राची वाटचाल उलट्या दिशेने, म्हणजेच प्रतिगामित्वाच्याच दिशेने, वेगाने होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. हे प्रतिगामत्व धर्म, अर्थ आणि राजकारण या तिन्ही मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या महत्वाच्या बाबींशी निगडीत असल्याने त्यावर गंभीर चिंतन करण्याची आवश्यकता आहे.

धार्मिक/सामाजिक प्रतिगामित्व:

कडव्या हिंदुत्ववादाचा प्रचार प्रसार अत्यंत आक्रमकतेने करणा-या संघटनांचा उदय हा महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा फाडायला पुरेशी असणारी घटना आहे. आज देशव्यापी बनलेल्या या संघटनांचा उदय महाराष्ट्रातुनच व्हावा याला निव्वळ योगायोग म्हणता येत नाही. रा.स्व. संघ, सनातन प्रभात व अभिनव भारत या त्या महत्वाच्या प्रतिगामी संघटना आहेत. हिंदुंचे संघटन हा मर्यादित हेतु नसुन धार्मिक वर्चस्वतावाद प्राप्त करत सत्ताकारण करण्याचे स्वप्न या संघटना पाहतात व त्यात त्यांना ब-यापैकी यशही मिळालेले आहे. पुरातन धर्मतत्वांचा आधुनिक काळात अट्टाहास धरत प्राचीन संस्क्रुतीच्या पुनरुत्थानाच्या नावाखाली होत जाणारी ही प्रतिगामी वाटचाल आहे. या संघटना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्त्या सतीप्रथेचे उदात्तीकरण करतात, मनुस्म्रुतीची, वर्णव्यवस्थेची शास्त्रीयता (?) आजही पटवतात व मान्य करतात. वेदांमद्धे सर्वच विद्न्यान ठासुन भरलेले आहे याचाही प्रचार-प्रसार करत असतात. मंदिरांत स्त्रीयांना प्रवेश का नको यावर खोट्या शास्त्रीय कल्पना सांगत स्त्रीयांना विशिष्ट (उदा. कोल्हापुरचे महालक्ष्मी मंदिर.) मंदिरांत प्रवेश नाकारण्याचे अंध समर्थन करतात. या संघटना आजही स्त्रीयांवर सामाजिक बंधने लादण्याचा प्रयत्न करत असतात. व्यलेंटाईन डे ला विरोध, बारमद्धे स्त्रीयांना जाण्याला विरोध ई. ते फक्त शाब्दिक नव्हे तर अनेकदा हिंसकपणे क्रुतीतही उतरवत असतात. एवढेच नव्हे तर अभिनव भारत व सनातन प्रभात आता धर्माच्या नावाखाली हिंसक दहशतवादी क्रुत्यांत उतरलेली आहे हे आता मालेगाव, नांदेड व गोव्यात झालेल्या स्फोटांवरुन पुढे येत आहे.
याचा अर्थ असा कि महाराष्ट्रीय मानसिकतेत प्रतिगामितेची ही बीजे आता फोफावु लागलेली आहेत. समाजाला पुढे नेण्यासाठी अनिष्ट प्रथांचे/समजुतींचे समुळ उच्चाटन करण्याचे प्रदिर्घ प्रयत्न करण्याऐवजी समाजाला एकुणातच पुन्हा मध्ययुगात ढकलण्याचे हे कारस्थान आहे यात शंका नाही. या कडव्या प्रतिगामी संघटनांचा उदय महाराष्ट्रातुन व्हावा आणि त्या प्रत्यही फोफावत असता समाज एकुणातच उदासीन असावा हे समाज कसा प्रतिगामी होत चालला आहे याचे निदर्शक आहे.
बरे हे येथेच थांबत नाही. फक्त ब्राह्मण प्रतिगामी असतात हा आरोप आता कालबाह्य झालेला आहे. फुले-शाहु-आंबेडकरांचे नाव घेत ज्या प्रतिगामी संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या आहेत ती तर अजुनच भीषण स्थिती आहे. सामाजिक समतेच्या चळवळीत ही तीन नावे सर्वच समानतावाद्यांसाठी वंद्य आहेत. एवढी कि त्यांची नावे घेतल्याखेरीज पुरोगामी या शब्दाला अर्थच रहात नाही ही महाराष्ट्रातील वस्तुस्थिती आहे.
ब्राह्मणी वर्चस्ववाद/जातीयवाद टाळत समता साधने, बहुजनांचे नैतीक/आर्थिक व सामाजिक उत्थान घडवुन आनने हा बहुजनीय चळवळीचा प्रमुख हेतु होता. ब्राह्मणांनी लिहिलेला असत्य इतिहासाचे बहुजनीय अंगाने पुनर्लेखन करत बहुजनांचे आत्मभान जागवने हाही हेतु होता. विद्रोही साहित्य सम्मेलने मुळात ब्राह्मणी परंपरेने नाकारलेल्या साहित्त्यिक-कवींसाठी विचारमंच देण्यासाठीच भरायला सुरुवात झाली. या चळवळीने सुरुवातीला महाराष्ट्राला उत्तमोत्तम कवि/लेखक/विचारवंत दिले हे वास्तव आहेच.
पण: प्रतिगामितेचे वीष याही चळवळीत घुसले. उदा. ज्या जातीनिर्मुलनाचा मुख्य उद्देश होता तो तर राहिला दुर पण जवळपास प्रत्येक जातीची स्वतंत्र साहित्य सम्मेलने भरण्याची प्रथा आली. आपल्याच जातीचा लेखक/विचारवंत काय तो श्रेष्ठ बाकी शुद्र हा नवा मनुवाद रुजलेला आहे. प्रत्येक जात आपापल्या अस्मिता बळकट करत प्रतिगामी बनु लागल्या. जातीय अभिमन कमी करण्याऐवजी तो वाढवण्याचे कार्य त्या त्या जातीतील नेते विचारवंत करु लागले. थोडक्यात जातीच्या बेड्या तोडण्याऐवजी त्या घट्ट कशा होतील हे पाहिले गेले, पाहिले जात आहे...हा प्रतिगामीपणा नव्हे तर काय आहे?
धर्मातील/समाजातील सर्व अनिष्टाला ब्राह्मणांना जबाबदार धरत त्यांच्यावर होनारी फुले-आंबेदकरी काळातील परिस्थिती ठीक होती आणि समजावुन घेण्यासारखी होती. परंतु ज्या कारणासाठी ब्राह्मणवादाचा विरोध केला गेला होता ती आणि तशीच प्रव्रुत्ती आणि विचार बहुजनीय चळवळीचे म्हनवणारे (सर्वच नव्हेत) बाळगु लागले, मांडु लागले आणि प्रचारही करु लागले...

बहुजनीय प्रतिगामी संघटना

गेल्या २०-२५ वर्षातील महत्वाची घटना म्हणजे मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ अशा काही संघटनांचा महाराष्ट्रातील उदय. शाहु-फुले आंबेडकरांचा झेंडा उचलत या संघटना स्थापन झाल्या. बहुजनांचे/दलितांचे ऐक्य आणि त्यातुन ब्राह्मणी वर्चस्ववादाला संपवणे हे त्यांचे वरकरणी उदात्त वाटणारे हेतु. प्रत्यक्षात मराठा सेवा संघ ही फक्त मराठ्यांची तर बामसेफ/भारत मुक्ती मोर्चा ही दलितांची संघटना आहे हे सत्य समोर यायला बराच काळ लागला. तोवर या दोन्ही संघटनांनी ओबीसींचा मात्र बहुजनीय चळवळीच्या नावाखाली भरमसाठ वापर करुन घेतला. तो होता तो केवळ संख्याबळ वाढवण्यासाठी आणि आपले छुपे अजेंडे राबवुन घेण्यासाठी. (छुपा अजेंडा फक्त रा.स्व. संघाचाच असतो या भ्रमात आता कोणी राहु नये.)
प्रत्यक्षात या जातीय संघटना आहेत हे सत्य लपुन राहिलेले नाही. मराठा आरक्षनाची बांग देवुन मराठा सेवा संघाने ते सिद्धही केले आहे. सर्वच समाजाने प्रगती करत जात एक दिवस आरक्षनाचीच गरज भासु नये असे प्रयत्न करण्याऐवजी बहुजनीय चलवळ चालवतो असे म्हणणारेच आरक्षण मागु लागले तर ते कोण मान्य करेल? स्वाभाविकच यांचा प्रतिगामी चेहरा उघडा पडला आहे.
असे करत असतांना या संघटनांनी ब्राह्मण द्वेषाची जहरी तत्वधारा (?) वापरली आहे. प्रसंगी ब्राह्मणांना कापुन टाका/कत्तल करा असा विक्खारी नाराही ते देत आहेत. ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला असा आरोप करत ते स्वता:च त्यांचापेक्षाही अत्यंत खोटा इतिहास लिहित आहेत, समाजात पसरवित आहेत. जाती नष्ट करण्याचा जो मुळ प्रामाणिक हेतु बहुजनीय चळवळीचा होता, तो नष्ट न करता मराठा आणि कुणबी एकच आहेत असे नवे सत्यापलाप करनारे सिद्धांत मांडत आरक्षणाच्या रांगेत मराठा सेवा संघ उभा आहे. हे प्रतिगामित्वाचे नव्हे तर अन्य कशाचे लक्षण आहे?
ही प्रतिगामिता निखळ सामाजिक चळवळीची म्हणुन असती तर एक वेळ समजता आले असते. परंतु यामागे सत्ताधा-यांचाच वरदहस्त असेल तर?
सत्ताधारी जातीच सामाजिक बहुजनीय चळवळींना स्वजातीयांच्या नेत्रुत्वाखाली वाढवण्याची संधी देत असेल तर?
त्यांना सर्वार्थाने आर्थिक/राजकीय पाठबळ मिळत असेल तर?
दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आहेत. ७०% सत्ताकेंद्रे ज्यांच्या हाती आहेत तेच या मंडळीच्या मागे ठामपणे उभे आहेत. म्हणजेच सत्ता जी सर्वांना समान लेखत सर्वांच्या हितासाठी राबवली पाहिजे या घटनात्मक चौकटीलाच ठार करण्याचा हा उद्योग नाही काय?
फुले-शाहु-आंबेडकरांच्या मुलतत्वांची ही अक्षरश: पायमल्ली आहे हे उघड आहे. या बाबींना विरोध करणारे बहुजनीय विचारवंत महाराष्ट्रात नाहीत असे नाही, पण यांची दहशत आणि बुलंद आवाजापुढे ते क्षीण ठरताहेत हेही एक वास्तव आहे.
म्हणजे ब्राह्मनच प्रतिगामी आहेत असे नाही. ब्राह्मनांनी आगरकर/लोकहितवादी/शतपत्रकार/न्या. रानडे/केतकरांदि पुरोगाम्यांना दुर ढकलुन दिले आहे. ब्राह्मण सम्मेलने ही आता प्रतिगामित्वाच्याच दिशेने भरकटलेली आहेत. असंख्य लेखक/विचारवंतही प्रतिगामी धारांना सामावुन घेत आहेत. अपवाद असतातच. पण ब्राह्मण समाजही सोयीचे पुरोगामित्व मिरवत अंतत: प्रतिगामी विचारधारांना आश्रय देत आहे. पण त्याच्याही पुढे आता बहुजनीय चळवळ चाललेली आहे आणि हा एक प्रकारे फुले-शाहु-आंबेडकरी तत्वधारांचा त्यांच्याच अनुयायांकडुन झालेला पराजय आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते.
भविष्यात ब्राह्मण-मराठा एकीकडे, ओबीसी व अन्य सर्व दुसरीकडे असे चित्र निर्माण झाले तर मला आश्चर्य वाटनार नाही. परंतु हे काही पुरोगामितेचे लक्षण म्हणता येत नाही. याचे कारण असे कि या पुरोगामी म्हनवणा-या प्रतिगामी महाराष्ट्रात आजही दलितांवरचे अन्याय कमी झालेले नाहीत. स्त्रीयांवरील अत्याचारांबद्दल कोणतीही जात मागे नाही. स्त्रीभ्रुणहत्या ही या महाराष्ट्रात नित्यश: घडनारी घटना आहे. यातील महत्वाचा भाग असा कि यात सुशिक्षित, आर्थिकद्रुष्ट्या प्रगत असलेला समाजच अग्रभागी आहे. गडचिरोली, धुळे-नंदुरबार सारख्या अप्रगत भागांत मात्र स्त्री-पुरुष प्रमाण हे संतुलित आहे तर पुने-नाशिक-कोल्हपुरादि प्रगत भागांत मात्र ते चिंता करावी एवढे असंतुलित आहे. महाराष्ट्राच्या प्रतिगामीपणाचे हे अत्यंत क्रुर उदाहरण आहे.

राजसत्तेचे जातीय केंद्रीकरण

सत्तेचे सर्वच समाजघटकांत न्याय्य वाटप व्हावे हा राजकीय पुरोगामीतेचा एक महत्वाचा निकष आहे. त्याशिवाय सर्वच समाजांना सत्तेत सहभाग मिळणार नाही आणि सर्वांगिण प्रगती साधता येणार नाही हे एक नुसते समाजशास्त्रीय वास्तव आहे असे नव्हे तर भारतीय घटनेलाही तेच अभिप्रेत आहे. सातवाहन काळापासुन नव्याने निर्माण झालेली सत्ताधारी जात म्हनजे मराठा. हा समाज गाव पातलीपासुन ते प्रादेशिक पातळीपर्यंत कोनत्या ना कोणत्या रुपात सत्ताधारी होताच, मग राजवट कोनाचीही असो. सरंजामे टिकवण्यासाठी राजकीय पक्ष बदलण्याची यांची रीत पुरातन आहे हे इतिहासच स्पष्ट करतो. पेशवाईत प्रथमच ब्राह्मण सरदार (पुर्वी फार तर ते मंत्री असायचे) तसेच मल्ल्हारराव होळकरांसारखे अमराठा सरदार आस्तित्वात आले. फार तर त्याला नंतर पेशव्यांनीच नष्ट केलेल्या नौदलाचे प्रमुख असतील. परंतु खरी सत्ता ही प्रय: मराठा सरदारांच्या, पाटलांच्याच हाती होती, हे ऐतिहासिक वास्तव आहे. अर्थात या जातीची जनसंख्याच कालौघात वाढत गेल्याने सर्वच मराठ्यांना सत्तेची फळे चाखायला मिळाली नाहीत हे खरे असले तरी संधी असली तर त्यांनाच प्राधान्य होते हे वास्तव आहे. ब्राह्मण जातीबद्दलही असेच वास्तव आहे. सर्वच ब्राह्मण वेदशास्त्रसंपन्न नव्हते. सर्वांनाच इनामे/कुळकर्ण्या मिळालेया नाहीत. त्यामुळे सर्वच ब्राह्मण हे धर्माचे नियंते होते असे म्हणायला वाव नाही. तसेच हे आहे.
लोकशाही परंपरा आल्यानंतर मराठा समाज लोकशाही प्रक्रियेच्या आरंभी विरोधातच होता असे दिसते. म्हनजे १९०९ साली फक्त एकच मराठा निवडनुकीला सामोरा जात आमदार बनला. पण जसजसा काळ बदलला मराठा समाज लोकशाही (?) प्रक्रियेत नुसता सामील झाला नाही तर जात म्हणुन अल्पसंख्य असतांनाही सत्तेवर विराजमान झाला. यात चुकीचे काही नाही कारण ते लोकांनीच निवडुन दिले असे म्हनणे वरकरनी योग्यच आहे.
परंतु आपण महाराष्ट्रातील निवडनुकांचा आणि सत्तेचा इतिहास नीट पाहिला तर लक्षात येईल कि मराठा समाजातील काही घराण्यांनी सत्ताकेंद्रे बनत, सत्ता वंशपरंपरागत करत नवी सरंजामशाहीची सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी सर्वच तंत्रे वापरलेली आहेत. तोच सरंजामशहांचा उद्दामपना-मस्तवालपना त्यांच्यात आहे. उदाहरनच द्यायचे झाले तर मुळात अण्णा हजारेंची जनलोकपालाची मागणी हे प्रतिगामी आहे हे अरुंधती रोय यांनी स्पष्ट म्हटले आहे आणि मी त्यांच्याशी सहमत आहे. पण हजारेंनी उपोशन सोडण्यापुर्वी ज्यांची मध्यस्थी मान्य केली ते विलासराव देशमुख हे एक तर स्वत:च भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकले असता भ्रष्टाचाराविरुद्ध राष्ट्रीय आंदोलन छेडनारे हजारे त्यांची मध्यस्थी कशी मान्य करतात? कारण साधे आहे, हे दोघे नुसते मराठा आहेत असे नव्हे तर नातेवाईकही आहेत! अन्य जाणत्या नेत्यांबद्दल आणि त्यांच्या संबंधींबद्दल काय बोलावे? हा राजकीय प्रतिगामीपणा नव्हे तर अन्य काय आहे? वंशपरंपरागत नेतुत्वाची आणि नवी सरंजामे निर्माण करण्याची पद्धत ही नि:संशयपने प्रतिगामीपणाची हद्द आहे यात मला शंका वाटत नाही. ही लागण अन्यांना होते आहे, झालेली आहे हेही कठोर वास्तव आहे, परंतु अस्तित्वाच्या युद्धात "महाजनो गत:स पंथा..." या नियमाने अन्यही जमेल त्या पद्धतीने अनुकरण करु लागत असतील तर दोष सत्ताधारी जातीकडेच जातो.

प्रतिगामित्वाचे भिषण वास्तव

थोडक्यात सामाजिक असो, धार्मिक असो वा राजकीय असो, महाराष्ट्र समतेच्या मुलतत्वांपासुन हटत नव्या विषमतेकडे वाटचाल करत आहे हे उघड वास्तव आहे. येथे बहुसंख्य समाजाच्या आशा-आकांक्षा आणि स्वप्नांची परिपुर्ती करण्याची साधी भावनाही नष्ट होत चालली आहे. भिका-याला तुकडे फेकावेत त्या पद्धतीने धर्मात व सत्तेत स्थानच नसलेल्या लोकांसाठी केवळ भावनिक आणि तात्पुरती सामाजिक/आर्थिक सोय लावण्याचे कारस्थान प्रत्यही होते आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत पण ते "कुणबी" असल्याने सत्ताधारी जातींना त्याचे वैषम्य नाही...दुसरीरीकडे आरक्षन मागण्यासाठी हेच निर्लज्ज कुनबी व्हायला तयार आहेत. मेळघाटात शेकडो बालम्रुत्यु आजही होत आहेत आणि त्या भागात एक नव्हे तर जवळपास ६५० एन.जी.ओ. कोट्यावधींचे अनुदान लाटत कार्यरत आहेत असे म्हनतात. ब्राह्मणद्वेष हा मुलमंत्र जपत आजच्या बहुजनीय चलवळी एक विघातक परंपरा पुढे नेत आहेत. ब्राह्मणी संघटना पुरातन माहात्म्यांचा गौरव गात गतकाळातच रममाण आहेत. राजकीय सत्ता एका जातीच्या हाती एकवटत चालली आहे.
मग पुरोगामीपणा कोठे राहिला? कोठे राहिली समता? कोठे गेला तो जातीनिर्मुलनाचा महनीय कार्यक्रम? कोठे गेले ते अर्थसत्तेचे न्याय्य वाटप?
महाराष्ट्र पुरोगामी होता असे म्हनायची वेळ आता आली आहे. यातुन जे नवे सामाजिक तान-तनाव निर्माण होत आहेत, होनार आहेत त्याचे भान आज ठेवले नाही तर एका सामाजिक विनाशाला आपण जन्म देत राहु आणि त्याची विषारी फळे आपल्याच पुढच्या पिढ्यांना खावी लागनार आहेत याचे भान सर्वांनीच ठेवने अत्यावश्यक आहे.7 comments:

 1. "फक्त ब्राह्मण प्रतिगामी असतात हा आरोप आता कालबाह्य झालेला आहे. फुले-शाहु-आंबेडकरांचे नाव घेत ज्या प्रतिगामी संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या आहेत ती तर अजुनच भीषण स्थिती आहे. सामाजिक समतेच्या चळवळीत ही तीन नावे सर्वच समानतावाद्यांसाठी वंद्य आहेत..... ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला असा आरोप करत ते स्वता:च त्यांचापेक्षाही अत्यंत खोटा इतिहास लिहित आहेत, समाजात पसरवित आहेत.फुले-शाहु-आंबेडकरांच्या मुलतत्वांची ही अक्षरश: पायमल्ली आहे हे उघड आहे. या बाबींना विरोध करणारे बहुजनीय विचारवंत महाराष्ट्रात नाहीत असे नाही, पण यांची दहशत आणि बुलंद आवाजापुढे ते क्षीण ठरताहेत हेही एक वास्तव आहे.......ब्राह्मणद्वेष हा मुलमंत्र जपत आजच्या बहुजनीय चलवळी एक विघातक परंपरा पुढे नेत आहेत. ब्राह्मणी संघटना पुरातन माहात्म्यांचा गौरव गात गतकाळातच रममाण आहेत. राजकीय सत्ता एका जातीच्या हाती एकवटत चालली आहे.
  मग पुरोगामीपणा कोठे राहिला? कोठे राहिली समता? कोठे गेला तो जातीनिर्मुलनाचा महनीय कार्यक्रम? कोठे गेले ते अर्थसत्तेचे न्याय्य वाटप?
  महाराष्ट्र पुरोगामी होता असे म्हनायची वेळ आता आली आहे. यातुन जे नवे सामाजिक तान-तनाव निर्माण होत आहेत, होनार आहेत त्याचे भान आज ठेवले नाही तर एका सामाजिक विनाशाला आपण जन्म देत राहु आणि त्याची विषारी फळे आपल्याच पुढच्या पिढ्यांना खावी लागनार आहेत याचे भान सर्वांनीच ठेवने अत्यावश्यक आहे.".......संजय,परखड विश्लेषण.सडेतोड मांडणी.बहुजनांच्या डोळ्यात अंजन घालणारे विवेचन.भगवान बुद्ध म्हणाले होते, "आगीने आग विझवता येत नाही".प्रतिगाम्यांच्या खोटेपणाला बहुजनीय खोटेपणा हे उत्तर होवु शकत नाही.आम्हाला विवेकवाद,सत्य आणि प्रामाणिकपणा यांच्याच आधारे पुढे जावे लागेल.आमचे प्रवक्ते आम्हाला फार विचारपुर्वक निवडावे लागतील.

  ReplyDelete
 2. अतिशय माहितीपूर्ण लेख . मांडणी अतिशय छान
  तुमची विचार पटले ..

  ReplyDelete
 3. सर ,
  अतिशय मुद्देसूद मांडणी.....
  सहजसोपी भाषा......
  अतिशय मार्मिक लेख......
  अल्प्वाचन असणाऱ्या कोणालाही सहज समजेल असे लिखाण.......
  धन्यवाद.......

  एक प्रश्न आहे......
  पुरोगामी.....प्रतिगामी.....पुरोगामी.......पुन्हः प्रतिगामी......
  हे चक्र असे का फिरत आहे ?
  हे चक्र कोणत्या कारणाने, कोणत्या वेळी, कोणत्या प्रकारे (pattern) फिरते......
  जगत सगळीकडे असेच चालते कि फक्त भारतात, महाराष्ट्रात चालत आहे......
  हे चक्र एकच दिशेला फिरवता येण्यासाठी समाज कसा आणि काय केल्याने तयार होईल.......

  माजे प्रश्न, विचार चुकीचे असू शकतात परंतु तुमचा लेख वाचून असे वाटते कि हे एक चक्र आहे आणि ते पुन्हः पुन्हः fashion सारखे फिरते आहे......

  ReplyDelete
 4. पेशवाई नेहमीच कर्जात होती परंतु त्याचे कारण अगदी वेगळे आहे ...
  तुम्ही पुल देशपांडे अनुवादीत कान्होजी आंग्रे हे पुस्तक वाचावे म्हणजे तुम्हाला कळेल की पेशवाईचे व थोरल्या छत्रपती शाहू यांचे ’फ़ाऊंडेशन’ कर्जावरच उभे होते ...

  बाजीराव पराक्रमी होता हे मान्य परंतु इतक कौतुक तर मला मुळीच वाटत नाही मुळात त्याच्या सर्व स्वार्‍या या उत्तर भारतावर होत्या व बहुतांश स्वार्‍या या खंडणीसाठी होत्या . राज्य वाढवण्यावर भर नव्हता .
  त्यापेक्षाही महत्त्वाचे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितल्याप्रमाणे जितके राज्य मिळवले त्याचे प्रशासनही करावे लागते , लोकांचा विश्वास संपादन करावा असे वर्तन लागते .. जे शिवाजी महाराजांना प्रतिकूल परिस्तिथीत जमले ते पेशवाईत अनुकूल परिस्तिथीतही जमलेले नाही ..
  पेशव्यांची घोडदौड ही मुळीच महसूल जमवत कर्ज फ़ेडण्यासाठी होती असे खेदाने म्हणावे लागते . अन्यथा इतक्या प्रचंड मोठ्या मुलुखांत घोडदौड असूनही तेथील राज्यकारभाराची घडी बसवण्यात काडीचेही लक्ष दिलेले नाही ..
  अजून एक गोष्ट .... शहाजीराजे यांच्या व्हिजननुसार मुळात शिवाजी महाराजांनी आपला राज्यप्रसार हा दक्षिण भारतात केला .. अगदी विजापूर व कुतुबशाही सारखे बलाढ्य सत्ता असतानाही .. याचे कारण साधे होते की दक्षिण भारतातील जनता हि नक्कीच शहाजी महाराज तसेच अगोदरच्या विजयनगर साम्राज्याप्रमाणे एत्तदेशिय विरुद्ध परकीय अशा संघर्षात (याला हिंदू , मुस्लिमसुद्धा म्हणू शकतो ... ) नेहमी एत्तदेशीयांच्या बाजूने उभी राहीली ...
  या क्रमाने जर साम्राज्याचा पाया उभा करायचा होता तर मुख्यत्वे लक्ष दक्षिण भारताकडे देणे हे अत्यंत गरजेचे होते तिथे राजवट स्थापून जर जनतेचा विश्वास संपादन केला असता (कोणताही प्रतिस्पर्धी नसताना ) तर चित्रच पालटले असते व साम्राज्याला अत्यंत मजबूत पाया मिळाला असता व युरोपियनांवरही नजर ठेवता आली असती ...
  परंतू दक्षिण भारत हा मुख्यत: दुष्काळी प्रदेश त्यामुळे तिथे लुटून महसूल गोळा करण्यासारखे खूप कमी व लोकांची मने जिंकण्याची कोणतिही इच्छा नसल्याने पुर्ण दुर्लक्ष केले ..
  त्यानेच निजाम व हैदर अशा क्रूर राजवटी निर्माण झाल्या .. माधवराव पेशव्यांनी दक्षिणेत लक्ष घातलेच परंतु नेहमीप्रमाणे राघोबादादाने पाय खेचून मराठी बाणा दाखवून दिलाच ..
  माधवरावांच्या नंतर सर्व पेशवाई तशी राम भरोसेच होती ...

  ReplyDelete
 5. Uday jee...aapale vishleshan atyant mahatvaache aahe. Mi yavar savistar apanaas lihito. Thanks a lot.

  Kunal jee, mi aapalyaa pritikriyevar facebook var uttar dilele aahe. Pla have a look at it. Thanks.

  ReplyDelete
 6. Purogamitav mhanje kaay? ekada tharva na? bramhnan,marthyna wa tynchya snghtanan virodh mhanje purogamitva ka? ...ki keval mandal ayogane dilele aarkshan laagu karne mhanje purogamitav? arakshan havach pan arthik adharawar...Nahitar Athawalenche chiranjiv ani mazya khedyatale magasvargiv garaju yanchi sprdha kashi hou shakel?
  RSS chya babtit apan jara don upkram samjaunghya...ek mhanje vanavasi kalyan ashram...dusara mhanje samajik samarsta manch...jya sanghtane vishayi apan purn pane janat naahi tyavishayo krupaya tippani naka karu..RSS sandhrbhat..Ramesh Patangena vichara..kinva..seva saritacha amrutkunbh he pustak vacha pls....ani Samata Parishad..Maratha Mahasangh..Brigade....BAMSEF...yanchya kamatun maharshtr purogami honar ka? yancha uday hi maharshtratch zala he visrun naahi chalanar sanjayro...

  ReplyDelete
 7. शेतकरी आत्महत्या करत आहेत पण ते "कुणबी" असल्याने सत्ताधारी जातींना त्याचे वैषम्य नाही...दुसरीरीकडे आरक्षन मागण्यासाठी हेच निर्लज्ज कुनबी व्हायला तयार आहेत...wa wa...apalya lekhat jatiywad andane daulat ahe..

  ReplyDelete