Sunday, December 4, 2011

रक्षक संस्थेचा इतिहास

महार कोण होते हे नीट समजावुन घ्यायचे असेल तर सर्वप्रथम नगर-ग्राम रक्षक संस्थेचा इतिहासही समजावुन घ्यायला हवा.
सैन्यदले ही राजकीय सीमांचे रक्षण करत असत. परचक्र आले वा आक्रमण करायचे असले तर युद्धात सैन्यच कामी येई. आद्य काळात खडे सैन्य अशी व्यवस्था नव्हती, तर लढु शकणारा प्रत्त्येक नागरिक युद्धात भाग घेत असे. एका अर्थाने ही एक पार्ट टाईम व्यवस्था होती. परंतु जसजसा राज्यांचा आकार वाढु लागला, तसतशी मात्र खड्या सैन्याची आवश्यकता भासु लागली. सैनिकी पेशा याच काळात, म्हणजे सनपुर्व २००० च्या आसपास पुर्णवेळ व्यवसाय बनला. यालाच आपण आद्य क्षत्रीय वर्ण म्हणु शकतो. तत्पुर्वी तो अस्तित्वात असण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नाही.

या काळात जनसंख्या वाढत गेली तसतशी नगरे व ग्रामांची संख्या वाढत गेली. नगरांना व ग्रामांना खालील धोके होते.

१. चो-या व दरोडे.
२. चोर-दरोडेखोरांकडुन वा आक्रमकांकडुन शेतीची व ग्रामे-नगरांची नासधुस-जाळपोळ.
३. गावाच्या वा नगराच्या हद्दीतुन जाणा-या येणा-यांकडुन निर्माण होवु शकणारा संभाव्य धोका.
४. नागरिकांनीच सारा/कर चुकवणे, लांड्यालबाड्या व फसवणुकी करणे तसेच राज्याच्या/ग्रामाच्या हितसंबंधांना धोका पोहोचवणे.

यासाठी नगरप्रमुख व ग्रामणी यांच्यावर ज्या जबाबदा-या टाकल्या जात असत त्या अशा.
१. गाव/नगरकुसाचे रक्षण.
२. ग्राम/नगर सीमांची अचुक माहिती ठेवणे.
३. ग्राम-नगरात येणा-या प्रत्त्येक बाहेरच्या माणसांची नोंद ठेवणे, आवश्यकता भासल्यास त्यांच्यावर नजर ठेवणे.
४. ग्रामहद्दीतुन जाणा-या व्यापा-यांच्या रक्षणाची हमी घेणे. (जर त्या ग्राम/नगरहद्दीत व्यापा-याचे काही नुकसान झाले तर त्याची भरपाई ग्रामणीने करुन द्यायची असे.)
५. प्रवाशांना आवश्यकता भासली तर पुढील मार्ग दाखवण्यासाठी वाटाड्याची नियुक्ती करणे व त्याचे संरक्षण करणे.
६. नगर/गांवात चोरी/दरोडा वा हिंसक घटना घडली तर त्याचा तपास करणे. अपराध्याला दंडाधिका-यासमोर नेणे व आवश्यक पुरावे सादर करणे.
७. व्यक्तिगत मालकीच्या शेतीचा वा ग्रामसीमांबाबतचा तंटा सोडवणे व त्यासाठी त्यांच्या योग्य नोंदी ठेवणे.

भारतातील नगरव्यवस्था व ग्रामव्यवस्था ही बव्हंशी स्वयंपुर्ण होती. ग्रामणी (वा गोप, म्हणजे आजचा पाटील) हा ग्रामाचा सर्वोपरी जबाबदार अधिकारी असे. त्यच्यावर केवळ वरीलच नव्हे तर ग्रामहद्दीतील नैसर्गिक साधनसंपत्तीची नोंद ठेवणे, त्यावर देखरेख करणे, सारा/कर जमा करणे व तो राजकोषात भरणे याही जबाबदा-या असत. त्याचा मोबदला म्हणुन राजाकडुन त्याला वतने दिली जात.

नगरांची प्रशासन पद्धती ही साधारणपणे ग्रानव्यवस्थेप्रमानेच होती. नगरप्रमुखाला नागरका, नगरपाल वा पुरमुख्य असे पद होते. सातवाहन काळात याच पदाला महारक्ख असे प्राक्रुत नाम होते. मेगास्थेनिसने याबाबत बरेच लिहुन ठेवले आहे. नागरकाची मुख्य जबाबदारी असे ती म्हणजे नगरात शांतता प्रस्थापित ठेवणे. मद्यालये, द्युतग्रुहे, गणिकालये यावर देखरेख ठेवणे, परकीय नागरिकांची येण्यजाण्याची नोंद ठेवणे आणि त्यांच्या हालचालींचा वेध घेणे, चो-या होणार नाहीत वा कोणाच्या वस्तु हरवल्या तर त्या शोधुन देणे, नगराच्या हद्दीत आलेल्या भटक्या समाजावर देखरेख ठेवणे ई. जबाबादा-या असत. एका अर्थाने आजचा पोलीस सुपरिटेंडेंट जे कार्य पहातो तेच कार्य हे करत असत.

अर्थात सर्वोच्च अधिकारी ग्रामणी वा नगरप्रमुख असला तरी तो स्वता: व्यक्तिशा: उपरोल्लिखित जबाबदा-या सांभाळणे शक्यच नव्हते. मेगास्थीनिज लिहितो त्याप्रमाणे नगर व ग्रामरक्षणासाठी रक्षक दले असत. कोटाचे, वेशीचे रक्षण, रात्री गस्त घालणे, हल्ला झाला तर प्रतिकार करणे व तशी माहिती नगरप्रमुख वा ग्रामणीस वेळीच देणे, व्यापारी तांडे वा प्रवाशांचे रक्षण करणे, चोर पकडणे इ. पोलीसी कामे रक्षकांनाच करावी लागत.

त्या कामांसाठी अर्थातच कुशल, चाणाक्ष, धोके पत्करणा-या आणि लढवैय्या लोकांची गरज होती. त्यांच्या अस्तित्वाखेरीज शांतता व सुव्यवस्था राखणे, प्रजेच्या वित्त-जीविताची रक्षा करणे असंभवच होते.

कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार अशा रक्षकांना नियमित रोख वेतन दिले जात असे व तसा आग्रहही आहे.

भारतीय धर्मशास्त्रात, ग्रीक व रोमन लोकांप्रमाणे देव व मनुष्य हातात हात घालुन कायदा-शांतता व सुव्यवस्था याची काळजी घेतात असे म्हटले आहे. या बाबतीत ऐतरेय ब्राह्मनामधील एक कथा रोचक आहे. मनुष्य आणि देवांनाही जेंव्हा प्रुथ्वीवर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करता आली नाही तेंव्हा प्रजापती (याच्यावर शांतता सुव्यवस्थेची वैश्विक जबाबदारी होती) रागावला व देवांना बोलावुन त्याने विचारले, "जर तुम्हीच जबाबदारीतुन अंग काढुन घेतले तर मानवजातीचे रक्षण कोण करील? मानवजातीचे रक्षण झाले नाही तर अराजक माजेल व लोक धर्मभ्रष्ट होतील." यावर देवही लाजले आणि म्हणाले कि अशी अराजकाची स्थिती राहु नये म्हणुन राजा आणि त्यासोबत रक्षक असतील.

मनुष्य हा मुळात स्खलनशील प्राणी असल्याने, परचक्रापेक्षा मोठा धोका हा अंतर्गत समाजविघातक व्रुत्ती व प्रव्रुत्तींचा होत्ता. या प्रव्रुत्तींमुळेच अराजकाचा धोका होता. त्यासाठी रक्षक संस्क्रुती सिंधुकाळापासुन अस्तित्वात आली हे येथे लक्षात ठेवले पाहिजे. युद्धे हे काही सातत्यपुर्ण घटना नव्हती, तर अंतर्गत रक्षण ही त्याहुनही मोठी आणि दैनंदिन आवश्यकता होती. राजा हा नागरक ते ग्रामणी यांच्या मार्फत रक्षकदलांच्या मदतीने या अंतर्गत शांतता-सुव्यवस्थाची काळजी घेत असे.

म्रुच्छकटीक नाटकात आपण तत्कालीन अराजकाच्या स्थितीचाही अनुभव घेतो, व त्यातील रक्षकांच्या भुमिकाही पहातो. कालिदासाने कुमारसंभवमद्धे या रक्षकांना "रक्षक" असेच म्हटले असुन त्यांचा प्रमुख तो "महारक्षक" असे नोंदवले आहे, एवढेच मी येथे नोंदवुन ठेवतो. असे अनेक उल्लेख अभिजात नाटकांत जसा येतो तसाच बाणभट्टाच्या "कादंबरी"तही. महावंसमद्धे जसा येतो तसाच सिलोन (आता श्रीलंका) येथील काही शिलालेखांतुनही.

थोडक्यात "रक्षक" ही संपुर्ण समाजाला रक्षण देनारी, त्यांच्या जिवित व वित्ताच्या रक्षणाची खात्री देणारी अत्यंत महत्वाची संस्था होती. "रातंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" असे वाटावे अशा स्थितीत त्यांनी कुशलतेने, शौर्याने ग्राम व नगरांचे संरक्षण गेली किमान ६००० वर्ष केलेले आहे.

जात कशी बनते?

हिंदु धर्मात कोणीही, तो निर्मानकर्ता असो कि सेवा उद्योजक, जो वंशपरंपरेने व्यवसाय करतो, त्याची जात बनते. उदा. शिंपी ही जात भारतात सर्वात उशीरा बनली कारण कपडे शिवुन घालायची पद्धत किमान दुस-या शतकापर्यंत तरी नव्हती. पण जेंव्हा ६-७ व्या शतकात शिवलेले कपडे घालायची फ्यशन आली तेंव्हा कोठे या जातीचा उदय झाला.

रक्षक तर अत्यंत पुरातन सेवा व्यवसाय. यात नुसते सैनिकाचे गुण पुरेसे नव्हते तर एखाद्या गुप्तचराचे, पाठलाग करण्याचे, संभाव्य धोके टाळण्यासाठी आधीच पुर्वतयारी करण्याचे, सीमा...मग त्या व्यक्तिगत मालकीच्या शेतांच्या असोत कि गांवाचा...नगराच्या...त्याची अचुक नोंद ठेवणे...गुप्त वाटा व पंचक्रोशाची माहिती ठेवणे अशी विविध द्न्यानसंपदा ठेवणेही अत्यावश्यक होते.

हा व्यवसाय वंशपरंपरागत झाल्याने ती एक जात बनली एवढे आपण येथे निर्विवादपणे म्हणु शकतो. कारण कोणत्याही व्यवसायाची जात बनवणे हा हिंदु परंपरेचे अविभाज्य अंग आहे. या जातीला स्थानिक भाषाभेदामुळे वेगवेगळी नांवे असली तरी त्याचे मुळ एकाच लढवैय्या समाजात आहे.



No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...