Thursday, November 15, 2012

असण्यात नसून आणि नसण्यात असून...


मी मोजत बसतो
क्षितीज घेऊन उशाला
रक्ताचा वाहता
प्रत्येक थेंब
शरीराच्या रोमारोमातून
जो रिक्त करत मला
चाललाय व्यापत महाकाश...

नाही...
वेदना नाहीत...
हताशा नाहीत...
उलट हे रक्तथेंब
व्याकुळल्या वेदनांचे
पंख फुटलेले
दिव्यभारित स्वप्नपूष्प जसे
मूक्त करायला वेदना
चराचराच्या आणि
रानोमाळी उमटणा-या
आर्त हुंकारांच्या
सादाला प्रतिसाद देत
विश्व व्यापणा-या
वेदनांचे मूक रुदन जसे
.....
वेदनांनाच वेदना कळतात ना?

मी होत चाललोय रिक्त...रिक्त
तसतसा भरला जातोय माझ्यात एक
दिव्य प्रकाश
रक्ताच्या थेंबाथेंबामागोमाग
उसळतोय तोही प्रकाश
द्यायला बळ
त्या स्वप्नपाखरांना...

जाईल वाहुन शेवटचा थेंब
क्षितीजाला देत अखेरचे अर्ध्य
क्षितीजे होतील तुडुंब
प्रकाशाची राने
आणि जातील विझून वेदनांचे
मोकाट उठलेले वणवे...

मी पहात असेल
कोठुन तरी
हा आनंद सोहोळा...
असण्यात नसून आणि नसण्यात असून...

No comments:

Post a Comment

एस.एस. रामदास: एक शोकांतिका

  एस . एस . रामदास : एक शोकांतिका - संजय सोनवणी               शेख सुलेमान इब्राहिमची आजची पहाट घरातल्या कटकटीनेच उगवली . त्याची मनोरुग...