Monday, March 4, 2013

इतिहासाची गंमत अशी आहे...



इतिहासाची गंमत अशी आहे कि जोवर आपल्या सोयीचा इतिहास लिहिला जात असतो तोवर सगळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. त्याहुन मोठा विनोद म्हणजे सोयीच्या इतिहासाबाबतचे ठोस पुरावे कोणी मागतही नाही. सोयीच्या इतिहासात सर्व लांड्यालबाड्या खपून जात असतात. पण जेंव्हा अशा सोयीच्या इतिहासाला छेद देणारे विवेचन स्वतंत्रपणे होऊ लागते तेंव्हा मात्र अशा लोकांची पंचाईत होऊ लागते. असे लोक खालील प्रकारच्या प्रतिक्रिया देवू लागतात:

१. आपले विवेचन पुर्वग्रहदुषित असून "एक्स"चे अनाठाई उदात्तीकरण करणारे आहे.
२. आपण दिलेले पुरावे पुरेसे नाहीत. जे पुरावे दिलेत त्या संदर्भांची प्रकाशकांसहित सुची द्यावी.
३. आपण "एक्स" जाती/धर्माचे द्वेष्टे दिसता.
४. आपले आकलन अपुर्ण आहे.
वर काही अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचे मासले दिले आहेत. समजा सर्व पद्धतीने संतुष्ट केले व आता प्रत्युत्तर द्यायला जागाच उरत नाही तेंव्हा हमखास मिळणारी प्रतिक्रिया:’
"इतिहास काय चघळत बसताय राव? येथे लोकांना प्यायला पाणी, नाही, बेरोजगा-या वाढत चालल्यात. वर्तमानातील प्रश्न सोडुन हे काय चाललेय? समाजात एकता करायच्या ऐवजी दुही का पसरवताय? आता कशाला जुने उगाळत बसायचे?"

झाले!

अशी मनोवृत्ती कदाचित अन्यत्रही असू शकेल, पण भारतात व त्यातल्या त्यात महाराष्ट्रात विशेष जोमात आहे हे मात्र खरे.  पुरोगामी आणि प्रतिगामीचे अर्थ सोयिस्करपणे बदलले जातात. इतिहासाचे अन्वयार्थ सोयिस्करपणे बदलले जातात. वर तुम्हीही सोयीने इतिहासाचा अर्थ लावत असतात असेही म्हटले जाते. त्यातल्या त्यात सोयीचा इतिहास कोणता व कोणाचा यावरही सोयिस्कर वादंगे घडवली जातात. आता जरा वरील प्रतिक्रियांचा समाचार घेऊ:

१. आमचे विवेचन पुर्वग्रहदुषित म्हणतांना नेमका कोणता निकष आहे बरे? हा निकष तुम्हाला सोयिस्करपणे प्रिय वाटणा-या लोकांबाबातही मग का लाऊ नये? कि तेच खरे महान होते आणि बाकीचे पुळचट होते असे म्हनणे आहे? तसे असेल तर तो आम्ही पुराव्यानिशीच हाणुन पाडनारच कि!
२.तुम्ही जे इतरांबाबत म्हनता, अवमुल्यने करता, तसा प्रचार करता त्याला कोणते पुरावे दिलेले असतात बरे?
३."एक्स" जाती/धर्माचा द्वेष्टा ठरवून मोकळे होणे हा तर पुरातन खेळ आहे. असे लेबल लावले कि मग कसलीही चर्चा करायला प्रतिपक्ष बांधील नसतो. कारण चर्चा हा त्यांचा उद्देशच नसतो. आणि तरीही वर नाक करून हीच मंडळी आपण किती पुरोगामी आणि अन्य जाती/धर्मियांबाबत कनवाळु आहोत हे आटोकाट दाखवायच प्रयत्न करत असते.
४. आकलन अपुर्ण आहे हा मुद्दा खरा धरता येवू शकतो...पण कधी? समोरच्याचा उद्देश दुस-याचे आकलन कमी आहे हे सांगतांना ते कोठे कमी आहे हे सांगायचा असेल तर! कोणाचेही आकलन समग्र असू शकत नाही हे कोनीही अमान्य करणार नाही. समुहाचे आकलनसुद्धा समग्र नसते. पण त्याची व्याप्ती अमान्य करत स्वत:च्या अक्कलशुन्यतेचेच हे उदाहरण नव्हे काय?

आणि शेवटचा मुद्दा: इतिहास अडचणीचा समोर येऊ लागतो तेंव्हा इतिहासापासून परावृत्त करण्याचा हा सोपा बुद्धीभेदी मार्ग आहे. या लोकांना विचारायचा प्रश्न असा कि भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणे हा तत्कालीन वर्तमानातील महत्वाचा प्रश्न असतांना सावरकर कशाला "सहा सोनेरी पाने" लिहित वेळ वाया घालवत बसले? लो. टिळक कशाला स्वातंत्र्यलढा पुढे नेण्यसाठी प्रत्येक क्षण डावाला लावण्यापेक्षा "आर्क्टिक होम इन वेदाज" लिहित बसले?
त्यांना वर्तमान आणि वर्तमानाचे प्रश्न समजत नव्हते असाच याचा अर्थ घ्यायचा काय?

"आर्क्टिक होम इन वेदाज" ही तत्कालीन समाजातील महा-दुहीची ग्वाही नव्हती कि काय?
 त्याचे फळे आपण आजही भोगत नाही आहोत कि काय?

असो. हे पण अडचणीचे प्रश्न आहेत. त्याचे सरळ उत्तर येणार नाही. पुन्हा असो.

इतिहासाच्या पायावरच वर्तमान उभा असतो. इतिहासाचे मुल्यांकण त्या-त्या काळातील लोकांनी आपापल्या आकलनानुसार केलेले असते. असे करतांना अनेक मुद्दे त्यातून सुटतात वा सोडले जात असतात. अशा स्थितीत इतिहासाचे पुन्हा पुन्हा नव्याने विश्लेशन करावे लागते. वर्तमानातील असंख्य सामाजिक समस्यांची कारणे इतिहासात दडलेली असतात. आजच्या समस्या या चुकीच्या धार्मिक/राजकीय इतिहासातुन निर्माण झालेल्या असतात. जातीसंस्था नष्ट करायची तर तिचा मुलात जन्म कसा झाला हे शोधावेच लागते. धार्मिक समस्या मिटवायच्या तर धर्माचे विश्लेशन करत त्याचे मुळ शोधावेच लागते. सामाजिक विषमतेची कारणे अन्य कोणत्या धर्मात दडली असतील तर तेही शोधत धर्मातील अपप्रवृत्ती हटवाव्या लागतात. ज्याचे स्वातंत्र्य त्याला बहाल करावे लागते व आपले स्वातंत्र्य मिळवावे लागते. वैदिक धर्मियांनी एकीकडे स्वत:ला हिंदू म्हणायचे आणि वैदिकतेला श्रेष्ठस्थानी ठेवत विषमतेची संस्कृती अव्याहत चालू ठेवू द्यायची हा उद्योग जर इतिहासातून स्पष्ट होत असेल तर तो थांबवणे अत्यावश्यक आहे. मी वैदिक धर्माचा द्वेष करत नाही. तो उलट स्वतंत्र आहे एवढेच सांगतोय. त्यातील चातुर्वर्ण्याने जी विशिष्ट सामाजिक स्थिती निर्माण केली आहे ती दूर करत समता आनायची असेल तर वैदिक धर्माला हिंदू धर्मापासून स्वतंत्र करणे अत्यावश्यक आहे. हिंदुंची एकही देवता वैदिक नाही आणि नव्हती हे मी आधी स्पष्ट केलेलेच आहे.

थोडक्यात इतिहासाचे पुनर्मुल्यांकन ही काळाची गरज आहे. समतेची गरज आहे. त्यासाठी माझ्यावर कितीही आरोप केले, निंदा केली, प्रतिगामी म्हटले, पुर्वग्रहदुषित म्हटले तरी मी त्याचेही स्वागतच करीन!

15 comments:

  1. संजयजी,
    अनेक इतिहासकारांना असे अनुभव येतात आणि त्याचा त्यांना त्रास होतो, याचे मोठे कारण ते चुकीच्या लोकांपुढे इतिहास मांडतात हे नाही काय? अहो ज्यांना सत्य नको असते, ज्यांना आपला जातीय अहंगंड कुरवाळणारा इतिहास पाहिजे असतो, ज्यांना इतिहास म्हणजे काय हेच माहीत नसते, त्यांच्या पुढे इतिहास मांडून काय उपयोग? आणि फेसबुकवर इतिहास मांडणे म्हणजे अतीच झाले.

    ReplyDelete
  2. आपले लिखाण अभ्यासपूर्ण आहे. परंतु सतत आपल्या लिखाणातून तुमचे म्हणणे मान्य नसणाऱ्या लोकांविषयी अनादर डोकावत असतो, ही खटकणारी गोष्ट आहे.

    आजच्या लेखातून इतिहासाचे पुनर्मुल्यांकन कसे गरजेचे आहे ह्याचे पूर्ण स्पष्टीकरण मिळत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. "आपले लिखाण अभ्यासपूर्ण आहे. परंतु सतत आपल्या लिखाणातून तुमचे म्हणणे मान्य नसणाऱ्या लोकांविषयी अनादर डोकावत असतो, ही खटकणारी गोष्ट आहे."

      याविधानाशी मी सहमत आहे.माहित नाही पण काही लोकांविषयी मत व्यक्त करताना कळत नकळत तुमचा रोष प्रकट होतो.कारण काहीही असो पण ते खरे आहे.मागे एकदा सावरकरांविषयीच्या लेखात मी हेच म्हटले होते.मान्य आहे कि प्रचलित मतांपेक्षा खूपच वेगळे विचार करण्यास आपण भाग पाडले.विचारांची दिशाच तुम्ही बदलून टाकलीत. तरीही तटस्थ लिहिण्यासाठीचा संयमितपणा थोडासा कमी पडतोय. ते जर तुम्ही साधू शकलात तर अतिउत्तम.

      Delete
  3. आदित्यजी, मला कडवट विरोध करना-यानाही मी त्यांचे मतस्वातंत्र्य दिले असेल तर अनादर कोठुन आला? अनादर जे बाष्कळ, बाळबोध प्रतिक्रिया देत मुख्य मुद्द्यांना स्पर्श न करता प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याबद्दलच आहे. दुसरे म्हनजे इतिहासाचे पुनर्मुल्यांकन का आवश्य्क असते हे जरा जागतीक परिप्रेक्षात पाहिले तर लक्षात येईल. आपल्याकडेच का याबद्दल अघोषित बंदी आहे हे समजत नाही. अहो, पकिस्तान परवडला जेथे सिंधी मुस्लिम
    अरेबिक इतिहास नाकारत आपली पाळेमुळे तेथीलच भुमीत शोधतात, सिंधी भाषेला राष्ट्रीय भाषेची मागणी करतात आणि अशा आंदोलनांना आणि संशोधनांना पाकसारखे राष्ट्रही विरोध करत नाही...आणि येथील कडवे मात्र पाक्यांपेक्षा जर कमअस्सल असतील तर संताप येनारच...मग त्याला तुम्ही काहीही म्हणा.

    ReplyDelete
  4. संजयजी, माझे मत नोंद्विल्याबद्दल धन्यवाद.

    इतिहासातील आदर्शांचे अधिक विश्लेषण का करू नये? ह्याविषयी मला असे वाटते की समाजाला आदर्शांची गरज आहे. कोणतीही व्यक्ती, समाज अथवा परंपरा परिपूर्ण नसतात. परंतु सद्य समाजाने नियमानुसार जीवन जगावे ह्यासाठी त्यांच्यापुढे परिपूर्ण असे एखादे चित्र रेखाटावे लागते. आता हे चित्र रेखाटले म्हणून समाजातील सर्व जण काही नियामनुसार वागत नाहीत. परंतु जे शिस्तबद्ध लोक असतात त्यांच्या मानसिक समाधानासाठी आदर्शांची गरज असते. म्हणून आदर्शांचे सखोल विश्लेषण करू नये अशी पद्धत आहे!

    ReplyDelete
  5. १. आमचे विवेचन पुर्वग्रहदुषित म्हणतांना नेमका कोणता निकष आहे बरे? हा निकष तुम्हाला सोयिस्करपणे प्रिय वाटणा-या लोकांबाबातही मग का लाऊ नये? कि तेच खरे महान होते आणि बाकीचे पुळचट होते असे म्हनणे आहे? तसे असेल तर तो आम्ही पुराव्यानिशीच हाणुन पाडनारच कि!

    yatil puravya nishich hanun padnar he khup IMP aahe.. jar kharokhar tas aasel tar aaple purave nusar mat saglejan manya kartil..


    आणि शेवटचा मुद्दा: इतिहास अडचणीचा समोर येऊ लागतो तेंव्हा इतिहासापासून परावृत्त करण्याचा हा सोपा बुद्धीभेदी मार्ग आहे. या लोकांना विचारायचा प्रश्न असा कि भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणे हा तत्कालीन वर्तमानातील महत्वाचा प्रश्न असतांना सावरकर कशाला "सहा सोनेरी पाने" लिहित वेळ वाया घालवत बसले? लो. टिळक कशाला स्वातंत्र्यलढा पुढे नेण्यसाठी प्रत्येक क्षण डावाला लावण्यापेक्षा "आर्क्टिक होम इन वेदाज" लिहित बसले?
    त्यांना वर्तमान आणि वर्तमानाचे प्रश्न समजत नव्हते असाच याचा अर्थ घ्यायचा काय?
    you have found only two persons from the indian freedom struggle ...wot about others ? many congress leaders wrote lot of books during the freedom struggle. e.g. NEHRU-GANDHI-AZAD-RAJGOPALACHARI ETC. AND WOT ABOUT THOSE WHO NEVER PARTICIPATED AGAINST BRITISH IN ANY KIND OF REVOLUTION? THEY ALSO WROTE SO MANY BOOKS....

    जातीसंस्था नष्ट करायची तर तिचा मुलात जन्म कसा झाला हे शोधावेच लागते. धार्मिक समस्या मिटवायच्या तर धर्माचे विश्लेशन करत त्याचे मुळ शोधावेच लागते. सामाजिक विषमतेची कारणे अन्य कोणत्या धर्मात दडली असतील तर तेही शोधत धर्मातील अपप्रवृत्ती हटवाव्या लागतात. ज्याचे स्वातंत्र्य त्याला बहाल करावे लागते व आपले स्वातंत्र्य मिळवावे लागते.
    LAST SO MANY YEARS ( MAY BE 2500) THIS TYPE OF EFFORTS HAD BEEN SEEN AND WHAT TODAY WE HAVE MULTI-MULTI CAST AND SUB CAST.. NO RELIGION OF THE WORLD IS CAST LESS.. EVERYWHERE WE WILL SEE THE DIVIDATION OF RELIGION IN MULTIPLE CASTES AND SUB CASTES ,EVEN THE RELIGION IS VERTICALLY SPLIT IN TWO OR MORE PARTS.. THE ALTERNATIVE IS ONLY ONE... ABOLISH OR DESTROY ALL RELIGIONS AND WE LIVE LIKE ONLY HUMANS...

    ReplyDelete
  6. आपले विवेचन पुर्वग्रहदुषित असून "एक्स"चे अनाठाई उदात्तीकरण करणारे आहे.
    २. आपण दिलेले पुरावे पुरेसे नाहीत. जे पुरावे दिलेत त्या संदर्भांची प्रकाशकांसहित सुची द्यावी.
    ३. आपण "एक्स" जाती/धर्माचे द्वेष्टे दिसता.
    ४. आपले आकलन अपुर्ण आहे.
    1) YOU CAN PRAISE THE PERSON OF YOUR CHOICE. EVERYBODY IN A DEMOCRATIC INDIA CAN DO IT. WHILE PRAISING ONE PERSON YOU SHOULD NOT DEGRADE OTHERS , WHICH IS NOT ACCEPTABLE TO THE SOCIETY.
    2) MANY TIMES YOU WROTE AND GIVE AMBIGUOUS REFERENCES, SO THERE IS NO HARM IF YOU PROVIDE IT WITH ALL DETAILS, AS YOU ARE WRITING PAGES AFTER PAGES THEN WHY YOU AFRAID FOR GIVING THE PROOFS.
    3) AS FAR AS THE PERSONAL VIEWS AND FOR ANY RELIGION-CASTE OR SUB CASTE , ITS YOUR OWN GOOD THINKING WILL PREVAIL.
    4) NO BODY IS COMPLETE, HOWEVER SOME TIMES SOMEBODY STARTED BEHAVING LIKE THAT. IN SUCH CASES WE CAN NOT HELP IT.

    ReplyDelete
  7. संजय सर ,
    इतिहास हा आपला आवडता विषय दिसतो आहे.
    आपण उत्तम लेखक होण्याआधी उत्तम श्रोते आहात हे फार महत्वाचे आहे.
    आपण म्हणता त्यात एक गोष्ट स्पष्ट होते की आपण लोकशाहीचा सर्वार्थाने आदर करत आहात -
    कारण आपण इतराना पण आपल्या ब्लोग वरून त्यांची मते - प्रतिक्रिया मांडण्याची पूर्ण मुभा देत आहात.
    आजकाल असे असणे दुर्मीळ होत आहे.
    ही अतिशय सुंदर गोष्ट आहे. मतभेद असून हे स्वातंत्र्य देण्यासाठी जे विशाल मन लागते ते आपल्याकडे आहेच !
    त्यापुढे जाउन चर्चा अधिक व्यापक आणि सर्व समावेशक होण्यासाठी असा निरोगी दृष्टीकोण फार
    परिणामकारक ठरेल यात शंका नाही .
    विनंती एकच करायची आहे, की सामान्य माणसाना , त्यांनी व्यक्त केलेल्या मतांना आपण परत जर उलट दाद दिली तर बरे वाटते -
    ते काम आपण न दमता ,कर्तव्य बुद्धीने करावे !
    हे काम कंटाळवाणे वाटले तरी करावे.
    प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया फारच वेगळे नाते निर्माण करते. !
    काही इंग्रजी लिखाण - प्रतिक्रिया अतिशय अशुद्ध असतात,
    त्यामुळे रसभंग होतो याची सर्वांनी नोंद घेतली तर बरे होइल.
    धन्यवाद .

    ReplyDelete
  8. संजय सर...

    तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लोकांना इतिहासातले सत्य जाणून घ्यायचे नसते तर स्वतःला गोड वाटेल वा पटेल ते सत्य म्हणून स्वीकारायचे असते.
    म्हणूनच नरहर कुरुंदकरांसारख्या पुरोगामी विचारवंताला जाणून बुजून दुर्लक्षिले जाते.
    उदाहरण द्यायचे झाले तर - रियासतकार गो.स. सरदेसाई यांच्याबद्दल कुरुंदकरांनी 'मागोवा' या त्यांच्या पुस्तकात पान क्रमांक ७४ वर म्हटले आहे
    " आमचे प्रातिनिधिक इतिहासकार म्हणजे सरदेसाई. सरदेसायांनी बरावाईट कसाही असो, मराठ्यांचा एकटाकी संपूर्ण इतिहास लिहून काढलेला आहे. अजूनही हे कार्य मराठीत इतर कुणी केलेले नाही. सरदेसाई फार मोठे इतिहाससंशोधक नव्हते. काळजीपूर्वक पुरावा गोळा करणे अगर विवेचक संगती लावणे हे काम सरदेसायांच्याकडून फारच क्वचित घडे. पण म्हणूनच राजवाड्यांच्याप्रमाणे त्यांच्या कल्पनेचा वारु तुफान दौडत नसे"
    असे वास्तव आणि परखड मत मांडणार्‍याला खर्‍या अर्थाने पुरोगामी विचारवंतांकडे समाजातील मी मी म्हणवणार्‍या इतिहासकारांनी दुर्लक्ष केलेले पाहिले की वर संजय सर म्हणत आहेत त्याची प्रचिती लगेच येते. गरज आहे ती अशा जागरुकतेने आणि डोळसपणे खरा इतिहास आपल्याला माहिती करुन घ्यायचे आहे की नाही? याची.
    अजून एक उदाहरण देऊन हा प्रतिसाद आटोपता घेतो.
    संभाजी महाराजांच्या त्यागाविषयी व शौर्याविषयी आपल्या सर्वांना आदर असतो व मुसलमान होण्यास नकार देऊन हिंदू धर्मवीर झालेला संभाजी आपण मान्य केलेला असतो. पण सत्य वेगळेच असते.
    दारुच्या धुंदीत संभाजी पकडला गेला. औरंगजेबाने त्याला मुसलमान होण्यास "सुचविले". तेव्हा संभाजीने उद्दामपणे औरंगजेबाला स्वतःशी निका करण्यासाठी औरंगजेबाची मुलगी मागितली. यामुळे औरंगजेबाने चिडून जाऊन संभाजीचे डोळे काढले व हालहाल करुन तुळापूरला वध केला. संभाजीने अत्यंत धैर्याने मरणाला तोंड दिले. तो शरण गेला नाही. औरंगजेबाच्या मुलीवर या घटनेचा एवढा परिणाम झाला की ती जन्मभर अविवाहित राहिली."
    नरहर कुरुंदकरांनी संभाजीविषयक आढावा घेताना वरील चिकित्सा 'मागोवा' या पुस्तकात केलेली आहे. खरा इतिहास माहिती करुन घ्यायची तयारी व इच्छा असलेल्यांनी जरुर वाचावे हे पुस्तक.

    तसेच संभाजी कैदेत आहे असे दाखवले आहे त्यावेळी संभाजी राज्यकारभार करत असल्याची कागदपत्रे उपलब्ध आहेत ते दुर्लक्षिले जाते. या पार्श्वभूमीवर बेंद्रे यांचे संभाजीचे चरित्र सर्वार्थाने वास्तववादी व पुराव्यांनी सिद्ध झालेले आहे असेही कुरुंदकर स्पष्ट करतात. इतिहासकारांना माहिती असले तरी आपल्या मराठी अभिमान बाळगणार्‍या मराठी लोकांना बेंद्र्यांचे हे पुस्तकच माहिती नसते. अशी उदाहरणे ढीगाने उपलब्ध आहेत.
    संजय सर तुम्ही सांगता आहात ते तुमचे मत भविष्यकाळात पुराव्यांच्या कसोटीवर घासून अधिकाधिक लख्ख होत जाणार आहे एवढे नक्की.

    ReplyDelete
  9. मंगळवार -
    > गणपतीच्या देवळातला मंडप .-
    > मध्येच घंटा वाजण्याचा मंगल आवाज , उदबत्तीचा शांत सुगंध - वातावरण प्रसन्न !
    > आप्पा - अहो बाप्पा,बसून घ्या , जरा वेळाने मुंगीला शिरायला जागा राहणार नाहीये !
    > बाप्पा - अहो आप्पा , आम्हाला तर एका पायावर उभे राहून भाषणे ऐकायची सवय लागली होती ,काय प्रकार काय आहे ? राज येणार आहे का शरद साहेब ?- का मनोहरपंत ?
    > आप्पा - नाही हो , मीच बोलणार आहे !. सगळी तयारी केली आहे !. तिकडच्या मारुती मंदिराजवळ सकाळीच बोर्ड लिहून आलोय ,आणि काल ऑफिसात सर्वाना सांगितलय ,
    > तसेच हिने पण तिच्या माहेरी सांगितलं आहे,- लक्षात आल का - गर्दी जमवायला वेळ लागत नाही ! - आपल्याकडे मनुष्यबळ चिक्कार - दुष्काळात अधिक महिना आलातरी !
    > बाप्पा - पण विषय काय आहे तुमच्या प्रवचनाचा - राधा कृष्ण ,नल दमयंती का दुष्यंत शकुंतला ?
    > आप्पा - नाही हो ,वेगळा विषय आहे.- झलक दाखवू का ? ऐका तर !
    > हिस्ट्री या शब्दाचे मूळ आहे हिस्तोरिया या ग्रीक शब्दात !.त्याचा अर्थ " समकालीन घटनांचे ज्ञान " असा आहे.
    > वर्तमानकाळात जगणारा इतिहासकार सभोवतालीच्या समाजाच्या समस्यांची पाळेमुळे गतकाळात रुजलेली आहेत का ते शोधत असतो .
    >
    > बाप्पा - बाप रे किती जड शब्द ! पण छान -वा वा बोलत राहा ! माझा आवडता विषय आहे. पण ष्टोरी नाही हो - तिथं घोडं पेंड खातय ! पब्लिक जमेल ना ?
    > आप्पा - ऐका तर पुढे - नागपूरकर भोसल्यांची बखर लिहिणारे विनायक आनंदराव पारधी औरंगाबादकर यांनी लिहिलंय
    > " शोधिता शोध नित नवाच शोध होतो.त्यास पुढील शोध पुढेच आहे व होईल . हा यथामती जितका समजला त्यास लिहिले." -
    > ते अठराशेआठ ते अठराशेअठरा च्या इंग्रज रेसीडंट रिचर्ड जेकिन्स चे आश्रीत आणि नागपूरकर भोसल्यांची बखर लिहिणारे समकालीन होते
    > बाप्पा - अहो इतिहासकार हा समाजाच्या " स्मृतीचा रखवालदार " असतो .बहुतेक लोक जे विसरतात त्याची आठवण इतिहासकाराने करून द्यायची असते.
    > आप्पा -खर सांगू का, पूर्णतया वस्तुनिष्ठ पद्धतीने इतिहास लिहिणे फार कठीण असते. भूतकाळ पुराव्यानिशी समजावून सांगणे तितकेसे सोपे नसते.
    > बाप्पा - अहो , अप्रकाशित अस्सल साधने हाती येत नाहीत आणि उपलब्ध साधनांवरच भिस्त ठेवावी लागते !
    > आप्पा - कितीही झालं तरी इतिहासाचा निवेदक , सहभागी निरीक्षकाची भूमिका तन्मयतेने वठवत असला तरी त्याचे आग्रह आणि पूर्वग्रह कळत-नकळत त्याच्या लिखाणात डोकावत असतात.
    >
    > इतक्यात एक माणूस येतो. - टेम्पो चालक - अहो इथे काहीतरी परी परी ,नाही पुराण ,आपल ते काहीतरी संवाद - भाषण होत बघा -
    > आप्पा - या या , बसून घ्या , आत्ताच सुरवात केली आहे. ( मधेच गणपतीच्या पुढे टांगलेल्या घंटांची किणकिण ) इतक्यात अजून ३ माणसे येतात ,
    > बाप्पा - या या , चपला इथे काढा बर का - असू द्यात - बसून घ्या , अगदी फक्त चारच वाक्य झाली बघा आत्तापर्यंत -
    > वेळेत आलात ! स्त्रियांनी या बाजूला नि पुरुषांनी या बाजूला -उशीर झाला ना - काही हरकत नाही , देवदर्शनाला यायला जायला जरा जागा सोडा मध्ये - बास !
    > आप्पा - बसा ना , या
    > माणूस - नाही हो , ह्या सतरंज्या द्यायच्या होत्या ,आपल्या माहेरहून मागवल्या होत्या न वहिनीनी - त्या टेम्पोतून आणल्या बघा , लई जड आहेत . उतरवून ठेवतो बाहेर -
    > लई गर्दी होणार आहे म्हणे - काय आहे हो ? आज चतुर्थी हाय का ? देवा गजानना,सर्वांच भल कर रे बाबा !
    > आप्पा - हीच काम दिसतंय हे ,सासरेबुवा आले नाहीत ,त्यांनी सतरंज्या आणि तक्के पाठवलेले दिसताहेत. मांडववाले ना ते - पिढीजात ! टेम्पोवाला आणि ते ३ कामगार जातात
    > बाप्पा - गर्दी कशी होत नाही अजून ?
    > आप्पा - अहो विषयाची ओढ पाहिजे ना लोकाना ! हेच सलमान वा अक्षय येणार कटिंगच्या दुकानाचे उद्घाटन करायला अस कळल असत तर -
    > तर मरणाची गर्दी केली असती पोरापोरीनी !
    > बाप्पा - जाऊ द्या हो , असे हिरमुसले होऊ नका ,बोलत रहा , हळू हळू गर्दी जमेल.
    >

    ReplyDelete
  10. इतक्यात पाठीत वाकलेल्या दोन म्हाताऱ्या आज्जी येउन वाकून आप्पाला नमस्कार करतात -
    > त्यातली एक मुठभर तांदूळ ठेवते आप्पांच्या समोर , आणि दुसरी चार आणे ठेवते ! ( आप्पा पार ओशाळून जातात )
    > आप्पा - आजी , अहो मी पुराणिक बुवा नाही हो ! तरी बसून घ्या - बसून घ्या , तक्क्या आहे बघा पाठीशी - आरामात बसा -
    >
    > आजी - नको रे बाबा , तुझा एकेक शब्द मणा मणा चा - काहीच कळेना रे बाबा ,इतके पांढरे केस झाले , पण हे काय आगळच ! देवा गजानना !उचल रेबाबा , कंटाळा आला आता !
    > दुसरी आजी - इतक्यात काय झालं दमायला ऽअतातर सहस्त्र चंद्र दर्शन झालं !अहो अम्बुताई,आपण चांगल इंग्रजांच्या काळातल भक्कम अन्न खाल्लाय ! आपण बरे मरू सुखासुखी ?
    >
    > आप्पा - तर बर का आज्जी - इतिहासकाराचे प्रथम कर्तव्य असे असते की -
    > बाप्पा - आप्पा ,माझ ऐकता का थोडंस , आवरा आता ,
    > आप्पा - का हो , आत्ता तर कुठे रंग - - -
    > बाप्पा- वाईट वाटत हो स्पष्ट सांगायला - पण , आपण रिकामटेकडी माणसं अस म्हणतात हो हल्ली सगळेजण , कदाचित त्याचं थोडस खरही असेल असं वाटू लागलय हो मलापण !
    > आप्पा - बाप्पा , तुम्हीपण ? आपण जीवाभावाचे मित्र ! एका विचाराचे - आचाराचे !
    > बाप्पा - कसं समजावू तुम्हाला - इतिहास हे पण एक हत्यार होत चाललय - काहीतरी वेगळच चाललय ,
    > आपल्या आकलन शक्तीच्या बाहेरच ! जे घडतंय ते शुद्ध पवित्र तर नाहीच पण अमंगल आहे ! यांच ध्येय आधीच ठरलेलं आहे.
    > साध्य माहीतच आहे , साधने भ्रष्ट करत सुटले आहेत हे !. इन्फोर्मेशन ,मिसइन्फोर्मेशन आणि डिस इन्फोर्मेशन चा खेळ आहे हा यांचा आणि त्यात गोबेल्सचे तंत्र !
    > माझं ऐका ,थोडी कळ काढा , आपल्या हातान हे मरण ओढवून घेतील नक्की !
    > manipulaters are the easiest to get manipulated असं म्हटलेलेच आहे तुकाराम , ज्ञानोबा का समर्थांनी !
    > आप्पा - काहीतरी काय हे बाप्पा - समर्थ आणि इंग्लिश ? छे छे -
    > बाप्पा - म्हणजे तुम्हाला काहीच कळाल नाही वाटत ?
    > आप्पा - काय ?
    > बाप्पा - अहो तो दाढीवाला ब्राह्मण इंग्रजांचा हस्तक होता ! पुरावा आहे त्यांच्या कडे !
    > आप्पा - इतिहासकार या शब्दाचीच मला भीती वाटू लागल्ये आता ,चुकल माझं ,येथे काहीही सिद्ध करता येते हेच खरे !
    > बाप्पा - ऐकणारी मेंढर वाढतच जाणार - होयबानां आपल्या महाराष्ट्रात तोटा कधीच नसतो !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बाप्पा...नेहमीप्रमाणेच "चोकस"!

      Delete
  11. मित्रहो, आपणा सर्वांच्या मतांचा मी आदर करतो. वाचकांच्या लेखकाकडुन अपेक्षा असतात हे खरे आहे. हा वरील लेख मी फक्त माझ्या अनुभवांवरुन लिहिला हे मात्र खरे नाही. हा अनुभव सध्या इतरही लेखक घेत आहेत. माझ्या लेखनात काही लोकांबद्दल/वाचकांबद्दल रोष प्रकट होतो काय? हे मीही मान्य करतो कि होय, ते खरे आहे. जेंव्हा क्रुतीशील चर्चा न करता वेगळेच मुद्दे काढत चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न होतो तेंव्हा मला राग येतो,. मीही एक मनुष्य आहे. असे असले तरी मी कोणचेही मत स्वातंत्र्य हिरावून घेतलेले नाही. मी आजतागायत मोडरेशन सुरु केल्यापासून एकही प्रतिक्रिया अप्रसिद्ध ठेवलेली नाही.

    फक्त सावरकर टिळकांचे नांव का घेतले? मला कल्पना आहे कि एक मोठा समुदाय या महनियांबद्दल खुपच संवेदनशील आहे. मी त्यांचा अनादर करत नसून त्यांनाही इतिहासाचे व आपल्या पाळा-मुळांचे सम्शोधन व विश्लेशन महत्वाचे वाटले तर मला का वाटु नये एवढ्यापुरताच तो उल्लेख आहे. मला वर्तमानांतील प्रश्नांची जाणीव नाही व मी निश्क्रीय आहे असे या पीठावरील कोणीही म्हणु शकेल असे मला वाटत नाही. लो.. टिळकांच्या ग्रंथामुळे उलट आर्य-अनार्य अशी फळी उभे राहिली व आजही ती मुलनिवासीवादाच्या रुपाने जीवंत आहे हे आपणा सर्वांस माहितच आहे. असो. मी मुलनिवासी वादाच्या विरोधात याच मंचावर अनेकदा लिहिले आहेच.

    येथील माझे बव्हंशी लेखन हे वाचकांशी संवाद या स्वरुपाचे असते. त्यात संदर्भांची रेलचेल उडवून देवून ते क्लीष्ट करण्याचा माझा मानस नसतो व नाही. तसेच मला विद्वान म्हणुन मिरवण्याचीही हौस नाही. अर्थात कोणी मागितलेच तर संदर्भ पुरवायला मी नकार देत नाही. पण अनेकदा संदर्भ मागण्याचे व नंतर ते अविश्वसनीय कसे हे आपलाच मुद्दा ठाम ठेवर म्हननारे कमी आहेत काय? अहो-तर्कतीर्थांचा संदर्भ दिला तर तर्कतेर्थांच्या तर्कटाला काय किंमत द्यायची असे म्हणनारे महाभागही मी पाहिले आहेत...इतरांची बातच सोडा. शेवटी आपल्या संकल्पनांना छेद देणारे लेखन आले कि संदर्भही नाकारण्याचा प्रयत्न होतो एवढेच यावरून दिसते.

    असो. आपल्या प्रतिसादांवरुन खुप शिकायला मिळते, विचारप्रवृत्त होतो हे आपणा सर्वांचे ऋण मी कृतज्ञतापुर्वक मान्य करतो व त्या ऋणातच राहू इच्छितो. धन्यवाद.

    ReplyDelete
  12. असमंजस वाचक आणि वैतागणारे लेखक
    खरे म्हणजे चांगल्या लेखकांचे समंजस आणि असमंजस अशा दोन्ही प्रकारचे वाचक असतात. पण लेखकाच्या लिखाणावर समंजस वाचक क्वचितच प्रतिक्रिया देतात. याउलट असमंजस वाचक प्रतिक्रिया देण्यात आघाडीवर असतात. त्यांची भाषाही कित्येकदा असभ्य असते. असमंजस वाचकांच्या विषय सोडून मोठ्या प्रमाणात आलेल्या प्रतिक्रिया लेखकाला त्रासदायक ठरतात. लेखकाने कितीही सोप्या भाषेत लिहिले असले ते अनेक वाचकांना कळत नाही. अनेक वाचकांना तर घ्यायचेच नसते. हे पाहून तो लेखक वैतागतो, आणि त्या असमंजस वाचकांची कीव करायला लागतो. त्यामुळे या प्रकाराला लेखक नसून असमंजस वाचकच जबाबदार असतात.

    ReplyDelete
  13. सोनवणी सर , अगदी खरे आणि परखड विचार मांडलेत आपण . सहमत आहोत

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...