Sunday, July 24, 2016

वैदिकांना याची एवढी निकड का?

सिंधु-घग्गर संस्कृती ही वैदिक आर्यांचीच निर्मिती हे सिद्ध करण्यासाठी काय उपद्व्याप चालले आहेत हे पाहिले तर थक्क व्हायला होते. सिंधू संस्कृतीची लिपी वाचल्याचे व ती वैदिक संस्कृती असल्याचे अनेक दावे केले गेले. एन. एस. राजाराम व एन. झा यांनी असाच दावा करत एक ग्रंथही लिहिला. त्यात त्यांनी २००० मुद्रांचे वाचन केल्याचे दाखवत काही मुद्रांवर वैदिक राजा सुदास, यदु, पुरु, कुत्स, राम आदींचा तसेच षडागमांचाही उल्लेख आहे तर बहुसंख्य मुद्रांवर नद्यांचे तर काही ऐहिक सामान्य उल्लेख आहेत असा दावा केला. याच ग्रंथात लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहित होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली. ही बनावटगिरी करण्याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीत घोडा असल्याचा एकही पुरावा नव्हता आणि वैदिक आर्यांचे संपुर्ण जीवन तर घोड्यांभोवती फिरते! त्यामुळे सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व होते हे दाखवण्याची त्यांना निकड होती. त्याशिवाय सिंधु संस्कृती वैदिकांची निर्मीती हे कसे सिद्ध करणार?

हे दावे वृत्तपत्रांत व पुस्तक (The Deciphered Indus Script-1999) प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ उडाली. कारण या शोधाने सिंधू संस्कृतीचा इतिहास नव्याने लिहिणे भाग होते. जगातील एका प्राचीन संस्कृतीची लिपी वाचणे हे असामान्य कार्य होते यात शंका नाही. पण राजाराम आणि झा यांचे दुर्दैव. हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी झा व राजाराम यांची बदमाशी फ्रंटलाईनमद्ध्ये (आक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आनली. या लेखात त्यांनी वैदिकवाद्यांच्या बनावटगिरीवर कठोर टीका केली. राजाराम व झा यांनी मुळच्या तुटलेल्या अर्धवट एकशिंगी बैलाच्या (Unicorn) मुद्रेला संगणकीय आधार घेत पुर्ण करत तो बैल घोडा असल्याचे कसे दाखवले आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. (http://www.frontline.in/static/html/fl1720/17200040.htm या लिंकवर हा लेख उपलब्ध आहे.) यामुळे भारतीय विद्वत्तेची जगभर लाज निघाली.

प्रश्न हा कि सिंधू संस्कृतीचे निर्माते हे वैदिक आर्य हेच होते हे सिद्ध करण्याची निकड वैदिकवाद्यांना का भासते? त्यासाठी बोगस दावे आणि चक्क फोर्ज-याही का केल्या जातात? एतद्देशियांचे (हिंदुंचे) सांस्कृतिक संचित लुबाडत वैदिक सांस्कृतिक स्ववर्चस्वतावाद निर्माण करणे हाच एकमेव उद्देश त्यामागे आहे हेच त्यातून दिसत नाही काय?

1 comment:

  1. सुंदर मुद्देसूद लिखाण आहे,पण -
    पुराणकाळी भारत ही संकल्पना आणि त्याचा भूविस्तार किती , कुठपासून मानायचा हे एकदा विचारात घेतले की काय हाती लागते ते बघूया .
    वेदकाळात अफगाणिस्तान पाकिस्तान ब्रह्मदेश बंगला देश नेपाळ हे सर्व मिळून भारत होता यावर एकमत असावे .
    आर्य एकदम इराणातून आले आणि दिल्ली मगध असे पसरले आणि त्यांनी आपली तत्वे इतरांवर लादली असे थोडेच आहे ?
    कोणतीही लाट ही टप्प्याटप्प्याने येते , इराण इराक मधून इकडे त्यांचे येणे हेही अपरिहार्यच होते . त्यानंतर अनेक वर्षांनी पारशीही आलेच. एक मुद्दा आपल्याकडून समजून घ्यायचा आहे - आर्यानी येथील लोकांचा युद्धात पराभव केल्याचा काही सबळ पुरावा आहे का ? मुसलमानांनी तथाकथित हिंदूंचा पराभव केल्याचे आपल्याला माहीत आहे तसे वैदिक सत्ता भारतात पसरताना ती नेमकी कोणत्या प्रदेशात स्थिरावली ? दक्षिणेत त्यांनी कधी हातपाय पसरले ? महाभारत आणि रामायण हि आर्यपूर्व लोकांची इतिहासात्मक रचना आहे का ?संपूर्ण भारतात या कथा इतक्या एकजीवपणे कशा पसरल्या ? यद्न्य आणि आश्रम व्यवस्था ही आजच्या मिशनरी धर्तीवर चालवलेली चळवळ होती का ?आर्य क्रूर होते का ?आऱयांपूर्वी अफगाणिस्तानातून मवाळ वैदिक लाट आली असेल का ?
    असे अनेक प्रश्न मनात येतात
    मुख्य प्रश्न असा की आर्य आणि त्यांचा भारतातील प्रवेश हा हिंसेवर आधारित होता का ?आणि आर्यांचा विरोध हा सशास्त्रपणे झाला का ?त्याच्या काही खुणा इतिहासात दिसतात का ? परमपूज्य रा चिं ढेरे यांचे आत्ताच एक पुस्तक वाचनात आले .-त्रिविधा - वाचनीय आहे . त्यांची संशोधनाची पद्धत हि अस्सल संशोधकाची वाटते . आणि आपण इतकी प्रचारात्मक वैदिकांविरुद्ध अकारण आघाडी का उघडता त्याचे आश्चर्य वाटते . आपले लिखाण हे संशोधकांचे वाटत नाही याबद्दल खेड होतो .

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...