Sunday, July 29, 2012

आर्यभट ते ज्ञानेश्वर आणि पृथ्वी परिवलन सिद्धांत
(हा लेख मी व डा. आनंद दाबक यांनी मिळुन लिहिला आहे.)


सोळाव्या शतकात कोपर्निकसने पृथ्वी स्थिर नसून स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत मांडॆपर्यंत जगभर टोलेमीचा (दुसरे शतक) स्थिर-पृथ्वी सिद्धांत प्रचलित होता. तत्पुर्वी स्यमोसचा अरिस्टार्कस (Aristarchus of samos) याने मात्र इसपु २३० मद्धे सर्वप्रथम सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धांत मांडुन पृथ्वी सुर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडला होता असे दिसते. अर्थात अरिस्टार्कसचा मुळ ग्रंथ आज उपलब्ध नसुन आर्किमीडीजने त्याच्या सिद्धांताचा (Sand Reckner या ग्रंथात) उल्लेख केला असल्याने हा सिद्धांत आपल्याला माहित आहे. परंतु टोलेमी व अन्य खगोलतज्ञ्यांनी हा सिद्धांत दुर्लक्षित केला व पृथ्वीकेंद्रित विश्वाचाच प्राधान्याने विचार केला. अर्थात अरिस्टार्कसने पृथ्वीकेंद्रीत सिद्धांताला एक पर्याय एवढ्याच मर्यादित अर्थाने सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धांत मांडला होता असे दिसते. शिवाय पृथ्वी स्वत:भोवतीही फिरते असे त्याने स्पष्टपणे म्हटल्याचे दिसत नाही.

उदय आणि अस्त आकाशातील ग्रहनक्षत्रांच्या भ्रमणाने होतो, पृथ्वीच्या नव्हे हाच टोलेमीचा (Ptolemy) विचार युरोपात सोळाव्या शतकापर्यंत प्रबळ राहिला. या पार्श्वभुमीवर भारतात काय घडत होते हेही येथे आपण तपासायला हवे. भारतातही प्राचीन काळापासुन स्थिरपृथ्वी सिद्धांतच प्रबळ होता. परंतु सन ४७६ मद्धे जन्माला आलेल्या आर्यभटाने मात्र आपल्या "आर्यभटीय" या ग्रंथातील गोलाध्यायातील ४.९ व ४.१० या श्लोकांतुन पृथ्वी स्वत:भोवती फिरते व त्यामुळेच वस्तुत: स्थिर असलेल्या नक्षत्रांचा उदय-अस्त झाल्याचा आभास होतो हे सर्वप्रथम स्पष्ट केले. मात्र युरोपात टोलेमीमुळे जे घडले तसेच आपल्याकडे ब्रह्मगुप्त, परमादीश्वर आणि वराहमिहिरांमुळे घडले. त्यांनीही स्थिर-पृथ्वी सिद्धांतच उचलुन धरला.

आर्यभटाचा सिद्धांत फेटाळला जाण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे स्थिर-पृथ्वी सिद्धांताचे समर्थक असणा-या या विद्वानांनी ४.१० या श्लोकातील "भ्रमति" या शब्दाचा घेतलेला सोयिस्कर अर्थ. हे कसे घडले हे समजावुन घेण्यासाठी आधी आपण आर्यभटाचे मुळ श्लोक पाहुयात:

४.९.१ अनुलोमगतिर्नौस्थ: पश्यत्यचलं विलोमगं यद्वत्।
४.९.२ अचलानि भानि तदवत्समपश्चिमगानि लङ्कायाम्॥
४.१०.१ उदयास्तमयनिमित्तं नित्यं प्रवहेण वायुना क्षिप्त:।
४.१०.२ लङ्कासमपश्चिमगो भपञ्जर: सग्रहो भ्रमति॥

अर्थ: ज्याप्रमाणे अनुलोमगतीने (पुढे) जाणारा आणि नावेत बसलेला मनुष्य अचल असा किनारा विलोम (मागे) जातांना पाहतो त्याचप्रमाणे लंकेमध्ये (विषुववृत्तावर) अचल असे असलेले तारे पश्चिम दिशेस जातांना दिसतात. (४.९)

उदय-अस्तासाठी ग्रहांसहीत सर्व नक्षत्रे लंकेच्या बरोबर पश्चिमेला प्रहव वायुमुळे वाहुन नेली जातात असा आभास (भ्रम) निर्माण होतो. (४.१०)

वरील श्लोकांच्या आम्ही प्रमाणित केलेल्या अर्थामुळे दोन्ही श्लोकांत एकवाक्यता दिसून येते आणि आर्यभटाला नि:संदिग्धपणे तारे/नक्षत्रे वस्तुता: स्थिर असून पृथ्वीच्या परिवलनामुळे ते पश्चिमेकडे जातांना दिसतात, पण प्रवह वायुमुळे (एक काल्पनिक प्रेरणा) नक्षत्रे ग्रहांसहित उदय व अस्तासाठी पश्चिमेकडे वाहुन नेली जात आहेत असा भास निर्माण होतो असे म्हणायचे आहे हे स्पष्ट आहे.

परंतु ४.९ या श्लोकाचा अर्थ, जो सर्वच विद्वानांनी ( आणि डा. मोहन आपटे, डा. जयंत नारळीकर) वर दिला आहे त्याचप्रमाणे घेतला असला तरी ब्रह्मगुप्त, परमादीश्वर ते डा. मोहन आपटे आदि विद्वानांनी मात्र ४.१० श्लोकातील भ्रमतीचा अर्थ "भास" नव्हे तर "फिरतो" असा घेतला आहे. त्यामुळे श्लोकाचा अर्थ असा होतो: प्रवह वायूकडून सतत ढकलला जाणारा सग्रह (ग्रहांसहित असा) भपंजर (तार्‍यांचे जाळे अथवा पिंजरा) पश्चिमेला उदय-अस्तासाठी फिरतो.

"भ्रमति" शब्दाचा "फिरतो" असा अर्थ घेतला तर मात्र मग आर्यभटाला विसंगतीचा दोष लागतो. म्हणजेच तो आपले ४.९ मधील विधान खोडुन काढतो आहे असा अर्थ होतो. म्हनजेच आर्यभटाने नक्षत्रेच फिरत असून पृथ्वी मात्र स्थिर आहे असेच म्हटले आहे असा आपला लाडका तर्क प्रस्थापित करण्यासाठी "भ्रमति" चा सोयीस्कर अर्थ घेतला आहे असे दिसते. वस्तुता: हा अर्थ चुकीचा आहे कारण एकाच श्लोकात "क्षिप्त:" (ढकलला जातो) आणि "भ्रमति" (फिरतो) असे दोन शब्द वापरण्याचे काहीएक संयुक्तिक कारण दिसत नाही. कारण मग भपंजर बरोबर पश्चिमेला फिरतो असे असेल तर "उदयास्तासाठी" भपंजराला ढकलण्याचे प्रवहवायुला कारणच उरत नाही. त्यमुळे "भ्रमति"चा "फिरतो" हा अर्थ चुकीचा आहे हे आपल्या लक्षात येईल.

अलीकडेच मात्र डा. सुभाष काक (संगणकशास्त्र विभागप्रमुख, ओक्लोहामा विद्यापीठ) यांनी "Birth and Early Development of Indian Astronomy " या आपल्या प्रबंधात आर्यभटाच्या ४.१० श्लोकातील " भ्रमति" या शब्दाचा अर्थ आभास (illussion)  असाच घेतला आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत.

म्हणजेच आर्यभटाने दोन श्लोकांत परस्परविरोधी अशी कसलीही विसंगती केलेली नसुन ४.९ व ४.१० या दोन्ही श्लोकांचा अर्थ एकमेकांशी सुसंगत असाच आहे. याच श्लोकांचा आधार घेवून डा. काक यांची विध्यार्थिनी रुपा एच. नारायण यांनी "Are Aryabhata’s and Galilean Relativity Equivalent? " यांनी आर्यभटाला सापेक्षतावाद माहित होता असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनीही "भ्रमति" या शब्दाचा अर्थ "आभास" असाच घेतला आहे, आणि तो संयुक्तिक असाच आहे. अभिषेक पारेख यांनीही आपल्या A Note on Aryabhata's Principle of Relativity या शोधनिबंधातही आर्यभटाच्या या दोन्ही श्लोकांचा आधार घेत ग्यलिलियन सापेक्षतेचा सिद्धांत आर्यभटाला माहित होता हे सिद्ध करण्यासाठी हेच दोन्ही श्लोक वापरले असून "भ्रमति" चा अर्थ त्यांनीही आभास असाच घेतला आहे.

डा. जयंत नारळीकर यांनी आपल्या "आकाशाशी जडले नाते" या प्रसिद्ध ग्रंथात पृष्ठ क्रमांक दोनवर आर्यभटाच्या श्लोक क्र. ४.९ चा आधार देवून असे विधान केले आहे कि "आर्यभटाचे द्रष्टेपण त्या काळी लोकांना कळले नाही. पृथ्वी स्थिर असुन तारकाच्छदित आकाशच आपल्याभोवती फिरते असाच समज टिकुन राहिला. पुढे दहा शतकानंतर कोपर्निकसने हाच मुद्दा युरोपात मांडला. सूर्य आणि ग्रह पृथ्वीप्रदक्षिणा करतात, इत्यादि विश्वास त्या काळी युरोपात इतके दृढमुल झाले होते कि लोकांना खरी वस्तुस्थिती लक्षात यायला त्यानंतर एक ते दीड शतकाचा कालखंड गेला."

पुढे पृष्टः क्र. ३९वर डा. नारळीकर म्हणतात, "परंतु त्याने (आर्यभटाने) मांडलेली आगळीवेगळी कल्पना कि पृथ्वी स्वता:च्या आसाभोवती फिरते, त्यावेळच्या समाजाला पटली नाही..... स्थिर पृथ्वी सिद्धांत ग्रीस आणि युरोपापलीकडे भारतातही रुजला होता हे आपण जाणतो."

येथे हेही लक्षात घ्यायला हवे कि डा. नारळीकर आर्यभटीयातील ४.१० श्लोकाचा निर्देश करत नाहीत. कदाचित त्यांच्याही मनात परमादीश्वरादींनी घेतलेला "भ्रमति" चा अर्थ "फिरतो" असाच घेतला असावा.

थोडक्यात आर्यभटाचा पृथ्वीच्या स्वांगपरिभ्रमणाचा सिद्धांत त्याच्याच बरोबर अस्तंगत झाला असा एकुणातील मतितार्थ डा.नारळीकरांनी काढला आहे असे दिसते. भारतातील खगोलशास्त्र कोपर्निकसचा उदय (सोळावे शतक) होईपर्यंत स्थिर-पृथ्वी सिद्धांतालाच चिकटुन बसले होते असे आपल्याला पाठ्यपुस्तकांतुनही शिकवण्यात येते आहे. पण ते वास्तव नाही याचा फार मोठा पुरावा आपल्याला तेराव्या शतकातील खुद्द ज्ञानेश्वरच देतात.

ज्ञानेश्वर व त्यांची ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरांना आर्यभटाचा सिद्धांत माहित होता एवढेच नव्हे तर त्यांनी त्या सिद्धांताचा दृष्टांत म्हणुन कसा उपयोग केला  यावर या विद्वानांनी लक्ष पुरवलेले दिसत नाही. त्यासाठी आधी आपण ज्ञानेश्वरांच्या चवथ्या अध्यायातील खालील ओव्या पाहुयात.

"अथवा नावे हन जो रिगे || तो थडियेचे रूख जाता देखे वेगे ||
तेचि साचोकारे जो पाहो लागे || तव रूख म्हण अचळ || (४.९७)

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे || जैसे न चलता सूर्याचे चालणे ||
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे || कर्मेची असता || (४.९९-ज्ञानेश्वरी)"

या ओव्यांचा अर्थ सहज समजु शकेल असाच आहे. ज्ञानेश्वर म्हणतात: नावेतुन जात असता तीरावरीत वृक्ष मागे जातांना दिसतात, परंतु सत्यदृष्टीने नीट पाहिले तर वृक्ष हे अचल आहेत हे समजुन येईल.

आणि उदय-अस्तासाठी ज्याप्रमाणे सूर्य चालत नसतांनाही चालल्यासारखा वाटतो त्याचप्रमाणे कर्मात असूनही नैष्कर्म्य असते.

आर्यभटाच्या श्लोकांचा अनुवाद ज्ञानेश्वरांशी आपण पुन्हा पडताळुन पाहुयात. आर्यभट म्हणतो:  ज्याप्रमाणे अनुलोमगतीने (पुढे) जाणारा आणि नावेत बसलेला मनुष्य अचल असा किनारा विलोम (मागे) जातांना पाहतो त्याचप्रमाणे लंकेमध्ये (विषुववृत्तावर) अचल असे असलेले तारे तारे पश्चिम दिशेस जातांना दिसतात. उदय-अस्तासाठी ग्रहांसहीत सर्व नक्षत्रे लंकेच्या बरोबर पश्चिमेला प्रहव वायुमुळे वाहुन नेली जातात असा आभास (भ्रम) निर्माण होतो.

आर्यभट झाला तो पाचव्या शतकात. ज्ञानेश्वरांचा उदय तेराव्या शतकातील. म्हनजे जवळपास आठशे वर्षांनतरही आर्यभटाने "पृथ्वी स्थिर नसुन स्वता:भोवती फिरते" हे विषद करण्यासाठी जी उदाहरणे दिली जवळपास तशीच्या तशी उदाहरणे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत असे आपल्या लक्षात येईल. याला आपण नक्कीच योगायोग म्हणु शकत नाही. आर्यभट "नक्षत्रे" केंद्रस्थानी घेतो तर ज्ञानेश्वर सूर्य केंद्रस्थानी घेतात असेही आपल्या लक्षात येईल. सूर्य आणि नक्षत्रे स्थिर आहेत पण पृथ्वी स्थिर नाही असाच एकुणातील मतितार्थ यावरुन लक्षात येतो. आणि तो एकमेकांशी सुसंगत आहे. म्हणजेच आर्यभटाच्या ४.१० मधील "भ्रमति" या शब्दाचा अर्थ पुर्वसुरींनी आपल्या लाडक्या "स्थिर-पृथ्वी" सिद्धांताला बळकटी आणण्यासाठी चुकीचा घेतला असे निश्चयाने म्हणता येते.

म्हणजेच आर्यभटाची विचारधारा त्याच्याबरोबरच संपली होती असा तर्क करता येत नाही. आठशे वर्षांनी झालेल्या ज्ञानेश्वरांपर्यंत ती पोहोचली  दुर्लक्षीत राहिली असली तरी, टिकुन राहिली ती आदी शंकराचार्यांनी दिलेल्या एका दृष्टांतातून.  . मुळात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहित होते  गीता सर्वसामान्यांना सहज समजावी म्हणुन. जी विचारधाराच अस्तित्वात नाही, लुप्त झाली आहे, लोकांना समजुच शकणार नाही अशी स्थिती असती तर ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत दिलाच नसता हेही उघड आहे. म्हणजेच आर्यभटीय विचारधारा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात प्रचलित राहिली होती असे म्हणता येते.

यातील दुर्दैवी भाग असा कि पुढील विद्वानांनी आर्यभटाच्या संशोधनाचा आध्यात्मिक दृष्टांतासाठी उपयोग केला, विज्ञान पुढे नेण्यासाठी नाही हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे आणि अध्यात्माच्या अनावर मोहापायी भारतीय विद्वानांनी विज्ञानाची एक प्रकारे हत्याच केली असे म्हणायला पाहिजे.

आर्यभटाने सूर्यकेंद्रित विश्व-सिद्धांत माडला होता काय?

पृथ्वी परिवलन करते पण ती सूर्याभोवती फिरते काय याबाब्त आर्यभटीयात स्पष्ट विधान मिळत नाही हे खरे आहे. परंतु आर्यभटाने तोही विचार केला असावा असे दिसते. ते कसे हे आपण पाहू. मोहन आपटे आपल्या "भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ: आर्यभटीय या ग्रंथात म्हणतात, (पृष्ठ-१२) "...मात्र सर्व ग्रह सुर्याभोवती फिरतात याची आर्यभटाला बहुदा कल्पना आली नसावी. तसा स्पष्ट उल्लेख आर्यभटीयात मिळत नाही. परंतू शीघ्रफल ही आर्यभटाची गणिती क्रिया ग्रहांच्या सूर्यकेंद्री स्थितीचे भूकेंद्री स्थितीत रुपांतर करत, तसेच ग्रहांच्या शीघ्रोच्च परिघावरुन काढलेली त्यांची अंतरे, सूर्यापासुन असलेल्या त्यांच्या अंतराशी बरोबर जुळतात. (कालक्रियापाद, श्लोक:२१.)"

यावरुन आर्यभटाला जर सूर्यकेंद्रित सिद्धांत मांडायचाच नव्हता तर भूकेंद्री आणि सूर्यकेंद्री गृहितके धरत त्यांनी गणित मांडले असते काय, हा प्रश्न उपस्थित होतो. असो. या क्षणी तरी जरी आपल्याला निर्विवादपणे सूर्यकेंद्रीत सिद्धांताचे श्रेय आर्यभटाला देता येत नसले तरी पृथ्वीचे परिवलन आणि नक्षत्रांचे सापेक्ष स्थिर असणे हा सिद्धांत मांडण्याचे श्रेय मात्र निर्विवादपणे आर्यभटाला द्यावे लागते. येथे नमूद करायलाचे हवी ती बाब अशी कि आर्यभटाचा "आर्यभट संहिता" हा दुसरा ग्रंथ आज आपल्याला उपलब्ध नाही ज्यात आर्यभटाने आपल्या आर्यभटीयातील निरिक्षणे नोंदवण्यासाठीची गणिते दिलेली असू शकतील.

अरिस्टार्कसने जरी आर्यभटापुर्वीच सूर्यकेंद्रीत विश्व सिद्धांत मांडला असला तरी तो आर्यभटापर्यंत ग्रीकांमुळे पोहोचला काय यावरही येथे विचार करायला हवा. भारतावर ग्रीकांची (अलेक्झांडर) आक्रमणे झाली ती इसपु चवथ्या शतकात. तेंव्हा अरिस्टार्कसचा सिद्धांत अस्तित्वातच नव्हता. मिन्यंडरचे आक्रमण भारतात उत्तर-पश्चिम भागापर्यंत मर्यादित राहिले असले तरी तो स्वत:च बौद्ध धर्मीय बनला. (इसपु १८०) इसपु १०० पर्यंत ग्रीकांची अल्पांश सत्ता भारतातुन नष्ट झाली. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात टोलेमीचा जन्म झाला व दुस-या शतकापर्यंत त्याने भुकेंद्रीत विश्वरचनेचा पुरस्कार केला. तो अधिक तर्कशुद्ध पद्धतीने मांडला गेल्याने अरिस्टार्कस तेंव्हाच मागे पडला. तसेही अरिस्टार्कस निखळ सूर्यकेंद्रीत सिद्धांताचा पाठपुरावा करत नव्हता तर एक पर्यायी व्यवस्था म्हणुन तो सिद्धांत मांडत होता असे दिसते. त्यामुळे जरी भारतीयांचा ग्रीकांशी इसपु चवथे शतक ते इसपु पहिले शतक या काळात जरी संपर्क आला असला तरी अरिस्टार्कसच्या सूर्यकेंद्रीत विश्वरचनेच्या सिद्धांताचा प्रसार भारतात होण्याचे कारण दिसत नाही. आर्यभट हा बिहारमद्धे जन्माला आला तो चवथ्या शतकाच्या उत्तरार्धात. बिहारमद्धे त्याचा पृथ्वी परिवलन सिद्धांत मान्य न झाल्याने तो प्रथम गुजराथेत व तेथेही उपहासच झाल्याने तो केरळकडे निघुन गेला ही आख्याईका डा. नारळीकरांनी त्यांच्या उपरोल्लेखित ग्रंथात मांडलेली आहे. थोडक्यात ग्रीकांचे भारतातील अस्तित्व संपल्यानंतर जवळपास पाचशे वर्षांनी आर्यभटाने ग्रीकांपासुन, जो सिद्धांत तोवर मृतप्राय झाला होता, त्यापासुन उसनवारी केली असेल असे मानायचे संयुक्तिक कारण दिसत नाही.

एवढेच नव्हे तर, अरिस्टार्कसचा सिद्धांत खुद्द ग्रीस आणि युरोपातुन सोळाव्या शतकापर्यंत, कोपर्निकसच्या उदयापर्यंत गायब झाला
तसे काही भारतात घडल्याचे दिसत नाही हे ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीतुन सिद्ध केले आहे. म्हणजे आर्यभट ते ज्ञानेश्वर अशी किमान आठशे वर्ष विखंडित असेल वा काळमान्य असेल, आर्यभटीय पृथ्वी-परिवलन व कदाचीत सूर्यकेंद्रीत सिद्धांतही टिकुन राहिला. भारत युरोपाप्रमाणे सोळाव्या शतकापर्यंत अंधारयुगातच राहीला हे मत त्यामुळेच मान्य करता येत नाही.

येथे आर्यभटाची प्रज्ञा आणि ज्ञानेश्वरांचे खगोलशास्त्रावरचे प्रभुत्व याबाबत अचंबा वाटतो आणि आदराने मन नतमस्तक होते. भारताचे खगोलशास्त्रात असलेले हे योगदान कसलीही कृपणता न दाखवता मान्य करायला हवे.

डा. आनंद दाबक
संजय सोनवणी

संदर्भ: १. आर्यभटीय- गोलपाद ४.९ व ४.१०
२. आकाशाशी जडले नाते. डा. जयंत नारळीकर. (पृष्ठ २ व ३९)
३. "Birth and Early Development of Indian Astronomy - Dr. Subhash Kak
4.  Are Aryabhata’s and Galilean Relativity Equivalent? - Roopa H. Narayan
5. A Note on Aryabhata's Principle of Relativity- Abhishek Parekh
6. भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ: आर्यभटीय- डा. मोहन आपटे
७. श्री ज्ञानेश्वरी- ४.९७-९९


6 comments:

 1. छान अभ्यासपूर्ण लेख आहे. खरेतर पृथ्वीभोवती सूर्य फिरतो की सूर्याभोवती पृथ्वी, हे सापेक्ष )relative आहे. त्याने astronomyतल्या गणितात काहीही फरक पडत नाही.

  ReplyDelete
 2. Good read......I appreciate it..

  ReplyDelete
 3. सर , आर्यभटांचा जन्म हा आपल्या औरंगाबाद जवळच्या चाळीसगाव परिसरातील पटना या खेड्यात झाल्याचे ऐकून होतो !
  अर्थात बिहार मध्ये हि औरंगाबाद आहे आणि पटना पण आहे ! कन्फ्युजन होतंय , कृपया आपण प्रकाश टाकावा

  ReplyDelete
  Replies
  1. Yes, as information goes he was born in Ashmak desha (Khandesh) So your information may be correct about Patan near Chalisgaon. We must collect all the legends on this.

   Delete
 4. छान लेख-- अंधारयुग होतेच-- प्रत्येक युगात उजेडाची वाट दाखविणारे बुद्धीजीवी विचारवंत असतात , तसे अंधाराची वाट दाखविणारे ही असतात.. ज्या युगात अंधारवादी विचारवंत राजाश्रयाला असतात ते अंधारयुग आणि ज्या युगात उजेडवादी राजाश्रयाला असतात ते युग विकासाचे..

  ReplyDelete