Saturday, October 6, 2012

तणावरहित पैसा





पैसा आणि तणाव याचे निकटचे नाते असल्याचे आपण दैनंदिन व्यवहारात नेहमीच पाहतो. म्हणजे पैसा अपुरा असला तरी तणाव आणि अतिरिक्त झाला तरी त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याचा तणाव. शिवाय मुळात पैसा किती असला म्हणजे तो पुरेसा असतो याबाबत सर्वच संभ्रमित असतात. त्याची काही ठोस अशी मानसिक व्याख्या नाही. कितीही पैसा आला तरी तो कमीच वातणे हा एक मानवी स्वभाव झाला. हा स्वभाव काही आजचा नाही. वेदांतही म्हटले आहे कि एकपट धन असलेला दुप्पट धनाची तर दुप्पट धन असलेला चौपट धनाची अपेक्षा बाळगतो. सर्वच धर्मग्रंथांत अतिलोभ असू नये, अधिकची हाव धरु नये, वाममार्गाने धन मिळवू नये अशी आज्ञात्मक विधाने असतातच...पण गंमत म्हणजे स्वत: धर्मसंस्थाही अंतत: धन जमा करण्याच्याच मागे लागलेल्या दिसतात. हिंदू मंदिरांतील अचाट संपत्ती असो कि व्ह्यटिकनकडे जगभरातुन वाहता संपत्तीचा प्रचंड ओघ असो. हा ओघ थांबावा असे धर्मसंस्थांनाही वाटत नाही. मग सामान्य माणसाचे काय?

पैसा आणि सुख यांत नेमका काय संबंध आहे? मी माझ्या गतायुष्याकडे जेंव्हा वळुन पहातो तेंव्हा एक लक्षात येते. मी मोलमजुरी करुन माझे व घराचे पोट भरायचो तेंव्हाची स्थिती आणि माझी स्वत:ची नेटवर्थ २७५ कोटी रुपये झाली या वेळची स्थिती...या दोन्ही स्थितींत मी नेमका कोठे सुखी होतो? मी व्यवसायात फटक्यामागुन फटके खाल्ल्याने माझी नेटवर्थ उणे तीन कोटी झाली तेंव्हा मी कोणत्या मन:स्थितीत होतो?

आणि आज सावरत असतांना मला पैशांबद्दल नेमके काय वाटते?

खरे सांगायचे तर काहीच वाटत नाही.

एक उदाहरण देतो. मी पुण्यात शिकायला १९८३ साली आलो तेंव्हा माझ्या खिशात फक्त ५ रुपये होते. पुण्यात येताच लगोलग पत्रकाराची नोकरी पत्करली महिना दिडशे रुपयांची. पुण्यात त्यावेळी खानावळीचा मासिक दर असे अडिचशे ते तिनशे रुपये. मी एक वेळ खायची सवय लावुन घेतली...ती पार अलीकडे पर्यंत टिकली. मी १९८५ पासुन विविध व्यवसायांत पडलो. १९९५ पासुन कोट्याधिशांच्या यादीत मी गेलो. वयाच्या तिशीत दोन लिस्टेड कंपन्यांचा संस्थापक-मालक बनलो. दाही दिशांनी पैसा अक्षरश: स्वत:हुन वाहत येत होता. मी एकामागुन एक नवी कंपनी स्थापन करत चाललो होतो. काश्मिरमद्धे, लेहमध्ये, पार अरुणाचल प्रदेशात...नक्षलवादी गडचिरोलीत तर कारखाना होताच!

हेतू काय? साधा हेतु होता. उद्योजकाचे कर्तव्य नुसते नफा मिलवायचे नसते. रोजगार काय...तो आपसुक निर्माण होतोच! पण जेथे कोणी जात नाही...कोणीच जात नसल्याने त्या भागांचा आर्थिक विकासच होत नाही, विकास झाला नाही तर दरिद्र समाज विध्वंसकतेकडे झुकु लागतो. काश्मिरमधील असो कि पुर्वोत्तर राज्यांतील दहशतवाद...तेथे उद्योगधंद्यांची पराकोटीची वानवा दहशतवादाचे सर्वात महत्वाचे कारण आहे हे माझ्या लक्षात १९९३ सालीच आले होते. फारुक अब्दुला असोत कि शिवांग थुप्स्तन...सर्वांशी मी याबाबतच चर्चा करत आलो होतो. अब्दुल्लांना ते पटलेही होते. त्यांनी मुंबईत येवून महत्वाच्या औद्योगिक घराण्यांच्या प्रतिनिधींची एकदिवसीय बैठकही घेतली होती. प्रत्यक्षात प्रयत्न करनारा मी एकटाच निघालो. अणि अब्दुल्लांनीच महाराष्ट्रातील एका मान्यवर महान नेत्याला मे भेटुन आशिर्वाद मागितले नाहीत म्हणुन पत्ताही कट केला. काश्मीर टाईम्सने माझी विस्ट्रुत मुलाखतही याबाबत प्रसिद्ध केली होती. असो. आजही माझी भावना आहे कि अधिकाधिक उद्योग या सीमावर्ती प्रदेशांतच निघावेत...फुटीरतावाद थांबवायचा असेल तर आर्थिक सुरक्षा हे आणि नेमके हेच योग्य उत्तर आहे.

असो. माझ्याकडे पैशांचा ओघ चांगला होता, देशविदेशांत आमची उत्पादने विकली जात होती. नवनवीन कल्पना घेत मी नवनव्या कंपन्या काढत होतो. पण का कोणासठाऊक, येणा-या पैशातील काही पैसा स्वत:च्या सुरक्षिततेसाठी गुंतवावा, जमीनी घ्याव्या, शेयर्स घ्यावेत...असे मला कधी वाटलेच नाही. तो माझा महामुर्खपणा होता असं माझे मित्र मला आताही म्हणतात. पण मला खंत वाटत नाही. माझी खरी नेटवर्थ पाच रुपयेच आहे याची जाण कधी सुटली नाही. आजही ती सुटलेली नाही.

तणावरहित पैसा असू शकतो काय? होय. माझ्या मते तणावरहित पैसा सहज असू शकतो. सहजपणे मिळवता येवू शकतो. समजा हाव असली तरी पैसा तणावरहित असू शकतो.

हे अशक्य वाटेल वरकरणी, पण ते तसे नाहीय.

प्रथम आपण पैशांचा अभाव म्हनजे नेमके काय हे पाहुयात. किती पैसा पुरेसा आहे याचे गणित नाही याचे कारण अनुकरनातुन, नक्कलेतुन, आपण आपल्या जीवनशैलीच्या कल्पना घडवत असतो. म्हणजे हजार रुपयाचे साधे मोबाईल इंस्ट्रुमेंट काल करण्यासाठी व घेण्यासाठी पुरेसे असले तरी कृत्रीम जाहिरातींच्या दबावाखाली हाय-फाय इंस्ट्रुमेंट घेण्याची अकारण इच्छा होते...पण प्रत्यक्षात आपली जीवनशैली सुधारायला त्यचा काहीएक उपयोग नाही हे लक्षात घेतले जात नाही. भारतातील मानसिकतेची एक गम्मत आहे. सर्वप्रथम भारतात मोबाईल आले तेंव्हा त्या कंपन्यांची अपेक्षा होती कि डाक्टर-वकील हे आपले सर्वप्रथम ग्राहक बनतील....झाले उलटेच...ज्यांचे खरे तर मोबाईलशिवाय काही अडु शकत नव्हते असेच मोबाईलमागे धावले. आजची हायस्ट व्हर्जन्स घेणारे उद्योजक नाहीत...तर हे मध्यमवर्गीय आहेत. या हायर व्हर्जन्सनी त्यांची कार्यक्षमता मुळीच वाढलेली नाही...उलट घटलेली आहे. कारण त्या अभिनव सुविधांचा वापर टाईमपाससाठीच अधिक होतो आहे. खरे तर हे एकुणातील राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

हे एक उदाहरण झाले. पैशांचा अभाव तेंव्हाच जाणवतो जेंव्हा गरज नसलेल्या गरजांचा हव्यास असतो. उपयुक्ततेपेक्षा स्टेटस सिंबोल म्हणुन एखादी वस्तू घेतली जाते तेंव्हा पैशांचा अभाव जाणवने सहज स्वाभाविक आहे. एका थिकाणावरुन दुस-या ठिकानी व्यवस्थित नेणे हे जर दुचाकी असो कि चारचाकी, वाहनाकडुनची अपेक्षा असेल तर अकारण अमुकच कंपनी---तमुकच मोडेल यांचा हव्यासही तसाच निरर्थक असतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडली ती आमदनी चवन्नी खर्चा रुपैया...भारतीय अर्थव्यवस्था आज नाही तर उद्या याच मार्गावर जाणार याचे दुश्चिन्हे आताच दिसत आहेत.

हस्तीमलजी फिरोदिया १९९७ साली माझ्या एका कारखान्याचे भूमीपुजन करायला जेजुरी एम-आय.डी.सी.त आले होते. वाटेत मी त्यांना प्रश्न विचारला होता..." भारतीय उद्योग एवढे वर्षे झाली तरी येथीलच बाजारपेठेत अजून का रेंगाळत आहेत? विदेशात जावे तेथे आपली उत्पादने एस्ट्यब्लिश करावीत असे का होत नाही?" हस्तीमलजी यावर म्हनाले होते, ज्यांना हाव आहे त्यांनी ते करावे. तसेही जागतिकीकरण आलेलेच आहे. पण गांधीजींच्या तत्वज्ञानाचा आमच्या परिवारावर पगडा आहे. कोठे थांबायचे हे आम्हाला चांगलेच माहित आहे. उद्योगाचा विस्तार किती मोठा असावा याचे भान नसले तर एक दिवस असे उद्योग स्वत:च्याच ओझ्याखाली चिरडुन जातात."

तेंव्हा मी फारच महत्वाकांक्षी होतो. पार अमेरिकेत सायटेक आयेन्सी ही कंपनीही स्थापन केली होती...अगदी भारतीय रेस्टारंटसची चेन सुरु करण्याच्याही बेतात होतो...त्यामुळे मला हस्तीमलजी जुनाट मताचे पुराणपंथी वाटले होते हेही खरे आहे. पण आज मागे वळुन पहाता लक्षात येते कि हस्तीमलजींनी एक वैश्विक सत्य सांगितले होते, जे आज सर्वांनाच लागु आहे.

म्हणजे खरे तर पैसा हा तनावाचे कारण असतो हे जेवढे खरे आहे त्यापेक्षा खरे हे आहे कि पैशांची नेमकी गरज आपल्याला कधीही मोजता येत नाही यामुळेच पैसा हा तनावाचे कारण बनतो हे अधिक खरे आहे. पैसा हे कर्तुत्वाचे दृष्य मूल्य आहे असे आयन -यंड त्यांच्या कादंब-यांतुन मांडत आल्या आहेत. खरे तर माझ्या पिढीचे असंख्य उद्योजक ते वित्तसल्लागार तिच्या तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली होते. टोकाचा भांडवलवाद हे तिच्या तत्वज्ञानाचे मुलभूत वैशिष्ट्य. रशियासारख्या तत्कालीन साम्यवादी विचारव्युहातुन बाहेर पडतांना कदाचित ही अतिरेकी विचारसरणी जन्माला आलेली असावी. आपल्या मानसिकतेने गांधीवादी (किंवा समाजवादी म्हणा) विचारांतुन बाहेर पडण्यासाठी ही विचारसरणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वीकारली हेही एक वास्तव आहे. पण त्यातील "कर्तुत्व" हा भाग सोयिस्कररित्या विसरला गेला. पैसा हवा हे खरे, पण त्याची मर्यादा कर्तुत्वसापेक्ष राहिली नाही. कर्तुत्वाने तसे सोमेगोमेही अब्जाधीश होवू लागले. इतके कि कर्तुत्ववानांनाही न्यूनगंड चढावा. लोकांचे बळी गेले तरी चालतील, पण पैसा हवा या हव्यासाने आपण अनेक गंभीर सामाजिक सुरक्षितताच संकटात आणुन ठेवल्या आहेत.

कसा असतो तणावरहित पैसा? काय मापदंड आहेत तणावरहित पैशाचे?

भविष्यातील असुरक्षितता हे गरजेपेक्षा अधिक पैसा मिळवण्याचे व संचय करण्याचे एक कारण मानले जाते. त्यात तथ्यही आहे. पण किती? याचा कहीक मापदंड नसतो हेही तेवढेच खरे आहे. मुळात सुनिश्चित असे भवितव्य कशाचेच...अगदी पैशांचेही नसते. कालच्या रुपयाची किंमत पुढच्या दिवशी काय असेल याचे निश्चित भकित करता येत नाही. डा. दत्तप्रसाद दाभोळकरांनी "ना डावं ना उजवं" या पुस्तकतील रशियावरील "लाल ता-याकडुन धुक्याकडॆ" या वाचायलाच हवा अशा रशियावरील लेखात यावर अप्रतिम भाष्य केलेलं आहे. एके काळचा बलाढ्य रशिया रुबल घसरल्यावर कोणत्या दयनीय स्थितीत येतो? अलीकडेच ग्रीसचे काय झाले? दोनच वर्षांपुर्वी अमेरिकेची अवस्था काय होती? गुंतवणुकींचे मोल एकाएकी शुण्य कसे होवून जाते? जर पैशाचेच भवितव्य स्थिर नसेल तर मग भावी आयुष्यातील असुरक्षिततेला पैसा कितपत कामाला येवू शकतो? भावी पिढ्यांसाठी कमवायचे असा "दूरदृष्टीचा" विचार करतात त्यांची तर मला कीवच वाटते. एक तर त्यांचा आपल्या भावी पिढ्यांवर मुळात विश्वासच नसतो अथवा पुढील पिढ्या ऐदी बनाव्यात असाच त्यांचा सुविचार असतो.

म्हणजे गुंतवणुक-बचत महत्वाची नाही असे नाही. परंतु ती करण्यासाठी कमवायचे किती? कसे? यावर विचार करणे तेवढेच आवश्यक आहे. पैसे अधिकाधिक कमवण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वातील काय काय आणि किती गमवायचे याचाही विचार करावा लागतो. आपण जो पैसा कमावतो आहोत तो आपल्या योग्यतेच्या प्रमानात आहे कि अधिकचा याचाही निरपेक्षपणे विचार करावा लागतो. पैसा खर्च करतांनाही आपण ज्यामुळे अडत नाही अशा निरर्थक पण स्टेटस देणा-या गोष्टींवर तर खर्च करत नाही ना हेही पहावे लागते.

पैसा कमी असो कि अधिक, तो त्रासदायक, तणावदायक तेंव्हाच ठरतो जेंव्हा पैसा कमवण्यामागील उद्देश निकोप नसतो. मनुष्य हा मुळात निसर्गत: कोणत्याही परिस्थितीशी जुळवुन घेवू शकेल एवढा लवचिक बनवला गेला आहे. परिस्थिती हवी तशी बनवुन घेण्याचेही निसर्गदत्त सामर्थ्य त्याला लाभलेले आहे. दुस-यापेक्षा मोठा व्हायची स्पर्धात्मकता त्याला अनेकदा अडचणीत आणते. स्वत:च्या ताटात काय वाढलेले आहे यापेक्षा दुस-याच्याच ताटात डोकावुन बघत असूयाग्रस्त होण्याचा त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. जग स्पर्धात्मक आहे असा आपला भ्रम आहे. ते खरे नाही. जग स्पर्धात्मक असेल तर ते आपण कृत्रीमरित्या तसे बनवले आहे. प्रत्येक व्यक्ति ही स्वतंत्र नैसर्गिक वैशिष्ट्यांनी परिपुर्ण असते. स्पर्धा असलीच तर फक्त स्वत:शी असते. अन्यथा बाह्य स्पर्धा कृत्रीम व एवतेव त्याज्ज्य आहेत. स्पर्धा माणसाला अनैसर्गिक बनवते. आणि म्हणुणच ती तणावाचे मुळ कारण असते. कोण मागे आहे कोण पुढे या सा-या सापेक्ष बाबी आहेत हे आपण लक्षात घेत नाही...म्हणुणच आपण तणावरहित पैसा मिळवुही शकत नाही.

पैसा तनावरहित असु शकतो...नव्हे त्याचे तनावरहित असने हेच त्याचे असण्याचे खरे लक्षण आहे. अर्थाचा पुरुष नव्हे तर पुरुषाचा अर्थ दास असतो. पैशाला दास बनवत सुखी जीवन जगायचे कि पैशाचा दास बनुन तणावसहितचे जीवन जगायचे...निवड आपल्या हातात आहे!

8 comments:

  1. फारच चांगला लेख. अति पैसा मिळवणे जसे वाईट तसे गरजेपुरता पैसा न मिळवणे हेही वाईटच. पण आपल्या येथील धर्म संस्थांनी पैसे मिळवणे वाईट म्हणत प्रचंड प्रमाणात पैसा गोळा करण्याचे काम केले आहे.

    ReplyDelete
  2. nath_revolt@yahoo.comOctober 6, 2012 at 9:43 AM

    GREAT ARTICLE SIR...

    ReplyDelete
  3. Paisha Sarkhya vishayavar khup chan lihile ahe. parantu apanala anakhihi kahi sangayche ahe ase sata vatat rahate, sanjayji paisa ani samajkaran yaatla tumacha adhikar motha ahe teva amhalahi aplya anubhavacha upyog houdya jara anakhi vistrutpane lekh lihit ja.

    ReplyDelete
  4. तणावरहित पैसा
    अनेकांसाठी नवीन विषय आहे.मांडणी पण छान आहे.
    आयन रयांड हि तुम्ही म्हणता तशी पूर्ण भांडवलशाहीची पुरस्कर्ती होती.पैसा हे कर्तुत्वाचे दृश्य मूल्य आहे.हे तिचे मत
    आहे.आपण बोली भाषेत असे म्हणू शकतो कि पैसा हा साईड इफेक्ट आहे.अट्लास श्रग्ड या कादंबरीतील
    मिस दाग्नी त्रागार्त,आणि तिचा भाऊ जोन त्रागार्त यांच्यातील वाद आठवला कि असे म्हणावेसे वाटते कि तो मुक्त भांडवलशाही आणि
    प्रोतेक्षनिझ्म यांच्या मधील वाद होता.जोन गाल्ट चा मार्ग हे त्या प्रोतेक्षनिझ्म ला दिलेले तडाखेबंद उत्तर आहे.
    सर्व भांडवलदारांनी संपावर जाणे,त्या खोल दरीत नंतर स्वतःचे उद्योग उभारणे हे फार थरारक आणि कधीही न कल्पलेले असे होते.
    -अमेरिकन अध्यक्षाचे भाषण बंद पाडून - त्या नंतर जोन गाल्टने दिलेले भाषण -चित्त थरारक असेच होते.तिने स्वतःचे विचारच -
    तिचे तत्वज्ञानच पात्रांकरवी मांडले आहे.
    रियरडन हा उत्तम पोलादासाठी धडपडत असतो.आणि मिस त्रागार्त हि मजबूत पल्ल्याची रेल्वे लाईन टाकायचा विचार करत असते.
    त्यांच्या स्वप्नात - फक्त एक ध्येय आणि त्याच्या पूर्तते साठी केलेले अखंड श्रम असा तो कालखंड अक्षरशः वेड लावून जातो.
    जोन गाल्ट हे पात्र म्हणजे इतके सुंदर आहे कि नुसत्या आठवणीने माणूस खलास होतो.दुसरे शब्दच नाहीत.
    असो.
    बऱ्याच दिवसांनी आपल्या लेखनामुळे त्या सगळ्याची आठवण झाली.आणि मग आयन रयांड ची विडीयो मुलाखत परत पाहिली.
    " विनोद करणे " या मानवी उपजत गरजेची तिने केलेली त्या मुलाखतीतील निर्भत्सना मात्र डोक्यावरून गेली.
    असो.
    जाता जाता विनंती कि आपण वेळात वेळ काढून शी.भालचंद्र नेमाडे यांचे " निवडक मुलाखती " वाचावे. त्यातील सुमेध वडावाला यांनी त्यांची घेतलेली मुलाखत
    आपल्या चालू विषयाशी संबंधीत आहे.
    पुढच्या लेखाची उत्कंठेने वात बघणे इतकेच हातात आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  5. संजय सोनवणी,
    आपण हल्ली १-२ महिन्यांपासून वेगवेगळे विषय ल्कांपुढे आणत आहात.
    अभिनंदन!
    ब्लोग लिहिताना आपण एक विशिष्ठ भूमिका ठरवून विषय निवडता का ?
    कारण जातींचा इतिहास,त्यांचा उगम इत्यादी आपले जिव्हाळ्याचे विषय असावेसे वाटते,
    आपणास विनंती करावीशी वाटते की
    आपण खालील विषयांवर पण लिहावे,कारण आपणच सुलभपणे लोकांसमोर काही पूर्वासुरींचे विचार , तत्वज्ञान मांडू शकाल !

    १) भारत हा खरोखरीच एक देश आहे का ? त्याचे श्रेय कोणाला जाते ? आपली तथाकथित हिंदू संस्कृती , का ब्रिटीश सत्ता

    २) निरीश्वर वाद - चार्वाक. आणि लोकायत तत्वज्ञान .आणि सांख्य , द्वैत , अद्वैत तत्वज्ञान
    चार्वाक याचे तत्वज्ञान - सांख्य -बुद्ध - जैन यांना जवळचे आहे का ?
    चार्वाक पाप पुण्य मानत नाही , कारण ते मानले की तुमच्या गरीबीचे ,कारण तुमचे पूर्व सुकृत , मग आपोआप पुनर्जन्म आला , स्वर्ग नरक आले .
    चार्वाक सामाजिक बांधिलकी मानतो का ?

    ३) दशावतार आणि मत्स्य ,कूर्म , वराह इ.अवतार कल्पना कधी जन्माला आली ? ती उत्क्रांतीविषयी आपणास काही सांगते का ?

    ४) बंगाली , पंजाबी , काश्मिरी या इतक्या प्रबाल भाषिक संस्कृती आहेत की त्यांची जर फाळणी झाली / केली नसती तर ,
    ते स्वतंत्र देश म्हणून जगासमोर यशस्वीपणे येऊ शकतात,म्हणून ब्रिटीश असतानाच त्यांची फाळणी झाली.किंवा लगेचच्या काळात म्हणूया .
    भारत आणि पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी अशी फाळणी आवश्यकच होती.नाहीतर स्वतंत्र बंगाल , पंजाब , काश्मीर असे धार्माधीस्तीत नव्हे
    तर प्रांतीय संस्कृतीच्या आधारावर भारतात ४-५ भारत निर्माण झाले असते -

    ५) भारत हा एक देश नसला तरी नवीन येऊ घातलेल्या जागतिक रचनेत तो तसं असणे हे भांडवलदारांना सोयीचे जाईल ,
    आणि केवळ म्हणून त्याचा एकसंध पणा टिकवला जाईल , जोपासला जाईल - त्यात प्रत्यक्ष भारतीयांचे किंवा भारतीय संस्कृतीचे काहीच क्रेडीट नसेल !
    एक एकसंध बाजारपेठ हाच काय तो कौतुकाचा विषय !
    असे बरेच विषय हाताळणे गरजेचे आहे. आपल्याकडे पण खूप सखोल विचार होत होते , हे समाजासमोर येणे महत्वाचे आहे.

    ReplyDelete
  6. Sir, I don't completely agree with what has been suggested in this article. Entrepreneurs do not strive for money. They want to create a product, a brand and money is only a side effect. And as you have experienced yourself sometimes get carried away and take too much risk. But they often bounce back as you have done it. And once you have a great product it's quite but natural to want to sell it to the entire world.
    Gandhian economics was based on minimalistic principle but in the real world it doesn't work. Many of our Indian industrialists were either influenced or contained with the Indian Market.Which kind of created saturation and was primarily responsible for the so called Hindu rate of Growth. Whereas in the West they strive to conquer the
    world.
    Wealth per se is not bad. Lot of great Entrepreneurs are also great Philantropists. We have to be ambitious but also be humane. Gandhian economics sadly makes people apologists for there success.
    Your thought?

    ReplyDelete
  7. खुपच छान लिहील आहे सर् तुम्ही ...माणसाच्या मर्यादित अपेक्षा +(आणि) समाधान = तणावरहित पैसा , उदाहरनार्थ असा हा लेख,,,,,,,,,,

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...