Thursday, September 12, 2013

साहित्य क्षेत्रात प्रांतवाद नको

साहित्य क्षेत्रात प्रांतवाद नको
(04-09-2013 : 00:09:33)
औरंगाबाद : साहित्यामध्ये कोणीही स्पर्धक असू शकत नाही. कारण, प्रत्येकाची लेखनशैली वेगळी असते. साहित्य क्षेत्रात प्रांतवाद असता कामा नये; कारण हे क्षेत्र वैश्‍विक असण्याची गरज आहे, असे संजय सोनवणी म्हणाले. सोनवणी हे सासवड येथील नियोजित ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार आहेत.
३ सप्टेंबर रोजी सोनवणी येथे आले असता ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, आज सर्वच जातीची साहित्य संमेलने भरत आहेत. मात्र, त्यातून जातिभेद नष्ट होण्याचे स्वप्न दुभंगत आहे. त्यामुळे शक्य तेवढय़ा समाजातील साहित्याची दखल घेण्याची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे केवळ सन्मान मिळविण्यापुरते नाही, तर कार्य करण्यासाठीही आहे.
साहित्य संमेलन केवळ उत्सव न बनता त्यातून सामाजिकता, संस्कृती पुढे जायला हवी. साहित्य संमेलन व्यापक होण्याची गरज आहे; ते तरुण वर्गाला साहित्य चळवळीत आणण्याचे माध्यम बनले पाहिजे, असेही सोनवणी म्हणाले.
आज एका शहरातील साहित्य चळवळीविषयी दुसर्‍या शहरात ना माहिती होते ना त्याची देवाण-घेवाण. ही देवाण-घेवाण होण्याची गरज आहे. तसेच जेव्हा सांस्कृतिक, सामाजिक पडझड होते तेव्हा केवळ निषेध केला जातो.
मात्र, केवळ निषेध न करता आज नीतिमूल्ये रुजविण्याची गरज आहे, असेही सोनवणी म्हणाले. काळानुसार भाषा बदलली पाहिजे. व्यक्त होण्यासाठी जे सोपे वाटेल त्याचा वापर व्हावा. ठराविक शब्दांचा आग्रह धरण्याऐवजी सोपे शब्द वापरले जावेत, अशी सूचना त्यांनी केली.
ऑनलाईन पद्धत हवी
आज नवनवीन माध्यमे उपलब्ध झाली आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात आहे. मात्र, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जुन्याच पद्धतीने होत आहे. त्याऐवजी यंदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर व्हावा, असे ते म्हणाले.(लोकमत ब्युरो)

No comments:

Post a Comment