Monday, July 30, 2012

जाती परिवर्तनीय होत्या व आहेत....


आपण सारे एकच समान इतिहासाचे भागीदार आहोत. इतिहास म्हणजे "असे घडले" हे जे सांगतो तो इतिहास. भारतात इतिहासाला पाचवा वेद मानण्याची प्रथा आहे. हा वेद लिहायचे/सांगण्याचे कार्य सूत, मागध व बंदी या वर्णव्यवस्थेने शूद्र मानलेल्या जाती करत असत. आज या जाती अस्तित्वात नाहीत याचाच अर्थ या जातींचे कार्य नंतर ब्राह्मण समाजाने हाती घेतले. "वैदिक संस्कृतीचा विकास" या ग्रंथात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या विषयाचा अत्यंत मुलगामी विचार केलेला आहे. सुत-मागधादी लोक पुरातन काळापासुन यज्ञ व उत्सवप्रसंगी आणि राजसभांतही उपस्थितांना इतिहास सांगत असत. या इतिहासाची भाषा आधी प्राकृत असली तरी सहाव्या शतकानंतर ती संस्कृतात अनुवादित होत गेली. हे अनुवाद करत असतांना त्यांत अवास्तव भर काही पोटार्थी ब्राह्मनांनी घातली व मुळ ऐतिहासिक ठेव्याला विकृत केले. अगदी अठराव्या शतकापर्यंत हे भर घालण्याचे काम चालु राहिले. त्यामुळे भारतीय पुराणांत येशू सुद्धा डोकावला. एवढेच नव्हे तर "सन्डे इति रविवारच" असेही घुसवले गेले.

भारतात अनेक नव्या जाती जन्माला आल्या असल्या तरी नष्ट झालेल्या जातीही खुप आहेत. याचा अर्थ त्या जातीयांचा उच्छेद झाला असा नसुन त्यांना पोटार्थी अन्य उद्योग शोधावे लागल्याने त्यांच्या जाती नष्ट झाल्या. तर नवे व्यवसाय/उद्योग वाढल्याने नव्या जाती निर्माण झाल्या.
मी जरी आजकाल विद्यमान जातींचा (म्हणजेच व्यवसायांचा.) इतिहास सागण्याचा प्रयत्न करत असलो तरी नष्ट झालेल्या जातींविषयकही विवेचन तेवढेच महत्वाचे आहे.
याचा अर्थ असा होतो कि जाती अपरिवर्तनीय आहेत, होत्या, हे विधान पुरेपुर खोटे ठरते. आणि त्यासाठी अनेक पुरावे उपलब्ध आहेतच. काही जाती नष्ट होणे, नव्या जाती निर्माण होणे, जातींतुन पोटजाती निर्मण होणे आणि काही पोटजातीही नष्ट होणे. उदा. रथकार ही सुतार समाजातील पोटजात आज अस्तित्वात नाही. आयोगव, धिग्वन आदि स्मृतींनी अस्पृष्य मानलेल्या जातीही आज अस्तित्वात नाहीत. उलट महार, मराठा, कायस्थ, शिंपी, रंगारी ई. जाती दहाव्या शतकापुर्वीपर्यंत अस्तित्वात असल्याचे उल्लेख मिळत नाहीत...
याचाच अर्थ असा होतो कि जातीव्यवस्था अपरिवर्तनीय आहे व होती हा सिद्धांत मुळातच बाद होतो.
मग जर जाती मुळात अपरिवर्तनीय होत्या हा सिद्धांतच पुराव्यअंवर टिकत नसेल तर मग आपण आज जाती अपरिवर्तनीय आहेत असे मानत आपली सामाजिक व्युहरचना का करतो? का आपण जातीअभिमानात गुरफटतो?
आज जी आपली जात आहे ती पुर्वी नव्हती. त्याआधी आपण अजुन कोणत्यातरी अन्य जातीचे असू. पुराणकाळात जे स्थितीस्थापकत्व नव्हते ते मात्र आम्ही आज निर्माण केले आहे. म्हणुनच जातीय संघर्ष पेटलेला आहे. आणि आजची कोणतीही जात अन्य पर्यायच उपलब्ध नसला तरच जातीचे परंपरागत व्यवसाय करते.
याचाच मतितार्थ असा कि जाती परिवर्तनीय होत्या व आहेत.
आणि जाती परिवर्तनीय असतील तर मग त्यांची गरजच काय?
आम्ही हजारो वर्षांपासुन अमुकच जातींचे होतो हा भ्रम कोणत्याही जातीला पाळता येत नाही. जाती मुळात अपरिवर्तनीय नव्हत्या. एका जातीचे (व्यवसायाचे) लोक स्वेच्छेने अन्य जातींत जात होते. कोणतीही जात आभाळातून पडलेली नाही. नष्ट झालेल्या जातींचे लोकही नष्ट झालेले नाहीत तर ते अन्य व्यवसायांत (जातींत) प्रवेशलेले आहेत. हे आतंर-सम्मिश्रण एवढे मोठ्या प्रमानावर झालेले आहे कि मानव आस्तित्वात आला तेंव्हापासूनच एका जातीचे पुर्वज एकाच जातीत होते असे मुळात मानणे अशास्त्रीय आणि अवैज्ञानिक आहे.
येथे सांगायची बाब अशी कि जात्युभिमान निरर्थक आहे कारण तुम्ही आज कोणत्याही जातीचे असा...इतिहासात कायमस्वरुपी तुम्ही याच जातीचे होता असा दुराभिमान वा हीनगंडात्मक विचार मुळात करण्याचे काहीएक कारण नाही.जगात मानवजातीला प्रत्येक व्यवसायाची जगण्यासाठी गरज होती, ती सर्वांनीच आपापल्या परीने भागवलेली आहे, त्यामुळे जातींचा दुराभिमान अथवा न्य़ुनगंड बालगणे मुर्खपणाचे आहे.
जर इतिहासात असंख्य जाती नष्ट झालेल्याच आहेत तर त्या आता नष्ट होणार नाहीत असे समजणे हेही अज्ञानाचे लक्षण आहे.

7 comments:

  1. जाती परिवर्तनीय आहेत हे आपले म्हणणे पूर्ण सत्य आहे. याची जैन समाजाच्या संदर्भातील कांही उदाहरणे आहेत. जसे, नेमा नावाची एक जात खंडेलवाल या जातीत कांही शतकांपूर्वी विलीन झाली व आता नेमा या जातीला खंडेलवाल जातीत कासलीवाल या कुलीने/गोत्राने ओळखले जाते. तसेच जैन समाजातील ओसवाल ही मोठी राजपूत, जाट, बलाई व इतर अनेक जातींची मिळून बनली आहे. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे गुजरात मधून इंग्लंडला गेलेल्या जैन समाजातील ९ वेगवेगळ्या जाती एकमेकात विलीन झाल्या व नवनात वणिक ही नवी जात बनली. मध्य प्रदेश, माळवा येथील बलाई या दलित जातीने जैन धर्म स्वीकारला व ते आता धर्मपाल या नावाने ओळखले जातात. अशाच गोष्टी हिंदू समाजाच्या बाबतीत ही नक्कीच घडल्या असतील, त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे.

    ReplyDelete
  2. येशू ख्रिस्ताचा उल्लेख कुठल्या भारतीय पुराणात आहे ???

    ReplyDelete
  3. yeshu cha ullekh tibeti dharm granthat pan ahe sangtat.....sanjay ji aapan yeshu ani puran yavar kahi saangal....???

    ReplyDelete
  4. There are 18 castes amongst Shrilankan Sinhalese. These castes are occupation based. Following is the list of those castes along with their traditional occupations

    Ahinkuntaya - Gypsies , Badahäla (Kumbal) - Potters , Bathgama - Traditionally cultivators. Called Palanquin bearers during the British period , Berava - Tom-tom beaters , Govigama - Traditional cultivators and herdsmen , Haali- Weavers, Hannali - Tailors , Hunu - Lime burners , Kinnaraya - Outcastes , Navandanna - Artisans many sub categories, Pamunu - Tenant farmers , Panna - Grass cutters , Pannikki - Barbers , Patti- Herdsmen , Porowakara - Wood cutters , Radala - Nobility of the Kandyan Kingdom , Rajaka - Dhobies, Washermen , Rodiya - Outcastes , Wahumpura - Jaggery makers .

    Out of those 18 castes 2 castes namely Rodiya and Kinnaraya were outcastes. It is important to note that Sinhalise people are Budhist for last 2200 years.

    If Hinduism is only responsible for creating caste system and Budhism is a kind of revolt against Hinduism, then how one can explain this reality?

    ReplyDelete
  5. प्रणाम साहेब,

    उत्सुकता वाढवणारा आपला लेख. जाती परिवर्तनीय होत्या, आहेत, तर त्यासंबंधी अजून वाचायला आवडेल. जर जाती परिवर्तनीय होत्या मग जाती असून काय उपयोग होता असा प्रश्न निर्माण होतो. स्व:ताच्या समाजाभोवती एक तटबंदी म्हणून जाती , जातीभेद निर्माण झाले. या जाती अंतर्गात् विवाह, विधवा सक्ती, सती या साधनांनी टिकवून ठेवली गेली. या संदर्भात जाती परिवर्तनीय होत्या हे विधान धाडसाचे धरेल.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...