Tuesday, April 8, 2014

भयात रहायचेच आहे तर...

आपण माणूस आहोत. यच्चयावत विश्वात अन्यत्र कोठे जीवसृष्टी आहे काय याचा विज्ञान अविरत शोध घेते आहे. माणसापेक्षाही प्रगत जीव कोठेतरी सापडेल...न सापडला तरी अप्रगत का होईना जीवसृष्टी सापडेल याची अनिवार आशा वैज्ञानिकांना...म्हणूनच आपल्या सर्व मानवजातीला आहे.

परंतू याक्षणी तरी संपुर्ण विश्वात आपण एकटेच असल्यासारखी स्थिती आहे. पृथ्वीवरील अन्य बरीच जीवसृष्टी माणसापेक्षा अधिक पुरातन आहे. अनेक प्रकारची जीवसृष्टी कोट्यावधी वर्षांपुर्वीच नष्टही होऊन गेली आहे. मनुष्य तसा तुलनेने अत्यंत तरुण जीव आहे. त्याचे आगमनच पृथ्वीतलावर झाले. उत्क्रांतीमुळे झाले कि जैवीक अपघातातून झाले हे आपल्याला निश्चयाने सांगता येणार नाही. पण त्याने सर्व पुरातन जीवसृष्ट्यांना मागे सारत, अक्षरश: पिंजरेबंद करत,  संपुर्ण पृथ्वी व अवकाशावर सत्ता स्थापित केली हे मात्र खरे. ज्या हत्याराने तो हे करू शकला त्याला माणूस "बुद्धी" हे नांव देतो.

आजच्या माणसाला वाटते पुर्वीचे जीवन किती साधेसुधे होते. पण ते खरेच तसे आहे काय? ते साधेसुधे आज वाटते पण त्या काळाच्या चौकटीत जेही काही उपलब्ध होते त्या सर्वाचाच मन:पूत वापर करत अधिकाधिक भौतिक सूख मिळवण्यासाठीचा संघर्ष करण्यात तो दंग नव्हता काय?  नक्कीच होता. त्याची जीवनविषयकची मुल्ये तो काळाप्रमाणे, गरजेप्रमाणे वाकवत राहिला, बदलत राहिला. आपले पुर्वज कधीच महान नव्हते. आपली पुरातन काव्ये-महाकाव्ये ही भिषण युद्धांचेच वर्णन करतात. मायेच्या ओलाव्याची काव्ये तुलनेने कमीच सापडतील. संघर्ष हीच त्याच्या प्रतिभेची मूळ प्रेरणा आहे कि काय?

सत्य-असत्य, हिंसा-अहिंसा, चांगले-वाइट....या सर्व संकल्पनांना माणसाने कवटाळले, त्यावर तात्विक वाद-विवाद घातले...अस्तत्यालाही सत्यात बदलवू शकण्याचे बुद्धीभेदी तत्वज्ञान शोधले, अधमातम कृत्याला समर्थन देवू शकणारे तत्वज्ञान मनुष्यच शोधू जाणे!

 माणसाने फक्त अन्य जीवसृष्टीचा विध्वंस केला नाही. असंख्य मानवी संस्कृत्यांचाही पुरातन काळापासून विध्वंस केला. काही संस्कृत्या आपल्याला तर फक्त अवशेषांतून माहित आहेत. कित्तेक संस्कृत्या तर जमीनीखाली कायमच्या दफन आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्याला कसलीही माहिती नाही. प्राकृतिक उत्पातांत तर किती संस्कृत्या संपल्या याची गणती नाही.

मनुष्य असा आहे. ते चांगले कि वाईट हे कोणत्याही नीतिनियमांनी ठरवता येणे कठीण आहे. त्याचा संघर्ष बाह्य जगताशीच आहे असेही नाही. त्याचा संघर्ष स्वत:शीही राहिला आहे. किंबहूना मानवी नीतिनियम हे त्याच्या आंतरिक संघर्षाचेच दृष्य रूप आहे. त्याला संघर्ष हवा आहे पण शांतीही हवी आहे. त्याला हिंसा हवी आहे पण त्याच वेळीस सदय अहिंसाही हवी आहे. तो समाज करून राहतो कारण एकटे जगू शकण्याएवढे धैर्य त्याच्यात नाही. तो निरंतर भयभित आहे म्हणून तो त्या भयावर मात करण्यासाठी जशी शस्त्रे शोधतो तसेच धर्म-पंथही शोधतो. तो शासनव्यवस्था बनवतो, संरक्षणासाठी सैन्यदले उभारतो...मृत्युचे भय असलेला माणूस माणसासाठीच धर्म/देशासाठी मरणे कसे श्रेय:स्कर असते याचे तत्वज्ञान बनवतो. ठसवतो. कारण त्याला सुरक्षित रहायचे असते.

समाजांतर्गत तरी तो कोठे पुर्ण सुरक्षित असतो?

त्यासाठीही त्याला वेगवेगळ्या रचना कराव्या लागतात. टोळीचे वंशसातत्य दूर पडत व्यक्तीगत वंशसातत्यासाठी त्याने विवाहसंस्था शोधलेली असते. ती टिकावी म्हणून तिलाही "दैवी" नियमांनी जखडून टाकली जाते.

मनुष्य निरंतर बंधने निर्माण करत जातो...पण तरीही नियमांत बद्ध होणे त्याला मंजूर नसते. तो व्यभिचार करतो, पण दुस-याचा व्यभिचार त्याला अक्षम्य वाटतो. त्याला स्वत:ला भ्रष्ट व्हायला निसर्गता:च आवडत असते कारण कमी श्रमात सुखासीन होण्याचा त्याचा स्वभाव आहे. पण दुसरा भ्रष्ट असेल तर आपल्या व्यक्तिगत अधिकारांवर कोठे तरी आच येते म्हणून तो भ्रष्टाचाराला विरोधही करत असतो.

माणूस हा असा आहे. अत्यंत विरोधाभासाने भरलेला. अत्यंत विरोधाभासात असल्याने भयभित असलेला. जेरेमी बेंथ्याम यांनी एक बाब फार छान सांगितली आहे. "माणूस कायदे कसे बनवतो? जे अपराध खरे समाजाचे नैतिक चारित्र्य ढासळवू शकतात त्या अपराधांना सर्वात कमी शिक्षा असते. उदा. भ्रष्टाचार. कारण तो सर्वांनाच हवा असतो. पण असे अपराध जे अपराधी पुन्हा पुन्हा करण्याची शक्यता नसते त्याला मात्र कठोरात कठोर शिक्षा दिली जाते. उदा. खून. कारण बहुतेक खून हे भावनेच्या भरात व व्यक्तिगत सुडापोटी होत असतात. पण त्याला अधिक शिक्षा, कारण तसे आपल्याशी झालेले आपल्याला आवडनार नाही." याचा मतितार्थ एवढाच कि ज्यामुळे समाज अध:पतीत होतो अथवा होऊ शकतो त्याला आणि ज्यामुळे समाजाचे अध:पतन होण्याचे कारण नाही अशा अपराधांत मनुष्य सोयिस्कर फरक करत असतो व तशी नीतिमुल्ये बनवत असतो.

माणसाचा मेंदू अविरत अशा सोयिस्कर गोष्टी शोधण्यामागे असतो. वंश, वर्ण, जाती, पोटजाती या तशा अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना माणूस जपतो कारण त्याला इतरेजनांपासून श्रेष्ठत्व-गंड जपायचा असतो. त्यासाठीही तो तत्वज्ञान बनवतो. जमेल तेवढा तो गंड इतरांवर लादायचा प्रयत्न करतो. उन्मादी भावनेत तो हिंसक होतो, क्रुर होतो आणि विनाश घडवत स्वत:चाही विनाश करून घेतो. जगाचा इतिहास अशा हिंसक/सांस्कृतिक संघर्षाने भरलेला आहे...कोण श्रेष्ठ याचा निकाल लागत नसतांनाही, लागू शकत नसतांनाही पुरातन पोथ्यांत आपले नसलेले आस्तित्व शोधत बसतो... आणि हे सारे निरंतर भयभित असलेला माणुसच करु शकतो हे विशेष!

माणूस हा भयभित प्राणी आहे हे मान्य करत भयनाशाचे परंपरेने चालत आलेले मार्ग वगळता नवीन कोणते मार्ग शोधता येतील यावर आता माणसाने चिंतन करण्याची गरज आहे. आजवरचे मार्ग विफल झाले आहेत हे तर उघड आहे. आधुनिक काळातील माणसाचा संघर्ष...आतला आणि बाहेरचा अधिक टोकदार आणि हिंस्त्र होत आहे. नैसर्गिक भयांची जागा कृत्रीम भयांनीही व्यापलेली आहेत. ती भये निर्माण करत त्याचा फायदा उचलणाराही माणुसच आहे. अन्य धर्मांचे भय, वंशांचे भय, वर्णांचे भय, जातींचे भय...समाजव्यवस्थेचे भय, व्यक्तीसंबंधांचे भय...संस्कृतीचे भय....कृत्रीम भयांची यादी एवढी आहे कि माणसाला भयातच जगायला आवडते कि काय हा प्रश्न पडावा.

भयात रहायचेच आहे तर किमान कृत्रीम भये तरी आम्ही दूर करू शकू काय?  

यच्चयावत विश्वात आपण सध्या तरी एकटेच आहोत. प्रगत आहोत अशी आपली तरी समजूत आहे. पण आपल्या प्रगतीच्या व्याख्या समूळ चुकीच्या आहेत. विश्वात खरेच अन्य जीवसृष्टी सापडली तर तिच्याही भयाने आपण कसे बनू हे आज तरी सांगता येणार नाही...

पण जे बनू ते काही आजपेक्षा चांगले बनू याची काय शाश्वती आहे?


8 comments:

  1. विकास आणि इतिहास

    धर्मनिरपेक्षतेचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शाही इमाम बुखारींची भेट घेऊन आपले 'खायचे दात' दाखवून दिले होते. तोच कित्ता गिरवित भारतीय जनता पक्षानेही आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून विकासपुरुषाच्या मनात लपलेले हिंदुत्व मतदारांना हळूच दाखवून दिले. आर्थिक सुधारणा आणि देशाला जगात महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याच्या गप्पा करणारे दोन्ही पक्ष अखेर धार्मिकतेची नखे बाहेर काढतात, हे दुर्दैवी आहे. पक्षाने नरेंद्र मोदी यांना गेले काही महिने विकासाचा चेहरा म्हणून समोर केले. त्याला अनुसरून आर्थिक सुधारणांपासून तर गूड्स अँड सर्व्हिस टॅक्सपर्यंतच्या मुद्यांची चर्चा जाहीरनाम्यात केली आहे. मात्र त्याचवेळी भाजपच्या मूळ चेहऱ्याची ओळख पुसली जाणार नाही, याचीही काळजी घेतली आहे. राम मंदिराचे बांधकाम, गायीचे रक्षण, भारतीय संस्कृती-परंपरांचे स्मरण, ३७०वे कलम आणि समान नागरी कायद्याचा उल्लेख करून भाजपने आपला परंपरागत मतदार विकासाच्या आवरणामुळे बिथरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेती आहे. विविध प्रकारची अनुदाने, अन्नसुरक्षा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आणि एफडीआय ही भाजपच्या काँग्रेसवरील टीकेची प्रमुख शस्त्रे होती. भाजपच्या जाहीरनाम्यात या सर्व प्रमुख मुद्यांविषयी मोघम भूमिका घेण्यात आली आहे. यूपीए सरकारवरील भाजपच्या टीकेत आर्थिक धोरणांची चिरफाड हा प्रमुख मुद्दा होता; मात्र सार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूक, खासगीकरण, मार्केट इकॉनॉमी, कामगार कायदे याबाबत स्पष्टपणे काही सांगितलेले नाही. 'एक भारत, श्रेष्ठ भारत' आणि 'सबका साथ, सबका विकास' या दोन घोषवाक्यांसह सादर झालेल्या या जाहीरनाम्यात टॅलेन्ट, टुरिझम, ट्रेड, ट्रॅडिशन आणि टेक्नॉलॉजी या पाच 'टीं'वर भर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यापैकी चार 'टीं'बाबत मतभेद असण्याचे कारण नाही; मात्र ट्रॅडिशन अर्थात परंपरा जपण्याच्या नावाखाली पक्षाच्या मनात काय आहे ते अधिक स्पष्ट व्हायला हवे होते. भाजपचा आणि खुद्द नरेंद्र मोदी यांचा इतिहास पाहता ते आवश्यक आहे.

    एकूण हा जाहीरनामा पाहिला तर नवे काही करण्याऐवजी आहे तेच सुधारण्याचा प्रयत्न होणार असल्याचे भाजपने सूचित केले आहे. आपला केवळ रिटेलमधील एफडीआयला विरोध असल्याचे स्पष्ट करीत विदेशी गुंतवणुकीचे आताचेच धोरण राबविण्याचे संकेत पक्ष देतो. भाजपच्या करविषयक सुधारणांविषयी हास्यास्पद दावे सोशल नेटवर्कवर सुरू आहेत. पक्षाच्या जाहीरनाम्यात मात्र करविषयक दहशतवाद संपविण्यात येईल, असा मोघम उल्लेख आहे. जमीन अधिग्रहण कायद्याच्या विरोधात पक्षाने रान उठवले होते; परंतु केवळ नापीक जमिनीचे अधिग्रहण करण्याविषयीची सुधारणा या कायद्यात करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. एखादी जमीन नापीक किंवा नॉन अॅग्रिकल्चर ठरवणे या देशात किती सोपे आहे, याचा अनुभव देश गेली कित्येक वर्षे घेत आहे. भ्रष्टाचारावर जाहीरनाम्यात भाष्य आहे; त्याला तसा अर्थ नाही कारण काँग्रेसला लालुप्रसाद हवे असतात आणि भाजपला येडियुरप्पा. तळागाळाच्या विकासाची काँग्रेसी स्वप्ने आणि परंपरा जपत, देशाला श्रेष्ठत्व मिळवून देण्याची भाषा करणारी, भाजप दाखवत असलेली, स्वप्ने अखेर भ्रष्टाचाराच्या दगडावर आदळून ठेचकाळतात. 'शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करू; मात्र गरज पडल्यास कठोर निर्णय घेऊ,' ही जाहीरनामाम्यात वापरलेली भाषा सत्ता सांभाळण्यातले वास्तव दाखवून देते. शत्रूला संपवून टाकण्याची भाषणबाजी करणाऱ्या मोदींच्या आक्रमकतेला भाळणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे.
    ..........................................................................................

    ReplyDelete
  2. मोदी विरुद्ध मोदी

    विजय चोरमारे

    सहा महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली. स्वतः मोदी यांनी आणि त्यांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठी इरेला पेटलेल्या समर्थकांनी त्यांचे एक भव्य-दिव्य कटआऊट बनवले. त्या कटआऊटकडे मान वर करून पाहताना त्या कटआऊटच्या उंचीएवढी आपली उंची आहे, असे दस्तुरखुद्द मोदी यांना वाटू लागले. मानसिकदृष्ट्या त्या कटआऊटने त्यांचा ताबा घेतला आणि प्रत्येक विरोधी राजकीय घटनेकडे ते तुच्छतेने पाहू लागले.

    देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली आहेत. स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यामध्ये मोदी आणि त्यांच्या पूर्वजांपैकी कुणीही नव्हते. स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे सरकार असतानाच पाकिस्तान, चीनबरोबरची युद्धे झाली. पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याता भारताचा पुढाकार होता आणि काँग्रेस सत्तेवर असतानाच ते घडले. मोदी भाषणांमध्ये भारतीय सैनिकांचे शीर कापून नेल्याची आठवण करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची दर्पोक्ती करतात. परंतु मोदींच्या पक्षाचे सरकार असताना कारगिल घडले आणि पाचशेहून अधिक भारतीय जवान शहीद झाले. काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना कारगिल शहीदांच्या शवपेट्यांच्या व्यवहारामध्ये घोटाळा आपल्याच पक्षाच्या सरकारच्या काळात झाल्याचे ते सोयीस्करपणे विसरतात.

    भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची उजळणी करण्यासाठी अनेक ग्रंथ लिहावे लागतील. गरिबी, निरक्षरता, आरोग्याचे प्रश्न, बेरोजगारी अशा अनेक समस्या आहेत आणि जगातील कुठल्याही राष्ट्रासमोर कमी-अधिक प्रमाणात याच समस्या आहेत. त्यामुळे भारत हा जगातला सर्वाधिक मागास देश आहे आणि त्याचा उद्धार करण्यासाठी नरेंद्र मोदी नावाचा महामानव कुठल्यातरी परक्या ग्रहावरून आला आहे, असे असा प्रचार केला जात आहे.

    गुजरात हा कुठलातरी स्वतंत्र देश आहे आणि त्याचे नंदनवन करून मोदी भारताच्या विकासासाठी पुढे आले आहेत वगैरे वगैरे. (गुजरातच्या सामाजिक विकासाचा पाया बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी घातला आहे, हेही लक्षात घ्यावे लागते. ज्या पायावर गुजरातच्या कथित विकासाचा डोलारा उभा आहे, त्या सरदार सरोवर प्रकल्पासाठी गुजरातमधील काँग्रेस सरकारने योगदान दिले आहे.) गुजरातमधील मानवविकासासंदर्भातील चर्चा गेल्या काही महिन्यांत होत असली तरी ठळकपणे ती लोकांसमोर येणार नाही, याची काळजी सगळीच प्रसारमाध्यमे घेत होती.

    आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात गुजरातचा दौरा केला आणि तिथल्या विकासाचे वास्तव लोकांसमोर आणले. हायवे चकचकीत आहेत, परंतु खुद्द नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अडाणी आणि अंबानी या दोघांना केंद्रस्थानी ठेवून गुजरातचा विकास सुरू असल्याचे केजरीवाल यांनी पुराव्यानिशी मांडले आहे आणि त्याचा प्रतिवाद खुद्द मोदी किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्या-कार्यकर्त्याने केलेला नाही. केजरीवालांना काँग्रेसचे दलाल म्हणून किंवा आम आदमी पक्षाला काँग्रेसची बी टीम म्हणून सुटका करून घेता येत नाही. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे कुणालाही देता आलेली नाहीत, हे वास्तव आहे. गुजरातमधल्या विकासाचे जे चित्र उभे केले जात आहे, ते भ्रामक असल्याचे त्यावरून सिद्ध झाले आहे.

    कॉर्पोरेट सेक्टरच्या मदतीने प्रचार आणि इमेज बिल्डिंगवर करोडो रुपये खर्च करून, प्रसारमाध्यमे विकत घेऊन मोदींनी दिल्लीचा रस्ता धरला आहे. हा रस्ता आपणच निवडला आहे आणि आपण ठरवलेय तिथपर्यंत पोहोचू शकतो, अशी घमेंड त्यांच्या देहबोलीतून आणि भाषणांतूनही दिसून येते. गुजरातसारख्या २६ जागा असलेल्या राज्याचे नेतृत्व करून देशाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहणे समजू शकते. असे स्वप्न कुणीही पाहू शकते. परंतु हे स्वप्न पाहताना एवढ्या विशाल देशाच्या आकांक्षा समजून घेण्याएवढे आपण प्रगल्भ आहोत का, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला तरी उत्तर नकारार्थी येईल.

    दुष्काळाच्या काळात महाराष्ट्रातील गाई-गुरांसाठी दिलेल्या मदतीचे बिल पाठवणारा नेता देशाचे नेतृत्व कसे काय करू शकेल ? भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयींना विकासपुरूष आणि लालकृष्ण अडवाणींना लोहपुरूष म्हटले जाई. अर्थात नेत्यांना आकर्षक लेबले लावण्यात संघपरिवाराचा हात कुणी धरू शकणार नाही.

    contd....

    ReplyDelete
  3. मोदी यांनी त्यावर कडी करून विकासपुरुषही आपणच आणि लोहपुरूषही आपणच अशी प्रतिमा प्रसिद्धीवर करोडो रुपये खर्च करून निर्माण केली. मोदींसकट सगळे लोक एक गोष्ट विसरतात. बारा वर्षांपूर्वी भूकंपामुळे गुजरात उद्ध्वस्त झाला होता, तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्याच्या पुनर्उभारणीची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवली होती. मोदी मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली गुजरातची पुनर्उभारणी झाली, हा इतिहास फार जुना नाही.

    नव्वदच्या दशकात साध्वी ऋतुंभरा वगैरे फायरब्रँड वक्त्या भाजपच्या प्रचारात सक्रीय होत्या. त्यांच्या भाषणांना गर्दी व्हायची, परंतु त्यानंतर धार्मिक तेढ निर्माण व्हायची. त्यामुळे काही उमेदवारांना आपल्या मतदारसंघात त्यांची सभा व्हावी असे वाटायचे. तर त्यांनी आपल्या मतदारसंघात फिरकू नये, असे अनेकांना वाटायचे. आपल्याच पक्षातल्या एखाद्या उमेदवाराचा गेम करण्यासाठी त्याला न विचारता त्यांच्या मतदारसंघात ऋतुंभरा वगैरेंच्या सभा ठेवल्या जायच्या. कल्याण-डोंबिवलीमधून निवडून आलेल्या राम कापसे यांची खासदारकी नंतर अशा वादग्रस्त भाषणामुळेच रद्द झाली होती.

    कापसे यांच्यासारख्या मवाळ प्रकृतीच्या खासदाराच्या मतदारसंघात गरज नसताना या सभेचे आयोजन त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी केले होते. आताच्या निवडणुकीत मोदींच्या सभा गर्दी खेचत असल्या तरी आपल्या मतदारसंघात मोदींची सभा होऊ नये, यासाठी नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेतेही देव पाण्यात घालून बसले आहेत. मोदींची सभा झाल्यास सौहार्द बिघडेल आणि अल्पसंख्य समाजाची मते जातील, ही भीती मुंडे-गडकरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही वाटते. मोदी हे सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जाऊ शकत नाहीत, यावर शिक्कामोर्तब करणारेच हे वास्तव आहे.

    भारतीय जनता पक्षात मोदींच्या विरोधात एक गट आकार घेऊ लागला आहे, हे त्याचेच निदर्शक आहे. क्लब १६० कल्पनेचा उगम त्यातूच झाला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यास उपपंतप्रधानपदी सुषमा स्वराज की अरुण जेटली यांची निवड होणार याची चर्चा आधीच सुरू करण्यात आली आहे. एनडीएला २७२ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी सुषमा स्वराज किंवा लालकृष्ण अडवाणी यांचा पर्याय पुढे आणावा लागेल आणि तसेच व्हावे, असे वाटणारा मोठा वर्ग भाजपमध्ये आहे.

    प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियाचा वापर करून नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिमा भव्य पोस्टरसारखी बनवली आहे. त्यांना स्वतःलाही आपण तेवढे उंच झाल्यासारखे वाटू लागले आहे आणि स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात ते अडकून पडले आहेत. पोस्टरच्या उंचीवरून खाली उतरण्याची त्यांची तयारी नाही त्यामुळेच अबकी बार मोदी सरकार ही त्यांची प्रचाराची मोहीम टिंगलटवाळीचा विषय बनली आहे.
    ............................................................................................................

    ReplyDelete
  4. मोदी आणि मुसलमान : दुसरी बाजू

    अनय जोगळेकर

    "२००२च्या दंगली उगाळत बसणारे लोकं विसरतात की १९६९ साली अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलीत ५०००हून अधिक मुसलमान मारले गेले होते. कॉंग्रेसचे हितेंद्रभाई देसाई हे गुजरातचे मुख्यमंत्री आणि स्व. इंदिरा गांधी तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या. दोषींना शिक्षा होणं दूर, पोलिसांकडून साधं एक आरोपपत्रंही त्यावेळेस ठेवलं गेलं नव्हतं." झफर सरेशवाला

    modi.jpg

    आजपासून सुरू होत असलेल्या लोकसभा निवडणूकांतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी. मोदी आले तर देशातील १५% मुसलमानांशी भेदभाव केला जाईल; त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाईल; देशात ठिकठिकाणी दंगे होतील अशा आवया कॉंग्रेस आणि अन्य तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांकडून उच्चरवाने उठवल्या जात आहेत. गेल्याच आठवड्यात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांना साकडं घालत त्यांना मुसलमानांना कॉंग्रेसच्या मागे उभं रहाण्याचं आवाहन करायला लावलं.

    निवडणूकांचं वातावरण सांप्रदायिकतेच्या मुद्द्यावरून तापलं असताना १ एप्रिल रोजी वरिष्ठ संशोधक आणि स्तंभलेखक मधु पुर्णिमा किश्वर यांचे "मोदी, मुस्लिम्स अ‍ॅंड मिडिया - व्हॉयसेस फ्रॉम नरेंद्र मोदीज गुजरात" हे पुस्तक प्रकाशित झाले. २०१३ साली गुजरातला अनेकदा भेट देऊन, तेथील मुस्लिम समुदायाच्या लोकांशी, २००२ च्या दंगलग्रस्तांशी, सरकारी अधिकाऱ्यांशी आणि खुद्द नरेंद्र मोदींशी साधलेल्या विस्तृत संवादावर आधारित हे पुस्तक मोदी विरोधाची होळी पेटवून त्यावर गेली १२ वर्षं स्वतःची पोळी भाजणाऱ्यांचा बुरखा टरकावते.

    या पुस्तकाची प्रस्तावना ख्यातनाम पटकथा लेखक (आणि हो सलमान खानचे वडील) सलीम खान यांनी लिहली असून ती डोळ्यांत अंजन घालते. २००२ च्या दंग्यांतल्या सहभागासाठी मोदींविरूद्धं लंडनमधून चळवळ चालवणारे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणारे झफर सरेशवाला मोदींचे जवळचे सहकारी कसे बनले याची हकीकत वाचकांना खिळवून ठेवते. आपण सर्वांनी हे पुस्तकं वाचावं म्हणून मी त्यातील सरेशवालांच्या कहाणीचा थोडासा स्वैर अनुवाद सारांशरूपाने तुमच्यासमोर मांडत आहे.

    सरेशवाला म्हणतात, सौदी अरेबियातून सुमारे २५० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये स्थायिक झालेल्या सुन्नी बोहरा समाजातील मी एक. अत्यंत कर्मठ मुसलमान असूनही आम्ही शिक्षण व उद्योगांत मोठी प्रगती केली आहे. २००२च्या दंगली उगाळत बसणारे लोकं विसरतात की १९६९ साली अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलीत ५०००हून अधिक मुसलमान मारले गेले होते. कॉंग्रेसचे हितेंद्रभाई देसाई मुख्यमंत्री आणि स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या.

    दोषींना शिक्षा होणं दूर, पोलिसांकडून साधं एक आरोपपत्रंही ठेवलं गेलं नव्हतं. १९८५ ते २००२ सालापर्यंत, जवळपास दर २-३ महिन्यांनी दंगे व्हायचे. कर्फ्यू लागायचे. कॉंग्रेस राजवटीत झालेल्या या दंग्यांमध्ये अनेकदा आमचं घर, ऑफिस किंवा फॅक्टरी जाळली गेली. विमा काढला असूनही त्याचे पूर्ण पैसे मिळायचे नाहीत. कदाचित २००२ च्या दंगली २४x७ टीव्ही आणि इंटरनेट युगात झाल्यामुळे त्या इतरांपेक्षा उठून दिसतात.

    २००२च्या दंगलींच्या वेळेस मी इंग्लंडमध्ये असलो तरी त्यात आमच्या कुटुंबाच्या व्यवसायाची वाताहत झाली. इंग्लंडला माझ्या आजूबाजूला रहाणारे ३ मुस्लिम रहिवासी या काळात गुजरातमध्ये गेले असता दंगलींत मारले गेले. आम्ही एकत्र येऊन मोदींना आणि गुजरात सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले. तत्कालिन गृहमंत्री लाल कृष्ण आडवाणींना अटक होण्याच्या भीतीने आपला इंग्लंड दौरा रद्द करावा लागला.

    एका रात्रीत मी "हिरो" ठरलो पण आपण यातून काय साध्य केलं या विचाराने मी अस्वस्थ होतो. इग्लंडमध्ये असताना जगभरातील मुसलमानांची स्थिती मी जवळून पाहिली. मुस्लिम जगात सर्वत्रं युद्धं, दहशतवाद आणि यादवीमुळे करोडो लोकं देशोधडीला लागले असून स्वतःच्या किंवा दुसऱ्या देशांत निर्वासितांसारखे जगत आहेत.

    त्यांच्या दुःखाचं भांडवल करणारे; त्यांना वाटाघाटींपासून परावृत्त करून संघर्ष चालू ठेवायला भाग पाडणारे लोकं, स्वतः मात्र दुसऱ्या देशांमध्ये रहातात. आलिशान ऑफिसं थाटून त्यातून इमेल पाठवणे किंवा मिडियात आंदोलनं करून लाखो डॉलरच्या देणग्या आणि सात आकडी पगार मिळवतात.

    मुस्लिम सर्व एक आहेत असा माझा तोपर्यंत समज होता. गुजरात दंगलग्रस्तांसाठी मदत गोळा करताना तो दूर झाला. अरब हे अरब आहेत आणि पाकिस्तानी हे पाकिस्तानी आहेत. भारतातही लखनौचे मुस्लिम हे गुजरातच्या मुसलमानांपेक्षा वेगळे आणि सुरतचे मुस्लिम हे अहमदाबादच्या मुसलमानांपेक्षा वेगळे असून गरज पडल्यास कोणी कोणासाठी धावून जात नसल्याचा प्रत्यय आला.

    contd....

    ReplyDelete
  5. त्यावेळेस इस्रायल आणि पॅलेस्टिनी लोकांच्यात भयंकर संहार सुरू असूनही त्यांनी शांतता वाटाघाटींना सुरूवात केली. जर गेल्या ६० हून अधिक वर्षांपासून लढणारे हे लोकं एकमेकांशी बोलू शकतात तर आपण का नाही? पण बोलणार तर कोणाशी? थेट मोदींशीच बोलायचे का? का नको? मोदी काही कोणी परके नाहीत. अहमदाबादच्या बाजूच्या आणि मुस्लिम वस्ती असलेल्या वडनगरमध्ये ते मोठे झाले. दोन तृतियांश मताधिक्याने ते पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते.

    त्यांना आणि गुजरात सरकारला वाळीत टाकले तर सर्वाधिक नुकसान गुजराती मुसलमानांचेच होणार होते. आम्हालाही शाळा, दवाखाने, मदरसे चालवायला प्रशासनाची मदत लागतेच. म्हणून मी याबाबत अनेक मौलवींशी चर्चा केली. कुराण आणि हदीथचे दाखले देत त्यांनी सांगितले की, जर तुमचा हेतु स्वच्छ असेल तर शांतता आणि सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी अगदी शत्रूशीही बोलणी करण्यास इस्लामची मान्यता आहे.

    पण मोदी आमच्याशी बोलतील का? गेली दोन वर्षं आम्ही त्यांच्याविरूद्धं आग ओकत होतो. हिटलर आणि अन्य क्रूरकर्म्यांशी आम्ही त्यांची तुलना करत होतो. तेव्हा मी माझे मित्र सिनेनिर्माते महेश भट यांचा सल्ला घेतला. त्यांनी आपले पत्रकार मित्र रजत शर्मांच्या माध्यमातून मोदींशी आमची भेट घडवून आणण्याची व्यवस्था केली. ऑगस्ट २००३ मध्ये पहिल्या "व्हायब्रंट गुजरात" परिषदेच्या प्रसारासाठी मोदी इंग्लंडला येणार होते.

    वेंब्लीच्या कुठल्यातरी हॉलमध्ये भेटायला त्यांनी सांगितले पण आम्ही एकांतातील भेटीसाठी आडून बसलो तेव्हा मोदींनी ते रहात असलेल्या जेम्स कोर्ट येथे भेटायला बोलावले. मी मोदींना भेटणार आहे हे कळताच तोपर्यंत स्तुतीवर्षाव करणारे लोकं माझ्यावर तुटून पडले. माझा धिक्कार करणाऱ्या ११०० इ-मेल मला आल्या. तरीही मी मागे हटलो नाही. मी म्हटलं की, हाच माझा जिहाद आहे.

    आमचे स्वागत करायला मोदी स्वतः लिफ्टपर्यंत आले होते. "या मित्रांनो" असं म्हणत अत्यंत आदबीनं त्यांनी अमचं स्वागत केले. आम्ही थेट मुद्द्यालाच हात घातला. तुम्ही ५ कोटी गुजरातींची भाषा करता, त्यात ६० लाख मुसलमान समाविष्ट आहेत का नाही? तुम्ही इथे व्हायब्रंट गुजरातच्या नावाखाली आर्थिक विकासाची गोष्टं करता पण सामाजिक न्यायाचं काय? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता कशी नांदेल. हा प्रश्नं फक्त दंगलींची झळ बसलेल्या मुसलमानांचा नाही तर हिंदूंचाही आहे.

    contd....

    ReplyDelete
  6. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका बड्या उद्योगपतीने घड्याळाकडे बघालया सुरूवात केली असता मोदींनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, आजची संध्याकाळ मी या लोकांबरोबर घालवणार असून माझे बाकीचे सर्व कार्यक्रम रद्द करा. माझ्याबरोबर आलेल्या मौलवी इसा मन्सूरींनी तर मोदींना धारेवरच धरलं. तब्बल दीड तास त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आम्ही त्यांना सुनावले की, या दंगलीत जे झाले त्याची जबाबदारी शेवटी मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर येते.

    मोदींनी आम्हाला शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी सांगितलं की, गुजरातच्या हिंदूंप्रमाणेच मुसलमानही माझेच आहेत. जेव्हा मी नर्मदेचं पाणी साबरमतीत आणलं तेव्हा त्याचा फायदा मुसलमानांनाही तेवढाच झाला. दंगलींबाबत करण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी अतिशय मुद्देसूद उत्तरं दिली. तथ्यहीन व अतिशयोक्तीपूर्ण आरोप त्यांनी पुरावे आणि आकडेवारीनिशी खोडून काढले. जिथे प्रशासनाच्या तृटी राहिल्या त्या त्यांनी खुलेपणाने मान्य केल्या.

    गुजरात दंगलींपूर्वी केवळ ४ महिने आधी ते मुख्यमंत्री झाले होते आणि केवळ ३ दिवस आधी राजकोट विधानसभेच्या पोटनिवडणूकीत ते विजयी झाले होते. त्यापूर्वी ना कधी ते आमदार होते ना सरकारात त्यांनी कोणती जबाबदारी पार पाडली होती. मुख्यमंत्री व्हायच्या आधीची ६ वर्षं ते राष्ट्रीय राजकारणात असल्याने गुजरातबाहेरच राहिले होते.

    या त्यांच्या मुद्यांमध्ये तथ्य असल्याचं आम्हाला पटलं. "हा कलंक माझ्या कारकिर्दीत लागला असून मलाच तो धुवावा लागणार आहे" अशा शब्दांत त्यांनी दंगलींची जबाबदारी स्वतःकडे घेतली. नरेंद्र मोदी दंगलींबद्दल माफी मागत नाहीत असा अनेकांचा आक्षेप असतो. पण आपली न्यायव्यवस्थाही "सॉरी" म्हटलं म्हणून कोणाचे गुन्हे माफ करत नाही. मी दोषी असेल्याचं सिद्धं झाल्यास मला भर चौकात फाशी द्या असं मोदी सांगतात.

    यापूर्वी गुजरातमध्ये एवढ्या दंगली झाल्या पण कॉंग्रेसच्या एकाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आमचे म्हणणे मांडायला संधी दिली नाही. १९९२च्या दंगलींनंतर पंतप्रधान नरसिंहा राव यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात माझे काका होते. त्यांना ४ दिवस ताटकळत ठेऊन पंतप्रधानांनी शेवटी भेट दिलीच नाही असं सरेशवाला सांगतात. या भेटीपासून सुरू झालेल्या मोदींसोबतच्या मैत्रीबाबत बोलताना ते कशाप्रकारे गेल्या १० वर्षांमध्ये गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही, आधी गुजरातमध्ये मुस्लिम शाळा काढणे दूरास्पद होते ते आता किती सहजशक्य झाले आहे आणि गुजरातच्या मुसलमानांनी कशा प्रकारे आर्थिक प्रगती केली आहे याचे अनेक दाखले देतात.

    contd....

    ReplyDelete
  7. दुसरीकडे मोदीविरोधी ब्रिगेडमधील तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार कशा प्रकारे दंगलींची केवळ एकच बाजू दाखवतात, दंगलींमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी असलेल्या कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या सहभागाबद्दल मूग गिळून गप्प बसतात, स्वतः मुंबईत राहून गुजरातच्या मुसलमानांबद्दल नक्राश्रू ढाळतात आणि कशा प्रकारे दंगलग्रस्तांच्या जखमा भळभळत राहतील यासाठी प्रयत्नं करतात याबद्दलही ते भरभरून बोलतात.

    आजवर मोदींची एवढी स्तुती ऐकायची सवय नसल्याने मधु किश्वर यांनी यातील शक्य तेवढ्या संवादांचे व्हिडिओ चित्रिकरण केले असून सरेशवालांच्या कहाणीची महेश भट आणि रजत शर्मांकडून खातरजमा केली आहे. पुस्तकाचा भर गुजरात दंगली, नरेंद्र मोदींना खलनायक ठरवण्यासाठी कॉंग्रेस तसेच मिडिया आणि सामाजिक संस्थांच्या एका गटाने गेली १२ वर्षं अविरतपणे चालवलेली मोहिम आणि गुजरातमधील मुसलमानांचा विकास या विषयांवर असला तरी ते कोणत्या पार्श्वभूमीवर मोदींची गुजरातमध्ये थेट मुख्यमंत्री म्हणून पाठवणी करण्यात आली, मोदींच्या नियुक्तीवर नाराज असलेल्या भाजपाच्या विविध गटांनी त्यांना कशा प्रकारे त्रास दिला, मोदींनी अल्पावधीतच कशा प्रकारे प्रशासन व्यवस्थेवर पकड मिळवली आणि भ्रष्टाचारमुक्त, कार्यक्षम आणि संवेदनशील व्यवस्था कशाप्रकारे निर्माण केली यावरही प्रकाश टाकते.

    २६ जानेवारी २००१ला कच्छला देशातील सर्वात मोठा भूकंप झाला. त्यानंतर ९ महिन्यांनी मोदींची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. तोपर्यंत भूकंपग्रस्तांचे हाल कुत्रं खात नव्हतं. ते न पाहवल्याने कच्छमध्ये तळ ठोकून सामान्य माणसांच्या दुःखात सहभागी होणारे; त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह जेवणारे, त्यांचे आश्रू पुसणारे मोदी या पुस्तकातून आपल्या समोर येतात तेव्हा रांगडी आणि पोलादी प्रतिमा उभी केलेल्या मोदींचे मन किती संवेदनशील आहे याचा आपल्याला प्रत्यय येतो.

    देशातल्या सर्वात मागास जिल्ह्यांत समावेश असलेल्या कच्छला नरेंद्र मोदींनी कशा प्रकार देशातील सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत पोहचवले (यावर गेल्या वर्षी मी कच्छला भेट देऊन आल्यानंतर "जेव्हा कासव धावू लागते http://goo.gl/iBPQNd हा लेख लिहिला होता) याची कहाणीही रोचक आहे.

    मोदींवर काय वाट्टेल ती टीका करणारे असंख्य लोकं आहेत आणि त्यात समाजातील अनेक मान्यवरांचाही समावेश आहे. दुसरीकडे "मोदींसाठी काय पण" असाही एक वर्ग आपल्याला इंटरनेट आणि सोशल मिडियावर हमखास भेटतो. त्यामुळे कुंपणावरच्या माणसांची स्थिती गोंधळल्यासारखी होते. मधु किश्वर यांनी स्वतः २००२ च्या दंगलींनंतर मोदींवर टीका करणारे अनेक लेख लिहिले होते.

    २०१३ साली स्वतः केलेल्या अभ्यास दौऱ्यानंतर त्यांचे मनःपरिवर्तन झाले. या पुस्तकात अनेक लोकांच्या मुलाखती त्यांच्या शब्दात मांडल्या असल्याने काही गोष्टी आणि उल्लेख पुन्हा पुन्हा येतात. तेवढा भाग सोडला तर हे पुस्तक मनाचा ठाव घेते. या निवडणूकींत मतदान करण्यापूर्वी शक्य झाल्यास हे पुस्तक वाचा असं सुचवायला मला आवडेल.
    http://www.amazon.in/Modi-Muslims-Media-Voices-Narendra/dp/8192935205
    .......................................................................................................

    ReplyDelete
  8. 'अब की बार'मुळे 'आ बैल मुझे मार'!

    एका 'चुनावी' घोषणेने देशभर वेगळ्याच अर्थाने धुमाकूळ सुरू केल्याने भाजपमध्ये मोदी लाटेइतक्याच आनंद, आश्चर्य आणि शंकांच्याही लाटा उसळू लागल्या आहेत. 'अब की बार मोदी सरकार' ही घोषणा कुठेही ऐकू आली, की 'आ बैल मुझे मार' अशा अवस्थेचा अनुभव भाजपवाल्यांना येऊ लागला आहे. प्रचारापेक्षाही, 'करमणुकीचा मुद्दा' म्हणूनच ही घोषणा लोकप्रिय होऊ लागली आहे.
    निवडणुका आणि प्रेमभावना यांचा तसा फारसा संबंध नाही. तरीही, 'अब की बार' घोषणेने प्रेम, मैत्री, अशा भावनांनानही आपलेसे केलेले दिसते.. 'बॉयफेंड्र अँड गर्लफ्रेंड किसिंग इन कार'.. अशा 'गॉसिपिंग' सुरातील तरुणाईच्या गप्पांनाही, 'अब की बार मोदी सरकार' घोषणेचा आधार मिळाला आहे. ते प्रेमी कधी एकमेकांवर लटके चिडतात, आणि रागाने तो म्हणतो, 'भाड में गया तेरा प्यार'.. मग तीही तणाव हलका करण्यासाठी बोलून जाते, 'अब की बार मोदी सरकार'.. मग दोघंही खळखळून हसतात. शेजारून जाणारा एखादा कार्यकर्ताही लाजून हसतो..
    फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल साइट्सवर तर या घोषणेवरून विनोदाची आतषबाजी सुरू आहे. या विनोदात राजकीय पातळी वा काव्यही नाही. तरीही हे विनोद वेगाने पसरत असून त्याच्या प्रतिसादांतही नवी विनोदनिर्मिती होऊ लागल्याने, अनेकांच्या काव्यप्रतिभेस बहर येऊ लागला आहे.. 'दो और दो होते है चार', असं कुणी सहजपणे बोलून गेलं, तरी 'पुढची ओळ' लगेचच तयार असते..
    काही विनोदांत मात्र, राजकीय ईष्र्यादेखील डोकावते. 'आप'चा ताप सुरू झाल्यापासून भाजपसमर्थक हे केजरीवाल यांच्यावरील टीकेचे निमित्तच शोधत होते. या विनोद प्रकारामुळे ते मिळाले, आणि 'करेंगे पंक्चर केजरू की वॉगनार, अब की बार मोदी सरकार' अशी घोषणा जन्माला आली.. त्यावर प्रत्युत्तर म्हणून कुणीतरी सहज विनोद केला, 'मोदी ने सीखा आलोकनाथ से संस्कार'.. त्यावरही उत्तर मिळाले, 'अब की बार मोदी सरकार'!
    सिगरेट में होता है टार, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, राहुल खाए चोको बार, दारू पीने चले बार, पराठों के साथ अच्छा अचार, चटनी बिना ढोकला बेकार, आय ट्राइड हार्ड अँड गॉट सो फार, कोल्ड्रिंक पीकर आती डकार, सन्नी देओल की आयेगी बहार, धोती कुर्ता आम का अचार, साजन की आखो मे देखा है प्यार, देखा तुझे यार दिल मे बजी है तार, दिल का भंवर करे पुकार.. कॉमरेड हो रहे सत्तर के पार, या साऱ्या ओळींना जोडणारीदेखील एकच घोषणा सगळीकडे घुमते आहे.. अब की बार मोदी सरकार!
    आता हा प्रकार अति होऊ लागल्याने, कुणी तरी म्हणे एकच उत्तर दिलंय.. मत करो ऐसा गंदा प्रचार, अब की बार मोदी सरकार! अबकी बार, मोदी का फुटेगा बार! शीला तो हारी, अब मोदी कि बारी! अबकी बार, मोदी कि हार!
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...