Monday, May 26, 2014

त्यांचे विचार धर्म बनत नाहीत.....

प्रत्येक विचारव्युहासाठी एक दुसरा विरोधी विचारव्यूह असतोच. कोणताही विचारव्यूह हा अंतिम नसतो हे जरी खरे मानले तरी विविध विचारव्युहांचे अस्तित्व असणे हेच मानवाला पुढे नेत आले आहे. भावनिक लाटांवर जे वाहवत जातात त्यांचे नाते कोणत्याही विचाराशी नसते हेही एक वास्तव आहे. काल ज्यांचे जयजयकार केले त्यांना पायतळी तुडवनारे उद्या आज ज्यांचा जयजयकार करते त्यांनाही पायतळी तुडवणार नाही असे नाही. जयजयकार करनारे कालही मुर्ख असतात...

आजही आणि उद्याही.

जगाचे अधिकाधिक नुकसान या भावनांच्या लाटांवर हिंदोळणा-या लोकांनी केले आहे. चोराला सोदा पण येशुला सुळावर चढवा असे म्हणनारे असेच भावनिक मुर्ख होते. गांधींना ठार मारा...देश वाचवा असे म्हणनारेही हेच मुर्खांचे नंदनवन होते. त्यांनी येशुला मारले, त्यांनी गांधीजींना मारले.

हरकत नाही. नवीन विचारव्यूह समजावून घेण्यातील सामान्य माणसांची ती मुलभूत अडचण असते. ते मेले, काही फरक पडत नाही. ज्यांना विरोधी विचारव्युहांचे अस्तित्वच मान्य करायचे नसते, विरोधी विचारांना ज्यांना हिंसेनेच संपवायचेच असते ते घडीभर जिंकतात....

पण त्यांचे विचार धर्म बनत नाहीत हाही एक इतिहास आहे.

एका कट्टर संघ कार्यकर्त्याला देशाच्या नेतृत्वाची धुरा डोक्यावर घ्यायची असतांना राजघाटावर जावेच लागते हा विजय गांधीजींचा आहे...रा. स्व. संघाचा अथवा सावरकरवाद्यांचा नाही. कट्टर हिंदुत्ववाद्यांना फाट्यावर मारत शरीफला बोलवावे लागते आणि त्याचे केविलवाने समर्थन संघवाद्यांनाही करावे लागते यात पराजित विचारव्युहाची दिशा दिसते.

प्रेयसीच्या आंधळ्या का होईना प्रेमात पडणे हे माणसासाठी नैसर्गिक आहे. नेत्यांच्या प्रेमात अंधपणे पडणे याला मात्र मुर्खपणा म्हनतात. विचारांच्या प्रेमात पडणे अथवा विचारविरोधक असणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. पण विचारांचाच थांगपत्ता नसतांना व्यक्तीच्या प्रेमात पडने यात प्रेमभंगाचीच अधिक शक्यता असते हे आम्ही लक्षात घेणार नाही हेही मला माहित आहे.

काही महिन्यांपुर्वी केजरीवालांच्या प्रेमात पडनारे अगणित मी पाहिले होते...ते आज कोठे आहेत हे शोधावे लागते, हे केजरीवालांचे नव्हे आमचे दुर्दैव आहे. आमच्याच कर्तुत्वहीण भावनांतून निर्माण झालेल्या, अस्तित्वात नसलेल्या कर्तुत्ववान नेत्यांच्या शोधातील आमच्याच हाती आलेले हे एक शून्य आहे. हे आम्हाला कधी कळेल?

हा देश घटनेमुळे एक नसून आमच्या राष्ट्रहीन भावनेने आम्ही विखुरलेले असल्याने एक आहे....हा विरोधाभास आहे खरा. पण विचार करा....आम्ही बळे हरवलेले वांझ लोक आहोत. आम्हाला लोकशाही पाहिजे पण लोकशाहीची मुलतत्वे आम्हाला पाळायची नाहीत. आम्हाला हुकुमशहाही हवा आहे पण मग हुकुमशाहीची नैसर्गिक अव्यवस्था झेलायचीही आमची तयारी नाही.

आम्ही वास्तवात नव्हे तर स्वप्नील जगात जगणे निवडतो. आम्हाला वास्तव हवेच कोठे आहे?

असो. माझे असंख्य वाचक मला शिव्या देतात, टीका करतात...ते त्यांचे स्वातंत्र्य आहे. मी मोदींवर टीका करतो हे माझ्या निकटतम प्रत्यक्ष ओळखीतील मित्रांनाही आवडत नाही...मी रा. स्व. संघावर तुटुन पडतो तेही खुपजणांना आवडत नाही. कोणालाही आपल्यावर टीका करुन घ्यायची हौस नसते.

प्रश्न विचारव्युहांचा असतो. आणि मला समजा एक विचारव्यूह कोणत्याही आधारावर पसंत नाही तो मला पसंत पडावाच हा अट्ट्टाग्रह कशासाठी?

मला माझा विचार आहे आणि त्याशी मी प्रामाणिक आहे. तुमच्या विचारांशी तुमच्या प्रामाणिकतेवर जर मी संशय घेत नाही, तर माझ्या अथवा माझ्या समविचारींच्या विचारांशी फालतू शंका का घेता?

एकच लक्षात घ्या...

राजकीय लोकशाहीत संख्येचे फार महत्व असते....

वैचारिक लोकशाहीत संख्याबलाने कसलेही विजय प्राप्त होत नसतात!

3 comments:

  1. आप्पा - अरे या संजयला नाट्य आणि वास्तव यातला फरकच समजत नाही !अगदीच कोरे मडके निघाले की रे !
    बाप्पा - मी तर म्हणतो आपण त्याला चार गोष्टी सांगून बघू या !
    आप्पा - मोदी हा काही भावनांच्या लाटेवर निवडून आला नाही !
    बाप्पा - संजयचे इथेच तर चुकते - तो एक सिद्धांत मांडतो आणि आपले विचार खपवतो , पण हि पद्धत कमकुवत आहे ! सदोष आहे !
    आप्पा - समज कम्युनिस्ट सर्व भारतभर जिंकून आले असते ,
    तरी त्यांनीही राजघाटाला भेट दिली असती !अशीच फुले वाहिली असती !
    बाप्पा - पक्ष भाजप असो वा काँग्रेस - नोटेवर गांधी राहणारच !त्यात संघ आणि इतर निष्ठांचा काहीच प्रश्न नाही , हे आता सर्वमान्य रीतीरिवाज आहेत !आणि हा परिपक्वपणा भाजप दाखवतो आहे ते संजयला समजत नाही असे कसे असेल ?
    आप्पा - गाडलेली भुते परत उखडणे हा संजयचा आवडता उद्योग आहेच हे आपण त्याच्या इतर लेखांवरून ओळखतोच !हि त्याची सवयच आहे !
    बाप्पा - कसले विचारव्यूह ?किती धेडगुजरी शब्द आहे हा !आणि इतके महा सत्तांतर खुद्द भाजपलाही अपेक्षित नव्हते हा फारच महान मुद्दा आहे !युवापिढी ही इतकी निराश झाली आहे आणि मध्यमम वर्ग भ्रष्टाचाराला इतका वैतागला आहे ,की त्यांनी हे मतपेटीतून राग व्यक्त करून सत्ता उलथवली आहे -पाकिस्तान किंवा इतर देशात सशस्त्र क्रांतीच झाली असती !
    आप्पा - सोनियापण सांगत आहे की आपण लोकांचा राग ओळखण्यात कमी पडलो , मग उगीचच यात विचारचक्र असले अर्थहीन कोरडे शब्द वापरायचे प्रयोजनच काय ?
    बाप्पा - परवा कुणीतरी बोलले की कोन्ग्रेस विरोधात मुकी गाढवे उभी केली असती तर तीसुद्धा निवडून आली असती - ते १०० टक्के खरे आहे
    आप्पा - छत्रपतीनी वेगळे राज्य का स्थापले , तर त्याना घराणेशाही चालवायची होती
    म्हणून नव्हे ! परिस्थितीची ती मागणी होती तसेच कट्टर संघ कार्यकर्ता जरी पंत प्रधान झाला किंवा कट्टर कम्युनिस्ट जरी सत्ताधीश बनला तरी त्याला आता या लोकशाहीच्या चौकटीतच काम करावे लागेल हि भारताच्या लोकशाहीच्या विजयाची पोच पावतीच नाही का ? ही परिस्थितीची गरज आहे ! मोदींच्या खाजगी जीवनाबद्दल विधाने करण्यापर्यंत कॉंग्रेसने खालची पातळी गाठली,पण आजही सोनिया आणि राहुल शपथविधीला हजर होते ही आपल्या निरोगी लोकशाहीची निशाणी आहे - ती सर्व पक्षांनी रुजवली आहे !आणीबाणीने आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या असे म्हणता येईल !
    बाप्पा - हुश्श ! किती मोठ्ठे भाषणच की रे ,मलातर तू छुपा संघवाला वाटायचास पण तू तर पक्का लोकशाहीचा झेंडा घेऊन हिंडणारा वाटतोस
    आप्पा - सांगतो काय , आज नेहरू हवे होते असे वाटते रे !त्यांनी यापेक्षा उमदी प्रतिक्रिया दिली असती , या संजयला आणि हेच नेमके कळत नाही -पं नेहरू यांची लोकशाहीवर नितांत श्रद्धा होती !
    बाप्पा - पण हा नकली गरीबीचा कळवळा , मुस्लिमांचे लांगुलचालन क़ोरडा समाजवाद आणि आचरट निधर्मीपणा ही पण पं नेहरू यांचीच देणगी आहे !
    आप्पा - गरीबी ही सरकारी योजनेने हटत नाही , ती स्वतःच हटवावी लागते त्यासाठी आपणच परिस्थितीशी झगडावे लागते !
    बाप्पा -पूर्वी कोकणातून अर्धपोटी ब्राह्मण पुणे मुंबईत येउन शिकायचे , माधुकरी हा त्यावेळचा सामाजिक उदारतेचा प्रकार अभ्यास करण्या सारखा आहे !कोणतीही सरकारी अनुदाने नसताना हि मुले शिकून मोठ्ठी होत असत , पेशवेकाळातील रामशास्त्री प्रभुणे यांची बालपणीची आठवण बरेच काही शिकवून जाते
    आप्पा - त्यांचे मालकाचे पाय धुताना भिकबाळी कडे लक्ष जाउन त्यांना मालकाचा मार खावा लागतो - -
    बाप्पा - तेच ते ! भाषणातून मोदी यानी म गांधींच्या चळवळीचा सुंदर उल्लेख केला आहे ,
    सत्याचे प्रयोग हे खरोखरच फारच सुंदर पुस्तक आहे आणि मोदी यांनी
    म गांधी यांच्या चळवळींचा आणि पं दीनदयाळ यांचापण उल्लेख केला हे कसले लक्षण आहे ?
    आप्पा - दोन वेगळे विचार एकत्र आणण्याचा तर प्रयत्न नाहीना ?आपला देश आणि इथला माणूस समजून घेणे हे भल्या भल्यांना जमत नाही !नरेंद्र मोडी यांच्या हाती जे यश आले आहे त्याचे उघड कौतुक करण्यात काहीच पाप नाही !

    ReplyDelete
  2. Sanjay sir,
    That's spirit. Keep it up!

    ReplyDelete
  3. कुणी लिहिले आहे हे ? अनानिमसाची टिपण्णी मार्मिक झाली आहे !
    संजय सरांचे बरेच काही चुकते त्यांची विचाराची बैठकच चुकीची आहे त्याला
    ते तरी काय करणार ?
    तसे पाहिले तर , अनेकांचे बरेच काही चुकते आहे ! सर्व समाजाला आपण ब्राह्मण द्वेषाचा कायमचा उत्तम डोस दिला आहे आणि ती बाजू आता भक्कम झाली आहे हा भ्रम आता दूर झाला आहे ! पवार काका पुतणे आणि इतर मराठा वर्ग यांची इतकी ससेहोलपट झाली की त्याना तोंड लपवायला जागाच नाही !फक्त पारंपारिक आदरामुळे त्यांची या भीषण भ्रष्टाचाराच्या विळख्यातून सुटका होईल !अजित पवार यांचा उद्धट पणा तर किळस येण्याइतका घाण आहे हे अनेकांनी अनुभवले आहे !
    संजय सोनावणी यांची बैठक ब्राह्मण द्वेषाची आहे हे श्री ह मो मराठे प्रकरणा पासून सर्वाना माहिती झाले आहे ,फक्त त्यांची मांडणी एखाद्या वकीलासारखी तिरपागडी असते इतकेच -

    आपल्याकडे अतिशय महान विचारवंत ,इतिहासकार होऊन गेले ,थोर द्रष्टे आणि समाजसुधारक झाले ,त्यात बहुतांशी ब्राह्मण वर्ग असणे स्वाभाविक आहे कारण शिक्षणाची पारंपारिक पार्श्वभूमी लाभलेला हा वर्ग आहे त्यामुळे तसे होणे स्वाभाविकच आहे ,पण ब्राह्मणांवर हा जो आरोप होतो की त्यांनी इतर जातीना शिक्षणापासून वंचित ठेवले ते तितकेसे बरोबर नाही !कारण अगदी परवा परवा पर्यंत इतर जातीत शिक्षणाची प्रवृत्ती एकंदरीत कमीच होती -
    मराठा वर्गाला क्षात्रतेज दाखवणे जसे कर्तव्य वाटते तसेच शिक्षणाबाबत ब्राह्मणांचे आहे असे म्हणता येईल ,ब्राह्मणांनी कालपरत्वे आपले क्षात्र तेजही दाखवले हेही नजरेआड करता येत नाही !असो !
    पण कायमच इतर जातींच्या मागासलेपणाचा ठपका ब्राह्मणांवर ठेवत त्याना दोष देण्याची प्रवृत्ती हानिकारक आहे आणि त्यामुळे इतर जातींची आत्मघाताची कक्षा रुंदावत गेली हेही कटू सत्य आहे !
    अनेक वेळा थेट भ इ सं मं संशोधित महाभारताची साक्ष काढत संजय सर अनेक गोष्टी प्रक्षिप्त आहेत असे सांगतात पण आधार घेण्याची आणि उपमा आणि नाट्य निर्माण करण्याची वेळ आली की एकलव्य आणि इतर गोष्टींचा उपयोग करताना दिसतात हे हास्यास्पद आहे !
    महाभारताची आत्ताच्या राजकारणाच्या संदर्भात कल्पना करणे हास्यास्पद आहे !
    नरेंद्र मोदी यांनी विचार मांडला आणि सुंदर रीतीने तो लोकांपर्यंत पोचवला ( उत्तम मार्केटिंग केले असे म्हणा हवेतर )पण
    १२ वर्षात एकही जातीय दंगल न होऊ देणे , सरदार सरोवर सारखी भव्य योजना राबवणे आणि मेघा पाटकर सारख्या नावाजलेल्यांना बाजूला ठेवत ती पूर्ण करणे , आपल्या प्रांताच्या विकासाचा ध्यास घेणे या प्रकारच्या विचारा संदर्भात , महाराष्ट्रात काय दिसते , फक्त भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणा = मग ती काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस !
    एसेम आणि लोहिया या काळात समाजवादी पक्षात सुद्धा कार्यकर्त्यांची ताकद ही महत्वाची बाब होती
    राष्ट्रसेवा दल आणि निळू फुले ,अण्णाभाऊ साठे राम नगरकर , अमरशेख असे कार्यकर्ते होऊन गेले
    तशीच परंपरा संघात दिसते ,विचारधारा वेगळ्या असल्या तरी निष्ठेबाबत कुणीही शंका घेणार नाही ,सर्व आपलेच ,
    पण कोन्ग्रेसने सत्तेमुळे जनसंपर्क तोडल्यामुळे यांना जी सुवर्णसंधी होती ती यांनी गमावली आणि महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष जवळ जवळ जमीनदोस्त झाला , शेकापच्या रूपाने काही अंशी कार्य चालू होते ,पण मूलतः रा स्व संघाने आपले विचार गढूळ न होऊ देता संघटना बांधली आणि अनेक रूपाने समाजकार्य साधले !आसाम मध्ये बघितले तरी त्याची प्रचीती येते ! असो !
    समाजाशी संपर्क तुटण्याची कॉंग्रेसने एक प्रकारे शिक्षा भोगली आहे असे म्हणता येईल !

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...