Saturday, June 2, 2012

मी आनंदी आहे. सर्वांप्रती कृतद्न्य आहे.



काल १ जुन २०१२ रोजी प्रा. हरी नरके यांना महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानतर्फे "महाराजा यशवंतराव होळकर" सन्मान अत्यंत भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. या सोहोळ्याचा हा वृत्तांत...वक्त्यांच्या क्रमाने:

संजय सोनवणी: (प्रास्तविक) महाराजा यशवंतराव होळकर व हरीभाऊंच्या जीवनात अनेक साम्ये आहेत. काळाचे संदर्भ बदलले असले तरी मुलभुत गोष्टी बदलत नाहीत. इंग्रज हे देशाचे शत्रु आहेत हे सर्वप्रथम ओळखणारे यशवंतराव होते. एके काळी ब्राह्मण व सावकार समाजाचे शोषण करत असत, पण आता संदर्भ बदलले असुन सत्ताधारी जमाती याच बहुजनांचे शोषण करत आहेत, अन्याय करत आहेत हे सर्वप्रथम प्रा. नरके यांनी ओळखले व बहुजनीय चळवळीची दिशा बदलली. ब्राह्मणही आज शोषित होवू लागले आहेत. यशवंतरावांना त्यांच्या मृत्युपुर्वी व नंतरही इतिहासातुन पुसण्याचे प्रयत्न झाले...तसेच प्रा. नरकेंना सार्वजनिक जीवनातुन संपवण्याचे प्रयत्न झाले. यशवंतरावांनी स्वहितापेक्षा राष्ट्रहित महत्वाचे मानत सर्वच जाती-जमाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेत स्वातंत्र्याचा पहिला लढा उभारला. हरीभाऊही सर्वच जातीजमातीच्या लोकांना जातनिरपेक्ष होत बहुजनांच्या सामाजिक स्वातंत्र्याचा लढा लढत आहेत. यशवंतराव शेवटपर्यंत एकाकी लढले, परंतु आम्ही हरीभाऊंना एकाकी पडु देनार नाही.

सु. दा. तुपे: बहुजन शिक्षीत झाला तरी अजुन आवश्यक बदल नाही. शिक्षण आपण कशासाठी घ्यायला हवे तेच समजत नाही. प्रत्येक गांवात पतपेढी आहे...पण केवळ १५% बहुजनांना कर्ज मिळते, बाकी मराठे उचलतात व कर्ज फेडतही नाहीत...कर्जमाफ्यांचा फायदा तेच लाटतात. इमानदारीने कर्जफेड करनारे बहुजन मात्र छळले जातात. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. बहुजनांनी आता मोठी स्वप्ने पहायला सुरुवात केली पाहिजे तरच त्यांचे भवितव्य उज्ज्वल असणार आहे.

राजाराम पाटील: कोकणातील खेड्यापाड्यांत, अक्षरश: ५-२५ श्रोते असले तरी तेवढ्याच तळमळीने-कळकळीने आमच्या, मोठेपणाचा कसलाही बडेजाव न मिरवता, आगरी-कोळी समाजाचेही प्रबोधन करणारे प्रा. हरी नरकेंसारखा नि:स्पृह विचारवंत देशात झालेला नाही. महाराजा यशवंतराव होळकरांसारख्या रणझुंजार स्वातंत्र्यप्रेमी महापुरुषाच्या नांवे पुरस्कार मिळणे ही आम्हा सर्वच बहुजनांसाठी अभिमानाची बाब आहे. प्रा. नरके यांचे अस्तित्व व विचार हाच आता बहुजनीय चळवळीचा मुलाधार आहे. आज आमचे प्रश्न भिषण आहेत. त्याकडे लक्ष द्यावे असे वाटनारे महान विचारवंत पण अत्यंत साधेपणाने आमच्याशी संवाद साधनारे हरी नरके खरेच अस्तित्वात आहेत यावर कधी कधी विश्वास बसत नाही. प्रचंड धावपळ, या जिल्ह्यातुन त्या जिल्ह्यात जात, वेळ पालण्याचा कसोशीने प्रयत्न करत आमचेही प्रबोधन करत नवी पहाट दाखवण्याचे कार्य ते करत आहेत याबद्दल कृतद्न्यता वाटते.

शुद्धोदन आहेर: प्रा. नरके यांच्या गौरव समारंभास आज सर्वच जाती-जमातींचे लोक एकत्रीत झाले आहेत ही ऐतिहासिक घटना असुन एक दिवस सर्वच जाती-पातींपार जात हा देश घडवतील, हा विश्वास या समारंभामुळे वाटतो. जाती व वंशाभिमानामुळेच शाक्य कुलाचा विनाश झाला हा इतिहास सर्वांनीच लक्षात ठेवायला हवा. गतकालात कोणी काय केले, काय पातके केली, आम्हाला कसे गांवकुसाबाहेर काढले त्याची खंत असली तरी आता तीच आमची प्रेरणा असुन हा देश घडवणे हेच उद्दिष्ट आमच्यासमोर आहे. प्रा. नरकेंसारखे प्रगल्भ विद्वान आणि तळमळीचे कृतीशील विचारवंत आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे.

महादेव जानकर: राष्ट्रीय समाज पक्षाने आजवर जाती-पाती निरपेक्ष समाज घडवण्यासाठी जीवापाड कष्ट घेतले आहेत. प्रत्येक समाजात चांगली व वाईट माणसे असतात. पहिल्या बाजीरावाने मल्हाररावांना संधी दिली. अहल्यादेवींचा विवाह खंडेरावांशी करुन देण्यात हौसेने पुढाकार घेतला. दुसरा बाजीराव मात्र नालायक निघाला. असे समाजात घडत असते. त्यासाठी एखाद्या समाजालाच संपुर्णपणे टार्गेट करणे आम्हाला मान्य नाही. खरा समाजशत्रु वेगळाच आहे. जातीनिहाय जनगनणेला विरोध करणारे ब्राह्मण नव्हते. सबसिड्या लाटनारे ब्राह्मण नाहीत. खेडोपाडी दलितांवर अन्याय करणारे कोण आहेत? पुरोगामी ब्राह्मण व ओबीसी एकत्र येणे आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी आमचा पक्ष सतत प्रयत्न करत राहील.

प्रा. हरी नरके:   बहुजनांचा द्न्यानाचा अनुशेष मोठा आहे. ब्राह्मणांत जसे जीवनभर एखद्या विषयाला वाहुन घेतलेले दिग्गज होते तसे दुर्दैवाने बहुजनांत नाहीत. त्या विद्वानांशी मतभेद असले तरी त्यांच्या द्न्याननिष्ठेबाबत शंका घेता येत नाही. आज बहुजनांत मात्र ९९.५०% द्न्यान-अनुशेष आहे व तो भरुन काढण्याची जबाबदारी आमच्यावरच आहे. दुस-यांना शिव्या देत, जाळ-पोळ-कत्तलीच्या भाषा वापरत हा अनुशेष कधीही भरला जाणार नाही. विचारकलह हा असायलाच हवा पण त्याची सुटका विचारांनीच होवू शकते. प्रक्षोभकपणा, हिंसकपणा करणारे जेंव्हा फुले-आंबेडकरांचेच नांव घेतात तेंव्हा चिंता वाटते. द्न्याननिर्मितीच्या मार्गात आडवे येतात ते द्न्यानविरोधक असुन तेच खरे समाजशत्रु आहेत.

शोषणाचे मुख्य बिंदु हे लिंगभेद व वर्गभेद असतात. भारतात दुर्दैवाने जातीभेद हेही शोषणाचे कारण बनले आहे. जातीयता संपवता आली नाही तरी आपण ती कमी तरी नक्कीच करु शकतो. त्यात अडथळे आणत एकाच वर्गाला संपवण्याची भाषा करणारे या मार्गातील अडथळे बनले आहेत. एका खिशात सोयरिकीसाठी शहाण्णव कुळ्याचे सर्टिफिकेट तर आरक्षनासाठी दुस-या खिशात कुणब्याचे सर्टिफिकेट बाळगण्याची फ्यशन सध्या आली आहे. एके काळी हेच लोक आपण क्षत्रीय आहोत अशा जाती-उन्नयनाची भाषा करनारे आता मागासपणाचे डोहाळे लागल्याची भाषा करत आरक्षणाच्या रांगेत उभे आहेत. शेकडो वर्षे सत्ता गाजवुनही हे स्वत:ला मागास समजत असतील तर मग जे खरे मागास आहेत त्यांनी काय करायचे?

मल्हारराव एक महान मुत्सद्दी होते. कोणता निर्णय कधी कसा घ्यायचा व त्यासाठी अनुकुल स्थिती कशी निर्माण करायची याचा वस्तुपाठ त्यांनी घालुन दिला. रणांगणे गाजवली म्हणुन उत्तर भारत जिंकता आला. अहल्यादेवींनी फक्त धर्म नव्हे तर प्रजाकारण सांभाळले. आपण इश्वराला उत्तरदायी आहोत म्हणुन प्रजेची कार्ये दक्षपणे केलीच पाहिजेत असा नुसता आग्रह धरला नाही तर दोषींना कठोर शिक्षा द्यायलाही मागेपुढे पाहिले नाही. हा वारसा आम्हा बहुजनांना आदर्शभुत आहे. यशवंतरावांनी अवघा देश स्वतंत्र करण्यासाठी एकाकी झुंज दिली. व्यक्तिगत स्वार्थापार राष्ट्रीय स्वार्थ असतात व ते साधणे यातच आपल्या सर्वांचेच इतिकर्तव्य आहे. यशवंतरावांच्या नांवाने मिळालेला हा पुरस्कार माझी जबाबदारी वाढवत आहे.

माय मराठी ही नुसती पुरातन नव्हे तर अभिजाततेच्या व्याख्येत बसणारी भाषा आहे हे मी सिद्ध केले. तोवर मराठीतील दिग्गजही या भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळु शकत नाही असा कंठरव करत होते. स्वत:ला कमी लेखण्याची ही मराठी प्रवृत्ती आता आपण सोडुन द्यायला हवी. आपासातील कलह, एकमेकांनाच हीण लेखणे या प्रवृत्तींमुळे मराठी माणसाचे नुकसानच होत आहे. कुवलयमाला या प्राचीन ग्रंथातही मराठी माणसाचे कलहशील असेच वर्णन केले आहे...आता ते बदलायला हवे. आपण स्वत:ला पुन्हा तपासुन पाहिले पाहिजे.

काही लोक माझ्यावर ब्राह्मणांना विकला गेला, दत्तक झाला असा आरोप करतात. मी भांडारकर संस्थेवर निवडुन आल्याबद्दल चीड व्यक्त करतात. पण आज मराठी अभिजात आहे हे सिद्ध करणारे दस्तावेज भांडारकरमद्धेच आहेत हे कोण सांगणार? मला विकले जायचे असते तर मी कधीच २५-३० वर्षांपुर्वी विकलो गेलो असतो. विशिष्ट लोकांच्या शिव्यागाळी, खुनाच्या धमक्या या भयाच्या सावटाखाली जगत राहिलो नसतो. मीही माणुस आहे. मृत्युचे भय आहेच. पण मग मी विचार करतो कि असा मृत्यु अधिक श्रेय:स्कर आहे. किमान जेही काही जगलो त्याचे ते एक प्रकारे सार्थकच असेल. उपटसुंभी आरोप करना-यांना हे माहित नाही कि आम्ही ना या छावनीत आहोत ना तुमच्या. आमची सर्वांचे हित साधु पाहणारी तीसरी छावणी आहे...ती अत्यल्प असेल...छोटी असेल...पण त्यात असण्यात आत्मगौरव आहे. तो कोणीही कधीही हिरावून घेवू शकणार नाही.

प्राचार्य सुधाकर जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात चौफेर फटकेबाजी करत विद्वेषरहित बहुजनीय क्रांतीची आवश्यकता प्रतिपादन केली.

नोट: मी श्री. प्रकाश खाडेसाहेब, प्राचार्य सोमनाथ नजन सर, श्री. लंबाथे, लासुरे साहेब यांचा नितांत आभारी आहे. त्यांनी हा ऐतिहासिक सोहोळा घडवुन आणला...हा निव्वळ सत्कार-सन्मान सोहोळा नसुन व्यापक विचारमंथनाचा सोहोळा होता. मी कृतद्न्य आहे. त्याचबरोबर मी रोहित पांढरे, सचीन शेंडगे, प्रा. लक्ष्मण हाके, सुदर्शन अक्कीसागर आणि अन्य अनेक माझे मित्र, या कार्यक्रमाचे संयोजक आणि अत्यंत प्रगल्भपणे हा कार्यक्रम यशस्वी करणा-या मान्यवरांचे आभार मानतो. हे सारे नव्या सामाजिक क्रांतीचे अग्रदुत आहेत. या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित असलेले श्री. अरुण खोरे, शरद लोणकर, मधुकर रामटेके, महावीर सांगलीकर, चैतन्य भुरे,  कृपाल देशपांडे (माझे प्रिय बंधुतुल्य मित्र), पं. वसंत गाडगीळ, डा. विश्वंभर चौधरी, विजय लेले, डा. श्रीपाल सबनीस, रविकिरण साने या सर्वच मान्यवरांशी मी कृतद्न्य आहे. हरीभाऊंमद्धे अचाट उर्जा आहे. या उर्जेला विस्कळीत करु पाहणा-यांची थोबाडे या निमित्ताने बंद होतील व तेही नव्या व्यापक समाजरचनेच्या कार्यापाठी जात खरा देश घडवतील अशी आशा आहे.

काहीही असो. मी आनंदी आहे. सर्वांप्रती कृतद्न्य आहे. मी त्यांच्या उदंड यशासाठी निर्मिकाकडे प्रार्थना करतो आणि सर्वांना सुयश चिंतितो.


7 comments:

  1. कालच्या यशवंतराव होळकर गौरव प्रतीषण आयोजित कार्यक्रमाने OBC चळवळीला नवी विचारधारा दिली आहे ... ज्या यशवंतराव होळ्कारांवर पुणे जाळले ,लुटले असे घाणेरडे खोटारडे आरोप झाले ते आपण आपल्या पुस्तकातून पुराव्यानिशी खोडून काढले आहेत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार ...यांशवंतराव होळकर याच्या नावें पहिला पुरस्कार देवून श्री हरी नरके सर यांना सन्मानित करून आपण खरचं पुणे व बहुजन चळवळ किती यशस्वी होणार याचे संकेतच दिले आहेत ...
    यशवंतराव होळकर गौरव प्रतीष्टनला व आपल्या कार्यास खूप खूप सुभेचा व असे कर्यक्रम वारंवार व्हावेत हीच अपेक्षा ..

    ReplyDelete
  2. कालचा कायक्रम एक विचार मंथन घडवून आणणारा होता ......प्रो. हरीनारके सर काहीशे भावनिक झाल्या सारखे वाटले ..माझ्या सारख्या नवख्या मुला साठी कालचा कार्यक्रम अतिशय माहिती पूर्वक होता .. त्याच्या यशस्वी आयोजन बाबत धन्यवाद ... जय यशवंत ..

    ReplyDelete
  3. संजय सर, बहुजन चळवळ म्हणजे खर्‍या अर्थाने समता व माणुसकीची जपणूक. वरील सर्व वृत्तांत वाचून खूप हळहळ वाटली. एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची सुवर्णसंधीच मी गमावलेली होती. पण तुमच्या या सविस्तर वृत्तांताने या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य जरी लाभले नसले तरी हे वैचारिक सुवर्णकण माझ्या झोळीत पडले हेच माझे भाग्य समजतो. मनापासून धन्यवाद

    ReplyDelete
  4. अजून एक - महत्त्वाचीच गोष्ट विसरलो. पहिला वहिला 'महाराजा यशवंतराव होळकर' पुरस्कार नरके सरांसारख्या अत्यंत योग्य व्यक्तीला मिळाल्यामुळे या पुरस्काराची शान नक्कीच उंचावलेली आहे. पुढील वर्षी हा पुरस्कार मिळवू इच्छिणारी व्यक्ती तितक्याच तोलामोलाचे कार्य करण्यासाठी या पुरस्कारामुळे नक्कीच प्रेरित होईल. :) पुनश्च धन्यवाद

    ReplyDelete
  5. म्हणजे एकंदर मराठा-कुणबी विरोधी राजकारणाची तयारी चालू आहे तर. हि तयारी खूप दिवस म्हणजे गेले ३० वर्ष चालू आहे.....१९९५ साली शरद पवारांमुळेच त्याला यश लाभले....आणि जोशी सरना मुख्यमंत्री पद मिळाले...त्यावेळी इतर समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला कि हे होवू shakte .......आणि त्यातून हि तयारी चालू आहे.......मराठेतर राजकारणाला पुढील काळात किती यश मिळते हे कालच ठरवेल..........पण हे पण लक्ष्यातठेवावे लागेल १९९५ साली सेनेला जी सत्ता मिळाली त्यात मराठा मतांचे खूप mothe योगदान होते....मराठवाड्यातून...६० पैकी ४२ जागा सेना भाजपच्या निवडून आल्या होत्या...त्या फक्त बाळासाहेबांनी मराठवाडा विद्यापिताच्या नामांतराच्या विरोधात भूमिका घेतली होती म्हणून.....पण आता सामाज्प्रोबोधानामुळे मराठा दलित दरी कमी झालेली आहे. आणि ठाकरे हे मराठा विरोधी राजकारण करत आहेत हि गोष्ट गाव गावामेढ पोचली आहे.......त्यानुळे ते यश आता मिळेल असे वाटत नाही...हे झिळा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीने दाखवून दिले.....श्री हरी नरके, महादेवजी जानकर, सोनाविनिजी हे मायावतींचे उदाहरण घेवून पुढे जात आहेत असे दिसते.....पण महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती खूप वेगळी आहे. पुढच १० वर्ष राजकारण कसे रूप घेते हे बघायला मजा येईल.........कारण राज्य कुणाचेही असो......जनतेला खूप कमी फरक पडतो हे आतापर्यंत सिद्ध झालेले आहे....मराठ्यांच्या सत्तेमुळे मराठा समाज सुधारला नाही तसेच.....होळकरांनी १०० वर्ष राज्य करून धनगरांच किती विकास झाला हि पण संशोधानाचीच बाब आहे......जो पर्यंत धर्म सत्ता आणि प्रशाकीय सत्ता हातात येत नाही तोपर्यंत समाजाचा विकास होत नाही......

    ReplyDelete
    Replies
    1. हा तर फरक होता होळकरांमध्ये आणि इतर मराठा राज्यकर्त्यामध्ये. होळकरांनी त्यांचे राज्य हे केवळ स्वताच्या जाती पुरते मर्यादित न ठेवता त्यांनी समस्त भारतभर विकासकामे केली. कदाचित त्यामुळेच कि काय धनगरांचा म्हणावा तितका विकास झाला नाही...

      Delete
  6. i miss the golden opportunity to attend this glorious event..

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...