पुर्वी छत्रपती पेशव्यांना वस्त्रे द्यायचे, आता फडणवीस छत्रपतींना वस्त्रे देत आहेत असे विधान शरद पवार यांनी केले. अलीकडे राजकारणी नेते अफजलखान, निजाम, औंरंगजेबाचे सैन्य वगैरे शेलके शब्द विरोधकांना वापरत मराठी राजकारण आजही सरंजामदारी युगात अडकलेले आहे आणि त्याचा उद्धार होणे शक्य नाही याबाबत विश्वास देत आहेत. शरद पवारांनी केलेले विधान उपहासात्मक असो कि "कहीं पे निगाहें...कहीं पे निशाना" या थाटाचे असो, ते जातीवादीच आहे असे बहुसंख्य विश्लेशकांचे मत आहे व वाहिन्यांवरही त्याचे पडसाद उमटले आहेत. कोण किती जातीयवादी आहे हे सांगण्याची मोहिम जोमात आहे.
पेशवे म्हणजे ब्राह्मणच असा दृढ समज असंख्य महाराष्ट्रीयनांचा आहे. खरे तर पेशवे म्हणजे राजातर्फे राजनैतिक पाहूण्यांसमोर प्रथम पेश होणारा सेवक. हा शब्द अभारतीय आहे. फारसी भाषेतून हा शब्द आलेला आहे. हे पद पंतप्रधान पदाचे वाचक नाही. पंतप्रधानाच्या समानार्थी येणारा शब्द म्हणजे "वजीर". पेशवे पद हे तसे अप्रसिद्धच म्हतले पाहिजे, कारण या पदाची सामान्य राजनयिक जबाबदारी. अधिकार अगदी किरकोळ. हे पद वंशपरंपरागत नसे. हे पद शिवाजी महाराजांनी निर्माण केले. शिवकालीन अष्टप्रधानांबद्दल कोणी लोकशाहीच्या बीजारोपणाचे उदाहरण देत असले तरी अष्टप्रधानास विशेषाधिकार नसत. संभाजी महाराजांनी आपल्या हत्येच्या कटात सामील असल्याच्या आरोपावरुन मोरोपंतांना अटकेत टाकले होते व कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. पुढे काही काळ प्रल्हाद निराजी पेशवे असावेत असा इतिहासकारांचा अंदाज आहे.
पुढे मात्र संभाजी महाराजांनी अटकेतच असलेल्या मोरोपंतांच्या पुत्राला, निळोपंत यास, कैदेतून मुक्त करून पेशवाई दिली. पण त्यामागे कटवाल्यांना अजून संधी मिळु नये, शांतता राखावी हा प्रमुख हेतू होता. अन्य पदे, मुजुमदार (अमात्य), सेनापती वगैरेही वंशपरंपरागत नव्हती.
शाहु महाराजांना सातारच्या गादीवर आणण्यात बाळाजी विश्वनाथाचा वाटा मोठा होता. कोल्हापुर गटाची कारस्थाने बाळाजीने मोडुन तर काढलीच पण आंग्रेंसारखे ताराबाईच्या बाजुला असलेले बलाढ्य सरदारही त्याने शाहुच्या बाजुने शक्ती-युक्तीने उभे केले. प्रसंगी कर्ज तर काढलेच पण एकदा त्याचे अपहरणही झाले होते. त्याने जीवावरची संकटे झेलली. राजसबाईला हाताशी धरुन ताराराणीला शेवटी पन्हाळ्यावर नजर कैदेत ठेवण्यात आले.अशा रितीने शाहुंना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अधिकृत वारस म्हणुन जनमान्यता व बव्हंशी सरदार मान्यताही लाभली. बाळाजी विश्वनाथ हा शाहुंचा अत्यंत मुत्सद्दी आणि विश्वासु सहकारी बनला तो त्याने शाहुंना केलेल्या अनमोल मदतीने. याचीच परिणती बाळाजील पेशवेपद मिळण्यात झाली.( १७ मे १७१३) बहुतेक सर्व प्रशासकीय स्वातंत्र्य बाळाजीच्या हवाली करुन सातारा येथे शाहु सुखाने राहु शकले.
बाळाजीनंतर बारामतीच्या नाईकांना पेशवेपद द्यावे या मताचा गट प्रबळ होता. पण शाहू महाराजांनी बाजीरावाला ते पद दिले. बाजीरावाने त्या संधीचे सोने कसे केले ह इतिहास सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे पेशवेपदाची प्रतिष्ठा वाडली. एवढी कि बाळाजीपासुनच्या पुढच्या काळाला पेशवाई असेच म्हटले जाते. हे सर्व ब्राह्मण होते. याला काही त्यांचा दोष म्हणता येणार नाही. दिली तख्तातही असेच राजकीय फेरफर होत वजीर महत्वाचा बनून बादशहा हे पद अधिकाराच्या दृष्टीने दुय्यम बनले. कारण औरंगजेबानंतरचे बादशहा बव्हंशी अकार्यक्षम होते. तसेच येथील शाहुमहाराजांनंतरच्या छत्रपतींचे झाले. पुढे तर छत्रपती पदावरील वारसाची निवड करण्यात पेशव्यांनीच भुमिका निभावली.
पेशवे पदाची अप्रतिष्ठा दुस-या बाजीरावाने केली हे सर्वांना माहितच आहे. पेशवेपदाला हपापलेल्या राघोबादादाने तर खून करण्याइतकी मजल गाठली होती. तसे जगाचाच इतिहास राजकीय सत्तापिपासा आणि त्यासाठी केली गेलेली कटकारस्थाने यांनी भरला आहे. मराठेशाहीही त्याला अपवाद नव्हती हे आपल्याला शांतपणे समजावून घ्यावे लागंणार आहे.
भारतात कोणा राजाने छत्रपती ही पदवी धारण केल्याचे उदाहरण नाही. काही अभिषिक्त राजांचे दाखले आपल्याला रामायण महाभारतापासून ते पुराणांत मिळतात. युधिष्ठिर, राम वगैरे सुपरिचित उदाहरणे. राज्याभिषेक अर्थातच दोन प्रकारचा...एक वैदिक व दुसरा तांत्रिक म्हणजे शैव अथवा शाक्त. शिवाजी महाराजांनी दोन्ही प्रकारचे राज्याभिषेक करून घेतले. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची एवढी सखोल माहिती मिळत नाही, त्यामुळे तो वैदिक कि शाक्त हे समजत नसले तरी संभाजीमहाराज स्वत: शाक्त पंथाचे अनुयाये असल्याने तो शाक्त असण्याची शक्यता आहे.
असे असले तरी इतिहासकाळात अथवा पुराणांतरी "छत्रपती" हे बिरूद कोणी वापरल्याचे दिसत नाही. चक्रवर्ती, राजाधिराज, राजराजेश्वर, राजाधिराज इत्यादी पदव्या पुराणांतरी जशा आहेत तशाच शिलालेख अथवा नाण्यांवरही दिसतात. पण छत्रपती ही पदवी दिसत नाही.
छत्रपती या शब्दाच्या उगमाच्या अनेक व्युत्पत्ती आहेत. त्यातील महत्वाची अशा, आपल्या अनुयायांना छत्रछायेत घेतो तो छत्रपती किंवा छत्र-चामर धारण करायचा अधिकार ज्या व्यक्तीस आहे तो छत्रपती. दुय्यम अर्थ असा कि ठरावीक क्षेत्रावर अधिकार असलेली व्यक्ती म्हणजे क्षेत्रपती-छत्रपती.
शिवाजी व संभाजी महाराजांनी या पदव्या घ्याव्यात हे कोणे सुचवले हे आपल्याला आज माहित नाही. पण महापराक्रमाने, प्रजाहितदर्शी धोरण राबवल्याने छत्रपती म्हटले कि हे दोनच छत्रपती आठवतात एवढी महत्ता छत्रपतीपदाला आली. पंण पुढे ती केवळ एक वंशपरंपरागत पदवी बनली असल्याचे दिसते. राजर्षि शाहू महाराज त्याला अपवाद.
फडणवीस हा शब्द माराठी अथवा संस्कृत नाही. हाही शब्द फारसी-उर्दू मिश्रणातून आलेला. कारकुणांची बसायची जागा तो फड आणि कारकुन म्हणजे फडणवीस असा याचा साधारण ढोबळ अर्थ. कारकुन शब्दही तसा उर्दुच. त्या काळात मराठीवर फारसी भाषेचे वर्चस्व मोठे होते. त्यामुळे बरीच पदनामे ही फारसोद्भव असत. त्यामुळे ही पदे धारण करणारे ब्राह्मणच होते असेही नाही.
आता आपल्याला मध्ययुगाचा सांस्कृतिक इतिहास पाहिला पाहिजे. लेखन-वाचन-पत्रव्यवहार-करारनामे वगैरे करणारा एकच एतद्देशेय वर्ग होता तो म्हणजे ब्राह्मण. कायस्थ हे त्याखालोखाल या पदांसाठी लायक समजले जात. या काळातील; सांस्कृतिक, विशेषत: जातींमधील संक्रमणे व अदलाबदली विलक्षण आहेत. इतिहासात कायस्थांनी ब्राह्मण असल्याचे जे दावे केलेले दिसतात ते यामुळेच. असे अनेक मुळच्या ब्राह्मण नसलेल्या जातींबाबतही झाले व काहींनी ते दावे खरेही करून घेतले.
आज ज्या कोणची अमूक जात आहे असे मानले जाते त्याची जात तीच अगदी पुर्वीपासून होती हे मानणे निरर्थक होऊन जाते ते त्यामुळेच. पण आपण आज एकविसाव्या शतकात आहोत. आधुनिक काळात आहोत. ज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. पण आपल्या सामाजिक व राजकीय संकल्पना मध्ययुगात होत्या तशाच वेडपट आणि अज्ञानमुलक आहेत. त्यातून आपली सुटका झालेली नाही. किंबहुना त्यातून सुटावे असे आपल्यालाच वाटत नाही.
शरद पवारांच्या अथवा अन्य नेत्यांच्या वक्तव्यांवरुन हेच चित्र दिसते. खरे म्हणजे मध्ययुगातील पदव्यांचे आणि त्यावरून जातींचे स्तोम माजवण्याचे, त्यांचा माज करण्याचे अथवा दुस-यांना हिनवण्यासाठी त्यांचा वापर करण्याचे काहीएक कारण नाही. ब्राह्मण विरुद्ध मराठा हा वाद अलीकडेच पेटवला गेला. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने त्यात मोठी भुमिका बजावली. हा वाद ब्राह्मण विरुद्ध बहुजन आहे अशी मांडनी करण्याचा प्रयत्न करत ब्राह्मण विरोधाचे रान पेटवले गेले. ब्राह्मणांच्या काहीच चुका नाहीत असे म्हणायचे धाडस खुद्द ब्राह्मणही करणार नाहीत. पण प्रत्येक सामाजिक दोषाचे खापर ब्राह्मणांवर फोडायची जी टुम निघाली त्यामागे केवळ राजकारण होते व आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.
प्रथम एक बाब लक्षात घ्यायची बाब अशी कि अपवाद वगळता मराठा समाज आपल्याला "क्षत्रीय" म्हनजेच वैदिक समजतो. क्षत्रीय हा वैदिक व्यवस्थेत ब्राह्मणापेक्षा दुय्यम असतो. अगदी प्राचीन काळापासून ब्राह्मण विरुद्ध क्षत्रीय हा वाद वैदिक धर्मेतिहासात हिरीरीने लढला गेलेला आहे. विश्वामित्राचे आद्य उदाहरण देता येईल. क्षत्रीय असलेल्या विश्वामित्राने ब्राह्मणत्व मिळवण्यासाठी किती यातायात केली याच्या असंख्य पुराकथा आहेत. वेदविरोधी क्षत्रीयांनीच उपनिषदे लिहिली असेही आवर्जून सांगितले जाते. ब्रह्मण श्रेष्ठ कि क्षत्रीय हा वाद तर विकोपाक्ला गेला होत्ता. गौइतम बुद्धही क्षत्रीयालाच ब्राह्मणंपेक्षा श्रेष्ठ मानत होता असेही आपल्याला दिसते. शेवटी क्षत्रीयच कसे नामशेष झाले या वैदिकांनी कधी परशुरामाचा बहाना दिला तर कधी नंदानेच क्षत्रीय नष्ट केले अशा पुराकथा निर्माण केल्या. मध्ययुगात केवळ रजपुतांना अग्नीकुलोत्पन्न क्षत्रीय अशी मान्यता दिली गेली. एरवी क्षत्रीय नाहीतच अशी वैदिक उद्घोषणा आहे. वेदोक्त प्रकरणात लो. टिळकांनीही हीच भुमिका घेतले होती हे सर्वविदीत आहे. टिळक म्हणाले होते, "या काळात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले असून शिवाजी महाराजही शूद्रच होते. तथापि त्यांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी ( म्हणजे वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी) खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला ; पण त्या वेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा वैदिक ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही . . . ." (संदर्भ : "राजर्षी शाहू छत्रपती" ; डॉ जयसिंगराव पवार , पृष्ठ ३५, "लोकमान्य टिळक यांचे चरित्र" , न. चिं. केळकर) अर्थ स्वयंस्पष्ट आहे. ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणीही वैदिक नाहीत असा निर्वाळा धर्मेतिहासातील तत्कालीन तज्ञ लो. टिळकांनीच हा निर्वाळा दिलेला आहे, तरीही अनेकांच्या मनात क्षत्रियत्वाचे थोतांड एवढे भरलेले आहे कि कोणीही उट्घतो आणि क्षत्रिय म्हणून मिरवतो! आणि वर गंमत म्हणजे सारे सामाजिक दोष ब्राह्मणांनीच निर्माण केलेत असेही घसे फाडून सांगतो. मग तेंव्हा क्षत्रिय (यांचेच पुर्वज) काय करत होते हे सांगायला यांची वाचा का बसते?
थोडक्यात, ब्राह्म्नण श्रेष्ठ कि स्वत:ला क्षत्रीय मानणारे सत्ताधारी वर्ग श्रेष्ठ यांच्यातील हा कलह आहे. तो आजही जीवित असावा यासारखे दुर्दैव नाही. परंतु वैदिक वर्णश्रेष्ठत्वाच्या गारूडात जे अडकले आहेत त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार?
मराठीच काय पण भारतातील अन्य राज्यांतील राजकीय कलहातही हा वाद प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या खेळला जात असतो त्यामुळे हे विवेचन करणे गरजेचे होऊन जाते. वर्चस्व कोनाचे असावे यचा निवाडा या लोकशाहीतझी होणे अशक्य झाले आहे. इतर वैदिकेतरांना यात वापरण्यापुरते दुय्यम स्थान आहे आणि ही लोकशाहीची शोकांतिका आहे. जाती-धर्माचा श्रेष्ठत्वतावाद मिरवत सत्तेची नवी समीकरणे बनवल्याने लोकशाही टिकू शकत नाही याचे भान आपल्याला अजून आले नाही.
जाती-धर्माचे राजकारण अज प्रत्येक पक्ष करतो हेही आपल्या लक्षात आले असेलच. तिकीट देण्यापासून याची सुरुवात होते. निवडून येण्याची शक्यता म्हणजे नेत्याच्या जातीचे उमेदवार मतदारसंघात बहुसंख्य अथवा निर्णायक असणे हा एकमेव निकश. यात गुण-लायकी याला महत्व नसते. पैसा आणि जात हेच काय ते निकश. यात लायक नेते वर येणे व लायकीची स्पर्धा होणे अशक्यच. म्हणजे जातीअंताकडे जातो, धर्मनिरपेक्ष होतो म्हणणारे दुतोंडी गांडुळे आहेत असे म्हटले तर वावगे काय?
आपली लोकशाही ही सरंजामदारांची लोकशाही आहे असे म्हटले तरी चालेल एवढे आपण लोकशाहीचे धिंदवडे काढलेले आहेत. आता तर घटनेलाच धर्मग्रंथ म्हणा असेही म्हटले जाते. यासारखा मुर्खपणा आम्ही भारतियच करु जाणोत. घटना परिवर्तनीय असते, धर्मग्रंथाप्रमाणे अपरिवर्तनीय नाही याचेही भान आम्हाला उरलेले नाही. घटना जणु देशाची नसून एकाच व्यक्तीने बनवली आहे अशा भ्रमात राहणा-यांचीही कमतरता या देशात नाही. पण ज्यांच्या मनात मानवतेपेक्षा जाती आणि धर्माचीच वर्चस्वतावादी वृत्ती ठासून भरली आहे त्यांचे वेगळे काय होणार? जातीच्या क्यन्सरने आम्हाला पोखरले आहे.
शरद पवार किंवा बाकीचे नेते जातीयवादी बोलतात त्याचे नवल वाटत नाही. पेशवे, फडणवीस किंवा छत्रपती हे शब्द जातीनिदर्शक बनवत आहोत हे न समजण्याएवढा निर्लज्जपणा आमच्यातच जर भरला असेल तर त्यांना तरी दोष कोणत्या तोंडाने देणार? वर्चस्व कोणाचे...ब्राह्मणाचे कि क्षत्रीयाचे हेच दाखवण्याचा हा पुरातन उपद्व्याप नाही काय? खरे तर लोकशाहीत एकदा निवडुन आल्यानंतर पंतप्रधान असो कि मुख्यमंत्री...तो सर्वांचाच असतो. त्याला जात-धर्म नसतो. घटनेशी इमानदार राहत जास्तीत जास्त समाजहित होईल असेच काम करणे त्यांच्याकडून अभिप्रेत असते. निर्णयांबाबत टीका करण्याचा, विश्लेशन करण्याचाही अधिकार प्रत्येक नागरिकाचा असतो. यपार व्यक्तीगत जाती-धर्माला मधे आणायचे काम नाही. पण सर्वच चुकत आहेत नि म्हणूनच भारतीय लोकशाहीची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे समजायचा प्रघात आहे. शाहू-फुले-आंबेडकर नांवे घेतली, त्यांचा जयघोष केला म्हणून कोणी पुरोगामी होत नाही. पुरोगामीपणा विचारांत व कृतीत असावा लागतो. उक्तीही प्रतीगामी आणि कृती तर पुरेपूर प्रतिगामी आहेत हेच या वादळावरून दिसते. महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता हेच काय ते खरे. खुद्द शाहु-फुले-आंबेडकरांची वैचारीक पायमल्ली करणारे कोणत्या तोंडाने त्यांचे नांव घेतात हे अनाकलनीय आहे. कोणताही राजकीय पक्ष अथवा कोनतीही सामाजिक संघटना या प्रतिगामीत्वात मागे नाही. कोण डावे कोण उजवे एवढाच वाद घालता येईल अशी आपली सामाजिक स्थिती आहे. इतिहासकाळातील पदे आजही उणे-दुणे काढण्यासाठी वापरली जात असतील तर प्रतिगामीत्वाचा कोणता कळस गाठायचा बाकी राहीला आहे? आज या पदांची कोणती महत्ता आहे? संभाजीराजे भाजपातर्फे खासदार होतात की अन्य पक्षामार्फत हा सर्वस्वी त्यांचा आंणि संबंधीत पक्षांचा निर्णय आहे. ते आता सामान्य नागरिक आहेत. "मराठा जातियवाद्यांचा कळपात गेला" हे विधानच जातीयवादी आहे. लोकांना त्यांच्याबाबत शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आदर वाटणे ही वेगळी बाब झाली. पण ते आज लोकशाहीत सरंजामदारशाही युगातील छत्रपती अथवा पेशवे अथवा फडणवीस उरलेले नाहीत याचे भान लोकांनीही ठेवले पाहिजे. पण राजामहाराजांचे आकर्षण सुटत नाही हे भारतभरचे चित्र आहे.
आम्हाला माणसांशी माणुस म्हणुन नाते बांधणारा माणुस हवा आहे! आमची लोकशाही (?) टिकु शकली तर ती याच पायावर टिकेल. अन्यथा धर्मा-धर्मातच नव्हे तर जाती-जातींतही वर्चस्वासाठी युद्धे सुरु होतील याचे भान आम्हाला आता तरी यायला हवे. लोकशाही टिकते ती सुजाण नागरिकांमुळे व समतेच्या व स्वातंत्र्याच्या पायावर. आमच्या देशात स्त्रीयांना अजून दुय्यम स्थान आहे. धर्मात तर तिला जवळपास स्थानच नाही. अनेक मंदिरांत जाण्याचे आजही बंदी आहे. अनेक जातींबाबतही ही बंदी कायम आहे. मुस्लिमांत तर स्थिती अजून विदारक आहे. साधा समान नागरी कायदा आम्ही अद्याप आणु शकलेलो नाही. अशरफ-अजलफ मुसलमानांतील संघर्ष आजही आहे. ख्रिस्त्यांतही जातीत्यवाद एवढा कि पुर्वास्पृष्य धर्मांतरितांसाठी वेगळे चर्चेस व वेगळ्या स्मशानभुम्या आहेत. आम्ही मानवतेचे विध्वंसक आहोत आणि श्रेष्ठ भारतियत्वाचे वृथा गुणगाण करतो. आमचे निवडणुकांतील सोशल इंजिनियरिंग म्हणजे सोशल डिस्ट्रक्शन आहे हे कोणीतरी समाजाला कान पिळुन सांगायची गरज आहे.
कोण करणार हे?
आम्हा प्रत्येक नागरिकाला हे काम करावे लागेल. मसीहा येत नसतात. तेही एक भ्रमजाल आहे. मसीहा म्हणजे मुर्खांच्या कळपातील कोणी एक अर्धशहाणा. सर्वांनीच शहाणे होत आपणच आपला पुर्णशहाणा मसीहा व्हायला काय हरकत आहे?
-संजय सोनवणी