Sunday, April 20, 2014

माणूस धन्य आहे...!

कालमूलमिदं सर्वजगद्बीजं धनंजय
काल एव समादत्ते पुनरेव यदृच्छया
स एव बलवान भूत्वा पुनर्भवति दुर्बल:

(काळ हे सर्व जागतिक घटनांचे आणि विश्वसंहाराचे बीज आहे. काळच आपल्या शक्तीने हे विश्व खाऊन टाकतो. काळ हा कधी बलवान तर कधी दुर्बल होतो.- व्यास, महाभारत)

आणि पुढे व्यास महाभारताचा शेवट करतांना म्हणतात-

उर्ध्वबाहुविरोन्मैश्य नकश्चित शृणोति माम?....

"मी दोन्ही बाहू उभारून आक्रोश करतो आहे...तुम्ही माझे ऐकत का नाही? अरे असेच कर्म करा कि ज्यामुळे मानवधर्म आणि मानवी मोक्ष शाश्वत राहील...."

आज काळ दुर्बळ आहे असे वाटावे अशी स्थिती आहे. मानवधर्माला आम्ही तिलांजली देत आहोत. सर्वार्थाने आम्ही या पृथ्वीचा आणि त्यावर जगणा-या यच्चयावत सृष्टीचा "काळ" बनलो आहोत.

आणि आम्हाला त्याची जराही शरम नाही. हव्यासाचा, द्वेषाचा, हिंसेचा उन्माद चौदिशांनी उसळतो आहे कानांचे दडे फाटवत....

इस्खिलूस "अगमेम्नन" या शोकांतिकेत दोन-अडिच हजार वर्षांपुर्वी लिहितो..."रक्त नेहमी रक्ताचीच मागणी करते...द्वेषातून द्वेषच भडकतो..."

हजारो वर्षांच्या रक्तपिपासू इतिहासापासून आम्ही काहीच शिकलो नाही...
आम्ही यत्किंचितही माणूस झालो नाही!

आम्ही खरे तर झापडे बांधून ठेवली आणि विचारवंतांना आदराच्या पिंज-यात कायमचे बंद करून टाकले. आम्ही मानवतेची महान दृष्य पाहिली...टाळ्या वाजवल्या...जरा भारावूनही गेलो आणि परत टाळ्या वाजवणारे तेच हात शस्त्रांकडे वळाले...वैचारिक अस्त्रे परजु लागले.

संस्कृतीचा अंत होत आहे यची ओरड स्वत:वरच शस्त्रे कोसळू लागतात तेंव्हाच मानवता-माणुसकी वगैरे आठवू लागली...

जोवर घाव दुस-यांवर होते तेंव्हा मात्र त्या अश्रुंत आणि वाहणा-या रक्तात आम्हीच उत्सव साजरे करण्यात कधी कुचराई नाही केली.

माणूस धन्य आहे...
कारण स्वत:चाच विनाश करवून घेण्यात त्याचा हात कोणी धरणार नाही!

1 comment:

  1. I would like you to elaborate above quotations in today's context. thank you

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...