Tuesday, September 8, 2015

तुळसाबाई होळकरमहाराजा यशवंतरावांना एकुण दोन अपत्ये झाली. लाडाबाईपासुन भीमाबाई तर मिनाबाईपासुन (काही इतिहासतद्न्यांच्या मते केशरबाईपासुन) मल्हारराव (तिसरे). तुळसाबाईंना अपत्यप्राप्ती झाली नाही. (तुळसाबाई या महानुभाव संप्रदायाच्या व मुळच्या जेजुरी येथील होत्या. हा त्या काळातील एक अतुलनीय असा आंतरजातीय प्रेमविवाह.) मल्हाररावाला (वय वर्ष ६) होळकरी गादीवर बसवुन त्याच्या तर्फे रिजंट म्हणून महाराणी तुळसाबाई राज्यकारभार पाहु लागल्या. यशवंतरावांच्या मृत्युपासून ते १८१७ पर्यंत यशवंतरावांची दृष्टी ठेवत इंग्रजांना होळकरी राज्यात पाय ठेवू न देण्याची त्यांनी दक्षता घेतली. खरे तर यशवंतरावांच्या मृत्युनंतर होळकरी राज्य आपण सहज गिळून टाकू असे इंग्रजांना वाटले होते. त्यांनी वेगवेगळ्या आमिषांचे प्रस्तावही पाठवले होते. तुळसाबाईंनी त्यांना भीक घातली नाही. इंग्रजांनी मग वेगळी आघाडी उघडली. पण तुळसाबाई कारभार पाहु लागल्यापासुन काही काळानंतर त्यांचा द्वेष करणा-यांची गर्दीही वाढु लागली, कारण माल्कमने त्यांना बदनाम करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. काय वाट्टेल ते करुन इंग्रजांना होळकरी राज्य खालसा करणे महत्वाचे वाटत होते.
तुळसाबाईवर करण्यात येणारा पहिला आरोप म्हणजे त्या यशवंतरावांच्या विवाहित पत्नी नव्हत्या. या आरोपाची दखल आपण आधी घेऊयात. ही अन्याबा महानुभाव या जेजुरी येथील गृहस्थाची कन्या होती. ही सुद्धा औरस कि अनौरस यबाबत माल्कमने संशय व्यक्त करुन आपल्या मनोवृत्तीचा परिचय करुन दिला आहे. असो. तुळसाबाई व यशवंतरावांचा परिचय होण्यात शामराव महाडिकांचे अंग होते ही एक दंतकथा तुळसाबाईंबद्दल प्रचलित आहे. १७९९ ते १८०१ या काळात कधीतरी यशवंतराव व तुळसाबाई यांची भेट झाली असावी असा तर्क नरहर फाटक देतात. (श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर) ही भेट उत्तरेत झाली कि खुद्द जेजुरीत याबाबत मात्र माहिती मिळत नसली तरी एकंदरित यशवंतरावांच्या हालचाली पाहता यशवंतरावांच्या पुणे स्वारीच्या दरम्यानच १८०२ मधे ही भेट झाली असेल असे म्हणता येते.
यशवंतरावांची तुळसाबाईंना पाठवलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. मल्हाररावांच्या लग्नानिमित्त तुळसाबाईंच्या नावे पाठवलेल्या दोन कुंकुमपत्रिका प्रसिद्ध असून नरहर फाटक म्हणतात कि उपस्त्रीला (रखेली) विवाहकार्याला निमंत्रण तत्कालीन स्थितीत दिले गेले नसते. अनेक पत्रांतही यशवंतरावांनी तुळसाबाईला "सौभाग्यवती" असे संबोधलेले आहे, त्यामुळे तुळसाबाई या विधीवत यशवंतरावांशी विवाहबद्ध झाल्या होत्या असे स्पष्ट दिसते.
तुळसाबाई स्वभावाने करारी, धैर्यवान व बुद्धीमान होत्या. तसे नसते यशवंतरावांच्या मृत्युनंतर मल्हारावाला मांडीवर बसवून राज्यकारभार त्यांना हाती घेता आला नसता. इंग्रजांच्या संदर्भातील तुळसाबाईंचा पेशव्यांशीही पत्रव्यवहार उपलब्ध असून त्यात त्यांच्या धोरणी राजकारणाचे दर्शन घडते. भीमाबाई व मल्हाररावांची कसलीही त्यांनी आबाळ केली नाही. भीमाबाई आपल्या सावत्र आईच्या राजकारणाला व मुत्सद्देगिरीला साथच देत असे. भीमाबाई व मल्हारराव जातीने महिदपुरच्या युद्धात उपस्थित होते यावरुन संस्थानाचे हित आपल्या सावत्र आईच्या मार्गदर्शनाखाली जपण्यात ही भावंडे अघाडीवर होते असे दिसते. तुळसाबाई, माल्कम व त्याची री ओढणारे इतिहासकार म्हणतात तशी बदफैली व व्यभिचारी असती तर सलग सात वर्ष तुळसाबाईंना राज्य करता येणे, वर्चस्व टिकवता येणे अशक्य झाले असते.
खरे तर यशवंतरावांचा मृत्यू झाल्यानंतर होळकरी राज्य सहज ताब्यात घेता येईल असा माल्कमचा होरा होता. त्याने त्यासाठी सुरुवातीपासून जी कटकारस्थाने केली त्याला तोड नाही.
मल्हाररावांचा रिजंट म्हणून तुळसाबाईंनी काम पहायला सुरुवात केली तेंव्हा ब्रिटिशांनीही मल्हाररावाचा वारसा मान्य करत पित्याच्या सा-या पदव्या वापरण्याचा अधिकार मान्य केला होता. तुळसाबाईने तात्या जोग, गणपतराव, अमिरखान, गफुरखान आणि जालीमसिंग या जुन्या सेवक तसेच यशवंतरावांच्या राजकीय मित्रांशी चांगले संबंध निर्माण केले. परंतू आपण अमिरखानाने यशवंतरावांशीही कशी छुपी दगाबाजी केली होती हे आधीच्या प्रकरणात पाहिलेच आहे. त्याला टोंकची जहागिरी यशवंतरावांनीच दिली होती. गफुरखान हा त्याचा मेव्हणा व होळकर दरबारातील त्याचा प्रतिनिधी. हा गफुरखान अमिरखानाला होळकर दरबारातील वित्तंबातम्या कळवत असे.
बाळाराम सेठ हा अजुन एक अधिकारी होता. गंगधर येथे त्याने तुळसाबाईला मल्हाररावांसहित थांबण्याचा आग्रह केला. परंतू त्यातील काळेबेरे लक्षात येताच तुळसाबाईंनी त्याला देहदंडाची शिक्षा दिली. आपले बिंग फुटले आहे कि काय या शंकेने गफुरखान व अन्य सरदार अस्वस्थ झाले. याची जानीव होताच तुळसाबाई अलोट येथे मल्हाररावांसह निघून गेल्या. म्हणजे तुळसाबाईंच्या सुरुवातीच्याच काळात त्यंना विश्वासघातांना तोंड द्यावे लागले.
आक्टोबर १८१३ मध्ये लोर्ड हास्टिंग्ज भारतात दाखल झाला. भारतातील स्थितीचा त्याने आढावा घेतला. मराठा राजमंडळातील सरदार पुन्हा एकत्र यायच्या प्रयत्नात आहेत व तुळसाबाईही त्यात सामील आहे हे त्याच्या लक्षात आले. होळकरांचे सैन्य त्याही काळात सर्वांत अधिक प्रबळ होते. बाजीरावावर अन्य सरदारांचा विश्वास नसला तरी पेशवेपदाचा मान होताच. त्यामुळे १ फेब्रुवारी १८१४ च्या पत्रात त्याने लिहिले कि ब्रिटिश साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी मध्य भारतात तातडीने असंतोष चिरडून टाकला पाहिजे. होळकर तसेच अन्य संस्थानिकांच्या सैन्याचा मुख्य आधार म्हणजे पेंढारी. त्यामुळेच ही इंग्रजांनी त्यांच्याहीविरुद्ध कारवाया करण्याचे निर्णय घेतले. पण यात होळकर, शिंदे आणि अमिरखान मोडता घालून मोठ्या प्रमाणावर बंड करतील अशी भितीही त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी कटकारस्थानाचाच वापर करायचा निर्णय घेतला व त्यांना एतद्देशिय देशद्रोह्यांनी साथ कशी दिली हे पुढील घटनाक्रमावरुन लक्षात येते.
या घटनाक्रमात तुळसाबाईंनी मराठा राजमंडलात राहुन ब्रिटिशांना विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पेशव्यांच्या दरबारी वकील पाठवून आपल्या तयारीची माहितीही दिली होती. तुळसाबाईला हटवल्याखेरीज होळकरी राज्य इंग्रजांना ताब्यात घेता येणार नव्हते. होळकरांची फौज बलाढ्य होती आणि यशवंतरावांनी ती प्रशिक्षीतही केली होती. त्यामुळे तुळसाबाईविरुद्ध इंग्रजांनी हळूहळू कटकारस्थाने सुरु केली. बदनामी करुनही कोणी बधत नाही म्हटल्यावर त्यांनी तुळसाबाईंचा खून करायचे ठरवले.
धर्मा कुंवर हा यशवंतरावांच्या विश्वासातील कारभारी होता. आधी त्यालाच फितवायचा प्रयत्न झाला, पण धर्मा कुंवरने दाद दिली नाही. मग इंग्रजांनी आपले लक्ष गफुरखानकडे वळवले. गफुरखान हा आमिरखानाचा होळकरांच्या दरबारातील प्रतिनिधी व सक्खा मेव्हना होता. होता. माल्कमने त्याला जाव-याची जागिर देण्याच्या बदल्यात विकत घेतले (९ नोव्हेंबर १७१७) आणि तुळसाबाई, मल्हारराव व अन्य होळकरी परिवाराला ठार करण्याचे कारस्थान रचले गेले. तुळसाबाई व मल्हारराव (३) ठार झाल्यानंतर झपाट्याने हालचाल करून राज्य गिळंकृत करण्याचे त्यांचे धोरण होते.
त्यानुसार गफुरखानाने संधी साधून तुळसाबाई व मल्हाररावांना अटक केली व त्यांना घेवुन जाव-याकडे निघाला. हत्याकांड होळकरी सीमेच्या बाहेर करावे अशी त्याची योजना असावी. पण यशवंतरावांचा विश्वासु सेनानी धर्मा कुंवरला हे कळताच त्याने गफुरखानाचा पाठलाग सुरु केला. गफुरखान व अमिरखानाशी त्याची लढाईही झाली, पण त्यात धर्माचा पराभव झाला. धर्माला शिरच्छेद करुन ठार मारण्यात आले. पण बोभाटा झाल्याने चित्र असे उभे केले गेले कि जणु धर्मानेच तुळसाबाई व मल्हाररावाला अटक केली होती व गफुरखानानेच त्यांना सोडवले. हा बेत फसल्याने हत्याकांडाची योजना त्यांना थोडी पुढे ढकलावी लागली. माल्कमने होळकरांनी ब्रिटिशांशी शिंद्यांनी केला तसाच ब्रिटिश सार्वभौमत्वाचा करार करावा असा लकडा लावला. तुळसाबाईंनी त्याला भिक घातली नाही.
मेजर माल्कम २६ नोव्हेंबर १८१७ रोजी तालेन येथे आपले सैन्य घेऊन आला. युद्ध करायचे आधीच ठरलेले होते. खुनाचा एक प्रयत्न फसला होता. नवी योजना आखण्याची गरज होती. दरम्यान इंग्रजांच्या हालचालींची खबर लागल्याने तुळसाबाईंनीही ब्रिटिशांशी युद्धाचा निर्णय घेतला. तात्या जोग, जो ब्रिटिशांशी समझौता करावा या मताचा होता त्याला पदावरुन हाकलुन नजरकैदेत ठेवले. मल्हारराव, भीमाबाई व सर्व सेनानी महिदपुरकडे ससैन्य निघाले होते. गफूरखान तेवढा मागे राहिला होता. त्याचे सैन्य मात्र मल्हाररावांसोबत रवाना झाले होते. या वेळीस होळकरांकडे शंभर तोफा, पंधरा हजार घोडदळ व दहा हजारांचे प्रशिक्षित पायदळ होते.
यामुळे माल्कम पुन्हा तुळसाबाईंशी तह करण्याच्या मागे लागला. १५ डिसेंबर रोजी होळकरांच्या तीन वकिलांशी त्याने वाटाघाटी करायचा निष्फळ प्रयत्न केला. या वाटाघाटीतुन काहीही निष्पन्न होत नाही हे लक्षात आल्यावर नेमके १९ डिसेंबर रोजीच त्यांनी वकिलांची परत रवानगी केली. कारण तुळसाबाई आहे तोवर आपला निभाव लागत नाही हे माल्कमच्या लक्षात आले होतेच आता खात्री पटली. पण दुर्दैवी भाग म्हणजे अमिरखानाने या आधीच, ९ नोव्हेंबर रोजी, इंग्रजांशी तह करुन टाकला होता. माल्कमच्या दृष्टीने ती जमेची बाजु होती. अमिरखानाचा मेव्हणा गफुरखान तर आधीच इंग्रजांना आतून मदत करत होता.
महिदपुरच्या लढाईचा आद्ल्या दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर १७१७ च्या रात्री गफुरखानने डाव साधला. सारे सैन्य, भिमाबाई-मल्हारराव राजधानीत नव्हते. त्याने ही संधी साधली. यासाठीच तो मागे राहिला होता. त्याने महालात अचानक आपली तुकडी घुसवली. तुळसाबाईंना त्यांच्या महालातुन बाहेर काढले, क्षिप्रा नदीच्या काठी नेले व त्यांचा शिरच्छेद करुन त्यांना ठार मारले. त्यांचे प्रेत नदीत फेकुन देण्यात आले. त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही. हत्याकांड होताच गफुरखान तातडीने महिदपुरच्या दिशेने रवाना झाला.
ब्रिटिशांशी तुळसाबाईलाच तह करायचा होता म्हनून तिला ही गफुरखानाने शिक्षा देण्यात आली असे माल्कमने लिहिले. तो शत्रुच होता. तह करायचा असता तर महिदपुरला सैन्य कशाला पाठवले असते हा प्रश्न आमच्या इतिहासकारांना पडला नाही. सात वर्ष ब्रिटिशांच्या पापी नजरेतून राज्य वाचवले या योग्यतेचे स्मरण केले नाही. वरील घटनाक्रम पाहिला, तुळसाबाईला ठार मारण्याचे दोन अयशस्वी आणि एक यशस्वी प्रयत्न पाहिला तर तुळसाबाई इंग्रजांच्या डोळ्यांत केवढी सलत असेल याची कल्पना येते.
गफुरखानाचे पाप येथेच संपले नाही. तो तुलसाबाईंना ठार मारुन महिदपुरला गेला. २० डिसेंबर रोजी सुरु झालेल्या युद्धात दुपारपर्यंत होळकर जिंकतील असे चित्र असतांना दुपारीच तो अचानक आपले सैन्य घेऊन पळून गेला. त्यामुळे होळकरांचा तेथे पराभव झाला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
यशवंतरावांच्या दुर्दैवी निधनापासून तब्बल सात वर्ष इंग्रजांना होळकरी सीमांपासून दूर ठेवणारी ही मुत्सद्दी महिला. सात वर्ष होळकरी संस्थानाचा घास घ्यायला टपलेल्यांना दूर ठेवणे ही सामान्य बाब नव्हे. पण इतिहासाने महाराणी तुळसाबाईंची यथोचित दखल घेणे तर सोडाच, तिला रखेली, बदफैली ठरवण्याचा प्रयत्न केला. तसे करणे माल्कमच्या किंवा इंग्रजांच्या दृष्टीने स्वाभाविक असले तरी आम्हा पामरांना तरी तुळसाबाईचे महत्व समजायला हवे होते. "नाही चिरा नाही पणती" अशे अवस्था एका समर्थ महाराणीची झाली. विश्वासघातकी मृत्यू स्विकारावा लागला. इंग्रज मात्र खूष होते...उरलले सुरले होळकरी सामर्थ्य नष्ट करण्यात ते यशस्वी होत आले होते. पण सरळ मार्गाने त्यांना अजुनही विजय मिळवण्याची खात्री नव्हती. पण त्यांचे नशीब थोर एवढे कि गफुरखानासारखे घरभेदी त्यांना मिळतच चालले होते.

आणि नीतिहीन लोलुपांची कमी कधी असते काय?

6 comments:

 1. आप्पा - कदाचित संजय सराना किंवा इतर अनेकाना आवडणार नाही आम्ही लिहिलेले , पण या लेखाबद्दल एकच वाटते की पेशवाई बुडाल्यावर आपोआप फांद्या खाली येणार होत्या आणि तसेच झाले !त्यामुळे तुळसाबाई चे कौतुक करण्याचे विशेष कारण नाही !
  बाप्पा - प्लासीची लढाई झाली आणि तेंव्हाच जणू प्राक्तन ठरले की इथे इंग्रज येणार म्हणजे येणार . अगदी १०० टक्के ! अगदी शिवाजी महाराज असते तरी ते टळले असते का ?- नाही !
  त्यामुळे असे तुटक तुटक कर्तृत्व दाखवणारे वीरगाजी काही वर्षे इकडे तिकडे करत इंग्रजी साम्राज्याचा प्रवेश लांबवू शकले असते . त्यातलाच हा प्रकार आहे इतकेच !
  आप्पा- सर्व क्षेत्रात सरस असलेल्या इंग्रजाना शिवाजी महाराज यांच्यासारख्यांकडूनही नंतरच्या काळात थांबवणे अशक्य होते , प्लासीच्या लढाईत १७५७ लाच इंग्रजांनी शिक्कामोर्तब केले आणि त्यांची पावले पडू लागली . हे ऐकायला दुःख दायक वाटते पण हेच सत्य आहे .
  बाप्पा - उमाजी नाईक असो , आंग्रे असोत वासुदेव बळवंत फडके असोत किंवा तुळसाबाई होळकर असोत . युरोपियन लोकांचे इथले येणे अटळ होते .या आपल्या वीरांची इच्छाशक्ती हीसुद्धा कशाशी निगडीत होती तेही पाहिले पाहिजे . जसे की , १८५७ च्या युद्धाला स्वातंत्र्य समर म्हणायचे का ? कारण त्याचा गाभा काय होता ? मुठभर राज्याना खालसा केले म्हणून हा वणवा पेटला होता का ? होळकर राज्य काय पद्धतीने चालले होते ? त्यांच्या रिजंट पदाचा तात्पुरता मान ठेवत इंग्रजांनी ते राज्य खालसा केले नसते तर महाराणी तुळसाबाई इतक्या पेटून उठल्या असत्या का ?
  आप्पा - खरच रे बाप्पा - असले उलटे प्रश्न आपण विचारू लागलो स्वतःला की वेगळीच उत्तरे गवसतात . मुळात एक नव्या धर्तीचे परचक्र इथे येत आहे हे नक्की आपल्या राजे लोकाना समजले होते की नाही ? ही काही वर्षांची शेवटची तडफड होती - असे प्रत्येक संस्थानात घडत होते - हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे . इंग्रजांचा मूळ रोख पुणे होता . त्यानंतर फक्त काही वर्षांचा प्रश्न होता . इतिहास समजून घेताना हा आंतर राष्ट्रीय संदर्भ लक्षात घेतला पाहिजे .
  बाप्पा - शिस्तबद्ध प्रशासन आणि कवायती फौजा यामुळेही इंग्रजांना लढाया जिंकणे सोपे जात होते , आपलीच माणसे आपल्याविरुद्ध वापरून हे घडत होते हेही ध्यानात ठेवले पाहिजे ,
  आप्पा - फंद फितुरी हा भाग आहेच पण आपल्याच देशाविरुद्धच्या लढाईत आपण परकियांच्या सैन्यात स्वदेशाविरुद्ध उभे रहावे असे देशी सैनिकाला वाटणे हा आपल्या कोणत्या मनोवृत्तीचा पराभव होता ?
  बाप्पा -शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी जे शक्य करून दाखवले ते या (महा)नायकाना का जमत नव्हते ?हा काळाचा महिमा म्हणावा का ? का चौथाई सरदेशमुखीचा सुस्तपणा ? असे अनेक प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात .हे इंग्रजी सैन्यात नोकरी पत्करणारे देशी सैनिक कोणत्या जातीचे होते त्यावर संशोधन झाले आहे का ? तिथे इंग्रजांनी काही धूर्तपणा दाखवत जातीचे राजकारण त्या काळात केले होते का ?
  आप्पा - आपले राज्य का बुडाले हा जसा अभ्यास आवश्यक आहे तसेच इंग्रज इथे आपली फौज आपल्याच लोकांमधून कशी उभे करू शकले हाही मुद्दा महत्वाचा आहे . आपल्याकडे जनसामान्यात स्वातंत्र्याचे वारे - शिवाजी महाराजांनी निर्माण केले होते ते स्फुल्लिंग एकाएकी विझले कसे ? हे असे एका रात्रीत तर घडत नाही ना ?
  आधी शिवाजी आणि संभाजी महाराज , त्यानंतर -पेशवे आणि त्यांचे पराक्रम , नंतरचे पानिपत , आणि इंग्रजांचे आगमन असे जर मराठेशाहीच्या इतिहासाचे भाग केले तर आपल्या सैन्याचे स्वदेशाचे प्रेम का व कसे आणि कधी आटत गेले ?
  बाप्पा - श्रीमान योगी नंतर अशी ऐतिहासिक व्यक्तिरेखा रंगवण्याची फ्याशन झाली आहे आणि मूळ अभ्यासाचा विषय मागे राहून जातीप्रमाणे अश्या व्यक्तिरेखा रंगवण्याकडे लेखकांचा ओढा वाढला आहे , तो अजून थांबत नाही हे दुर्दैव !
  आप्पा - त्या ऐवजी इंग्रजांच्या सैन्यातील देशी सैनिकांच्या मनोवृत्तीचा अभ्यास झाला तर आपल्या उपयोगी पडेल . १८५७ चा संग्राम हा स्वातंत्र्य संग्राम होता का हेही संघ विचार मांडणाऱ्या
  देशभक्ताना सांगता येईल .

  ReplyDelete
 2. आप्पा बाप्पा , आपण खूपच धाडसीपणाने आपला मुद्दा मांडला आहे .आपल्या देशी सैनिकांच्या मुद्द्यात तथ्य आहे ,कारण सैन्य हे शेवटी पोटावर चालते हा सुविचार मान्य केला तरी आपले मराठी मन इतके कोडगे कसे बनले , इंग्रजांच्या अधिपत्याखाली त्यांच्या बंदुका आपल्याच जनतेवर कधी रोखल्या गेल्या ?
  पेशव्यांनी चौथाई सर देशमुखीच्या आणि शाहू महाराज यांच्या कडून पेशवेपदाला अधिक अधिकार मिळवण्याच्या नादात आपल्या कर्तृत्वाला मर्यादा घालून घेतल्या का ?भगवा झेंडा अटकेपार गेला पण तिथे कायमचा रोवला गेला नाही ! हल्ली शिवसेना खंडणी गोळा करते तशीच ही एकप्रकारे क्खान्दानीची चातक पेशवाईत रुजली आणि त्यांनी मराठेशाहीचा घात केला ,
  पानिपतात आपले पराभूत सैन्य पळू लागले तेंव्हा आपल्याच सैन्याला प्रजेकडून अत्यंत हिणकस वागणूक मिळाली , मराठी सैन्याला लुटारू म्हणत अनेक ठिकाणी तुडवले गेले , हे काही हिंदुपात्पाद्शाहीचे सैन्य म्हणवून घेण्याच्या लायकीचे राहिले नव्हते , म्हणजेच जिथे जिथे मराठी संस्थाने होती त्याठिकाणी लोक अतिशय सुखात नांदत होती का ? मुघल सत्तेविरुद्ध पेशव्यांनी कायम पद्धतीने बफर स्टेट म्हणून होळकर शिंदे इत्यादी सरदार वसवले त्याचा मूळ हेतू फसला . कारण नवीन शत्रू खैबर खिंडीच्या ऐवजी , अरबी समुद्रातून आला . त्याने आपल्या संस्थानांकडे तैनाती फौजा ठेवल्या ! त्यांच्या दिमतीला मुलुख तोडून मागितला आणि आपले संस्थानिक आपसातल्या लढाईला इंग्रजांचा दारुगोळा आणि थेट सहाय्य मागू लागले , ते लोण भाऊबंदकीने जर्जर झालेल्या आपल्या देशात सर्वत्र वेगाने पसरत गेले

  पेशवाईकडे हे पाप नक्कीच जाते ! कोणते पाप ? - त्यांनी शिवाजीच्या काळात दिसणारी
  "आपले स्वराज्य - माझे स्वराज्य " ही आपुलकी घालवली आणि एखाद्या बनिया सारखे राज्य चालवण्याचे दुकान मांडले . राज्यविस्तार हेच ध्येय मानून त्यासाठी स्वराज्य कर्जबाजारी बनवले
  असो - तर दिसले तसे मांडले !
  आप्पा बाप्पा राग मानू नये ,

  ReplyDelete
 3. संजय सर ,
  आपल्या ब्लोगवर असल्या विशायाना अत्यल्प प्रतिसाद मिळत असतो . तसेच आपले होळकर प्रेम आपल्याला हे लिखाण करायला लावत असेल , पण लोकाना त्याबद्दल काहीच सोयर सुटक नाही .
  अगदी कर्तव्य म्हणता येणार नाही , पण , आपल्या ब्लोगचे ध्येय काय ? आपणास या ब्लोगचा वापर करून काय मिळवायचे आहे असा जर विचार केला , तर , असे दिसते की आपण असंख्य विषयावर लिहित असता , त्यात लोकाना न आवडणारा विषय आहे हा !
  आपण ५०० पूर्वीचा इतिहास लिहाल , चाणक्य चंद्रगुप्त लिहाल , आरक्षण लिहाल , दुष्काळ लिहाल , जिहाद,सेन्सस , सांस्कृतिक आणीबाणी , महाभारत , खंडोबा , साहित्य संमेलने, शैव वैदिक असे काही लिहाल तर लोक आवडीने वाचतात , पण अशा विषयात रस नसतो असे दिसते . मलाही नाही ! पण आपल्या निदर्शनास आणण्यासाठी लिहिले

  ReplyDelete
 4. संजय सरांचा हा लेख अनेक नवी माहिती देत आहे . आम्हाला थोरले मल्हारराव होळकर इतकीच थोरवी माहित होती . परंतु पु . तुळसाबाई यांच्याबद्दल आपण लिहिले त्याबद्दल आभार . आता असेच एक पूर्ण सत्र आपण नागपूरकर भोसले , बडोद्याचे गायकवाड आणि शिंदे यांचा बद्दल लिहावे हि विनंती , पूर्वी लिहिले असल्यास त्याबद्दल सांगावे . धन्यवाद .

  ReplyDelete
 5. आप्पा - दमलो रे बाप्पा - किती धावाधाव करायची ? इतकं केलं म्हणून हा पाउस पडला .
  बाप्पा - अरे आपण , वैष्णव , हे संजय सोनावणी आपल्याला थोडच क्रेडीट देणार आहेत त्याचे ?
  आप्पा -अरे पण आपण त्यांच्याच देवाला साकडे घातले ना ? पार कैलासाच्या पायथ्याशी गेलो !
  बाप्पा - एक मात्र या पुराणांचा उपयोग होतो बर का ! भोला सांब किती भोळा आहे ते समजल बघ . आपल्याला पाहिल्यावर कस म्हणाला , तुम्ही कुठले ? पुण्याचे ? आपण जेंव्हा म्हटलं की आपण शैव आहोत , तुमचे निस्सीम भक्त आहोत तेंव्हा त्याला अजिबात डाऊट आला नाही , मला वाटलं होत की आता धरतो की काय ?
  आप्पा - पण जेंव्हा म्हणाला ना की मी पुण्यालाच पाउस पाडायला निघालोय , तेंव्हा खर नाही वाटलं , अस वाटलं की कोणी पुण्याचा मंत्रीच बोलतो आहे !
  बाप्पा - छेरे , तो पुण्याचा मंत्री " हिरवी देठ हिरवी देठ " असे केसाला कलप लाऊन म्हणत बसलाय !त्याला माहित पण नाही की कैलासाचा शंकर साक्षात ओंकारेश्वरला येउन जाणार आहे ते !
  आप्पा - पण काहीही म्हण हं - भोलेनाथ आला तोच मुळी मुसळधार पाऊस घेऊनच आला !
  बाप्पा - आपण खोट बोललो त्याच पाप आपल्याला लागेल ते लागो , पण आपण हाक मारली - आणि आला बघ रे -
  आप्पा - म्हणजे आपण वैदिक लोक म्हणतात तितके पापी नाहीयोत नाही का रे ? आता हे ठीक आहे , की लोकांसाठी आपल्याला खोटे बोलावे लागले . आपण शैव आहोत असे सांगावे लागले .
  बाप्पा - खर सांगू का , अरे आपण वैदिक आहोत असे म्हटले असते ना साक्षात शिवाला , तरी तो आलाच असता पाऊस घेऊन - - हे राजकारणी पण एकमेकाची काम करतातच की नाही रे ?
  आप्पा - चाल तर मग , निदान एक प्रदक्षणा तरी मारू ओंकारेश्वराला ,
  बाप्पा - पण ती भोलेनाथाची प्रदक्षणा फार उलटी सुलटी असते रे !
  आप्पा - असू दे असू दे - पब्लिक साठी काहीही करायची आपल्याला सवय केली पाहिजे . आफ्टर आल यु नो व्हाट आय मीन - आज सत्यनारायणाचा शेवटचा दिवस आणि मेघराज बरसले !
  बाप्पा - म्हणजे तुला काय म्हणायचे आहे ? सत्य नारायणाने जाता जाता पाउस पाडला ?

  ReplyDelete