Tuesday, June 10, 2014

आनंद यादव व न्यायालयिन निकाल...


आनंद यादव यांच्या "संतसूर्य तुकाराम" आणि "लोकसखा ज्ञानेश्वर" या कादंब-यांच्या संदर्भात दाखल झालेल्या बदनामीच्या खटल्याचा न्या. सौ. के. पी. जैन यांनी दिलेला संपुर्ण निकाल वाचला. (सौजन्य, माझे मित्र सागर भंडारे.)

संतसूर्य तुकारामबाबत वाद झाला तेंव्हापासून मी या बाबतीत विविध वृत्तपत्रांतून प्रतिक्रिया देत होतो, अनेक लेखही लिहिले होते. शिवराज काटकर यांनी त्यांच्या "कृष्णाकाठ" या दिपावली अंकात या संदर्भात घेतलेल्या परिसंवादात मी व स्वत: डा. आनंद यादवही सहभागी झाले होते. दै. प्रभात मद्ध्ये एका निवेदनात मी वारक-यांचा विरोध केला होता, त्यावर बंडातात्या क-हाडकर माझ्यावर प्रचंड संतापले होते. असो. आजव्र मी मांडलेले मुद्दे आणि हा खटला यावर साधक-बाधक मुद्दे मांडतो.

१. "संतसूर्य तुकाराम" ही एक अत्यंत फालतू कादंबरी आहे. "लोकसखा ज्ञानेश्वर" मी वाचलेली नसली तरी न्यायालयाने निकालपत्रात या कादंबरीतील जे उतारे उद्घृत केले आहेत त्यावरुन ही कादंबरीसुद्धा काय योग्यतेची आहे हे लक्षात येते.

२. "संशोधनपुर्वक सिद्ध केलेली कादंबरी" असे दोन्ही कादंब-यांच्या संदर्भात लेखकाने धाडसी विधान केल्याने य खटल्यात त्यांन दोषी ठरवायला न्यायालयाला अधिक वाव मिळाला असे निकालपत्रावरून दिसते.

३. हा खटला भा.द.वि. ४९९ व ५०० अंतर्गत असून तो पुर्वज-बदनामी, मानहानी या स्वरुपात दाखल केला गेला होता. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ आरोपींना झालेला नाही. संत तुकारामांच्या वंशजानेच हा खटला दाखल केल्याने या खटल्याला कायदेशीर वजन मिळाले.

४. कादंबरीतील प्रसंग आरोपी आनंद यादव सिद्ध करु शकले नाहीत. तत्कालीन चाली-रिती, रुढी-परंपरा यांना धरुन लेखन केलेले नाही हा फिर्यादी पक्षाचा दावा न्यायालयाने मान्य केला आहे.

५. कलम ४९९ नुसार कायद्याने अपवाद केले आहेत. म्हनजे "लोकहितासाठी आवश्यक अशा ख-या गोष्टीचा अध्यारोप करणे किंवा प्रकाशित करणे." परंतु दोन्हीही संतांबद्दल मुळात कोणीही अशा प्रकारचे आरोपच केलेले नसल्याने ही पळवाट आरोपींसाठी बंद झाली. सबब न्यायालयाने दोन आरोपींना दोषी ठरवले. परंतू डा. यादवांचे साहित्यातील योगदान पाहता या खटल्यात दिली जावू शकणारी दोन वर्ष कैदेची शिक्षा न देता दोन्ही आरोपींना प्रत्येकी १०,०००/- रुपयांचा दंड ठोठावला आहे. (फिर्यादी पक्षाने १ कोटी रुपये दंडाची मागणी केली होती.)

६. न्यायालयीन बाबी पाहता त्यात काहीही आक्षेपार्ह असायचे कारण नाही. हा खटला साहित्य-जगताशी संबंधित नसून खाजगी स्वरुपाचा व पुर्वज-बदनामी आणि ज्ञानेश्वर हे तुकारामांचे विद्या-गुरु असल्याने तो संबंध लक्षात घेऊन हा खटला चालला. बदनामी झाली आहे हे न्यायालयाचे मत आरोपी कसलाही पुरावा सादर करू न शकल्याने (जो एवढ्या जुन्या काळाबद्दल असुही शकत नाही) बनले व हा दंड ठोठावण्यात आला आहे. यादवांनी "संशोधनपुर्वक सिद्ध केलेली कादंबरी" असे विधान कादंबरीच्या सुरुवातीलाच छापल्याने पुरावे देण्याची त्यांची जबाबदारी होती. काल्पनिक म्हटले असते तर कदाचित त्यांना सुटका मिळू शकली असती.

७. त्यामुळे यावर अधिक विचार न करता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत यायला हवा तो मात्र येत नाही. मराठी लेखक अपवाद वगळता जाहीरपणे याबद्दल बोलत नाहीत. मी गेल्या वर्षीच सा. कलमनामामद्ध्ये प्रसिद्ध झालेल्या "भरकटलेली वारी" या लेखातील या संदर्भातीत उद्घृत देतो...

"...अलीकडचंच महत्त्वाचं उदाहरण घ्यायचं म्हणजे आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीचं. ऑगस्ट २००८ मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यावर विविध वृत्तपत्रांत सविस्तर समीक्षणंही प्रसिद्ध झाली होती. एकाही समीक्षकाला ही कादंबरी (ती रद्दड वाटली तरी) आक्षेपार्ह आहे अशी वाटली नव्हती. तोवर असंख्य वाचकांनीही ही कादंबरी वाचली होती. त्यांनाही ती आक्षेपार्ह वाटली नव्हती. पण साहित्यसंमेलनाचे पडघम वाजू लागले आणि आनंद यादव निवडूनही आले आणि एकाएकी देहुकरांना जाग आली. अक्षरशः दहशतवाद माजवत यादवांना त्यांची कादंबरी मागे घ्यायला लावली गेली. जगाच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण असावं. यादवही कणाहीन असल्याने ते पुरते झुकले. एवढंच नव्हे तर संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला. अध्यक्षाशिवाय साहित्यसंमेलन भरवायची नामुष्की महाराष्ट्रावर ओढवली.

"मी यावर वारकरी तालिबानी झाले आहेत अशी जाहीर प्रतिक्रिया दिली होती. कर्हाडकर माझ्या घरावर दगड फेकायला तयारही झाले होते. पण त्यांना त्यासाठी आर्थिक प्रायोजक न भेटल्याने तो बेत बारगळला ही बाब वेगळी. पण ह.भ.प. देगलुरकर महाराजांनी एक ‘फतवा’ जारी केला आणि त्यात म्हटलं, ‘संतांबद्दल श्रद्धायुक्त अंतःकरणानेच लिहिलं पाहिजे. अन्यथा लिहू नये.’" (७ जुलै २०१३)

संतांवर लिहायचे असेल तर आधी वारकरी संप्रदायाची अनुमती घ्यावी असेही अनेक संप्रदायातील हभपंनी म्हटले होते. हा प्रश्न यादवांपुरता मर्यादित नाही. यादवांनी जी चूक केली आहे तेवढ्यापुरते व या खटल्यापुरते पाहून चालणार नाही. लेखकांनी सिद्ध न करता येण्याजोगे पण बदनामीकारक वाटू शकतील असे दावे करू नयेत हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या चौकटीतही मान्य केलेच पाहिजे.

परंतू अलीकडे सामाजिक असहिष्णुता लेखकांची प्रतिभा मारत चालली आहे हे वास्तव आहे. कशावर लिहावे, काय लिहावे, कशावर प्रतिक्रिया द्यावी, कशावर देवू नये याचा विचार करत दडपणाखाली जर लिहावे लागत असेल तर साहित्याचा घास या प्रवृत्त्या घेतल्याखेरीज राहणार नाहीत. अगदी अपवादात्मक सोडले तर लेखक यावर जाहीर भुमिका घेत नाहीत हे त्याहून दुर्दैव. ते स्वकोषात रममाण राहत गप्प बसतात. त्यांना त्यांच्याच कर्माची फळे मिळताहेत असे म्हणावे काय?

न्यायालयीन मार्ग न चोखाळता, यादवांना ज्या पद्धतीने साहित्य संमेलन काळात वारक-यांनी त्रास दिला व घटनाबाह्य बंदी घालण्यास भाग पाडणे योग्य होते काय? साहित्यिकांनी यादवांच्या कादंबरीतील सवंगपणा दाखवून देत त्यांच्या स्वातंत्र्याचा सन्मान ठेवत त्यांच्या पाठीशी रहायला नको होते काय? अध्यक्षाविना साहित्य संमेलन होत असुन त्यावर बहिष्कार घालण्याऐवजी साहित्यिक मंडळी तेथील रमण्यांत रमण्यात धन्यता मानत असतील तर मराठी साहित्यिक हे मेलेलेच आहेत असे म्हणणे दुर्दैवाने क्रमप्राप्त आहे.

12 comments:

  1. tumhi ase objectionable lekh lihita ani nantar lok bhadakle ki tyanchi tulna talibani dashatvadyashi karta.....he atyanta chukiche aahe....

    tujya aayla... tu talibanat astas tar tya lokani tula asa lekh lihayla jivant pan sodla nasta....

    ReplyDelete
  2. Abhivyakti swatantyawar punha ghala ghatala gela ahe!

    Prakash

    ReplyDelete
  3. आप्पा - हा मूर्खपणा कायमचा थांबवा !
    बाप्पा - संजय सोनवणी , आपण असल्या शिव्या सहनच कशा करता ?
    आप्पा - अहो खुद्द तुकोबा असते तरी त्यांनी आनंद यादव याना कोर्टात खेचले नसते , आणि हे कर्हाडकर कोण ? देगलूरकर कोण ? आणि अशा लोकाना तालिबानी म्हटलंच पाहिजे ! संजय सर , आपण निर्धास्त रहा , कावळ्याच्या शापाने कधी गाय मारत नसते

    ReplyDelete
  4. या निनावी तालिबानी विचारांचा निषेध असो !
    आपले विचार मांडताना ज्यांना आपल अस्तित्व लपवावे लागत आहे त्यांची कशाला फिकीर करायची ? संजय सर , आम्ही आपल्या पाठीशी आहोत ! असले वारकरी भ्रमिष्ट लोकांचे डोके ताळ्यावर आणलेच पाहिजे . अहो , याना खरेतर सरकार दरबारी फुकटचा मान मिळत असतो , खरेच सांगा बरे , तुकाराम महाराज असे अपमान झाला म्हणून कोर्ट कचेऱ्या करत बसले असते का ? पण हे लोक म्हणजे खरोखरच तालिबानी वृत्तीचे आहेत !हे आपल्या पदाचा गैर वापर करत असतात हे सर्वांनाच माहित आहे ,म्हणूनच फार वेगाने वारकरी संप्रदाय हा लोकांच्या नजरेतून उतरत चालला आहे ! या सर्व माथानी काय सामाजिक कार्य केले त्या देवासच माहित , यांचे मान अपमान हे तर किळसवाणे झाले आहेत ! यांना पांडुरंगाचे नाव घेण्याचीच लाज कशी वाटत नाही ?
    समीर घाटगे

    ReplyDelete
  5. या नालायक लोकांचा निषेध असो - हा शिवीगाळ करण्याचा विषय नाही
    संजय सर आपण ताबडतोब हि शिवीगाळ केलेली मेल नष्ट करा , कारण हि प्रवृत्ती योग्य नाही ,
    आज अनेक जनाना या तालिबानी वारकरी हुकुमशाहीची किळस वाटते
    आपण शिव्या देऊ लागलात आणि आपण फार खालची पातळी गाठून आपले हसे करून घेतले आहे
    आपण किती खालच्या पातळीवर जाऊ शकता हे दिसते
    आपण वारकरी असाल तर माउलींच्या संप्रदायाला कलंक आहात ,
    शिवीगाळ केल्याबद्दल आपण क्षमा मागितली पाहिजे !
    स्वतः माउली किंवा संत तुकाराम कसे वागले असते ? उगीच भले तरी देऊ कासेची लंगोटी असे दृष्टांत देऊन मनमानी करू नका !
    आज परिस्थिती अशी आहे की अनेक तथाकथित दिंड्या आणि त्यांचे मनमानी करणारे मुख्य यांनी वारकरी संप्रदायाला काळीमा लावला आहे
    देगलूरकर असोत किंवा अजून कुणी , ते एकप्रकारच्या हुकुमशाही वृत्तीचे बळी ठरत आहेत
    या हुकुमशाही प्रवृत्तीचा धिःकार असो !
    पद्मजा

    ReplyDelete
  6. अशा धमक्या देऊन मत परिवर्तन होत नसते
    वारकरी संप्रदाय असहिष्णू नाही ,कुणीतरी मुद्दाम हा खोडसाळ पणा करत आहे
    आनंद यादव यांच्यावर अन्याय झाला आहे असे मानणारे लाखो वारकरी आहेत आणि अनेक सुजाण वाचकाना तसेच वाटते
    वारकरी नेते या बाबतीत अत्यंत हिणकस वागले आहेत आणि दस्तुरखुद्द तुकाराम महाराज असे वागले असते का ? हा कळीचा मुद्दा आहे
    आजचे वंशज हे भान का ठेवत नाहीत ?
    लेखन स्वनन्त्र्यचा मानच ठेवला जात नसेल तर मग हे असहिष्णू हुकुमशाही तालिबानी प्रवृत्तीचे द्योतकच नाही का ?
    आनंद यादव यांचे वाग्मायात मोलाचे योगदान आहे आणि त्यांनी निराश होऊन राजीनामा दिला हे सर्व जगास माहित आहे ! खरेतर आनंद यादवांनी या तुकारामांच्या वाशाजाना उत्तम चपराक मारली आहे ,एक कोटी नुकसान भरपाई मागणे हे कसले लक्षण आहे हे समजण्या इतकी जनता वेडी नाही
    वारकरी हि अत्यंत निकामी चळवळ आहे आणि समाजाला त्याचा काडीचाही उपयोग नाही ,
    त्या ऐवजी या लोकाना कामास लाऊन त्यांच्या कडून लोकोपयोगी कामे करून घेणे जास्त योग्य ठरेल
    मोदॆञ्च्या राज्यात असला बिनडोकपणा चालता कामा नये !
    मोहिनी पारकर

    ReplyDelete
  7. निषेध असो , शिव्या देणारे आणि छापणारे यांचा निषेध असो !

    ReplyDelete
  8. या विघातक प्रवृत्तीचा निषेध असो
    वारकरी संप्रदाय हा थोर वारसा असलेला आहे , त्याना शिव्या देत स्वतःचे समर्थन करायची कधी वेळ येत नाही , हा कुणीतरी मुद्दाम कारस्थान करणारा चावात्पाना करत असावा
    स्वतः संत ज्ञानोबा किंवा तुकोबा असे वागले असते का ?
    शिवीगाळ लिखाण केल्याबद्दल संबंधिताने जाहीर क्षमा मागावी ,निदान संजय सरांनी तशी मागणी करावी

    ReplyDelete
  9. पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ऐशीतैशी...

    ReplyDelete
  10. संतांच्या बद्दल मला काही बोलायचे नाही, पण पुराव्याचे म्हणाल तर रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेतले याचा तरी काय पुरावा आहे? आपण भावनेने विचार करणे सोडून बुद्धीने विचार केला पाहिजे. उगाच कुणी शिवाजी महाराज किवा संत यांच्याबद्दल बावळट सारखे लिहिले म्हणन ते काही लहान होत नाहीत. दुर्लक्षा करा , आपोआप मातीत जातील. उगाच भडकून विधान सभेचे मत ठरवू नका. या सगळ्या गोष्टीत राजकारण आहे हे विसरू नका. आणि ईंद्रायणीत बुडविलेली गाथा पुन्हा वर आली, याला तरी काय पुटावा पुरावा आहे? तरी पण लोकभवना न दुखावता हा मुद्दा पु.ल. सारख्या जरा विनोदी ढंगाने मांडता आला असता. इथे लोक बुद्धीने नाही तर भावनेने विचार करतात हेच ह्या देशाचे दुर्दैव आहे.

    संतोष चाफेकर

    ReplyDelete
  11. सर्वप्रथम या विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

    काही मुद्दे मात्र नीट समजले नाहीत.
    १) एखादी कलाकृती उत्तम दर्जाची की फालतू हे न्यायालय ठरवू शकत नाही. शिवाय कादंबरी सवंग वाटणे हे व्यक्तीसापेक्ष आहे. मग या कादंबरीबद्दल बोलतांना केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कोर्टासमोर आलेले मुद्दे यावर बोलणे अधिक संयुक्तिक नाही का?

    २) "संशोधनपुर्वक सिद्ध केलेली कादंबरी" असे जरी यादवांनी म्हटले असले तरी त्यात गैर काय. कादंबरी लिहितांना काही मुद्यांचा विस्तार लेखक त्याच्या कल्पनेप्रमाणे करू शकत नाही का? संशोधनाप्रमाणे जर एखादी व्यक्ती आधी संसारात रमली होती मग परमार्थाकडे वळली असे सिध्द झाले असेल तर, ती व्यक्ती संसारात कशी रमली होती हे वेगवेगळे लेखक त्यांच्या मगदुराप्रमाणे रंगवू शकत नाही का?
    शिवाय अनेक महापुरुषांबद्दल काही ना काही ‘संशोधन’ होत असते. उदाहरण द्यायचे झाले तर अनेकांच्या मौलिक संशोधनाप्रमाणे शिवाजी महाराज हे हिंदूधर्मरक्षक, आद्य कम्युनिस्ट तर कधी शिवधर्माचे प्रणेते वगैरे वगैरे असतात.

    ३) तुकाराम महाराजांचे वंशज ज्ञानेश्वरांवर लिहिलेल्या पुस्तकावर कसा आक्षेप घेऊ शकतात? विद्या-गुरु संबंध ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यात होता. ज्ञानेश्वर आणि जयसिंग मोरे यांच्यात नाही.

    ७ व्या मुद्द्याशी आणि शेवटच्या पॅरीग्राफशी पूर्णपणे सहमत. तस्लिमा नसरीनवर बहिष्कार घालणारे काय आणि यादवांकडून माफीपत्र मागणारे काय एकाच जातकुळीचे.

    ReplyDelete
  12. संजय सोनवणी याना खरोखरच वैदिक द्वेषाची कावीळ झाली आहे
    त्यांनी स्पष्ट करावे की ते वैदिक आणि हिंदू धर्म वेगवेगळा मानतात तर त्यांना इतके टेन्शन का की संघ परिवार शिक्षणात बदल करून वैदिकांचा चा उदो उदो करतील असे ?
    एक पाहिजे की आजच्या जमान्यात भटजीचा मुलगाही शिक्षण घेताना इंग्रजी मिडीयम पसंत करत असतो आणि त्यालाही त्याचे वडील या सर्व प्रकारातून दूर ठेवत असतात

    गोळवलकर गुरुजी तर ठामपणे म्हणत असत की आर्य भारतातलेच आहेत ते बाहेरून आलेले नाहीत
    त्यांचा मुद्दा असा होता की ध्रुव प्रदेशच सरकला आहे ! दक्षिण आणि उत्तर ध्रुव यांचा एक्सिस बदलला आहे पण त्याचा विचार संजय सोनवणी करत नाहीत ,त्यांचे एक भारुड कायम चालू असते ,

    आज समाजाला त्याचा हरवलेला चेहरा हवा आहे ,आपल्या परंपरांची पुनर्मांडणी करताना कशी करायची ते संघाला समाजात नाही का ?मनुवादी विचार यापुढे कधीही इथे रुजू शकत नाहीत हे न समजण्या इतके ते दुधखुळे नाहीत मोदींचे यश आणि त्याचे रहस्य याबाबत संजय सोनावणी यांचे चिंतन नक्कीच कमी पडते आहे !
    आता यापुढे संघ काय करेल ?तो विचार करू या !
    त्यांचा पूर्ण प्रयत्न असा राहील कि काश्मीरचे कलम रद्द केले आणि काश्मीर पूर्ण भारतात विलीन झाला तर काय होईल ?९९ टक्के जनतेला असेच वाटते की पाकिस्तानची खोड मोडण्यासाठी हे पाउल अत्यंत आवश्यक आहे !अब्यास्क्रमात बदल हि किरकोळ बाब आहे !ते होणारच आहे !

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...