Saturday, December 26, 2015

एक सांगू....

एक सांगू
मला चित्रे काढायचीत
जमतील तशी
जमेल तसे गायचेय
संगीत द्यायचेय
अथांग स्वप्ने
कागदावर उतरवायचीत
कोणी ऐको न ऐको
पाहो न पाहो
वाचो न वाचो
मला मनमुक्त व्यक्त व्हायचेय
या आभाळाच्या सावलीत
घनगंभीर दर्याच्या काठी
दर्यात किंवा आभाळात
झोपडीत किंवा उजाड डोंगरमाथ्यावर
भटक्या माणसांसोबत
शेळ्या-मेंढ्यांसोबत
उन्मुक्तपणे
किंवा वाघ-सिंहाच्या
कोल्हे लांडग्यांच्या झुंडीत
जीव मुठीत घेऊन का होईना
जगायचय...
मला माझ्या तीळ तीळ तुटणा-या भावनांना
शब्द किंवा स्वर
किंवा चित्र द्यायचेय...
मला जगण्यावर प्रेम करायचय
मला थांबवू नका...
मला केवळ मी तुमच्या कळपातला कधीच नव्हतो
म्हणून मारू नका....
मला व्यक्त होऊद्यात...
हे विराट आकाश मला
त्याच्या अनंत पोकळीत
स्वत:च अदृष्य करत नाही
तोवर...
मी माझ्या
विराट मानवी समुदायाच्या
मांडीवर
मस्तक टेकत
शेवटचा श्वास घेत नाही तोवर...
मला मारू नका!

(मानवतेसाठी एक चिंतन!)


No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...