Sunday, May 10, 2015

वादाला का भीता?







... होय, संजय सोनवणी हे एक तटस्थ वृत्तीचे आणि ठाम भूमिका घेणारे साहित्यिक आहेत. वेगवेगळ्या साहित्य प्रवाहात कणखर आणि परखड भूमिका घेऊन त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले असले तरी त्यांनी सत्याची कास सोडली नाही. त्यांच्या काही भूमिकांविषयी मतभेद जरूर असू शकतात; मात्र हा माणूस नेक वृत्तीचा आणि साहित्य क्षेत्राशी प्रामाणिक आहे हे मान्य करावेच लागेल.
सध्या एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे दिवस आहेत, तर दुसरीकडे या स्वातंत्र्याचा अतिरेकही केला जातो. मध्यंतरी  पेरूमल मुरूगन या लेखकाने या व्यवस्थेला कंटाळून स्वतःतील लेखकाचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, हा  आपल्याकडील काळाकुट्ट इतिहास आहे. ही मुस्कटदाबी कुणा एका विचारधारेकडून, समाजाकडून होते असे नाही. सत्य काय हे जाणून न घेता केवळ आपला स्वार्थ पुढे दामटण्यासाठी जे राजकारण सुरू आहे ते अत्यंत निषेधार्ह आहे.
क्षमा आणि शांतीचा संदेश देणार्‍या आपल्या देशात आजवर अनेक समाजद्रोह्यांनी थयथयाट सुरूच ठेवला आहे. राजकीय लाभापायी इथल्या पोखरलेल्या व्यवस्थेने अशा दुष्प्रवृत्तींना सातत्याने खतपाणी घातले. आज अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा तो स्वबळावर पूर्ण करू शकतोय. इतकी समज आणि कुवत त्याच्यात निर्माण होण्याइतपत बदल नक्की झालाय. मात्र तरीही समाजाच्या अनेक गरजा आज दुर्लक्षित आहेत. साहित्य आणि संस्कृती हा आपल्या आदर्श समाजरचनेचा पाया आहे. तो मात्र दिवसेंदिवस तकलादू होत चालला आहे.
’महाराष्ट्र भूषण’ श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांची संपूर्ण हयात शिवसेवेसाठी घालवली. युगपुरूष शिवरायांचे चरित्र तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी जे कष्ट घेेतले, जे कार्य उभे केले त्याला तोड नाही. शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला समाज घडू शकेल, लोकापुढे शौर्य आणि पराक्रमाची मशाल तेवत राहील यादृष्टिने बाबासाहेबांनी जे कार्य उभे केले आहे त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांचे हे काम अद्वितीय आहे. महाराष्ट्र सरकारने उशीरा का होईना पण त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. असे सारे असताना काही विकृत मनोवृत्तीचे लोक त्यांच्यावर खोटे आरोप घेऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्राला जात, धर्म, प्रांत यावरून भांडत राहणे परवडणारे नाही, हे ठाऊक असूनही केवळ स्वतःचा स्वार्थ पुरा करण्यासाठी काहीजण आपल्यात भांडणे लावण्याचे उद्योग सुरू ठेवत आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांनी जे लेखन केले त्यातील आपल्याला हवा तो भाग, हव्या त्या पद्धतीने घेऊन टाळकी भडकवण्याचे काम वेगात सुरू आहे. आजची विचारी तरूणाई अशा भूलथापांना बळी पडणार नाही, मात्र त्यांच्यापुढे यातील सत्य आले पाहिजे. बाबासाहेबांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथातील काही वाक्ये उचलून, त्याचे कपोलकल्पित संदर्भ जोडून समाजात दुही निर्माण करण्याचे कारस्थान सुरू आहे. अशा बिकट वेळी संजय सोनवणी या लढवय्या लेखकाने अत्यंत अभ्यासपूर्वक, जिद्दीने सत्य पुढे आणण्याचा चंग बांधला. बाबासाहेबांचे पुस्तक त्यांनी अभ्यासले आणि तथाकथीत काही अविचारी लोकाचे सर्व आरोप पुराव्यासह खोडून काढले. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जे आक्षेप घेतले जात होते ते राजकीय हेतूने, पूर्वग्रह ठेवून आणि जातीय भूमिकेतून होते हे सिद्ध झाले. अशाने आधीच बंद पडत चाललेली आपली दुकानदारी बंद होणार, हे ध्यानात येताच काही ब्रिगेडी टाळकी पेटून उठली आहेत. वाटेल त्या थराला जाऊन, खर्‍याचे खोटे आणि खोट्याचे खरे ठरवून हे लोक आपले घोडे पुढे दामटत आहेत. संजय सोनवणी यांनी मुद्देसूदपणे आणि अभ्यासपूर्वक बाबासाहेबांवरील सर्व आरोप फेटाळून लावल्याने यांची गोची झाली आहे.
संजय सोनवणी हे मराठीतील असे एकमेव लेखक आहेत की ज्यांचे पुस्तक अमेरिकेत, व्हाईट हाऊस मध्ये ‘रेफरंस बुक’ म्हणून ठेवण्यात आले आहे. मराठी आणि इंग्रजीत त्यांनी विपुल लेखन केले आणि त्यांचे साहित्य जगभर वाचले जाते. वंचित, उपेक्षित, भटके विमुक्त, आदिवासी, दलित यांचे सुखदुःख मांडण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासारख्या सूड भावनेने वागणार्‍या माणसाला न्यायालयात अधिकृत माफी मागण्यास भाग पाडले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायदेशीर मार्गाने लढत दिली. हिंदू आणि हिंदुत्व या दोन्हीपासून हजारो मैल दूर असणार्‍या सोनवणी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील आरोप विवेकाने खोडून काढले आहेत. त्यासाठी लागणारी सच्चाई आणि अच्छाई त्यांच्याठायी आहे. जातीपातीच्या बाहेर पडून अशी न्याय भूमिका घेणार्‍या आणि धाडसाने सत्य पुढे आणणार्‍या सोनवणी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास पूत्र आहेत. त्यांनी शिवकाल जिवंत केला आहे. एव्हरेस्टसारख्या उंचीचा हा ध्येयवेडा माणूस अनेकांच्या हृदयावर राज्य करतोय. ज्यांचा प्रत्येक श्‍वास शिवमय होऊन गेलाय, ज्यांनी आपल्या आयुष्यातील क्षण न क्षण शिवाजीराजांच्या प्रेमात घालवलाय त्यांच्याविषयी आमच्या मनात श्रद्धाभाव आहे. बाबासाहेबांवर केवळ ‘ब्राह्मण’ म्हणून टीका करणे हे काही ‘ब्रिगेडियर’ नेत्यांचे कारस्थान आहे. संभाजीनगर येथे बोलताना बाबासाहेबांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ बद्दल अभिनंदन करणार्‍या शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भूमिका मात्र पक्षाची नसून ती त्यांची स्वतःची आहे, असे केविलवाणे विधान केले. यातून पवारांसारख्या नेत्याची विखारी वृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्राला जवळून पाहता आली.
संजय सोनवणी यांच्या चिकित्सेनंतर नगर येथील ‘शिवप्रहार’ या संस्थेचा अध्यक्ष असलेल्या संजीव भोर नावाच्या एकाने सोनवणी यांना धमक्या देणे सुरू केले आहे. त्याने सोनवणी यांना सूड भावनेने  आव्हान देऊन नगरला बोलवून घेतले. आजपर्यंत अनेकवेळा लेखकांना काळे फासले गेले, त्यांच्यावर शाई टाकण्यात आली, लेखकांचा निषेध करण्यात आला किंबहुना लेखकाला स्वतःतील लेखक मेल्याचेही जाहीर करावे लागले. मात्र मराठीच्या इतिहासात प्रथमच असा एक लेखक पुढे आला की ज्याने आव्हान देणार्‍याला ठामपणे सांगितले,  की ‘‘ठिकाण आणि वेळ तू ठरव, तू मला काळे फासण्याच्या आधी मी तुझ्या कानाखाली ओढतो. तुझ्या मुस्कटात ठेऊन देतो!’’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सांगितले होते की, ‘‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या!’’ सोनवणी यांनी ज्या बेडरपणे हे आव्हान स्वीकारले ते पाहता आता स्वातंत्र्यवीरांचे विचार खोलवर रूजलेत असे मानायला हरकत नाही.
मात्र या संजीव भोरने संजय सोनवणी यांना बोलवण्याचा आततायीपणा केला. आपली आता काही खैर नाही हे ध्यानात येताच त्याने काही महिला गोळा केल्या. संजय सोनवणी यांच्या अंगावर या महिलांना सोडायचे आणि विनयभंग, ऍट्रॉसिटी असे गुन्हे दाखल करायचे असे कारस्थान त्याने रचले. याची माहिती मिळताच नगरला गेलेल्या सोनवणी यांनी माघार घेतली आणि भोर याचा कुटील डाव हाणून पाडला.
आगरकरांनी विचारले होते की, ‘‘वादाला का भीता?’’
ज्याला सत्य जाणून घ्यायचे आहे त्यांची चर्चेची तयारी असते. ते कोणत्याही तात्त्विक वादाला कधीही घाबरत नाहीत. मात्र संजीव भोर याच्यासारख्या भ्याड माणसाने सोनवणी यांच्यासारख्या दिग्गजाला आव्हान देऊच नये. भोर याच्या आडून हे आव्हान सरळ सरळ ‘संभाजी ब्रिगेड’चे आहे हे पुरते ठाऊक असल्याने सोनवणी यांनी ते स्वीकारले पण भोरने पळपुटेपणा करत कट रचला.
बाबासाहेब पुरंदरे आणि संजय सोनवणी यांच्यात वैयक्तिक काहीही संबंध नाहीत. बाबासाहेबांच्या लेखनावर चुकीचे आक्षेप घेतल्याने  संजय सोनवणी यांच्यासारखा एक सत्लेखक दुखावला गेला आणि त्याने सत्य पुढे आणण्याचे काम धाडसाने केले. पुरंदरे आणि सोनवणी या दोन मात्तबर लेखकांची भेट ‘चपराक’च्या पुढाकाराने लवकरच घडवून आणत आहोत, मात्र यात कसलेही राजकारण, स्वार्थ नाही हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. केवळ सत्य पुढे यावे आणि आजच्या तरूणाईच्या मनात जे जातीभेदाचे विष कालवले जात आहे ते दूर व्हावे या प्रांजळ भूमिकेतून संजय सोनवणी यांच्यासारख्या खमक्या लेखकाने हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यांच्यावर सध्या राळ उडवण्यात येत असून त्यांची वैयक्तिक बदनामी केली जात आहे. हे सारे संतापजनक आहे. अशा बिकट प्रसंगी आपण सर्वजण संजय सोनवणी यांच्या पाठिशी राहणे, बाबासाहेबांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिचा गौरव करणे हे आपले कर्तव्यच आहे. 

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२


4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आप्पा - खरी वेळ आली बर का बाप्पा !
    बाप्पा - काय झालं तरी काय ?
    आप्पा - आपला संजय रे ! त्याच्यावर हा कोण आउचा काऊ संजीव भोर उठतो आणि धमकीवजा च्यालेंज देतो - हे म्हणजे अतीच झाले आणि तो जर संजीव भोर असले चाळे करून बायकाना जमवून खोटे आरोप करणार असेल तर आपणपण सत्तरीचे म्हातारे असलो तरी सरसावून पुढे येत या बायकाना सुनावले पाहिजे की अहो ताई माई आक्का आता अशा फसू नका बरका , पवार घराणे आणि त्यांचे बगलबच्चे - काय रे बाप्पा त्या यड्याचे चे नाव ?
    बाप्पा - जितेंद्र आव्हाड - अरे बिचारा निवडणुकीत तीन तेरा झाल्यावर दुसरे काय करणार ?
    आप्पा - अरे या लोकाना समाजात काही खरोखरचा बेस तरी आहे का ?असले भुक्कड लोक भोवती जमवून जर थोरले साहेब राजकारण करणार असतील तर कठीणच आहे - विनाशकाले विपरीत बुद्धी ! अहो ते मोडी बघा , त्यांच्या जातीची चर्चा होते का ? नाही - शरदराव त्याना चिकटतात !
    बाप्पा - मला तर वाटते की थोरल्या साहेबांचा मास्टर प्लान असावा - जसे गांधी वधानंतर ब्राह्मणाना बेचिराख केले तसा - कारण यांनी लाख प्रयत्न केले पण राजकारण काही यांच्या मनासारखे होत नाहीये !सगळे फासे उलटे पडत त्यांचा इतका स्वप्नभंग झाला आहे की त्यांचा तोल सुटू लागला आहे ! आणि हे जितेंद्र आव्हाड सारखे भाड्याचे तट्टू !चहू म्हटले की लागले भुंकायला , आणि वर आव असा आणायचा की आम्ही तेव्हढे अभ्यासू , त्या वेळेस तर यांचे सांत्वन करावेसे वाटते - यांनी फार तर दहीहंडी फोडावी , !
    आप्पा - तू म्हणतो ते खरे असावेसे वाटते , कारण एकप्रकारे जितेंद्र आव्हाड ची पाठराखण केल्यासारखेच साहेब बोलले , अशाने त्यांच्या व्यक्तिमत्वाला किती चरे पडत आहेत ते त्याना जाणवतही नाही . राष्ट्र पातळीवर सत्तेचे राजकारण करणारा , जिल्हा पातळीवर थोडेसे यश मिळताच परत विखारी विचार दुतोंडीपणा करून मांडू लागला - करंटेपणा - दुसरे काय ?
    बाप्पा - याना शिवाजी महाराज हे त्याची स्वतःची मालमत्ता वाटते हीच खरी गम्मत आहे ! बिच्चारे ! कीव करावीशी वाटते - त्यांच्या जगण्याला गांधी नेहरू इंदिरेचे वलय शोभत नाही - कारण हजार वेळा शेण खाल्लेल्याना काँग्रेस मध्ये कुणी विचारात नाही - पु लो द झाले , राष्ट्रवादी झाले - आत्ता आत्ता भाजप ला पाठींबा देण्याची केविलवाणी खेळी झाली - राग आला , आता सोडा आपले बगलबच्चे , शिवाजी महाराज हा त्यांचा हुकमाच्या टाळ्या मिळवण्याचा विषय , पण हा ब मो म्हातारा तिथेपण आपले विचार वैभव आणि भाषेवरचे प्रभुत्व दाखवून सर्वाना आपलेसे करतो आहे - वर्षानुवर्षे - आणि मरतही - शिवचरित्र झाले , जाणता राजा हा भव्य प्रयोग झाला , हे मराठा समाजात करणारा कुणीही नाही - दुर्दैव !
    आप्पा - आजपावेतो ब्राह्मण द्वेषामुळे सत्तेचे राजकारण सोपे होते , नुसता जय भवानी जय शिवाजी म्हटले की गर्दी जमायची - पण मोडी हा झंजावात आला - शरद रावाना जाणीव झाली
    की आता आपल्यापेक्षा आणि आपल्याविना काहीतरी चांगले भव्य दिव्य या देशात घडणार आहे !
    हव्या त्या लोकाना एकत्र आणून मोडी नक्कीच राज्य्सभाहि आपलीशी करणार , ३७० कलम रद्द करणार , संघ ते करवून घेणार , त्यात परत मोडी हे ब्राह्मण नाहीत , आता कसे होणार , काय करावे ?- अशी कथा आहे शरद रावांची - मग चला संजय भोरही चालेल , संजय सोनवणी फारच फुरफुरायला लागलाय , त्याची खुजली एकदा - - असले चक्र सुरु होते , अशावेळी आपण संजयाच्या मागे उभे राहिलेच पाहिजे , कारण सर्व देशाच्या फ्रेम मध्ये आवश्यक नसणाऱ्या जितेंद्र आव्हाड सारख्या कुलुंगडी कुत्र्यांची जागा त्याना दाखवली पाहिजेच पाहिजे , शरदराव इतके हतबल व्हावेत की असल्या सोम्यागोम्याला ते आवाज टाकून समाज देवू शकत नाहीत यातच त्यांची अवस्था किती दयनीय आहे ते समजते
    बाप्पा - शरद रावांनी जे राजकारण केले त्याचा हा परिणाम आहे , देव त्याना सद्बुद्धि देवो !
    आप्पा - त्या संजीव भोरवर दात ओठही खाता येत नाहीत , कारण आपल्या कवळ्या ! त्याही आता जुन्या झाल्या , तरीही हरकत नाही - अजूनही आम्ही लढायला डगमगणार नाही - सोनावणी सरांनी धीर सोडू नये , आमच्या सारखी शेकडो म्हातारी मंडळी एका हाकेसरशी तुमच्यामागे उभी राहतील .
    बाप्पा - आम्ही आपण दाखवलेल्या धारीष्ट्या बद्दल आणि समय सूचकते बद्दल आपले अभिनंदन करतो आहोत ! आणि बायकांचा आधार घेणाऱ्या संजीव भोरची कीव करत आहोत !

    ReplyDelete
  3. संजयजी ,
    आपल्या लिखाणाच्या प्रतिक्रियेत दिनेश शर्मा यांची प्रतिक्रिया गायब झाली आहे ते पाहून वाईट वाटले , त्यांचे लिखाण सभ्य आणि वाचनीय असते ,
    ते एक असो !
    आपल्याबद्दल "चपराक "मध्ये आलेले विचार वाचले
    आणि आपले अभिनंदन केल्याशिवाय रहावत नाही , आपण अत्यंत हिम्मत दाखवत ब मो पुरंधरे यांची बाजू समजून घेवून आणि काळाची गरज ओळखून मते मांडली आहेत कारण द्वेषाचे राजकारण आजकाल फारच खालच्या पातळीवर जात चालले आहे देशाच्या राजकारणात जनतेने एक नवे सत्तांतर करून ताज्या दमाच्या नेत्याला राष्ट्राची धुरा दिली आहे , ते पण आपले विचार कृतीत आणण्यासाठी काही तडजोडी करत शासन करत आहेत
    त्यांनी केलेल्या वायद्यात ३७० व्या कलमा बाबतचा वायदा देशाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे , स्व . नेहरूंनी एकेकाळी फार मोठी काश्मीर बाबत चूक केली आहे .
    हैदराबाद विलीन होताना निजाम आणि नेहरू यांनी काय काय नाटके केली हेपण आपण मांडले तर फार बरे होईल , कारण त्यातून अनेक गोष्टी लोकांसमोर येतील आणि ते नक्कीच वाचनीय असेल कारण आपण कधीही उथळ लिहिणार नाही असा विश्वास वाढत चालला आहे .
    ३७० कलम आणि प्रांतिक अस्मिता वगैरे गोंडस शब्दांमुळे जर काश्मीरला मूळ भूमीशी पूर्णत्वाने समरस होण्यात विलंब लागणार असेल तर त्या कलमांचा पुनर्विचार होण्यास हरकत नसावी आपणही आपले विचार मांडावेत हि विनंती
    शिवाजी महाराज हा जितका नाजूक विषय आहे तितके च हे ३७० कलम आज ना उद्या महत्वाचे ठरणार आहे राष्ट्राच्या उभारणीत त्याचे रद्द होणे न होणे फार महत्वाचे ठरणार आहे म्हणूनच नरेंद्र मोदी सर्व पक्षाना आंजारत गोंजारत आहेत
    आजपावेतो काँग्रेस संस्कृतीने थोर परंपरेचा गैर फायदा उचलत सत्तेच्या राजकारणाचा असा काही यशस्वी फॉर्म्युला राबवला की समाजाला जातीपातीच्या राजकारणाने कधी गिळंकृत केले ते समजलेच नाही , पार खोलपर्यंत जातपात रुजवण्याचा दोष शेवटी आपले राज्यकर्ते आणि धर्म वेत्ते यांच्या कडेच जातो - अनेक संत आले आणि गेले पण जातपात गेली नाही , आता तर
    कम्पार्टमेंट झाल्याप्रमाणे समाजाची अवस्था झाली आहे प्रत्येक जातीचा संत आणि नेता आहे संत रोहिदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चोखामेळा असे संत आणि बाबासाहेब आंबेडकर ,
    स्वा . सावरकर , अण्णाभाऊ साठे , शाहू ,फुले अशा वाटण्या झाल्या आहेत सोपे आणि सुटसुटीत !

    हा देश काही विशिष्ठ तत्वज्ञानावर उभा आहे का ? का त्याचा खून कॉंग्रेसने आणि नथुरामने असा दोघांनी मिळून १९४७ - ४८ लाच केला आहे ? आणि काँग्रेस च्या नंतर त्याची जागा घेणारे तत्वज्ञान काय आहे , ते सर्वमान्य होण्याची गती काय आहे , ते धर्मवेडे आहे का ?असे कितीतरी प्रश्न आज डोक्यात उभे राहतात
    संघाला सापडलेले उत्तर हेच एकमेव उत्तर आहे का ?आता समाजवाद हाही घराणे शाहीत अडकलाय आणि प्रांतिक ताकद ठरला आहे - तसाच तो राहणार का ?
    संघ शिरजोर होत राजकारणात असह्य झाला तर नरेंद्र मोदी फुटून नवा मध्यम मार्गी विचार ,जो गांधीवादाला सामावून घेत लोकाना पुढे नेईल - असे काही होईल का ? असे विचार येत राहतात
    पवार मुलायम सारखी संधिसाधू माणसे मगरीसारखी निगरगट्ट आणि निबर असतात - ते त्याची वाटही बघत असतील . कोण जाणे .
    ३७० कलम आणि राज्यसभेतील भाजप ची स्थिती हे नाजिकच्या काळात फार महत्वाचे निर्णायक मुद्दे आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. आता तर
      कम्पार्टमेंट झाल्याप्रमाणे समाजाची अवस्था झाली आहे प्रत्येक जातीचा संत आणि नेता आहे संत रोहिदास संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चोखामेळा असे संत आणि बाबासाहेब आंबेडकर , स्वा . सावरकर , अण्णाभाऊ साठे , शाहू ,फुले अशा वाटण्या झाल्या आहेत सोपे आणि सुटसुटीत !
      Hya watanya tumhi 2000 warshe adhich karun thevlyat atta ka oradata? .. tumhi kahi karun kahihi honar nahi karan konihi vishwas thevnar nahi

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...