यशवंतरावांच्या सांगण्यावरुन विठोजीराव होळकर दक्षिणेत आले होते हे आपण मागे पाहिलेच आहे. त्यांच्याकडे विशेष फौजफाटा नसल्याने त्यांनीही सर्वत्र गनीमी काव्याचाच आधार घेतला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात त्यांनी अनेक प्रांत पायतळी तुडवले, पण सुस्थिर होण्याची संधी कोठेही मिळाली नाही. उत्तरेतल्या बातम्या जशा कळत तसतसा पेशव्यांबद्दलचा त्यांचा रागही वाढत चालला होता. तेही अम्रुतराव हाच पेशवा बनावा या मताचे होते. त्यांनी अम्रुतरावाशी संधान बांधले होते. अम्रुतरावांनी त्यांना गुप्त मदतही पुरवली. सनदा दिल्या. पेशव्यांचे बालक्रुष्ण बावनपागेंसारखे काही सरदारही त्यांना सामील झाले. थोडी शक्ती वाढली तसे त्यांनी खुद्द पेशव्याच्याही प्रांतांवर हल्ले सुरु केले. कुरकुंभ, पंढरपुरादि भाग तुडवत, पेशव्यांच्या पानसे, पटवर्धनसारख्या सरदारांचा पाडाव करत पार पुरंदरपर्यंत येउन पोहोचले. बाजीराव पेशवा भित्रा होता हे सर्वविदित आहेच. विठोजी एवढ्या जवळ येउन ठेपला आहे या वार्तेनेच तो घाबरुन गेला. पण पेशव्यांच्या बापु गोखलेदि सरदारांनी विठोजीचा धोका ओळखुन तातडीने लष्करी हालचाली केल्या. मोठी फौज रवाना झाली. विठोजीकडे पेशव्यांच्या तुलनेत फारशी सेना नव्हतीच. तोफा-बंदुकांचा तर प्रश्नच नव्हता. एका अर्थाने विठोजी बागी बंडखोर होता. पेशव्यांच्या फौजांसमोर त्याचा निभाव लागणे शक्यच नव्हते. तो लढाच विषम होता. तरीही पळुन जाण्याऐवजी (गनीमी काव्याला साजले असते..) त्याने चिवट लढा दिला. हार नक्कीच होती. विठोजीला त्याच्या पत्नी-मुलासह पकडण्यात आले व पुण्यात आणण्यात आले.
शत्रु तावडीत जीवंत सापडला आहे हे पहाताच बाजीरावाला चेव चढला. आपण अतिउत्साहाच्या भरात एका विनाशाला जन्म देत आहोत याचेही त्याला भान राहिले नाही. आपण होळकरांसारख्या दौलतीच्या पुर्वीच्या सेवेदारांशी कसे वागायला हवे हे त्याला समजले नाही....आणि आपले क्रुत्य यशवंतरावांसारख्या बलाढ्य राजाशी पराकोटीचे शत्रुत्व निर्माण करेल हेही त्याला उमजले नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी...!
विठोजीची क्रुरातिक्रुर हत्या
१६ एप्रिल १८०१.
भारताच्या इतिहासात कोणालाही कधीही एवढी क्रुर शिक्षा दिली गेलेली नाही. मानवतेची,.न्यायाची एवढी क्रुर विटंबना कधीही झालेली नाही.
शनिवारवाड्यासमोरील प्रांगण. काढण्या घातलेल्या विठोजीला भांबुर्ड्यावरुन तेथे आनण्यात आले. दिल्ली दरवाजावरील नगारखान्यात दुसरा बाजीराव आणि बाळोजी कुंजीर बसलेले. विठोजीला करता येईल तेवढे अवमानित करत प्रथम दोनशे कोरडे त्याच्या पाठीवर ओढले गेले. रक्तबंबाळ...सोलपटलेली पाठ...विठोजीला वाटले असेल एवढीच काय ती शिक्षा...अन्यायाविरुद्ध बंड केल्याबद्दल...
पण तसे व्हायचे नव्हते. बाजीराव व कुंजीर शांतपणे खालील प्रकार पहात होते. मैदानात माहुत हत्ती घेउन आला. त्याच्या पायाला विठोजीला साखळदंडांनी बांधले गेले. आता मात्र विठोजीला आपले भवितव्य कळुन चुकले. प्रथमच त्याने बाजीरावाकडे पाहिले...करुणा भाकली...पण बाजीराव ढिम्म होता तर कुंजीर आणि अन्य सरदार त्या द्रुष्याचा विक्रुत आनंद घेत होते.
हत्तीला माहुताने खुण करताच हत्ती चालु लागला. विठोजी फरफटला जावु लागला. स्वता:ला हत्तीच्या पायी न येण्यासाठी आटापिटा करु लागला. पुणेकर गर्दी करुन हे द्रुष्य पहात होते. कोनालाही कसलीही दया आली नाही. सारे हसत होते आणि म्रुत्युचा तमाशा पहात होते. पुण्याच्या विक्रुतीने कळस गाठला होता. एखाद्या समाजाचे नैतीक अध:पतन केवढ्या खालच्या पातळीवर जावू शकते त्याचे हे नीचतम उदाहरण!
असह्य वेदनांनी फरफटला जानारा विठोजी शुद्धीवर असेतोवर किंचाळत राहिला...मदत मागत राहीला...शेवटी तो बेशुद्द्ध पडला...पण तरीही तमाशा सुरुच राहिला...
त्याचे मस्तक हत्तीच्या पायाखाली आले...आणि खेळ संपला!
पण विठोजीची विटंबना येथेच संपली नाही. महाविक्रुत बाजीरावाने विठोजीचे छिन्नभिन्न प्रेत दुस-या दिवसापर्यंत स्वत:च्या आणि पुणेकरांच्या द्रुष्टीसुखासाठी (?) तसेच त्या मैदानातच पडु दिले...
विठोजीबरोबरच पेशवाईचेही मढे उठण्याची व्यवस्था या निर्दय घटनेने केली!
यशवंतरावांचे आक्रमण!
पेशव्याने उघड शत्रुत्व घेतले होते. त्याचा पेशवा म्हणुन मानसन्मान ठेवावा अशी लायकी ठेवली नव्हती. विठोजीच्या क्रुर हत्येची वार्ता काही दिवसांतच यशवंतरावांपर्यंत पोहोचली. यशवंतरावांना या वार्तेने केवढ्या वेदना झाल्या असतील, संतापाचा केवढा उद्रेक झाला असेल याची आपण कल्पना करु शकतो. पेशवे पदाचा तरी म्हणुन असलेला आदर आता चक्काचुर झाला नसल्यास नवल नाही. त्यांनी या क्रोधाच्या भरात पुण्यावर आक्रमण करुन पेशवाई तेंव्हाच बुडवली असती तरी नवल वाटले नसते.
पण यशवंतराव संतापाच्या भरात कसलेही चुकीचे पाउल उचलणा-यांपैकी नव्हते. त्यांनी अत्यंत थंड डोक्याने पुढची योजना आखली. पुण्यावर आक्रमण तर ते करणारच होते, पेशव्याला धडा शिकवल्याखेरीज राहणार नव्हते...पेशव्याचा मुलुख बेचिराख करणारच होते...
आणि आपल्या मागण्या त्याच्याकडुनच पुर्ण करुन घेणार होते...पेशव्याला कैदेत टाकावे वा मारावे असा अविचार त्यांच्या मनाला शिवलाही नाही.
पण पेशवा आपल्या सौजन्याची कदर न करता एक वेगळाच विनाश निमंत्रीत करणार आहे याची मात्र त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
ते कसे हे पुढील घटनाक्रमावरुन सिद्ध होईल.
No comments:
Post a Comment