Tuesday, September 20, 2011

...१९९० नंतरचे सामाजिक वास्तव....

१९९० नंतरचे सामाजिक वास्तव....
-------संजय सोनवणी

समाज कोणत्याही प्रदेशातील असो, कोणत्याही काळातील असो, तो एकाच वेळीस एवढ्या संम्मिश्र प्रवाहांतुन जात असतो कि त्याचा निश्चित वर्तमान आकलनात येणे जवळपास अशक्य असते. हे प्रवाह प्रतिगामी असतात तसेच पुरोगामी वा स्थितीस्थापकही असु शकतात आणि एकमेकांना अवरोध करत एकुण समाजाची गती कुंठित करत असतात. भारतात १९९० नंतर जशी नवी आर्थिक धोरणे आस्तित्वात आली तशी जागतिकिकरणाची लाट आली....आणि एरवी तुलनेने स्थितिस्थापक असलेला परंपरागत भारतीय समाज एका अत्यंत वेगवान अशा परिवर्तनाच्या लाटेवर आरुढ झाला. याची फळे वरकरणी का होईना एवढी आकर्षक होती आणि आहेत कि आज आपण जागतिकिकरणाशिवाय भारतीय समाज हा विचारच करु शकत नाही. जागतिकिकरणाचे फायदे फक्त शहरी आणि त्यातल्यात्यात उच्च-मध्यमवर्गच लाटतो आहे असे नाही तर त्याचे फायदे तळागाळात झिरपलेले आहेत हेही वास्तव आपण पहात आहोत.
या नव्य आर्थिक स्थितीत, जागतिकिकरणामुळे जे एक सांस्क्रुतीक अभिसरण घडते आहे तेही आश्चर्यजनक व काहीसे भयभीत करणारे आहे. जागतीक संस्क्रुतीच्या लाटांमागुन लाटा भारतावर कोसळत आहेत. अमेरिकन, जपानी, युरोपियन, जापानीज ते चायनीज संस्क्रुत्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव ज्या वेगाने गेल्या तीस वर्षांत वाढु लागले आहेत कि येत्या काही दशकांत येथे पुर्णतया एक नवीच संमिश्र संस्क्रुती आस्तित्वात आलेली असेल. भारतीय संस्क्रुती सर्वच संस्क्रुत्या पचवायला सक्षम असल्याने सर्वच संस्क्रुत्यांवर ही संस्क्रुती मात करुन उरेल हा अभिमान मुळात व्यर्थ आहे हे आपण इतिहासाकडे नजर टाकली तरी लक्षात येईल. पुरातन काळात ग्रीक, रोमन, अरब व चीन्यांकडुन आपण बरीच सांस्क्रुतीक देवाण-घेवाण केलेली आहे. पार धार्मिक संकल्पना, दैवते, पेहराव पद्धती, चित्रशैल्या, तत्वद्न्याने ते उत्पादनपद्धत्यांतही हे साम्स्क्रुतीक संक्रमण झालेले आहे. इस्लामी राजवटीत तर तो वेग अधिकच वाढला. ब्रिटिश काळात तर पार विचारपद्धतीवरही पराकोटीचा प्रभाव पडु लागला...इतका कि हजारो वर्ष ज्या अन्न्याय्य का होईना धर्माबाबत सारा समाज (स्त्रीयांसह) निमुट होता तो आवाज उठवायला लागला...हक्कांची, समानतेची मागणी करु लागला. या गोष्टी सनातन हिंदु धर्मात बसतच नव्हत्या...पण त्याला आव्हाने मिळु लागली. एका अर्थाने ही सामाजिकच नव्हे तर सांस्क्रुतीक क्रांती होती आणि या क्रांतीचा विचारगर्भ होता ब्रिटिश व्यवस्था....त्यांची संस्क्रुती. म्हणजे येथे ज्याही कोणत्याही सामाजिक चळवळी निर्माण झाल्या त्या स्वतंत्र नव्हत्या तर परपुष्ट होत्या. मुळच्या भारतीय संस्क्रुतीचा चेहरा मोहरा या नव्य संस्क्रुतीने पुरेपुर बदलुन टाकला.
१९९० नंतर तर नुसती सामाजिकच नव्हे तर आर्थिक संस्क्रुतीतही ज्या वेगाने विविध संस्क्रुत्यांचा प्रवेश झाला आहे आणि होतो आहे त्यातुन जी काही संस्क्रुती निर्माण होईल ती ओळखण्याच्या पलीकडची असेल.
हे घडणे योग्य कि अयोग्य याबाबत विविध मतप्रवाह असु शकतात. खरे तर सांस्क्रुतिक अभिसरण व त्यात सातत्याने बदल घडत राहणे हे सर्वत्रच होत असते. या बदलांना विरोध करणारे असतात, काही अत्यंत उत्साहाने हे बदल स्वीकारत असतात तर काही नाईलाजाने त्या लाटेवर स्वार झालेले असतात. म्हणजे आर्थिक संस्क्रुतीचे फायदे सर्वांनाच हवे असतात पण सांस्क्रुतीकतेचा जेथे प्रश्न येतो तेथे मात्र गतिरोधांची संख्या अर्थ-संस्क्रुतीपेक्षा अधिक वाढलेली दिसते. (राजकीय संस्क्रुतीही याच लाटांवर आरुढ होत बदलतात...) यातुन जे एक सातत्याने परिवर्तीत होणारे सामाजिक वास्तव आणि एकुणातील मानसिकतेचे आपसातील संघर्ष यातुन निर्माण होत असनारी स्थिती यावर साकल्याने विचार होतोच असे नाही.
वर विषद केलेल्या मुद्द्यांच्या आधारावर आज आपण महाराष्ट्रीय समाजाकडे पाहिले तर खालील मुद्दे पटकन लक्ष वेधतात.

पारंपारिक समाजांतर्गतचा संघर्ष:

१. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद: १९व्या शतकातील सामाजिक चळवळींनी सनातन व्यवस्थेला हादरे दिले असले, मोकळीकीचा काही प्रमाणात श्वास प्राप्त केला असला तरी मुलभुत गाभ्याचे प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिल्याने १३०-१४० वर्षांनतरही हा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीय. मराठा महासंघ, बामसेफ, भारत मुक्ति मोर्चाच्या जहाल आक्रमकतेमुळे सध्या हा वाद कदाचित १९व्या शतकात नसेल एवढा पेटलेला आहे. परंतु बव्हंशी समाज, विशेश्त: ब्राह्मण, हा वाद संपण्यासाठी समतोल भुमिका घेत ज्या कारणांमुळे वाद आहे त्यांचे निराकरण करत नाहीत असे दिसते. यातुन एक गंभीर सामाजिक स्थिती निर्माण झालेली आहे हे एक वास्तव आहेच.

२. मराठा-मराठेतर वाद: आरक्षणामुळे निर्माण झालेला हा एक नवीन वाद आहे व तोही हळुहळु सामाजिक संघर्षात बदलेल अशी शक्यता आहे. परंपरागत सत्ता भोगणारा मराठा समाजही आरक्षणाच्या रांगेत आल्याने ओबीसी व अन्य आरक्षित वर्ग अस्वस्थ झालेला असुन त्याबाबत संघर्षाच्या ठिनग्या पडु लागल्या आहेत व ओबीसी कधी नव्हे एवढे जाग्रुत होत एकत्र येत आहेत कारण खरा फटका व झटका त्यांनाच बसण्याची भिती आहे आणि ती निराधार नाही.

३. हिंदु-मुस्लिम वाद: हिंदु-मुस्लिम ऐक्याचे समंजस प्रयत्न होत असतांना मुस्लिम मुलतत्ववादी आणि कट्तर सनातनी हिंदुत्ववादी संघटना यांचा एकमेकांविरुद्धचा गरळ ओकण्याचा कार्यक्रम हा तर फार मोठा धोका आहे हे वास्तव समजावुन घ्यावे लागणार आहे. याची परिणती म्हनजे महाराष्ट्रात पुणे-मुंबई लक्ष करुन गेल्या २५ वर्षांत ब्वांबस्फोटांची वारंवार पुनराव्रुत्ती होत शेकडो माणसे ठार झाली आहेत तर हजारो जखमी झालेले आहेत. त्याचीच प्रतिक्रिया म्हणुन सनातनी कट्तरपंथी हिंदु संघटनाही या दहशतवादाच्या स्पर्धेत उतरले असुन तो भविष्यात कोठे जाइल, हे सांगता येत नाही. या संघर्षामुळे सामाजिक पातळीवर या दोन्हि समाजांत बव्हंशी आपसी संशय वा तिरस्काराचीच भावना आहे हे एक आपले सामाजिक वास्तव आहे.

४. ग्रामीण विरुद्ध शहरी संघर्ष: आज या प्रश्नाची एवढी चिंता शहरी समाजाला वाटत नाही. किंबहुना असा काही संघर्ष होवु शकतो ही कल्पनाच त्यांना हास्यास्पद वाटते, पण तसे वास्तव नाही. अर्थव्यवस्थेचा एकुणातील वाटा जेवढा ग्रामीण जनतेला मिळायला हवा तो मिलत नाही. कमी पीक आले तरी त्रास आणि जास्त झाले तरी त्रास या त्रासदीचा उद्रेक आंदोलनांच्या रुपाने सध्या होतच असतो. परंतु नेहमीच असे उद्रेक आंदोलनांच्या पातळीवर राहतील आणि त्याची परिणती शस्त्रे हातात घेण्यात मात्र होणार नाही असे समजणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील आजवर गडचिरोली-चंद्रपुरच्या जंगलांपर्यंत सीमित रहात हिंसक कारवाया करणारे नक्षलवादी आता पुण्यातही पकडले जावु लागले आहेत. हा असंतुष्ट वर्ग त्यांचे टार्गेट असु शकते याचे भान असायला हवे.

अपारंपारिक सांस्क्रुतिक संघर्ष

गेल्या ३२ वर्षात वेगाने वाढलेले हे काही संघर्ष-

परकीय संस्क्रुती विरुद्ध भारतीय संस्क्रुती: मी लेखारंभीच खरे तर हा वाद निरर्थक आहे असे स्पष्ट केले आहे, परंतु हा एक नवा संघर्ष आहेच. पास्श्च्यात्य संस्क्रुती आता ब-यापैकी भारतीय जीवन व्यापुन आहे हे एक वास्तव आहे. पाश्चात्य पेहरावच नव्हे तर त्यांचे सणही येथे उत्साहाने साजरे होत आहेत. चीनी फेंग-शुइ सापडणार नाही अशी घरे विरळीच असतील. या लाटॆत भारतीय संस्क्रुती वाहुन जाईल अशी शंका आल्याने संस्क्रुतीरक्षकांचीही एक फौज निर्माण होते आहे. महिलांनी बारमद्धे जावु नये, व्ह्यलेंटाइन डे-मदर्स डे, ख्रिस्तमस, ३१ डिसेंबरादि उत्सव साजरे करु नये यासाठी ते प्रसंगी हिंसक होतात हे आपण सातत्याने पहातच आहोत. भारतीय संस्क्रुतीची महत्ता गाण्यासाठी प्रसंगी सती प्रथेचे उदात्तीकरण करायलाही ते मागेपुढे पहात नाहीत. प्रत्यक्षात सती प्रथा ही भारतीयांनी (हिंदुंनी) सिथियन या परकीय जमातीपासुन घेतली हे या कथित संस्क्रुतीरक्षकांना माहितही नसते. हिंदु (भारतीय) संस्क्रुती म्हणजे नेमके काय हे मुळात ठरवता येणे शक्य नाही. अर्थात प्रस्तुत लेखाचा भारतीय संस्क्रुती म्हणजे काय हे सांगण्याचा उद्देष नसुन आजचे सामाजिक वास्तव काय आहे आणि ते १९९१ पासुन कसे वेगाने बदलत चालले आहे याकडे लक्ष वेधणे हा आहे.
स्वप्रांतीय विरुद्ध परप्रांतीय: खरे तर हा सामाजिक झगडा शिवसेनेच्या स्थापनेनंतर आधी दाक्षिणात्यांविरुद्ध होता व त्यातुन महाराष्ट्राचे एक सामाजिक व राजकिय वास्तव बदलले. आता मनसेने उत्तरभारतीयांविरुद्ध त्याच मुलतत्वांवर हा संघर्ष सुरु केला आहे. अलीकडे हा संघर्ष कोमट झाला असला तरी महाराष्ट्राचे हेही एक सामाजिक वास्तव आहे.
जागतिकिकरणातील नव्य अर्थव्यवस्थेचे अपरिहार्य लक्षण म्हनजे पराकोटीची स्पर्धा...तिचा लाभ असला तरी तोटेही अभ्यासायला हवेत. त्याच वेळीस व्यवस्थेतील त्रुटी शोधुन गैरफायदा उठवत रातोरात श्रीमंत होवू इच्व्छिणा-यांची भाउगर्दी हेही एक वास्तव आहे आणि त्यावरही चिंतनाची गरज आहे.

जागतीकीकरणाने मुल्ल्यांचा जो एक प्रश्न निर्माण झालेला आहे तो मला अधिक गंभीर वाटतो. खरे तर बाह्य संस्क्रुतीपेक्षा मुल्यांचे आंतरिक अधिष्ठाण असणारी संस्क्रुती अभिप्रेत असते. परंतु यात मात्र मोठा -हास होत असुन एक मुल्य-अध:पतीत समाज मात्र वेगाने निर्माण होतो आहे.
गेल्या काही दशकांत कुटुंबव्यवस्था खिळखिळी होवू लागली आहे. घट्स्फोटांचे आणि विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण, विशेश्त: नवतंत्रद्न्यानाच्या क्षेत्रातील,लोकांत, अवाढव्यपणे वाढत आहे. महाराष्ट्रात गांधीजी, विनोबाजींनी वा समाजवाद्यांनी एक मुल्याधिष्ठित समाजाची स्वप्ने पाहिली ती आता पुरेपुर कोलमडलेली दिसतात. सामाजिक चलवळी एन-जी,ओं.च्या हाती जात आहेत हे एक बदलते सामाजिक वास्तव आहे. एन.जी.ओ., काही अपवाद आहेत, पण बव्हंशी भ्रष्ट व स्वार्थप्रणित आहेत हे वास्तव लक्षात घ्यावे लगणार आहे. खरी समाजसेवा दुरच आहे. समाजाला आपण देणे लागतो ही भावना कमी होत चालली असुन व्यक्ती-केंद्रित समाजरचना वेगाने होत चालली आहे आणि ते एकुणातील सामाजिक मानसिकतेवर फार मोठा आघात करत आहे. याची परिणती ही अधिक गंभीर असुन खरे चिंतन यावर व्हायला हवे.
मराठी समाजात वेगाने परिवर्तन होत आहे. द्न्यान-तंत्रद्न्यानाच्या क्षेत्रात तो मोठ्या झेपा घेत साता-समुद्रापार झेंडे फडकावत आहे. अद्याप ते नोकरीच्याच रुपात असले तरी मानसिकता बदलली तर तो अवाढव्य उद्योगही उभारण्याची क्षमता असलेला आहे याची मला पुरेपुर जाणीव आहे. याच समाजात समतेची (मग ती सामाजिक/धार्मिक वा आर्थिक असोत) स्वप्ने पाहणारे, त्यासाठी प्रयत्न करणारे सम्यक द्न्यानवंत व विचारवंतही आहेत...आणि त्या सर्वांचा सार्थ अभिमानही आहे, परंतु यी गतीमान स्थित्यंतराच्या काळात त्यांना साथ देनारे नवविचारवंत द्न्यानवंतांचीही फार मोठी गरज आहे. असे घडले तर या दिशाहीण संक्रमनाला मुल्य-निष्ठता तरी देण्यात यश लाभेल व सुध्रुढ समाजाकडे काही प्रमाणात वाटचाल करता येईल असा विश्वास मला वाटतो.



2 comments:

  1. सर्जी बढिया !वाचायला आनंद झाला.विषय सुद्धा तेवढाच ताकतवर आहे.जागतिकीकरणाचे परिणाम नक्कीच ग्रामीण भागापासून शहरी भागात सर्व स्तरावर होत आहेत.लोकशाहीचे विकेंद्रीकरन खऱ्या अर्थाने झाले तर विकासाची फळे सगळ्या समाजाला चाखायला मिळतील.निवडणुकीपासूनच्या सुधारणा असतील,किंवा जनतेचे प्रभोधन असेल,ग्रामसभेचे सशक्तीकरण असेल,लोकशाहीचे पाच स्तंभ जेवढे मजबूत होतील तेवढी आपली लोकशाही अधिक सशक्त होईल.त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे तरच आपला देश पुन्हा सोने कि चिडिया व्यायला वेळ लागणार नाही.आणि जाती धर्माचे बंध तोडणे तेवढेच आवश्यक आहे त्याशिवाय आपला समाज संघटीत राहू शकणार नाही.

    ReplyDelete
  2. आपल्या लोकशाहीची बलस्थाने योग,आयुर्वेद,प्राणायाम,ध्यान ह्यातून माणसाचा अध्यात्मिक विकास झाला तर तर हि पृथ्वी नक्कीच स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही.

    ReplyDelete

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...