Sunday, October 14, 2012

शाश्वत शेती...शाश्वत जीवन...शाश्वत दांपत्य!



सध्याच्या जागतिकीकरणाच्या लाटेमुळे शहरी समाजाचीच जीवनशैली बदलली आहे असे नव्हे तर शेतक-यांच्याही जीवनशैलीत फार मोठा फरक पडला आहे. हा फरक झाल्याने शेतक-यांच्या अर्थकारणात मात्र फरक झाल्याचे दिसून येत नाही. उलट ही जीवनपद्धती शेतक-यांच्या आत्महत्त्या घडवण्यासच अधिक हातभार लावत आहे. ही बदललेली जीवनशैली म्हणजे मुळातच शेती करण्याची बदललेली पद्धती. हायब्रीड...जनुकीय बदल केलेली बियाणी, रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा मारा, चुकीची पीकपद्धती व त्यामुळे शेतजमीनींची होणारी अपरिमित हानी...यातुन निर्माण होणा-या समस्या...जीवनसंघर्षात पडत जाणारी ताण-तणावात्मक भर...हे आता सर्वत्र दिसनारे चित्र आहे. पण या समस्यांची सुरुवात आजची नाही हे आपल्याला सहसा माहित नसते. याची पाळेमुळे कृषिक्रांती घडवण्याच्या, तत्कालीन निकडीच्या गरजेच्या पण चुकीच्या पद्धतीने राबवलेल्या गेलेल्या पद्धतीतच रोवली गेली होती. आज त्याची भयावहता सर्वांना जाणवू लागली आहे हे खरे पण १९८१ सालीच विदर्भातील करुणाताई व वसंतराव फुटाणे या दांपत्याने या समस्येची भविष्यातील भयावहता ओळखुन स्वत:च्या प्रत्यक्ष प्रयोग, आचरण व सातत्याने प्रबोधन करत "शाश्वत शेती...शाश्वत जीवनपद्धती" या तत्वांवर काम सुरू केले ते आजतागायत ३३ वर्ष अव्याहत सुरु आहे. त्यांचे कार्य आता राष्ट्रव्यापी होत असून हजारो शेतकरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शाश्वत शेती व शाश्वत जीवनपद्धतीचा अंगिकार करू लागले आहेत. या कार्याचा परीघ विस्तारत आहे. तेही कोणतीही संस्था, ट्रस्ट वा संघटना स्थापन न करता. एक रुपयाचे अनुदान अथवा देनगी न घेता. वसंतरावांचा एकाच तत्वावर विश्वास आहे व तो म्हणजे अनुयायी नकोत...सहप्रवासी पाहिजेत. या तत्वामुळे समविचारी, सहद्धेयाने प्रेरीत एक अवाढव्य टीम उभी राहते आहे. एका सायलेंट मुव्हमेंटचा विस्तार होतो आहे.



काय प्रेरणा आहे यामागची? का स्वत:चे आणि अगदी मुलांचेही जीवन या ध्येयाला वाहिले गेले? कसलीही अपेक्षा न ठेवती, प्रसिद्धीची गरजही न भासता कसे य दांपत्त्याला हे साध्य करता आले? हा इतिहास मोठा रोचक आहे.

विनोबाजी व जेपी प्रेरणा

करुणाताईंचे वडील रणजितभाई देसाई हे गुजराथी तर आई बिंदी बिहारी. वडिल आधी गोशाळांचे व्यवस्थापन करायचे. काही काळाने त्यांनी बैलगाडीतुन फिरत विनोबांच्या साहित्याचा प्रचार-प्रसार सुरू केला. त्या विक्रीतुन येणारे उत्पन्न तुटपुंजे असे. आई कापुस पिंजणे ते सुतकताई व कपडे शिवण्यापर्यंतचे काम स्वत:च करायची. गांधीवादाचा प्रभाव तेंव्हा अगदीच अतुट असाच होता. १४ सप्टेंबर १९५८ रोजी करुणाताईंचा जन्म झाला. विनोबाजींच्या "सत्य:प्रेम:करुणा" या त्रिसुत्रीतुन व करुणा हे भगवान गौतम बुद्धाचे अव्यवच्छेदक असल्यामुळे व वडिल बौद्ध साहित्याचे अभ्यासकही असल्यामुळे त्यांनी आपल्या कन्येचे नांव करुणा असे ठेवले.

१९६३ साली विनोबाजींनी पवनारला स्त्रीयांसाठी आश्रम काढला. करुणाताईंच्या आईनेही त्या आश्रमात संन्यस्त जीवन जगायचा निर्णय घेतला. करुणाही आईबरोबरच त्या आश्रमात रहायला गेली. करुणाताईंचे सारे शिक्षण झाले ते अत्यंत अनौपचारिक पद्धतीने. विद्वान स्त्रीया देश-विदेशातुन आश्रमात यायच्या. करुणाताईनाही शिकवायच्या. बाळकोबा, विनोबाजींची भाषणे, चर्चा यातुन विचारवैभवही वाढत गेले. अशोक बंगांमुळेही त्यांना खूप शिकायला मिळाले. शेती ते इतर प्रत्यक्ष कामेही करत श्रममाहात्म्यही ठसत गेले. बांगलादेशी शरणार्थींसाठीही काम करायला मिळाले. १९७३-७४ सालच्या दरम्यान विनोबाजींनी करुणाताईंना अचानक एक प्रकल्प दिला. त्यांनी सांगितले कि तू पपयांची लागवड कर. जोवर त्या झाडांना पपया येत नाहीत तोवर मी पपई खाणार नाही. या प्रकल्पासाठी त्यांनी करुणाताईंना ७ गुंठे जमीन दिली.

शाश्वत शेतीचा प्रयोग विनोबाजींच्या प्रेरणेने सुरु झाला तो असा. करुनातांंनी स्वत: मशागत केली, सेंद्रिय खते व त्यांचे प्रमाणही स्वत: निवडले, बियाणी आणुन लागवड केली. पाणी द्यायचे कामही स्वतच. प्रत्येक नोंदी, अगदी खतांवरचा खर्चही ठेवला. आणि जेंव्हा फळे आली तो दिवस आश्रमवासियांच्या दृष्टीने उत्सवाचाच दिवस होता. अशोक बंग स्वत: थोर कृषितज्ञ. त्यांनी सांगितले, ही फळे जागतीक दर्जाची आहेत. विनोबाजींनी आपला पपई-उपवास तोडला. करुणाताईंच्या दृष्टीने हा अतीव आनंदाचा व परिपुर्तीचा क्षण होता. शाश्वत जीवन आणि शाश्वत शेतीचा हा शोध त्यांच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा देणारा होता.

दरम्यान करुणाताईंचा सामाजिक चळवळीतही सहभाग सुरु झाला. किंबहुना त्यांना त्यांचा जीवनसाथी या चळवळीमुळेच भेटला. जयप्रकाश नारायणांनी आणिबाणीच्या काळात "तरुण शांती सेना" स्थापन केली होती. या संघटनेतर्फे वेगवेगळ्या प्रांतात शिबीरे घेतली जात. तरुणांचा सहभाग वाढवला जाई. विनोबाजींचा आणिबाणीला पाठिंबा असतांना तुम्ही जयप्रकाशजींच्या आणिबाणीविरुद्ध आंदोलनात कसा भाग घेतला हे करुणाताईंना विचारले तर त्या सांगतात, हे धादांत खोटे आहे. विनोबाजींचा आणिबाणीला पाठिंबा कधीच नव्हता. समाजकारण करणा-यांचा प्रभाव राजकारण्यांपेक्षा मोठा असला तरच अनुशासनपर्व येवू शकते असे त्यांचे म्हनणे होते, परंतु तत्कालीन केंद्रीय मंत्री वसंत साठेंनी या चांगल्या तात्विक विधानाचा विपर्यास करून आणिबाणीलाच अनुशासन पर्व ठरवून टाकले.

वसंतराव फुटाणे तसे शेतकरी कुटुंबातील. पण तेही जेपींच्या या तरुण शांती सेनेत हिरिरीने काम करत होते. दोघांची ओळख याच निमित्ताने झाली.  चर्चा, वाद-विवाद यातुन मैत्री झाली. दोघांचा विवाहाचा असा विचार नव्हता...पण मित्रांनीच तुम्ही एकमेकांना अनुरुप आहात असा सल्ला दिल्याने त्या दृष्टीने प्रथमच चर्चाही केली. पण विनोबाजींची परवानगी महत्वाची होती. विनोबाजी ब्रह्मचर्याचे समर्थक...पण करुणाताईंनी आपली भुमिका स्पष्ट केली आणि विनोबाजींनी परवानगीही दिली. वैवाहिक जीवनाकडे कल असेल तर सक्तीच्या ब्रह्मचर्याच्या तेही विरोधातच होते. १९८१ साली दोघे पवनारच्या आश्रमातच अत्यंत आश्रमवासी पद्धतीने विवाहबद्ध झाले. या लग्नाला चार-दोन मित्र सोडले तर कोणाचेही नातेवाईक नव्हते. वसंतरावांचा वडिलांचा या विवाहाला कडाडुन विरोध होताच. परंतु इच्छाशक्ती जिंकली. या विवाहाबरोबरच करुणाताईंचे जवळपास १८ वर्षांचे आश्रमवासी जीवन संपुष्टात आले.

शाश्वत जीवन:शाश्वत शेतीच्या शोधात

वसंतरावांचे गांव अमवरावती जिल्ह्यातील रवाळा, पोस्ट सावनूर, ता. वरुड. हे आदिवासी गांव. ६०% लोकसंख्या आदिवासींची, २०% दलित समाज व उर्वरीत अन्य अशी विभागणी. वरूड तालुका तेंव्हाही संत्र्यांसाठी प्रसिद्ध होताच. रवाळा हे मध्यप्रदेशाच्या सीमेला लागुन असलेले गांव. सातपुडा पर्वतराजीचे संगत. मेळघाटाचे अरण्य तेंव्हा रवाळ्यापर्यंत विस्तारलेले होते. वाघांचे दर्शनही दुर्मीळ नव्हते. संत्र्यांसाठी देशभरातुन वरुड तालुक्यात ट्रक्सची वर्दळ असायची. आणि लोकसंख्या हजार-बाराशेच्या घरात. परंपरांचे जोखड वावरत जगणारे सर्वच. वसंतरावांच्या घरच्यांना हा विवाह पचने कठीणच होते. एक तर हा आंतरजातीय विवाह. अजुन वसंतरावांच्या एका बहिणीचे व दोन्ही भावांचे विवाह व्हायचे होते. अशा स्थितीत त्यांचे विवाह कसे होणार ही समस्या भेडसावणारी. वसंतरावांच्या एका भावाचा विवाह ठरला तर करुणाताईंनी तेथे येवून "या कोण?" असा प्रश्न होणा-या सोय-यांनी विचारला तर पंचाईत होवू नये म्हणुन साक्षगंधाच्या दिवशी करुणाताईंना चक्क कोंडुन ठेवण्यात आले. पण सुदैवाने वसंतरावांचे बंधुही तेवढेच बंडखोर. त्यांनी हा सारा बेत हाणून पाडला...सारे काही सुरळीत झाले.

शेती करायची तर शाश्वत पद्धतीनेच असा निर्णय विवाहापुर्वीच या दांपत्याने घेतला होता. पण घरचे मानत नव्हते. प्रयोग करायचे तर स्वतंत्र जमीनीची गरज होती. "रसायने अन्नाला विषाक्त करतात...जर असे विषारी अन्न खावू शकत नाही तर इतरांनाही कसे खावू द्यायचे?" हा दोहोंसमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता. मग घरच्यांशी बोलणी करुन वसंतरावांनी बारा एकर जमीन मिळवली व स्वतंत्र झाले.  शेतावरच रहायला आले. चळवळीतील अनेक मित्रही तेथे मुक्काम ठोकु लागले. शाश्वत शेतीचे विविधांगी प्रयोग सुरु झाले. कसलेही रसायनी खत अथवा कीटनाशके न वापरता विविध वाणांची पीके कशी घेता येतील व उत्पादकताही बाधणार नाही   असे प्रयोग स्वत: केल्याखेरीज इतरांना पटवून देणे तर अशक्यप्राय होते. लोक हायब्रीड बियाणे व त्यातुन वरकरणी उदंड दिसणा-या पीकांना सरावले होते. आपल्याच पुर्वजांनी निर्माण केलेल्या पीक-चक्रांना विसरले होते. सेंद्रीय खतांचे तर नांवही उरलेले नव्हते. बदल घडायला तर हवा होता पण ते तेवढे सोपे राहिलेले नव्हते. स्वत: यशस्वी प्रयोग करणे आवश्यक होते. सुरुवातीला काही प्रयोग सफल तर काही अक्षरशा विफलही झाले. मग यशाची मात्रा दिसु लागली. परिसरातच नव्हे तर देश्भरात प्रचार-प्रसारही सुरु राहिला. पण लोक अद्याप समजावून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

शाश्वत शेतीच नव्हे तर शाश्वत जीवनपद्धती हे ध्येय उभयतांनी बाळगलेले होते. स्वत:च्या गरजा किमान ठेवणे, स्वत:साठी आवश्यक असणा-या सर्वच शेतमालाचे उत्पादन स्वत:च करणे, (अगदी तेलही स्वत:च्या शेतात पिकलेल्या तेलबियांपासून तेलघाण्यावर बनवुन आणणे)) अत्यंत अत्यल्प वस्तुंची बाहेरुन खरेदी करणे ही जीवनशैली म्हणजेच शाश्वत जीवनशैली हे उभयतांचे मुलभूत तत्वज्ञान. ते सर्वच शंभर टक्के पाळु शकत नाही ही जाणीव असली तरी स्वत: फुटाणे कुटुंबीय सुरुवातीपासुनच याच जीवनशैलीचा अंगीकार करुन जगत आहेत व त्या पद्धतीचे फायदे लोकांच्याही लक्षात येवू लागले आहेत. आज शंभराहुन अधिक शेतकरी कुटुंबे या शैलीप्रमाणे वा किमान जवळपास जात जीवन जगत आहेत व त्याची व्याप्तीही विस्तारत चालली आहे.

शाश्वत शेती म्हणजे काय?

शाश्वत शेतीचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मात्र तिला एका चळवळीचेच रुप प्राप्त झाले. सभा, पत्रके, अहवाल, प्रश्नोत्तरे, प्रात्यक्षिके या माध्यमातुन देशभर प्रचार सुरु झाला. शाश्वत शेतीची मुलतत्वे म्हणजे १. हायब्रीड अथवा जनुकीय बियाण्यांचा वापर न करता पारंपारिक बियाण्यांचाच वापर करणे. २. फक्त सेंद्रीय खते वापरणे. ३. रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करणे. ४. स्थानिक पर्यावरणाला व मृदेला सुसंगत अशीच पीके घेणे. ५. पीकवितरण योग्य प्रमाणात करणे. ६. निसर्गचक्रात ढवळाढवळ न करता निसर्गापासुन शिकणे. ई.



वरील शेतीपद्धतीमुळे भूजलउपसा मर्यादेत रहातो. करुणाताई म्हणतात उदा. विदर्भातील संत्र्यांच्या बागा म्हणजे स्थानिक पाणी उपसणे व देशभर फळांच्या रुपात पाठवणे. त्यांत पैसा आहे, पण अतिरिक्त सातत्यपुर्ण उत्पादनामुळे विदर्भाची भूजल पातळी संकटात आली आहे. त्यापेक्षा कही प्रमानात का होईना स्थानिक आंब्यांच्या प्रजाती वाढवण्यावर आम्ही जोर दिला. सुरुवातीला सर्वांनाच हे धाडसी पाऊल वाटले. परंतु हळु हळु चळवळ एवढी यशस्वी झाली कि सर्वाधिक चविष्ट आंबे पिकवणारे म्हणुन टाइम्स ओफ इंडियाने आमच्या शेतक-यांची दखल घेतली. उलट उत्त्पन्न वाढायला मदतच झाली व भुजलाचा झाडांकडुनच होनारा अमर्याद उपसा कमी झाला.

हायब्रीड बियाण्यांमुळे रासायनिक खते व कीटनाशके अपरिहार्य होतात, कारण या प्रजाती मुळात नाजूक प्रकृत्तीच्या. पण यामुळे ते विषारीपण अन्नात तर उतरतेच पण कसही कमी झालेला असतो. शेतजमीन हळुहळु निकस होत जाते, खारावू लागते व नापीकतेकडे वाटचाल सुरु होते...म्हणुन मग अधिक खते...हे एक दु:श्चक्र आहे. आज जो फायदा मिळतांना दिसतो तो शाश्वत नाही...तात्कालिक आहे व याची अनिष्ट फळे भविष्यात येणार हे निश्चित आहे. याहुन निर्माण झालेला मोठा धोका म्हणजे खेड्यांत पुर्वी मधुमेह/हृदयविकारदि आजारांची नामोनिशानी नव्हती. आज त्याची लागण ग्रामीण भागात झपाट्याने होवू लागली आहे. गेली सतत ३१ वर्ष प्रचार-प्रसारत्मक चळवळीतुन साध्य झालेली बाब म्हणजे अक्षरश: हजारो शेतकरी आज शाश्वत शेतीचे महत्व समजावून घेवू लागले आहेत, आपापल्या विभागांतील नैसर्गिक परिस्थितीनुसार प्रयोग करत पुढे वाटचाल करु लागले आहेत. अर्थात हे अत्यल्प प्रमाण आहे याचीही जाणीव या दांपत्याला व त्यांच्या देशभरातील सहका-यांना आहे.

सरकारी मदत घ्यायची नाही!

या दांपत्याने शाश्वत शेतीला चळवळीचे स्वरुप देतांना एक निर्धार केला होता व तो म्हणजे कसलीही शासकीय मदत घ्यायची नाही. कोणाकडुनही देणगीही घ्यायची नाही. कसल्याही पुरस्काराला थारा द्यायचा नाही. वृत्तपत्रीय प्रसिद्धीच्या मोहातही कधीही पडायचे नाही. प्रत्यक्ष कामातुनच लोकांपर्यंत पोहोचायचे. हा निर्धार या जोडप्याने कटाक्षाने आजवर पाळला ही अत्यंत अभिनंदनास्पद बाब आहे. अन्यथा अगणित एन.जी.ओ. काम करोत अथवा नकोत, अनुदाने अथवा देणग्यांकडे डोळे लावून बसलेले असतात हे वास्तव आपण पहातो.


एवढेच नव्हे तर या चळवळीला संस्थात्मक स्वरुप जाणीवपुर्वक या दांपत्याने दिले नाही. एका अर्थाने हे एक सैल व अनाम पण समान उद्दिष्टांचे असे संघटन आहे. वसंतराव व करुणाताई जेपींच्या आंदोलनात असल्यापासुनचे त्यांचे देशभरचे अनेक मित्र व त्यात स्वयंस्फुर्तीने सामील होनारे हे सारेच समान पातळीवर वावरत ही चळवळ व्यापक करत आले आहेत. वसंतरावांचे वरुडमधील एक सहकारी मोहन रत्नपारखी सांगतात कि "अनुयायी नकोत...सहप्रवासी हवेत..."हेच या दांपत्याचे मूलभुत तत्वज्ञान आहे आणि त्यामुळेच सामुदायिक...सम-स्वतंत्र-विचारी नेतृत्व हा पाया राहिलेला आहे जो आजच्या काळात दुर्मिळातिदुर्मिळ असाच म्हणावा लागेल. आणि ते खरेच आहे.

दारुबंदी

शाश्वत शेतीच्या कामाबरोबरच सर्वात महत्वाचे काम म्हणजे दारुबंदी. करुणाताई अत्यंत प्रांजळपणे सांगतात कि मी या चळवळीचे नेतृत्व केले नाही. खरे तर आदिवासींचेच गांव असल्याने दारु हा आदिवासींच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे हे मी मनोमन मान्य करुनच टाकले होते. ग्रामसुधारणांचे, प्रौढ शिक्षणाचे उपक्रम मात्र १९८१ पासुनच सुरु होते. पण एकदा गांवात लग्न करुन आलेल्या काही तरुण सुना माझ्याकडे आल्या आणि दारुबंदीबाबत बोलु लागल्या. विरोध व्यक्त करु लागल्या. आपली दु:खे सांगु लागल्या. मला त्या सर्व प्रश्नांची जाणीव होतीच पण आता आदिवासी तरुणींनाही त्याविरोधात आवाज उठवावा वाटु लागला आहे याचा मला मनोमन आनंद झाला. मी त्यांना सांगितले...मी नेत्रुत्व करणार नाही. आपण सारे मिळुन एकत्र हा प्रश्न सोडवुयात. त्या तरुणी तयार झाल्या. आणि सुरु झाली एक मोहीम.



पोलिसांनी या आंदोलकांविरुद्ध खोट्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गाठली. करुणाताईंसोबत आत्मविश्वास वाढलेल्या या तरुणी पार मामलेदार, जिल्हाधिकारी यांच्याशीच्या चर्चांत/वादांत हिरिरीने भाग घेवू लागल्या. आज परिस्थिती अशी आहे कि गांवातील स्त्रीया ताठ मानेने जगतात. दारुबंदीसोबत स्त्रीमुक्तीची ही अभिनव चळवळ बनली तिही सर्वांनीच नेतृत्व केलेली चळवळ. ती नंतर अन्यत्रही पसरली.

वर्तमान

शाश्वत शेतीचे काम जोमाने फोफावत आहे. जनुकीय बियाणे बनवुन देशाला परावलंबी बनवु पाहणा-या मोन्सेटोसारख्या बलाढ्य कंपनीशीही संघर्ष सुरु आहे. एकट्या वरुड तालुक्यात शंभरेक शेतकरी शाश्वत शेतीच्या मार्गाने सुखासमाधानाचे जीवन जगत आहेत. या व्यापक कामात आता दुसरी पिढीही उतरली आहे. शालेय शिक्षणाला आई-वडिलांप्रमानेच महत्व न देता प्रत्यक्ष जीवन शिक्षणातुन मिळवलेले ज्ञान ही पिढी प्रचारत आहे वाटत आहे. विनय आणि चिन्मय ही या दांपत्याची मुले. हे दोघेही बायोग्यस तंत्रज्ञान, सुलभ सेंद्रीय खते कशी बनवायची यावरची प्रात्यक्षिके देशभरातुन त्यांच्याकडे भेट द्यायला येणा-या शेतक-यांना देत असतात. स्वत:ही अनेकविध प्रयोग करत आपल्या मातापित्यांना साथ देत असतात. कलकत्ता ते पोंडॆचरी अशा देशभर विखुरलेले सहकारी जोमाने शेतक-यांचे जीवन सम्रुद्ध करण्यासाठी राबत आहेत. त्यासाठी कार्यशाळा घेत आहेत...प्रात्यक्षिके देत आहेत...प्रबोधन करत आहेत.



सध्या वसंतराव स्थानिक वाणांची पण उत्तम उतारा देवू शकतील अशा बियाण्यांची महाब्यंक बनवण्याच्या अवाढव्य प्रयत्नांना लागलेही आहेत. हे कार्य देशव्यापी स्वरुपावर सुरु असून या बीज-ब्यंकेमुळे शेतक-यांना बीजौत्पादक कंपन्यांवर भविष्यात कधीही अवलंबुन रहावे लागणार नाही, स्वत:चे बियाणे स्वत:लाच निर्माण करता येईल असा या उभयतांना विश्वास आहे. सध्या देशी वाणांची व विविध प्रकारची बियाणी उपलब्ध करणे सोपे उरलेले नाही. अनेक भागांतुन अनेक प्रकारची परंपरागत बियाणी पुरेपुर नष्ट झालेली आहेत. हायब्रीड अथवा जनुकिय बियाणी नवीन बियाण्यांचे पुनरुत्पादन करु शकत नाहीत. ते काम फक्त पारंपारिक/नैसर्गिक बियाणी करु शकतात. कारण ती शाश्वत व अविनाशी आहेत.

आता ही बियाणी मिळतात ती आदिवासी शेतक-यांकडुन अथवा दुर्गम भागांतील शेतक-यांकडुन अथवा अल्प प्रमाणात का होईना गांवरान वाण करतात त्यांच्याकडुन. ती सर्व बियाणी एकत्र करत कोठे कोणते बियाणे अनुकुल असेल व अधिक उत्पादकताही देवु शकेल यावर प्रयोग करुन अवाढव्य बीज-ब्यंक निर्माण केली जानार आहे.

या क्रांतीचा भवितव्यातील धोका लक्षात घेतलेल्या विदेशी बियाणी बनवणा-या कंपन्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. त्याचे पडसाद वर्धा जिल्यातील शाश्वत शेती करणा-या काही शेतक-यांना मिळालेल्या धमक्यांत उमटत आहेत.

विदेशी बीजकंपन्या शेतक-यांना पुर्णपणे परावलंबी करत आहेत. दरवर्षी भाव वाढवत शेतक-यांची लूट करत आहेत. एके दिवशी भारतीय शेतीचे संपुर्ण नियंत्रणच त्यांच्या हाती जाण्याचा धोका आताच निर्माण झालेला आहे. या शाश्वत शेतीपद्धतीने आणि बीजब्यंकेमुळे शेतकरी खरा स्वावलंबी "बळीराजा" बनु शकणार आहे.

भारतीय शेतक-याची मानसिकता बदलता येणे सोपे नसते याची उभयतांना ३१ वर्षांच्या अनुभवांतुन कल्पना आली आहे. पण पहाड फोडुन कोट्यावधी शेतक-यांपैकी काही हजार शेतकरी तरी आता प्रत्यक्ष शाश्वत शेतीत उतरत शाश्वत जीवनाचा मार्ग अंगिकारु लागले आहेत ही एक अभिनंदनास्पद उपलब्धी आहे. प्रसिद्धीच्या झोतात न येण्याचे फायदे हेच कि मुख्य उद्देशापासुन, ध्येयापासुन लक्ष विचलित होत नाही. म. गांधीजींचे परम शिष्य विनोबाजींच्या तालमीत तयार झालेल्या करुणाताईंना अन्य कोणत्या आदर्शाची वा व्यक्तिगत आकांक्षेची मोहिनी पडणे शक्य नव्हते. तसे कधीही झाले नाही. आजही करुणाताई व वसंतरावांचे पवनार आश्रमाशी असलेले नाते सुटलेले नाही. आजही ते तेथे कार्यरत असतात. वर्धा जिल्ह्यातही त्यांचे कार्य फोफावलेले आहे. आज विद्रभातच नव्हे तर देशभरात त्यांचे कार्य शेतक-यांत नावाजले जात आहे. वैदर्भियांमद्धे अर्थातच या दांपत्याबद्दल मोठा आदर आहे. करुणाताईंना तर सर्वत्र "विदर्भकन्या" म्हणुनच ओळखले जाते. हाच खरा सन्मान...!

हे एक विलक्षण, एकरुप-एकध्येय असलेले, स्वप्न साकार करण्यासाठी खांद्याला खांदा लावुन बरोबरीने आयुष्य पणाला लावणारे शाश्वत दांपत्य आहे. अशी दांपत्ये या यच्चयावत विश्वात असतील तरी किती? कोणालाही आदर्शभुत ठरावे असे त्यांचे दांपत्यजीवनही आहे.

शाश्वत शेती आणि शाश्वत जीवन ही आजच्या शेतक-यासमोरील स्वप्ने असायला हवीत. शहरी लोकांनाही शाश्वत जीवनशैलीचे मोल समजणे तेवढेच आवश्यक आहे. गरजा किमान करत नेत, मानवी संबंधांना दृढमुल करणारी जीवनशैली म्हणजे शाश्वत जीवनशैली. ही जीवनशैली प्रत्यक्ष जगणे किती सुंदर व अनोखी गोष्ट असते हे फुटाणे दांपत्याच्या जीवनावरुन लक्षात येते. आज आपण मात्र अशाश्वताच्या हव्यासापायी काय करत चाललो आहोत, कोठे चाललो आहोत यावर सर्वांनीच आत्ममग्न होत चिंतन करायला हवे...

बदलायला हवे.

-संपर्क:
सौ. करुणाताई व वसंतराव फुटाणे,
रवाळा, पोस्ट सावनूर,
ता. वरुड, जि. अमरावती
फो.-०७२२९-२३८१७१
    ०७२२९-२०२१४७

5 comments:

  1. wah..thank you Mr. Sonawani, thank you very much. An eye opener.

    ReplyDelete
  2. WOW WHAT A BLOG!!!!!
    IT HAS HELPED ME A LOT IN PREPARING MY COLLEGE PROJECT OF ENVIOURMENTAL SCIENCE.

    ReplyDelete
  3. Wow so briliant & i am proud of you

    ReplyDelete
  4. Inspired.. हेच खरे जीवन!
    आम्हीही असेच जगू पाहतोय.

    ReplyDelete
  5. Please give me a proper contact no.if any one possible .its humble request to sir.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...