जाती नष्ट करायचे प्रयत्न अयशस्वी का ठरले?
जातिसंस्था हे हिंदुंच्या अध:पतनाचे, अन्याय्यपुर्ण समाजरचनेचे आणि शोषणाचे प्रमूख कारण आहे म्हणुन ती उध्वस्त केली पाहिजे असे आजवरच्या सर्वच पुरोगामी विचारवंतांनी म्हटले आहे. जातिसंस्था नष्ट करण्यासाठी गौतम बुद्धापासुन ते मध्ययुगीन असंख्य संतांनी प्रयत्न केले आहेत असेही आपण वाचत असतो. आधुनिक काळात महात्मा फुले, महर्षि शिंदे, डा. बाबासाहेब आंबेडकर,
सावरकर ई. असंख्य विचारवंतांनी व समाजधुरिणांनी जातिसंस्थेवर कठोर प्रहार केले आहेत व त्यातील अनेकांनी जात्युच्छेदनासाठी अविरत प्रयत्नही केले आहेत असेही आपण पहातो. पण प्रत्यक्षात जातिसंस्था नष्ट होण्याऐवजी दिवसेंदिवस जातीय जाणीवा, नेणीवा व प्रेरणा अधिक टोकदार-धारदार होत चालल्याचे आपण पहातो आहोत. असे जर होत असेल तर एक तर जातिसंस्थेबाबतची विद्वानांची मते गफलतपुर्ण तरी आहेत अथवा भारतीय समाज आजही इतका मतिमंद आहे कि त्याला जातीय जाणीवा जोपासण्यात आपला विनाश आहे हे समजत नाही किंवा जातिसंस्था टिकून राहणे त्याला आपल्या ऐहिक (व कदाचित पारमार्थिकही) हिताचे आहे असे वाटत असावे. आज प्रत्येक जातीच्या व पोटजातींच्याही संघटना आहेत, प्रत्येक संघटना आपापल्या जातीत जन्मलेल्या संतांची व महामानवांची तळी उचलत जातीअंतर्गत विवाहांसाठी वधु-वर मेळावे घेत असतांना आपण पहात आहोत. प्रत्येक जात आपापल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक मागण्यांसाठी पुढे सरसावत आहे असेही आपण पहातो. राजकारणात आज जात ही कधी नव्हे एवढ्या कळीचा मुद्दा बनली आहे. साहित्यक्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. जातनिहाय साहित्यसंमेलने होत आहेत. समिक्षक शक्यतो स्व-जातनिहाय साहित्याचीच समीक्षा करतांना दिसत आहेत. स्वजातियांचे कसेही असले तरी स्वीकारायचे आणि अन्यजातियांचे धिक्कारायचे अथवा दुर्लक्षीत ठेवायचे ही प्रवृत्ती एकविसाव्या शतकात कळसाला पोहोचली आहे. गेल्या शतकापासून ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी एवढ्यापुरताच हा सूप्त संघर्ष मर्यादित राहिलेला नसून तो जाती-विरुद्ध-जाती असा बनल्याचे वास्तव वाढत चालले आहे.
असे का होते आहे? जातिव्यवस्था जर एवढी दोषपुर्ण आहे तर जातीय जाणीवा हे समजावून सांगितल्यानंतरही का तीव्र होताहेत? का कथित पुरोगामीही शक्यतो स्वजातीतच व तेही ब्राह्मण बोलावून लग्न लावत आहेत? जाती अंत करणारी कोणतीही चळवळ अत्यंत अत्यल्प परिघातच का यशस्वी झाली आहे? पुरोगाम्यांची वैचारिकता समाजाच्या मनाशी पोहोचण्यात अपेशी ठरत आहे कि मुळात पुरोगाम्यांची व्युहनीतीच समूळ चुकीची आहे? ब्राह्मणी व्यवस्थेने लादलेली जातीयव्यवस्था अन्याय्य आहे हे खरे मानले तर मग खुद्द ब्राह्मणही या जातीव्यवस्थेचे साडेपाचशे भागात तुटलेले जात घटक कसे बनले आहेत? त्यांच्यातही आपसात भेदाभेद का आहे?
जगातील कोणताही समाज स्वत:च्या मानसिकतेला रुचेल अशी व्यवस्था बनवतो व तशाच व्यवस्थेत राहणे पसंत करतो. ज्या क्षणी व्यवस्था चुकीची अथवा अन्याय्य वाटु लागते तेंव्हा तो ती व्यवस्था बदलतो व नव्या व्यवस्थेचे अनुसरण करू लागतो. आज आपण घटनात्मक लोकशाही असलेल्या देशात रहातो. घटनेच्या चौकटीतच आपले जीवनव्यवहार असावेत अशी अपेक्षाच नव्हे तर सक्ती आहे. जातीभेद घटनेला मान्य नाहीत. स्वातंत्र्य, समता व बंधुता या उच्च मूल्यांचा पुरस्कार घटना करते. तरीही विषमतेचे मूळ असलेले जातीभेद कमी न होता वाढत आहेत...फक्त या भेदांचे व्यावहारीक रुप काही प्रमाणात बदलले आहे एवढेच.
मला वाटते कोठेतरी गंभीर गफलत झालेली आहे. त्यावर आपल्याला जातीविशिष्ट दृष्टीकोनातुन विचार करुन भागणार नाही. जातिनिर्मुलनाचे आजवर झालेले प्रयत्न व त्यांचे यशापयशही आपल्याला पाहिले पाहिजे.
भगवान बुद्ध
भगवान बुद्ध हा जातीसंस्थेवर प्रहार करणारा, जातीभेदातीत समाजरचना करू इच्छिणारा धर्मसंस्थापक होता अशी साधारण मान्यता आहे. पण आपण सारे हे विसरतो कि बुद्ध जातिसंस्थेबद्दल कोठेही बोलत नाही. त्याचा विरोध वर्णसंस्थेला आहे. जातिसंस्था व वर्णसंस्था या सर्वस्वी भिन्न बाबी आहेत हे आपण मागील लेखांत पाहिलेच आहे. गौतम बुद्ध तत्वत: विरोध करतो ते वर्णव्यवस्थेला.
"न जच्चा वसलो होति, न जच्चा होति ब्राह्मणो
कम्मना वसलो होति, कम्मणा होति ब्राह्मणो..
जन्माने कोणी चांडाळ अथवा ब्राह्मण होत नसून कर्मानेच कोणी ब्राह्मण अथवा चांडाळ होतो असे बुद्ध येथे सांगतो व ते वर्णव्यवस्थेच्या मूळ रुपाशी सुसंगतच आहे. पण बुद्ध जातिव्यवस्थेबाबत बोलत नाही कारण ती तेंव्हाही व अगदी दहाव्या शतकापर्यंत लवचिकच होती, समाजव्यवस्थेचे व्यंग नव्हते हे आपण पाहिले आहेच. व्यवहारातील वर्णव्यवस्था बुद्धाला मान्य होती व तो स्वत: खतिय (क्षत्रीय) व त्यातल्या त्यात शाक्यकुलीन असल्याचा अभिमान बाळगत असे. त्यामुळेच कि काय वर्णव्यवस्थेची उतरंड बुद्धाने ब्राह्मण-क्षत्रीय अशी न करता क्षत्रीयाला उच्च स्थानी बसवून केल्याचे स्पष्ट दिसते. प्रवज्जा घेतल्यानंतरच वर्णभेद मावळतो असे बौद्ध तत्वज्ञान आहे. समाजव्यवहारातील वर्णभेदाचे वास्तव त्याला मान्य आहे.
त्यामुळे बुद्ध हा जातिसंस्थेला विरोध करनारा होता असे म्हणने ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत चुकीचे आहे.
यानंतर आठव्या अथवा नवव्या शतकात लिहिले गेलेले वज्रसुचिकोपनिषदात जीव, देह, ज्ञान, कर्म अथवा धर्म यापैकी कशानेही ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व सिद्ध होत नाही असे उद्घोषित केले असले तरीही सर्व रोख वर्णव्यवस्थेकडेच आहे. जातिसंस्थेकडे नाही हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागते.
जातिसंस्थेवर हल्ले दिसतात ते सरळ मध्ययुगात. याचाच अर्थ असा होतो कि तोवर जाती अस्तित्वात असल्या तरी भेदाभेदाने कळस गाठला नव्हता. संतांनीच जातिंवर हल्ले सुरु केले. संत बसवेश्वर, नाथपंथीय, सिद्ध, हे जातिभेदांविरुद्ध स्पष्ट भुमिका घेतांना दिसतात. तीही अस्पृष्य जातींबाबत सहानुभुतीची तर ब्राह्मणीव्यवस्थेच्या विरोधी. अन्य जातींबाबतीतील भेदांबाबत कोणी संत बोलत नाही. मग बलुतेदार जातींत भेदभाव नव्हता कि काय? संतांनाही आपल्या जातींचा अभिमान का होता? तसेच तत्कालीन अस्पृष्यांना ज्ञानबंदी खरोखर होती काय हा प्रश्नही अनेक संतांबाबत उद्भवतो. तसे असते तर चोखा मेळा व त्याचे कुटुंबिय अभंग लिहु शकले असते काय? हा प्रश्न उद्धटपनाचा वाटेल पण त्याचे उत्तर प्रत्येकाने शोधले पाहिजे. जातीय दृष्टीकोनातून व एकांगी भुमिकेतून आपल्याला कसलेही उत्तर गवसायची संधी नाही.
तुकाराम म्हणतात "ज्याचा संग चित्ती...तुका म्हणे तो ते याती..." म्हणजे जातिसंस्था नष्ट व्हावी असा रोख तर नाही पण उलट अपवादात्मक संत वगळता व्यवहारातील जातीभेद त्यांनाही मान्यच होता असे चित्र दिसते. रामदासांनी तर उघडपणे अंत्यजांविरुद्ध व शुद्रांविरुद्ध भुमिका घेतलेली दिसते. ब्राह्मणविरोधी भुमिका कारु-नारु जातींची तर शूद्र-अस्पृष्यांविरुद्धची भुमिका ब्राह्मणी संतांची असे चित्र निर्माण झालेले दिसते ते सोळाव्या-सतराव्या शतकात. तत्पुर्वीच्या पाच-सहाशे वर्षांत रुजलेल्या जन्माधारीत जातीव्यवस्थेचे परस्पर संघर्षातून व वर्णीय श्रेणीबद्धता लादण्याच्या प्रयत्नांतुन निर्माण झालेल्या दोन्ही गटांच्या मानसिकता व तेंव्हाची व्यावहारिक वास्तवे या संतसाहित्यातून स्पष्ट होतात.
परंतु दोन्ही गट जातिअंताला अनुकुल होते असे विधान मात्र करता येत नाही. ब्राह्मण या व्यवस्थेचा लाभार्थी असल्याने ही व्यवस्था नष्ट करणे त्याला सोयीचे नव्हते असे विधानही सरसकटपणे करता येत नाही, कारण धर्मकार्यापलीकडे ब्राह्मणांशी अन्य जातीयांचा विशेष संबंधही येणार नाही अशी बंदिस्त चौकट आधीच निर्माण झालेली होती. ब्राह्मणांनी आपली जीवनशैली स्वतंत्रपणे बनवून त्या कोषात जगत स्वत:ला सर्वात आधी बंदिस्त करुन घेतले होते व त्यांच्या अनुकरणातून अन्य जातीयांनीही स्वत:ला बंदिस्त करायला सुरुवात केली असे डा. आंबेडकर आपल्या "CASTES IN INDIA : Their Mechanism, Genesis and Development" या प्रबंधात म्हणतात. प्रत्येक बंदिस्त जातींची स्वतंत्र जीवनशैली यातून विकसीत झाली असे म्हटले तर प्रश्न असा उद्भवतो कि ब्राह्मणांनी आपल्याला बंदिस्त करण्याची सुरुवात का केली? वंशशुद्धता टिकवणे हे त्यामागे खासच कारण नव्हते कारण कोणताही वंश शुद्ध नाही हे ब्राह्मणांना महाभारतातील युधिष्ठीरवचनावरुन व पौराणिक साहित्यातुन माहित होतेच. त्यांची रचना करनारेही बव्हंशी ब्राह्मणच होते...आणि त्यासाठी (वंशशुद्धीसाठी) बंदिस्त केले म्हणावे तर बंदिस्त होण्याआधीची त्यांची सामाजिक स्थिती नेमकी काय होती हा प्रश्न पडतो. उत्तरादाखल म्हणता येईल कि त्याआधी वंशशुद्धी अस्तित्वात नव्हती व त्यांच्या अंतर्गत रचनेतही पुरेशी सैलता होती. अन्यथा नवनवीन ब्राह्मण जातीही अस्तित्वात आल्या नसत्या. असो.
थोडक्यात जातींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन इंग्रजी राजवट येईपर्यंत तरी अत्यंत वेगळा होता असे म्हणावे लागते. इंग्रजी राजवट येण्याआधीचे सामाजिक वास्तव दाखवेल असे संतसाहित्य व फुटकळ प्रबंध वगळता साहित्य आपल्याकडे जवळपास नाही. पण ते वास्तव कटु होते असे आपल्याला अनुमान काढता येते. यामागील कारणांची चर्चा आपण मागील लेखांत केली असल्याने येथे पुनरावृत्ती करत नाही, पण प्रत्येक जात हे एक स्वतंत्र राष्ट्र बनले होते एवढे मात्र पुन्हा नमूद करतो. दोन राष्ट्रांत जेही संघर्ष असू शकतात ते अस्तित्वात होतेच व आर्थिक पातळीवर अपवादात्मक समाज सोडले तर सारेच रसातळाला जावून पोहोचले होते. त्यातून परस्पर हीनभावना आणि द्वेष याची भर पडलेली दिसते.
इंग्रजी आमदनीत पाश्चात्य विचारसरण्यांशी संबंध आलेल्या नवशिक्षीत मंडळीला आपल्या समाजातील दोष दिसू लागले. ख्रिस्त्यांमधील तुलनेने अधिक असलेली सामाजिक एकात्मतेची भावना नव-विचारवंतांना आकर्षित करती झाली. एवढेच नव्हे तर अनेक उच्चजातीयांनी धर्मांतरेही केली. भारताची अवनतीचे मुख्य कारण जातीभेदप्रणित विषमता आहे म्हणुन ते नष्ट केले पाहिजेत अशी धारणा बनू लागली. परंतु असे लोक अत्यल्प होते. सतीबंदीचा कायदा करुन इंग्रजांनी हिंदू धर्मातील अनिष्ट परंपरेला तिलांजली द्यायला भाग पाडले असले तरी जातीव्यवस्थेबाबत इंग्रज उदासीन राहिले. उलट या संस्थेचा अभ्यास करुन आपली राजवट टिकवण्यासाठी तिचा अभ्यास करवून घेत तिचा उपयोग करुन घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. काही इंग्रजी वंशोद्भ्यासकांची (Ethenologists) मते आपण गेल्या प्रकरणात पाहिलीच आहेत.
जात्युच्छेदन हे विचारवंतांसमोरील एक ध्येय बनले तरी त्याला छेद देणा-या एका भयंकर सिद्धांताचा एकोणिसाव्या शतकात जन्म झाला आणि जात्युच्छेदनाची दिशाच भरकटली. तो सिद्धांत कधीच कालबाह्य झाला असला तरी अनेक ब्राह्मणी व अब्राह्मणी विचारवंत आजही त्या सिद्धांताचे बळी ठरले आहेत व त्यामुळे मुळात दोहो पक्षांची मुलभुत वैचारिक मांडणीच सदोष झाल्याने जात्युच्छेदन साधता येणे त्यांनाही साध्य झालेले नाही. काय होता हा सिद्धांत?
आर्य वंशवादाचा स्फोट: वैचारिकतेची फरफट
इंग्रजांना राज्य चालवण्यासाठी व प्रशासनासाठी येथील कुशल शिक्षीत मानवी श्रम हवे होते. ब्राह्मण वर्ग त्यात आघाडीवर असणार असा त्यांचा होरा होता व तो खराही झाला. इंग्रजी शिक्षणात अर्थात ब्राह्मण आघाडीवर होते. पाश्चात्य विचारांपुळे त्यांच्यात जशी सामाजिक जाणीव निर्माण झाली आहे तशीच उद्या राजकीय स्वातंत्र्याचीही जाणीव वाढीला लागेल हे इंग्रजांना कळत होते. त्यांना राजनिष्ठ ठेवण्यासाठी त्यांना अजून काही हवे होते...काहीही झाले तरी अखेर इंग्रज हे वेगळ्या संस्कृतीचे व वंशाचे लोक होते. एतद्देशीय पुढारलेल्या वर्गाला आपलेसे करता आले नाही तर येथे दीर्घकाळ राज्य करता येणार नाही हे त्यांना माहित होते. त्यांच्याशी एकात्मकता दाखवण्यासाठी इंग्रजांच्या कामी आला तो आर्य वंशवाद.
जर्मन पंडित म्यक्स मुल्लरने या आर्य सिद्धांताला मोठे बळ दिले. खरे तर त्याला "आर्य" हा शब्द वंश म्हणुन वापरायचा नव्हता तर एक इंडो-युरोपियन भाषिक गट म्हणुन वापरायचा होता. युरोपियन व संस्कृत भाषांतील काही साधर्म्यांवर आधारित हा एकभाषिक लोकांच्या मुळस्थानाबद्दलचा सिद्धांत होता. हे इंडो-युरोपियन भाषा बोलणारे कधीकाळी एका ठिकाणी वास्तव्यास असून पुढे ते भारत व युरोपात टोळ्या-टोळ्यांनी पसरले असे या सिद्धांताचे मुख्य प्रतिपादन होते. या सिद्धांतानुसार आर्य हे भारतावरील आद्य आक्रमक ठरत होते ज्यांनी येथील दास-दस्युंना पराजित करुन गुलाम केले. हे सर्व मुळचे गुलाम म्हणजे आजचे शूद्र जातीय. ब्राह्मण हे आर्यवंशीय. आद्य आक्रमक. या सिद्धांतामुळे एक मोठीच सांस्कृतीक उलथापालथ झाली. हा सिद्धांत इंग्रजांच्या फारच सोयीचा होता. कारण आता ब्राह्मणही त्यांचे पुरातन रक्ताचे बांधव ठरत होते...पण त्याचे वेळीस त्यांची एतद्देशीयांशीची नाळही तुटत होती. विष्णुशास्त्री चिपळुनकरही इंग्रजांना "आमचे पुरातन आर्य रक्ताचे बांधव" असे संबोधत असत. टिळकांनी "आर्क्टिक होम इन वेदाज" लिहून त्या सिद्धांतात भरच टाकली.
दरम्यान महात्मा फुलेंनीही याच सिद्धांताला स्वीकारुन "आर्यभट" या संकल्पनेचा ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करण्यासाठी वापर केला. आक्रमक आर्यांनी बलीस्थानावर आक्रमण करुन येथील दास-दस्युंना कपटाने हरवले असे सिद्धांतन त्यांनी केले. त्यावर आधारीत नवीन संघर्ष सुरु झाला. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला जातीय नव्हे तर वांशिक परिमाण लाभले. हा एक गंभीर धोका होता जो ब्राह्मणांनी वंशश्रेष्ठत्वाचे प्रमाणपत्र आयतेच मिळत असल्याने सहज स्वीकारला.
आर्य सिद्धांत चुकीचा होता खरे पण याच सिद्धांताचा आधारर घेत जर्मनीत आर्यवंशवादी हिटलर उदयाला आला. भारतात हिटलरचे समर्थक वाढले. आजही खूप आहेत. जातीय अहंभाव ठीक होता असे एक वेळ म्हणता येईल, परंतू वांशिक अहंकारामुळे जी एक विचित्र जातीय तेढ निर्माण झाली, ती जात्युच्छेदनाची दिशा बदलली. बराचसा जातीअंताचा लढा वांशिक पायाकडे झुकल्याने जात्युच्छेदनाचे तत्वज्ञानही बदलले व जातीनिर्मिती ही आक्रमक आर्य-ब्राह्मणांनी एतद्देशीयांवर निरंकुश सत्ता गाजवण्यासाठीच केली असे प्रतिपादन अट्टाग्रहाने होवू लागले. याची परिणती जातीनिर्मिती व तिचे व्यावहारिक वास्तव समजावून घेण्याकडे कल होत ती कशी नष्ट करता येईल इकडे प्रामुख्याने लक्ष जाण्याऐवजी ब्राह्मणद्वेषात झाली. कारण ते परकीय होते...आक्रमक होते व एतद्देशीयांना (मुलनिवासींना) गुलाम करनारे होते. ब्राह्मणांनीही आर्य सिद्धांत स्वीकारला असल्याने त्यांच्या वांशिक अहंभावात भर पडली. त्याचे प्रतिबिंब गतशतकाच्या व आताच्याही पुरोगामी चळवळीत उमटले असल्याचे चित्र दिसते. आजही चळवळीतील अनेक विचारवंत ब्राह्मण हे परकीय असून वेगळ्या वंशाचे आहेत असे मानुन जातरचनेविषयक वैचारिक संरचना करतात. त्यामुळे जात्युच्छेदनाचा मार्गही अवरुद्ध होत एका विचित्र वळनावर येवून थांबला आहे....कारण मुळातच जातीव्यवस्थेचे आकलन या बनावट वंशसिद्धांताने ग्रासलेले आहे. त्यामुळे जातिसंस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन हाच मुळात जातविद्वेषावर (वंशविद्वेषावर) उभा ठाकल्याने त्या व्यवस्थेचे तटस्थ आकलन कमी पडत आपण भरकटत तर जात नाही आहोत ना यावरही आपल्याला चिंतन करने गरजेचे आहे.
तसेच पुरोगामी विद्वानांनी जात्युच्छेदनाचे जे अनेक मार्ग सुचवले आहेत ते कितपत व्यवहार्य आहेत व ते का यशस्वी ठरले नाहीत यावरही आपण पुढील भागात चर्चा करुयात...
(क्रमश:)