Saturday, January 23, 2016

रोहिथ वेमुला...एक मूक्त चिंतन


माहितीच्या व प्रोपागंड्यांच्या या महाविस्फोटात कोणी सत्य शोधायला जाईल तर पदरी निराशाच पडेल. प्रत्येकजण त्यामुळे हवे तेवढेच सत्य म्हणून स्विकारतो आणि आपापले अजेंडे राबवतो. त्यामुळे एकाच घटनेचे असंख्य अर्थ घेतले जातात किंवा जाणीवपुर्वक दिले जातात. आपणच काढलेला अन्वयार्थ खरा आहे असे दावे हिरीरीने शिस्तबद्ध पसरवले जातात. यातून जे संघर्ष उभे राहतात त्यातून मुख्य घटना मात्र पोरकी होऊन बसते. तिच्या मुळ कारणांचा तटस्थ शोध घेण्याच्या फंदात कोणी पडत नाही. अजून दुसरी कोणती घटना घडत नाही तोवर हे वादळ चालू राहते नि काही दिवसांत विझतेही.

रोहिथ वेमुलाचे आत्महत्या प्रकरण कितीही गंभीर असले तरी या प्रकरणाचेही हेच होत आहे असे माध्यमांतील चर्चा पाहिल्या तर स्पष्ट होते. एकीकडे आंबेडकरवादी/बहुजनवादी आक्रोशत आहेत, हे प्रकरण म्हणजे व्यवस्थेने केलेली हत्या आहे असे म्हणत आहे तर दुसरा संघवादी गट वेमुलाला देशद्रोही ठरवण्याच्या अथक प्रयत्नात आहे. त्याला बेजबाबदार, सातत्याने विचार बदलणारा अस्थिर मनोवृत्तीचा छंदी-फंदी आंबेडकरवादी म्हणून रंगवण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यात पंतप्रधानांनी "भारतमातेने एक सुपुत्र गमावला..." असे विधान केले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी वेमुलाच्या प्रेताच्या साक्षीने आपापले राजकारण साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण यात अशी घटना घडतेच कशी याबाबत चिंतन करण्यात व असे पुन्हा कधी होनार नाही यासाठी कायमस्वरुपी व्यूहरचना करण्यात आम्ही अपेशी ठरत आहोत ही बाब पुन्हा अधोरेखित होते आहे.

मूख्य बाब म्हणजे तरुणाईचे मानसशास्त्र आम्ही समजावून घेत नाही आहोत. तरुणाई ही बंडखोर असते, रुढतेला नाकारणारी असते. तरुणाईने व्यवस्थेच्या, परंपरांच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे. भारतात कोणी तरुण सावरकर-भगतसिंगांच्या क्रांतीवादी तत्वज्ञानाच्या मोहात जातो तर कोणी संघवाद, मार्क्सवाद, माओवाद व आंबेडकरवादाच्या छायेखाली जातो. गरम रक्ताच्या तरुणाईला गांधीवाद सहजी पचनी पडत नाही. भारतात तरुण कोणत्या वादाच्या आहारी जाईल हे जवळपास त्या तरुणाच्या जातीय/धार्मिक संदर्भांवर अवलंबून असते. निखळ वैचारिकतेचा पाया त्यामागे असतोच असे नाही. शिवाय ज्या महाविद्यालयात/विद्यापीठात जे जे विचारप्रवाह मजबूत असतील त्यापैकी एक तरी एखाद्याला इच्छा नसली तरी अपरिहार्यपणे स्विकारावा लागतो. एकटे पाडले जाण्याचा धोका किती तरुण पत्करू शकतात हाही अभ्यासाचा एक विषय आहे.

स्वविवेक जागा असलेले स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण या वातावरणात गोंधळून जाणे स्वाभाविक म्हणता येते. वेमुलाने आपल्या विचारधारा बदलल्या असा जो दावा केला जातो तो मुर्खपणाचा आहे. मुळात "स्वशोधाची" म्हणून जी प्रक्रिया असते त्यात "स्व" शी जवळीक साधणारे तत्वज्ञान कोणते याचा शोध घेणेही महत्वाचे बनून जाते आणि तरुणाईत तर अधिकच. खरे तर यालाच स्वातंत्र्य म्हणतात. माणसाने एकाच विचारसरणीत आयुष्यभर बंदिस्त व्हावे ही अपेक्षा करणे वेडेपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मरणोत्तर वेमुलाला बदनाम करण्यासाठी त्याचे कालौघात बदललेले विचार वेठीला धरणारे मुर्ख आहेत. देशाला सुस्थितीत आणण्यासाठी कोण योग्य आहे हे ठरवतांना एक लक्षात घ्यायला हवे कि काल जे योग्य वाटले होते त्यांनीही निराशा केली आणि आज जे योग्य वाटत आहेत तेही निराशा करत आहेत. भविष्यातले आपल्याला माहित नाही. अशा संभ्रमयूक्त राष्ट्रीय स्थितीत अनुभव्यांची जेथे पंचाईत झाली आहे तेथे जीवनाच्या प्रांगणात खुले पाऊल टाकु पाहणा-या सर्वच युवकांचे काय होत असेल याची कल्पना करुन पाहिलीच पाहिजे.

 वेमुलाने (व त्याच्या सहका-यांनी) याकुबच्या फाशीला विरोध केला म्हणून तो देशद्रोही असाही एक हिंस्त्र विचार लाटेसारखा पसरवला जात आहे. या देशात प्रत्येकाला आपले मत लोकशाही मार्गाने मांडायचा अधिकार आहे हे मात्र सोयिस्करपणे ही मंडळी विसरते. गोडसेंचे पुतळे / मंदिरे उभी करण्याची मागणी करणारे त्यांचे स्वातंत्र्य वापरत नाहीत काय? त्यांना जे स्वातंत्र्य आहे तेच स्वातंत्र्य वेमुलालाही होते हे कसे विसरणार? शिवाय याकुबच्या फाशीला विरोध आणी त्याची आत्महत्या या दोन घटनांचा काय संबंध आहे? त्याची आत्महत्या ही त्याच्यासह काही विद्यार्थ्याला होस्टेलमधून काढून लावले, विद्यापीठाच्या परिसरात काही विभाग त्यांच्यासाठी बंद केले गेले, केंद्र सरकार ते विद्यापीठाच्या उच्चस्तरीय समितीने आणि अभाविपने जे असह्य दबाव निर्माण केले त्यास तोंड देणे असह्य झाल्याने त्याने हार मानून आत्महत्या केली असे हाती आलेल्या सर्व माहित्यांचा आढावा घेतला तर दिसते. या दबाव आणणा-या घटकांची नि:पक्षपाती चौकशी करणे व त्याबाबतच बोलणे अभिप्रेत असता वेमुलाची बदनामी करण्याचे कारण काय? पण असे घडते आहे. वेमुलाबाबतच नाही तर गेल्या दोनेक दशकांतील घटना पाहिल्या तर असेच झाले आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे मोडस ओपरेंडी एकच आहे...पिडित मयतांना व त्यांच्या कुटुंबियांना बदनाम करणे. त्यात ते यशस्वी होतात हेही कटू वास्तव आहे.

यातून काय साध्य करायचे आहे? विरोधी गटांत उभी असलेली तरुणाई व अनुभवी घटक यांचे मानसिक खच्चीकरण कसे होईल हे पहायचे. संघवादी तरुणांची मानसिक ससेहोलपट शक्यतो होत नाही कारण ते नुसते एका विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात असे नाही तर त्यांच्या मागे शक्तीशाली शिस्तबद्ध काम करणारी यंत्रणा उभी आहे. अशी यंत्रणा दुस-यांकडे नाही ही कटू वस्तुस्थिती आहे. मार्क्सवादाची लय कधीच विरलेली आहे. आंबेडकरवादी आज केवळ प्रतिक्रियावादी व विखुरलेले आहेत व तो केवळ भावनिक आहेत. वैचारिक गंभीर पाया त्यांनी कधीच गमावला आहे. अन्य हिंदू बहुजनांना आंबेडकरवाद आजच्या आंबेडकरवाद्यांमुळेच फारसा स्विकारार्ह नाही असे दुर्दैवी चित्र आहे. त्यामुळे ते एकतर संघवाद्यांच्या कळपात जातात किंवा स्वजातीय संघटनांत अथवा कळपांत आपले अस्तित्व जपतात. सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ व्यापक होण्याऐवजी ती आक्रसत चालली आहे. बाबासाहेब म्हणाले होते, जोवर सामाजिक स्वातंत्र्य येत नाही तोवर राजकीय स्वातंत्र्याला अर्थ नाही आणि नेमके हेच आंबेडकरवादी विसरले आहेत.

जातीयवादाविरुद्ध बोलतांना, दुस-यांना त्यासाठी जबाबदार धरतांना, आम्ही आमची जात सोडायचा यत्किंचितही प्रयत्न करत नसू... तर आम्ही आंबेडकरवाद त्यागला आहे असेच म्हणावे लागेल. आम्हाला नीट राष्ट्रव्यापी सम्यक विचारधारेचे संघटन करत संघाला वैचारिक व सांस्कृतिक तोंड देता येत नसेल तर आंबेडकरांचा बुद्धीवाद, फुल्यांची बंडखोरी आम्हाला मान्य नाही असेच म्हणावे लागेल. खरे तर आज आंबेडकरवाद एकाकी पडत आहे काय यावर नव्याने चिंतन करावे लागेल. जाते/धर्म निरपेक्ष मानवतावादी राष्ट्रव्यापी, राजकारण निरपेक्ष संघटन करावे लागेल...आणि तरच आम्ही वेमुलासारख्या विद्यापीठांत झालेल्या अनेक आत्महत्यांना न्याय देवू शकू आणि पुन्हा अशा आत्महत्या होणार नाहीत याची दक्षता घेऊ शकू!

अन्यथा...अजून एक घटना....तेच निषेध...तेच मोर्चे....सोशल मिडियावर एकाहुन एक तीव्र आवेगातले आक्रोश...एवढेच घडत राहील...बाकी काही नाही!

8 comments:

  1. वास्तव चित्रण. पण खेदाने नमूद करावं लागतंय, हे अरण्यरुदन आहे !

    ReplyDelete
  2. विषयाचे अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर! पण बऱ्याच व्याख्या पुन्हा एकदा तपासून बघायला हव्यात. पहिले म्हणजे जे संघवादी आपण म्हणतो त्यात अनेक जन तोंडावर संघाला शिव्या देतात आणि त्यांची वेळ आली कि संघाच्या विचारांची री ओढताना दिसतात. त्यांना कसेही करून समाज आपल्या अधिपत्याखाली हवा असतो म्हणजे त्याचे व्यवस्थित शोषण करता येते. बहुजन हे सगळे आंबेडकरवादी आहेत का हाही एक मोठा प्रश्नच आहे. आता फुले आंबेडकरवादी हि राजकीय नावे झाली आहेत. भले अशी घटना ऐकून एखाद्या दलिताच्या छातीत धस्स झालेले असते, पण ते तो लपवून स्वतःला मोठा राजा महाराजा समजतो. आता बहुजन, दलित अभिजन, सवर्ण व मुस्लिम ह्या सगळ्यांना वेगवेगळे करून कडक कायदे करायची वेळ आली आहे. आजकाल कोणीही उठतो आणि फुले आंबेडकरी चळवळीचे कातडे पांघरतो. त्यामुळे चळवळ निष्फळ होत चालली आहे. रोहित वेमुला हा हि एक भरकटलेला आंबेडकरवादी होता का अशी शंका येते. कारण याकुबच्या फाशीचा आणि दलितांचा उद्धार यांचा काडीमात्र संबंध नाही. तरीही त्याने याकुबचा फाशीवर काही बोलले असेल तर त्याचे करते करविते सुद्धा शोधले पाहिजेत. आंबेडकरांचे मुस्लिम विषयक विचार हि तितकेच स्पष्ट होते याचा विचार आपण इथे करणे आवश्यक आहे. दलित चळवळीचा जर कोणी मुस्लिमांच्या फायद्याच्या दृष्टीने वापर करीत असेल. तर त्यालाही सोडून चालणार नाही.

    ReplyDelete
  3. दुख हे आहे कि आंबेडकरी चळवळ सुरु व्हायच्या आतच संपुष्टात आणायचा डाव सगळेच करताहेत. अनेक कारणे आहेत. सवर्णांची संख्या अधिक आहे. ते एकत्र आहेत. ते आंबेडकरी चळवळीला एक उपद्रव समजतात व लवकरात लवकर ती संपवून आपली मध्ययुगीन सत्ता स्थापन करण्याचा डाव करतात. आंबेडकरी चळवळ फक्त शिक्षण आणि सरकारी नोकरी क्षेत्रापुरती मदत करणारी आहे. शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन सरकारी नोकरी करणे हा एकच पर्याय मागासवर्गीयांना शिल्लक असतो पण तोही ह्यांच्या डोळ्यात सलतो. संख्या अधिक, पिढीजात जमिनी, भरपूर भांडवल, मोठा समाज ह्या सवर्णांच्या आव्हानापुढे मागास युवक व्यवसाय करायचा धोका पत्करण्याच्या मानासिकेतेत येउच शकत नाही. तेव्हा चळवळ अधिक व्यापक बनवायची गरज आहे.

    ReplyDelete
  4. Atishay surekh chintan! Swatantrya vishayiechi tumchi bhumika far far changali aahe.
    Dhanyawad.

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  5. सुप्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाकडून मिळालेली डी. लिट पदवी परत करणार आहेत. हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर असलेल्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर वाजपेयी यांनी हा निर्णय घेतला आहे.





    अशोक वाजपेयी यांनी दादरी प्रकरणानंतर साहित्य अकादमी पुरस्कारही परत केला होता. त्यानंतर हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाकडूनच त्यांना बहाल केलेली डी लिट पदवी त्यांनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.


    रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. चौकशी समिती संपूर्ण प्रकरणाचा तपास करुन अहवाल सुपूर्द करणार आहे.





    काय आहे प्रकरण ?





    केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी स्मृती इराणींना एका पत्र लिहून हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ हे जातीयवादी, उग्रवादी आणि राष्ट्रविरोधी राजकारणाचा अड्डा झाल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या पत्रानंतरच विद्यापीठ प्रशासनाने पाच विद्यार्थ्यांची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली. यापैकी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने रविवारी संध्याकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.





    रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी बंडारु दत्तात्रेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मात्र दत्तात्रेय यांनी त्या पत्राचा आत्महत्या केलेल्या रोहितशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.


    मुंबई बॉम्बस्फोटांचा दोषी याकूब मेमनला फाशी झाली त्यावेळी माकपशी संबंधित विद्यार्थी संघटना एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर काही दलित विद्यार्थ्यांवर दुसऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप झाला. संबंधित विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याच्या आईने कोर्टात धाव घेतली. यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं.

    ReplyDelete
  6. याकूब ची फाशी टळावी यासाठी किती साहित्यिक,पत्रकार,नेते,अभिनेत्यांनी टाहो फोडला होता हे सर्वाना ज्ञात आहे . त्यांचे बाबतीत काय व्यवहार करण्यात आला ?

    ReplyDelete
  7. याकुब मेमन की फाँसी रुकवाने हिन्दुस्तान के जिन
    चालीस ने राष्ट्रपति को चिठ्ठी लिखी थी ..उनके नाम..!!
    01- वृंदा_करात
    02- प्रकाश_करात
    03- शत्रुघ्न_सिन्हा
    04- राम_जेठमलानी
    05- महेश_भट्ट
    06- शाहरुख_खान
    07- अमिर_खान
    08- सैफ_खान
    09- नसीरुद्दीन_शाह
    10- सलमान_खान
    11- अरविंद_केजरीवाल
    12- तिस्ता_सितलवाड
    13- दिग्विजय_सिंग
    14- लालू_यादव
    15- नितीश_कुमार
    16- अबु_आजमी
    17- प्रशांत_भुषण
    18- अससुद्दीन_ओवैसी
    19- अखिलेश_यादव
    20- आजम_खान
    21- सचीन_पायलट
    22- राहुल_राय
    23- जनरैल_सिंहद
    24- अलका_लांबा
    25- आशुतोष
    26- सागरिका_घोष
    27- करिना_खान
    28- सानिया_मिर्जा
    29- अकबरूद्दिन_ओवैसी
    30- शाजीया_इल्मी
    31- अहमद_बुखारी
    32- अभय_दुबे
    33- रविश_कुमार
    34- पुण्य_प्रसुन_बाजपेयी
    35- ममता_बॅनर्जी
    36- सिद्धारमैया
    37-आशीष_खेतान
    38- अग्निवेश
    39- संजय सिंह
    40- शकील_अहमद
    भारत सरकार से अपील है की अभी-अभी अब - पंजाब में आतंकवादियों द्वारा किये गये हमले से लड़ने के लिए सेना,कमांडों इत्यादि ना भेजे जिन 40 मशहूर हस्तियों ने अपने AC कमरों में बैठकर आतंकी याकूब मेमन पर दया दिखाने की चिट्ठी लिखी है उन सभी महान आत्माओं को वहां भेजा जाए आतंकवादियों को प्यार से समझाने-बुझाने और मनाने के लिए क्योकि आज अगर सेना ने अपनी जान जोखिम में डालकर😈इन्हें गिरफ्तार कर भी लिया तो 10,15 साल बाद मीडिया और कुछ देशद्रोही इन्हें बचाने की मुहिम छेड़ देगें।
    जय भारत 🙏👍☝

    ReplyDelete
  8. People need freedom! Freedom to treacherous acts, disloyalty, infidelity.........

    Humanity on the ruin....

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...