Sunday, November 20, 2011

निर्माणकर्त्यांना डावलुन कसली लोकशाही?

आजची राजकीय विषम वाटनीची अवस्था पाहिली तर कोणालाही निराशा येणे स्वाभाविक आहे. लोकशाही प्रक्रियेत दोष आहेत हे तर उघडच आहे. पण त्याहीपेक्षा मोठे दोष हुकुमशाही वा राजेशाहीत आहेत व होते हा जगाचा इतिहास आहे. आपण एखाद्याला निवडुन देतो...त्याने काम केले नाही तर जास्तीत जास्त आपण त्याला पुढच्या वेळीस पाडु शकतो आणि नव्या मुर्खाला निवडुन देवू शकतो. समजा निर्वाचित उमेदवाराला परत बोलवण्याची संधी नागरिकांना मिळाली तर कदाचित तोच माणुस परत आहे तेथे पुन्हा बसू शकतो. राजकीय पुनर्वसन ही सर्वच राजकीय पक्षांनी असल्या नादान लोकांसाठी केलेली एक सोय आहे. त्यामुळे इकडुन हकालपट्टी झाली तरी त्यांच्या बापाचे काही एक जात नाही. राज्यातुन हाकलले कि केंद्रात, केंद्रातुन हाकललले कि राज्यपाल, नाहीतर कोणत्या ना कोणत्या महामंडळांवर त्यांचे "पुनर्वसन" केले जाते. नव्यांना संधी न देता आहे त्याच मुखंडांना सार्वभौम सरंजामदार केले जाते. ही लोकशाहीची भारतीय विटंबना नव्हे काय?

हे का होते? हा खरा प्रश्न आहे. हे नेते स्वत:ला "जनमान्य" म्हनवून प्रोजेक्ट करण्यात यशस्वी होतात म्हणुनच ना? आणि कोण करते त्यांना प्रोजेक्ट? लोक? नव्हे...तर त्या-त्या पक्षाचे त्यांचेच विकत घेतलेले, आणि संधी मिळताच टोप्याही फिरवु शकनारे लोक आणि मिडिया. एक नेता मेला तर त्याच्या बायकोला वा मुलाला तिकिट मिळते....तिची/त्याची राजकीय लायकी असतेच असे काही आहे का? पण लोक भावनीक होवून तिला/त्यालाच निवडुन देणार. मुले-बाळे-नातू-पणतु...हे चालुच आहे. ही एक लोकशाहीच्या बुरख्याआडची राजेशाही/हुकुमशाही/सरंजामशाहीच नव्हे काय? याबदल आम्हा जनतेचे नेमके काय मत आहे? काय भुमिका आहे? आम्हाला नेमके काय हवे आहे? आपण सर्वांनीच यावर बोलायला हवे असे मला वाटते.

भारतीय लोकशाही ही सरंजामशाहीचा आधुनिक अवतार आहे. ती त्यामुळेच टिकली आहे. भारतातील लोकशाही टिकली यामागे खरे हेच कारण आहे, कारण लोकशाहीचा बुरखा वापरत सरंजामशाही जीवंत राहिली आहे. त्यामुळे या सरंजामशहांना आपापल्या मतदारसंघ नामक खाजगी इस्टेटीला एन-केन-प्रकारेन सांभाळणे महत्वाचे वाटते...आणि हे सांभाळने म्हणजे अन्य काही नसुन पराकोटीच्या लुटीतील काही तुकडे निवडनुकांवेळी सामान्यांच्या तोंडावर फेकुन आपली महत्ता टिकवणे होय.

थोडक्यात भारतीय लोकशाही म्हनजे अन्य काहीही नसुन सरंजामशाहीवादी लोकशाही आहे. ती टिकली याबाबत कौतुक करण्यात फारसा अर्थ नाही.

या सरंजामशहांना जात हाच मोठा निकष असल्याने, आणि हेच लोक जातीभेदांबाबत उत्साहाने बोलत असल्याने व लोक माना डोलवत असल्याने, जात संपलेली नाही. आरक्षणामुळे जातीयता वाढलेली नसुन ती या जातीयवादी सरंजामशहांमुळे कट्टर होत चालली आहे. कोणात मुजोरपणाची हद्द झाली आहे तर कोणाला जीव मुठीत धरुन एखाद्या भिका-याचे जेवन जगावे लागत आहे. आणि य्स्स पद्धतीने देशाचे सत्ता वा मत्ता वाढनार नाही...महासत्ता होणे ही तर दुरची बाब राहीली.

या लोकशाही म्हणवना-या देशाची एकंदरीत जातींच्या प्रमानातील जनसंख्या पाहीली तर त्या प्रमाणात त्यांना जातीनिहाय प्रतिनिधित्वही नाही. असते तर निळ्याला भगवा कशाला भिडला असता? ओबीसी, बीसी, भटके-विमुक्त ई. समाजघटक (मी त्यांना खरे निर्मानकर्ता घटक म्हणतो....अणि त्यांनाच राष्ट्रीय निर्मितीपासुन दुर ठेवावे?) हे सर्वच घटक राजकीय जागरुकतेपासून अजुनही दुरच आहेत. याचे महत्वाचे कारण म्हणजे ओबीसी म्हणुन समाज मोठा वातला तरी त्यांतील शेकडो जातींचा विचार केला तर जातपातळीवर ते अत्यल्पसंख्य ठरतात आणि त्यांना एकत्र येवु न देण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो. खरे तर हे सारेच घटक व्यवसायाधिष्ठित जातीने वेगळे असले तरी ते एकाच मुळ निर्मितीक्षम समाजातील आहेत, ते एकाकार आहेत याचे भान त्यांना दिलेच जात नाही.

त्यामुळे विभेदात्मक होत ते खोट्या आश्वासनांवर वा अफवांवर भावनीक होत ते आपापली मते कोणाच्या तरी पारड्यात टाकतात. सत्ताधारी घटक जाती ज्या प्रमानात माध्यमांचा वापर करतात तेवढा सोडा, मुळात त्यांना कसलेही स्थानच नाही...ते मिळवण्यासाठी एकाकारतेची भुमिका या सर्वच जातीघटकांनी घ्यायला हवी ती त्यांना जमतही नाही...कारण त्यांना आपल्या सर्वच समाजाच्या एकत्वाची जाणीव करुन दिली जातच नाही.

तसे करणे हे राजकारणी पुढारी/विचारवंत व मिडियाच्या तत्वांत बसत नाही.

उलट ते माध्यमे जो प्रचार प्रसार करतात त्या मतांना बळी पडतात. आज जसे सामाजिक जनजागरण महत्वाचे आहे तेवढेच राजकीय जनजागरणही महत्वाचे आहे. या निर्माणकर्त्यांना स्वता:चे बळ ओळखावे लागणार आहे. खरे तर या निर्माणकर्त्या घटकांचाच एक सर्वकश राजकीय पक्ष असला पाहिजे. मुळात एकाकार आणि ख-या अर्थाने राष्ट्रनिर्मानात सर्वोपरी सहभाग असणा-या या घटकावरच सरंजामदारी नेत्रुत्वे लादली जातात व अपवादाने काही गाजरे फेकली जातात हे काही समर्थनीय असू शकत नाही. यावर मला निर्माणकर्त्या बांधवांचे विचार ऐकायला आवडतील. आज बहुजनीय नेते अनेक पक्षांत विखुरलेले आहेत. त्यांचे अवमान कसे वारंवार केले जाताहेत हेही आपण पहातोच आहोत आणि याची खंत आपल्याला नाही. कारण हा निर्मानकर्ता समाजच छोट्या-छोट्या जातींत कसा विखुरला गेला आहे आणि कोणालाही समग्र सामाजिक व राजकीय भान नाही हे सत्यही आपण पहातो...अनुभवतो आहोत. या जाती मुलत: एकाच समाजघटकाचे व्यवसाय-सेवानिष्ठ वितरण असले तरी त्यांची मुळे एकच आहेत हे आता तरी लक्षात घ्यावे लागणार आहे. आता शासित नव्हे तर शासक बना हाच मुलमंत्र जपणे योग्य राहील असे मला देशाच्या व्यापक आणि विराट भवितव्यासाठी आवश्यक वाटते.

आज गोपीनाथ मुंढे, छगन भुजबळ यांच्यासारखे बलाढ्य नेते जातीय्वाद्यांच्या वा सरंजामदारांच्या गोटात नाईलाजाने आहेत. महादेव जानकरांसारखे नेते स्वतंत्र पक्ष काढुन त्यागबुद्धीने राजकारण व समाजकारण करतात...त्याबद्दल खुद्द त्यांचेच आताचे अनुयायी वा समाजीय जेवढ्या बळाने त्यांच्या पाठीशी उभे रहावे तेवढे उभे रहात नाहीत, कारण शिस्तबद्ध पद्धतीने त्यांची जातीय वाटनी करुन टाकण्यात हे सरंजामशहा यशस्वी झालेले आहेत.

हे सांगण्याचे कारण म्हणजे भुजबळ माळ्यांचे, मुंढे वंजा-यांचे, आठवले ते प्रकाश आंबेडकर नवबौद्धांचे आणि जानकर धनगरांचे अशी अत्यंत अन्याय्य वाटनी या निर्मानकर्त्यांनी स्वीकारलेली आहे. ती समुळ चुकीची आहे. जोही कोणी निर्मानकर्त्या समाजघटकातील नेता आहे त्याला सर्वांनीच मोठे करायला हवे, तरच ख-या अर्थाने ज्या न्याय्य सत्ता आपल्या पुर्वजांनी स्वबळावर निर्माण केल्या तशाच न्याय्य सत्ता पुन्हा उभ्या करता येतील. द्न्यान, विद्न्यान आणि अर्थव्यवस्थेला नवे वळण मिळेल.

ओबीसी, एस.सी, बी सी, एस.टी, एन.टी म्हणु नका...हे सारे निर्माणकर्ते आहेत. इतिहास पहा...त्यांची महत्ता पहा आणि त्यांच्या समाजाच्या एकंदरीत प्रगतीसाठी झालेल्या विभक्तिकरनातले एकाकारत्व पहा...

हे आता सर्वांना शिकावे लागणार आहे, अन्यथा आर्थिक, राजकीय, सामाजिक अन्यायाचे बळी सतत व्हावे लागेल. हे सरंजामदार निघ्रुण आहेत...अलीकडेच एका कुलकर्णीची हत्या झाली...एक च्यनेल सोडला तर त्याचे कसलेही पडसाद मिडियात नाहीत. अशा अजुन कितीतरी होत असतील वा खोट्या गुन्ह्यांमद्धे त्यांना जेलमद्धे सडवले जात असेल...कोणाला माहित? आणि माहित करुन घेण्याची गरज कोणाला वाटते?

निर्माणकर्त्यांनो, तुम्हीच देशाला संस्क्रुती दिली, धर्म दिला, विचारांची अद्भुत वादळे निर्माण केली....सरंजामशहा हे नेहमीच प्रथम विचारांची हत्या करत तुम्हाला गुलाम करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही या जातीय विघटनाला बळी पडला आहात...

आता तरी बदला अथवा खरी लोकशाही या देशात येवु शकणार नाही.
तुम्हाला न्याय मिळण्याची सुतराम शक्यता नाही.


3 comments:

  1. न्याय मिळण्यासाठी अदुगर सुतराजू मिळाला की काम सुलभ होई असे नाही वाटत?

    ReplyDelete
  2. भारतासाठी जसे रशिया आणि अमेरिका म्हणजे ढवळ्या आणि पवळ्या आहेत तसेच मागासवर्गीयांसाठी सवर्ण समाजात ढवळ्या आणि पवळ्या आहेतच. कोणालाही पाठींबा दिला तरी तडजोड स्वीकारावीच लागणार. मागासवर्गीयांचा सतत नाईलाज होत राहणे यातच सवर्णांचे हित सामावलेले आहे.

    ReplyDelete
  3. संजय सर एकदम वास्तववादी लेख लिहिला आहे.सर्वाना आत्मपरीक्षणाची गरज आहे.

    ReplyDelete