Friday, November 18, 2011

ऋण काढुण सण...अन मग दिवाळे...!

ऋण काढुन सण साजरा करु नये ही पुरातन म्हण काही काळापुर्वीपर्यंत आपल्या समाजात रुजलेली होती. शेतीसाठी हंगामापुरती तगाई वा कर्ज घेण्यापलीकडे दैनंदिन सुखासीन बाबींच्या खरेदीसाठी कर्ज काढण्याची प्रव्रुत्ती जवळपास नव्हती. जे आहे त्यात समाधान मानण्याची नुसती प्रव्रुत्तीच नव्हे तर मानसीक व्रुत्ती होती. "ठेविले अनंते..तैसेची रहावे..." ही अध्यात्मिक आत्यंतिकता मला अमान्य असली तरी "चित्ती असु द्यावे समाधान" शी मात्र सामाजिक सहमती होती. उपलब्ध साधन-संसाधनांच्या परिप्रेक्षातच आपल्या जीवनाची नाळ जुळवली जात होती.

परंतु गेल्या दोन दशकांत, विशेषता: जागतिकीकरणाच्या लाटेत, मात्र या मुलभुत प्रेरणांना मोठा हादरा बसला आहे. उद्योग-व्यवसायासाठी ठीक पण पुर्वी स्कुटर, मोटरसायकल ते ग्रुहकर्जांची पद्धत आपल्याकडे नव्हती आणि त्यांची कोणाला गरजही वाटत नव्हती. जवळ शिल्लक असेल तरच या गोष्टींची खरेदी होत असे. त्यामुळे किंमतीही मर्यादेत होत्या. प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक क्षमतेच्याच बळावर आपापली स्वप्ने पुर्ण करायच्या प्रयत्नांत असे. स्वप्ने पुर्ण करण्यासाठी जे धन हवे ते वाढवायचा आणि बचत करत आवाक्यातीलच खरेदी करायचा फंडा होता.

पण अमेरिकी कर्जाधारीत व्यवस्थेची लागण झाली आणि चित्र पालटायला लागले. भारतीय ब्यंकांनी याही गोष्टींसाठी कर्जे देणे सुरु केले. पाठोपाठ लीजींग कंपन्या आल्या. मग क्रेडिट कार्डे आली. जेवण-पेट्रोल ते सोनेखरेदीसाठी त्यांचा क्रमश: बेसुमार वापर सुरु झाला. खरेद्या वाढत गेल्या तसतशा वस्तु-जागादिंच्या किंमतीही वाढत गेल्या. प्रसारमाध्यमांचा या कल्पक (?) कंपन्यांनी अवाढव्य वापर करत जीवनशैलीच्या सर्व संकल्पनाच बदलुन टाकल्या. आजवर ज्या गरजा नव्हत्याच, ज्यांवाचुन काहीएक अडलेले नव्हते त्या गरजांची गरज वाटु लागली. टी.व्ही. हवा...घ्या कर्ज...कार हवी...घ्या कर्ज...

कारण या नव्या व्यवस्थेने सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पनाच बदलवुन टाकल्या. गांवात ८० च्या दशकापर्यंतची लग्ने लापशी-आमटी वा फार झाले तर पोळ्या-गुळवणीपर्यंत ऐपतीनुसार साध्या मंडपात वा उघड्यावरही लग्नसमारंभ करीत ते लाखोंचा खर्च करु लागले. हुंड्याचे दर वाढतच गेले. हे सर्व शक्य झाले ते बव्हंशी या कर्जांच्या सहज उपलब्धतेमुळे. ज्या कारणासाठी सरळ कर्ज मिळत नाही त्यासाठी खोटी कारणे (उदा. शेतीकर्ज, फर्निचर कर्ज...) देत कर्जे उचलली जावु लागली. फेडता येण्याची क्षमताच नसल्याने परतफेड शक्यच नव्हती...म्हणजे ज्या कारणासाठी कर्जे उचलली त्यासाठी प्रामाणिक वापरच होत नसल्याने क्षमता कशी निर्माण होणार?

त्यातुन शेतक-यांच्या आत्महत्या सुरु झाल्या. त्यातुनच तरुण व्यावसायिक वा नोकरदारांवर मानसिक नैराश्याचे सावट गडद होवू लागले. सामाजिक मन:स्वास्थ्य...जो कोणत्याही समाजाचा पाया हवा तोच उध्वस्त होवू लागला.

कर्जांचा गोंगाट सुरु झाला...आणि तो आता भयभीत होत चिंता करावी एवढा वाढला आहे.

अर्थव्यवस्थेचा विकास म्हणजे नेमका काय असतो बरे?

अर्थव्यवस्थेचा विकास म्हणजे कर्ज काढण्याची वेळ शक्यतो कोणाही समाजघटकावर येवु नये असा विकास. हा विकास खरे तर द्रुष्य नसुन मानसिक व्हायला हवा. उपयुक्त कर्जे आणि अनुपयुक्त कर्जे यातील फरक लक्षात यायला हवा. ज्यातुन संसाधनांचा विकास होण्याची शक्यता आहे अशी आणि अशीच कर्जे श्रेयस्कर असुन जी कोणतीही कर्जे केवळ क्रुत्रीम सामाजिक प्रतिष्ठादर्शक वस्तुंच्या खरेदीचा हव्यासापायी केली जातात ती निंध्य होत.

कारण यातुन एक आर्थिक दुश्चक्र निर्माण होते. ते जगड्व्याळ बनत जाते. म्हनजे नैसर्गिक स्त्रोतांचा विनाशकारक उपसा सुरु होतो. दुसरा धोका म्हनजे तुमचेच धन तुम्ही बुडविण्याच्या मार्गाला लागता. व्यक्तिगत पातळीवरील आत्मविश्वास येथे कामाला येत नाही, कारण एकाकी घटक या चक्राला थांबवु शकत नाही...वा "माझी प्रगती माझ्यावरील कर्जाच्या व त्यावर देत असलेल्या व्याजाच्या प्रमाणात होतच राहणार आहे..." ही संकल्पना अनिश्चिततेच्या तत्वावर टिकत नाही...कोणाचीही टिकलेली नाही. तिसरा धोका म्हणजे क्रमश: होत जाणारे मानसीक अध:पतन...

हे मानसीक अध:पतन दोन प्रकारचे असते. पहिले अध:पतन म्हणजे भविष्याबद्दलचा निर्माण झालेला अंध आत्मविश्वास...आणि तो उज्ज्वल असनारच या संभाव्य शक्यतेपोटी कर्जाधारीत निर्माण केलेली जीवनपद्धती. या शक्यता असंख्यदा इतिहासात कोसळुन पडलेल्या आहेत. साम्राज्ये कोसळली आहेत...अनेक व्यवसायच समुळ नष्ट झालेले आहेत...जुन्या व्यवसायाधारीत जाती नष्ट होवुन नव्या जाती आस्तित्वात आलेल्या आहेत...नष्ट होतात ते विसरले जातात...आणि आज आस्तित्वात आहेत ते जगण्याच्या संघर्षात लागतात. ही परिवर्तने पचवण्याची क्षमता नसणारे काळाच्या अवाढव्य पटावरुन चक्क अद्रुश्य होतात. कारण भविष्य वर्तमानकालीन मानवी चुकांनीच निर्माण होते याबाबतचे गंभीर अद्न्यान!

दुसरे अध:पतन म्हणजे टिकुन राहण्यासाठीची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे सामर्थ्यच नष्ट होणे. हतबल होणे. छोट्या-मोठ्या घडामोडीमुळे वैफल्यग्रस्त होत मग आध्यात्मिक असो कि राजकीय, अर्थक्षेत्रीय कथित तद्न्यांच्या भविष्यवाण्या असोत...त्यांच्या मागे लागत पुन्हा होते ते समाधान गमवत नव्या समाधानांच्या मागे लागणे.

ही अध:पतनेच आहेत. यातुन खरी शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण कशी होणार? अर्थव्यवस्था म्हणजे मानवी जीवनाला वास्तव आकार-आधार देणारी संस्था आहे...तिचाच पाया ढिसुळ केला तर ते अंतिम मानवी सुखाचे प्रेय आणि श्रेयही कसे प्राप्त होणार?

कर्जाधारीत कोणतीही अर्थव्यवस्था टिकु शकत नाही. ती टिकण्याची सुतराम शक्यता नाही.

खिशात जेवढा हात जाईल तेच विकत घ्या आणि जे खरोखर जीवनोपयुक्त आहे तेच विका...ज्यातुन नवोत्पत्ती होवु शकते ते कर्ज स्वीकारार्ह आहे...पण जे केवळ कथित स्पर्धात्मक सुख देते त्या साधनांसाठी चुकुनही कर्ज काढु नका.



1 comment:

  1. संजय सर लेख एकदम आवडला.आपली शेती जास्त भांडवली झाल्यामुळे ऋण काढून सन साजरा करण्याची वेळ आली आहे.शेतकऱ्याला ह्या चक्रव्युहातून निघणे अवघड आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...