Thursday, September 12, 2013

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद "जीवनगौरव" पुरस्कार नाही: सोनवणी

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद "जीवनगौरव" पुरस्कार नाही: सोनवणी

पुणे: 11: - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे जीवनगौरव पुरस्कार नसून साहित्य-संस्कृतीच्या सर्व प्रवाहांना एका सूत्रात बांधत पुढील दिशादर्शक कार्य करण्यासाठी असते. साहित्य संमेलन हा केवळ उत्सव नसून व्यापक विचारमंथनाचे शिबीर आहे व ते वर्तमान व भविष्यातील साहित्यिक व साहित्यरसिकांसाठीचे एक उर्जाकेंद्र बनावे यासाठी आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत अशी आपली भूमिका साहित्यिक संजय सोनवणी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली.

कायदे केल्याने अनैतिक गुन्ह्यांची संख्या कमी होत नाही. निर्भयावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर कायदे कठोर केले गेले हे खरे असले तरी महिलांवरील अत्याचार कमी न होता वाढतच आहेत. मुळात हा प्रश्न समाज-संस्कृतीचा असून समाजाच्या नैतिक धारणांना आकार देण्याचे कार्य आपल्या साहित्यिकांना करावे लागणार आहे. आज ग्रामीण भागातून स्वतंत्र प्रतिभेचे अनेक लेखक कवी लिहिते झालेले आहेत परंतू त्यांना सामावून घेणारे व्यापक व्यासपीठ नसल्याने उपेक्षेने कंटाळून हे क्षेत्र सोडणा-यांचीही संख्या वाढते आहे. त्यासाठी मराठी साहित्य परिषदेच्या सर्वच घटकसंस्थांना क्रियाशील करण्याची गरज आहे असेही सोनवणी म्हणाले.

परराज्यांत व विदेशातही मराठी माणसांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या साहित्य व्यवहाराशी य सर्वांनाच आत्मियता वाटावी यासाठी विशेष प्रयत्न होत नाहीत. बेळगांव-निपाणी भागातील मराठी भाषकांना एवढी झळ बसत असुनही त्याचे पडसाद साहित्य जगतात उमटत नाहीत. एवढेच काय या भागातील एकही नांव साहित्य संमेलनाच्या मतदार यादीत नाही. गोवेकर मराठी भाषकांची मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा अशी जुनी मागणी आहे पण तिला महाराष्ट्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी आपण अध्यक्ष झाल्यास एक अनौपचारिक अध्यक्षीय समिती स्थापन करून सर्व घटक संस्थांच्या प्रत्येकी किमान दोन प्रतिनिधींचा त्यात समावेश करून एक दबाव गट निर्माण करू. ही समिती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि शासनाने स्वीकारलेले सांस्कृतीक धोरण कटाक्षाने राबवावे यासाठीही जनांदोलन करेल असेही सोनवणी पुढे म्हणाले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया सुलभ व व्यापक पायावर व्हावी यासाठी online मतदानाची सुविधा निर्माण करावी यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत असेही संजय सोनवणी म्हणाले.

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...