Thursday, November 17, 2011

प्रज्ञा असल्याखेरीज

प्रज्ञा असल्याखेरीज ज्ञ्यानाची पायरी गाठता येणे अवघड असते. प्रज्ञा म्हणजे, मला वाटते ते, जीवन्/निसर्ग्/विश्व यातील गुढे उलगडण्याची अनावर जिज्ञासा. बादरायणांनी "अथातो धर्मजिज्ञासा" अशीच ब्रह्मसुत्रांची सुरुवात केलेली आहे. म्हणजे धर्माबाबतची गुढे उलगडण्याची जिज्ञासा असेल तरच पुढील वाचावे असा त्या सुत्राचा मतितार्थ आहे. येथे धर्म हा शब्द रुढार्थाने धर्म नसुन स्रुष्टीचा/विश्वाचा धर्म या अर्थाने येतो. जिज्ञासेचा विस्तार प्रज्ञेचाच आधारे होवु शकतो असे मला वाटते...आणि प्रज्ञा ही जिज्ञासेशिवाय अस्तित्वात असु शकते काय? समजा नसली तरी जिज्ञासा हीच मानवी ज्ञानाला पुढे नेणारी बाब आहे हे तर नक्कीच. आहे त्या उपलब्ध ज्ञानाला मानवी सुखांसाठी प्रायोजित उपकरणांमद्धे बदलवणे वेगळे आणि आहे त्या ज्ञानाला आव्हाने देत बौद्धिक झेप घेणे वेगळे. दोहोंमागील प्रेरणा वेगळ्या आहेत. एक प्रेरणा तात्काळ अर्थक्रांती घडवु शकण्याची संभावना बाळगते तर जिज्ञासु प्रेरणा आहे त्या मुळ ज्ञानधारांनाच क्रांतिक रुप देणे/आहे त्या ज्ञानाचे खंडन करत अत्यंत अकल्पनीय ज्ञानधारांना जन्म देणे आणि मानवी मन सतत " या निशां सर्वभुतानां तस्यात जागर्ति संयमी" या उक्तीनुसार मानवी मन जागे कसे राहील याची काळजी वाहते. मानवी सम्,आज इतिहासकाळात अनेकदा अंधारयुगात गेला आहे. आज आपण माहितीच्या अवाढव्य ढगांमुळे निर्मित माहितीच्या अंधारात तर आलेलो नाहीत ना?

माहिती वाईट असते काय? नक्कीच नाही. पण ती जेवढी सोपी आणि उथळ होत जाते तेवढेच माहितीचे मुल्य कमी होत जाते, आणि त्या माहितीचे मुल्यांकन कसे करावे हे प्रज्ञेखेरीज होवु शकत नाही. ज्या काळात माहिती मिळवणे अवघड होते, त्या कालात तर्कतीर्थ लक्ष्मनशास्त्री जोशी असोत कि Dr. आंबेडकर, आदी शंकराचार्य असोत कि तुकाराम, रा. गो. भांडारकर असोत कि धर्मानंद कोसंबी, यांनी प्रज्ञा व ज्ञानाची जी झेप गाठली होती ती आज कोठे गेली? कारण माहिती कोणती, कोठली आणि कशी विश्लेषनात्मक पद्धतीने वापरत सिद्धांत साधावेत याचे ज्ञान त्यांच्याकडे होते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

रिचर्ड बर्टनचे उदाहरण देण्याचा मोह आवरत नाही. या संकेतस्थळावरील सर्व ज्ञानाभिमुखांना तो माहितच आहे. जीवावरची संकटे पेलत या माणसाने इस्लाम्/अरबी जग जगापुढे आणले. याला मी "अथातो ज्ञानजिज्ञासा" असे म्हणतो. परंतु इतिहासलेखनही उथळ, एकतर जातीयवादी/धर्मवादी वा वंशवादी द्रुष्टीने आजच्या काळात होत असेल तर आपण ज्ञानात कोणती गुणात्मक प्रगती केली हा प्रश्न उभा राहतो.

विज्ञानाबद्दल बोलायचे तर मी मुलभुत विज्ञानाबद्दलच बोलत होतो. आज कोणी विद्यार्थी मुलभुत भौतिकी/रसायन ते अभियांत्रिकीकडे फिरकत नाही ही जागतीक अवस्था आहे. पुण्यात माझे पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र शाखेत असनारे तरुण संशोधक आणि विज्ञानकथा लेखकही असलेले प्रा. डा. संजय ढोले ही खंत नेहमीच व्यक्त करतात.

मला असे वाट्ते कि जी नवी चंगळवादी, आहे ते उपभोगा आणि जे नाही ते कोणी तरी करेल या आशांवर जगणारी मानवी संस्क्रुती, जी आज बलाढ्य झालेली आहे, ती प्रज्ञा व ज्ञानाची हानी करत आहे.

ज्या पद्धतीने सोनोग्राफीचा उपयोग करत गर्भातील कन्यांची हत्या केली जात आहे तशीच भविष्य घडवु शकणा-या ज्ञान आणि प्रज्ञेची हत्त्या केली जात आहे.

हा मानवी मनांच्या सर्वांगीण हत्त्येचा मानवी कट नसेल काय?

1 comment:

  1. True fact sir, "imagination is more important than knowleadge"says einstein......creativity always forces the man to think different and creativity is the only mother of sharpness.....it gives birth to thoughts... many philosophers are alerting the people about this issues.but people don't have time to listen to them....sir,you are doing fantastic job by alerting people about main problem especially before youth....THANKS A LOT SIR..

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...