Saturday, December 24, 2011

आपली खरी सांस्क्रुतीक ओळख काय?

रक्त नेहमी रक्ताची मागणी करते. द्वेषातून फक्त द्वेषच निर्माण होतो. एक झुंड निर्माण झाली कि तिला प्रत्युत्तर द्यायला तशीच झुंड उत्पन्न होते. अशात विवेकी आणि सामान्य लोकांचा आवाज हरवला जातो आणि या वा त्या झूंडशाहीचे साम्राज्य कायम रहाते. या द्वेषमुलक झूंडींच्या विरोधात आपला संयम आणि विवेक कायम ठेवत उभे राहुयात!

या वा त्या समाजाविरुद्ध तेच एकमेव शत्रू आहेत असा आव आणत द्वेषाच्या आधारावर झुंडी उभ्या राहतात. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिंसेचे/द्वेषाचे आगडोंब पेटवत सामान्य माणसाला दिग्भ्रमित केले जाते. विवेकी लोकांना दडपून टाकण्याचे प्रयत्न होतात. झुंडशाहीला झूंडशाही हे उत्तर नसते. पण परस्परविरोधी झूंडी आपसूक निर्माण होतात हे तर वास्तव आहे. विवेकी आवाज बुलंद करणे तर आपल्या हाती आहे? विवेकाची झूंड नसते तर ती पेटलेले वणवे विझवणारी स्न्हेहमय शक्ती असते...
येथे मला काही महत्वाचे मुद्दे मांडयचे आहेत.
१. महाराष्ट्रात बुद्धिझम १००% नसला तरी इ.स. पुर्व २०० ते जवळपास १३व्या शतकापर्यंत प्रभावशाली होता. एवढा कि संतही विठ्ठ्लाला बुद्ध स्वरूपात पहात होते. (श्रीविट्ठल: एक महासमन्वय-रा. चिं. ढेरे आणि विट्ठलाचा नवा शोध- संजय सोनवणी)
२. बौद्ध धर्मामुळे भारताची सैनिकी शक्ती कधीच कमी झाली नव्हती. अशोकाने वा त्याच्या वंशजांनी वा कोणत्याही बुद्ध राजाने सैन्यदले बरखास्त केलेली नव्हती. बुद्धाची अहिंसा मुळात कोणालाच समजलेली नाही. अशोकाचा नातू ब्रुहद्रथाची हत्या पुष्य़मित्र श्रुंगाने केली. हा ब्रुहद्रथाचा सेनापती होता हे वास्तव का लपवले जाते?


बौद्ध धर्मीयच नव्हेत तर जैन आणि सारे आजचेही शैव हे मुळात असूर संस्क्रुतीचेच होते. वैदिकांनी त्यांना कालौघात बदनाम केले असले तरी मुळ स्वरुप आजही शाबुत आहे. दसरा-दिवाळी ते नागपंचमी हे सारे उत्सव मुळचे शैव(असुर) संस्क्रुतीचे आहेत. वैदिक विष्णु आणि असुर विष्णु या नामसाधर्म्याचा फार मोठा गैरवापर झाला आहे. वैदिक विष्णु हा अत्यंत दुय्यम, इंद्रापेक्षाही छोटा देवता आहे. तो सागरशयनी नाही आणि लक्ष्मी त्याची पत्नीही नाही. आज महित असलेला विष्णु वेगळाच आहे. पण ही वैदिकांची चाल होती.

ही चाल येथेच थांबली नाही. बुद्धालाही त्यांनी चक्क विष्णुचा अवतार ठरवून टाकले. अलीकडेपर्यंत विष्णुचा दहावा अवतार म्हणुन खाली बुद्ध लिहीत आणि वर विट्ठलाचे चित्र असे. यामागचे कारण एकच आहे ते म्हनजे तत्कालीन महाराष्ट्रीय बौद्धधर्मियांत मानसिक गोंधळ उडवून देत त्यांना वैदिक शक्य नाही तर पौराणिक चाकोरीत आणुन बसवणे. आजही श्रुती-स्म्रुती हा धर्म फक्त वैदिकांचा असतो तर पुराणोक्त बहुजनांचा.

श्रुती-स्म्रुतींचे शिक्षण आज घेतले काय आणि नाही घेतले काय काय फरक पदतो? वेदाचार्य घैसास गुरुजींच्या शाळेत ब्राह्मणाव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश मिळत नाही हे माहित आहे काय?. बुद्ध पुर्वाश्रमीचा वैदिक नव्हे तर शैव होता हेही आपणास माहित असणे अगत्याचे आहे. प्रस्थापित धर्माविरुद्धची प्रतिक्रांती म्हणुन शैव धर्मातील मुर्तीपुजा त्याने नाकारली आणि पुनर्जन्माचा सिद्धांतही त्याने नाकारला. वैदिक धर्मात कधीच मुर्तीपुजाही नव्हती आणि आत्मा वा पुनर्जन्माचा सिद्धांतही. क्रुपया ऋग्वेद वाचावा ही विनंती.
हा संघर्ष वांशिक नसून सांस्क्रुतीक होता. जोही भेद होता तो कालौघातील धार्मिक परिप्रेक्षातील होता. बाबासाहेब आंबेडकरांनीही हेच मत फार पुर्वी व्यक्त केले होते आणि आता सर्व पुरावे याच मताशी येवून ठेपतात. बुद्ध असो कि महावीर हे महानायक भारतीय संस्क्रुतीला व्यापक परिमाण देणारे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा आदर ठेवणे (चिकित्सा न नाकारता) आपले कर्तव्य आहे.

आणि एक विसरता कामा नये...धर्म पसरतो तो राज्यशक्तिंमुळे. जर पार अफगानिस्तानातील बामियान येथे अवाढव्य बुद्धमुर्ती कोरल्या गेल्या असतील तर राज्यकर्ते बौद्द्ध असले पाहिजेत. म्हणजेच आजचा रानटी वाटणारा अफगानिस्तानही एके काळी बौद्धांनी सत्तेत आणला असेल तर ते नेभळे होते असे कदापि म्हणता येत नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे शैवप्रधान धर्म सोडला तर वैदिक धर्मच मुळात आत्मा आणि पुनर्जन्म मानत नाही, त्याचे काय? पुनर्जन्मादि प्रकरण तुमच्याच वैदिक धर्माच्या विरुद्ध जातेय त्याचे काय करणार? जे लोक श्रुती-स्म्रुतींचे हवाले गेली काही हजार वर्ष देत आहेत त्यांनी त्या श्रुती-स्म्रुती मुळातुन वाचायचे कष्ट घेतले आहेत काय? वेदांना संन्यास मान्य नाही. वेदांना पुनर्जन्म मान्य नाही. वेदांना आत्म्याचे स्वतंत्र आणि चिरकाळचे अस्तित्व मान्य नाही. वेदांना मुर्तीपुजा मान्य नाही. बौद्ध धर्मात मात्र संन्यास (परिव्रज्जा) मान्य आहे जी शैव धर्मात मान्यच होती. शैव धर्म हा मुत्र्तीपुजा प्रधान नव्हे तर प्रतीक-पुजा प्रधान होता. शिवलिंग हे प्रतीक आहे. शिव-पार्वती मुर्ती बनवणे हे शैव धर्मधारेचे मुळातील अंग नव्हते.

बौद्ध धर्माने एकीकडे वैदिक तत्वधारा स्वीकारली. दुसरीकडे बुद्धाच्या निब्बानानंतर शैवांतील प्रतीक पुजाही स्वीकारली.तिसरीकडे सांख्यांचा निरिश्वरवादही स्वीकारला व दु:ख हेच सर्व समस्यांचे मुळ आहे हे मतही काहीसा बदल करुन स्वीकारले. सांख्यांचे दु:ख हे मानवी दु:ख नसुन तीन मुलतत्वांतील असमतोलातुन निर्माण होणारा प्रक्षोभ या अर्थाने होते. बुद्धाने त्याला मानवी दु:खाशी जोडले. थोडक्यात बुद्ध धर्म हा त्या काळी प्रचलित असलेल्या विभिन्न विचारधारांतील काही नाकारत व काही स्वीकारत एक सम्यक विचारधारेला जन्म दिला आणि हे एक अलौकिक कार्य होते. बौद्ध धर्माला नावे ठेवतांना बरीचशी विधाने अभिनिवेशापोटी आणि अद्न्यानापोटी झालेली दिसत आहेत. यद्न्यातील पशु हिंसा सोडली तर वैदिक आणि बौद्ध धर्मात फारसा फरक नाही. आत्मा, पुनर्जन्म, मुर्तीपुजेस विरोध ई. बाबी समान आहेत. शैव धर्मातील प्रतीक पुजा बुद्ध धर्माने स्वीकारली, एवढेच नव्हे तर तंत्रशास्त्रेही उत्तरकाळात स्वीकारली.

अहिंसेबाबत सावरकर फार अन्याय्य टीका करतात. सन्यस्त खड्ग हे नाटक हे त्या अन्याय्य भुमिकेचे एक उदाहरण आहे. पण प्रत्यक्षात कोणत्याही बौद्ध राजाने सैन्यदले बरखास्त केलेली नाहीत. कनिष्काने, जो बौद्ध धर्मीय होता, ज्याच्या कारकीर्दीत एक धम्म्संगती भरली, त्याने चीनचा पराभव करून त्याच्या राजपुत्राला ओलीस म्हणुन काश्मीर येथे आणुन ठेवले होते हे कोणाला माहितच नसते. अशोकाचा नातू ब्रुहद्रथ हा सैन्याचे निरिक्षण करत असतांनाच त्याच्याच सेनापती पुष्यमित्र श्रुंगाने त्याची हत्या करून सत्ता बळकावली...म्हणजे ब्रुहद्रथाकडेही सैन्य होतेच...बरखस्त केले नव्हते आणि लढायचेच नसेल तर सैन्य कोठुन आले असते? आणि या बौद्ध राजांच्या कारकिर्दीत भारतावर एकही आक्रमण झाले नाही, जी झाली ती सीमा प्रांतांत आणि ती तेथेच थोपवली गेली...हे काही सन्यस्त खड्गाचे उदाहरण होत नाही. किंबहुना बुद्धाने जी अहिंसा सांगितली ती सबलाची अहिंसा सांगितली. भेकडाची नव्हे.

सातवाहनांनी बौद्ध धर्माला आश्रय दिला नाही असे काही विद्वान म्हनतात, आणि ते ब्राह्मणी धर्माचे श्रेष्ठ अनुयायी होते असे म्हनतात हेही चूक आहे. महाराष्ट्रातील बव्हंशी लेणी सातवाहन काळातच खोदली गेलीत. असंख्य विहार व स्तूप बांधले गेले. देण्ग्या दिल्या...गावे इनाम दिली. सातवाहन स्वत: बौद्ध धर्मीय नव्हते, पण त्यांनी जो समभाव दाखवला तो लक्षणीय आहे. एवढेच नव्हे तर बौद्ध धर्माचा प्रभाव असुनही त्यांनी तीन्ही सागरसीमा आपल्या अंकित ठेवल्या...एवढेच नव्हे तर श्रीलंकेवर स्वारी करुन त्यांनाही जिंकले आणि तेथील राजाच्या कन्येशी विवाहही केला.

म्हणजे भारतावर पारतंत्र्य आले ते बुद्ध धर्मीयांच्या अहिंसेमुळे हा दावा निकालात निघतो. खरे तर भारतावर परकीयांचे खरे राज्य सुरु झाले ते तेराव्या शतकापासुन. बुद्ध धर्म तर जवळपास आठव्या शतकापासुनच भारतातुन अस्तंगत व्हायला सुरुवात झाली होती. संपुर्ण देशावर सत्ता परकीयांनी निर्माण केली तेंव्हा जर बौद्ध धर्माचे अस्तित्वच जर नाममात्र झाले होते तर त्याबाबतचा दोष बुद्ध धर्माकडे कसा जातो?

बुद्धाने नाकारली ती प्राणीहिंसा...व्यर्थ यद्न्यीय हिंसा...अकारण केली जाणारे प्राणीहिंसा. पण बुद्धाची याबाबतची अनेक मते पटण्यासारखी नाहीत. कारण भिक्षेत कोणी मांसाहारी खाद्य वाढले तर ते स्वीकारावे हे बुद्धमत. म्हणजे आपण जी हिंसा केलेली नाही, अन्य कोणी तरी केली आहे, त्यापासुन खाद्य पदार्थ बनवला आहे तो स्वीकारायला हरकत नसने हे मत हे नैतीक गोंधळ आहे हे खरेच आहे. मी याला सम्यक भुमिका मानत नाही. " हिंसा मी करणार नाही, पण अन्य कोणीतरी करुन त्यापासुनचे पदार्थ वाढले तर ते मी नाकारणार नाही..." हे हिंसेचे अप्रत्यक्ष समर्थनच आहे.

गौतम बुद्धांचा अनेक विषयांवरील युक्तीवाद हा शाब्दिक खेळ आहे असे अनेक ठिकानी स्पष्ट दिसते. ज्या बाबींबाबत त्यांचे स्वत:चे काहीच मत नाही वा ते स्वीकारणे वा नाकारणे यातील युक्तीवाद टाळायचा आहे तेथे ते प्रश्नकर्त्यालाच प्रतिप्रश्न करत उत्तरे टाळतात. उदा. विश्वाचा निर्माता आहे कि नाही, आत्म्याचे अस्तित्व आहे कि नाही, दु:खाचा अंत स्वाभाविक आहे कि नाही, मेल्यानंतर माणसाचे काय होते?...अशा अनेक प्रश्नांवर बुद्ध मौन राहतात. त्यांच्या मते हे प्रश्नच मुळात गौण आणि अशिष्ट असुन त्यावरची तात्विक उत्तरे न देता केवळ युक्तीवादावर समोरच्याला निरुत्तर करण्यावर त्यांचा भर होता हे त्यांचे आज जे अवशिष्ट साहित्य आहे त्यावरुन दिसते.

अहिंसा हे काही जैन वा बौद्ध धर्माचे स्वयंशोधीत मुलतत्व नव्हे. जैनांनी या तत्वाचा अतिरेक केला तर बुद्धाने त्याला सम्यक स्वरुप दिले एवढेच. परंतु अहिंसा हे तत्व फार आधीच अस्तित्य्वात होतेच. हे तत्व मुळात आणले ते श्रमण संस्क्रुतीने. महावीर जसा स्वत:ला चोविसावा तीर्थंकर समजुन घेतो तशीच बुद्ध परंपरा बुद्धाआधीही अनेक बोधीसत्व होवुन गेले अशी भुमिका घेते. म्हणजे अवतार परंपरा बुद्ध धर्मानेही सोडली नाही, तात्विक संदर्भ काहीही असोत.

येथेच आपल्याला पौरात्य धर्म आणि पास्चिमात्य धर्मांतील मुलभुत मानसिक विभेद समजावुन घेता येईल. ज्यु, ख्रिस्ती आणि इस्लाम हे धर्म मुलत: व्यक्तीवादी आणि अतिरेकी धर्म-आचारसंहितांना घट्ट कवटाळुन बसलेले दिसतात. वैदिक धर्माबाबत मी कितीही विरोधी असलो तरी हा धर्म त्या-त्या परिप्रेक्षात का होईना लोकशाही माननारा धर्म होता...अन्यथा त्या धर्माची रचना एक नव्हे तर किमान ३५० ऋषी करु शकतच नव्हते. शैवागमे ही किमान २००० पेक्षा अधिक पंडितांनी, तंत्रशास्त्रातील अधिका-यांनी रचली आहेत. बुद्ध धर्मातील आज उपलब्ध असलेले तत्वद्न्यान हे तर शेकडो बुद्ध धर्मीय पंडितांनी किमान ५ धर्म संगती भरवुन वारंवार रचलेले आहे.

वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था ही महत्पापे सोडली तर तथाकथित हिंदु धर्मातही कोणाला पुजावे आणि कोणाला नाही, देव माना कि न माना...हे स्वातंत्र्य आहेच. आणि त्यांने जी पारतंत्र्ये लादली तीही ठोकरुन आपण लावतच आहोत.

धर्म जर कळीचा मुद्दा असेल तर भारतातील विध्यमान आणि विस्म्रुत धर्मांचा लेखाजोखा घेत आपल्याला आपली खरी सांस्क्रुतीक ओळख करुन घ्यायला लागेल.

3 comments:

 1. दोन मुद्दे आहेत.
  १] पुष्यमित्र शुंग हा जर सेनापती होता तर सैन्याच्या उपस्थितीत तो राजाची हत्या करतो आणि स्वत: राजा बनतो. सैन्याचा पाठिंबा नसताना हे कसे काय शक्य आहे? जनता आणि सैन्य हे दोन्ही जर बौद्ध धर्माला अनुकूल असतील तर ब्राह्मणी विचार असलेल्या पुष्यमित्राला त्यांनी राजा म्हणून कसे स्वीकारले?
  २] सोमनाथचे मंदिर वाचवताना हजारो हिंदू मृत्युमुखी पडल्याचे मुस्लिम इतिहासकारांनी नोंदवून ठेवले आहे. त्यानंतरही हजार वर्षांच्या मुस्लिम राजवटीत सर्वसामान्य समाज इस्लामला अनुकूल नव्हता म्हणूनच आज हिंदूंची बहुसंख्या आहे. जेव्हा वैदिक धर्मीय बौद्ध धर्मावर आठव्या शतकापासून आक्रमण करत होते तेव्हा बौद्ध मठाला वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनता पुढे आल्याचे चित्र दिसत नाही. हजार वर्षांच्या काळात सोमनाथचे मंदिर मुस्लिम आक्रमकांकडून सहा वेळा पाडले गेले आणि हिंदूंकडून परत सहा वेळा बांधले गेले. पण वैदिकांनी जे बौद्ध मठ ताब्यात घेतले त्यावर हक्क सांगण्यासाठी कोठेच उठाव झालेले दिसत नाहीत. मुळात हा समाज बौद्ध धर्माविषयी उदासीन होता का आणि ते देखील बौद्ध धर्माच्या पतनाचे कारण असू शकेल काय?

  ReplyDelete
 2. कोणताही धर्म आहे त्या स्वरूपात पृथ्वीवर अवतरला हे आपले गृहीत स्वीकारता येत नाही. सर्व धर्म हे धर्मविषयक आकलनाच्या मार्गावरील टप्पे आहेत असे मला वाटते. असुरसंस्कृतीत आगम-निगम या दोघानाही प्रमाण मानले आहे. आगम म्हणजे वेद व निगम म्हणजे परंपरागत शास्त्रे. वेदातील मंत्रसंहिता व ब्राह्मण हे भाग असुरसंस्कृतीनेच विकसित केले असावेत असे मानण्यास जागा आहे.

  ReplyDelete
 3. <<<<<<>>>>>

  गौतम बुद्धांवर टीका करण्याला काही हरकत नाही स्वतः गौतमांना सुद्धा नसावी... पण एक गोष्ट लक्षात घ्यावी कि बुद्ध हे एका विशिष्ट platform वरून बोलतात आणि त्याचे कंगोरे खूप क्लिष्ट आहेत ... नेमके बुद्ध जेव्हा बोलतात तेव्हाची सर्व परिस्थितीचे आकलन अशक्य आहे... बाकी आपले विचार वाचनीय असतात यात वाद नाही...

  ReplyDelete