Thursday, December 8, 2011

महार शब्दाची व्युत्पत्ती

आपल्याला येथे सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम शोधायचा आहे. यासाठी पुर्वी अनेक विद्वान व डा. इरावती कर्वेंसारख्या विदुषिंनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे...पण यातुन महार हा शब्द कोठुन आला हे मात्र स्पष्ट होत नाही, महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही.

"म्रुताहारी" (म्हणजे म्रुत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणुन) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गत: म्रुत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे म्रुताहारी बुद्ध धर्माच्या द्न्यात इतिहासात अगणित झालेले असतील. त्यांना सर्वांनाच "महार" म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात व आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे, म्हणजे महार शब्दाचे मुळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.

शिवरामपंत भारदे म्हणतात कि महारचे मुळ "मह-अर" म्हणजे अरण्यात पर्वतांच्या गुहेत राहणारा वा अरण्य वा गुहांचा नाईक हे आहे, म्हणुन त्याचे काम वाटाड्याचे ठरवले. महारांवर वाटाड्या ही अन्य अनेक महत्वाच्या कामाबरोबरच एक जबाबदारी होती. त्यमुळे ही व्युत्पत्तीही स्वीकारता येत नाही.

महाआहारी (खुप खाणारे) असणा-या लोकांना महार म्हणु लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्क (रोबेर्टसन) मद्धे दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही. उलट महार समाजाचे जेवढे कुपोशण झाले तेवढे अन्य कोणत्याही समाजाचे झाले नसेल.

म्रुतहर या शब्दापासुन महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा डा. रा. गो. भांडारकर यांनी केला आहे. पण पुन्हा म्रुत जनावरांना वाहुन नेणे ही जबाबदारी महार समाजावर त्यांच्या सामाजिक व आर्थिक अवमुल्यनानंतर आलेली आहे. त्यामुळे ही व्युत्पत्तीही टिकत नाही.

महात्मा फुले यांनी महा-अरी, म्हणजे आर्यांचा मोठा शत्रु अशी व्युत्पत्ती सुचवलेली आहे. परंतु प्रत्यक्षात महार लोक गाव-नगरांचे रक्षण करत असत, त्यामुळे ते शत्रु असु शकत नाहीत. शत्रुवर रक्षणाची महत्वाची जबाबदारी कोणीही टाकणे असंभाव्य आहे.

दुसरे असे कि महार एक जात म्हणुन कोनत्याही स्म्रुती/पुराणांमद्धे उल्लेखिलेली नाही. अस्प्रुष्यांच्या यादीतही ही जात पुराणे व स्म्रुत्यांनी नोंदलेली नाही. मनुस्म्रुतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचु, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गांवाबाहेर रहावे असे म्हटलेले आहे, पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्प्रुष्य म्हटलेले नाही. तैत्तिरिय ब्राह्मणानुसार व विष्णुस्म्रुतीनुसार फक्त चांडाल ही जात अस्प्रुष्य आहे. त्यामुळे मुलात जन्मभुत अस्प्रुष्यता भारतात नेमकी कधी आणि का आली असे निश्चयाने सांगता येत नाही. परंतु अस्प्रुष्यतेचा उगम दहाव्या ते बाराव्या शतकातच शोधावा लगेल, कारण तत्पुर्वी चांडाळ वगळता अन्य कोणत्याही जातीला अस्प्रुष्य मानले गेलेले नाही.

वर्णसंकरातुन अस्प्रुष्य जातींचा विकास झाला हे मनुस्म्रुतीचे मत मानव वंश शास्त्राने खोटे ठरवले आहे. जाती या विशिष्ट सेवा-उद्योगातील कौशल्यातुन निर्माण झालेल्या आहेत. आपल्या व्यवसायात अन्यांनी पडुन स्पर्धा निर्माण करु नये म्हणुन जातीव्यवस्था सैलतेकडुन बंदिस्ततेकडे गेली असेच आपल्याला समाजव्यवस्थेच्या एकंदरीत प्रवासातुन दिसते. याला कालौघात बदलत गेलेली आर्त्झिक, राजकीय आणि धार्मिक स्थिती आहे हे आपण मागील प्रकरणात पाहिलेच आहे.

मनुस्म्रुतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात, अगदी पुराणांतही महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशुद्र, मेघवाल ई. भारतात अस्प्रुश्य मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेखही नाही. तसे असते तर उल्लेख आले असते. याचाच अर्थ ९-१० व्या शतकानंतर (म्हणजे स्म्रुतीकाळ संपल्यानंतर) कधीतरी या जातींना अस्प्रुष्य बनवले गेलेले दिसते, त्याचेही विश्लेषन येथे आपल्याला करावयाचे आहे.
मग प्रश्न असा उद्भवतो कि "महार" ही मुळात (पुरातन काळी...सिंधुकाळी) जात होती काय?
महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?
त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक द्रुष्टीक्षेप टाकुयात. महारांमद्धे आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे ई. आडनावे आढळतात.

ही आडनावे महारांनी ते ज्यांच्या सेवा करत होते त्या उच्चवर्णीयांतुन उचलली असा दावा केला जातो, तो खरा नाही. कारण महार संपुर्ण गावांची रक्षकसेवा करत असत. तेंव्हा ते एखाद्या विशिष्ट घराण्याचे आडनांव उचलतील हे असंभवनीय आहे.

या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक पुरातन काळी कधीतरी एकत्र होते आणि व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा वेगवेगळ्या जाती एकाच समाजघटकांतुन कालौघात विभक्त झाल्या. जाती जन्माधारित बनत गेल्याने जातीधर्म आणि समाजधर्मात विभाजन होत तुकडे पडत गेले.

त्यामुळे महार समाज हा सर्वस्वी स्वतंत्र वंशातुन विकसीत झाला आहे असे मानता येत नाही. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे...(शिव/विष्णु/विट्ठल/महलक्ष्मी ई.) त्याचवेळीस या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्प्रुष्तेचा काळात अन्य मंदिरांत स्थान व प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसीत होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहु शकतो. धनगर समाजानेही आपली अस्प्रुष्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहेत आणि ती आज महत्ता मिळवुन बसलेली आहेत हा अनुभव आपण घेतो.

म्हणजे महार जातीत सर्वच मानवघटकांतील लोक सामाविष्ट आहेत असे म्हणता येते. कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही. समाजाच्या विकासाच्या ओघात त्या-त्या व्यवसाय-सेवा क्षेत्रांचा जसजसा विकास वा नवीन शोध लागल्याने वा नव्या सेवांची गरज भासु लागल्याने तसतसे त्यात अन्य समाजघटकातील लोक त्या विशिष्ट व्यवसायाबाबत आवड व कौशल्य असल्यामुळे वा केवळ चरितार्थासाठी प्रवेश करतात. त्यानिष्ठ आधी एक पेशा बनतो. अशा रितीने असंख्य व्यवसाय कालौघात जगभरच निर्माण झालेले दिसतात, परंतु त्यांना आवडीनुसार कधीही पेशा बदलण्याचा जन्मदत्त अधिकार होता. एके काळी तो भारतातही होता.
उदाहरणार्थ जन्माने कोळी असलेल्या व्यासांनी व वाल्मिकींनी विश्वविख्यात महाकाव्ये लिहिली. इतरा दासीचा पुत्र असलेल्या ऐतरेयाने ऐतरेय ब्राह्मण लिहिले. कालिदास व शुद्रक या कथित शुद्रांनी महाकाव्ये ते विश्वविख्यात नाटके लिहिली. सातवाहनांना पुराणांनी शुद्र मानले होते. सातवाहन हे औंड्र (आंध्र हे प्राक्रुत रुप) या घराण्यातील असुन ऐतरेय ब्राह्मणात त्यांचा शुद्र मानले आहे. हा मुळचा पशुपालक समाज, परंतु त्यांना सत्ता स्थापन करण्यात, म्हणजेच क्षत्रियाचा मेशा निवडण्यात अडचण आली नाही हेही स्पष्ट होते.
आता सर्वप्रथम आपण "महार" या शब्दाचा उगम शोधला पाहिजे. भारतातील बव्हंशी जातींची नावे ही व्यवसायाधारित आहेत हे आपणास माहितच आहे. उदा. शिंपी, सोनार, न्हावी, कुंभ्रार ई.
म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारीत असला पाहिजे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
त्यासाठी मी सुरुवातीलाच वर्णीत केलेला महारांचा व्यवसाय पुन्हा एकदा तपासुन घेवुयात.
अ. महार हे मुख्यत: ग्रामरक्षक होते...चो-या-दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपु शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. त्यांनाच भुमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच जमीनींच्या व गांवशीवेच्या सीमांबाबतचा वाद मिटत तर होताच पण संरक्षितही रहात होत्या.
ब. इ.स. च्या पहिल्या सहस्त्रांतापर्यंत प्रादेशिक व विदेशी व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे. परक्या मुलुखातुन जातांना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवैय्या अशी राहिलेली आहे.
क. सरकारी खजीना (महसुल) प्रामाणिकपणे व सुरक्षित रित्त्या तालुक्याला पोहोचवण्याचे कामही तो करत असे.
ड. चोरांचा माग काढणे, पकडणे व मुद्देमाल परत मिळवणे.
ही झाली महारावरची मुख्य जबाबदारी. याशिवायही त्याला इतरही अनेक प्रशासकीय कामे करावी लागत असत. उदा. जन्मम्रुत्युच्या नोंदी ठेवणे, गांवात येना-या-जाणा-यांवर लक्ष ठेवणे, संशयिताला वेशीवरच अटकाव करणे इ.
परंतु त्याचे अत्यंत महत्वाचे कार्य होते ते म्हणजे रक्षकाचे हे आता स्पष्ट झाले असेल. म्हणजेच गावाचे/व्यापा-यांचे "रक्षण" हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.

महारक्ख (महारक्षक) म्हणजेच आजचा महार समाज
या दोन मुद्द्यांवरुन मला स्पष्ट दिसते कि "महार" हा शब्द "महारक्षक" (वा प्राक्रुत/पाली-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे. आणि हीच सद्न्या महार या शब्दाचा उलगडा करते अन्य कोनतीही नाही हे जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरुनच सिद्ध होते. ही कर्तव्ये तत्कालीन राजकिय अस्थिरता, धामधुम आणि कधी पुर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जीवंत राहुच शकत नव्हती.
यासाठी आपल्याला उपलब्ध पुराव्यांचा विचार करायचा आहे. महारक्षक व महारक्ख हे शब्द संस्क्रुत व पाली साहित्यात असंख्यदा येतो. महा धम्मरक्ख, महा लेखारक्ख (लेखागाराचे रक्षण करणारा) तसेच महा रक्ख अशा स्वरुपात आपल्याला या शब्दाचे उल्लेख मिळतात.
रक्ख या शब्दाचा इंग्रजी व पाली शब्दकोशात रक्ख म्हणजे रक्षण असाच दिलेला आहे.
महावंसमधील प्रकरण LXXIVI मद्धे रक्ख नामक सेनापतीच आहे.
श्रीलंकेतील ब्राह्मी शिलालेखांत (Inscriptions of Ceylone) रक्ख व महारक्ख हा शब्द वारंवार येतो. हा शब्द नगर/ग्राम व व्यक्तिगत रक्षक अशाच अर्थाने वापरला गेला आहे.
कालिदासाच्या रघुवंशात रक्षक व महारक्षक हे पदनाम वारंवार येते.
सम्राट अशोकाने महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रचार करायला पाठवले होते त्याचे नांव धम्म महारक्षित असे होते.

सातवाहन आणि महारक्ख

आजची मराठी ही सातवहनकालाच्या माहाराष्ट्री प्राक्रुताचे देणगी आहे. महाराष्ट्र हा महारट्ठ या शब्दापासुन बनलेला आहे. रट्ठ म्हणजे प्रांतांचे जे विभाग होते ते. या रट्ठांचे जे प्रमुख केंद्रवर्ती सत्तेकडुन नेमले जात त्यांना महारठी म्हणत. सिमुख सातवाहनाने अशाच महारठीच्या नागणिका या कन्येशी विवाह केला होता. या महारठींच्या तत्कालीन काळात बदल्याही होत असत. महारट्ठांचे कार्य हे आजच्या जिल्हाधिका-याप्रमाने असे. याच वर्गातुन मराठा समाजाचा उदय झाला असे उपलब्ध पुराव्यांवरुन दिसते. तिलाही पुढे एक जात बनवण्यात आली.
महाभोज हे एका परीने सामंत असत व ते अधिक रट्ठांवर नियंत्रण ठेवत. या महाभोजांची मात्र जात बनल्याचे आढळत नाही कारण त्यांची मुळातील अल्प संख्या.
महारक्ख हा मात्र व्यापक समाज होता. सातवाहन काळातही ग्रामे व नगरांभोवती सिंधु संस्क्रुतीप्रमाणेच कोट बांधण्याची प्रथा होती. स्वाभाविकच प्रत्त्येक ग्राम व नगराच्या कोटांची रक्षव्यवस्था पाहण्यासाठी रक्षकांची...रक्खांची नियुक्ती केली जात होती. या रक्खांच्या प्रमुखाला महारक्ख असे संबोधले जात होते. ग्रामसीमांचे रक्षण करण्यासाठीही रक्षक नेमले जात होते असे गाथासप्तशतीवरुनही दिसुन येते. महारक्ख या पदावरील व्यक्तींत बदल होत असल्याने जवळपास सर्वच रक्खांना पुढे महारक्ख हे पद कधीनाकधे उप्भोगायला मिळाले असल्याने ते व त्यांचा परिवारतील सर्वच महारक्ख बनले. असेच महारट्ठांबाबतही झालेले आपल्याला दिसते.
"महा" हा शब्द माहाराष्ट्री प्राक्रुतात तसेच पालीत असंख्यदा वापरला गेलेला आहे हेही एक विशेष. उदा. महावंस, महास्वामी, महारक्ख, महाबोधी, महासेना, महालेखारक्ख, महायान, महाविहार...इ. "महा" या शब्दातुन प्रमुख...मुख्य असा अर्थ प्रतीत होतो.
"रक्ख" हा शब्द पाली साहित्यात राक्षस या अर्थानेही वापरला गेल्याचे आपल्याला दिसते. परंतु त्यात आस्चर्य वातण्याचे काहीच कारण नाही. राक्षस या शब्दाची व्युत्पत्तीच मुळात "रक्षति इति राक्षस:" (रक्षण करतो तो राक्षस.) भारतीय समाज हा असुर संस्क्रुतीतुनच विकसीत झालेला आहे. असुर शब्दाला जसे कालौघात बदनाम केले गेले तसेच राक्षस या शब्दालाही. हे कार्य पुराणकारांनी असुर संस्क्रुतीची महत्ता घटवत वैदिक अवगुंठण चढवण्याचा नादात केले आहे हे मी "असुर कोण होते?" या प्रदिर्घ प्रबंधात केलेले आहेच.
थोडक्यात एका मुळच्या बलाढ्य संस्क्रुतीला व त्यांचा युद्धायमान प्रेरणांना हतोत्साहित करण्यासाठी ही एक मोठी क्लुप्ती वापरली गेली असे स्पष्टपणे म्हनता येते.
थोडक्यात आजचा महार समाज हा ग्राम/नगर/व्यापा-यांच्या रक्षणासाठी अहोरात्र राबणा-या महारक्खांचा समुदाय आहे हे येथे सिद्ध होते.
कालौघात महारक्ख या शब्दाचा "क्ख) गळुन फक्त महार हा शब्द शिल्लक राहिला. असे असले तरी "महारकी करणे" (महारक्खी करणे) हा भाग उरलाच. आणि या समाजाचे कितीही अवमुल्यन केले गेले असले तरी, त्यांना कालौघात शुद्रातीशुद्रांत ढकलले गेले असले तरी त्यांच्या पुर्वांपार रक्षणाच्या मुळ जबाबदा-यांत कसलाही फरक स्वातंत्र्यपुर्व काळापर्यंत पडलेला दिसत नाही यावरुन महारक्ख म्हणजेच आजचे महार असे मला निर्विवादपणे म्हणता येते.
महार जमात ही नैसर्गिक रित्त्याच लढवैय्या आहे. ब्रिटिश त्यांना मार्शल रेस का म्हनत हे आता पुरेसे स्पष्ट व्हावे.
युद्धातील सैनिकाला फक्त युद्धकाळात लढावे लागे. परंतु महारक्खांना पुरातन काळापासुन रात्रंदिवस डोळ्यात तेल ग्घालुन गावशिवेचे व वेशीचे रक्षण करावे लागे, त्यामुळे अधिक दक्ष व पराक्रमी असण्याची मुलभुत आवश्यकता होतीच. आणि ती या समाजाने जपली.

उदय

महार समाजाचा उदय नेमका कधी झाला याचे भौतिक/लिखित पुरावे आज आस्तित्वात नाहीत. मुलता: ही प्रत्त्येक ग्रामस्तरावर व नगरस्तरावर रक्षण देणारी सेवासंस्था असल्याने तिच्या उदयाबद्दल फारसे लिखित पुरावे ठेवण्याची तत्कालीन समाजाला गरज भासली नसावी. शिवाय ही एक वैशिष्ट्यपुर्ण सेवा आहे. म्हणजे शांततेच्या काळात त्यांचे अस्तित्व असुनही ते जानवत नाही. आजही पोलिसांबाबत असेच घडते. त्यांच्या अस्तित्वामुळेच शांतता असते हे खरे पण त्याचे मुल्ल्य कळत नाही. अनागोंदी, परचक्र वा दरोडेखोरांचे हल्ले होतात व रक्षकांना प्राणपनाने लढावे लागते तेंव्हाच त्यांचे महत्व लक्षात येते. अशा लढवैय्यांच्या स्मारकशिला आपल्याला सर्वत्र आढळतात.
समाजेतिहासाचा प्रवाह कसा वाहतो याचा अंदाज घेतला तर जेंव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेंव्हाच हा समाज आपल्याच समाजातुन लढवैय्या व्यक्तींना नागर/ग्राम रक्षणासाठी नियुक्त करतो. त्याखेरीज समाजव्यवस्था शांतता आणि सुव्यवस्थेचे सुख उपभोगुच शकत नाही. त्यासाठी रक्षकयंत्रणा अत्यावश्यक ठरते.
युद्धातील सैनिक आणि नागर/ग्राम रक्षक यात मुलभुत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रु सैन्यावर तुटुन पडण्याचे काम असते. परंतु ग्रामरक्षकाला मात्र तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. त्याच्यात फक्त लढवैय्येपणाचा गुण पुरेसा नसतो तर अन्वेषनाची, हेरगिरीची तल्लख बुद्धीमत्ताही तवढीच आवश्यक असते ज्याची सैनिकांना गरज नाही. असे लोक आहे त्याच समाजातुन निवडुन, त्यांना प्रशिक्षित करुन नियुक्त केले जात होते. तेंव्हा ही जात जन्माधारीत नव्हती तर फक्त गुणाधारीत होती. पुढे जातीव्यवस्थेचा रोग या संस्क्रुतीला एकुणातच लागला तेंव्हा ही एक वंशपरंपरेने कर्तव्ये करत असतांनाच जात बनली. महाराष्ट्रात माहाराष्ट्री प्राक्रुतातुनच मराठीचा उदय झाल्याने महारक्खाचे महार हे संकःएपाने नांव बनले. इतर प्रांतात मात्र समान पेशाच्या जातींचा उगमही या पद्धतीने शोधता येईल असे मला वाटते.
शत्रुच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव/शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधु काळापासुनची आहे. सिंधु संस्क्रुतीच्च्या उदयाचा काळ हा किमान साडेसहा हजार वर्ष जुना आहे. तटबंदीयुक्त नगरे/ग्रामे आली कि त्यांच्या रक्षणाची, पहारे ठेवण्याची गरज आलीच. त्याच काळात रक्षकसंस्था उदयाला आली असे ठामपणे म्हनता येते. तसे पुरावेही "पोलिस अडमिनिस्ट्रेशन इन अन्शंट इंडिया" या ग्रंथात दिलेले आहेत.
यावरुन रक्षक संस्था ही तेवढीच म्हनजे किमान साडेसहा हजार वर्ष पुरातन आहे असे म्हनता येते.

कोटाबाहेर वसती का?
महार समाजाला गांवकुसाबाहेरचे वास्तव्य होते/आहे हे एक वास्तव आहे. ही वस्ती शक्यतो पुर्वेलाच असे हेही एक वास्तव आहे आणि बव्हंशी गांवकुसांची द्वारेही (वेस) पुर्वाभिमुखच असत हेही एक वास्तव आहे.
रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, उशीरा लागेल म्हणुन कधीतरी रक्षकांनी गाव/नगराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण म्हणजे तत्कालीन अर्थव्यवस्था ही मुख्यत: क्रुषिप्रधान होती व शत्रु नगर/गावांवर आक्रमण करतांना प्रथम शेते जाळतच येत असे. त्यांना तात्काळ प्रतिकार केला जावा व हल्ला व हानी टाळण्यासाठी ही व्यवस्था निर्माण केली गेली असावी. कारण शेते जाळत आत घुसण्याची शत्रु वा दरोडेखोरांची प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती हे तर सर्वविदित आहेच. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत असल्याने वेशीबाहेर या बहाद्दर असणा-या रक्षकांची वसती केली गेली असावी असे मला वाटते. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख "महारक्षक" पद भुषवत असणे स्वाभाविक आहे, परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तीत झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली व संक्षेपाने तीच जात महार म्हणुन ओळखली जावु लागली असे दिसते. (मराठा जातीचाही कसलाही उल्लेख श्रुती-स्म्रुती-पुराणांत मिळत नाही त्याचे हेच कारण आहे.)
महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवुन ठेवले असेल याचे हेच कारण आहे कि परंपरागतच मुख्यत: संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवैय्येपणा, चिकाटी हे मुलभुत गुण त्यांच्यात होते आणि वेळोवेळी द्न्यात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करुन त्यांनी हजारो वर्ष जे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खालील मुद्दे पाहिल्याखेरीज लक्षात येणार नाही.
१. तत्कालीन स्थितील प्रत्त्येक गावाभोवती तटबंदी/कोट असत व रात्री मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण म्हणजे सत्ता कोनाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय सातत्याने आक्रमने/पर-आक्रमने यात तर वाटेत येतील त्या गावांत लुटालुट- जाळपोळ हा आक्रमकांचा (आणि दरोडेखोरांचाही) प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहुन गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र जीवाचा धोका पत्करुन उघड्यावर स्वत: व स्वत:चे कुटुंबे असुरक्षित ठेवत गावांचे रक्षण करत राहीली आहेत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते...अशा वेळीस प्राणांचे बलिदान त्यांना द्यावे लागलेले आहे.
२. महार समाज प्राय: गरीबच राहीला आहे. उघड्यावर रहात असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालुन करत तेच गाव त्यांना स्वत: लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते, पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत द्न्यात इतिहासातही दिसत नाही.
३. जमीनीचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत एवढ्या त्यांच्या साक्षीचे महत्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाड्यांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण नाही.
४. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा मद्धेच गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही.
५. महार समाजावर अस्प्रुष्यता लादली गेली, अन्याय बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असुनही आपल्या गावाविरुद्ध/व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलले नाही.
या काही मुद्द्यांवरुन अखिल समाजाने महार समाजाबाबत किती क्रुतद्न्य असले पाहिजे हे लक्षात येइल.
त्याच वेळीस महारांचा इतिहास पुरातन व गौरवशाली असुन धर्ममार्तंडांनी (आणि अन्य समाजांनीही) त्यांना कितीही हीण सामाजिक दर्जावर नेवुन ठेवले असले, अत्यंत घ्रुणास्पद वागणुक दिली असली तरी त्यांचे देशाच्या इतिहासातील हे कार्य विसरणे हा क्रुतघ्नपणाच आहे याबाबत शंका बाळगु नये, बाळगलीच तर फक्त शरम. ज्यांच्या जीवावर निर्घोर झोपा काढल्या त्यांनाच अशी वागणुक देणे हे अमानवी तर होतेच पण त्याहीपेक्षा सारेच धर्माचे गौरवगान गात धर्मावरच कसे अविरत बलात्कार करत राहिले यातच या धर्मावनतीची बीजे होती...आणि म्हणुनच हा धर्म त्यागावा लागला हेही लक्षात ठेवले पाहिजे.


1 comment:

  1. pls read Dr. Babasaheb Ambedkar's Who are SHUDRAS for details about Mahar.. they explain about this topic

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...