Sunday, April 20, 2014

एक गोष्ट!

लहानपणी आईने सांगितलेली एक गोष्ट. आटपाट नगर होतं. त्या नगराबाहेर झोपडपट्टीत एक भिकारी रहायचा. दैन्यावस्थेने पार कावला होता तो. पण करणार काय? रोज नगरात जायचं आणि म्निळेल त्या भिकेत छोटा संसार चालवायचा. एके रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात चक्क देव आला. देव म्हणाला, "उद्याचा दिवस तुझे भाग्य बदलून टाकेल..." गडी खूष झाला. सकाळी उठल्या उठल्या बायकोला स्वप्न सांगितलं. बायकोनं त्याला वेड्यात काढलं..."असं कधी होतंय होय? निघा आपले गुमान झोळी घेऊन..."
भिका-याला मात्र आज आपलं कोटकल्याण होणार यावर विश्वास होता. पण कसं? भिकच...पण समजा राजानेच दिली तर? सोन्या-नाण्यांनी ही झोळी भरली तर? विचारानेच गडी हरखला. आज सरळ त्याने राजरस्ताच गाठला. राजा सायंकाळी देवदर्शन करून याच रस्त्याने परत येतो...
राजरस्त्यावर मोक्याची जागा पाहून भिकारी थांबला. जाणारे-येणारे धान्य नाहीतर एखाददुसरे तांब्याचे नाणे देत होते. पण त्याचे कोणाचकडे लक्ष नव्हते. राजा येण्याचीच तो वाट पहात होता. दिवस कलला. सावल्या लांबलचक झाल्या.
आणि राजाचा रथ दिसू लागला. भिकारी हरखला. जरा पुढे सरकला. राजाला आपण दिसायला हवं. आणि चक्क रथ थांबला कि त्याच्या पुढ्यात...आणि राजा खाली उतरला...त्याच्याच दिशेने येवू लागला...
भिका-याचं हृदय त्याच्या तोंडात आलेले...
त्याने झोळी पुढे सरसावली...
राजा आला. त्याच्या पुढ्यात गुढगे टेकून बसला...अत्यंत नम्रतेने म्हणाला...
"मला तुझ्याकडून दान हवे आहे..."
भिकारी किंचित मागे सरला. राजाकडे त्याने अत्यंत उपहासाने पाहिले...
"अरे राजा, तू मला दान द्यायचे तर माझ्याकडेच भिक मागतोस?"
"होय महाराज," राजा म्हणाला, "मला भिक द्या आणि कृतार्थ करा..."
भिका-याला काय करावे हेच सुचेना. संतापाने तो वेडापिसा झाला होता. पण समोर राजा तेवढ्याच लीनतेने बसलेला...
भिका-याने झोळीत हात घातला...धान्याचा एक दाना काढला आणि राजाच्या हातावर ठेवला...
"तू खरा भिकारी...जा आता...देव-बिव सगळे झूठ..."
राजाने नम्रतेने तो दाणा कपाळाला लावला, कशात ठेवला आणि भिका-याला अभिवादन करून रथाकडे गेला.
भिकारी संतापला होता. आता थांबायची कसलीही गरज वाटत नव्हती. तो तसाच घरी निघाला. देवाला शिव्या घालत.
घरी गेला. बायकोने चेष्टेने विचारले..."भेटला काहो देव?"
"नाहीच तो काय भेटनार? चल...बघ थोडे धान्य आणि काही नाणी आहेत...घे स्वयंपाक करायला..."
भिका-याने झोळी बायकोच्या हातात दिली. तिने ती नेहमीप्रमाणे उलटी केली. धान्य आणि नाणी...
पण एक चमकदार धान्याच्या दाण्याएवढाच कण...जेवढा राजाला दिला होता त्या दाण्याएवढाच कण...लखलखता...सोण्यासारखाच...नव्हे सोण्याचाच...त्याने वारंवार खात्री करून घेतली...
मग भकासपणे बायकोकडे पहात राहिला!

No comments:

Post a Comment