Tuesday, October 16, 2012

"ना डावं...ना उजवं..." एका सामाजिक संतुलनाकडे जाण्यासाठी...



"ना डावं...ना उजवं...काश्मिर, रा. स्व. संघ आणि इतर लेख" हा डा. दत्तप्रसाद दाभोळ्कर यांचा एक चिंतनाने ओतप्रोत भरलेला आणि गहन विचारव्युहांत अडकवणारा लेखसंग्रह अत्यंत सावकाशीने वाचुन काढला. सावकाशीने वाचन अशासाठी झाले कि या संग्रहातील प्रत्येक लेखच नव्हे तर प्रत्येक लेखाचा प्रत्येक परिच्छेदही एकेका विषयाचे वेगवेगळे पैलू एवढ्या समर्थपणे सामोरे येत जातात कि पुन्हा आधीचे परिच्छेद वाचणे आणि चालू परिच्छेदातील विवेचनाचा अन्वयार्थ लावत पुढच्या अजूनच विलक्षण विचारव्युहात प्रवेशण्यातील एक बौद्धिक थरार अनुभवने ही एक आगळीच मेजवानी होती. मी समिक्षक नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत वाचायलाच हवे असे कोणतेही नवे वैचारिक पुस्तक मला आढळले नाही. काही पुस्तकांनी फसगत केली असे म्हटले तरी चालेल. याचे कारण म्हनजे आपली मराठी वैचारिकता कोठे तरी कोणत्या-ना-कोणत्या विशिष्ट, मग ती जातीय असेल कि पक्षीय, कोणत्यातरी वादाला धरुन असेल कि धर्माला, चौकटीत अडकली आहे व त्यामुळेच वैचारिकतेचा मूक्त आविष्कार जणु काही गायबच झाला आहे...अपहृत झाला आहे. हा लेखसंग्रह वेगळा, आवश्यक आणि वाचकाला मूक्त चिंतन करण्यास मोकळीक देणारा ठरतो म्हणुन त्याचे महत्व आहे. "ना डावं ना उजवं" या शिर्षकातच लेखकाने आपण आपल्या मांडणीत संतुलन साधल्याचे सूचित केले आहे...पण हे संतुलन साधतांना त्यांनी दावी बाजुही विचारात घेतलीय तशीच उजवीही. एकांगी मते लादण्याचा प्रयत्न कोठेही केलेला नाही. आणि तरीही त्यांची जीवनाकडे पाहण्याची व्यापक आणि सखोल-गंभीर दृष्टी मनाचा ताबा घेत असते. या लेखसंग्रहातील लेख वरकरणी वेगवेगळ्या विषयांवरचे असले तरी त्यात एक समान धागा आहे तो म्हणजे माणुस शोधण्याचा. त्याच्या वैश्विकतेचा पसारा शोधण्याचा!

या लेखसंग्रहात रा.स्व. संघ, सरस्वती नदीचा शोध, १८५७ चे बंड, शेतकरी संघटना, गोर्बाचेव्हकालीन रशिया, सती आणि काश्मिर प्रश्न असे विविधांगी विषय हाताळले गेले आहेत. यात कोणता लेख डावा आणि कोणता उजवा हे ठरवता येणे अवघड आहे कारण मुळातच प्रत्येक लेखाचा विषय वेगळा आहे आणि प्रत्येक लेख आपल्याला आजवर अज्ञात असलेले पैलू उलगडुन दाखवत जातो. प्रत्येक लेखावर लिहायला गेलो तर प्रत्येक लेखावर एक लेख होईल!

सरस्वती नदीच्या शोधाची गाथा सांगतांना दाभोळकर सध्या महाराष्ट्रात एक मूलनिवासी विरुद्ध उपरे आर्य असा जो बामसेफी व अन्य कथित पुरोगामी निर्मित एक सामाजिक संघर्ष आहे त्याचे दोन्ही दृष्टीकोनातून विवेचन करतात. मायकेल बामशादचे जेनोम सम्शोधन व तत्पुर्वीचे लो. टिळक, त्याहीआधीचे विल्यम जोन्स, रिश्ले ई.चे ऋग्वेद, मानववंशशास्त्र व भाषाशास्त्राच्या अंगाने झालेले संशोधन हे पायाभूत मानतच मुलनिवासी संकल्पनेची रचना करण्यात आली आहे. पण त्याचवेळीस दाभोळकर सिंधु संस्कृतीचा -हास हा परकीय आर्यादिंचा आक्रमणामुळे नव्हे तर पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाला असे स्पष्ट करत म्हनतात कि सर्व सभ्यता या आपल्याच लोकही आपलेच. सर्वच देशाचे समान नागरिक...आणि अन्यायकारी, समाज विघटित करनारी व्यवस्थाही आपलीच!

हा लेख २००४ मधील. बामशादनंतर पुढेही अजून बामशादपेक्षाही व्यापक दोन डीएनए प्रकल्प झाले. बामशादची निरिक्षणे ब-यापैकी फेटाळली गेली. आर्य वंश व कथित आक्रमण सिद्धांतही ऋग्वेदाच्याच पायावर डा. नी. र. व-हाडपांडेंच्या "कपोलकल्पित आर्य आणि त्यांच्या स्वा-या" या अभ्यासपुर्ण ग्रंथामुळे फेटाळला गेला. तरीही आजही खूप मोठा वर्ग मुलनिवासी संज्ञेवर विश्वास ठेवतो हे वास्तव आहे. एकसंघ समाज बनावा या ध्येयाने झपाटलेल्या लोकांसमोर एक आव्हान आहे व ते म्हणजे जातीसंस्था मोडायची कशी हा. दाभोळकर म्हणतात जोवर मुळात जातीसंस्था निर्माण झालीच कशी याचे गूढ उलगडत नाही तोवर ती मोडायची कशी हेही उलगडनार नाही.

१८५७च्या बंडाबाबत दाभोळकरांचा अभ्यास व निरिक्षणे वेगळी आहेत. खरे तर त्यांनी यावर पुस्तक लिहावे अशी राजहंस प्रकाशनाची इच्छा होती. त्यांनी ते लिहिले नाही हा ५७च्या अभ्यासकांवर मोठाच अन्याय आहे कारण त्यांची निरिक्षणे व संदर्भ अत्यंत स्वतंत्र असून त्याचे विश्लेशनही वेगळे आहे. शेषराव मोरेंचा ग्रंथ ज्यांनी वाचलाय त्यांनी या पुस्तकातील १८५७ वरील दोन लेख वाचले तरी मला काय म्हनायचे ते लक्षात येईल!

"लाल ता-याकडुन धुक्याकडे" हा लेख मला खुपच आवडला. हे प्रवासवर्णन नाही. हा लेख म्हणजे संक्रमनाच्या काळातील एका देशाच्या नागरिकांच्या मानसिकतेचा, जीवनविषयक बदलु पाहना-या दृष्टीकोनांचा अवगाहन घेणारा लेख आहे. हे सारे वाचत असतांना मानवतेचा एक विशाल पट समोर येतो. लेखकाची अपार सहृदयता सतत जाणवत राहते. आपल्या भारतीय मानसिकतेशी नकळत तुलना होत राहते. तशी लेखकानेही केली आहेच! परंतु एका बलाढ्य कम्युनिस्ट रशियाचे पतन आणि नव्या व्यवस्थेकडे चाचपदत का होईना होनारी वाटचालही अस्वस्थ करते.

खिन्न...उदासवाना करणारा, आपल्याच आत्म्याचे पापुद्रे सोलत रक्तबंबाळ करनारा लेख म्हनजे "सती: एक मूक्त भ्रमंती". या लेखाचे निमित्त आहे राजस्थानातील देवराळ्याला सती गेलेली रुपकंवर. लेखकाने तेथे दिलेली भेट, तेथील भारावून गेलेले चैतन्यमय वातावरण...लेखकालाही त्या चैतन्यातील एक बिंदू झाल्याचा येणारा साक्षात्कारी अनुभव...! हे वाचतांना विचित्र...नव्हे लेखक त्याचे मित्र समजतात तसा माथेफिरुच असला पाहिजे असे वाटु लागते. पण लेखकाच्या त्याक्षणीच्या भारावून गेलेल्या भावनाही कसलाही आदपददा न ठेवता समोर येतात...पण राग येतो हेही खरे. लेखक परत फिरतो...आणि भारावलेली मन:स्थितीही उतरते...स्वत:ची शिसारीही वाटु लागते. सतीप्रथेबाबत भाष्य, संशोधने माम्डत मग ते स्वत:ला सतीस्थानाला भेट देवून आल्याने जे दैवत माहात्म्य येते त्याची जी कथा सांगितली आहे ती आपल्या भारतीय मानसिकतेबद्द्ल घृणा वाटावी अशीच आहे. काही जीवंत जाळुन सती जातात...काही स्त्रीया क्षणाक्षनाने परंपरेच्या आगीत अव्याहत सती जात असतात...हा एक अत्यंत खिन्न करनारा अनुभव देनारा लेख आहे.

कश्मीरबाबतचा लेख एक अशीही विचारधारा अस्तित्वात आहे व ती समजावून घेतली पाहिजे म्हणुन हा मला आवडुनही न आवडलेला एकमेव लेख. अर्थात आता काश्मिरमधील परिस्थितीही बदललेली आहे, व हा लेख १९९१ मधील. त्यामुळे दाभोळकरांचे काश्मीर समस्येबाबतचे मत बदलले असेल अशी आशा आहे.

एकंदरीत गेल्या दहा-बारा वर्षांत या उंचीचे पुस्तक आलेले नाही. यामधील लेखकाची सर्वच मते पटतात असेही नाही. पण ती का पटत नाहीत याचेही मग तेवढेच तार्किक उत्तर शोधायला भाग पाडणारे हे पुस्तक आहे एवढे मी नक्की म्हणेन. भारतीय संस्कृती, एकुणातील मानसिकता, संस्कृती संघर्ष आणि त्यामागील नेमक्या प्रेरणा शोधणे हे आजच्या पिढीसमोरील मोठे आव्हान आहे. एकमेकांकडे बोटे दाखवून आपल्याला खरी उत्तरे कधीही मिलनार नाहीत. जर सर्वांनी मिळुन संस्कृतीची पार सिंधु काळापासून उभारणी केली असेल तर त्या संस्कृतीतील अनिष्टांची जबाबदारीही आपणा सर्वांचीच आहे हे लक्षात ही अनिष्टे कशी दूर करायची हे आपल्यासमोरचे आजचे तातडीचे आव्हान आहे. त्याशिवाय भविष्यातील सम्स्कृतीची निकोप घडण अशक्यप्राय आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागनार आहे. हा लेखसंग्रह वाचुन शेवटी जे मला वाटले ते मी ग्रथित केले आहे. सर्वांनी यावर विचार करावा एवढेच मी म्हणेल व हे पुस्तक, तुम्ही कोनत्याही विचारसरणीचे असा अवश्य वाचावे अशी शिफारस करेन!

ना डावं ना उजवं
ले. डा. दत्तप्रसाद दाभोळकर
अक्षर प्रकाशन, पुणे
संपर्क: ९३२२३९१७२०
मूल्य: रु. १७५/-    


4 comments:

  1. अभिनंदन !
    आपण मोकळेपणे आग्रहवजा शिफारस केली आहे ते पुस्तक मी लवकरात लवकर वाचून
    आपल्याला माझे त्या बाबतचे मत कळवेन .
    खरे म्हणजे असे सुचवणे हि फार चांगली प्रथा आहे .
    दाभोलकर कुटुंब हे मुळातच एक वेगळ्या दिशेने विचार करणारे आहे .
    माझी संजय सोनावानिना विनंती आहे कि आपणपण यापुढे असेच निर्मल पाने "वाचकाने काय वाचावे "ते सुचवत जावे.
    कारण आज काल च्या धकाधकीत असे जर कोणी सांगणारे असेल तर ते स्वागतार्ह ठरते.
    सकस वाचनाची आणि विचारांच्या आदान प्रदानाची चळवळ सध्याच्या वातावरणात आवश्यक आहे.
    १) मला इथे सांगावेसे वाटते कि संघ परिवारा ने ब्राह्मणांच्या विचार शक्तीचा ताबा घेतलेला नाहीये आणि ते काही ब्राह्मणांचे एकमेव प्रवक्ते नाहीयेत.
    माझ्या लहानपणापासून मी संघ ढासळत गेलेलाच पहिला आहे.कारण त्यांचे विचार हे मर्यादित बाबतीतच प्रभावी आहेत.तेच त्यांचे कार्य क्षेत्र आणि तीच त्यांची मर्यादा ठरते.
    २) १८५७ चे बंड हा काही स्वातंत्र्य लढा नाही असे माझे मत आहे.
    ३) आर्य उपरे का इथलेच याबाबत मला खूप उत्सुकता आहे पण ती आता हळू हळू कमी होत चालली आहे.
    अजून बरेच विषय चर्चिले जाऊ शकतात -जसे कि -
    ४) कुणीतरी असा विचार का करत नाही कि पारशी लोक जसे नंतर इथे आले तसेच ते पूर्वीही बरेच वेळा इकडे येऊन त्यांनी येथील असुरांना योगदान दिले असेल.
    पारशी कधीच लढाऊ नव्हते का ?-विस्तारवादी नव्हते का ?-जिथे सरशी तिथे पारशी हि म्हण आहे त्याबाबतीत त्यांचे आणि कोकणस्थांचे साम्य आहे असे वाटते.
    अवेस्ता आणि वेद यामध्ये जर बरेच साम्य आहे -ते समकालीन आहेत का ?.
    ५) ओ.बी.सी.बी.सी.आणि इतर राखीव जागांच्या मुळे समाजात विचित्र वातावरण आहे.
    घटनेने त्या आरक्षणाला मर्यादा अपेक्शिलेली आहे.म्हणजेच आंबेडकर हे सुद्धा कायमच्या आरक्षणाच्या बाजूने नव्हते .
    ६) देव देवता -त्यांची निर्मिती,त्यांचे जीवनातील स्थान -त्यावर आधारीत चालणारे बेगडी उत्सव -त्याचे बाजारू स्वरूप-हे कालबाह्य झाले आहेत असे कुणीतरी मत मांडायला पाहिजे.
    सार्वजनिक धार्मिक उत्सव हा एक महाभयानक रोग ठरत आहे.
    ७) कोल्हापूरच्या मंदिरातील लाडू प्रकरणात जे विचार मांडले गेले त्यातून पावित्र्य आणि देवदेवता या विषयी प्रकट चर्चा झाली पाहिजे.
    मातृसत्ताक समाजातून या देवतांचे महत्व मानले गेले होते.त्या विषयी समाज प्रबोधन करून ,खरे म्हणजे देव आणि त्यांच्या पूजा ह्या किती कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत तेपण मांडले पाहिजे.
    कारण आत्ताच्या काळात टी व्ही वर जे दाखवतात ते मेंदूला मुंग्या आणणारे असते.- - -अमुक देवीने अमुक राक्षसाचा वध केला - -म्हणून अमुक दिवस आजसुद्धा तो आनंद एखाद्या विचित्र पद्धतीने साजरा करणे म्हणजे चेष्टाच नाही का ?देवीचे सोवळे ओवळे - ती किती वेळ झोपते हे सगळे विनोदी वाटते."माझे आणि माझ्या कुटुंबाचे भले ( म्हणजे काय कुणास ठाऊक ) होऊ दे इतकेच मागणे !
    हा सगळा प्रकार मोहक आहे , संस्कृतीचा भाग आहे असे म्हणून त्या विरुद्ध लिहिणाऱ्या लोकांचा निषेध करणे हेपण विनोदीच ठरते.
    परंपरांची आपल्या इतकी आवड कुठेच नसेल !

    ReplyDelete
    Replies
    1. Impressed!!!!!!!!

      Agashesji......now a days we can find a new creed they talk philosophies, pretend that they are rationalist, and again say that religion is personal thing. How can religion its myths, its claims be personal thing which is affecting everybody's life.

      Delete
  2. संजय ,
    धर्म आणि श्रद्धा या समजा खाजगी बाबी आहेत .पण सध्या जे
    महलक्ष्मी च्या देवळात घडते आहे ते काय म्हणायचे ?
    व्ही आय पी नावाची दर्शनाची वेगळी लाईन कशी असू शकते ?
    अशी लाईन जर सरकार निर्माण करत असेल तर त्याचा सर्व थरातून निषेध केला पाहिजे.
    जर तिथले ब्राह्मण पुजारी हा प्रकार करत असतील तर त्यांना रस्त्यावर आणून उघडे पाडले पाहिजे.
    देवी जर कुणाच्या स्वप्नात जाऊन स्पेशल लाईन - निर्माण करा स्पेशल भक्तांसाठी -असे निर्देश देत असेल
    तर मात्र हा प्रश्न वेगळ्या पातळीवर सोडवावा लागेल -अंधश्रद्धा वगैरे. कारण आज लाखो लोक रांगेत उभे राहून हा तमाशा बघत आहेत .
    आपला समाज शिस्त कधी अंगी बाणवणार ?

    ReplyDelete
  3. I AM GOING TO PURCHASE IT... SOUNDS GOOD ...

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...